हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा.
नुकतीच घडलेली एक घटना. माझ्या एका मित्राच्या घरी चोरी झाली. जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज घरातून चोरी झाला. मित्राने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून न घेता त्याला २ दिवसांनी ये, तोपर्यंत आम्ही तपास करू असे सांगितले. दुसर्या दिवशी मित्राला पोलिसांकडून फोन आला कि ताबडतोक पोलिस स्टेशन ला ये. तिथे गेल्यावर ते चोर सापडल्याचे कळाले. इन्स्पेकटर ने सांगितले कि हे एक लाख रुपये घे आणि हे प्रकरण इथेच मिटवून टाक. हीच तुला तुझी नुकसान भरपाई मिळाली असे समज. जर का तुम्ही कोर्ट आणि इतर प्रक्रिया करत बसलात तर तुम्हाला तुमचे चोरी गेलेले सामान मिळणे तर दूरच पण सगळ्या प्रक्रियेमुळे वैतागून तुम्ही स्वतःहून केस मागे घ्याल. तेव्हा मिळतेय ते घ्या आणि इथून सटका. त्यानंतर मित्राच्या समोरच त्या इन्स्पेकटर ने त्या चोरांना देखील सांगितले कि हे प्रकरण मिटवायला तुम्हाला मला देखील ५०,००० रुपये द्यावे लागतील. चोरांनी काहीही न बोलता ५०,००० रुपये इन्स्पेकटर ला देण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे १.५ लाखामध्ये हि केस मिटवली गेली. चोर मोकाट सुटले.. आणि सज्ज झाले पुन्हा नवी चोरी करण्यासाठी आणि जर सापडलेच तर पुन्हा नवीन इन्स्पेकटरशी सेटलमेंट करण्यासाठी .
वर वर पाहता हि घटना कदाचित क्षुल्लक वाटू शकते. पण अश्या प्रकारच्या घटना किंवा या पेक्षा देखील किती तरी मोठ्या घटना या रोज आपल्या देशात घडतात. किती तरी गुन्हेगार असेच उजळ माथ्याने फिरतात.
मला कधी कधी प्रश्न पडतो कि खरच आपण स्वतंत्र आहोत. ? भारतीय राज्यघटने मध्ये सांगितलेली न्याय समता स्वातंत्र्य बंधुता इ गोष्टी आज आपण उपभोगतोय..??? माझ्या मते भारत हा एक वाया गेलेला देश आहे. आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य कसे जगावे आपल्या हक्कांबाबत कसे जागरूक राहावे हे कधीच कळले नाही. कारण हा देश नेहमीच कोणाच्या तरी अधिपत्याखाली किंवा गुलामीखाली राहिलेला आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्य आमच्या रक्तामध्ये कधी भिनलेच नाही. इंग्रज सरकार गेले आणि भारतीय सरकार आले. किंबहुना गोरे केले आणि काळे आले. हाच काय तो फरक झाला. बाकी परिस्थिती जैसे थे. याच काळात स्वतंत्र झालेल्या इतर काही देशांकडे पहिले तर ते भारताच्या कितीतरी पुढे गेलेले दिसतात. आपण मात्र फक्त एकाच गोष्टीत पुढे गेलोय ती म्हणजे आपली लोकसंख्या. प्रत्येक वेळी राजकीय लोक " गरीबी हटाओ " सारखे लोकप्रिय नारे देऊन इथे सत्ता स्थापित करतात आणि आपल्या घरातील तिजोर्या भरण्याचे काम चालू करतात. रस्ते वीज पाणी निवारा इत्यादी मुलभूत सेवा देण्यात देखील आपण ६८ वर्षे प्रयत्न करून यशस्वी नाही, कोटी कोटी रुपयांची पैकेजेस जाहीर होतात पण प्रत्यक्षात गरीब जनतेपर्यंत एक रुपया देखील पोचत नाही. सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी वशिलेबाजी आहे. आणि याविरुद्ध आवाज उठवणार्या माणसांना हे लोक जीवे मारण्यात सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. आश्या समाज सुधाराकांना दिवसाढवळ्या मारले जात असेल तर आपण स्वतंत्र कसे?
