मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे.
पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत
१) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
२) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते!
मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला)
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्या जाणार्या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात.
१०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ.
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
प्रतिक्रिया
17 Aug 2008 - 1:00 pm | अमोल केळकर
पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
हे मात्र अगदी खरे
अमोल
(स्वगतः डॉक्टरांना बहुतेक पॅटीस खात खातच हे सुचलेले दिसते )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 Aug 2008 - 10:49 pm | भाग्यश्री
अगदी सहमत!! रविवारी सकाळी पॅटीस हे निरीक्षण सगळ्यात बेस्ट आहे.. बाकीचे ठीकठाक.. पुण्यामधेच लोकांना सगळ्या पाट्या, नावं वगैरे दिसतात.. बाकीच्या ठीकाणंचा कुठ्लाच किस्सा कधी ऐकला नाही.. असे किस्से शोधून लिहावं म्हणते.. पुण्याला किती वर्षं टार्गेट करणार.. ! दाढे डॉ. लेख छान आहे.. पण अतीपरिचयादवज्ञा म्हणतात तसं झालेला विषय आहे.. त्यामुळे कंटाळा आला..(मी अस्सल/अट्टल पुणेकर असल्यानेही असेल, मला नाही आवडत पुण्याला मजेतही नावं ठेवलेली..) :)
17 Aug 2008 - 11:47 pm | रेवती
छानच प्रतिसाद ग भाग्यश्री! धन्यवाद !
रेवती (पुणेकर)
17 Aug 2008 - 1:08 pm | अविनाश ओगले
एकदा एका पुणेकराच्या घरी गप्पा मारत बसलो असता ते 'बसा, चहा घेऊन येतो.' असे म्हणत आत गेले. मी चहाची वाट पहात बसलो. ते आत चहा पिऊन तोंड पुसत बाहेर आले. निरोप देतांना पुढच्या वेळी जेवायलाच या असे म्हणाले.
19 Aug 2008 - 5:31 pm | जनोबा रेगे
ही सर्व चर्चा आम्ही आमच्या इतिहासाच्या प्राध्यापक मित्रास दाखविली ते॑व्हा पुण्यात फार पूर्वीपासून कुचाळक्या आणि गप्पा॑चे अड्डे होते असे ते म्हणाले. आम्ही पुरावा मागितला असता त्या॑नी आम्हा॑स नाना फडणविसाच्या हातचे एक वाक्य दाखविले.." ह्या पुण्याच्या लोका॑ची स॑गत परमेश्वराने कुणाच्याही भाळी लिहू नये.." कारण ते॑व्हा म्हणे भा॑ग्या मारुतीच्यापाशी जमणार्या टवाळा॑नी नानाबद्दल खूप अफवा पसरविल्या होत्या व त्या॑ची दहशत खाऊन नाना मेणवलीला (त्या॑चे गाव) पळाले होते.
(अस्सल मु॑बईकर) जनोबा
17 Aug 2008 - 1:08 pm | मनीषा
१) पुणेरी लोकं चोखंदळ असतात... (पारखी नजर म्हणतात ना? तसे.)
२) कुठलेही कार्य गाजावाजा करुन करतात.. पण चांगले कार्य करण्यातही पुणेरी लोकंच आघाडीवर असतात.
३) एखाद्या न पटणा-या गोष्टीला जीव तोडून विरोध करतील... परंतु एखादी गोष्ट मान्य असेल तर कोणीही काहीही म्हणो त्याला पाठींबा देतील..
४) भाषा तुसडी असेल .. पण जे करतील त्यात सच्चे पणा असतो... (....कर, ...कर इ. लोकांसारखी तोंडदेखले गोड बोलून तोंडाला (दुस-यांच्या) पाने पुसण्याची कला पुणेकरांना अवगत नाही.)
५) मराठी नाटक, (शास्त्रीय, नाट्य, सुगम) संगीत, नृत्य या कलांना भरभरुन प्रतिसाद देतात.
६) पुणे -- विद्येचे माहेरघर ही ओळख आजही कायम आहे...
4 Mar 2009 - 12:52 pm | सागर
पुण्यात बर्याच चांगल्या गोष्टी आहेत.
रसिक प्रेक्षक पुण्यात जास्तच मिळतील ( सवाई गंधर्व पुण्यात होण्याचे महत्त्वाचे कारण हेही आहे)
१) पुणेरी लोकं चोखंदळ असतात... (पारखी नजर म्हणतात ना? तसे.)
पूर्णपणे सहमत :)
खरे सांगायचे तर पुण्यात आलेली व्यक्ती पुणेकर होऊनच जाते...
ते पुण्याचे वैशिष्ठ्यच आहे म्हणा ना..
(पुणेकर) सागर
अवांतर : "बाजीराव-मस्तानी" - हा मस्तानी या पेयाचा एक प्रकार आहे जो मला खूप आवडतो... गुजर मस्तानी हाऊस मधे छान मिळते ही... :)
17 Aug 2008 - 1:09 pm | सर्वसाक्षी
असे म्हणाल असा प्रकार मी पुण्यात पाहिला आहे (दुसरी कडे कुठे पाहायला मिळणार?)
जनसेवा दुग्धालयात फळ्यावर खडूने मोठ्या अक्षरात लिहिले होते
आंबा लस्सी
आंबा मिल्क शेक
मग खाली लिहिले होते = 'हे पदार्थ नाहीत'
जाता जाता -
पुण्यात
वाण्याच्या दुकानाला 'मिनी मार्केट' म्हणतात
मोठ्या दुकानाला 'सुपर मार्केट' म्हणतत
४ मजली इमारतीला 'हाईट्स' म्हणतात
७ मजली इमारतीला 'टॉवर' म्हणतात
याहून उंच इमारत असेल तर गच्चीवर लाल दिवा लावतात!
17 Aug 2008 - 1:13 pm | शेरलॉक होम्स
कॉल सेंटर मधील बलात्कार सगळ्यात जास्त पुण्यात
दारुचा जास्त खप पुण्यात
अपघात सगळयात जास्त पुण्यात
पुण्यात काय नाहि हो तर पुण्यात नीतीमत्ता नाहि बाकी सगळे आहे
17 Aug 2008 - 2:00 pm | चिन्या१९८५
वरील गोष्टीला माझा साफ विरोध आहे. अपघात सोडल तर इतर २ समस्या गेल्या काही वर्षातच वाढलेल्या आहेत्,ज्या पुणेकरांमुळे नाही तर बाहेरुन आलेल्यांमुळे वाढलेल्या आहेत.
17 Aug 2008 - 2:06 pm | टारझन
आमच्या पुण्याला नावं ठेवणारे इंग्लिश नाव वाले..
पुरावे द्या मग बोला .. ऊगाच उचलली बोट ,झोडला कळफलक नहा करू...
काही १-२ अपघातांना लग्गेच टॉपवर नेलं... साला दारू म्हणे पुण्यातच जास्त पितात... तुमच्या कडं बिलं असतील तर दाखवा बॉ...
बाहेरुन आलेल्यांमुळे वाढलेल्या आहेत.
चिन्या शी १०१% सहमत
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
17 Aug 2008 - 5:05 pm | सर्किट
जाता जाता
मुळचे पुणेकर (?) हे २००-३०० वर्षांपुर्वी कोकणातुन व महाराष्ट्राच्या इतर प्रांतातुन येवुन पुण्याच्या पेठांमधे राहु लागले. त्यामुळे बाहेरचे आतले जुने नवे असे काही नाही
सगळ्यांची जबाबदारी समान
जबाबदारी झटकता येणार नाही
सुधारणा सगळे मिळुन करावी लागेल
मारामारी तुन शुन्य निष्पन्न
17 Aug 2008 - 6:31 pm | llपुण्याचे पेशवेll
पेशवाईत पुण्यात आलेले लोक सोडले इतरही लोक पुण्यात पूर्वी पासून रहात होते(शिवाजी महाराजांचा काळ आठवा). झाली गोष्ट बलात्काराची तर त्याबाबतीतही मुलीच्या आणि तिच्या घरात राहणार्या तिच्या मैत्रिणिंच्या कथनात एकवाक्यता नाही. त्यामूळे बलात्काराच्या केसबद्दल इतर कोणत्याही गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत बोलणे निरर्थक आहे.
