आमची प्रेरणा
(अनघाताई, कृपया ह घ्यावे.)
बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
प्रतिक्रिया
26 Jun 2014 - 11:37 am | जेनी...
हिहिहि .. मज्जा आली बै !
26 Jun 2014 - 12:26 pm | प्रभाकर पेठकर
ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक (खरंच अल्पसंख्य आहेत?, अभ्यास वाढवला पाहिजे.) पुरुषांच्या भावना दुखावल्यामुळे ह्या धाग्याचा सौम्य निषेध. विशेषतः खालील वाक्ये...
१) पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत.
२) या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते ....
३) हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
४) जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे.
५) यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
हि वाक्ये तर माझ्यावर वैयक्तिक हल्ला आहे असाच भास झाला. खरं पाहता सुटलेल्या पोटाला, स्वच्छ शब्दात, 'सुटलेले पोट' म्हणण्याऐवजी 'ढेरी' असा अपमानकारक, हिणकस शब्द ठायी ठायी वापरून पोट सुटलेल्या पुरुषांच्या मानसिक (आणि सामाजिक) जखमेवर (फुंकर घालण्याऐवजी) मीठच चोळले आहे. आजकालच्या स्त्रीप्रधान समाजात पुरुषांना सन्मानाने जगणे मुश्किल झाले आहे.
बायकांच्या सुटलेल्या पोटावर (आणि काय काय अवयवांवर) लेख लिहायचा विचार होता पण संमच्या उंचावलेल्या भुवया नजरेसमोर येऊन (आपली नजर जमिनीकडे वळवून) साळसूद भुमिकेत जात आहे.
हा संपूर्ण प्रातिसाद हलकेच घ्यावा ही नम्र विनंती. *smile*
26 Jun 2014 - 12:39 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. पुरुषांची ती ढेरी, स्त्रियांची ती कंबर. असे तर इतके अवयव आहेत ज्यांच्या बेढबपणाबद्दल गिगाबायटी निबंध लिहिता येतील, पण ते इथे पचणार नाही कुणाला. सत्य कटु असते.
(ह. घ्या किंवा नका घेऊ. सत्याला त्याने फरक थोडीच पडणारे?)
26 Jun 2014 - 3:30 pm | विजुभाऊ
हा शब्द मी उगाचच तात्याला असा वाचला.
अर्थात त्यामुळे आषयात काहीच फरक पडत नाही
26 Jun 2014 - 4:18 pm | बॅटमॅन
हम्म, तेही आहेच म्हणा.
26 Jun 2014 - 4:47 pm | विटेकर
एक सहस्त्र वेळा सहमत !
खात्या- पित्या घरचे लोक , जरा समृद्धीच्या खुणा बाळगऊ म्हटले तर त्याला " ढेरी" असा हिणकस शब्द वापरावा? येते थोडेसे पोटं बाहेर , शर्टच्या बटणांची उभी काजी आडवी दिसतात म्हणून लगेच ढेरी?????
णिषेद !!!!
नजर बदला , जग बदलेल ..अंमळ असा विचार करा ना की या सम्रूद्धीच्या पाउल(पोट्)खुणा आहेत म्हणून ! एखाद्याचे असे खाणं काढणं शोभतं का भारतीय संस्कृतीत ?
26 Jun 2014 - 4:49 pm | बॅटमॅन
न शोभायला काय झालं? फक्त ते पुरुषांचं काढायचं इतकंच लक्षात ठेवलं तरी झालं.
26 Jun 2014 - 12:54 pm | दिपक.कुवेत
काय लिहितेस गं.....मजा आली वाचुन. हसुन हसुन गडबडा लो़ळतोय...
26 Jun 2014 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर
लोळ लोळ मेल्या! एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर नाहीतर कुशीवर झोपावे लागेल.
26 Jun 2014 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले
एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर नाहीतर कुशीवर झोपावे लागेल.
