आडनावाच्या आडून...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 10:45 pm

शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता. परंतू एका गोष्टीचे आश्चर्य वाटले, पहिल्याच ओळखीत बाईंनी माझे आडनाव लक्षात ठेवले होते. वर्गहि मोठा होता. (मुले आणि मुली मिळून ५० जण.) फारच हुशार होत्या आमच्या जोशीबाई.
निबंधाचा तास संपल्यावर बाई निबंधाच्या वह्यांचा गठ्ठा वर्गातिल एखाद्या धडधाकट कमी हुशार (मीहि कमी हुशार होतो.) मुलाला टिचररूमपर्यंत घेवून यायला सांगत.भले तो मुलगा अर्धे पानहि निबंध लिहित नसेल परंतू तो गठ्ठा नेण्याचा मान आपल्याला मिळावा यासाठी तो नेहमीच आग्रही असे. अशी कामे आपल्याला मिळवि असे नेहमी वाटायचे. कदाचित मी दिसायला 'गोंडस' दिसत असल्यामूळे जोशीबाई मला अशी जड कामे देत नसाव्यात अशी मी मनाची समजूत करुन घ्यायचो.
बाई गांधीजींचा धडा शिकवत होत्या. धडा एका तासात शिकवून झाला. तास संपल्याची घंटा वाजली. मधली सुट्टी झाली व मधल्या सुट्टीतले मित्र ( हो हे मित्र वर्गातलेच परंतु पहिल्या बाकापासून बरेच दूर असलेले व अभ्यास सोढून ईतर सर्व विषयात तरबेज असलेले.) मला 'माथेफिरू' ह्या विशेषनामाने हाक मारू लागले. मला ह्या गोष्टिचा उलगडा लगेचच झाला.तो गांधिजींचा धडा त्यातील 'गोडसे'मुळे काहिहि कष्ट न करता लक्षात राहिला होता. फ्रेंच राज्यक्रांती एखाद्या गोडसेंनी केली असती तर किती सोपे झाले असते, बीजगणिताच्या समीकरणांमध्ये 'नावाला' गोडसे हे शब्द टाकले असते तर त्या विषयात मला गोडी निर्माण झाली असती असे उगाचच वाटायचे. अशा स्वप्नरंजनात रंगता रंगता रांगत रांगत पुढील वर्गात जायचो. शरीराचा गोंडसपणा टिकवून ठेवला होता. शारिरिक उंचीत प्रगती नाममात्र होती.
आठवीला आम्हाला संस्कॄत, अर्थशास्त्र व मिलिटरी सायन्स ह्यपैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता.(मुलींसाठी पहिल्या दोन विषयांपैकि एक). मी अर्थशास्त्र व संस्कॄत रट्टामारु विषय टाळले व प्रात्यक्षिक आधारावरिल मिलिटरी सायन्स निवडला. माझ्यापेक्षा मोठ्या भावाने दोन बहिणींनी संस्कॄत घेऊन पैकिच्या पैकी गुण मिळ्वलेले होते. पुढे त्यांनी कितीहि अभ्यास केला तरी त्यांच्या गुणात छटाक्भरही वाढ झाली नाही. प्रगती खुंटली कि नैराश्य येते हे मला लवकरच समजले होते. त्याबाबतीत मी बहीण भावंडांमध्ये अधिक हुशार होतो.
मिलिटरी सायन्सचे जोशी सर हातात .२२ व ३०३ च्या दोन बुलेट घेउन त्यातिल फरक समजाउन सांगत होते. आहा! किती रम्य वातवरण होते ते! आमचा २/३ वर्ग संस्कृत अर्थशास्त्र चा किस काढत असताना उरलेला वर्ग मोकळ्या मैदानावर मोठ्या डेरेदार वृक्षाच्या छायेत जोशी सरांचा एक एक शब्द कान देउन ऐकत होतो. एखाद्या तासाला मागच्या व पहिल्या बाकावरील विध्यार्थी (पहिल्या बाकावरच्या विध्यार्थ्यांचा मी एकमेव प्रतिनिधी होतो.) इतके एकाग्र झालेला तो दुर्मिळ क्षण होता. (टागोरांची कृपा)
जोशी सर मिलिटरीतून निवृत्त होउन आमच्या शाळेत आले होते. त्यांच्या वयाकडे बघितले असता ते निवृत्तीच्या वयाचे वाटत नव्ह्ते. ते सैन्यातून पळून आले असे काहि वात्रट मुले सांगायचे. खरे खोटे देव जाणे. स्वभावाने मिश्किल व तब्येतीने मजबूत होते. संपुर्ण तासभर त्या गोळ्यांची तांत्रिक माहिती व त्याच्या गमती जमती सांगुन त्या गोळ्या आमच्या डोक्यात शूट केल्या.असेच मजेत मिलिटरी सायन्सच्या तासांचा आनंद घेत होतो. आणि ज्या दिवसाची आम्ही वाट पहात होतो तो दिवस आला. आज आम्हाला रायफल लोड न करता हाताळायला मिळणार होती. शस्त्रगृहातून मुलांनी ३-४ रायफली बाहेर काधून कंपाउंडच्या भिंतीला रांगेत उभ्या केल्या.
सरांचा मिश्किलपणा जागृत झाला. गोडसे त्या रायफलींच्या बाजुला उभा रहा- सर. मि आज्ञा पाळून उभा राहीलो.तेव्हा मला माझे खुजेपण लक्षात आले. रायफल माझ्यापेक्षा वीत दोन वीत उंच होती. सर छद्मिपणे हसले व एक रायफल घेउन यायला सांगितले.आतापर्यंत फक्त रंगपंचमिच्या बंदुकाच उचलल्या होत्या. रायफल उचलली. जडच होती. दोन्ही हातांनी उचलून सैन्यातील जवानांसारखी शरिराच्या एका बाजूला धरून चालण्याचे स्वप्न तेथेच भंग पावले. रायफल मोठी असल्याने चालताना जमीनीला टेकायची.शेवटी शरिराच्या बरोबर मधोमध दोन्ही हातांनी मुसळासारखी धरली व गरोदर महिलेसारखे चालत चालत सरांच्या दिशेने निघालो. चार पावले टाकली नाही तोच जोशी सर गरजले, मुर्खा असा चड्डीत हागल्यासारखा काय चालतो आहेस जरा मर्दासारखा ताठ चाल. सरांचा आवाज शाळेच्या संपूर्ण आवारात घुमला. सगळे मित्र जोरजोराने हसले. मी अजिबात लाजलो नाही, क्यों की आज मेरे पास रायफल थी! रायफल हातात असण्याचा आनंंद वेगळाच असतो राव.
