व्यवहारज्ञान (२)

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 8:48 pm

मि. ऱ्होडस ची नाराजी बहुदा मि. पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते,
"असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा मि. ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे की कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या केसेस चे तज्ञ समजले जातात. पण त्यांना एकदा समस्या दिली की ती सोडविण्यासाठी, ते उत्तराच्या जवळ असणाऱ्या शक्यतेचाच फक्तं विचार करतात आणि त्याप्रमाणे आपला बचाव कसा असायला पाहिजे, याची आखणी करतात. पण हे करत असताना बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते, असे मला वाटते. असे मुद्दे, की जे कमी महत्त्वाचे आहेत, किंवा अजिबात महत्त्वाचे नाहीत असे वाटत असते , परंतु समस्या सोडविण्याच्या दृष्टीने त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे त्यांचा बचाव साहजिकच दुबळा ठरेल अशी मला भीती वाटते. म्हणूनच मी, मि. ऱ्होडसला तुमच्याकडे यायचा सल्ला दिला. "

मी परत एकदा मि. ऱ्होडसकडे पाहिले. परंतु अजूनही तो हताशपणे बसलेला होता.

"मला जर तुम्ही पहिल्यापासून माहिती दिली तर माझ्यासाठी सल्ला देणे सोपे होईल" , असे म्हणून मी मोठ्या अपेक्षेने मि. ऱ्होडस कडे पाहिले. त्याच्या एकंदरीत अविर्भावावरून त्याला मि. पथेरिक च्या सल्ल्यात फारसे तथ्य वाटत नसावे. तो काहीच बोलला नाही. मग मि. पथेरिक यांनीच मला सारी माहिती पुरवली.
मि. आणि मिसेस ऱ्होडस यांनी बर्नचेस्टर येथील क्राऊन हॉटेल मध्ये दोन खोल्या आरक्षित केल्या होत्या. या खोल्या पहिल्या मजल्यावर अगदी टोकाला होत्या. दोन खोल्यांच्या मध्ये दरवाजा होता. जिना चढून गेल्यानंतर जी मोकळी जागा होती, त्याचे रुपांतर लाउंज मध्ये करण्यात आले होते. जिथे काही टेबल्स होती आणि त्यांच्या भोवताली खुर्च्या. त्या हॉटेलमध्ये राहणारे लोक तेथे बसून कॉफीचा आस्वाद घेत असत. घटना घडली तेव्हा तिथे दोघे व्यावसायिक आणि एक मध्यमवयीन जोडपे बसलेले होते. लाउंज मध्ये बसल्यावर मि. आणि मिसेस ऱ्होडस च्या खोल्यांचे दरवाजे व्यवस्थित दिसत असत. त्या चौघानी खात्रीपूर्वक सांगितले, की त्यांनी त्या खोल्यांमध्ये जाताना तिथली एक कर्मचारी आणि स्वतः मि ऱ्होडस या व्यतिरिक्त अन्य कोणालाच पाहिले नव्हते. तसेच त्याच वेळी एक इलेक्ट्रिशियन, मिसेस ऱ्होडस च्या खोलीच्या समोर असलेल्या व्हरांड्यात कसल्याशा दुरूस्तीचे काम करत होता. त्याने पण असाच जवाब दिला.

आता मात्र मला ही केस कठीण वाटायला लागली होती. परंतु का कुणास ठाऊक, मि. पथेरिक ला मि. ऱ्होडस च्या निरपराधी असण्याची खात्रीच होती. आणि मि. पथेरिक हे अत्यंत व्यवहारी आणि समंजस व्यक्ती असल्याने मला त्यांच्यावर अविश्वास दाखविता आला नाही. म्हणून मी अजून काही माहिती मिळते का याचा शोध घेऊ लागले.

मि. ऱ्होडस हे सध्या प्राचीन अश्मांसंदर्भात एक पुस्तक लिहीत आहेत. त्या साठी ते आपल्या खोलीत बसून लिखाण करीत होते. त्यांनी देखिल फक्त चेंबर मेड ला त्यांच्या पत्नीच्या खोलीत जाताना, आणि तेथून परत येताना पाहिले होते. त्यामुळे साहजिकच माझ्या चौकशीची दिशा तिच्याकडे वळली.
त्या चेंबर मेडचे नाव आहे मेरी हिल. ती त्याच गावातली एक रहिवासी आहे, आणि गेली कित्येक वर्षे ती क्राऊन हॉटेलमध्ये काम करत आहे. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले, की ती फारशी काही बुद्धिमान स्त्री नाही, आणि थोडीफार घाबरटच असावी. तिच्याबरोबर बोलल्यावर मला असे अजिबातच वाटले नाही, की ती कुणा व्यक्तीवर हल्ला करून तिचा खून करू शकेल. आणि तिला मिसेस ऱ्होडसचा खून करण्यासाठी काही कारणसुद्धा नव्हते. त्यामुळे तिच्यावर संशय घेण्यात काहीच अर्थ नव्हता.

मग परत मी त्या हॉटेलची, म्हणजे विशेषतः मि. आणि मिसेस ऱ्होडस जेथे राहत होते त्या भागाची रचना तपासण्यास सुरुवात केली. जिना चढून आल्यानंतर एक कॉरीडॉर आहे, नंतर तेथे जी मोकळी जागा आहे, ज्याला ते लाउंज असे म्हणतात, तेथे काही स्त्री पुरूष बसलेले होते. म्हणजे अनोळखी व्यक्तीने येऊन, खून करून कुणाच्याही नजरेस न येता तेथून निसटणे सर्वथा अशक्यच होते.