>>> अगदीच तसं काही नाही ... पोटावरही झोपता येते पण मग पाठीवरउलट्या पडलेल्या कासवा सारखी अवस्था होते *biggrin*
26 Jun 2014 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर
खी: खी: खी:
26 Jun 2014 - 11:45 pm | चिगो
ते 'पाठीवर पडलेल्या कासवा'ची पोज इमॅजीन करुन मरणाचं हसतोय.. =)) =))
27 Jun 2014 - 11:53 am | प्रसाद गोडबोले
27 Jun 2014 - 11:59 am | प्रचेतस
27 Jun 2014 - 12:03 am | स्थितप्रज्ञ म्हैस
... अगदीच तसं काही नाही ... पोटावरही झोपता येते...
कोणाच्या पोटावर?
27 Jun 2014 - 11:46 am | प्रसाद गोडबोले
स्वतःच्याच हो !
=))))
बाकी आञडी आवडलाय ...इथे आधी एक निराकार गाढव होते आता स्थितप्रज्ञ म्हैस आलीये ...लोल :)
26 Jun 2014 - 8:29 pm | भाते
जर पोटावर व्यवस्थित झोपता आले तर अजुनही पोट सुटलेले नाही आहे असे समजायचे का?
26 Jun 2014 - 8:56 pm | प्रभाकर पेठकर
कांही वेगळेच विचार डोक्यात आल्याने व्यनि केला आहे.
26 Jun 2014 - 1:12 pm | कवितानागेश
वेडीये ही. =))
26 Jun 2014 - 2:10 pm | सविता००१
माऊताईशी. खरच ही स्नेहा वेडीये.
इतकं आवड्तं हिच लिखाण की बस
26 Jun 2014 - 2:15 pm | प्यारे१
लिखाणासाठी स्नेहातैला चार कप्पी डबा भरुन हवा! (तू डायेटवर हाये ना? म्हणून! ) ;)
26 Jun 2014 - 2:42 pm | सस्नेह
म्हाईताय म्हाईताय, टम्म हवा भरायची अन मग टाचणी लावयची असं प्ल्यानिंग है तुमचं !
आमी नाय जा !
26 Jun 2014 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर
कमाल आहे. 'ज्जा' म्हंटल्यावर खरोखरच गेले.
26 Jun 2014 - 5:34 pm | प्यारे१
कोण गेलं म्हणे?
26 Jun 2014 - 5:42 pm | टवाळ कार्टा
ते "आमी नै ज्जा" असे असेल तर?? ;)
26 Jun 2014 - 4:40 pm | सानिकास्वप्निल
सॉल्लिड लिहिले आहे गं ताई :D
त्यात प्रतिसाद वाचून तर =))
26 Jun 2014 - 8:40 pm | सूड
१००
27 Jun 2014 - 10:00 am | मुक्त विहारि
झक्कास...
27 Jun 2014 - 12:19 pm | मराठी कथालेखक
विडंबन या प्रकाराला अनेक मर्यादा आहेत. शिवाय विडंबनाचा दर्जा कच्च्या मालाच्या दर्जावर पण अवलंबून असतो.
तरी हे विडंबन इतर विडंबनांपेक्षा सरस वाटले.
विडंबन करतानाही तुम्ही चांगल्या विषयाला हात घातलात. अनेक पुरुष बेडौल स्त्रियांना हसतात मात्र स्वतःच्या ढेरीकडे दुर्लक्ष करतात हे खरेच.
27 Jun 2014 - 4:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
चुकुन पुरुषांचे डेटींग असे वाचुन धागा उघडला होता....... पण असो,
खाणे ही गोष्ट अनकॉन्शस माईन्डकडून(किंवा सबकॉन्शस माईन्ड- जो काही बरोबर शब्द असेल तो घ्यावा)झाली की ती स्मूथ होते. पण ते जर कॉन्शस माईंडच्या हाती सोपवलं तर वाट लागते.
