जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 Nov 2014 - 9:59 pm

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
सर्व वाचकांना धन्यवाद!


मदतकार्यामध्ये देशभरातील कार्यकर्त्यांचे योगदान

६ ऑक्टोबरच्या रात्री‌ अनेक कार्यकर्ते भेटले. त्यापैकी एक जण कर्नाटकच्या मंड्याचे अर्जुन होते. देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण डॉक्टर होते, तर हे इंजिनिअर होते. सर्व जण त्यांच्या धडाडीने आणि मेहनतीने प्रभावित झाले. रात्री अर्जुननी मदतकार्यासाठी आणखी एक पाऊल पुढे जात जवळजवळा सत्तर हजारांचा चेक दादाजींना दिला. दादाजींनी त्यांना विचारलं इतके पैसे कशाला, त्यावर ते म्हणाले, 'कारण ते माझ्या खात्यामध्ये आहेत.' काही‌ करण्याची इतकी तळमळ आणि तीही सहज! खरोखर असेच लोक देश घडवू शकतात. . .

७ ऑक्टोबरला भल्या पहाटे साडेतीन वाजता सगळे जण श्रीनगरला निघण्यासाठी तयार आहेत. आज अनेक डॉक्टर लोक परत जातील. वस्तुत: सेवा भारती आणि एनएमओ (नॅशनल मेडिको ऑर्गनायजेशन) ह्यांनी एक तीन दिवसीय (३ ते ५ ऑक्टोबर) आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. पूराच्या बदलेल्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये आणखी कित्येक डॉक्टर सहभागी झाले. आज हे सर्व डॉक्टर्स परत जात आहेत. आपापल्या वेळेप्रमाणे लोक येत आणि जात आहेत. इथे एक गोष्ट दिसली की, सर्व डॉक्टर एकत्र काम करत आहेत. त्यांपैकी काही पस्तीस पस्तीस वर्षांचा अनुभव असलेले एचओडी आहेत आणि अनेक इंटर्नशिप करणारेही डॉक्टर आहेत. परंतु आता सर्व जण एक होऊन टीमप्रमाणे कार्यरत आहेत. आज जम्मूमध्ये ह्यांचीच मीटिंग आहे ज्यामध्ये परत जाणारे कार्यकर्ते आपले अनुभव शेअर करतील.

पहाटे चार वाजता तीन एम्ब्युलन्स रेसिडन्सी‌ रोडवरच्या आश्रमातून निघाल्या. काही लोकांना उठवायला बराच त्रास झाला. . . पण वेळेत सर्व निघाले. आता थंडी बरीच वाढलेली आहे. तीन दिवसांपूर्वी बरीच कमी होती. अंधारातच पुलवामा आणि शोपियाँपर्यंत प्रवास झाला. शोपियाँ सफरचंदांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे दोन हजार मीटर उंचीवरील हे रमणीय गाव आहे. परत जाणा-या साथीदारांनी इथे बरीच सफरचंद खरेदी केली. पेट्रोल पंप शोधण्यातही बराच वेळ गेला. पेट्रोल पंप होते अनेक, परंतु सकाळची वेळ असल्याने उघडलेले नव्हते. खरोखर आपत्तीनंतर एका महिन्यामध्ये स्थिती सामान्य करण्याचे मोठे प्रयत्न चालू असलेले दिसतात.

शोपियाँपासून पुढे प्रसिद्ध मुघल रोड सुरू होतो. इथून निसर्गाचा अविष्कार सुरू होतो. पीर की गलीपर्यंत रस्ता पंचेचाळीस किलोमीटर सरळ वर चढत जातो. पीर पंजाल रांगेमधून हा रस्ता जातो. वातावरण अत्यंत थंड आहे. जवळजवळ हिमवृष्टी होण्याइतका थंड. मुघल रोडवर काही ठिकाणी मिलिटरीचे चेक पोस्टस आहेत. असे ठिकाण आले की सर्व जण मिळून 'जय हिंद! आर्मी ज़िंदाबाद' म्हणत आहेत! हे ऐकून जवानांच्या चेह-यावर स्मित उमटत आहे. पीर की गलीनंतर परत उताराचा रस्ता आहे.

