दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
27 Jun 2014 - 2:21 am

तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे.

सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’.

तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही. आणि तुम्ही युवराज आहात की सामान्य याचा इष्काशी काहीएक संबंध नाही. तुम्ही आणि तुमची दिलरुबा तारुण्याच्या ऐन बहरात आहात की आयुष्याच्या शेवटाला; तुम्ही सधन आहात की निर्धन, या कशाचा तुमच्या आणि तिच्या अनुबंधाला लगाम नाही.

ग्रेस म्हणतो, प्रेम म्हणजे काय? दोन डोळे समान, एक हृदय किमान!

या इष्काची नशा, तुमची दुनिया जन्नत करते. कधी कुणावर बेतहाशा प्रेम करुन पहा. आज, उद्या, केव्हाही. एक दिलरुबा तुमच्या हृदयात विराजमान करा आणि मेहदी हसनची ही दिलकश गज़ल तुमच्या रोमारोमात भिनेल. त्याची गज़ल तुमचा अनुभव होईल. आणि तुम्ही म्हणाल :

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।

हे मी तुम्हाला सांगत नाही, ती अस्तित्वाची किमया आहे. आज नाही, अनंत कालापासून सृष्टीनं ते रहस्य जपलंय.

बुलबुलनं फुलांना सांगितलं, फुलांनी बहरांशी हितगुज केलं आणि पौर्णिमेचा चंद्र तारकांना म्हणाला...

बुलबुलने गुलसे, गुलने ब-हा-रों-से कह दिया या स्वरावलीत, मेहदी हसनजींनी ख़र्जात कमालीची अदाकारी केलीये. आणि `इक चौदवीके चांदने' वर स्वर असा काही वर नेऊन पुन्हा, `तारोंसे कह दिया' वर अशी काही सम साधली आहे की त्या समेसरशी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते!

बुलबुलने गुलसे, गुलने बहारोंसे कह दिया
इक चौदवीके चांदने, तारोंसे कह दिया....

आणि मग अत्यंत मखमली आवाजात, रसिकांची दाद मनोमन स्विकारत, मेहदी हसनजी, जी काही सुरुवात करतात ती केवळ लाजवाब आहे. `दुनिया' या शब्दावर त्यांनी टाकलेलं वजन आणि जन्नत या शब्दाचं केलेलं आश्वासक उचारण, प्रत्येक रसिकाला नि:संशयपणे सांगतं की फक्त एक दिलरुबा हवी! आणि मग, `हूरोंसे कम नही' मधे पुन्हा, `हूरोंसे' वर टाकलेलं वजन, कलेजा खलास करतं.

दुनिया किसीके प्यारमे, जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।

तू सौंदर्याची साम्राज्ञी आहेस, माझ्या (नज़रेनं तुझी एकेक अदा पहायचा अवकाश की) तू सौंदर्याचं संपूर्ण विश्व आहेस. आपल्या पारस्पारिक विश्वासचा, त्या अतूट अनुबंधाचा, तू प्राण आहेस. आपल्या इष्कामुळे तू इतकी खुलली आहेस की तुझ्या अंगोपांगात, प्रत्येक देहबोलीत एक शान आहे. आपल्यावर कुणी बेतहाशा प्रेम करतं ही भावनाच स्त्रीला इतकी सुखावून जाते की ती स्वतःच मोहोब्बतकी शान होते. तिची प्रत्येक अदा, तिचा डौल, प्रेमाच्या सुखावह आधारातून व्यक्त होतो. आणि प्रियकराला वाटतं की तिच्या सौंदर्याची दाहकता, तिचा सहवास, आपलं आयुष्य निव्वळ चांदणं करुन गेला आहे.

हार्मोनियमच्या काउंटर मेलडीज ग़ज़लेची उत्कटता क्षणोक्षणी वाढवत नेतात. ठेका तर इतका अप्रतीम आहे की तो हसनजी आणि हार्मोनियमच्या मखमली स्वरावलींवर, एखाद्या कमनीय युवतीच्या देहासारखा, त्या मखमलीला जरा सुद्धा धक्का न लावता, आवर्तनामागून आवर्तनं घेत राहातो.

तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो
जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो
जलवे तुम्हारे हुस्नके, तारोंसे कम नही ।

_________________________
ती सहज हसली तरी दिसणार्‍या दंतपंक्ती मोत्यांची बरसात करुन जातात. आणि तीनं नज़र उचलून पाहिलं तर हृदयातल्या आकांक्षांच्या कळ्या उमलतात. तिच्या कुंतलांचा गंध पुष्पांची बरसात करुन जातो.

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे
पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे
खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही ।

______________________________

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।

या जगात ज्याज्या वेळी प्रेमाच्या रहस्याशी कुणी थबकेल, त्यात्या वेळी ही कालातीत ग़ज़ल त्याला आश्वासन देत राहील की `दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही'. ही दुनियाच स्वर्ग आहे. आणि त्या मुहोब्बते-जन्नतच्या माहौलमधे, तो आणि त्याची दिलरुबा एक परिकथा बनून जगतील.