स्त्रियांच्या बाबतीत जास्त कथा अशासाठी तयार होतात की शंभरातल्या किमान ९९ स्त्रिया या लहान पणापासुनच भलत्याच डाएट कॉन्शस असतात. नवनवे पदार्थ चाखुन पहाण्यातला आनंदाला त्या पारखी झालेल्या असतात. याचा परिणाम म्हणजे खाताना प्रचंड कॉन्शसनेस. संपुर्ण लक्ष फिगर कडे देण्याच्या नादात आणि अतिरीक्त चरबी घटवण्याच्या नादात त्यांच्या जीभेचे स्नायु एकदम स्टीफ होतात आणि खाण्यावरचा हात अखडलेला रहातो. अठवा बुफेमधे आवडत्या गुलाबजामचा ढीग समोर दिसत असुन लहानातलहान गुलाबजाम शोधण्याची धडपड आणि त्याचवेळी इतर बायकांवर असलेली चोरटी नजर. आणि मग अशा वेळी कोणी त्यांच्या वाटीत एकदम पाचसहा गुलाबजाम टाकले की त्यांची गाळण उडते. अशा वेळी नक्की काय प्रतिक्रीया द्यायची या विचाराने त्या एकदम गोठुन जातात. आणि मग न्युटनचा नियम लागु पडतो. इक्वल अॅन्ड अपोझीट रिअॅक्शन च्या नियमा प्रमाणे इतर बायका तिच्या कडे बघत कुत्सित पणे हसु लागतात. मग कोणाला जळजळीत नजर आणि कोणाला नाकाचा शेंडा वाकडा करुन दाखवुन तर कोणाला चिमटे काढुन बदला घेण्यात येतो.
या सर्वावर उपाय म्हणजे जे जे आवडत असेल ते ते बिनधास्त खायची सवय लाउन घेणे. आई किंवा बहिण अशी सवय लाउन देण्यासाठी कुचकामी असतात. कारण त्या स्वतःच डाएट कॉन्शस असतात. त्या खातात कमी आणि आपल्या कमी खाण्याचे वर्णनच जास्त करतात. शिवाय त्यांनी सोडुन इतरांनी केलेला एखादा पदार्थ बिघडला असेल तर त्याचा त्यांना आनंद जास्त होतो. त्या पेक्षा बुफे मधे मनलाउन जेवणार्या पुरुषांच्या डिश कडे बघावे आपल्या मागुन येणार्या कॉमेंटींकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत कसे हदडावे ते त्यांच्या कडुन शिकण्या सारखे असते.
भरपेट खाण्याचा आनंद मिळवायचा असेल तर खवय्येगिरीची तत्व समजून घेउन इतरत्र पूर्ण दुर्लक्ष करत जेवढे रीचवता येईल तेवढे रिचवावे. निर्लज्ज पणा अंगी बाणवला की खाण्यातला आनंद मिळवायला इतर काही करावे लागत नाही.
कोणी सतत बाजुला बसून कॉमेंटी पास केल्या तरी जेवणावरच लक्ष केंद्रीत करुन सफाईदार पणे सगळ्या पदार्थांचा अस्वाद घेता येतो.
डिश शिगोशीग भरुन घ्या. आपल्याला परत मिळणारच नाहीये असे समजा आणि मित्रांना आपल्या डिश मधे हात घालु देउ नका पण त्यांच्या डिश मधले पदार्थ जरुर गिळंकृत करा. एखादा जागेवरुन उठला की त्याला दोन चार पदार्थ घेउन यायचे हुकुम सोडायला शिका. बस इतक सोप आहे हे.
गढे (गरगरीत ढेरी)
28 Jun 2014 - 3:30 pm | रेवती
डिश शिगोशीग भरुन घ्या.
हे वाचून ३ इडियटस मधील आमीर खान व दोन मित्र एका लग्नाच्या जेवणावळीत जातात त्याची आठवण झाली. प्लेटमध्ये पदार्थ मावत नाहीयेत अशावेळी आमिर त्या मित्राला तसेच अॅडजस्ट करण्यास सांगतो.
28 Jun 2014 - 7:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या जगात चारचं प्रकारची लोकं असतात. जगण्यासाठी खाणारी, खाण्यासाठी जगणारी, दुसर्याच्या प्लेट मधे डोकवुन आगाऊपणे सल्ले देणारी आणि जिभेवर कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स चा चार्ट घेऊन फिरणारी.
त्यापैकी फक्त दुसर्या प्रकारातली लोकं सुखी आणि दिर्घायुषी होतात.
जगण्यासाठी खाणारी लोकं पोटात भरायचं म्हणुन खातात, चवीसाठी नाही. अन्न्ब्रम्हाचा घोर अपमान ह्याहुन जास्त कुठला. अंगाला लागत नाही असं खाऊन.
