(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे)
वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते.
तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात. स्वत:च नाव सांगायची प्रत्येकीची त-हा वेगळी. कोणी घाईघाईने नाव सांगून मोकळी होत होती; तर कोणी आधी हसावं की नाव सांगावं या संभ्रमात. एखादी दुसरीलाच नाव सांगायचा आग्रह करत होती – तेंव्हाचा त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता.
त्यांनी सहा सात महिन्यांपूर्वी हा बचत गट स्थापन केला होता. महिन्यातून एकदा त्या सगळ्या नियमित भेटतात आणि बचत करतात. बॅंकेच दर्शन त्यातल्या एक दोघींनीच घेतलेलं – तेही या गटामुळे. बचत गटाच वैयक्तिक पासबुक त्या अगदी जपून ठेवतात. प्रत्येकील मी तिचं पासबुक पहावं असं वाटतं. खरं तर एक दोन पासबुकं पाहिली की कळतो त्या गटाचा एकंदर आर्थिक व्यवहार आणि शिस्त. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी प्रत्येक पासबुक पाहते, त्यावर काहीतरी बोलते /विचारते आणि हसून ते परत करते.
मी त्यांच्याकडून गट बांधणीच्या प्रक्रियेची माहिती घेते आहे. ती घेताना त्यांच जगणं, त्यांचा संदर्भ मी समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. मी इतके सगळे प्रश्न का विचारतेय हे त्याही समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत हे माझ्या लक्षात येतं.
खरं तर जगण्याबद्दल विचार करत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. दारिद्र्याशी झुंजण्यात त्यांची सारी शक्ती खर्च होते. हंडाभर पाणी आणायचं तर अर्ध्या तासाची पायपीट केल्याविना त्यांना ते मिळत नाही. घरात खाणारी सहा सात तोंडं आहेत – त्याची तजवीज करावी लागते. लाकूडफाटा, धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई, शेणगोठा – ही त्यांचीच कामं! गेली दोन वर्ष पावसानं ओढ दिलीय खरी, पण शेत तयार तर करावं लागतं आशेनं!
गावातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. इतर गावातील गटांचे अनुभव मी त्यांना सांगते तेव्हा त्यांच्या नजरेत नव्या स्वप्नांच बीज रुजताना मला दिसतं.
“ताई, रसायन घ्यायला आवडेल का तुम्हाला?” रखमाताई विचारतात आणि मी दचकते. फार वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाच्या भटकंतीत तिथल्या आदिवासींच्या भावनांचा मान राखण्यासाठी मी ‘अपांग’(तांदळाची दारू) चाखली होती. तसाच प्रसंग दिसतोय आज. माझा गोंधळ चेह-यावर दिसला असणार. कारण नीता (सोबत असलेली संस्थेची कार्यकर्ती) हसून म्हणाली, “घाबरू नका, रसना पिणार का असं विचारताहेत त्या!”
रखमाताई आधीच माझ्याशी बोलताना जरा बावरलेल्या होत्या. नीताच्या बोलण्यावर जमलेल्या सगळ्या बाया हसतात तेव्हा त्या आणखीच खजील होतात. मला एरवी रसना आवडत नाही. पण आत्ता रखमाताईंना बरं वाटावं म्हणून मी उत्साहाने होकार देते.
रखमाताईंच घर छोटसं आहे. पुरेसा उजेड पण नाही. रसना येतं. मी ग्लासातलं रसना कमी करायचा प्रयत्न करते तो एकमुखाने हाणून पाडला जातो.
मग गावात एक फेरफटका मारायला आम्ही निघतो. गुलाबताईंच घर दूर आहे. पाण्याचा टिपूस नसलेल्या नदीच्या पात्रातून आम्ही चाललो आहोत. भर दुपारी दोन वाजता वाळूतून चालणं सोपं नाही. आम्ही दोघी तिघी सोडल्या तर कोणाच्याच पायात चप्पल नाही. पण जणू एखादा आनंदसोहळा असल्यागत सर्वांचा उत्साह!
एक चढण चढून आल्यावर समोर एकदम हिरवाई आहे. गुलाबताई बायफ संस्थेच्या शेती विकास कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. खड्डे कसे खणले, लांबून पाणी आणून लेकराच्या मायेनं आंबा आणि काजू कसे जगवले, त्यापायी शरीर कसं हलकं झालं ... असं बरंच काही गुलाबताई बोलतात. त्यांचं घर त्यामानाने मोठं वाटलं मला. एका दोरीवर काही कपडे टांगलेले होते; एका कोप-यात चूल – दोन तीन पातेली आणि तीन चार ताटल्या फक्त दिसल्या. दुस-या कोप-यात दोन मध्यम आकाराच्या कणग्या. आणि तिस-या कोप-यात एक मध्यम आकाराची पेटी. घरात फक्त एवढंच सामान.