सोबतचे कार्यकर्ते आपापले अनुभव शेअर करत आहेत. त्यांपैकी अनेक जण गुजरातच्या भावनगरचे आहेत. आपले अनुभव सांगत आहेत. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीकोनानुसार परिस्थितीकडे बघत आहेत. काही लोग काही अनुभवांमुळे बरेच नाराज आहेत. काही ठिकाणी आरोग्य शिबिर घेताना थोडा वादसुद्धा झाला. काही कश्मिरींच्या मनामध्ये असलेल्या कडव्या भावनांचा अनुभव काही जणांना आला आहे. हे सर्व ऐकताना मनामध्ये परत परत प्रश्न पडतोय की, लोक एक दुस-याला इतके वेगळे का मानतात? काही जणांना दोन आणि दोन चार आहेत हे का कळत नाही? आणि इतक्या प्रतिकूल भावना कशामुळे?

मनात हे विचार चालू असतना एक छोटी गोष्ट आठवली. एक फकीर रस्त्याने जात होता. एका मोठ्या झाडाजवळून तो जात असताना झाडाची एक छोटी फांदी नेमकी त्याच्यावर पडली. एक क्षण तो थबकला आणि मग पुढे गेला. एक माणूस जवळून त्याचे निरीक्षण करत होता. त्याने काही विचार केला आणि मग दुस-या दिवशी जेव्हा तो फकीर त्याच मार्गाने येत होता, तेव्हा त्या माणसाने त्याच्यावर एक दगड फेकला. एक क्षण फकीर दचकला आणि त्याने त्या माणसाकडे बघितलं. मग काहीच न बोलता तो पुढे निघाला. आता त्या माणसाला राहवले नाही आणि त्याने फकिराला थांबवून विचारले, 'तू काल शांत राहिलास कारण झाडावरून फांदी आपोआप पडली होती. पण आज मी तर तुला जाणून बुजून दगड मारला. तरी तू‌ शांत का राहिलास?' त्यावेळी फकीर म्हणाला, 'एका क्षणासाठी हाच विचार माझ्या मनात आला होता. झाडावरून फांदी पडणे हा योगायोग होता. मग माझ्या लक्षात आलं की, तू असा विचार करणं आणि मला दगड मारणं हासुद्धा तसाच योगायोग तर आहे! आणि जर मी झाडावर रागावलो नाही, तर तुझ्यावरसुद्धा रागवण्याचे काही कारण नाही!' कदाचित अप्रिय गोष्टींबद्दल कसा विचार करावा हेच ही कथा सांगते. . .

. . . छोट्या छोट्या ठिकाणांहून जाणारा हा रस्ता बाफ्लियाज़ला पूँछच्या सुमारे किलोमीटर अंतरावरून दूर जाऊन थाना मंडीच्या मार्गाने राजौरीकडे जातो. आता डोंगर उतरायचा आहे. राजौरीनंतर नौशेरा, अखनूर आणि जम्मू! अखनूरजवळ चिनाब नदी बघून विश्वास बसत नव्हता की, ह्याच नदीने थोड्याच दिवसांपूर्वी बरंच नुकसान पोहचवलेलं आहे. आता नदी एकदम शांत वाहते आहे. तवी नदीसुद्धा एकदम छोटी झालेली आहे.

जम्मूमध्ये सेवा भारतीच्या कार्यालयात पोहचताना दुपारचे चार वाजले आहेत. सेवा भारती कार्यालय अम्बफला भागामध्ये आहेत. जवळच मिलिटरीची अनेक कार्यालये आहेत. सेवा भारती कार्यालय परिसरामध्ये विद्या भारती, राष्ट्रीय सीक्ख संगत आणि जम्मू कश्मीर स्टडी सेंटर अशा संस्थांचेही कार्यालय आहेत.