दुसर्याच्या प्लेट्मधे डोकऊन आगाऊपणे सल्ले देणारी लोकं डोकं फिरवतात अ़क्षरशः. स्वतः नीट खात नाहीत आणि दुसरा खातोय त्याला सुखानी खाऊ देत नाहीत. सगळ्यात बेक्कार म्हणजे ही लो़कं हिप्पोक्रिट असतात असा अनुभव आहे.
कार्बो-हायड्रेट आणि कॅलरी वाली मंडळी तर हल्ली अर्ध्या हळकुंडानी पिवळी होऊन सगळ्या जगात थयथयाट करत आहेत. आपल्या हातात गरमा-गरम पाकातला गुलाबजाम असावा, शेजारी आईसक्रीम असावं, आपण छान चवं घ्यायला जाणार तेवढ्यात हे विघ्नसंतोषी लोकं आपल्या तोंडचा घास पळवुन घेतात. आपण झक्कास मिसळ आणि मिसळीची तर्री चापतोय आणि समोरचा माणुस, खाण्याऐवजी कॅलरीज मोजतोय (बॅड कंपनी).
असो. सकाळी दणकुन व्यायाम करायचा आणि दिवसभर शक्य होईल तिथे आणि तेवढं चालायचं. कितीही हादडा, काय बिशाद आहे ढेरी ऑर टेरी वाढायची? व्यायाम मात्र पाहिजेच, ह्यात शंका नाही. (स्वानुभव).
उद्या काय होईल ह्याच्या भितीनी आजचा दिवस का खराब करायचा? खा प्या, रेग्युलर व्यायाम करा-रिन्स अँड रिपीट.
-सगळ्या मोजुन मापुन खाणार्या लोकांचा अतितीव्र णीशेध-
28 Jun 2014 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर
>>>> दणकुन व्यायाम करायचा आणि दिवसभर शक्य होईल तिथे आणि तेवढं चालायचं.
तारुण्यात हेच केलं, आज कारूण्य आलय. पोटाचा घेर ४४ इंच.
28 Jun 2014 - 11:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
;)
कालाय तस्मै नमः :)
वय वाढेल तसं हे चालायचचं :)
17 Aug 2014 - 8:13 pm | सुजल
<,आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?>> अगदी अगदी आमच्या ऑफिस मध्ये अशाच पुरुषांनी भरपूर खाऊन खाउन मागच्या बायकांना काही खायलाच उरल नाही अशी अवस्था करून ठेवली :)
18 Aug 2014 - 1:15 pm | पैसा
म्हणजे तुमच्या हापिसात जेवण असतं तेव्हा बायकांना नंतर जेवायला देतात? आमच्या हापिसात तर अगदी स्वीपर बाईसुद्धा जेवायला आल्याशिवाय कोणीही पुरुष जेवण वाढून घ्यायला सुरुवात करत नाहीत ब्वा.
हो, लेखाशी सहमत असले तरी चांगलं ते चांगलंच नै का!
18 Aug 2014 - 1:59 pm | सुजल
बायकांना नंतर जेवायला देत नाहीत हो. बुफे च टेबल लागल रे लागल कि भराभर पुरुष लोकच लायनीत उभे राहतात. बायका हातातलं काम संपवून जरा थोड्या उशिरा आल्या कि त्यांना शेवटीच मिळणार न जेवण :)
तुमच्या ऑफिस मधल वेगळ बर का पैसा ताई. ऑफिस ऑफिस ची गोष्ट आहे :)
18 Aug 2014 - 2:06 pm | पैसा
आता मी जर का म्हटलं की "बायका कामं करत असतात म्हणून त्यांना काम संपवून उठायला वेळ लागतो, याउलट पुरुष मंडळी चकाट्या पिटतात/बिड्या ओढतात/आंतरजालावर बागडत असतात. त्यामुळे हापिसातले पुरुष पार्टीच्या जेवणाचा वास आल्याबरोबर लग्गेच लैन लावू शकतात" तर या धाग्याची शंभरी भरलीच म्हणून समजा!
