९ सप्टेंबरला हर्शेल बेटावरुन आलेला मिशनरी फ्रेझर याची अॅमंडसेन आणि स्टेन यांच्याशी गाठ पडली. फ्रेझर मॅकेंझी नदीवर असलेल्या फोर्ट मॅकफर्सन इथे निघाला होता. त्याच्या जोडीला रॉक्सी हा एस्कीमोदेखील होता. किंग पॉईंटच्या पश्चिमेला चार मैलांवर एका तंबूत त्यांनी मुक्काम ठोकला होता. हर्शेल बेटाच्या परिसरात पाच जहाजं बर्फात अडकून पडलेली होती. त्याचबरोबर किंग पॉईंटच्या पूर्वेला आणखीन सहा जहाजं अडकल्याचंही त्याच्याकडून स्टेनला कळून आलं. ही जहाजं नेमकी कोणत्या परिसरात आहेत याबद्दल मात्रं फ्रेझर अनभिज्ञ होता.
११ सप्टेंबरला अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांनी हिवाळ्यात मुक्कामाच्या दृष्टीने किंग पॉईंट इथे दोन घरं उभारण्यास सुरवात केली. ही दोन्ही घरं लाकडाचा वापर करुन बांधण्याचा अॅमंडसेनचा बेत होता. यापैकी एका घरात राहण्याची व्यवस्था आणि दुसरं घर ऑब्झर्वेटरी म्हणून वापरण्याची त्यांची योजना होती. या घरात चार माणसांची राहण्याची सोय होणार होती. लिंडस्ट्रॉम आणि स्टेन यांची इतकी गाढ मैत्री झाली होती की लिंडस्ट्रॉमने आपल्या घरी राहवं असा स्टेनने आग्रह धरला. लिंडस्ट्रॉमने अर्थातच त्याला होकार दिला. स्वतः अॅमंडसेन, गॉडफ्रे हॅन्सन आणि एस्कीमो मन्नी ग्जो वर राहणार होते.
१५ सप्टेंबरला घराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर हेल्मर हॅन्सन, रिझवेल्ट, विल्क आणि लुंड यांनी या घरात स्थलांतर केलं. हे घर उबदार ठेवण्यासाठी पेट्रोलचा एक टँक आणि बोनान्झा जहाजावर मिळालेल्या लोखंडी पट्ट्यांच्या सहाय्याने रिझवेल्टने एक सुटसुटीत हीटर तयार केला! घरातील वातावरण उबदार ठेवण्याची सोय झाल्याने सर्वांना हायसं वाटलं. असाच एक हिटर स्टेनच्या घरातही बसवण्यत आला होता. बोनान्झावर मिळालेल्या स्टोमध्ये थोडीफार सुधारणा करुन अॅमंडसेनने जहाजावरील आपल्या केबिनमध्ये त्याची प्रतिष्ठापना केली होती!
राहण्यासाठी घराची व्यवस्था मार्गी लागल्यावर सुमारे दोनशे यार्ड अंतरावर ऑब्झर्वेटरी उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं. विल्क आणि रिझवेल्ट यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांवरुन उत्तर-दक्षिण दिशेला या घराचं बांधकाम सुरु झालं!
मिशनरी फ्रेझरने फोर्ट मॅकफर्सनला जाण्याचा आपला विचार रद्द केला होता. एका सकाळी अॅमंडसेन आणि इतरांचा निरोप घेऊन रॉक्सीसह त्याने हर्शेल बेटाची वाट धरली. फ्रेझर परतल्यावर हिवाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने ग्जो वरील सर्व शिडं उतरवण्यात आली आणि वायुविरोधक कापडाने संपूर्ण जहाज झाकून टाकण्यात आलं.
किंग पॉईंट इथे हिवाळ्यात नांगरलेलं ग्जो जहाज
किंग पॉईंट इथे निरनिराळ्या 'घरां'तून एकूण वीस जणांची वसाहत तयार झाली होती. अॅमंडसेन, गॉडफ्रे हॅन्सन आणि मन्नी ग्जो जहाजावर मुक्कामाला होते. अॅमंडसेनचे इतर चार सहकारी किंग पॉईंटवरील घरात होते. लिंडस्ट्रॉम बहुतांश स्टेनच्या घरी असला तरी कधी आपल्या सहकार्यांच्या घरीही मुक्कामाला असे! स्टेनचा दुसरा सहकारी जिमी आपल्या पत्नीसह तिथे मुक्कामास होता. त्याखेरीज स्टेनच्या मोहीमेतील एस्कीमोही तिथेच मुक्कामाला होते.