मांडणीप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

27 Jun 2014 - 9:54 am | चाणक्य

हसनजींनी सुरूवात खरच जीवघेणी केलीये...तुमच्या लिखाणाची सुरूवातही मस्त. आणि तुम्ही लिहीलेल्या ग्रेसच्या ओळी सुद्धा लाजवाब.

चिनार's picture

27 Jun 2014 - 10:01 am | चिनार

अतिशय सुंदर वर्णन !!! मस्त वाटलं वाचुन
मेहेंदी हसन यांची 'रंजिश ही सही ' गझल सूद्धा खूप छान आहे

माधुरी विनायक's picture

27 Jun 2014 - 1:10 pm | माधुरी विनायक

उर्दू ही प्रेमाच्या अभिव्यक्तीची देखणी भाषा. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही.. कोणे एके काळी ऐकलेल्या आणि नकळत लक्षात राहिलेल्या अशाच दोन तरल ओळी आठवल्या..
गुनगुनाती हुई आती है फ़लक से बुंदें
कोई बदली तेरे पाज़ेब से टकराई है...

पाजेब - पैंजण

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2014 - 10:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह संक्षी, माझ्या काळजातली गझल!
आणि मेहंदी हसन हा जिव्हाळ्याचा विषय!!
__/\__!! मजा आला.

पैसा's picture

29 Jun 2014 - 9:17 pm | पैसा

सुरेख गझलेची सुरेख ओळख!

संजय क्षीरसागर's picture

30 Jun 2014 - 10:43 pm | संजय क्षीरसागर

*smile*

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे
पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे
खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही ।

स्स्ही...!!!

संक्षीसेठ, गझल भारी आहे, पण मी अजून ''मरिजे मुहब्बत''मधुन बाहेर पडलो नाही. :)

इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन
फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम |

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2014 - 10:23 am | संजय क्षीरसागर

मरीज़े मुहोब्बतचा स्वरसाज, गुलाम अलींचा पहिल्या शब्दापासून लागलेला लक्षवेधी स्वर आणि प्रत्येक शेराच्या शेवटी दिसणारी उस्ताद क़मर जलालवींची कमाल प्रतिभा, ग़ज़लचा मूड क्षणोक्षणी वाढवत नेते. तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते!

`दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहौल वेगळा आहे. शब्द साधे आहेत, चाल सोपी आहे पण आषय उत्कट आहे. ही ग़ज़ल अभिव्यक्तीपेक्षा अनुभवात सरस आहे. फक्त प्रेम करता यायला हवं, मग प्रेयसीबद्दल कोणताही शिकवा राहात नाही कारण तीनं तुमची दुनिया जन्नत केलेली असते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2014 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते!

:) संक्षीसेठ, बिना पेगची 'ती'आणि 'मरिजे मुहोब्बत' या गझलेची आठवण व्हावी अशी ती सुंदर गझल. आणि पेग घेतल्यावर तर ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' वर माणुस घुटमळु लागेल आणि मग आनंदापेक्षा त्रास व्हायला लागेल. दिलकश असलेली ही गझल केवळ सुंदरच. बशीर बद्रचा एक सुंदर शेर आहे-

चांद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन
इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मु़झे.

सालं सर्व तुला दिलं आणि आमच्या वाट्याला काय तर ''दिल मुश्तरिब है'' हेच वाट्याला येतं, एक तर प्रेम या गोष्टीपासून माणसाने चार हात दूर राहावं (असं दूर थोडी राहता येतं म्हणा) आणि एकदा की तुमच्या मनाने मनकायाप्रवेश केला मी मग तुम्ही कुठलेच उरत नाही म्हणुन तुम्हे ''दिल लगाने को किसने कहा था'' असे ऐकावं लागतं.

`दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहोल वेगळ आहे हे मान्यच. शब्द साधे आहेत म्हणुन म्हणा किंवा चाल म्हणुन म्हणा तुलनेत 'मरिजे मुहोब्बत' शब्द, आशयात भारीच आणि गायन असं की आत नुसतं काहुर माजावं इतकी ती सुंदर आहे, असे मला वाटते. प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.

असो, अशाच चांगल्या चांगल्या गझला आणा ऐकायला त्यांच्या भावार्थाचा आनंद लुटायला मजा येत आहे. आभार.

अवांतर : आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मुड काही खास आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

3 Jul 2014 - 12:28 am | संजय क्षीरसागर

आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मूड काही खास आहे, असे वाटते.

सर, संदर्भ वेगळे असतात म्हणून मूड वेगळा वाटतो, माणूस एकच आहे! इतर वेळी दिमाग दिमागसे उलझता है, ग़ज़ल तो दिलका दिलसे उलझ जाना है|

चांद चेहरा, जुल्फ दरिया, बात खुशबु, दिल चमन
इक तुम्हे दे कर खुदा ने, दे दिया क्या क्या मु़झे |

आयला, तुम्ही सुद्धा एकदम शायराना मिज़ाज़ आहात.