बाकी पुण्याबद्दल पुण्याबाहेरून येणारे लोकच खडे फोडत राहतात. :) ही गोष्ट पुणेकरांना नवीन नाही.
बाकी चालूदे.
पुण्याचे पेशवे
17 Aug 2008 - 10:55 pm | भाग्यश्री
बाकी पुण्याबद्दल पुण्याबाहेरून येणारे लोकच खडे फोडत राहतात. :) ही गोष्ट पुणेकरांना नवीन नाही.
सही रे पेशव्या!! हे एकदम खरे! माझ्या डोक्यात विचार येतो कधी कधी, पुण्याला जे बाहेरून येतात पुण्याच्या सर्व सोयी/चांगले हवामान इत्यादी गोष्टींचा लाभ घेऊन वर नावं पण ठेवतात, त्यांना त्यांच्या गावाबद्द्ल 'इतकं' बोललेलं कसं वाटेल ? हे इतकं महत्वाचं! इतकी वर्षं झाडताय पुण्याला, पुणेकरांची ते सर्व हसत खेळत घेण्याची वृत्ती नाही दिसली कुणाला!! (दाढे डॉ, हे तुम्हाला उद्देशून अजिबात नाहीये..पण विषय निघालाच आणि असे खूप महाभाग पाहीलेत म्हणून लिहीले..)
बाकी 'पुण्याच पेशवे' असल्यासारखा वागलास ते सही ! :)
17 Aug 2008 - 11:55 pm | चिन्या१९८५
टारझन्,भाग्यश्री आणि पेशव्या ,पुर्ण अनुमोदन.
आणि जे लोक स्वतः पुण्यात राहुनही स्वतःला 'पुणेकर' म्हणत नाहीत त्यांना आम्ही 'बाहेरचे' म्हटले तर काय चुकले???
बाकी पुणेकर असल्याचा मला जाज्वल्य अभिमान आहे
18 Aug 2008 - 10:19 am | डॉ.प्रसाद दाढे
जे लोक स्वतः पुण्यात राहुनही स्वतःला 'पुणेकर' म्हणत नाहीत त्यांना आम्ही 'बाहेरचे' म्हटले तर काय चुकले???
हे मला उद्देशून असेल तर चिनॉयशेट तुम्ही चुकत आहात. मी माझ्या लेखाच्या सुरूवातीसच स्पष्ट केल॑ की माझा जन्म पुण्याचा नाही पण गेली दहा वर्षे मी पुण्यात राहात आहे (व आता व्यवसायही करीत आहे). जसा तुला पुण्याचा जाज्वल्य का काय म्हणतात तसा मलाही अभिमान आहे. प्रस्तूत लेखाचा विषय पुणेकरा॑वर टीका कि॑वा त्या॑ची नि॑दा- नालस्ती नसून पुणेकरा॑चे वेगळेपण दाखविणार्या विस॑गती वा ग॑मती असा आहे हेही मी लिहिल॑ आहे. उदा. नाण्याला 'डॉलर' म्हणण॑! हे निश्चितच वेगळ॑ आहे, ग॑मतशीर आहे. पुणेरी पाट्या॑बद्दल ह्यापूर्वी इथे व इतर ठिकाणीही बरेच काही लिहिल॑ गेल॑ आहे पण अशा काही इतर गोष्टी॑वर मी तरी कुठे वाचले नाहीये. त्यामुळे वर कोणीतरी अतिपरिचयात अवज्ञा असे लिहिले आहे तेही वाचून मला मौज वाटली!
माझ्याच एका पेशन्टचा किस्सा सा॑गतो. के. कृष्णन नावाचे सत्तरीचे गृहस्थ त्या॑चे सगळे दात एक एक करून काढण्यासाठी माझ्याकडे येत असत. चार-पाच अपॉइ॑टमेन्टमध्ये मी त्या॑चे तो॑ड मोकळे करून दिल्यावर त्या॑चा माझा थोडा स्नेहही उत्पन्न झाला. गप्पा मारता मारता मला ते म्हणाले की 'माझ्यासारखी (म्हणजे त्या॑च्यासारखी) नॉन-मराठी माणसे पुण्यात खूप आहेत. मी पुण्यात गेली तीस वर्षे राहतो व आता पुणेकरच झालो आहे, पण डॉक्टर तुम्ही मात्र 'पुणेरी' आहात!' मी ही कॉ॑प्लीमे॑टच समजतो. तस्मात मीही एक पुणेरी पुणेकर आहे व त्यामुळेच खिलाडूवृत्तीचा आहे. ते॑व्हा पुणेकरा॑ची वैशिष्ठ्ये ऐकताना कि॑वा वाचता॑ना मला खूप ग॑मत वाटते (माझा जाज्वल्य का काय तो अभिमान डिवचला जात नाही). तेव्हा माझ्या पुणेकर बा॑धवा, असा नाराज होऊ नकोस :)
18 Aug 2008 - 6:59 pm | चिन्या१९८५
नाही डॉ.दाढे,तुम्हाला उद्देशुन लिहिलेल नाहीये. वर पायरो का मायरोनी जे लिहिलय त्याला उद्देशुन मी लिहिल होत. त्यांच म्हणन आहे की सगळे पुणेकर बाहेरचेच आहेत
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
18 Aug 2008 - 6:29 am | रेवती
पुण्याला जे बाहेरून येतात पुण्याच्या सर्व सोयी/चांगले हवामान इत्यादी गोष्टींचा लाभ घेऊन वर नावं पण ठेवतात
पण नुसत्या येण्याचं काय म्हणतेस, यांचे चरितार्थ चालतात, संसार, मुलेबाळे, ती मोठी होऊन लग्नंकार्य असे सगळं आयुष्यं पार पडतं तरी नावं ठेवणं संपत नाही असेही लोक भेटले आहेत मला.
रेवती
18 Aug 2008 - 10:39 pm | संदीप चित्रे
>> मुळचे पुणेकर (?) हे २००-३०० वर्षांपुर्वी कोकणातुन व महाराष्ट्राच्या इतर प्रांतातुन येवुन पुण्याच्या पेठांमधे राहु लागले.
अहो मग मूळचे भारतीय (?) हे सुद्धा कधी काळी आफ्रिकेतून इथे आले ना कारण मानव आफ्रिकेतून पुढे जगभर पसरला !!! :)
21 Feb 2009 - 8:09 am | चोरीराम कोतवाल
तुमच्या कडं बिलं असतील तर दाखवा बॉ...
कसले बिल दाखवताहेत त्यांना सवय आहे ताडीमाडीच्या दुकानात जाउन दिव्याहुन आलेली शिंदळी प्यायची, तिथं कोण देत बिलं?
बिल घ्यायची सवये आपण पुणेकरांना.
18 Aug 2008 - 7:55 am | अनिरुध्द
उगाच नाही ते कशाला स्विकारा. पुण्यामधे वाढलेल्या समस्या बाहेरील लोकांमुळेच झाल्या आहेत.
18 Aug 2008 - 10:40 pm | संदीप चित्रे
एकदम सहमत ....
4 Mar 2009 - 4:39 pm | सालोमालो
थोडा विचार करून बोला. immature statements करण्यासाठी हे व्यासपीठ नाही. स्वता:च्या नावाला तरी जागा. कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण करतायं.
सालो
17 Aug 2008 - 1:55 pm | टारझन
ओ डागतर... झकास पाइंट काडले राव .. हा.हा.मे. =))
पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे.
ह्ये आंक्षी बराबर हे ... पण म्हंत्यात ना "झाकली मुठ सव्वा लाखाची" .. मग हे स्कार्फधारक पोरी .. कितीही अतिसर्वसामान्य असली .. तिने स्कार्फ गुंडाळला की ती झाला कत्रिना ... हो.. पण हा पुण्याचा अँटिक नमुना आहे बरं का .... स्कार्फ फकस्त पूण्यात चालतो....