हेल्मर हॅन्सनला एक दिवस एक नवीनच शोध लागला. काही अंतर चालून गेल्यावर समुद्राचं पाणी खारट न लागता बर्यापैकी चवदार लागत होतं! हे पाणी स्वैपाकासाठी आणि पिण्यासाठीही चांगलं असल्याचं त्यांना आढळून आलं. मॅकेंझी नदीच्या नजीकच्या सान्निध्यामुळेच पाण्यातील हा बदल दृष्टीस पडत होता असं हॅन्सनचं ठाम मत होतं. मॅकेंझी नदीतून आर्क्टीकमध्ये सतत पाणी वाहून येत असल्याने किंग पॉईंटच्या परिसरातील बर्फ पूर्णपणे गोठण्यास नेहमीच उशीर होत असे!
२४ सप्टेंबरला एस्कीमोंची एक तुकडी हर्शेल बेटाच्या दिशेने जात असलेली अॅमंडसेनच्या दृष्टीस पडली. ज्या अर्थी एस्कीमो जात आहेत त्या अर्थी बर्फ स्लेजवरुन प्रवास करण्याइतपत गोठला असावा असा त्याचा कयास होता. अॅमंडसेनने स्लेजवरुन हर्शेल बेटावर जाण्याचा बेत केला. नॉर्वे सोडून तीन वर्षे होऊन गेली होती. नॉर्वेच्या स्वातंत्र्ययुद्धाची त्रोटक हकीकत त्याला कॅप्टन मॅकेनाकडून कळली होती. पुढील माहीती मिळवण्यासाठी तो अधिर झाला होता! स्टेनलाही पुढच्या हालचालीसाठी हर्शेल बेट गाठणं आवश्यक होतंच!
३ ऑक्टोबरला अॅमंडसेन आणि स्टेन यांनी स्लेजवरुन हर्शेल बेटाच्या दिशेने आपल्या मोहीमेस सुरवात केली. त्यांच्याबरोबर मन्नी आणि आणखीन एक एस्कीमोही होते. चार मैलांचं अंतर काटून त्यांनी एस्कीमोंचा कॅंप गाठला. एस्कीमोंनी आपल्या बोटी किनार्यावर ओढून ठेवल्या होत्या. या कँपच्या पश्चिमेला २ मैलांवर असलेल्या दुसर्या कँपमधील एस्कीमो हे नेचिली एस्कीमोंपेक्षा अधिक सुधारलेले असल्याचं अॅमंडसेनला आढळून आलं. या एस्कीमोंना चहाचं दांडगं व्यसन असल्याचंही त्याच्या ध्यानात आलं. कोणत्याही एस्कीमोच्या घरात शिरल्यावर हटकून चहाचा आग्रह होत असे! या एस्कीमोंचा निरोप घेऊन अॅमंडसेन-स्टेनने आपल्या एस्कीमोंसह पुढची वाट धरली आणि किंग पॉईंटच्या पश्चिमेला १५ मैलांवर असलेल्या की पॉईंट इथे रात्रीचा मुक्काम ठोकला. हर्शेल बेट इथून वीस मैलांवर होतं!
दुसर्या दिवशी त्यांनी पुढचा मार्ग सुधरला. मात्रं आता बर्फावरुन स्लेज हाकारणं कठीण जात होतं. अनेकदा बर्फाखाली सुमारे ८-१० इंचावर असलेल्या पाण्यात स्लेज घुसत होती. स्लेज बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे बूट ओलेचिंब झाले होते. मात्रं कोणत्याही अडथळ्याला न जुमानता त्यांची वाटचाल सुरुच होती! अखेर दुपारी ४ वाजण्याच्या सुमाराला अॅमंडसेन आणि स्टेन आपल्या सहकार्यांसह हर्शेल बेटाच्या बंदरात पोहोचले!
हर्शेल बेटावर पोहोचल्यावर अॅमंडसेनला एक अभूतपूर्व दृष्य दिसलं..
पाच मोठी जहाजं एकाशेजारी एक अशी बर्फात नांगरून ठेवलेली त्याला आढळली!