या गोष्टीचे मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न जर केला तर कळेल कि या सर्व परिस्थितीचे मूळ हे प्रत्येक भारतीयाच्या मानसिकते मध्ये आहे. इथल्या लोकांना देश, देशप्रेम न्याय आपले हक्क कर्तव्ये आणि जबाबदार्या यांच्याशी काहीही घेण देण नाहीये. याचे ताजे उदाहरण सांगितले तर कदाचित तुम्हाला पटेल. आपले पंतप्रधान तिकडे ओरडून ओरडून सांगत आहेत कि स्वच्छता पाळा. पण कोणी मला पुण्यामधला एक तरी भाग दाखवू शकेल काय जिथे लोकांनी हि गोष्ट मनावर घेवून आपला भाग स्वछ ठेवला आहे. पहिले ३-४ दिवस नाटकी झाली. ती हि पेपर मध्ये आपला फोटो छापून येण्यासाठी पण पुढे काय.?? ये रे माझ्या मागल्या. माझी खात्री आहे कि असे १००० मोदी जरी स्वच्छतेच्या नावाने बोंबलले तरी भारतात काहीच फरक पडणार नाही. कारण इथल्या लोकांना कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावे हे खरच कळत नाही. म्हणजे एखादा साधा नगरसेवक जरी निवडून आला तरी त्याच्या ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतील पण एखादा मिलेट्रि मधला जवान सीमेवर पराक्रम गाजवून किंवा एखादे शौर्य पुरस्कार जिंकून आला तर त्याला कुत्र पण विचारत नाही गावी आल्यावर. भारतातील किती लोक सीमेवर शहीद झालेल्या जवानांबद्दल जागरूक असतात. एखादा जवान जर लढताना शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना किती मदत मिळते? एखादा माणूस गोर गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी भरीव कार्य करतो त्याला काडीचीही प्रसिद्धी किंवा मानसन्मान मिळत नाही. पण एखादी फालतू बातमी आपले लोक फार मनापासून वाचतात आणि त्यावर चर्चा करतात. जसे कि आमुक अमुक हिरोइन ने नुकतेच पळून जाऊन गुपचूप लग्न केले. आपल्या इथे लोक एखादा व्यक्ती गरीब भुकेला असेल तर त्याला अन्न देणार नाहीत पण गणपती दुध पितो असे समजल्यावर हजारो लिटर दुधाची नासाडी करतील. एखाद्या गरीब गरजू माणसाला १ रुपया देणार नाहीत पण तिरुपती बालाजी, शिर्डी अश्या ठिकाणी लाखोंची देणगी देतील. आपल्या जवानांनी शत्रू सैनिकांना किंवा अतिरेक्यांना जर ठार केले तर त्याबदाल कोणी बोलणार पण नाही आणि त्याचा कोणाला अभिमान पण नाही. पण भारताने पाकिस्तान ला क्रिकेट मध्ये हरवले तर मात्र इथे लोक दिवाळी साजरी केल्यासारखे आनंदाने वेडेपिसे होतात. भारतीय लोक क्रिकेट मैचेस चौका चौकात प्रोजेक्टर आणि पडदे लावून पाहतील. पण, नेमबाजी, बॉक्सिंग हॉकी बुद्धिबळ इ जागतिक दर्ज्याचे खेळ आणि त्याच्या खेळाडूंना कोणी ओळखत पण नाही.
भारतीय लोक हे आणखी एका गोष्टीत खूप पुढारलेले आहेत. ती गोष्ट म्हणजे "नियम मोडणे" . ज्या लोकांना आपले अधिकार आणि स्वातंत्र्य नीट माहित नाही. ते लोक आपली कर्तव्ये आणि जबाबदार्या तरी काय पळणार म्हणा. अगदी सध्या सध्या गोष्टीत देखील भारतातील लोकांचा मागासलेपणा लक्षात येतो.
एखादा व्यक्ती जर सिग्नल सुटायचा आहे म्हणून थांबला असेल तर मागच्या गाड्यांचे ड्रायवर होर्न वाजवायला चालू करतात. जसे कि यांच्या होर्न वाजवण्याने सिग्नल लवकर हिरवा होणार आहे. एखादा माणूस जर नियम पळत असेल तर त्याचीच अक्कल काढली जाते. एखादा माणूस जर रस्त्यावार थुंकला आणि आपण त्याला का थुंकलास म्हणून विचारायला गेलो तर इतर लोक आपल्या बाजूने उभे राहायचे सोडून "बहुतेक याचा स्क्रू ढिल्ला झालाय " अशी प्रतिक्रिया देतील . सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास बंदी आहे हे माहित असून देखील स्वतःच्या बापाचे राज्य असल्यासारखे झुरके मारत फिरणारे महाभाग पहिले कि पायतानाने त्याला झोढून काढावा असे वाटते. प्रत्येक गल्लीमधील रस्ता हा माझ्या मते बराच मोठा आसतो. एका वेळी २ वाहने आरामात जातील इतका. पण आपले लोक त्या रस्त्यावर आपल्या चार चाकी गाड्या दुतर्फा पार्क करून त्या मोठ्या रस्त्याची वात लावून टाकतात. अरे जर तुमच्याकडे पार्किंग साठी जागा नाहीये तर गाडी घेतलीत कशाला तुम्ही? रस्ता हा वाहुतुकीसाठी आहे. तुमच्या गाड्या पार्क करण्यासाठी नाही . या बद्दल कोणी बोलायला गेल तर आजूबाजूचे तुम्हाला च वेड्यात काढून हसतील. (मला अनुभव आहे ) . आजकाल पुण्यामध्ये कचरा गोळा करण्यासाठी गाडी येते. त्या गाडीमध्ये स्पीकर वरून सूचना होत असते कि तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक आहे असे नसेल तर रुपये ५००० दंड आहे. पण आमच्या इथे सगळे लोक हे मिक्स कचरा आणि तो हि प्लास्टिक च्या पिशवीमध्ये भरून त्या गाडीत टाकत असतात.
कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जा. प्रत्येक गोष्टीचे दर फिक्स आहेत. अगदी जन्मलेल्या मुलाल्चे रजिस्ट्रेशन करून त्याचा दाखला मिळवण्यासाठी पण चिरीमिरी द्यावी लागते. म्हणजे इथे आयुष्याची सुरवात च भ्रष्टाचार करून होते. वास्तविक पाहता सर्व शासकीय कामांना नियम आहेत. पण ते कोणीच पळत नाही. सर्व नियमबाय्ह कामे असे पैसे देऊन नियमात बसवून घेतली जातात. शासनाने अगदी हगन्या- मुतन्या पर्यंत नियम केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी हे विधी करताना जणाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगली पाहिजे. पण आपले लोक कुठेही हे विधी सुरु करतील. मुंबई मध्ये एकदा रेल्वेने सकाळी प्रवास करत असताना हे असे मोर आणि काही ठिकाणी लांडोरी पण रेल्वे रुळाच्या आजूबाजूला दिसल्या होत्या.
आपण विदेशातील लोकांबद्दल तेथील स्वच्छता , टापटीपपणा , रस्ते वीज आरोग्य आणि इतर सोयी सुविधांबद्दल नेहमीच बोलतो त्यांची स्तुती करतो. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या देशाकडे पाहतो तेव्हा काहीच वाटत नाही. साधी लाज पण वाटत नाही.
बोलायचे झाले तर हा विषय खूप मोठा आहे. पण व्यक्तिश: मला असे वाटते कि २०२० कि ३०२० पर्यंत देखील भारत प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. भारत हा एक वाया गेलेला देश आहे. जिथे लोकशाही फक्त नावाला आहे. स्वातंत्र्य समता न्याय इत्यादी विशेषणे फक्त संविधानामध्येच आहेत वास्तविक जीवनामध्ये नाहीत . भारत हा असा एक देश आहे ज्याच्याकडे खूप ताकद आहे पण आपण ती नको तिथे वापरत आहोत. कोणी काहीही म्हणो , मला मात्र कधी कधी भारतीय असल्याची लाज वाटते. जाता जाता नाना पाटेकर च्या एका सिनेमातील संवाद आठवतो
" सौ मे से अस्सी बेईमान.. फिर भी मेरा भारत महान "
*संपादित*
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 12:41 am | सांरा
हा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आला असणारच...
24 Feb 2015 - 1:00 am | संदीप डांगे
मला असा विचार करणार्या भारतीयांची (कधी कधी नाही) सतत लाज वाटते....
देशाची लाज वाटणार्यांनी सरळ देश सोडून निघून जावे किंवा कामाला लागावे...
निदान महिनाभर तरी देशोदेशीच्या स्थानिक बातम्या वाचाव्यात. आपण आहोत तिथे फार सुखी आहोत असे लक्षात येइल...
24 Feb 2015 - 1:16 am | बाप्पू
हा प्रतिसाद कोणतरी देणार असे वाटलेच होते....
आपल्याकडे एखादा अवगुण असेल तर त्याची लाज वाटणे हे स्वाभाविक आहे. आणि ते मान्य करणे आवश्यक आहे.
एखादी गोष्ट खराब आहे पण फक्त ती माझी आहे म्हणून तिला वाईट न म्हणता त्याचा अभिमान बाळगणे हे निश्चितपणे चुकीचे आहे. हि गोष्ट देशाला पण लागू होते.
मला कधी कधी भारतीय असल्याची लाज वाटते. आणि हा कधी कधी केव्हा येतो ते मी माझ्या लेखामध्ये स्पष्ट केलें आहे.
देशावर प्रेम करणे हि चांगली गोष्ट आहे. आणि ते माझे हि आहे. पण आंधळे प्रेम करणे हे निश्चितच वाईट.
