माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय;
कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये.
स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय?
त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही.
प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय.
प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी.
प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका.
इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग.
मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे.
भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय.
असं किती काळ चालेल?
कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.
पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय.
माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही!
* शतशब्दकथा
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 9:16 am | प्रचेतस
थोडी वेगळीच.
आवडली कथा.
23 Jul 2014 - 9:19 am | स्पा
कुल :-)
23 Jul 2014 - 10:05 am | एसमाळी
कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.
हे जास्त आवडल.
23 Jul 2014 - 10:45 am | अत्रुप्त आत्मा
*good*
23 Jul 2014 - 10:57 am | डॉ सुहास म्हात्रे
छान मनोगत ! आवडले.
फक्त कादंबरी लिहीणेच नाही तर खरं आयुष्यही असंच असतं... धमक असलेला/ली आपल्या मर्जीनुसार आपलं साम्राज्य स्थापतो/ते.
23 Jul 2014 - 11:16 am | हरकाम्या
टूकार.
23 Jul 2014 - 11:36 am | ज्ञानोबाचे पैजार
गोष्ट आवडली.
पैजारबुवा,
23 Jul 2014 - 12:02 pm | किसन शिंदे
कथेपेक्षाही तुम्ही करत असलेल्या कामासंदर्भातले तुमचे मनोगत अधिक वाटले.
23 Jul 2014 - 12:10 pm | सस्नेह
यावरून तुमची त्या कार्यातली खोल इन्वॉल्व्हमेंट दिसून आली !
23 Jul 2014 - 12:26 pm | प्यारे१
किसन आणि स्नेहांकिता शी सहमत. आवडलं. पण हे कथेपेक्षा स्वगतामध्ये गणलं जावं की काय अशा शंकेत.
23 Jul 2014 - 12:52 pm | शैलेन्द्र
"कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. "
गुंतुनी गुंत्यात या, गाठ गहन छेडली,
आज मी म्रूगजळाची, सावली का खोडली?
23 Jul 2014 - 2:52 pm | आतिवास
कोणाच्या ओळी आहेत या?
(की तुमच्याच?)
23 Jul 2014 - 10:55 pm | शैलेन्द्र
माझ्याचं, एका अपुर्ण कवितेतल्या :)
23 Jul 2014 - 12:53 pm | शैलेन्द्र
सॉरी, कथेला दाद द्यायची राहुन गेली.. मस्त जमलीये.. आवडली..
23 Jul 2014 - 1:17 pm | एस
माझीही झोप उडालीय. अंधारलेल्या रणाक्रंदनातून चालतोय.
कशाचाच आनंद नाही. ना कशाची खंत.
ही वस्तुस्थिती आहे? की स्वप्न? मला जाणून घ्यायचे नाही.
त्यांच्या कोलाहलातही मी शांत आहे. त्यांचे घाव सोसूनही जिवंत आहे. मीही परतवतोय त्यांचे जीवघेणे हल्ले.
नि:शब्दपणे भोवतालचे हलाहल रिचवतोय.
जगण्याच्या दुर्दम्य आशेने माझी पावले चालत राहतात.
मी अजिंक्य. अजेय. सामदामदंडभेद. त्यांचीच शस्त्रे मलाही अवगत झालीयेत. त्यांच्या डोळ्यांत रोखून पाहतो. भीती आणि आश्चर्य.
त्यांच्या न संपणार्या भाऊगर्दीतून पुढे जात राहतोय.
स्थितप्रज्ञाच्या अविचलतेने.
असं किती काळ चालेल?
कधीतरी हे पर्व संपेल.
मग माझ्या नियमांनुसार मी या सगळ्यांना झुंजायला लावेन.
तत्त्ववेत्ते कुठे लढतात युद्धे? मी लढतोय.
माझ्या तत्त्वांनी लढेन. त्यांच्या तत्त्वशून्यतेने नाही.
* शतशब्दप्रतिसाद
23 Jul 2014 - 2:50 pm | आतिवास
शतशब्दप्रतिसाद उत्तम आहे; आवडला.
लढाईच्या अशा अनेक बाजू असतात हे खरं आहे!
23 Jul 2014 - 5:37 pm | सखी
मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स यांचा हा प्रतिसादही आवडला. प्रतिसादावरुन उषःकाल होता होता..हे ही आठवलं.
23 Jul 2014 - 7:48 pm | मधुरा देशपांडे
मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स यांचा हा प्रतिसादही आवडला.
23 Jul 2014 - 11:20 pm | बहुगुणी
दोन्हीही ताकदवान आहेत. (बाकी मूळ शतशब्दकथा ही कथेपेक्षा आत्मप्रकटन वाटलं हेही खरंच.)
24 Jul 2014 - 2:08 am | खटपट्या
याचा वेगळा धागा व्हायला पायजेलाय !!
बाकि मुळ शतशब्दकथाही अप्रतीम !!
30 Jul 2014 - 8:45 pm | arunjoshi123
आपली नि अतिवासतैंची कथा एकामागे एक वाचणे म्हणजे पर्वणी आहे.
23 Jul 2014 - 1:28 pm | आयुर्हित
कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.
आमेन!
23 Jul 2014 - 1:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
कथा आवडलीच
23 Jul 2014 - 5:08 pm | कवितानागेश
मूळ लेखन सुंदर. प्रतिसादही आवडला.
24 Jul 2014 - 5:02 am | पहाटवारा
""मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!""
मिळेल मग सुटका या कोलाहलातून ..?? मिळेल मग हवी ती मन:शांती ??
कथा आवडली हेवेसांनल..
-पहाटवारा
24 Jul 2014 - 11:28 am | आतिवास
नाही.
कोलाहलातून सुटका होणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. त्यामुळे पूर्ण मनःशांती हे सर्वसाधारणपणे (याला अपवाद होते, आहेत, असतील) एक मृगजळ आहे!
30 Jul 2014 - 11:15 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
30 Jul 2014 - 8:37 pm | जयनीत
''''''''''कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. ''''''''
मनुष्याची वागणूक पण बदलत असते कालांतराने.