18 Aug 2014 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर
या धाग्याची शंभरी (आणि तुमची कम्बख्ती..)भरलीच म्हणून समजा! *biggrin*
18 Aug 2014 - 3:18 pm | एस
बादवे पैतै, आम्ही तर असं ऐकलंय की स्त्रियांचे घ्राणेंद्रिय पुरुषांच्यापेक्षा जास्त तीक्ष्ण असते. ;-)
18 Aug 2014 - 2:13 pm | एस
काही गोष्टी ध्वनित होताहेत -
एक. तुमच्या हापिसातले पुरुष रिकामटेकडे असतात.
दोन. तुमच्या हापिसातले पुरुष दुष्ट असतात.
तीन. तुमच्या हापिसातल्या पुरुषांना अनावर भूक लागते.
चार. तुमच्या हापिसात जेवण पुरेसं बनवत नाहीत.
पाच. तुमच्या हापिसातल्या पुरुषांच्या बायका त्यांना डबाही देत नाहीत आणि घरी खायलाही घालत नाहीत.
सहा. तुमच्या हापिसातल्या बायका हातातलं काम उशिरा संपवतात.
सात. तुमच्या हापिसातले पुरुष लायनीत उभे राहूनच जेवण घेतात.
आठ. तुमच्या हापिसातले पुरुष काय करतात यावर बारीक लक्ष ठेवलं जातंय.
आसो, आसो. बिचारे हापिस. या सगळ्या बिचार्यांना सहानुभूती कळवा हां!
20 Aug 2014 - 1:22 pm | कवितानागेश
=))
26 Aug 2014 - 2:25 am | डॉ सुहास म्हात्रे
अरे, अरे, मुख्य मुद्दा राहिलाच !
शुन्य. तुमचे एक हापिस आहे.
18 Aug 2014 - 3:13 pm | सुजल
<,पुरुष मंडळी चकाट्या पिटतात/बिड्या ओढतात/आंतरजालावर बागडत असतात. त्यामुळे हापिसातले पुरुष पार्टीच्या जेवणाचा वास आल्याबरोबर लग्गेच लैन लावू शकतात>> अगदी बरोबर .भरुदे कि शंभरी. हाय काय अन नाय काय :)
स्वॅप्स तुमच्या साठी
एक. तुमच्या हापिसातले पुरुष रिकामटेकडे असतात.- अस कुठे मी म्हटलं ?
दोन. तुमच्या हापिसातले पुरुष दुष्ट असतात- नसावेत ( सगळेच कसे असतील?).
तीन. तुमच्या हापिसातल्या पुरुषांना अनावर भूक लागते.- असेल असेल
चार. तुमच्या हापिसात जेवण पुरेसं बनवत नाहीत.- जेवण ऑर्डर करतात ( आदल्या दिवशी ऑर्डर करतात माणशी )
पाच. तुमच्या हापिसातल्या पुरुषांच्या बायका त्यांना डबाही देत नाहीत आणि घरी खायलाही घालत नाहीत.- जेवणाच्या दिवशी आदल्या दिवशी माहितीच असत हो उद्या जेवण आहे म्हणून . उगीच बायकांना नाव ठेवायची नाहीत ह :)
सहा. तुमच्या हापिसातल्या बायका हातातलं काम उशिरा संपवतात.- हा कळीचा मुद्दा आहे. बायकांच्या चार्ज ची काम संपता संपत नाहीत. कितीही हापसा पाणी संपतच नाही
सात. तुमच्या हापिसातले पुरुष लायनीत उभे राहूनच जेवण घेतात.- पुरुष काय न बायका काय सगळ्यांनाच लायनीत उभ राहूनच जेवण मिळत हो
आठ. तुमच्या हापिसातले पुरुष काय करतात यावर बारीक लक्ष ठेवलं जातंय- बारीक लक्ष नसत हो पण पाहिजे तेव्हा कधी जागेवर सापडणार नाहीत त्यामुळे लगेच लक्षात येतच .
स्वॅप्स कळवते बर का तुमची सहानुभूती :)
18 Aug 2014 - 3:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
सालों साल की मेहनत और पैसा लगता है (बियर क्रेट्स साठी) एक पर्फेक्ट बियर बेली बनाने में :lol:
26 Aug 2014 - 12:33 am | आयुर्हित
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 21st August 2014 Episode
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 22nd August 2014 Episode
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 25th August 2014 Episode