‘ती’ चा प्रवास....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते. नवी साडी नेसून मिरवायला ‘ती’ला निश्चित आवडेल पण मुलांना कपड्याचे दोन जोड असावेत हे तिला महत्वाचं वाटतं. नटण्याची हौस ‘ती’लाही आहेच पण तिच्या कुटुंबाला आनंदात पाहून ‘ती’च्या चेहऱ्यावर उमटणार समाधान हाच तिचा खरा शृंगार! हि ‘ती’ म्हणजे अमुक एक स्त्री नसून तमाम ग्रामीण महिलांचा प्रातिनिधिक एक चेहरा.
महिला अर्थिक विकास महामंडळाच्या कामा निमित्त महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील ग्रामीण जीवन आणि विशेषतः ग्रामीण महिलांचं जीवन फार जवळून पाहण्याची संधी मिळाली. गावातल्या महिलांमध्ये बसून, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांचं जगणं खऱ्या अर्थाने अनुभवता आलं. जाताना गावातील महिलांबद्दल शहरी दृष्टीकोन घेऊन गेले असले तरी येताना मात्र गावातल्या ‘ती’च्या बद्दल एक थक्क करणारा अनुभव घेऊन मी परतले.
‘ग्रामीण भाग’ म्हणजे विकासापासून दुरावलेला भाग हि आपली समजूत आणि इथे विकासाची व्याख्या देखील आपापल्या सोयीनुसार बदलत जाते. पण मुळात ग्रामीण भागाचा, तिथल्या परिस्थितीचा, ग्रामीण जीवनाचा अभ्यास न करता तिथल्या विकासावर भाष्य करणं अयोग्य आहे हे तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर लक्षात आलं. आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा बरा जाईल ह्या चिंतेत गावातील कष्टकरी, शेतकरी वर्ग असताना आपल्या सो कॉल्ड विकासाच्या व्याख्येत ग्रामीण विकासाचं मोजमाप करण कितपत योग्य आहे...? अशा प्रकारे शहरी विकासाच्या मापदंडावर ग्रामीण विकास पडताळून पाहताना खरोखर चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची राहून जातेय हे गावात स्वतः भेट दिल्यावर मनापासून वाटत राहीलं. तिथली परिस्थिती, गावातील लोकांचा लहान-लहान गरजा पूर्ण करण्यासाठीचा संघर्ष आणि ह्या सगळ्यात विशेषतः महिलांची भूमिका प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पटल, त्यांच काम खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणूनच कुणाशीही बरोबरी न करता, कुठल्याही स्पर्धेत न उतरता गावातील ‘ती’ स्वतःचा तोडका मोडका संसार सावरण्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून ‘ती’च्या कर्तुत्वाला सलाम करावासा वाटला. परंपरेच्या नावाखाली ‘ती’ला दुबळं बनवणाऱ्या संकुचित मानसिकतेच्या पार जाऊन ‘ती’ खंबीरपणे उभी राहिलीये. डोईवरचा पदर ‘ती’ने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी निर्धाराने कमरेला खोचलाय. बचत गटाच्या माध्यमातून सुरु झालेला ‘ती’चा प्रवास आज खऱ्याखुऱ्या विकासाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय.
माविमच्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच गावपातळीवर सुरु असलेल काम खरोखर वाखाणण्याजोग आहे. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासात हे स्वयंसहाय्यता बचत गट फार मोलाची भूमिका बजावताय. वरवर पाहता अगदी सामान्य वाटणारे परंतु ग्रामीण महिलांच्या जगण्यात अमुलाग्र बदल घडवण्याच कसोटीचं काम हे गट करताय. ‘धनी’, ‘मालक’ जे चारदोन रुपये देईल त्यात तारेवरची कसरत करत घर चालवणारी ‘ती’ आज स्वतः नवऱ्याच्या बरोबरीने संसाराला हातभार लावतेय. मान खाली घालून उंबरठ्याच्या आत वावरणारी ‘ती’ आज आत्मविश्वासाने बचत गटाच्या बैठकीत सहभागी होतेय. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी बोलणारी ‘ती’ आज स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी जाब विचारतेय. चारचौघात बोलायला घाबरणारी ‘ती’ आज संपूर्ण गावासमोर गाणी, भजनं सादर करतेय. एकेकाळी जिच्या हातात स्वतःच्या घरातला व्यवहार देखील नव्हता आज ‘ती’ बँकेचे लाखो रुपयांचे व्यवहार अचूक करतेय. घराबाहेर पडताना परवानगी घेणारी नाही ‘ती’, आता सांगून बाहेर पडते. आधी तीही घरात होती, पण आज ‘ती’ आहे म्हणून घर आहे. हे आणि असेच असंख्य बदल ग्रामीण महिलांमध्ये घडले आहेत आणि हे घडवण्यामागे माविम चे अथक परिश्रम आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक पाठबळ न देता कुटुंबातील आणि समाजातील ‘ती’चं सन्मानाच स्थान तिला मिळाव यासाठी गेल्या चार दशकांपासून माविम महाराष्ट्रातील १०,४९५ गावामधील सुमारे नऊ लाख महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. ‘ती’ला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी ‘तेजस्विनी’ आणि ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ यांसारख्या परिपूर्ण योजना महिला आर्थिक विकास महामंडळ यशस्वीपणे राबवत आहे.
महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आदर्श महिला, यशस्वी महिला, यशस्वी महिलांच्या यशोगाथा अशा अनेक मथळ्यांखाली ‘ती’ आपल्याला भेटत असते. पण तिच्यातील ‘स्त्रीत्वाच्या’ सन्मानासाठी तिने निर्धाराने सुरु केलेला हा प्रवास ‘ती’ ची नवी ओळख निर्माण करणारा ठरेल.
प्रतिक्रिया
वा
लय भारी :)
आवडलं!! हा लेख आणि हे ग्रामीण
टिपिकल परीघ सोडून उर्वरित
मिसळपाव वरच्या माझ्या
वाद घालायचा नाही, पण संवाद
तुझ म्हणण अगदि मान्य.पण नागरी
मस्त
ऑ ?
women empowerment
आवडल...
अस्सं !
आगं
छ्या !
+१
+१११११११११११११
स्पंदुन स्पंदून की स्फुंदुन
+१
+१
आवडलं
'ती'च्या प्रवासाचा आढावा
लेख छान आहे. येवां, मिपा आपलांच आसां!
उत्तम प्रवास !