पुणेरी पाट्या राह्यल्या की राव. एकाने आपल्या घरासमोर पाटी लावलेली..
"ईथे पार्किंग करण्यास मनाई आहे... तरीही पहा, हा गाढव इथेच पार्क करतोय"
पुणेकराचं हिंदी पण बेष्ट असतं, एक पुणेरी हिंदी पाटी...
"यहा गाडी पार्क करोंगे, हमारे नाक मे दम करोंगे तो टायर मे हवा कम पाओंगे - हुकुमसे "
पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे.
पुणेरी पब्लिक ला पत्ता विचारा ... काही लोक एवढे मदतीला तत्पर असतात की एक वेळ.. बाबा क्षमा करा तुम्हाला पत्ता विचारला पण आता डोकं खाणं सोडा... पुणेरी माणूस कोणत्याही विषयावर शुन्य माहीतीवर देखील एखाद्याला चितपट करेल एवढे बोलू शकतो...
आत्ता एवढंच आजुन बराच थैला आहे ... पुलंनी आपल्या पुणेकर्,मुंबैकर आणि नागपुरकर मधे बरच कव्हर केलं आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
17 Aug 2008 - 2:16 pm | भडकमकर मास्तर
एक जराशी अतिशयोक्ती असलेला ...
आनंद इंगळेने सांगितलेला किस्सा, पुण्यात एक असे रेस्टॉरंटसुद्धा आहे, जे दुपारी १२ ३० ते २ ३० जेवणाच्या सुट्टीसाठी बंद असते....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Aug 2008 - 3:30 pm | अरुण वडुलेकर
पाव शॅम्पल किंवा शॅम्पल पाव हा पदार्थ फक्त पुण्यातच मिळतो.
पुण्यात पोलिसचौकीला गेट म्हणतात.
पुण्यात शाळा हा शब्द कसा वापरला जातो हे पुण्याला जाऊनच अनुभवावे.
17 Aug 2008 - 4:28 pm | अभिज्ञ
मध्यंतरी एका लेखात असे वाचले होते कि प्रत्येक राज्यात किंवा देशात एखादे ठिकाण असे असते कि
त्याबद्दल बाकिच्या लोकांना उगाचच हेवा वाटत असतो. का कुणास ठावुक...? ~X(
खुद्द अमेरिकेतहि हा प्रकार न्युयॉर्क च्या बाबतीत घडताना दिसतो.
न्युयॉर्ककरांविषयी एक अनामिक असुया बाकिच्या अमेरिकन लोकांमध्ये दिसून येते.
तोच प्रकार महाराष्ट्रात "पुणे" ह्या शहराबाबत घडताना दिसतो.
माणुस पुण्याचा आहे हे कळल्यावर समोरच्या माणसाच्या चेहर्यावरचे भाव लगेच बदललेले दिसतात. :?
पुणेकरांना छाप पाडण्याकरिता जास्त काहि करावे लागतच नाहि.
नुसतेच "पुणेकर" आहोत हे सांगितले कि मंडळि थोडि सावधच होतात.
अहो अन आम्ही पुणेकर आहोत हे सांगताना आम्हालाहि केवढा अभिमान असतो,भले आमचे कर्तृत्व काहि का असेना. ;)
पुणे,पुण्यातील संस्कृती,पुण्यातील हवामान,पुण्यातील पाउस,पुण्यातील रस्ते,पुण्यातील पाट्या,दुकानदार..
बोलण्याच्या,चालण्याच्या अन खाण्याच्या पध्दती..एक का दोन....अन जाता जाता महत्वाचे म्हणजे "पुणेकर".
ह्याविषयी आतापर्यंत एवढे लिहिले गेले आहे तरिहि पुणेकर आणि पुणे आपली घडण अजुन टिकवून आहेत ह्याचे मला
राहून राहून आश्चर्य वाटते.
विशेषत: मुंबईकर,ठाणेकर,विदर्भ,खानदेश,कोंकण, मराठवाडा ह्यातील जनतेला ह्या शहाराविषयी एक प्रकारची वेगळि
असुया असून देखील मनात खोलवर कुठेतरी ह्या शहराविषयी जिव्हाळा कायम आहे.
अहो,आपल्या शहराविषयी,गावाविषयी प्रत्येकालाच अभिमान असतोच,परंतु भले बाकिच्या शहरांबद्दल असो वा नसो ,
मराठी जनतेला पुणे शहराविषयी "मत" हे असतेच ,हे कोडे मला काहि उलगडलेले नाहि.
महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना
एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते.
(अनिवासी पुणेकर) अभिज्ञ.
17 Aug 2008 - 10:17 pm | रेवती
पुणेकरांना जसा जाज्वल्य अभिमान असतो तसाच अपुणेकरांना पुणेकरांबद्द्ल तिरस्कार असतो की काय असे वाटते, पण त्यात आता नविन काही राहीले नाही.
रेवती (पुणेकर)
17 Aug 2008 - 4:33 pm | भडकमकर मास्तर
त्याबद्दल बाकिच्या लोकांना उगाचच हेवा वाटत असतो.....अनामिक असुया
असुया शब्द वापरलास....
अभिज्ञा आता लोक हिंस्र होणार..... जपून र्हा रे बाबा.... :O
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Aug 2008 - 1:35 pm | यशोधरा
>>>....कर, ...कर इ. लोकांसारखी तोंडदेखले गोड बोलून तोंडाला (दुस-यांच्या) पाने पुसण्याची कला पुणेकरांना अवगत नाही
??
भांडारकर, परुळेकर यांची नावे ऐकली आहेत का हो तुम्ही मनिषा?? ही वानगीदाखल दिली आहेत...
18 Aug 2008 - 7:10 pm | मनीषा
मी मुंबईकर, नाशिककर, सातारकर अशी नावे ऐकली आहेत... (म्हणजे ज्यांच्या पुढे "कर " जोडावे अशी )
17 Aug 2008 - 6:46 pm | सखाराम बाइंडर
चालु द्या
उत्तम संकलन चालु
आमच्या विदा मधे चांगली भर पडत आहे सध्या
- सर्किट
17 Aug 2008 - 6:52 pm | डॉ.प्रसाद दाढे
एखाद्या न पटणा-या गोष्टीला जीव तोडून विरोध करतील... परंतु एखादी गोष्ट मान्य असेल तर कोणीही काहीही म्हणो त्याला पाठींबा देतील..
सहमत. हेल्मेटसक्तीला पुण्याइतका विरोध कुठेच झाला नसेल.
मराठी नाटक, (शास्त्रीय, नाट्य, सुगम) संगीत, नृत्य या कलांना भरभरुन प्रतिसाद देतात.
कलाकार जर पुण्यातलाच परिचित असेल तर प्रथमपासूनच जास्त टाळ्या पडतात. पण जर काहीसा अपरिचित कलाकार असेल तर सुरूवातीला थ॑डा प्रतिसाद असतो असे माझे निरीक्षण आहे. मी पुण्यातल्या खूपशा मैफीलीत पाहील॑य, कलाकार सुरूवातीलाच आम्हा॑ला पुण्यात गायच॑/ वाजवायच॑ बर॑च टेन्शन येत॑, इथले प्रेक्षक फार ओख॑दळ आहेत वगैरे बोलतात पण ग॑मत अशी की मी ह्याच कलाकारा॑ना ठाणे, डो॑बिवली, पनवेल, नागपूर इ. ठिकाणीसुद्धा हेच बोलता॑ना पाहिल॑ आहे! :)
अर्थात पुण्यात जाणकार व दर्दी प्रेक्षक खूप असतात हे मात्र खरे आहे.
पण हेच पुणेकर सवाई ग॑धर्व सारख्या कार्यक्रमात गाद्या घालून का झोपतात हे मात्र अनाकलनीय. अगदी मोठमोठ्या॑नी घोरतातसुद्धा! :) सगळे नाही हो झोपत पण सवाईमध्ये पुष्कळ लोक॑ पिकनिकला आल्यासारखीच बागडता॑ना मी पाहिली आहेत.