या जहाजांवरील माणसांची आणि एस्कीमोंची ही गर्दी किनार्यावर झालेली होती!
बहुतेक सर्व अमेरीकन आणि इतर गोर्या लोकांनी एस्कीमोचे पोशाख घातलेले होते, तर बहुतेक सर्व एस्कीमो हे अमेरीकन पोशाखात होते! हे एस्कीमो कोणाही बिगर एस्कीमोला कब्लूना म्हणूनच संबोधत होते. निग्रोंचा उल्लेख करताना मात्रं 'मॅक्टॉक कब्लूना' - काळे गोरे असा करत होते. स्टेन आणि दुसरा एस्कीमो यांच्यापैकी बहुतेकांच्या परिचयाचे होते, परंतु अॅमंडसेन आणि मन्नी मात्रं त्यांच्यासाठी पूर्णपणे अपरिचीत होते!
हर्शेल बेटावर बर्फात अडकलेली जहाजं
अॅमंडसेनने अलेक्झांडर जहाजाचा कॅप्टन टिल्टॉनची गाठ घेतली. टिल्टॉनने अगत्याने आपल्या जहाजावरील एका केबिनमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था केली. लवकरच इतर सर्व जहाजांच्या कॅप्टनचीही अॅमंडसेनची भेट झाली. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. टिल्टॉनने अॅमंडसेनच्या नावे आलेली दोन पत्रं त्याच्या स्वाधीन केली. अर्थात ही पत्रं सुमारे दीड वर्षांपूर्वीची असली तरी अॅमंडसेनने त्यावर झडप घातली नसती तरच नवंल! या दोनपैकी एक पत्रं सॅन फ्रॅन्सिस्को इथला नॉर्वेजियन वकील हेनरी लुंड याचं होतं. आर्क्टीकमध्ये जाणार्या प्रत्येक जहाजाला ग्जो ला लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याची त्याने सूचना दिलेली होती. अॅमंडसेनला लिहीलेल्या पत्रात सॅन फ्रॅन्सिस्को इथे त्याचं स्वागत करण्याची तयारी सुरु असल्याचं त्याने कळवलं होतं!
इथेच अॅमंडसेनची गाठ मिशनरी आणि हडसन बे कंपनीचा अधिकारी असलेल्या व्हिटेकरशी पडली. आपली पत्नी आणि दोन मुलींसह तो किनार्यावर वास्तव्यास होता. कंपनीचा हिशोब ठेवण्याच्या कामाव्यतिरिक्त एस्कीमोंवर नियंत्रण ठेवण्याचं कामही त्याला करावं लागत असे!
२० ऑक्टोबरला हर्शेल बेटावरुन टपालफेरी निघणार होती. सर्वांनी लिहीलेली पत्रं घेऊन फोर्ट मॅकफर्सन मार्गे फोर्ट युकून इथे पोस्टमन जाणार होता. अर्थात फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर ही पत्रं पुढे आपल्या पत्यावर पोहोचवली जाणार होती. या मार्गाने पत्रव्यवहार झाल्यावर पुढच्या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत कोणत्याही पत्राला उत्तर मिळण्याची शक्यता नव्हती. त्या दृष्टीने फोर्ट मॅकफर्सन इथे जाऊन स्वतः प्रयत्न करण्याचा अॅमंडसेनचा बेत होता. बोनान्झा जहाजाचा कॅप्टन मॉगही फोर्ट मॅकफर्सन मार्गे सॅन फ्रॅन्सिस्कोला परतण्याच्या विचारात होता. पुढील वर्षी दुसर्या जहाजाने आर्क्टीकमध्ये पुन्हा सफरीवर येण्याची त्याची योजना होती!
२९ सप्टेंबरला अॅमंडसेन आणि स्टेन यांनी आपल्या एस्कीमो साथीदारांसह किंग पॉइंटच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. त्यांच्यापाठोपाठ कॅप्टन मॉगही होताच. दिवसभराच्या प्रवासानंतर वाटेत एस्कीमोंचा पाहुणचार घेऊन रात्री ११ च्या सुमाराला अॅमंडसेनने किंग पॉईंट इथे असलेलं ग्जो जहाज गाठलं!