24 Feb 2015 - 2:18 am | संदीप डांगे
बाप्पूसाहेब,
तुम्ही लिहलेल्या सर्व गोष्टी काही तुम्ही पहिल्यांदा लिहिणारे नाही की आम्ही वाचणारे पहील्यांदा वाचत आहोत असेही नाही. अशा पद्धतीचे लिखाण करणारांचा खरंच राग येतो. व्यक्तिशः घेऊ नका.
कोणताच देश परिपूर्ण नसतो. इतर देशांच्या इतिहासात, भुगोलात, समाजात आणि आपल्याकडे फरक हा असणारच. आपल्या देशात जे काही चांगले आहे त्याचा कुणीही, कधीही उदोउदो करत नाही. सर्वांचा आपला एकच आवडता टैम्पास: घाला देशाला शिव्या. म्हणजे आम्ही कित्ती जबाबदार, सुसंस्कृत आणि दक्ष नागरिक आहोत हा एक छुपा सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स मिरवत हा देश कसा आमच्या राहण्याच्या लायकीचा नाही वैगेरे गफ्फा बर्याच ऐकल्या आहेत. गंमत म्ह्णजे एका बाबतीत हे दुसर्यांना दोष देत असतात तेव्हा दुसर्या बाबतीत आपण चुकत आहोत हे त्यांच्या दुटप्पी स्वभावास अजिबात मान्य नसते. आपल्या आसपास सर्व थरात अशी हजारो उदाहरणे सापडतील. आपला समाज अशाच लोकांनी भरलेला आहे. आपणही त्याच समाजाचा एक भाग आहोत. त्यात लाज किंवा अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही. यथा प्रजा तथा व्यवस्था.
त्यातून 'तिकडे बघा, कित्ती छान छान आहे', हा एक वीट आणणारा प्रकार. त्या छान छान देशांमधल्या नागरिकांना कधी आपल्यासारखी, मला माझ्या देशाची अमूक एका गोष्टीमुळे लाज वाटते अशी, भूमिका घेतांना बघीतले आहे का? त्यांच्यातही काही अवगुण असतीलच की. तुम्ही वर नमूद केलेल्या समस्या थोडाफार फरकाने सगळ्याच देशात आहेत. एकच एक फूटपट्टी सगळ्यांना नाही वापरू शकत.
आता अशी वेळ आहे की ह्या लाज आणणार्या परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही-आम्ही काही करणार आहोत का? तर नाही. पुढच्या हजार वर्षातही हा देश बदलणार नाही असा तुमचा ठाम विश्वास. मागच्या काही दशकांमधे देश खूप बदलला आहे. काही मूठभरच लोकांनी तो बदलला आहे. अजूनही बदलत आहेत. बाजूला बसून शिव्या घालणारांची कमी कुठल्याच काळात नव्हती. सिग्नलवर लोक थांबतात, नाहीच असे नाही. त्यांना प्रोत्साहन द्या. नियम तोडणे हा आपल्या समाजात अंगातली रग दाखवण्याचा एक प्रकार आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असा माज आहे. दुर्दैवाने आपल्याकडे नियम पाळण्यासंबंधी होणारे प्रबोधन आर्जव प्रकारातले आहे किंवा दंडदर्शक प्रकारातले आहे. ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारण्याचा आपला राष्ट्रीय स्वभाव आहे. हा स्वभाव कसा बदलता येइल यावर उहापोह होणे याक्षणी आवश्यक आहे.
मला तुमचे वय माहीत नाही, पण आपण सगळेच अजून जास्तीत जास्त ५०-७० वर्षे जगू अशी अपेक्षा करतो. आता हा काळ कुरबुरी करत घालवायचा का काही ठोस करत घालवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. बाकी हा देश पुढच्या हजार वर्षात कसा असेल याच्याशी आपणास काय करायचे, तेव्हाचे लोक काय ते बघून घेतील. हजार वर्षांपूर्वी देश अस्तित्वात नव्हते, फक्त राजवटी होत्या. गेल्या तीनशे वर्षात देश ही संकल्पना मजबूत झाली, पुढेही असेच राहील असे काहीच नाही. बदल प्रत्येक क्षणी होत आहे. त्याचे कर्ता व्हा, नसेल जमत तर निदान साक्षीदार व्हा. निव्वळ पिंका टाकणारे टिकाकार होउ नका. त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होइल. आपल्याच पुर्वजांच्या काही चुकांचा त्रास आज आपण भोगतो आहोत. आपले वंशज असेच मग आपल्यालाही बोल लावत राहतील भविष्यात.
