चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते. नवी साडी नेसून मिरवायला ‘ती’ला निश्चित आवडेल पण मुलांना कपड्याचे दोन जोड असावेत हे तिला महत्वाचं वाटतं. नटण्याची हौस ‘ती’लाही आहेच पण तिच्या कुटुंबाला आनंदात पाहून ‘ती’च्या चेहऱ्यावर उमटणार समाधान हाच तिचा खरा शृंगार! हि ‘ती’ म्हणजे अमुक एक स्त्री नसून तमाम ग्रामीण महिलांचा प्रातिनिधिक एक चेहरा.
महिला अर्थिक विकास महामंडळाच्या कामा निमित्त महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील ग्रामीण जीवन आणि विशेषतः ग्रामीण महिलांचं जीवन फार जवळून पाहण्याची संधी मिळाली. गावातल्या महिलांमध्ये बसून, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांचं जगणं खऱ्या अर्थाने अनुभवता आलं. जाताना गावातील महिलांबद्दल शहरी दृष्टीकोन घेऊन गेले असले तरी येताना मात्र गावातल्या ‘ती’च्या बद्दल एक थक्क करणारा अनुभव घेऊन मी परतले.
‘ग्रामीण भाग’ म्हणजे विकासापासून दुरावलेला भाग हि आपली समजूत आणि इथे विकासाची व्याख्या देखील आपापल्या सोयीनुसार बदलत जाते. पण मुळात ग्रामीण भागाचा, तिथल्या परिस्थितीचा, ग्रामीण जीवनाचा अभ्यास न करता तिथल्या विकासावर भाष्य करणं अयोग्य आहे हे तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर लक्षात आलं. आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा बरा जाईल ह्या चिंतेत गावातील कष्टकरी, शेतकरी वर्ग असताना आपल्या सो कॉल्ड विकासाच्या व्याख्येत ग्रामीण विकासाचं मोजमाप करण कितपत योग्य आहे...? अशा प्रकारे शहरी विकासाच्या मापदंडावर ग्रामीण विकास पडताळून पाहताना खरोखर चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची राहून जातेय हे गावात स्वतः भेट दिल्यावर मनापासून वाटत राहीलं. तिथली परिस्थिती, गावातील लोकांचा लहान-लहान गरजा पूर्ण करण्यासाठीचा संघर्ष आणि ह्या सगळ्यात विशेषतः महिलांची भूमिका प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पटल, त्यांच काम खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणूनच कुणाशीही बरोबरी न करता, कुठल्याही स्पर्धेत न उतरता गावातील ‘ती’ स्वतःचा तोडका मोडका संसार सावरण्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून ‘ती’च्या कर्तुत्वाला सलाम करावासा वाटला. परंपरेच्या नावाखाली ‘ती’ला दुबळं बनवणाऱ्या संकुचित मानसिकतेच्या पार जाऊन ‘ती’ खंबीरपणे उभी राहिलीये. डोईवरचा पदर ‘ती’ने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी निर्धाराने कमरेला खोचलाय. बचत गटाच्या माध्यमातून सुरु झालेला ‘ती’चा प्रवास आज खऱ्याखुऱ्या विकासाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय.
माविमच्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच गावपातळीवर सुरु असलेल काम खरोखर वाखाणण्याजोग आहे. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासात हे स्वयंसहाय्यता बचत गट फार मोलाची भूमिका बजावताय. वरवर पाहता अगदी सामान्य वाटणारे परंतु ग्रामीण महिलांच्या जगण्यात अमुलाग्र बदल घडवण्याच कसोटीचं काम हे गट करताय. ‘धनी’, ‘मालक’ जे चारदोन रुपये देईल त्यात तारेवरची कसरत करत घर चालवणारी ‘ती’ आज स्वतः नवऱ्याच्या बरोबरीने संसाराला हातभार लावतेय. मान खाली घालून उंबरठ्याच्या आत वावरणारी ‘ती’ आज आत्मविश्वासाने बचत गटाच्या बैठकीत सहभागी होतेय. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी बोलणारी ‘ती’ आज स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी जाब विचारतेय. चारचौघात बोलायला घाबरणारी ‘ती’ आज संपूर्ण गावासमोर गाणी, भजनं सादर करतेय. एकेकाळी जिच्या हातात स्वतःच्या घरातला व्यवहार देखील नव्हता आज ‘ती’ बँकेचे लाखो रुपयांचे व्यवहार अचूक करतेय. घराबाहेर पडताना परवानगी घेणारी नाही ‘ती’, आता सांगून बाहेर पडते. आधी तीही घरात होती, पण आज ‘ती’ आहे म्हणून घर आहे. हे आणि असेच असंख्य बदल ग्रामीण महिलांमध्ये घडले आहेत आणि हे घडवण्यामागे माविम चे अथक परिश्रम आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक पाठबळ न देता कुटुंबातील आणि समाजातील ‘ती’चं सन्मानाच स्थान तिला मिळाव यासाठी गेल्या चार दशकांपासून माविम महाराष्ट्रातील १०,४९५ गावामधील सुमारे नऊ लाख महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. ‘ती’ला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी ‘तेजस्विनी’ आणि ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ यांसारख्या परिपूर्ण योजना महिला आर्थिक विकास महामंडळ यशस्वीपणे राबवत आहे.
महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आदर्श महिला, यशस्वी महिला, यशस्वी महिलांच्या यशोगाथा अशा अनेक मथळ्यांखाली ‘ती’ आपल्याला भेटत असते. पण तिच्यातील ‘स्त्रीत्वाच्या’ सन्मानासाठी तिने निर्धाराने सुरु केलेला हा प्रवास ‘ती’ ची नवी ओळख निर्माण करणारा ठरेल.