ग्जो इथे पोहोचण्यापूर्वीच अॅमंडसेनची एका एस्कीमो तुकडीशी गाठ पडली होती. ही तुकडी स्लेजवरुन हर्शेल बेटाच्या दिशेने निघाली होती. हे सर्व एस्कीमो चार्ल्स हॅन्सन जहाजावरील होते. कॅप्टन मॅकेनाने यांची रवानगी हर्शेल बेटावर केली होती. चार्ल्स हॅन्सन मॅकेंझी नदीच्या मुखापासून जवळच असलेल्या टोकर पॉईंटपाशी बर्फात अडकलं होतं. त्याच्या पूर्वेला बेली बेटापाशी आणखीन चार जहाजं बर्फात अडकली होती. पण ओल्गा या लहानशा जहाजाचा मात्रं काहीही पत्ता लागला नव्हता!
एव्हाना किंग पॉईंट इथे बांधकाम सुरु असलेली ओब्झर्वेटरी पूर्ण बांधून तयार झाली होती. अॅमंडसेन, रिझवेल्ट आणि विल्क यांनी सर्व उपकरणं त्यात नीटपणे मांडून ठेवली. १ ऑक्टोबरपासून चुंबकीय निरीक्षणांच्या नोंदीचं काम पुन्हा सुरु झालं!
२१ ऑक्टोबरला अॅमंडसेन आणि मॉग आपल्या टपालमोहीमेवर निघाले. सर्वांनी आपापल्या आप्तेष्टांना आणि मित्रं-मंडळींना लिहीलेली पत्रं एका ब्रासच्या पेटीत बंद करण्यात आलेली होती. अॅमंडसेनच्या स्लेजवर ही पेटी काळजीपूर्वक बांधण्यात आली. ही स्लेज स्टेनने खास या मोहीमेसाठी तयार केली होती. पूर्वीच्या अनेक स्लेज असूनही स्टेनच्या हट्टापायी अॅमंडसेनला ती स्वीकारावी लागली होती. अॅमंडसेनच्या जोडीला एस्कीमो मन्नीही होताच!
की पॉईंट इथे पोहोचत असतानाच अॅमंडसेन आणि मॉगची भन्नाट वेगाने येणार्या दुसर्या एका स्लेजशी गाठ पडली. या स्लेजवर चक्कं शिड उभारलेलं होतं. वार्याचा योग्य तो उपयोग करुन घेत त्यांना मागे टाकून झपाट्याने ती स्लेज पुढे निघून गेली. मात्रं काही अंतर पुढे गेल्यावर ती स्लेज पुन्हा वळून त्यांच्या दिशेला आली. अॅमंडसेन त्या स्लेजकडे आश्चर्याने पाहत असतानाच स्लेज चालवणार्या एस्कीमोने त्याच्यापुढे एक निराळीच कल्पना मांडली. अॅमंडसेनच्या स्लेजचे कुत्रे आपल्या स्लेजला जोडून तो अॅमंडसेन - मॉग यांचीही स्लेज ओढून नेण्यास तयार होता! या सूचनेचा अॅमंडसेनने सहर्ष स्वीकार केला!
हर्शेल बेटाच्य दिशेने जाताना अॅमंडसेनची त्या एस्कीमोशी चांगली ओळख झाली. त्याचं नाव जिमी होतं. तो सफाईदारपणे इंग्लिश बोलत होता. स्लेजवरुन फोर्ट युकून इथे टपाल नेण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक झाली होती! त्याला फोर्ट युकूनची वाट माहीत नव्हती, मात्रं ही मोहीम यशस्वी केल्यास त्याला व्हेलची शिकार करणारं एक जहाज बक्षीस म्हणून मिळणार होतं! एस्कीमोंच्या दृष्टीने सर्वोच्च बहुमान असलेल्या जहाजाच्या मालकीच्या आशेने त्याने ही कामगिरी स्वीकारली होती!
दुपारी ३ च्या सुमाराला त्यांनी हर्शेल बेट गाठलं.
अॅमंडसेन आणि मॉग हर्शेल बेटावर येऊन पोहोचल्यावरही टपालमोहीमेची तयारी अद्याप पूर्ण झालेली नव्हती. सर्वजण या तयारीत मग्न असताना अॅमंडसेनने अलेक्झांडर जहाजाचा कॅप्टन टिल्टॉन याच्याबरोबर मुक्काम ठोकला होता. या काळात हर्शेल बेटावर असलेल्या पाचही जहाजांच्या कॅप्टनकडे तो आलटून - पालटून पाहुणचार झोडत होता!