मग आता बोला, काय करता येइल देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी?
24 Feb 2015 - 11:13 am | मराठी_माणूस
ते जर आपल्या देशातील लोकांनी दाखवले तर लगेच तिथे गेलेले आपलेच बांधव त्यांची फुकट वकीली करुन ते कसे बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
हे असे समर्थन अतिशय चीड आणणारे असते.
24 Feb 2015 - 5:39 pm | बाप्पू
कोणताच देश परिपूर्ण नसतो. इतर देशांच्या इतिहासात, भुगोलात, समाजात आणि आपल्याकडे फरक हा असणारच.
तुमच्या या वाक्याशी सहमत. भारत किंवा कोणताच देश कितीही पुढे गेला किंवा मागे राहिला तरी तो कधीच परिपूर्ण होणार नाही. काही न काही कमी हि राहणारच
त्यांच्यातही काही अवगुण असतीलच की.
त्यांच्यात अवगुण आहेत म्हणून ते आपल्यात सुद्धा असले पाहिजेत असे नाही. आपल्यात ते आहेत कळल्यावर ते घालवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. आणि जो कोणी प्रयत्न करत असेल त्याला प्रोत्साहन देणे दूरच.. त्याची चेष्टा केली जाते.
मग आता बोला, काय करता येइल देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी?
१) वरील लेखामध्ये मी जे चोरी झाल्याचे उदाहरण दिले आहे त्यात मी काहीच केले नाही असे वाटते का?
ती घटना झाल्यावर मी त्या पोलिसांशी संपर्क साधला होता. आणि त्या चोरांना अटक करण्याची विनंती केली होती. कि ज्यामुळे पुढे होणार्या चोऱ्या टळतील. परंतु त्यांनी जे उत्तरदिले ते पुढीलप्रमाणे " अहो आम्हाला काय तेवढाच काम आहे का ? तुमची नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली ना ? मग विषय संपला ना तिथेच. आणि त्या चोरांना अटक झाली व FIR बनवली तर पुन्हा त्रास आम्हाला व तुम्हालाच आहे. कारण त्यांना कोर्टासमोर हजर करणे, पुरावे दाखवणे, वकिलांची मदत घेणे आरोप सिध्द करणे, दिलेल्या तारखांना हजर राहणे आणि मग शेवटी निकाल आपल्या बाजूने लागल्यावर त्यांना तुरुंगात घालणे हे सर्व काम तुम्हाला वाटते तितके सोपे आहे का? आम्ही जर हेच करत बसलो तर २४ तास कमी पडतील दिवसातले. "
त्यानंतर माझ्या मित्राने देखील जाऊदे हा विषय म्हून मला थांबवले.
२) त्यानंतर दोनच दिवसांनी आमच्या गल्लीतील एका दुकानदाराशी माझी भांडणे झाली. मला रोज दुपारी २ वाजता ऑफिस ला जावे लागते. कॅब माझ्या घरापाशी आल्यानंतर रोज ड्रायवर चे ऐकावे लागते कि सर तुमच्या इथे कॅब आणणे खूप अवघड आहे. रस्ता नाहीये. आणि जर आणली तरी पुन्हा रिवर्स घ्यायला खूप कष्ट करावे लागतात. इथे खूप अडचण आहे.
आता प्रत्यक्षात माझ्या घरापर्यंतचा रस्ता बराच मोठा आहे. दोन चारचाकी गाड्या एकदम जातील एवढा मोठा. पण रस्त्याच्या दुतर्फा लावल्या गेलेल्या चार चाकी गाड्यांमुळे रस्ता शिल्लक च राहत नाही. त्यामुळे रविवारी शेजारील दुकानदाराला ( वय वर्षे 3५) सांगायला गेलो कि
मी : अहो काका तुमची गाडी इथे पार्क करत जाऊ नका. खाली चौकात भरपूर मोकळी जागा आहे तिथे लावा किंवा बिल्डींग च्या मागे जागा आहे तिथे लावा,.
काका : अरे पण मी माझी कुठे लावावी हे सांगणारा तू कोण?
मी: अहो, रस्त्यावर अश्या गाड्या लावल्याने मला रोज ऑफिस ला जाण्यास त्रास होतो. इथून गाडी रिवर्स घेता येत नाही.
काका : अरे माझी गाडी मी माझ्या दुकानासमोर लावतोय ना.. तुझ्या दारात तर येत नाही ना. मग तू मला विचारणारा कोण ?
मी: अहो पण हा रस्ता सरकारी आहे. वाहतुकीस अडथळा होतोय.
एव्हाना शेजारचे २-३ लोक पण गोळा झाले.