प्रतिक्रिया
22 Apr 2015 - 11:47 am | भिंगरी
सुंदर ओळख करून दिलीस 'ती'ची.
22 Apr 2015 - 11:48 am | टवाळ कार्टा
लय भारी :)
22 Apr 2015 - 12:14 pm | पलाश
आवडलं!! हा लेख आणि हे ग्रामीण स्त्रीमधील सकारात्मक परिवर्तन, दोन्ही !!! :)
22 Apr 2015 - 12:18 pm | चौथा कोनाडा
टिपिकल परीघ सोडून उर्वरित स्त्री जगाचा धाण्डोळा आवडला. ओघवत्या शैलीमुळे लेख सुन्दर झालाय.
या विश्वात तुम्ही घेतलेले अनुभव नक्की वेअसणस्णार्णार.
जरूर इथे टाका.
22 Apr 2015 - 3:23 pm | प्रियंका देसाई
मिसळपाव वरच्या माझ्या पहिल्याच लेखाचं तुम्हा सर्वांकडून झालेल्या स्वागताबद्दल आभारी आहे...!
22 Apr 2015 - 2:45 pm | स्पंदना
वाद घालायचा नाही, पण संवाद म्हणुन साम्गते, मुकत व्हावं लागलं ते नागरी स्त्रीला. खेड्यातली ती पहिल्यापासून कष्टकरी असल्याने, नवर्याच्या खांद्याला खांदा लावुन राबत होती, शेतात राबल्याशिवाय पर्याय नव्हता हो तीला. आज उठुन सगळ्यांना तीला मुक्त करावसं वाटतयं, पण अजुन तुमचा शहरी समज बदलला नाही असच म्हणेन.
22 Apr 2015 - 3:20 pm | प्रियंका देसाई
तुझ म्हणण अगदि मान्य.पण नागरी भागात राहणाऱ्या प्रत्येकाला मुख्य प्रवाहातील माध्यमांची जशी साथ मिळते त्याची उणीव गावातल्या तिला नेहमी भासते. तिचे कष्ट अविरत चालत राहतील मग 'ती' गावातली असू देत किंवा शहरातली. हा प्रयत्न फक्त मला भेटलेल्या 'ती' ची तुम्हा सर्वांशी ओळख करून देण्यासाठी आहे. तुझ्या मोकळ्या संवादाबद्दल मनापासून धन्यवाद!
22 Apr 2015 - 3:09 pm | कविता१९७८
मस्त
22 Apr 2015 - 3:28 pm | हाडक्या
ऑ ?
कुठे नेऊन ठेवलाय मिपा माझा ???
(एवढं गोग्गोड ! ते पण एक दिवस वयाच्या लेखिकेच्या धाग्यावर ? देवा.. ऐसा दिन देखने से पयले मेरे कु किसी और संस्थळ पे क्यु नै लेके गया रे.. ;) )
22 Apr 2015 - 4:08 pm | जेपी
women empowerment
22 Apr 2015 - 4:09 pm | पीसी
'ती' शहरातली किवा खेड्यातली तिचे कष्ट अविरत चालत राहतील हे खर आहे.
22 Apr 2015 - 4:34 pm | सस्नेह
पण मग शेवटी काय झालं 'ती'चं ?
22 Apr 2015 - 5:01 pm | स्पंदना
आत्ता सुरवात हाय बाई!!
येवड्यातच "शेवट"?
कठीण बाई तुझं!
22 Apr 2015 - 5:31 pm | सस्नेह
सर्कारी प्रसिद्धीपत्रक वाचल्यागत वाटलं बाॅ लेख वाचून !
22 Apr 2015 - 5:36 pm | पॉइंट ब्लँक
+१
22 Apr 2015 - 7:18 pm | बॅटमॅन
बाकी स्पंदनाताई फारच स्पंदून स्पंदून प्रतिसाद देताहेत असे निरीक्षण नोंदवतो.
24 Apr 2015 - 1:12 pm | स्पंदना
स्पंदुन स्पंदून की स्फुंदुन स्फुंदुन???
नक्की ठरवं.
22 Apr 2015 - 7:22 pm | मधुरा देशपांडे
अगदी अगदी.
24 Apr 2015 - 11:34 am | कोंबडी प्रेमी
हेच म्हणीन
25 Apr 2015 - 6:28 pm | एक एकटा एकटाच
चांगला लेख आहे
25 Apr 2015 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
'ती'च्या प्रवासाचा आढावा आवडला ! लिहीत रहा.
'ती'चा प्रवास सुरु झाला हे नक्की आणि हे नक्कीच चांगले आहे. पण, अजून सरसकट बहुतेक सर्वच 'त्या' इतक्या सबल झाल्या नाहीत... तसे होईल तेव्हाच खरी प्रगती झाली असं म्हणता येईल.
या निमित्ताने कालच पंतप्रधान "सरपंच-पती" संबंधात काही म्हणाले ते आठवले. 'ती'चा मार्ग इतका साधा-सोपा-सरळ नाही, त्या मार्गात उघड/गुप्त खोडा घालणारे बरेच आहेत, हे नक्की. तरीही, कोणी उच्चाधिकारी व्यक्ती "सरपंच-पती" या वस्तुस्थितीचे आस्तित्व चक्क सार्वजनिकरित्या उघडपणे कबूल करते आणि त्याविरुद्ध बोलते, हे आशावादी लक्षण आहे.
25 Apr 2015 - 8:29 pm | एस
हा परिच्छेद लयच मोट्टा झालाय जनू. थोडा थोडा घास घेत निवांत वाचल्या जाईल! (झालं का आता मिपावर प्रांप्रिक पद्धतीने स्वागत?) :-)
30 May 2015 - 4:30 pm | papilon
उत्तम प्रवास !