मरायचं नाय बे...!!
कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय ,
फासावर जाय नाहीतर औषध खाय ,
लय बेनं इपितर बायलच हाय.. सालं..
मरायचं नाय बे , मरायचं नाय ||धृ||
गेलं खरीप गेलं रब्बी सारं गेलं जाऊ दे ,
धट्टा-कट्टा पिळदार शरीर मागं राहू दे |
चिलं-पिलं गोड कशी पिवळी हाय बाय ...
मरायचं नाय बे , मरायचं नाय ||१||
दारू पेऊन भैतानं शिव्या लय दे S तं ,
गांजाचा धूर सालं बका-बका घे S तं |
या परीस कुठतरी मजुरीनं जाय...
मरायचं नाय बे , मरायचं नाय || २ ||
लिडरायच्या मागं सालं शेपटीगत फिरतं ,
दारू मटणासाठी त्याचा जयजयकार करतं |
घाम गाळ रताळ्या कष्टाचं खाय ...
मरायचं नाय बे , मरायचं नाय || ३ ||
तुही-मही काळीमाय लई मया करते ,
खंडीभर माणसाचं पोट कसं भरते..?
एकट्याच्या जीवासाठी लागतच काय ..?
मरायचं नाय बे , मरायचं नाय || ४ ||
बँकेचं रिन काढलं , आता भरू नको,
इमान नगं सोडू सालं तसा मरू नको |
कष्टाची भाकर-भाजी ठेशासंग खाय ...
मरायचं नाय बे , मरायचं नाय || ५ ||
* * *दिलीप वि. चारठाणकर, सेलू [ परभणी ]
Dilip Charthankar धन्यवाद...विनंती की व्यथित कषटकरयापर्यंत पोचवावी...!!
(श्री दिलीप वि. चारठाणकर यांच्या विनंतीला मान देवून, त्यांच्या पूर्व परवानगीने मिपावर प्रकाशित)
प्रतिक्रिया
11 Dec 2014 - 6:51 pm | चुकलामाकला
चरचरीत वास्तव! .......
12 Dec 2014 - 12:06 pm | वेल्लाभट
सुरेख ! मरून काय होतंय बे !
वाह ! वास्तव आहे; दाहक आहे; पण तरीही मरायचं नाय बे !
12 Dec 2014 - 4:25 pm | सिरुसेरि
असाच काहीसा संदेश पूर्वी एका समाज प्रबोधनपर गीतामध्ये ऐकला होता . त्यातील काही ओळी अशा होत्या -
" जमीन , जुमला , गोठ्यातली गाय , विना कारण कधी विकायची नाय .
मौजेत सुदधा ताडी न माडी , आल्या गेल्या संगे प्यायाची नाय .
गावकीत आपल्या ठरलच हाय रे ठरलच हाय "