आणखी एक निरीक्षणः पुणेरीपणा हा जातीवार अजिबात वाटलेला नाहिये.. हे मुळा-मुठेचे पाणी जो कोणी पितो, तो तसाच बनतो :)
(एक खुलासा: प्रस्तूत दुव्याचा उद्देश कुणावरही टीका नसून दैन॑दीन (पुणेरी) जीवनात दिसणार्या विस॑गती व ग॑मती यातून मनोर॑जन हाच आहे.)
18 Aug 2008 - 3:41 am | मदनबाण
हे मुळा-मुठेचे पाणी जो कोणी पितो, तो तसाच बनतो
सहमत....
रिक्शावाल्यांचा अनुभव देखील अगदी जबराट आहे..या रिक्शावाल्यांच्या डोळ्यात बहुधा स्कॅनर असावा,,रिक्शात बसणार गिर्हाईक हे पुण्यातील नाही हे त्यांना लगेच कळते..आणि नंतर त्या गिर्हाईकाला आपण कसे गंडलो हे बर्याच उशीरा कळते.
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
17 Aug 2008 - 7:25 pm | गणा मास्तर
१. मी एम आय टी कॉलेजमध्ये नवीन आलो होतो तेव्हाची गोष्ट . पुणेकर मित्र म्हणाला चल चहा पिउन येउ. मी गेलो. साला त्याने नंतर चहाचे सुट्टे ३ रुपये मागुन घेतले.
२. पत्ता सांगण्यात अतितत्पर ...
३. आणि त्यांचे गाडी चालवणॅ म्हणजे....शब्दच नाहीत
17 Aug 2008 - 7:31 pm | विसोबा खेचर
दाढेसाहेब, सर्व मुद्दे अगदी चपखल व खुमासदार.. :)
लेख आणि प्रतिसाद वाचून अंमळ मौज वाटली.. :)
आपला,
(मुंबईकर) तात्या.
17 Aug 2008 - 7:51 pm | सखाराम_गटणे™
ग्राहकाला हाकलुन लावणारा दुकानदार विसरलात.
असल्या दुकानदारांना मी आयुष्यात विसरु शकत नाही,
काय खेकसतात ऐक ऐक !!!!!!!!!
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
17 Aug 2008 - 10:24 pm | प्रकाश घाटपांडे
पुणेकर, मुंबैकर कि नागपुरकर?
मपल्याला तर बाबा पुणेकर
प्रकाश घाटपांडे
18 Aug 2008 - 12:17 am | विजुभाऊ
पुणेरी पाट्या हा फक्त पुण्यातच भेटणारा प्रकार
परवा स्टेशन जवळ एक पाटी पाहिली
सायकल दवाखाना
आमचे येथे सायकल रीपेर करुन मिळेल ओव्हरओईल चेन स्पोक दुरुस्त करुन मिळेल
"मुळव्याधीवर रामबान औषध मीळेल"
सायकलची चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध यांची दुरुस्ती एकाच ठिकाणी होणारे जगातले हे एकमेव ठिकाण असेल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Dec 2008 - 5:00 pm | सातारकर
टिळक रोडवरच्या एका मिठाइ आणि दुधाचे पदार्थाच्या दुकानात "मुळव्याधीवरील औशध मिळेल" अशी पाटी आहे.
18 Aug 2008 - 1:41 am | आगाऊ कार्टा
लेख खूपच छान लिहिला आहे.
आपल्याला आणखी पाट्या येथे पाहता येतील.
18 Aug 2008 - 4:24 am | स्वांतसुखाय
पुणेकरांचे "हटेलेपन" पकडणारी चपखल उदाहरणे वाचायला मिळाली. एक सॅम्पल किस्सा सांगतो.
पुण्याच्या लोकांना मराठीचा जाज्वल्य अभीमान आहे. हे ठीकच आहे. पण ह्या अभीमानाच्या मागे हिंदी बोलता न येणण्याची बोच तर नसेल ना असे कधी कधी वाटते.
एकदा पुण्याच्या दुकानात आम्ही काही वस्तू खरेदी करायला गेलो. त्यावेळी सवयी प्रमाणे आम्ही दुकानदाराशी हिंदीत बोलत होतो. तो आम्हाला पुणेरी हिंदीत उत्तरे देऊन जाम वैतागला असावा. थोड्या वेळाने आम्ही जेव्हा एकमेकांशी मराठीत बोललेले त्याने ऐकले, तेव्हा त्याने सरळ अम्हाला डांट फटकारच केली. "तुम्ही मराठी आहात मग मघापासून माझ्याशी हिंदीत का बोलत आहात? आपण मराठी माणसांनीच मराठी वापरली नाही तर कसे होणार?"
पुणेकर टीकून आहे तोवर मराठीला मरण नाही.
18 Aug 2008 - 4:32 am | मुक्तसुनीत
स्वांतसुखाय ,
सर्वप्रथम मिपावर तुमचे मनःपूर्वक स्वागत !
तुमचा किस्सा वाचला. पुणेकर दुकानदाराने जे सांगितले यात त्याला "हिंदी बोलता न येणण्याची बोच तर नसेल ना" असे तुम्ही सुचवता. तुमच्या आणि तुमच्या मित्राचे काही चुकले आहे याची तुम्हाला काही जाणीव आहे/नाही याचे तुमच्या किश्श्यामधे एकही चिन्ह नाही. हा प्रकार मला थोडा मौजेचा वाटतो खरा. थोडे आत्मपरीक्षण केल्यास तुमचे नि तुमच्या मित्राचे काही चुकले तर नाही ना ? याचा थोडा विचार करावा असे मी तुम्हाला सुचवतो. पुणेकर दुकानदाराला हिंदी येत असो वा नसो , पण मराठी बाण्याला तो जागला हे अगदी १००% खरे. असे तुमच्या बाबतीत म्हणता येईल का ? राग मानू नका. पण तुम्हाला "हिंदी बोलता न येणण्याची बोच" दिसते. आम्हाला मराठी माणसे एकमेकांशी आणि हिंदी न येणार्या मराठी माणसाशी हिंदीत बोलतात याचे वैषम्य वाटते ....
18 Aug 2008 - 7:04 am | स्वांतसुखाय
तुम्ही म्हणता ते ही खरे आहे. पण पुष्क्ळ गोष्टींना फक्त एकच खरी बाजू नसते. वेगवेगळ्या कोनांतून पाहील्या तर इतरही सत्ये असू शकतात. आपण तक्रार करतो, चेन्नाई मधे स्थानीक लोक हिंदी येत असूनही हिंदीत बोलत नाहीत. मराठी ही आपली मातृभाषा आहे, तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रीय एकता साधण्यासाठी इतर अनेक गोष्टींबरोबर राष्ट्रभाषेचा प्रसार हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आता त्या कदाचित पुणेरी दुकानदाराला हिंदी चांगली येत नसेल. पण भाषा शिकण्याचा सर्वात छान उपाय म्हणजे भाषा वापरणे. जितकी जास्त वापराल, तेवढी जास्त शिकाल. चुकांमधूनच शिक्षण मिळते. मला येतच नाही म्हणून भाषा वापरलीच नाही तर कधीच शिकता येणार नाही. जपान मधे शळेत इन्ग्लीश शिकवतात. पण व्यवहारात वापरायची संधी मिळाल्यावर देखील बहुतांश लोक इन्ग्लीश येणार्या परदेशी लोकांशी देखील जपानी मधेच बोलतात. ह्यात जपानी भाषेचा अभिमान वगैरे नसून आपण इन्ग्लीश बोलतांना चुका करू अशी लाज असते. हे मला एका जपान्यानेच सांगीतले.