संध्याकाळची मीटिंग एक अनौपचारिक संवाद होता. सगळे मनमोकळ्या प्रकारे एकमेकांसोबत बोलत आहेत. सेवा भारतीतर्फे अनेक सिनिअर लोक आहेत. पण ते भाषण न करता एक एक कार्यकर्त्याला समोर बोलावून अनुभव सांगायला सांगत आहेत. आणि कार्यकर्त्यांने केलेले कामही सांगत आहेत. दादाजीसुद्धा प्रेमाने आणि आग्रहाने एकेकाला बोलावत आहेत. ते स्वत:बद्दल काहीच बोलत नाहीत, पण सर्व कार्यकर्त्यांच्या बोलण्यात येणारी समान गोष्ट दादाजींचं मार्गदर्शन हीच आहे. अनेक वेळेस दादाजींचे कठोर शब्द ऐकले होते; परंतु आता त्यांचा चेहरा विश्वासाने उजळलेला आहे. जेव्हा जेव्हा मनामध्ये काही प्रश्न आले; तेव्हा तेव्हा दादाजींनी त्यांचं समाधान केलं. अनेक जण काहीशा भितीसह आणि पूर्वग्रह असलेल्या मनाने इथे आले होते. आता प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती बघून त्यांचं मत बदललं आहे. इथल्या कामासोबत नंतरही कसे जोडलेले राहू, ह्याबद्दल प्रत्येकाने विचार सांगितले. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने पुढेही जोडलेला राहील. बंगळुरूच्या आयटी मिलन गटसुद्धा पुढेही सक्रिय राहील. एकाने सेवा भारतीचे फेसबूक पेज सुरू करून हे काम लोकांपर्यंत नेणे सुरू केलेले आहे. अनेक वेळेस लोक तीव्र टीकासुद्धा करतात. परंतु सर्वांचा हाच निर्धार आहे की, कोणत्याही वादविवादात पडण्याऐवजी आपल्याला कामावर लक्ष द्यायचं आहे. दादाजी जोर देऊन हेच सांगत आहेत की, सेवा भारती फक्त माध्यम बनलं. जम्मू- कश्मीरची आपत्ती बघून समाजामध्ये मदतकार्याची तीव्र भावना निर्माण झाली आणि लोक मोठ्या संख्येने समोर आले. सेवा भारती फक्त माध्यम बनलं.

मीटिंगनंतर रिपोर्ट आणि पाम्पलेटचं कामसुद्धा केलं. त्यामध्ये सतत बदल होत आहेत. मदतकार्याबद्दल व्हिडिओसुद्धा बनवायचा आहे. आता काही जण वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातील. बरेच जण उद्या परत जातील.

. . ७ ऑक्टोबरच्या रात्री श्रीनगरच्या तुलनेत जम्मूमध्ये थंडी फारच कमी आहे. संस्थेच्या कार्यालयात रिपोर्टचं काम करण्यामध्ये दहा वाजले. दीपनिर्वाण करून झोपायच्या तयारीत असताना अचानक वीज चमकावी तसा भयंकर पाऊस सुरू झाला. एकाएकी जोराने वारे वाहू लागले आहेत आणि सगळीकडून वस्तु आपटण्याचे आवाज येत आहेत. खोलीमध्ये तीव्र पाऊस आत येतो आहे. खिडक्यांना तोडत वारा आत शिरला आहे. विजांमुळे जणू सूर्यच चमकत आहेत आणि मेघगर्जनांनी अन्य सर्व आवाज दाबून टाकले. खोलीत हळु हळु पाणी शिरत आहे. . . अचानक जाणवलं की, हा पाऊस ७ सप्टेंबरसारखा तर नाही? जम्मू पर्वताच्या टोकाशी आहे. इथे पर्वत संपतो. कदाचित म्हणूनच पर्वतावरून वाहणारे ढग आणि वारे जम्मूवर कोसळत आहेत. . .