या टपालमोहीमेचं नेतृत्व बोनान्झा जहाजाचा कॅप्टन मॉग याच्याकडे होतं. मॉग एक अनुभवी कॅप्टन होता. तसेच आर्क्टीकच्या भूप्रदेशात स्लेजवरुन प्रवासाचाही त्याला दांडगा अनुभव होता. अॅमंडसेनने ग्जो वरुन आणलेल्या अनेक गोष्टी हर्शेल बेटांवरच सोडून देण्याची त्याने सूचना केली. अॅमंडसेनला मनातून हे पटलं नसलं तरी मॉगच्या सूचनेला त्याने होकार दिला. आपल्याबरोबर अनेक खाद्यपदार्थ मॉगने घेतलेले होते. मात्रं बर्फावर चालणार्या स्लेज त्यांना फार काळ वापरता येणं शक्यं नव्हतं. पर्वतराजी गाठल्यावर जंगलात वापरण्याची कॅनेडीयन स्लेज वापरण्याला पर्याय नव्हता.
२३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी निघण्याची पूर्ण तयारी झाली होती. कॅप्टन मॉग आणि अॅमंडसेन यांच्या जोडीला एस्कीमो जिमी आणि मन्नी जाणार होते, परंतु शेवटच्या क्षणी मन्नीने दोन्ही पायात वेदना होत असल्याची तक्रार केल्याने अॅमंडसेनने त्याची किंग पॉईंट इथे रवानगी केली. मन्नीच्या ऐवजी जिमीची पत्नी कापा हिने मन्नीची स्लेजवरील जागा पटकावली!
२४ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजता मॉग - अॅमंडसेन यांनी जिमी आणि कापा यांच्यासह हर्शेल बेट सोडलं!
हर्शेल बेटाच्या पूर्वेने मार्गक्रमणा करत त्यांनी बेटाचा दक्षिण-पूर्व किनारा गाठला. तिथे असलेली बर्फाने गोठलेली खाडी ओलांडून त्यांनी कॅनडाचा मुख्य भूभाग गाठला. या परिसरात पोहोचल्यावर एका तीव्र उताराच्या चढावरुन चढाई करत त्यांनी टेकडीचा माथा गाठला. टेकडी उतरुन त्यांनी पायथ्याची हर्शेल नदी गाठली. या नदीच्या काठाने त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला. दुपारी चारच्या सुमाराला नदीपात्राच्या कडेला असलेल्या एका सोईस्कर जागी त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी प्रवास आवरता घेतला.
२७ ऑक्टोबरच्या सकाळी एका लहानशा दरीतून पुढे जात असताना अॅमंडसेनची चार एस्कीमोंशी गाठ पडली. हे एस्कीमो तिथे शिकारीसाठी मुक्काम करुन होते. आदल्या रात्रीच त्यांनी एक रेनडीयर आणि पहाडी बो़कडाची शिकार केली होती. या एस्कीमोंच्या मते नदीचं पात्रं पुढे गोठलेलं नव्हतं! या पात्रातून वाटचाल करणं अशक्यंच होतं. त्या प्रदेशात त्यांचा नेहमीचा राबता होता. मॉगच्य तुकडीला नदी ओलांडून पलीकडच्या भागात असलेल्या बर्फाळ प्रदेशात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली.
दुसर्या दिवशी सकाळी त्या एस्कीमोंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एका तीव्र उतारावर चढाई केली. सकाळी ११ च्या सुमाराला त्यांनी ब्लो होल गाठलं. सतत उडणार्या बर्फाच्या तुकड्यांमुळे या जागेला तसं नाव पडलं होतं. समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंचीवर खडकाळ भागात ही जागा होती. नदी पार करुन पुन्हा बर्फाचा प्रदेश आल्यावर त्यांना हायसं वाटलं!
दक्षिणेला खडकाळ प्रदेश संपून तुलनेने सपाटीचा प्रदेश लागल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. इथे त्यांना अनेक रेनडीयरच्या वाटा त्यांना आढळून आल्या. ३० ऑक्टोबरला त्यांनी नदीचं उगमस्थान असलेलं सरोवर गाठलं. हे सरोवर जवळपास सर्वच बाजूंनी उंच पर्वतरांगांनी वेढलेलं होतं.