मला पुण्यालाच नावे ठेवायची नाही आहेत. असे इतर भाषांमधेही होते. मला इतकेच म्हणायचे आहे की मराठी बाण्याच्या कोषात गुरफटून आपण राहू नये. मराठीचा उत्कर्श व्हावा म्हणून आपण सारे मिपा सारख्या स्थळांवर योगदान देतच आहोत ना? पण मराठी पलीकडेही जग आहे!
18 Aug 2008 - 7:13 am | मुक्तसुनीत
"मराठी पलीकडेही जग आहे" यात कसली शंकाच नाही. आणि आम्ही आपल्या भाषेतच बोलू ; आम्हाला इतर भाषा , इतर भाषा आणि जगाच्या इतर भागातील ज्ञान नको असे माझे म्हणणे नाहीच. पण महाराष्ट्रात वावरताना, महाराष्ट्रीय व्यक्तिशी संभाषण करताना - त्या व्यक्तिला हिंदी "मोडकेतोडके"च येत असताना - मराठीत न बोलणे यात नक्कीच विसंगती आहे.
तुमच्या पहिल्याच पोस्ट मधे तुम्हाला भलतेसलते बोलण्याचा माझा उद्देश नव्हता. पण उपरोल्लेखित प्रसंगात तुम्ही बहुभाषिकत्त्वाचे योग्य तत्त्व अयोग्य ठिकाणी लागू करत आहात असे वाटले. आपल्या भाषेची लाज नको, त्या भाषेचा प्रसार साध्यासाध्या ठिकाणी - अगदी सहज शक्य असताना - थांबविण्याची गरज नाही इतकेच माझे म्हणणे :-)
असो. मिसळपाववर अशा प्रकारच्या चर्चांची रेलचेल असते. आपले मत तुम्ही आवर्जून नोंदवा :-)
18 Aug 2008 - 7:47 am | रेवती
मराठी पलीकडेही जग आहे!
आपल्या जगात असताना आपली भाषा वापरणे सोयीस्कर असते, तर पलीकडच्या जगात पलीकडची! जेंव्हा आपण पलीकडे जातो तेंव्हा चूकतमाकत शिकतोच. उदहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी परराज्यात, जेथे स्थानिक भाषेव्यतिरिक्त हिंदी बर्याच प्रमाणात वापरली जाते, तेथे मोलकरणीला हिंदी येत नाही म्हणून मला थोडीफार तेथिल भाषा शिकावीच लागली. असे असूनही तीने काही महीन्यातच काम सोडून दिले कारण एकदा ती आजारी आहे आणि औषध द्या म्हणाली व मला समजले नाही (माझी शेजारीण त्यावेळी घरी नव्हती). तसेच तेथे असलेल्या मराठी भाषिक भाजीवाल्याला जरा रागातच मी विचारले होते की तो माझ्याशी परभाषेत का बोलतो, जर त्याला माहित आहे की मी मराठी बोलते? घरी मात्र मी मराठीमध्येच बोलायचे आणि बोलते.
रेवती
18 Aug 2008 - 2:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठी ही आपली मातृभाषा आहे, तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.
यातला पहिला भाग बरोबर आहे, पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही!
यासाठी संदर्भावरून घेतलेला संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India
मला पुण्याचा जाज्वल्य अभिमान नाही, ना ठाण्याचा, ना मँचेस्टरचा! जिथे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं, जे विनोदी आहे त्यावर हसावं आणि वाईट आहे ते बदलता आलं तर बघावं!
उदा: पुण्यात मराठी लोकांच्या दुकानात सगळ्यात दुर्लक्षित वस्तू असते गिह्राईक, मी गुजराथ्याकडे/मॉलमधे जाते, पंपंल (पी.एम.पी.एम.एल.) बेकार आहे, मी सायकल्/स्कूटर चालवते, ठाण्यात जाऊन मला सर्दी होते तर मी दोन दिवसात परत येते, आणि माझ्याबरोबरच्या अमराठी लोकांना भाषेमुळे जी अडचण येते ती शक्य तेवढी सोडवायचा प्रयत्न करते.
डॉक्टरसाहेब, एक निरीक्षण राहिलंच, पुण्यातल्याच लोकांना तो जाज्वल्य वगैरे काय तो अभिमान असतो; बाकी ठाण्या, मुंबईतल्या लोकांना विचारा ते गर्दीला नावं ठेवतील, कलकत्तावासी भिकाय्रांच्या संख्येला, लंडनचे लोक हवेला आणि कुठकुठचे लोक कशाकशाला! पुण्यातले लोक म्हणूनच विचारतात "पुणं तिथे काय उणं?" आणि आम्ही "बाहेरचे, परप्रांतीय" म्हणतो ,""पुणं तिथे काय उणं?", सौजन्य, शिस्त, रस्ते, सार्वजनिक बस सेवा, मराठी सोडून इतर भाषांमधे बोलण्याइतपत प्रावीण्य,...." ... जाऊ दे, मी थोडं काम करतेच आता!
(बारा गावचं पाणी प्यायलेली) यमी
31 Dec 2008 - 7:17 am | संदीप चित्रे
तू दिलेल्या दुव्यामधे एक वाक्य आहे..
>> The official language of the Republic of India is Hindi, and its subsidiary official language is English.[7]
माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारची / संस्थांची पत्रके इ. हिंदी आणि इंग्रजीमधे वितरीत होतात. शाळांमधेही हिंदी ही 'राष्ट्रभाषा' म्हणूनच शिकवली जाते (जसा राष्ट्रीय पक्षी -- मोर, राष्ट्रीय प्राणी -- वाघ आणि राष्ट्रीय खेळ -- हॉकी !)
महाराष्ट्रात हिंदीच्या परीक्षा घेणार्या संस्थेचे नाव 'राष्ट्रभाषा प्रचार समिती' असे आहे.
दक्षिणेकडच्या राज्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली नाही तरी ती अधिकृतरित्या राष्ट्रभाषा आहे.
31 Dec 2008 - 7:07 am | संदीप चित्रे
दोन मराठी माणसांनी एकमेकांशी मराठीतच बोलायला काय अडचण असावी?
स्वांतसुखाय -- तुम्ही चेन्नईचे उदाहरण दिले की तिथे हिंदी बोलत नाहीत पण तिथे 'स्थानिक' भाषा (तमिळ) हटकून बोलले जाते हे मी स्वतः अनुभवलय.
(शेवटी असं आहे की भाषा लादता येत नाही... तुमच्यासारख्यांना मराठी माणसाशी जर हिंदीतून बोलावेसे वाटत असेल तर .....)
-----
अवांतरः जरा 'अभिमान' शब्द पाच वेळा लिहून काढाल का राव ? ह. घ्या :) !!
18 Aug 2008 - 10:48 pm | संदीप चित्रे
हा तर पुण्याच्या हिंदीपेक्षा भीषण प्रकार आहे... खरंतर तो हिंदीचा खून आहे !! शिवाय मुंबईत हिंदी भाषा पसरायला तिथल्या मराठी लोकांचा सक्रिय सहभाग आहे :(
मी हिंदी भाषेत बॅचलर स्तराची पदवी मिळवली आहे पण नेहमी वाटतं की मराठी माणसाने मराठी माणसाशी हिंदी / इंग्लिश बोलण्याने काय मिळतं ?
18 Aug 2008 - 6:04 am | प्राजु
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
या पॅटिस नामक पदार्थाला फक्त (आणि फक्त) पुण्यातच पॅटिस म्हणतात इतर शहरातून याला व्हेज पफ्फ असे म्हणतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Aug 2008 - 11:12 pm | देवदत्त
हे पॅटीस म्हणजे मुंबईतील किंवा इतर ठिकाण येथील रगडा पॅटीस मधले पॅटीस की आणखी वेगळे काही?
