ती आणि तो : भाग २

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 12:52 pm

(भाग १)

तिला शुद्ध आली तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतलं. ती रडायची थांबत नव्हती. तिला पुन्हा झोपवलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेले.

काही जवळचे लोक रात्रीच हॉस्पिटलमध्ये येउन गेले. पण त्यांना आणि बाकी सगळ्यांनाच असं सांगितलं कि तिचा एक अपघात झाला. आणि तिला शुद्ध नव्हती म्हणून लवकर समजलं नाही.

तिच्या अवस्थेकडे पाहून लोकांना शंका तर येत होती. पण कोणी उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण जेव्हा घरी पोलिस येउन गेले तेव्हा त्यांच्या शंकांवर शिक्कामोर्तबच झालं.

झालं असं होतं कि ती तिच्या एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू घ्यायला ऑफिसमधून घरी जाताजाता एका मॉलमध्ये गेली होती. तिथून निघाली तेव्हा पार्किंगमधेच कोणीतरी तिला मागून मारलं आणि गाडीत घालून कुठेतरी नेलं. तिच्या अर्धवट शुद्धीत तिने प्रतिकार करायचा बराच निष्फळ प्रयत्न केला. ते दोनजण होते एवढंच तिला आठवत होतं. त्या पुढचं तिला काहीच सांगता येत नव्हतं. हे एवढं सांगतानासुद्धा ती हमसून हमसून रडायला लागली होती.

या वर्णनावरून पोलिसांना तपासात काहीच मदत झाली नाही पण तरी आम्ही शोध घेऊ आणि काही तपास लागला कि कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं.

ती महिनाभर कुठेहि बाहेर गेली नाही. तिचा अपघात झालाय, मुका मार लागलाय आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय असं त्यांनी ऑफिसमध्ये आणि सगळीकडेच सांगितलं. पण तिला घरी भेटायला येणाऱ्यांचा यावर विश्वास बसत नाही हे लगेच कळायचं.

तो रोज ऑफिसनंतर तिला भेटायला जायचा. गप्पा मारायचा. तिला रडू आलं कि समजावून सांगायचा. पण कितीही समजावलं तरी कोणाचीच पुरती समजूत निघत नव्हती.

त्याचे आईबाबा तिला भेटायला म्हणून गावाकडून आले होते. ते तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या आईबाबांना काय बोलावं तेच समजत नव्हतं. अगदी अवघडल्यासारखे सगळे शांत बसले होते. ती त्याच्या आईला बिलगली आणि रडायला लागली. त्यांनी तिला धीर दिला. सगळं ठीक होईल असं सांगितलं. थोडा वेळ बसून ते निघाले.

त्याच्या घरी पोचले तेव्हा त्याचे आई बाबा एकमेकांना काहीतरी खाणाखुणा करत होते. काहीतरी बोलायला ते संकोचत होते.

शेवटी त्यानेच विचारलं "काय झालंय?"

आईने धीर केला, आणि विषयाला सुरुवात केली "मग आता काय विचार आहे तुझा?"

"कशाबद्दल?"

"अरे कशाबद्दल काय? लग्नाबद्दल."

"आई हि काय वेळ आहे का हा विषय काढण्याची. तिची तिच्या घरच्यांची अवस्था तू बघून आलीस ना?"

"अरे, तेच. तिच्याशी लग्न करायचं का यावर काय विचार आहे तुझा. तुम्ही सांगितलं नाही म्हणून काय आम्हाला काय झालंय समजत नाही का? आता अशा मुलीला आपण सून म्हणून कसं घरात घेणार?"

"अशी मुलगी म्हणजे? तिने काय केलंय."

"ते तू आम्हाला शिकवू नकोस. लोक काय बोलतील आपल्या कुटुंबाबद्दल?"

"मी असा विचार नाही केला अजून."

"मग कर. करावाच लागेल विचार. तुला स्वतःला तरी चालेल का अशी बायको? हे जे झालंय ते विसरू शकणार आहेस का तू?"

तो काहीच बोलला नाही.

"बघ बाबा, नीट विचार कर. आणि तुझं काहीका ठरेना, ती आम्हाला आमच्या घरात चालणार नाही एवढं आत्ताच सांगून ठेवते. थोडी चांगली वेळ बघ, आणि त्यांच्या घरी जाऊन सांग, हे यापुढे काही जाणार नाही म्हणून."

त्याला प्रश्नात पाडून ते निघून गेले. तसं त्यांनी काही नवीन विचारलं नव्हतं. हा प्रश्न त्याच्या जवळच्या मित्रांनी सुद्धा आडूनआडून विचारून झालेलाच होता. आईने थेट मुद्द्याला हात घातला इतकंच. आणि त्याच्या स्वतःच्या मनात काय होतं, हे त्याला काहीच कळत नव्हतं.

कथाविचार

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

21 Mar 2015 - 9:40 am | स्पंदना

वाचतेय.