दुसर्या दिवशी नदीच्या पलीकडील किनार्यावरुन त्यांची वाटचाल सुरु झाली. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते तुलनेने बराच कमी बर्फ असलेल्या एका प्रदेशात पोहोचले होते. आता बर्फावरुन चालणार्या स्लेजऐवजी जंगलात वापरण्यात येणार्या कॅनेडीयन पद्धतीच्या स्लेज वापरण्याची पाळी आली होती! कॅनडाची सरहद्द ओलांडून ते आता अमेरीकेचा भूभाग असलेल्या अलास्काच्या प्रदेशात येऊन पोहोचले होते!
२ नोव्हेंबरच्या सकाळी त्यांनी पुढची वाट धरली. समोरच दिसणार्या पर्वतराजीची उंची नकाशावर जरी १०००० फूट दाखवलेली असली, तरी प्रत्यक्षात ती ५००० फुटांपेक्षा जास्तं नसावी असा अॅमंडसेनचा अंदाज होता. ३ सप्टेंबरच्या दुपारी त्यांनी त्या पर्वताचा माथा गाठला. या पर्वतमाथ्यावरुन दक्षिणेला अमेरीकेच्या अंतर्भागात तसेच उत्तरेला आर्क्टीक समुद्राच्या दिशेने अनेक लहानमोठे ओढे वाहत असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं.
या पर्वताच्या शिखरावरुन दक्षिणेला नजर टाकल्यावर एक लहानशी दरी त्यांना आढळली. ही दरी पुढे पोर्क्युपाईन नदीकडे जात असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं. या दरीत उतरून आल्यावर ती दक्षिण-पूर्वेच्या दिशेने पुन्हा एका लहानशा पर्वतराजीपाशी येऊन संपत होती.
४ नोव्हेंबरला मॉगच्या तुकडीने अखेर पोर्क्युपाईन नदीची उपनदी असलेली कॉलीन नदी गाठली. नदीपात्राच्या काठाने मार्गक्रमणा करणं तुलनेने बरच सोईस्कर होतं.
७ नोव्हेंबरच्या दुपारी मार्गक्रमणा करत असताना जिमी अचानकपणे थांबला. त्याच्या तीक्ष्ण नजरेला दूरवर नक्कीच काहीतरी दिसलं होतं..
"इंडीयनांचे ट्रॅक्स!"
रेड इंडीयनांचा मार्ग जिमीला गवसला होता. याचा अर्थ जवळपास रेड इंडीयनांची वस्ती असणार होती. आतापर्यंत मॉगच्या कमी सामान नेण्याच्या अट्टाहासापायी सर्वांचा अर्धपोटी प्रवास सुरु होता. रेड इंडीयनांच्या वसाहतीत सर्वांना पोटभर अन्न मिळणार होतं!
लवकरच काही अंतरावर असलेली इंडीयनांची झोपडी जिमीच्या नजरेस पडली. त्या झोपडीत एक इंडीयन जोडपं राहत होतं. मॉगच्या तुकडीने तिथे दोन दिवस आराम केला. त्या इंडीयनांकडून मांस आणि काही मासे विकत घेऊन त्यांनी पुढचा मार्ग धरला.
१२ नोव्हेंबरला नदीकिनार्याने मार्गक्रमणा करताना जिमीच्या नजरेला एका स्लेजच्या खुणा आढळून आल्या. परंतु दुसर्या दिवशी दाट धुक्यामुळे हा माग निसटला. धुक्याचा पडदा दूर झाल्यावर काही अंतरावर नदीच्या पलीकडच्या किनार्याला असलेली लाकडी झोपडी जिमीच्या तीक्ष्ण नजरेला पडली. या झोपडीत दोन स्त्रिया त्यांना आढळल्या. झोपडीतले दोन्ही पुरुष एका व्यापार्याला भेटण्यासाठी पोर्क्युपाईन नदीच्या परिसरात गेले होते. ज्या मार्गाने ते गेले होते त्याच मार्गाने गेल्यास दोन दिवसाचा प्रवास वाचेल असंही त्या दोघींनी मॉग - अॅमंडसेन यांना सांगितलं!