थोड्या वेळाने बाहेर जाऊन एका कार्यकर्त्याला भेटण्याचं साहस करता आलं. खाली एक झाड कोसळलं आहे. एका टेबलाचे तुकडे झाले आहेत. हा कार्यकर्ता काही लोकांना सोडण्यासाठी स्टेशनवर गेला होता. त्याने सांगितलं की अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुफानी पाऊस सुरू झाला आणि रस्त्यावरची दृश्यमानता (विजिबिलिटी) संपून गेली. अनेक वाहन एकमेकांवर आपटत गेले. कशीबशी जवळ जवळ शून्यच्या वेगाने गाडी चालवत तो परत आला. अशा भयावह परिस्थितीमध्ये मनात एकच विचार सुरू आहे की कधी हा पाऊस संपेल. जे लोक थोड्याच वेळापूर्वी वैष्णोदेवीकडे निघालेले आहेत, ते कुठे अडकले तर नाहीत? त्यांच्याबद्दल एकाकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की, ते बहुतेक तर पोहचले असतील. इतका भीषण पावसाने खरोखर बुद्धीचं कवच भेदून मनातली भिती उघडी पाडली. आपण कितीही म्हणतो की, आपण भीत नाही, आपण असे असे आहोत, इतके शक्तीवान आहोत; पण जेव्हा अशी वेळ आणि परिस्थिती येते, तेव्हा बुद्धीचं आवरण गळून पडतं आणि समोर भिती उभी राहते. त्यावेळीसुद्धा एका गोष्टीने धीर दिला. ही गोष्ट एका राजाची‌ आहे. त्याला एका साधूने एक अंगठी दिली होती‌ आणि सांगितलं होतं की, जेव्हा जेव्हा तुझ्यावर बिकट परिस्थिती ओढवेल आणि कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, तेव्हा ह्याची मदत घे. राजा हिमतीचा माणूस होता. अनेक वेळेस बिकट स्थिती येऊनही त्याने ही मदत घेण्याचा विचार टाळला. पण एकदा तो फार बिकट परिस्थितीत सापडला. चारीही बाजूंनी शत्रूने त्याला घेरलं होतं. आता त्याच्याच्याने राहावलं नाही आणि म्हणून त्याने ती अंगठी हातात घेतली. त्यामध्ये एक चिठ्ठी बांधलेली होती. राजाने आश्चर्याने ती वाचली. त्याच्यावर फक्त इतकंच लिहिलं होतं- 'हेसुद्धा होऊन जाईल. वेळ थांबत नसतो.' हे बघून राजाला धीर आला. त्याने विचार केला आणि तो सावरला. शत्रू आले; त्यांनी त्याला पकडलंसुद्धा. पण मग काही दिवसांनी तो त्यांच्या तावडीतून निसटला.

ह्या गोष्टीमुळे बराच धीर आला. म्हणतात ना की, फक्त बदल हीच गोष्ट स्थिर आहे! हळु हळु पाऊस मंदावला. नंतर फक्त वीजा आणि वा-याचा पाठलाग सुरू झाला. मध्यरात्री वातावरण शांत झालं. परंतु त्या दोन तासांमध्ये एक महिन्यापूर्वीच्या दिवसांची झलक नक्की मिळाली. . .


ह्या एम्बुलन्समधून प्रवास झाला


वेडी वाकडी वळणं असलेल्या रस्त्यावरचं हे काम. . .


ये कश्मीर है. . .


जम्मू कार्यालयातील बॅनर

"जन्नत" वाचवण्यासाठी अजूनही मदतीची गरज आहे. . .
SEWA BHARTI J&K
Vishnu Sewa Kunj, Ved Mandir Complex, Ambphalla Jammu, J&K.
www.sewabhartijammu.com
Phone: 0191 2570750, 2547000
e-mail: sewabhartijammu@gmail.com, jaidevjammu@gmail.com

हिंदीतला ब्लॉग- जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४

क्रमश:

समाजविचार

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

9 Nov 2014 - 3:09 pm | विवेकपटाईत

माहितीपरक लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2014 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे दूरदराजच्या भागात केलेले महत्वाचहे कार्य नेहमीच दुर्लक्षित केले जाते. त्याबद्दल लिहून तुम्ही प्रशंसनिय काम करत आहात. पुभाप्र.

(आणि इकडे, आमच्याच टॅक्सच्या पैश्यातून ठेवलेल्या कचराकुंडीवरही "क्ष्क्ष्क्ष च्या सौजन्याने" असे स्वतःचे नाव झळकवायला कॉर्पोरेटर्स पुढे असतात ते रस्त्यावरून जाताना रोज बघायला भाग पडते :( )