काका : हे बघ शाहण्या, इथे कोठीही नो पार्किंग चा बोर्ड लिहिलेला नाहीये. आणि मीच एकटा गाडी इथे लावतोय का? या लाइन ला सगळी लोक आपल्या घरासमोरील रस्त्यावर गाडी लावतायेत. त्यांना का नाही सांगत हे तुझे तत्वज्ञान. ?
हा डायलॉग ऐकल्यावर जमलेल्या २-३ जनांना हसायला आले. प्रत्यक्षात त्या लोकांनी मला सपोर्ट करायला हवा होता पण ते राहिले बाजूला.. माझीच थट्टा चालली होती. काही ना बोलत शेवटी मी तिथून निघून गेलो.
आता सांगा. काय अजून काय करायला हवे होते मी या दोन प्रसंगात? हेच नाही तर असे अनेक प्रसंग मी अनुभवलेत.
इथल्या लोकांना सुधारायचे नाहीये आणि जे लोक प्रामाणिकपणे सुधारणा करू पाहतायेत त्यांना इथले लोक दीड शहाणा असा पुरस्कार देतात. त्यामुळे इथे तत्वज्ञान सांगणे काही कामाचे नाहीये. झोपलेल्याला जागे करता येत.. झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. त्यामुळे खरच "हा देश वाया गेलेला आहे"
हा देश एक दिवस नक्की बदलेल पण तो दिवस आत्तापर्यंत यायला हवा होता. कारण तेवढी क्षमता आपल्यात होती. पण ती नको तिथे वापरली गेली.. आणि आजूनही तेच होतोय. त्यामुळे तुम्हाला आम्हाला हवा असलेला भारत लवकर अस्तित्वात येईल असे वाटत नाही.
24 Feb 2015 - 7:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हवा सोडुन द्यायची =)) एक दिवस त्याची अडचण झाली म्हणजे त्याला समजेल.
बाकी चौकापर्यंत चालत गेलात तरी फारसा त्रास तुम्हाला आणि कॅब ड्रायव्हरला होणार नाही.
24 Feb 2015 - 7:55 pm | हाडक्या
हे जोक म्हणून किंवा जशास तसे म्हणून ऐकायला ठिक वाटतं पण तुम्हाला हा मार्ग योग्य वाटतो का ? आपले सामाजिक वर्तन दुसर्यास त्रासदायक नसावे, कोणी ते निदर्शनास आणून दिल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून वर्तनात सुधारणा (या वेळेस शक्य नसेल तर पुढच्या वेळेस) अशा अगदी सामान्य गोष्टी लहान्पणापासून नकोत का रुळायला की पोरांना टायरची हवा कशी घालवावी याचे प्रशिक्षण द्यावे.
यांचे सगळेच मुद्दे पटणेबल नसले तरी भावनिकता समजून घेवून (आणि वगळून) कमीत कमी चर्चा तरी व्हायला काहीच हरकत नाही.
24 Feb 2015 - 8:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सद्ध्यातरी विनोदानी म्हणालोय. पण,
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण त्रास सहन करुन घेउन सहिष्णुतेनी वागु शकतो. त्यापलीकडे जाऊन त्याला योग्य धडा शिकवणं हाचं एक मार्ग उरतो.
24 Feb 2015 - 8:01 pm | संदीप डांगे
त्यांचे अवगुणांबद्दल नाही हो बोलत मी. त्याची लाज वैगेरे वाटण्याबद्दल बोललो. उगाच वडाची साल का पिंपळाला लावायची.
बाकी प्रतिसादातल्या स्पष्ट मुद्द्यांवर चर्चा होऊ द्या. शब्द वेचून तुम्हाला सोयिस्करपणे लिहिता येईल तसे लिहू नका. दोघांचाही गोंधळ होईल.
पहिल्या उदाहरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली तरीही आपण किंवा आपल्या मित्राने ती गोष्ट 'स्वतःला जास्त त्रास होऊ नये' म्हणून सोडून दिली. पोलिसांनी तरी वेगळे काय केले? त्यांनी तुम्हाला नियमबाह्य काम करायला सांगितले, तुम्हीही ते केले. आता इथे तुम्ही जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडण्यास कमी पडला आहात. असेच बरेच सुजाण नागरिक 'जाऊ दे' म्हणून सोडून देतात. त्यामुळे पोलिसांचे फावते. तुम्हाला वाटते तशी न्याययंत्रणा सोपी कधीच नसते. इकडून नाणं टाकलं की भस्सकन कोक-पेप्सीच्या बॉटल सारखा न्याय बाहेर येत नाही. अगदी अमेरिका असली तरीही.