शेजारचे लहान-मोठे सगळे मला पहायला येतात. पुन्हा एकदा ‘परिचयाचा’ कार्यक्रम होतो. एक पोरगेलासा तरुण पुन्हा एकदा मला नाव विचारतो. नवा शब्द सापडल्यागत तो स्वत:शी हसतो आणि एका अंधा-या कोप-यात दिसेनासा होतो. दोन मिनिटांत तो लगबगीने परततो. “माझ्या लग्नाला यायचं बरं का ताई,” असं म्हणत माझ्या हातात पत्रिका देतो. त्याचा निरागस आनंद पाहून “लग्नाच्या योग्य वयाबाबत” काही बोलायचा मोह मी निग्रहानं टाळते.
तेवढ्यात टोपलीभर बटाटे घेऊन एक आजीबाई येतात. इतके स्वच्छ आणि तुकतुकीत बटाटे मी आजवर कधी पाहिले नव्हते. त्या बाजारात बटाटे विकायला निघाल्या आहेत असं समजून मी विचारते, “किती किलो बटाटे आहेत, आजी?” त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, “ मापून थोडेच आणलेत? तुझ्यासाठी घेऊन आलेय मी. घरी घेऊन जा.”
सकाळपासून या गावात मला आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळते आहे. या गावात मी आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही. या स्त्रियांकडून खास वागणूक मिळावी असं वास्तविक मी काही केलेलं नाही. मी या स्त्रियांशी फक्त गप्पा मारायला आलेय. मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय - आशेनं त्या माझ्या पुढेपुढे करताहेत अशातलाही भाग नाही. मला भरून आलं – माझ्या डोळयांत पाणी तरारलं.
पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं. सकाळपासूनच्या भारावून टाकणा-या आदरातिथ्यासमवेत नकळत नजरेआड केलेली वास्तवाची काही प्रखर रुपंही होती – ती आता ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली.
शहर असो की खेडं, माणसांच्या मूळ स्वभावात आणि परस्परनातेसंबंधात फारसा फरक आढळत नाही. व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं. मी या गावातली – त्यांच्यातलीच एक - असते; तर रखमाताईंनी मला ग्लास भरून रसना दिलं नसतं; आपलं काम सोडून या स्त्रिया माझ्याशी अशा गप्पा मारत बसल्या नसत्या; गुलाबताईंनी मला आग्रहाने त्यांच्या घरी नेलं नसतं आणि त्या पोरगेल्या युवकाने मला इतक्या लगबगीने त्याच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नसतं.
पण बाहेरून पाहिलं, की तेच जग वेगळं दिसतं!
आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते. रोजच्या संबंधातील व्यक्तींना गृहित धरून चालताना आपलं काही चुकतंय असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्यातील एका व्यक्तीला नेम धरून एकटं पाडणं – हा समाजातल्या रंजनाचा सर्वमान्य नमुना. कोणाच्याही अनुपस्थितीत भलतेसलते शेरे मारत त्या व्यक्तीच्या वागण्याचा अनर्थ काढण्यात आपली सारी हुशारी खर्ची पडते. रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं. ते आपण सहज करू शकत नाही. क्रिया-प्रतिक्रियांच्या जंजाळात सोप्या गोष्टी अवघड करून घेण्यात, दुस-यांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता वाटायला लागते. आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!
परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात कधीतरी आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली बसण्याचं सुख जरूर उपभोगावं! पण रोजचीच गोष्ट असेल तर आपली सावली आपल्याला आतच शोधायला हवी!
प्रतिक्रिया
30 Apr 2014 - 11:18 am | यशोधरा
शेवटचे २-३ परिच्छेद लाजवाब. सुरेख.
30 Apr 2014 - 2:03 pm | मधुरा देशपांडे
सुरेख. असेच असेच म्हणते. मागे अन्यत्र वाचला होता तेव्हाही आवडला होता. पुन्हा वाचतानाही आवडला.
30 Apr 2014 - 6:49 pm | शुचि
मागे अन्यत्र वाचला होता तेव्हाही आवडला होता. पुन्हा वाचतानाही आवडला.
8 May 2014 - 2:57 am | संदीप चित्रे
सहमत यशो!
30 Apr 2014 - 11:23 am | अनुप ढेरे
मांडलेले विचार पटले.
हे विशेष पटलं
30 Apr 2014 - 12:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
अदिवासी पाड्याचे वर्णन, तेथील रहिवास्यांची निरागसता, त्यांचे साधे, सरळ, जीवन, त्यांची विचारसरणी टीपण्याची शैली आवडली.