तुम्हें दिल लगानेको किसने कहा था,
बहेल जाएगा दिल बहेलते बहेलते |

या ओळीत तर क़मर जलालवींची, काव्यविषयाशी एकतानता ठेवण्याची आणि आयुष्याची एक दारुण वास्तविकता सहजपणे लिहून जाण्याची, प्रतिभा काही और आहे. जिच्याशी मुहोब्बत केली ती मिळत नाही, तो सल तर कायम राहातो आणि तिच्याशिवाय जगतांना हेच वाटत राहातं की, दिवस तसेही सरलेच असते, कशाला कुणासमोर इतका हळवा झालो.

हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया,
इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |

प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.

सहमत!

संजय क्षीरसागर's picture

3 Jul 2014 - 1:35 am | संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, त्यामुळे कदाचित मला `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही', माझीच ग़ज़ल वाटते. रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते.

एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील.

मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.'

तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो
जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो |

ही वफा़दारी मुहोब्बतशी आहे, स्मृतींशी नाही. प्रेमी असतील, नसतील, पण प्रेम कायम असेल. ज्यांना त्याची जादू कळेल ते एकमेकांशी जोडले जातील आणि तीच इश्काची खरी शान आहे. आणि ज्यांना ती कळली, त्यांच्यासाठी दुनिया जन्नत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली,
आय हाय.... खल्ल्लास...! सही संक्षीसेठ. :)

रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते.

वॉव...! सुंदर.

एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील.

मान्य नाही.

मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.'

असं कुठं असतं काहो. प्रेम असं दहादा करता येत असतं का ? आणि एकावर प्रेम केलंत तस्सचं दुस-यावर करता येत असत का ? आणि वेळ, काळ परिस्थितीनुसार जरी कोणी आवडलं तरी पहिल्याप्रेमासारखं हे दुसरं प्रेम रंगवता येईल का ? आपल्याच्याने शक्य नाही बॉ. पहिलंच प्रेम सतत समुद्राच्या लांटासारखे मनावर आदळत राहील. आणि असं नाही झालं तर माणसंच नव्हे तर मला पानं, फुलं, हवा, मंदिरं, रस्ते, शब्द,कवितेच्या ओळी आणि तिच्या सहवासातील प्रत्येक एकेक गोष्ट विचारेल की अरे ती कुठेय...? मी काय बोलणार.

इन्हीं रास्तो ने जिन पर कभी तुम थे साथ मेरे
मुझे रोक रोक के पुछा की तेरा हम सफर कहा है

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

5 Jul 2014 - 11:07 am | संजय क्षीरसागर

भावनिकतेचा कौल नेहमी तुमच्या बाजूनं आहे.

पण वास्तवाशी हुज्जत घालता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर. स्ट्रेट इन फ्रंट ऑफ यू. मी गेलो तर, उर्वरित आयुष्यात ती दु:खी राहून काय उपयोग? आणि प्रेमात प्रतारणा होऊ शकत नाही हे मान्य, पण स्मृतींशी इमान राखून, दु:खच पदरी येत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा. काल्पनिक गोष्ट असल्यानं नेमका निर्णय होऊ शकत नाही. पण मला वाटतं, प्रश्न प्रेमाचा आहे. व्यक्ती आता परत येणारच नाही म्हटल्यावर, भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमान स्विकारायला हवा.... आणि वर्तमानाची जन्नत करायची असेल तर, पुन्हा प्रेमात पडायला हवं! देअर इज नो वे. दुनिया समजत असेल पण, ती व्यक्तीशी प्रतारणा नाही, प्रेमाची शान आहे.

क्या टॉपिक निकाला है संजयजी आपने. इस बातपर हम शुरु हो जायें तो फिर तो.....खैर!
हम चुप रहे, कुछ ना कहा.... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गप्पा खूप झाल्या. :)

०दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

5 Jul 2014 - 11:10 am | संजय क्षीरसागर

*yes3*

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2014 - 7:29 pm | तुमचा अभिषेक

मजा आली !!!

मुक्त विहारि's picture

5 Jul 2014 - 7:44 pm | मुक्त विहारि

आवडला...

संजय क्षीरसागर's picture

5 Jul 2014 - 8:43 pm | संजय क्षीरसागर

मानाके मुहोब्बतका, छुपाना है मुहोब्बत,
आ यूंही किसी रोज़, जतानेके लिए आ |

खूप छान … माझं लेखन वाचताना अभ्याला याची आठवण आली म्हणून हा वाचायला मिळाला… :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2016 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रिय संक्षीसेठ, आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही लिहिणार की नै एवढंच सांगा.
नसेल लिहायचं तर आपली दोस्ती खतम. जब से तुने मुझे दिवाना बना रखा है.

-दिलीप बिरुटे