दुसर्या उदाहरणात तुम्ही स्वतःचे हसे करून घ्यायची काही एक आवश्यकता नाही. मीपण यातून गेलो आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून रितसर तक्रार करा. पण हे होणार नाही कारण वरचेच. फारच राग आला असेल अन जास्त वेळ नसेल तर रस्त्यावर बेवारस गाड्यांना काय काहीही होउ शकते. इथे जरा आपला सुसंस्कृतपणा सोडून लातोंके भूत च्या म्हणीवर विश्वास ठेवावा. जरा नुकसान झाले की गुमान ठेवतील आपल्या गाड्या नीट जिथल्या तिथे.
वरीलप्रकारचे अनुभव सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच येतात. पण वेळ नाही म्हणून आपण ते सोडून देतो. छान छान देशांमधले लोक सर्वस्व सोडून देतात आणि पाहिजे तो बदल घडवण्यासाठी अहोरात्र झटतात. त्यांनी घेतलेले ते कष्ट आपल्या लोकांना दिसत नाहीत फक्त सोयी-सुविधा दिसतात. त्यामुळे असे व्हायचेच. रामसेतू बांधायचा तर प्रत्येकाने एकएक दगड टाकत नेला आहे. वर्षानुवर्षे चळवळी चालवाव्या लागतात तेंव्हा कुठे त्याची फळे मिळतात. माहितीचा अधिकार अशाच वेड्या लोकांमुळे आपणास मिळाला अहे. कारण त्यांनी "जाऊ दे" म्हटले नाही.
आज मुंबईची जी कचरापेटी झाली आहे त्याचे एकमेव कारण लोकांना वेळ नाही. आपल्याच शहराला, जिथे आपण राहतो, खातो पितो, त्यालाच नीट ठेवण्यासाठी वेळही नाही आणि इच्छाशक्तीही नाही. नेते-पुढार्यांची ढाल पुढे केली की आपला नाकर्तेपणा झाकून दुनियेला अक्कल शिकवायला मोकळे.
एक साधे उदाहरण स्टेशनबाहेरच्या फूटपाथवरच्या फेरीवाल्यांचे घेऊ या. जर जनतेने इथून एकही वस्तू विकत घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली तर कोण मूर्ख तिथे धंदा टाकून बसेल? बरं फेरीवाल्यांच्या विरूद्ध बोटे मोडणारी जनता ज्या दिवशी स्वतःला काही घ्यायचे असते तेंव्हा हटकून तिथूनच घेणार.
25 Feb 2015 - 11:26 am | मराठी_माणूस
एकाला त्याच्या सुधारणेच्या प्रयत्नाचे काय फळ मीळाले ते इथे वाचा
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Bandra-man-gets-a-broken-...
25 Feb 2015 - 5:19 pm | बाप्पू
हाच मुद्दा मला लेखात मांडायचा होता. आपल्या बातमी मुळे तो आता पुराव्यानिशी सिद्ध झाला.
धन्स मराठी_माणूस.
25 Feb 2015 - 6:55 pm | संदीप डांगे
बरं मग आता काय?
24 Feb 2015 - 9:40 am | जेपी
आता अशी वेळ आहे की ह्या लाज आणणार्या परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही-आम्ही काही करणार आहोत का?
आणी,
मग आता बोला, काय करता येइल देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी?
भलत्याच अपेक्षा बॉ तुमच्या!! अस काय करायच नसत..
(स्वार्थी) जेपी
24 Feb 2015 - 10:40 am | आकाश कंदील
मला बाप्पू यांचे बोलणे पटले, जर मला आजार बारा व्हावा असे वाटत असेल तर आधी मला तो आजार आहे हे मान्य केले पाहिजे, मग रोगावर उपचार होईल.
मला वाटते संदीप डांगे साहेब यांना भ्रष्टाचार, बेशीस्त, कायद्याचे उल्लघन करणे यासारख्या गोष्टी आपल्या समाजात आहेत आणि त्या वाईट असून बदल्या पाहिजेत असे असे वाटत नसावे किंवा त्या त्यांच्या आयुष्याच्या भाग असाव्यात. म्हणून असल्या गोष्टीच्या समर्थनार्थ ते बेगडी देशप्रेमाचा पुळका दाखवतात.