छोट्या छोट्या बारकाव्यांसकट केलेल्या वर्णनामुळे हा लेख त्या पाड्यातच बसुन वाचतो आहे का? असे वाटुन गेले.
वरील वर्णनाच्या पार्श्र्वभुमीवर, शेवटच्या ३-४ परिच्छेदांमधे काढलेले निष्कर्ष पटले नाहीत.
ते वाचल्यावर, वरचा लेख हातचे काही राखुन लिहीला आहे का? अशी शंका उगाच मनामधे येउन गेली.
30 Apr 2014 - 1:12 pm | आतिवास
:-)
30 Apr 2014 - 1:17 pm | बॅटमॅन
_/\_
नवीन शब्द सुचत नैत म्हणून ओ.
30 Apr 2014 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीसारखाच "सुक्ष्म निरिक्षण आणि त्याचे चपखल विवेचन" याने नटलेला वाचनिय लेख ! खास अतिवास शैलीतले शेवटचे तीन परिच्छेद विशेष आवडले.
30 Apr 2014 - 5:56 pm | प्रचेतस
अगदी हेच म्हणतो.
30 Apr 2014 - 3:37 pm | मारवा
30 Apr 2014 - 4:15 pm | आतिवास
हाहा!
पण प्रियंकाजी कुठे आणि आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे!
शिवाय हे एक आहेचः
मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय
;-)1 May 2014 - 6:21 am | स्पंदना
खर सांगु का? प्रियांकाच्या पणजोबापासुन त्यांच घराण या देशावर अक्षरशः राज्य करतय.
तरीही अजुन निवडणुकीच्या वेळी त्यांना अश्या भाकरीचे तुकडे मोदावे लागतात यातच सर्व काही आल.
यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना.
असो.
1 May 2014 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना.
याउलट जनतेला हेतुपुर्रसरपणे गरिब, अशिक्षित आणि लाचार ठेवणे हेच बहुतेक राजकारण्यांचं ध्येय आहे आणि ते साध्य करण्यात ते बर्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. कारण साधे आहे सधन आणि शिक्षित बहुमताला 'टोपी घालणे' आणि 'विकत घेणे' हे जरा जास्तच जिकीरीचे आहे ना !30 Apr 2014 - 3:42 pm | मितान
वा ! खूप चांगल्या पद्धतीने उतरवता आलंय.
वाचताना सगळं डोळ्यासमोर दिसतंय !
30 Apr 2014 - 5:26 pm | पैसा
"आतले आणि बाहेरचे" या लघुनिबंधाची आठवण झाली. तसंच छान लिहिलंय.
30 Apr 2014 - 5:37 pm | आत्मशून्य
क्लास.
दंडवत. _/\__/\__/\_
अतिशय अनुभवसकस.
30 Apr 2014 - 5:56 pm | सिफ़र
नेमकं!!!
__/\__ तुमचं लेखन वाचल्यावर नेहमीच केंद्रबिंदू अधिक घट्ट करून परिघ विस्तारायला पाहीजे असं वाटतं. धन्यवाद.
3 May 2014 - 3:18 am | बहुगुणी
परिघ विस्तारायला पाहीजे असं वाटतं.
असंच वाटलं.आतिवासः वाचनखूण साठवली आहे इतकंच नमूद करतो!
30 Apr 2014 - 6:46 pm | रेवती
छान लिहिलय. लेखाचा शेवट होता होता मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य वाचायला नको वाटत होते कारण ते खरेही आहे.
तुम्ही कोणतीही आश्वासने देत नव्हता पण जे लोक देतात आणि पूर्ण करीत नाहीत, त्यांना रात्री झोप येते कशी? इथे आपण एखादी गोष्ट देऊ म्हणून द्यायला जमले नाही तर वाईट, अस्वस्थ वाटत राहते.
30 Apr 2014 - 7:36 pm | मुक्त विहारि
आवडला.
30 Apr 2014 - 7:40 pm | शुचि
अतिशय सुंदर वाक्य!!! आपली माणसं,आपली परीस्थिती,अस्तित्व सर्वार्थाने आपलेसे करायचे असतात अगदी त्यांच्या शॉर्ट्कमिंग्ससहीत.
1 May 2014 - 6:23 am | स्पंदना
एक अलिप्त नजरीया!
सुरेख लेखण. शेवट वाचताना न कळत पळुन जावस वाटायची भावना दाटुन आली.
1 May 2014 - 12:16 pm | कवितानागेश
नेहमीप्रमाणेच, अगदी मनातून उतरलेलं लेखन.