18 Aug 2008 - 11:42 pm | रेवती
देवदत्त,
दोन्ही वेगवेगळे आहेत, पुण्यातील पॅटीस म्हणजे बेकरीमध्ये मिळणारी खारी नावाचा जो पापुद्रे सुटलेला प्रकार असतो त्याच्या आत जर बटाट्याचे सारण भरलेले असेल तर जे काय होते ते (असे वाटते)
रगडा पॅटीस मधिल पॅटीस हा उकडलेल्या बटाट्यामध्ये मसाले घालून केलेला असतो. मी पुणेकर असूनही फारतर दोन किंवा तीनवेळा पॅटीस खाल्ला आहे तोही रविवारी नाही (म्हणजे मी पुणेकर नाही की काय?).
रेवती
19 Aug 2008 - 10:49 pm | देवदत्त
हं आठवले. मी पुण्याच्या ऑफिसच्या कँटीनमध्ये पाहिले होते. पण ते बहुधा वेज पफ्फच म्हणत होते. :)
20 Aug 2008 - 9:58 pm | प्रभाकर पेठकर
'व्हेज पफ्' हेच खरे नांव आहे. 'पॅटीस' हे मुळ 'पॅटीज्' चा अपभ्रंश आहे. 'पॅटी' (एकवचन) म्हणजे 'पॅट' करून (थोपटून) बनविलेली 'टीक्की' त्याचे 'पॅटीज्' हे अनेकवचन. बटाट्याच्या आवरणात 'सारण' भरून त्याचे तोंड बंद करून थोपटून ('पॅट' करून) चपटा गोलाकार आकार दिला जातो (जसा 'रगडा-पॅटीज्' मधील 'पॅटी'ला दिला जातो.) तो 'पॅटी', ज्याला दिल्ली कडे 'टीक्की' असे म्हणतात. पण 'टीक्की' मधे सारण असावेच असा आग्रह नसतो.
पुण्यातील 'पॅटीस' हे 'पॅटीज्' अजिबात नाही. ते 'व्हेज पफ्' च असते.
18 Aug 2008 - 7:57 am | अनिल हटेला
कुणी कितीही नाव ठेवली तरी ,
एक गोष्ट लक्षात घ्या ,माननीय मिपा करहो...
पुणे तीथे काय उणे !!!!
असो लेख आणी प्रतीसाद वाचुन मजा आली....
महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना
एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते.
हे अगदी चपखल बसते पुण्यातील चालकाना....
एक जोक !!!!
एकदा अमेरीकेत एक विमान वाईट हवामाना मुळे डोंगर द-यात भरकटते ...
आणी वैमानीक कौशल्य पणाला लाउन प्रत्येक डोंगर द-यातुन आडवे तिडवे कट मारून सुखरूप विमान तळावर घेउन येतो.....
त्याचा सत्कार केला जातो ,आणी हे कौशल्य कुठे आत्मसात केलस अस विचारल जात...
तो सहज म्हणतो," आधी ड्रायव्हर होतो पी एम टी त !!!"
आपलाच पक्का पुणेरी
(उपनगरीय १२+२ = MH 14 वाला)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Aug 2008 - 10:34 am | मराठी_माणूस
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ?
स्वतः च ठरवयाचे , स्वतः च आवर्जुन वारंवार वापरायचे (लिहिताना, बोलताना) आणि असे दाखवायचे कि हे सगळ्याना मान्य आहे .
18 Aug 2008 - 11:29 am | विसोबा खेचर
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ?
हा हा हा! हे बाकी अगदी खरं! :)
आपला,
(मुंबईकर) तात्या.
18 Aug 2008 - 1:26 pm | अनंत
(अरे पण हे कोणि ठरवले ?)
हा हा हा! १००% खरं आहे बरं का!!!
18 Aug 2008 - 1:37 pm | मनीषा
...कशाला ?आणि कोणी ?
वस्तुस्थिती आहे.. बदलत नाही ती कधी
18 Aug 2008 - 2:35 pm | टारझन
काय पण हे ? आहो कोणी एकाने नाही दिली ही पदवी .. उद्या म्हणाल टिळक स्वता:लाच लोकमान्य म्हणून घेत होते ...
आणि उगाच नाय मोठे साहित्यिक पुण्यात राहिले .. आणि काय हो ? कोणी जालना,यवतमाळ, गडचिरोली ला बरं नाही म्हटलं विद्येचे माहेरघर ? तुम्ही घेता का आवर्जुन विदर्भ,मराठवाडा नाय तर आंबेडकर युनिव्हर्सिटीत ऍडमिशन ? का येतं पब्लिक ईकडून तिकडून पुण्यात ?
असो .. माणूस आणि सहमत लोकांना (तात्यांना पण :) ) इनो घेण्याचा फुकटचा सल्ला !
जलो ... और जलो .. हमका बहुत मजा आता है ! हे सांगायची वेळ आली शेवटी .. -- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
18 Aug 2008 - 3:13 pm | मराठी_माणूस
हे म्हणजे , ब्रिटिशानि "sun never sets........" म्हणायचे आणि साळसुद पणे असे सांगयचे कि हे असे सगळे जग म्हणते
(अवांतरः ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज नाशिकचे, वि.स. खांडेकर सांगलि,शिरोडे,कोल्हापुर ह्या ठिकणि होते. हि यादि खुप मोठि होउ शकेल, मुद्दा एव्हढाच कि उत्तुंग व्यक्तिमत्व अन्यत्र पण होति , आहेत आणि असतिल )
18 Aug 2008 - 3:20 pm | विसोबा खेचर
असो .. माणूस आणि सहमत लोकांना (तात्यांना पण ) इनो घेण्याचा फुकटचा सल्ला !
आम्हाला कुणी सल्ला द्यायची गरज नाही. गरज वाटलीच तर तो आम्ही मागू!
आपला,
(दुनियेला फाट्यावर मारणारा मुंबईकर) तात्या.
18 Aug 2008 - 1:33 pm | यशोधरा
>>>अरे पण हे कोणि ठरवले ?
ठरवायचे काय त्यात? जे आहे ते आहेच!! :)
18 Aug 2008 - 1:52 pm | अनिल हटेला
सहमत !!
सत्य आहे ते !!
आणी ठरवणारे आपण कुणीही नाही !!
फार आधीपासुन हे सर्व मान्य आहे ...
आता कुणी नाही जरी मान्य केल ,
काही फरक पडत नाही...........
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 2:00 pm | विसोबा खेचर
आता कुणी नाही जरी मान्य केल ,
काही फरक पडत नाही...........
अरे वा! हे 'सागायची' वेळ आली का? छान छान! :)
18 Aug 2008 - 3:31 pm | अनिल हटेला
आरे पुण्या बद्दल इतकी असुया का बुवा लोकाना ?
काय समजत नाही.....
असो .....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 3:35 pm | विसोबा खेचर
आरे पुण्या बद्दल इतकी असुया का बुवा लोकाना ?
असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? :)
प्रचंड विनोदी प्रकार वाटला हा! :)
असो,
आपला,
(दलालस्ट्रीटवरचा मुंबईकर) तात्या.
18 Aug 2008 - 3:39 pm | मराठी_माणूस
असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही?
जबरदस्त, ह. ह. पु. =))
18 Aug 2008 - 3:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही?
तात्यांनू, लई भारी बोल्लात पहा. =))
मला एक समजत नाही लोकमान्य टिळक पुण्यात राहिले (कोकणात जन्माला आले) यात आजच्या पुणेकरांचं काय कर्त्तृत्व?
आणि पुण्यात (एन.एच.४ वर कुठेतरी, चिंचवडच्या जवळ) लिहिलं आहे, पुणं हे "पूर्वेचं ऑक्सफर्ड" आहे. आता कोणी कोणाचा पराभव केला? ऑक्सफर्डनी पुण्याचा का "पुणेय्रां"नी पुण्याचा?
आणि यावर माझे यच्चयावत मराठी, अमराठी, पुणेकर, "परप्रांतीय" मराठी, परदेशी सहकारी पोट धरून पुण्याच्या वर्णनावर हसतात.