असे लोक आणि 'कोपर्निकस', 'डार्विन' सारख्या विद्वानांना शिव्या घालणारे सारखेच
24 Feb 2015 - 2:42 pm | संदीप डांगे
भाऊ, जरा प्रतिसाद नीट तरी वाचावे, कुणावरही व्यक्तिगत आणि बिनबूडाचे आरोप करतांना. तुम्ही ह्या काय चार महान ओळी खरडल्या आहेत माझ्याबद्दल त्याआधी माझ्या त्या लांबलचक प्रतिसादाचा एक 'श्रीगुरुजी स्टाइल' प्रतिवाद करा. त्यात दा़खवा माझ्या प्रतिसादात, तुम्ही म्हटले आहे ते कुठेतरी ध्वनित झाले आहे का?
दुसरं असं की तुमचा व्यवसाय, नोकरी किंवा तुमच्या आई-वडीलांपैकी कुणीही जर नोकरी व्यवसाय केला असेल तर त्यांनी किंवा तुम्ही आयुष्यात एकदाही 'काय करणार, सिस्टीमच तशी आहे त्यामुळे करावे लागते' किंवा 'जगरहाटी अशीच आहे, असेच करावे लागते' असे म्हणून एकदाही बेइमानी, भ्रष्टाचार केला नसेल तरच इतरांच्या आयुष्याचा कोणता भाग काय आहे याच्याबद्दल काहीही टिप्पणी करण्याचा तुम्हास हक्क आहे. आईवडील यासाठी की त्यांच्या पुण्यपापाचे आपण कारण किंवा उत्तराधिकारी असतो.
आजार आहे हे पार तुकाराम महाराजांपासून लोक सांगत आले आहेत हो, आणि आम्हाला ते मान्यही आहे. आजार बरा करण्यासाठी हे तथाकथित सुसंस्कृत लोक वाचाळ्पणा करण्यापलिकडे काय करतात हे आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल.
आमचा मुद्दा नपुंसक चीड, राग आणि लाज येण्याबद्दल आहे. या देशात निव्वळ अराजकच आहे, गोंधळ माजलेला आहे असा एकांगी दि़खावा उभा करणार्या लोकांविरूद्ध बोलणे बेगडी देशप्रेम असेल तर असो बापडे. तुम्ही तुमच्या लाजेत, रागात डुंबत राहा.
हे लोक येता-जाता ह्या देशाला शिव्या घालत असतात आणि भ्रष्टाचार, बेशीस्त, कायद्याचे उल्लघन करणे यासारख्या गोष्टींना भर्पूर हातभार लावत असतात. अशा दांभिक लोकांचं काय करायचं बोला? मागच्या दहा वर्षात घडलेल्या एकूण एक भ्रष्टाचार, बलात्कार, दंगे अगदी यांच्या तोंडपाठ असतात. पण त्याचवेळी भारतीयांनी केलेल्या किमान ५० तरी चांगल्या गोष्टी, लावलेले शोध, सरकरी निर्णय याबद्दल विचारले तर थोबाडात खेटर बसल्यासारखे गप्प बसतात असा अनुभव आहे.
बाद'वे, वादाशी संबंध असो नसो, कोपर्निकस, डार्विन वैगेरे शब्द वापरले की आपण सुसंस्कृत, हूच्च्भ्रू, विचारवंत, व्यासंगी, अभ्यासू वैगेरे वैगेरे असल्याचा सॉल्लीड फील येतो, नाही?
24 Feb 2015 - 1:02 pm | चौकटराजा
कोणताच देश परिपूर्ण नसतो. सबब भारत देश ही नाही. भारतापेक्षा गुन्हेगारीचे प्रमाण अमेरिका, युरोप या प्रगत भागात जास्तच आहे. ( इथे आकडेवारी मात्र देता येत नाहीय याबद्द्ल दिलगीर ) . भारत देशात जर मोठी समस्या असेल तर
प्रामाणिकपणा व प्रशासन या दोन्हीचा प्रचंड अभाव. मग ते पोलीस असोत, गॅस एजन्सी असो की इलेक्ट्रीक सप्लाय वा
आय एस पी. मी सरकारी नोकरी सहा वर्षे केली व खाजगी नोकरी २२ वर्षे. माझे ठाम निरिक्षण असे आहे की भारतात तुम्ही जितके आळशी व अप्रामाणिक असाल तितके वरिष्ठ होण्याचे तुमचे चान्सेस अधिक. प्रामाणिक असाल तर काहीसे यश हे खाजगी धंद्यात येउ शकते इतकेच. पुण्यातील चितळे स्वीट गाडगीळ सराफ ही त्याची उदाहरणे आहेत.
24 Feb 2015 - 4:51 pm | हाडक्या
चौरा काका, अगदी थोडक्यात बैलाचा डोळा टिपलात..
आम्ही सकल सामाजिक दांभिकता म्हणतो ती हीच. :)
24 Feb 2015 - 5:41 pm | बाप्पू
तुमच्याशी सहमत चौकटराजा..