1 May 2014 - 2:24 pm | सस्नेह
शेवटच्या परिच्छेदातली व्यथा जाणवली. पण खेद का हे समजले नाही. अतिथी देवो भव हा खास भारतीय बाणा आहे. घरचं काही असलं तरी अतिथिला चांगलं काय ते द्यावं ही भावना श्रेष्ठच आहे. पण रोजच्या धकाधकीत घरच्या घरी उणीव झाकणार कशी ? यामागे काही दुजाभाव असेल असं वाटत नाही, तर उणीवा अतिथीपासून दूर ठेवणे ही भावना असावी.
1 May 2014 - 6:15 pm | आतिवास
व्यथा आणि खेद दोन्हीही नाही; अतिथीधर्माबद्दल तक्रारही नाही:
- तसं पोचलं असेल तर लेखनातली उणीव आहे ती :-)
1 May 2014 - 6:39 pm | सस्नेह
कदाचित माझी जाणीव चुकली असेल.
8 May 2014 - 7:20 am | स्पंदना
व्वा! स्नेहांकिता! एक वेगळीच उकल.
1 May 2014 - 4:07 pm | एस
तुमचे लेख जितके वाचनीय असतात तितकेच मननीयही असतात. याही लेखातून तुमची सखोल 'इनसाइट' जाणवते आहे.
1 May 2014 - 8:59 pm | अर्धवटराव
डोळे आणि मन उघडं ठेऊन जगाकडे बघण्याचं तत्वज्ञान किती सहज सोपं करुन मांडलय.
1 May 2014 - 9:00 pm | जयनीत
आवडलं....
''''''''''''''''''''''''''''आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते.''''''''''''''''''''''''''
व्यक्तिगत संबंधाच्या मर्यादा ह्या विषयावर कधीतरी असच काही तरी खरडलं होतं.
जास्त नाही पण तुमच्या वरच्या ओळींशी संबधीत काही अंश इथे शेअर करतो.
'''''''अंतरपाटा आड खूप आनंदी होती दोघे
सुप्तपणे सुरु झाले मग पति पत्नीचे गा-हाणे'''''''
2 May 2014 - 2:24 pm | आतिवास
तुमचा पूर्ण लेख कुठे आहे? मिपावर असल्यास (किंवा अन्यत्रही) त्याचा दुवा द्या - वाचायला आवडेल!
2 May 2014 - 8:13 pm | जयनीत
अरे रे घात झाला
साफटवेअरच्या जमान्यात कॅम्पूटर बद्दलचे अज्ञान उघडे पडले.
साधी लिंक सुद्धा मला अजून देता येत नाही.
आता टपाल खाती खर्डेघाशी करण्या शिवाय पर्याय नाही.
असो.
हैप्पी बड्डे कल्चर वर छोटेखानी काहीबाही खरडलं आहे.
पाठवतो वाचून बघा.
3 May 2014 - 5:14 am | चाणक्य
अतिवास ताई,काय सुंदर लिहीलं आहे तुम्ही. पहिल्या दोन ओळीत जी पकड घेतलीत ती अगदी शेवटच्या ओळीपर्यंत. फारच छान लिखाण.
5 May 2014 - 2:16 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आभार.
यशोधरा, मधुरा देशपांडे, शुचि, अनुप ढेरे, ज्ञानोबाचे पैजार, बॅटमॅन, इस्पीकचा एक्का, वल्ली, मारवा, अपर्णा अक्षय, मितान, पैसा, आत्मशून्य, सिफर, बहुगुणी, रेवती, मुक्त विहारी, लीमाउजेट, स्नेहांकिता, स्वॅप्स, अर्धवटराव, जयनीत, चाणक्य - तुम्हा सर्वांच्या प्रतिसादासाठी आभार.
8 May 2014 - 9:16 am | प्रमोद देर्देकर
अतिवासतै खुप छान लिखाण.
पण तुमच्या लिखाणाची ओळ >>>परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं....
ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे.
8 May 2014 - 10:00 am | आतिवास
:-)
ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे.
आत्मशून्य हा माझा आयडी नाही. 'आतिवास' हा माझा एकमेव आयडी आहे.
हा लेख प्रसिद्ध झाल्यावर आत्मशून्य यांनी सही म्हणून ती ओळ घेतली आहे असं दिसतंय. त्यांनी त्या वाक्याचं श्रेय 'आतिवास'ला दिलं आहेच. त्याबद्दल तक्रार करण्याजोगं मला काही वाटलं नाही. उलट मी आत्मशून्य यांचे आभार मानायला हवेत! ते आता या प्रतिसादाच्या माध्यमातून मानते.
जागरूकतेसाठी आभारी आहे पण काळजी नसावी :-)