(या विश्वातल्या, कन्या सुपरक्लस्टरमधल्या, आकाशगंगेतल्या, सूर्यमालेतल्या, पृथ्वीवरच्या, आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या, पुणे शहरातल्या, बाणेर गावातल्या, एका छोट्या घरात रहाणारी, नगण्य) यमी
18 Aug 2008 - 3:53 pm | अनिल हटेला
(या विश्वातल्या, कन्या सुपरक्लस्टरमधल्या, आकाशगंगेतल्या, सूर्यमालेतल्या, पृथ्वीवरच्या, आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या, पुणे शहरातल्या, बाणेर गावातल्या, एका छोट्या घरात रहाणारी, नगण्य)
गूड १ !!!
दिसतये ते !!
जी गोष्ट चांगली ,ती चांगली...
जिथे चुकतये ते चुकतये हे मान्य कधी करणार आम्ही , कुणास ठाउक !!
बाकी मी सुद्धा जन्माने फक्त पुण्याचा !!
आणी कर्तूत्त्वा म्हणाल तर सध्या काहीच नाही ...
म्हनुण मी सुद्धा तुमच्या सोबत उभाराहुन पुण्याच्या नावानी खडे फोडु शकतो....
ते जमत नाही आपल्याला ....
जे आहे जस आहे तस आहे ...
आणी हो हे जे तुमच लिखाण आहे ते जरा त्रयस्थ दृष्टीने वाचा मग समजेन मी अस वाक्य का बोललो "असुये विषयी"
पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 3:56 pm | विसोबा खेचर
पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये ....
अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य! ;)
आपला,
(तोंड दाबून हसणारा मुंबईकर!) तात्या.
18 Aug 2008 - 4:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य!
तात्या, ही सिक्सरच आहे ... एक नंबर! मानलं तुम्हाला! =))
काय आहे, अनिल हटेला, मी तर नगण्यच आहे, मोठेपणा दाखवणार कुठून! ;-)
पुण्यातल्या विक्षिप्त सवयींचंही कसा काय लोक समर्थन करतात कोण जाणे? :?
18 Aug 2008 - 4:46 pm | अनिल हटेला
यमी आजी !!
कदाचीत खरही असेन तुमच !!!
मोठेपणा विषयी न बोललेल च बर !!
ठीक हे !!
पुणे हेही इतर शहरा सारखे साधे सुधे आणी नगण्य शहर आहे !!!
ओ के ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 5:23 pm | टारझन
आन्याचे सर्व मुद्दे क्लास .. आमचं पुणं बेष्ट ... सगळ्या जगात ...
मी बर्याच ठिकाणी राहीलोय . तात्याच्या मुंबईत सुद्धा ! पण नको वाटली मुंबई...
हल्ली मुंबईतले लोक्स तळेगाव, लोणावळा आणि पुण्यात घर शोधतात म्हणे ...
पुण्याने सगळ्यांकोच भुरळ पाडी हय .. पण मान्य करने को तात्या एवं यमी आज्जी क्यो तयार नही हय ?
तात्या आणि यमी कडे सबळ मुद्दे नाहीत .. ते नुसतेच अपोज करत आहेत ...
असो ... आन्या अप्पन तेरे साथ है रे
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
18 Aug 2008 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी कधीही ठाणं किंवा मुंबई, किंवा कोणतंही शहर श्रेष्ठ आहे असं म्हटलं नाही आहे. कोणतंही शहर आयडियल होऊच शकत नाही. पण जेव्हा नावं ठेवायची वेळ येते तेव्हा मुंबईकरपण मुंबईतल्या गर्दिला नावं ठेवतो आणि लंडनचा माणूस खराब हवेबद्दल बोलतो.
मी पुण्यात आहे कारण तेव्हा radio quiet zone पुण्याजवळ (नशीबाने) सापडला आणि radio astronomers ना पुणे विद्यापीठामधे जागा दिली गेली.
पण याचा अर्थ पुणेरी लोक जर "पुणंच सर्वश्रेष्ठ शहर आहे" असा काढत असतील, बाहेरच्या लोकांनी दाखवलेल्या विसंगतींच चांगल्याच आहेत असं म्हणात असतील तर ते माझ्या दृष्टीनी हास्यास्पद आहे!
पुण्यातली लोकं तर पेठांच्या बाहेर पुणं आहे हे पण मान्य करत नाहीत, तर लोणावळा आणि तळेगाव तर फारच लांब आहेत ... फक्त पुणे जिल्ह्यात आहेत, तालुकापण बदलतो! बाणेरला रहाते म्हटल्यावर "किती लांब" एवढंच पुणेरी लोक म्हणणार, पण त्यामुळे मला जरातरी मोकळे रस्ते, कमी प्रदूषण आणि मुख्य म्हणजे प्रवासाला लागणारा कमी वेळ या गोष्टी त्यांच्या (पुणेरी, पेठांमधल्या) डोक्यात येत नाहीत.
आता लोकं "पुणेरी" गोष्टींबद्दलच बोलतात कारण, एकतर पुणेरी लोक स्वतःच रस्त्याला पडलेल्या सहा फूट खड्ड्याबद्दलही अभिमान व्यक्त करतात आणि दुसरं म्हणजे, पुणं हे एक जुनं, बय्रापैकी मराठी लोकांच्या वस्तीचं शहर आहे आणि बय्रापैकी विकसितही आहे. मुंबईमधे "भारतीय" (फक्त मराठी नाही) प्रतिबिंब दिसतं आणि नाशिक, (किंवा सातारा उदाहरणार्थ) एवढं जुनं, विकसित किंवा (दु:)अभिमानी लोकांचं शहर नाही.
(तुझी वैश्विक) यमी आज्जी!
18 Aug 2008 - 7:51 pm | सुनील
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
हाच काय तो जाज्वल्य की काय म्हणतात तो अभिमान?
बाकी वर यमी यांनी दिलेल्या सविस्तर प्रतिसादाशी १००% सहमत.
(मुंबईकर) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Aug 2008 - 8:38 pm | प्रगती
"असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? "
तात्या काय सिक्सर मारलात :D
18 Aug 2008 - 9:04 pm | अभिज्ञ
काय मुंबई ,ठाणे वगैरे दंगा चाललाय रे?
हे "मुंबई,ठाणे " वगैरे भाग पुण्यात कुठेशीक येतात?
इथल्या पुणेकरांपैकी कोणाला माहिती आहे का? ;)
(पानिपतची लढाई नक्की कुठे झाली ते माहित असणारा) अभिज्ञ.
अवांतर-
टार्या व अनिल हटेला ,
मस्तच किल्ला लढवलात.अभिनंदन.
(सर्वच जण ह.घ्या.)
19 Aug 2008 - 1:18 am | घाटावरचे भट
१) माझ्या मते 'पुणे तेथे काय उणे' असं म्हणण्याची पद्धत पेशवाईपासून चालू आहे. कारण पुणे हे त्यावेळी मराठी साम्राज्याचं केंद्र होतं. एक समृद्ध शहर होतं.
२) पुणेकरांप्रमाणेच स्वतःची वेगवेगेळी स्वभाववैशिष्ट्ये असलेले इतरही 'कर' आहेत (संदर्भः पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर बाय अवर ओन भाईकाका). त्यात फक्त पुण्याच्याच लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही.
३) मुंबई देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि एक बहुभाषिक शहर आहे. त्यात मराठी लोकांना आज पूर्वीचं महत्वाचं स्थान राहिलेलं नाही. त्यामानाने पुण्यात अजून परिस्थिती बरी आहे. पुणे निदान महाराष्ट्रातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं शहर आहे हे तरी मान्य कराल की नाही?
४) 'विद्येचे माहेरघर' वगैरे गोष्टीसुद्धा स्वातंत्र्याआधीपासून चालत आलेल्या आहेत. कारण विद्यार्जनासाठी लागणार्या महत्वाच्या संस्था पुण्यात होत्या आणि येत गेल्या (अगदी आयुकापासून वेदपाठशालेपर्यंत).