त्या दोघींपैकी एकजण वाट दाखवण्यास तयार झाली. झोपडीपासून काही अंतरावर असलेल्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचल्यावर तिथे आधी पुढे गेलेल्या माणसांचे जमिनीवर उमटलेले माग दृष्टीस पडत होते. अॅमंडसेन स्कीईंग करत सर्वात पुढे निघाला. त्याच्यापाठोपाठ आपल्या स्लेजवर जिमी आणि कापा आणि त्यांच्यामागोमाग मॉग अशा क्रमाने त्यांची वाटचाल सुरु होती.
१४ नोव्हेंबरच्या दुपारी पुढे स्कीईंग करणार्या अॅमंडसेनने एक वळण घेतलं आणि तो पाहतच राहीला..
पोर्क्युपाईन नदी!
नदीच्या काठावर असलेली इंडीयन वसाहत!
इंडीयन वसाहतीच्या शेजारीच अॅमंडसेन आणि मॉगने आपले तंबू उभारले. काही वेळातच अॅमंडसेनची जॉन अॅल्व्हर्ट नावाच्या त्या व्यापार्याशी गाठ पडली. तो देखील इंडीयनच होता. त्याच्या मते या वसाहतीपासून फोर्ट युकून इथे पोहोचण्यास त्यांना जास्तीत जास्तं चार ते पाच दिवस लागणार होते! त्याच्यापाशी असलेल्या सॅमन माशांची खरेदी करुन सर्वांनी तिथे रात्रीचा मुक्काम ठोकला.
पोर्क्युपाईन नदी
१८ नोव्हेंबरला पुन्हा त्यांना स्लेजच्या खुणा आढळून आल्या. या खुणांवरुन माग काढत जात ते एका घरापाशी पोहोचले, परंतु या घरात कोणीच नव्हतं. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना सॅमन क्रीक इथे असलेली इंडीयनांची दुसरी वसाहत दिसून आली. अचानकपणे प्रगटलेल्या या चार जणांना पाहून सुरवातीला सर्वजण एकदम गोंधळून गेले.
या वसाहतीत सर्वत्र स्त्रियाच दिसून येत होत्या. थॉमस नावाचा एक वृद्ध तेवढा एकमेव पुरुष त्यांना आढळला. हा थॉमस कॅप्टन मॉगचा जुना मित्रं होता. मॉगबरोबर हर्शेल बेटावरुन अनेकदा त्याने इगल सिटीपर्यंत याच मार्गाने प्रवास केला होता. वसाहतीतील सर्व पुरुष व्यापाराच्या निमित्ताने फोर्ट युकूनला गेले होते. एकटा थॉमस सर्व स्त्रियांसह मागे थांबला होता. थॉमस हा अतिशय हुशार माणूस असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं. त्याला इंग्लीश, फ्रेंच, एस्कीमो आणि इंडीयन अशा चार भाषा अस्खलीतपणे बोलता येत होत्या!
दुसर्या दिवशी सकाळी मॉग - अॅमंडसेनने पुढचा मार्ग धरला. संध्याकाळी उशीरापर्यंत फोर्ट युकून गाठण्याची त्यांची योजना होती. पण आदल्या रात्रीच्या भोजनाने सुस्तावलेल्या कुत्र्यांनी वेगाने मार्गक्रमणा करण्यास जणू साफ नकार दिला होता. अखेर फोर्ट युकूनच्या आधी पुन्हा एकदा मुक्काम करण्यापलीकडे त्यांना गत्यंतर नव्हतं!
२० नोव्हेंबरच्या सकाळी पुढे निघण्यापूर्वी अॅमंडसेनची चार इंडीयनांशी गाठ पडली. हे चार इंडीयन थॉमसच्या वसाहतीतले होते. अखेरीस दुपारी १.३० च्या सुमाराला अॅमंडसेन आणि मॉग फोर्ट युकूनला पोहोचले!
फोर्ट युकून इथे अॅमंडसेनची जॅक कार नावाच्या इंग्लिश व्यापार्याशी गाठ पडली. कार अनेक वर्षांपासून तिथे वास्तव्यास होता. फोर्ट युकूनला इंडीयनांच्या सुमारे तीस-चाळीस झोपड्या होत्या. इथे एक चर्च आणि शाळादेखील होती, परंतु ज्या एका गोष्टीच्या आशेने अॅमंडसेन तिथे आला होता, ती मात्रं फोर्ट युकूनला नव्हती,
तारायंत्र!