ऱ्होडस पती-पत्नींच्या खोल्यांपैकी मिसेस ऱ्होडस च्या खोलीला अजून एक दार होते, जे पलीकडच्या व्हरांड्यामध्ये उघडते. तो भाग लाउंज अथवा मि. ऱ्होडस च्या नजरेआड आहे. पण तेथील दार आतून लावलेले होते, अगदी कुलुपबंद होते, आणि त्याच्या शेजारील खिडकी, जी पलीकडच्या भागातच उघडते ती सुद्धा आतून बंद असून त्याचेही लॅच लावलेले होते. म्हणजे खूनी व्यक्ती तेथून पलीकडच्या भागात गेली असण्याची , अथवा तिथून खोलीत आली असण्याची शक्यताच नाही.

मी परत एकदा माझे लक्ष मि ऱ्होडस कडे केंद्रित केले. त्याने काहीशा तुटक शब्दात आपल्या पत्नी संबंधी माहिती दिली, परंतु मला ती अजिबातच समाधानकारक वाटली नाही. उलट काहीशी विस्कळीत, आणि स्वतःला सहानुभूती मिळविण्यासाठी जुळवलेली असावी असेच मला वाटले. मि. पथेरिकला, त्या ऱ्होडस च्या निर्दोषी असण्याची इतकी खात्री का होती देवजाणे.

मि. ऱ्होडस ने सांगितले, त्याची पत्नी ही एक नेहमी कसल्यातरी भीती अथवा तणावाखाली वावरणारी, अशी स्त्री होती. तिला सतत स्वतःला काहीतरी गंभीर आजार असल्याचे वाटत असे. आणि त्यावर इतरांनी विश्वास ठेवावा अशीही तिची अपेक्षा असे. मि. ऱ्होडस सवयीने या सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यास शिकला होता. तसेच तिला प्रत्येक घटना, आहे त्यापेक्षा वाढवून सांगण्याची खोड होती. उदाहरणार्थ ती समजा केळीच्या सालीवरून पाय घसरून पडता पडता वाचली, तर ती सांगे, मी एका फार मोठ्या अपघातातून नशिबाने वाचले, किंवा ती असलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किटने आग लागली असेल, तर ती सांगेल तिच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठ्या दुर्घटनेतून वाचली आहे. पण तिच्या या कथांकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याची सवय मि. ऱ्होडस ने स्वतःला लावून घेतली होती.

मला असे वाटते की अशा व्यक्तींची हीच शोकांतिका असते. कारण त्या सांगत असलेली प्रत्येक गोष्ट, ही कपोलकल्पित मानून त्यांच्याकडे सगळे दुर्लक्ष करत राहतात, आणि जेव्हा खरोखरीच त्यांना मदतीची गरज असते, तेव्हा ती त्यांना मिळू शकत नाही. आणि काही वेळा असा दुःखद शेवट त्यांच्या नशिबात येतो.

मि. ऱ्होडस ने सांगितले, की तिला काही काळापासून धमकीची पत्रे येतात असे मिसेस ऱ्होडस ने सांगितले होते. काही पत्रे तिने त्याला दाखवलीपण होती. पण ती पत्रे इतकी बालीश आणि विचित्र होती, की मि. ऱ्होडस चे असे मत झाले की कुणीतरी तिला फक्त घाबरविण्यासाठी म्हणून असे उद्योग करत आहे. किंवा दुसरी शक्यता म्हणजे ती स्वतःच असली पत्रे लिहित असावी. तिच्या एकूण स्वभावावरून त्याला ही शक्यता जास्त खरी वाटत होती.
मिसेस ऱ्होडस सांगत असे, की त्यांच्या विवाहापूर्वी तिच्या कारखाली सापडून एक लहान मुलगा जखमी झाला होता. चूक त्या मुलाचीच असल्याने ( तो खेळता खेळता वेगाने वाहने जात असणाऱ्या रस्त्यावर आला होता, जिथे पायी चालणारे कुणी येणे अपेक्षित नव्हते) तिला काही शिक्षा झालेली नव्हती. पण त्याच्या आईने म्हणे, त्यावेळी तिला धमकी दिली होती, की याची शिक्षा तिला (म्हणजे मिसेसऱ्होडसला), भोगावी लागेल. आणि बहुदा तीच स्त्री अशी पत्रे वरचेवर पाठवीत असे.

मला देखील ऱ्होडसने ती पत्रे दाखविली. त्याचे म्हणणे अगदीच काही खोटे नव्हते.. ती पत्रे खरंच फार बालीश पद्धतीने लिहीली गेली होती. पण तरी देखिल ही शक्यता दुर्लक्षून चालणार नव्हती.
आता त्या हॉटेलमध्ये कुणी एकटी स्त्री, किंवा काही स्त्रिया रहायला आलेल्या होत्या का? ही माहीती मिळविण्यासाठी, मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना विचारण्यास सुरूवात केली......

(क्रमशः)

(अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या "मिस मार्पल टेलस अ स्टोरी" या कथेचे मराठी रुपांतर )

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

20 Apr 2014 - 9:17 pm | Prajakta२१

छान
पु.भा प्र
:-)

पैसा's picture

20 Apr 2014 - 9:40 pm | पैसा

पुढे काय?

शुचि's picture

21 Apr 2014 - 12:47 pm | शुचि

उत्कंठावर्धक!

वाचते आहे.
ती बाई कमी बुद्धीमान असणे अन पत्रे बालीश असणे - काही संबंध आहे का?