५) पुण्यातले खत्रूड दुकानदार, लेड्बॅक वातावरण याचं एकमेव कारण म्हणजे पुण्याची आर्थिक प्रगती तितक्या वेगाने झाली नाही. पण ही उदाहरणं आजकाल कमी होतायंत. (आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्यांकडेच जातो....भले मग ही मंडळी स्वतःला दलाल स्ट्रीटवरची नाहीतर वॉल स्ट्रीटवरची म्हणू देत... ह. घ्या :) )
६) पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक करायलाच हवं. केवळ नावं ठेवण्यासाठी नावं ठेवायची ह्याला काही अर्थ नाही.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
18 Aug 2008 - 9:52 pm | मुशाफिर
माझी चुलत आत्या पुण्यात राष्ट्रिय रासायनिक प्रयोगशाळेत (म्हणजे मराठीत N.C.L. हो ! :)) कार्यरत होती. ती ने सान्गितलेला हा किस्सा.
तीची आणि डॉ. मोहन आगाशे ह्यान्चि चान्गली ओळख आहे. पुण्यात असताना माझी आत्या जागेच्या शोधात होती. आणि याविषयी सहज बोलताना डॉ. तीला म्हणाले, "तू एक काम कर. त्या 'इतिश्री' सोसायटीत जागा बघ. तिथे बरेच पेन्शनर राहातात. ते तुझ्यावर आणि तुझ्या घरावर बारिक लक्ष ठेवतील. म्हणजे, त्यानाही दिवसभर काम मिळेल आणि तुझ्या घराचीहि देखरेख होईल. ती ही एकदम फुकटात!" :)
18 Aug 2008 - 9:57 pm | यशोधरा
म्हणजे पहा, पुण्यातले लोक कसे शेजारधर्माला जागतात ते!! :) नायतर तुमची मुंबै!! शेजारच्याचा खून झाला तरी कळत नै तुम्हाला!
18 Aug 2008 - 10:23 pm | मुशाफिर
पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, "पुणेकर व्ह्यायच असेल तर पुण्याविषयी जाज्व्यल्य अभिमान असायला हवा". तो हाच वाटत! ;) पण मला तर वाटल की , डॉ. आगाशे हे पुणेकरच आहेत. ;) मग त्याना ही गोष्ट का कळू नये? आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ???? :)
(मुळचा मुम्बैकर)
मुशाफिर
18 Aug 2008 - 10:35 pm | टारझन
एक नंबर बोललीस ..
अजुन एक ... मुंबैकरांकडे काही मुद्देच नाहीत, सगळी बेसलेस विधाने आहेत. आपण कधीही मुंबैच्या कोणत्याही गोष्टीला आक्षेप घेतलेला नाहीये.. पण कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात.
तात्या व त्यांची मुंबैकर गँग उगाच संख्याबळाच्या जोरावर बेसलेस मुद्दे उचलून धरत आहेत. जो मुंबैकर आणि पुणेकर नाही अशांना विचारले तर कमीत कमी ५१% मत पुण्याला पडेल असा अस्मादिकांना विश्वास आहे.
तात्या काहीही बोलले की बाकी स्पेक्टेटर्स नुसते बिनज्योत बुद्धु आणि शिक्सर शुमन प्रमाणे हसत आणि षटकार मारत आहेत. अरे ठोस मुद्दे मांडा ना राव. यमीचे मत तर बादच झालेले आहे. कारण तीला तर स्वर्गात सुद्धा काहीतरी त्रुटी आढळतील.
पुण्याचे हे महात्म्य साक्षात भाईकाकांनी मान्य केले आहे त्यामुळे तुम्ही आम्ही त्यावर गोदङी फाडुन उपयोग नाही.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
18 Aug 2008 - 10:34 pm | एक
मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली..
पण साहेब इथल्या काही माकडांच्या हातात कोलित मिळालं ना... ;)
जाऊ दे..पुणेकरांना माकडांची सवय आहे.. मारा शाब्दिक कोलांट्या उड्या आम्हाला मजाच येते आहे.
-पक्का जाज्ज्वल्य अभिमान असलेला पुणेकर.
18 Aug 2008 - 10:35 pm | संदीप चित्रे
डॉक्टरसाहेब ...
तुमची निरीक्षणशक्ती चांगली आहे पण काही गोष्टी पटल्या नाहीत ब्वॉ आणि काही गोष्टी अज्ञानातून आल्या आहेत असे वाटले.
एक अस्सल पुणेकर म्हणून काही निरीक्षणांवर मत व्यक्त करतोय --
>> १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
मी लहान होतो तेव्हा एक 'डॉलर' नावाचे चॉकोलेट मिळायचे. गोल बंदा रूपया असतो त्या आकाराचे आणि सोनेरी कव्हर असायचे. अजूनही मिळत असेल बहुतेक.
एक रूपयाचे नाणं आणि एक रूपयाची नोट ह्यातल्या फरकासाठी बोली भाषेत त्या चॉकोलेटवाल्या डॉलरचा संदर्भ वापरणं रूढ झालं !
>> २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
झोपडीलाही 'चंद्रमौळी' वगैरे शब्द आहेतच की ! पेशवाईचं गाव म्हटल्यावर एवढं तर होणारच :)
>> ५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
ही पाटी तर मुंबईतून पुण्यात आली .. माझ्या आठवणीप्रमाणे 'कला निकेतन' की अशाच कुठल्या तरी प्रसिद्ध दुकानाची जाहिरात होती !
>> ७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
जुनं पुणं (पक्षी: गाव) छोटं असल्याने ठराविक भागात ठराविक वस्तू मिळतात / मिळायच्या उदा. तांबट आळी, बोहरी आळी इ.
>> ८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
अहो पण 'कोणासाठी' चेहरा छान ठेवतात ते आपल्याला काय माहिती ? 'ज्यांच्यासाठी' इतका चेहरा छान ठेवतात, त्यांना दिसत असेलच ना :)
>> ११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
खरंतर हा प्रकार मी मुंबईत पाहिलाय... अगदी मुंबईकर मराठी लोकांना मी हे म्हणताना ऐकलंय की मुंबई शब्दात 'बाँबे'ची शान नाही यार ! अगदी ठाण्याचा माणूस जर चर्चगेट भागात गेला असेल तर म्हणतो, "जरा बाँबेला गेलो होतो' :)
(तसंच मुंबईचे लोक 'पुणे' म्हणण्याऐवजी 'पूणा' म्हणतानाही पाहिले आहेत !! )
18 Aug 2008 - 10:41 pm | यशोधरा
>>आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ????
नाय ब्वॉ!! उलट पहा बरं, त्यांनी पण कसं स्नेहीधर्माला जागून तुमच्या आत्त्याच्या लक्षात आणून दिलं की तिचा फायदा कशात आहे, त्याबाद्दल कौतुकच आहे त्यांचं :) पुण्यातली माणसंच अशी, माणूसकी जपणारी... :)
अवांतरः ठराविक भागात ठराविक गोष्टी मिळणं चांगलच की!! तुमच टाईम मॅनेजमेंट का काय ते होऊन जातय आपोआप!! जे हवय ते घ्यायला सगळीकडे सैरावैरा नको धावायला!! :)
18 Aug 2008 - 11:17 pm | मुशाफिर
पु. ल. नि म्हटलय तेच पुन्हा म्हणतो ! :).... बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू.
"मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय? :)
(जन्माने मुम्बईकर असणारा)
मुशाफिर :)
19 Aug 2008 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय?
एगजॅक्टली! आपल्या शहरातलं वाईट दाखवलं तरी यांना राग येतो! दुसय्राच्या डोळ्यातलं .....!
यमी ली! (from the middle of nowhere)
18 Aug 2008 - 10:51 pm | अभिज्ञ
बिचारे "कल्याण, डोंबिवली,ठाणे " कर जर स्वतःला मुंबईकर समजून घेत असतात,पण सच्चा मुंबईकर त्यांन "मुंबईकर" मानत नाहित त्याबद्दल काय?
अभिज्ञ.
अवांतर :
आमचा आक्षेप हा "पुणे व पुणेकरांना" विनाकारण टार्गेट करून लिहिण्यावर आहे.
बा़कि चालु द्यात.