तार करुन नॉर्वेतील खबर मिळवण्यास आणि नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात यशस्वी झाल्याची बातमी जगाला सांगण्यास अॅमंडसेन उतावीळ झाला होता!
फोर्ट युकूनपासून सर्वात जवळचं तारायंत्र उपलब्धं होतं ते ईगल सिटी इथे!
२०० मैल अंतरावर!
हर्शेल बेटावरुन ३०० मैलांची मजल मारुन फोर्ट युकून इथे आल्यावर रिकाम्या हाती परत फिरण्याची अॅमंडसेनची तयारी नव्हती. त्याने पुढे ईगल सिटीला जाण्याचा बेत केला. कॅप्टन मॉग त्याच्याबरोबर जाण्यास तयार होताच! परंतु जिमी आणि कापा या एस्कीमोंना, विशेषत: कापाला पुढे जाणं शक्यं नव्हतं. तिची खूपच दमछाक झाली होती. अखेर चार्ली नावाच्या एका इंडीयन वाटाड्याची जॅक कारने अॅमंडसेन - मॉग यांच्याबरोबर नेमणूक केली.
अॅमंडसेन - मॉग यांनी चार्लीसह ईगल सिटीचा मार्ग धरला. अॅमंडसेनने आपले एस्कीमोंचे कपडे फोर्ट युकूनला ठेवून दिले होते. दुसर्या दिवशी जंगलात त्यांना एक झोपडी आढळून आली. रात्रीच्या मुक्कामासाठी ही जागा आदर्श अशीच होती. दुसर्या दिवशी जंगलात एका झोपडीत वास्तव्यास असलेल्या ली प्रोव्होस्ट या लाकुडतोड्याशी त्यांची गाठ पडली. त्याच्या आमंत्रणाला मान देऊन एक रात्रं त्यांनी त्याच्या झोपडीत मुक्काम केला.
२६ नोव्हेंबरला अॅमंडसेन आणि मॉग सर्कल सिटी इथे पोहोचले. इथे पोहोचल्याबरोबर त्यांनी आपला गाईड चार्लीला रजा दिली. सुदैवाने सर्कल सिटीहून ईगल सिटीला जाणारा पोस्टमन हार्पर अद्याप सर्कल सिटीतच होता. अॅमंडसेन आणि मॉग यांनी त्याच्याबरोबर ईगल सिटी गाठण्याचा बेत केला.
नऊ दिवसांच्या प्रवासानंतर अॅमंडसेन आणि मॉग पोस्टमन हार्परसह अखेर फोर्ट एगबर्टपासून दोन मैलांवर येऊन पोहोचले.
फोर्ट एगबर्ट!
ईगल सिटी!
नॉर्वे सोडल्यावर तब्बल अडीच वर्षांनी अॅमंडसेन पुन्हा नागरी वसाहतीत येऊन पोहोचला होता!
५ डिसेंबर १९०५!
फोर्ट एगबर्ट इथलं तार ऑफीस गाठून अॅमंडसेनने नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात यशस्वी झाल्याची नॉर्वेला तार पाठवली. अलास्काच्या उत्तर किनार्यापासून अवघ्या काही मैल पूर्वेला असलेल्या किंग पॉईंटपर्यंत पोहोचल्यावर नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडल्यातच जमा असल्याचं अॅमंडसेनचं मत झालं नसलं तरच नवल!
पुढचे दोन महिने अॅमंडसेनचा मुक्काम ईगल सिटीतच होता. या काळात नॉर्दन कमर्शियल कंपनीचा मॅनेजर फ्रँक स्मिथ याच्या घरी त्याचा मुक्काम होता.
फोर्ट एगबर्ट - ईगल सिटी
नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे ओलांडल्याची बातमी नॉर्वेत पोहोचताच एकच जल्लोष झाला असला तरी इंग्लंडमध्ये मात्रं विरोधी प्रतिक्रीया उमटल्या होत्या. अद्यापही अॅमंडसेनने बेरींग सामुद्रधुनी ओलांडली नाही असाच इंग्लिश वृत्तपत्रांचा सूर होता. नॉर्वेतून मात्रं अॅमंडसेन आणि त्याच्या तुकडीतील सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Oct 2014 - 7:55 pm | अजया
मस्त झालाय हा भागही.
7 Oct 2014 - 9:34 am | स्पार्टाकस
अद्याप बरंच काही घडायचं आहे....