ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं.
उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही. (या अर्थानं मात्र उर्दू गज़ल अनेकांच्या हृदयाला स्पर्शून जाते, कारण ती त्यांच्या अयशस्वी प्रेमाची कहाणी असते.)
फरक इतकाच की सामान्य प्रियकर यथावकाश, चाहत सोडून देतो आणि शायर मरते-दम-तक `आशिक' राहातो.
सो इन अ वे, प्रश्न इष्काचा नाही तर `आशिकीचा' आहे. ती आशिकी जर तुम्ही जपली असेल तर ही गज़ल तुमच्यासाठी आहे. फ़रिदा अशा आशिक प्रियकरासाठी गातेयं, ज्याच्या हृदयातली `अभिलाषा' मावळलेली नाही.
___________________________________
कल्पना करा की तुमची `चाहत' अचानक, तुम्हाला तुमच्या शहरात भेटलीये. जीनं तुम्हाला स्वत:चा कधीही अंदाज़ न लागू देता आयुष्यभर झुलवलं, ती एखाद्या निवांत ठिकाणी अनपेक्षित भेटलीये. तुम्ही एकमेकात रंगून गेलात. सगळं जग एकाबाजूला आणि तुम्ही दोघं तुमच्या विश्वात रममाण. मधेच तुम्ही वेळ पाहाता आणि रात्र उलटून चालल्याची जाणिव होते, मग तुम्ही तिला निघतो म्हणता आणि ती म्हणते : आज जानेकी ज़िद ना करो! अशक्य ना?
पण तोच तर काव्यविषय आहे!
ही गज़ल प्रियकरानं म्हटली असती तर ती साधी गज़ल झाली असती. पण जेंव्हा प्रेयसी असं आर्जव करते आणि तेही इतक्या दिलकष अंदाज़ानं गाण्यात उतरवते, तेंव्हा कहर ओढवतो. फ़रिदा जणू `उम्र भरकी प्रेयसी' आहे आणि ती तिच्या (इतके दिवस वाट पाहाणार्या) प्रियकराला विनवते आहे : यूंही पेहलू में बैठे रहो...
काय कल्पना आहे. `तू असा जवळी रहा' इतकंच नाही तर, `तू माझी मिठी सोडवू नकोस'.
आणि त्याही पुढे जाऊन : ‘हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे’. सुभानल्ला! काय नज़ाक़त आहे! इतकी समर्पित अवस्था की नुसत्या कल्पनेनं प्रियकराचं अंग मोहरुन जाईल.
आणि शेवट तर काय कमाल केलायं : आता जाण्याचा विषयच काढू नकोस... ऐसी बातें किया ना करो.
आज जानेकी ज़िद ना करो
यूंही पेहलू में बैठे रहो...
हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो
आज जानेकी ज़िद ना करो ।
________________________________
तेच आर्जव पण पुन्हा वेगळ्या अंदाज़ानं ‘बात इतनी मेरी मान लो!’ फक्त एकाच गोष्टीला राजी हो : आज जानेकी ज़िद ना करो ! कारण तू गेलास तर जणू माझा प्राणच मला सोडून जाईल. तुला माझी शपथ, या उत्तररात्री तू असाच माझ्या पहेलूमधे राहा.
तुमही सोचो ज़रा क्यों ना रोके तुम्हें
जान जाती है जब उठके जाते हो तुम
तुमको अपनी क़सम जानेजा
बात इतनी मेरी मान लो
आज जानेकी ज़िद ना करो ।
_________________________________
शेवटच्या दोन्ही कडव्यात फैयाझ हाशमीची शायरी कलात्मकतेची परिसिमा करते.
प्रेयसी म्हणते, जर काळ नसता तर ही भेट अशीच निवांतपणे, मनसोक्त पुढे गेली असती, पण आपलं जगणंच कालबद्ध आहे. तरीही मिलनाची ही रात्र कालाला पार करुन जाते, कारण आपल्या भेटीचे हे मोजके क्षण, काल संपल्यासाखे अविस्मरणीय झाले आहेत.
कुसुमाग्रज हीच व्यथा (प्रियकराच्या) नजरेतून अशी मांडतात :
काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत
पण फैयाझ त्यातूनही वाट शोधतो :
वक्तकी कैदमें जिंदगी है मगर
चंद घडीया यही है जो आज़ाद है
आता हे अनमोल क्षण जर तू दवडलेस, तर अशी भेट पुनरपी संभव नाही. आणि मग आयुष्यभर खंत केली तरी जे काही हातून निसटलं ते पुन्हा लाभणार नाही.
इनको खोकर मेरी जानेजा
उम्रभर ना तरसते रहो
आज जानेकी ज़िद ना करो ।
___________________________
कितना मासूम-ओ-रंगीन है ये समा
आजचा नज़ारा दिलकष आहे. एका अर्थानं सगळी सृष्टी पुन्हा निरागस झालीये कारण आपण भूतकाळ विसरुन एकमेकांसमोर आलो आहोत. आणि तो नज़ारा आकांक्षांचे सगळे रंग घेऊन बहरलायं कारण आपली मनं एक झालीयेत.
आशा भोसलेचं एक गाणं आहे, ये रंगीन महेफिल गुलाबी-गुलाबी, मेरे दिलका आलम, शराबी-शराबी. दोन हृदयांची अंतरात एकरुपता साधली की बाहेर रंगांची बरसात सुरु होते.
हुस्न और इश्ककी आज मेराज़ है
आणि आज सौंदर्य प्रेमावर कुर्बान आहे. इतकंच नाही तर (तुझं) प्रेम आणि (माझं) सौंदर्य त्यांच्या परिसीमेवर आहेत. तुझ्या नज़रेत माझ्या सौंदर्याशिवाय काही नाही, ती सतत माझ्या अंगोपांगाचा सर्व बाजूंनी वेध घेतेयं आणि माझ्या सौंदर्याच्या बाहुपाशात माझा आशिक आहे.
कलकी किसको खबर जानेजा
उद्या उजाडेलच हे आजपर्यंत कुणीही नक्की सांगू शकलेला नाही. आज आहे म्हणून उद्या असेल असा फक्त कयास आहे. कदाचित आजचा दिवस शेवटचा असू शकतो. आणि नेहमी हीच परिस्थिती आहे ‘ कलकी किसको खबर जानेजा ’
तर तू फक्त माझ्यासाठी एवढंच कर :
रोकलो आजकी रात को
आजच्या रात्रीचा दिवस होऊ देऊ नकोस! वॉट अ क्लायमॅक्स!
किती तरी अर्थछटा फैयाझ, केवळ एका ओळीत घेऊन येतो.
प्रेयसी ही जर निशा असेल तर तिची विनवणी अशी की आता तूच मला सावर ‘ रोकलो आजकी रात को’.
तू जर दिवस असशील, तर ‘यूंही पहेलूमे बैठे रहो’, इतक्यात उठू नकोस, माझ्या निवांतपणाचा महौल असाच राहू दे.
आणि तू जर माझं सर्वस्व असशिल तर हा काळ थांबव!
आज जानेकी ज़िद ना करो ।
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 1:20 am | मनिष
आज उगाचच उचक्या लागतील आता. माझ्या आवडीचे कडवे हे -
13 Oct 2014 - 1:05 pm | चिगो
अश्या आठवणींनी उचक्या लागण्याचं नशीब लाभल्याबद्दल अभिनंदन..