सरांचा मूड बदलला. मला जवळ घेतले. पाठिवर थोपटल्यासारखे केले व म्हणाले गोडसे हे तुझ्यासारख्याचे काम नाही, ह्या रायफलितून जेव्ह्या गोळी सुटते तेव्हा रायफलिचा खांद्याला जोरात धक्का बसतो. तू तर मागेच उडशील, त्यांच्या लाडक्या विद्यार्थी चव्हाण कडे पहात डोळे मिचकावले. माझ्यासाठी संस्कृत विषयचा पर्याय कसा योग्य आहे हे पूढे अनेकवेळा मला समजाउन सांगितले. मी मिलिटरी सायन्सच्या तासाचा मनमूराद आनंद घेत होतो.
शाळेचे दिवस संपले, महविद्यालयात गेलो. नवीन मित्र मिळाले. एक हिंदीभाषिक नविन मित्र माझ्याबरोबर जवळिक करत होता. एक दिवस म्हणाला बरे झाले त्या गांधिला तुमच्या गोडसेनी मारले ते. गांधीजींना मारणार्या गोडसेंचा माझ्याशी काहीएक संबंध नाही व गांधीजी मला आदरणीय आहेत, मी त्याल सूनावले. त्याने जिद्द सोडली नाही, गांधीजी किती वाइट, गोडसे किती महान ह्याबद्दल त्याने मला अनेक दिवस माहिती पुरवली. म. गांधींबद्दल माझा अभ्यास फार नाही.परंतू केवळ आड्नावामुळे कोणी गांधीद्वेष्टा माझ्याशी जवळिक करत असेल तर मला विचित्र वाटते.
खरोखरच आडनावाच्या आड जात्,धर्म व्यवसाय दड्लेले असतात काय? मला आड्नाव हे हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे भासते.जेव्हा माझ्याकडे करंदिकर्,दुर्वे,कानिटकर व लेले सारखे मित्र जवळ यायचे तेव्हा मला आड्नाव हे चुंबकसारखे वाटायचे.परंतू शेख्,चौधरी,चव्हाण्,पाटिल व कांबळे सारखे मित्र मिळाले व वरील मित्र दूर झाले तेव्हा माझे आड्नाव मला चाळणीसारखे वाटे. ह्यातले खडे कोणते व दाणे कोणते ह्या तपशिलात मला जायचे नाही.
महाविद्यालयातील दिवस मजेत चालले होते. आमच्या वर्गाची एक दिवसाची सहल डहाणूला जाणार होती. सहलीचे व्यवस्थापन व जबाबबदारी वर्गाच्या आवडत्या चिपळूणकर म्याडमकडे होते. आम्ही सगळे विध्यार्थी व विध्यार्थीनी एका वर्गात सहलीचे नियोजन करन्यासाठी जमलो होतो. एसटी च्या बूकिंग्पासऊन ते फर्स्ट एड बोक्स पर्यंतच्या सर्व गोष्टिंचे नियोजन झाल्यावर म्याडमनी जेवणाच्या डब्यांचा विषय काढला.उद्देश एवढाच होता कि बटाट्याची भाजी आणि पूरीचा ओव्हरडोस नको व्हायला. कारण सगळेजण डबे एकमेकांमध्ये शेअर करत असत. एखाद्याने डबा आणला नाही तरी चालत असे. एक एक जण आपला मेनू सांगत होता व म्याडम एका कागदावर टिपून घेत होत्या. माझी पाळी आली. मी नेहमीच आउट ओफ बोक्स विचार करायचो, परंतू उघड करायला कचरायचो. आज मनाचा हिय्या केला व म्हटले झिंगा फ्राय! म्याडमसकट सगळ्या मुली काऽऽऽय ... शीऽऽऽ अशा मिक्स आवाजात किंचाळल्या. कर्वे नावाच्या मुलीचे किंचाळणे मला जास्त भावले.एखादि पाल अंगावर पडली अशा ढंगात ती शीऽऽ~ गोऽऽऽडसे किंचाळली. (तिच्या अंगावर खरोखरच पाल पडली असती तर तिच्या रंगाला 'म्याच' झालि असती.) लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती. मी जवळजवळ डहाणूच्या समुद्रकिनारी
पोहोचलो होतो. फक्त समुद्रात दुबकी मारणे बाकी होते.
..... अरे गोडसे तू 'कोब्रा' ना... ? म्याड्मच्या ह्या बंपरने मला वास्तवात आणले.मी गोंधळलो. कोब्रा म्हणजे काय?- मी प्रतीप्रश्न केला. मुली व म्याडम एका सूरात ओरडल्या तुला कोब्रा माहित नाही? (ये पिएस्पिओ नहि जानताचा जन्म असा झाला.) मी नकारार्थी मान डोलावली. अरे कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राम्हण. मी पून्हा नकारार्थी मान डोलावली.
मग तु "देब्रा" का ? मी - देब्रा म्हणजे काय ?पुन्हा पिएस्पिओ टाईप कोरस. म्याड्म - अरे देब्रा म्हणजे देशस्थ ब्राम्हण. पुन्हा मी नकारार्थी मान डोलावली. सगळे स्तब्ध.म्याडम- तू कोब्राहि नाहीस देब्राहि नाहीस मग तु आहेस तरी कोण? आता मला कळाल हे तर माझा ठाव घेत आहेत. मी ठामपणे म्हणालो मी कोब्रा ही नाही किंवा देब्रा ही नाही मी 'बाब्रा' आहे.पुन्हा काऽऽऽय चा कोरस. ह्यावेळी शीऽऽऽ सामील नव्हते. म्याडम - बाब्रा म्हणजे? मी - बाब्रा माहीत नाही? अहो बाब्रा म्हणजे बाट्लेला ब्राम्हण. अय्या ... काय पण गोडसे तू... (मुलींच कोरस.) वात्रटच आहेस. म्याडम- तू नोन व्हेज खातोस? मी हो म्हटले.
शाळेत जोगळेकर सरांनी चौरस आहारात दूध, अंडी,मासे ई. चा समावेश असावा असे शिकवले होते.ते मी आचरणात आणून त्यांना गुरूदक्षिणा देतो हे मी म्याडमला पटवून दिले.(शाळेत आमच्या वर्गात फळ्यावर 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे सुभाषीत लिहीले होते, ते मी प्रत्यक्ष आचरणात आणले होते. बस्स.)
मागच्या आठवड्यात बसने मी औरंगाबादला जात होतो, शेजारील प्रवाशाबरोबर गप्पा मारत होतो. त्या प्रवाशाने ममाझी वैयक्तिक चौकशी सुरू केली. माझे आडनाव कळल्याबरोबर त्याने थेट राजकारणाचा विषय काढला. नाशिकला भुजबळांविरुद्ध शिवसेनेचे हेमन्त तुकाराम गोडसे उभे आहेत. ते कसे भुजबळांना नाकिनऊ आणतील, राज ठाकरेंनी कसे गोडसेंना डावलले. सिन्नरचे कोकाटे कसे गोडसेंना मदत करतील...... असा माझा 'नथुराम ते 'तुकाराम' प्रवास चालू आहे.

विनोदसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

16 Apr 2014 - 3:14 pm | तुमचा अभिषेक

शक्य आहे. कागदोपत्री मराठा इतकेच असावे. त्यातील ९६ कुळे वेगळी होऊन स्वताला ९६ कुळी म्हणवू लागले. बहुधा पंचकुळी असाही प्रकार आहे काहीतरी. हे कोणी ठरवले की आपले आपणच याचाही इतिहास मला काही माहीत नाही. ऑर्कुटवरच्या दोन्ही ९६ कुळी मराठा समूहाचा सक्रिय सभासद होतो एकेकाळी आणि वडीलांच्या तोंडून ऐकतो त्यामुळे हा शब्द माझ्या तोंडी रुळलाय इतकेच. पण आता माझा आंतरजातीय विवाह झाल्याने माझ्या मुलीला म्हणजे पुढच्या पिढीला मी आपण अमुकतमुक आहोत असे सांगण्याची शक्यता कमीच.

बाळकराम's picture

17 Apr 2014 - 2:43 am | बाळकराम

काही नयनींच्या प्रतिक्रिया सोडल्यातर चांगली चर्चा चालू आहे. ९६ कुळी मराठ्यांबद्दल- माझ्या पौरोहित्य करणार्‍या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, ९६ कुळी हे फक्त मराठ्यांपुरते मर्यादित नाहीत, त्यात प्रामुख्याने मराठा असले तरी ब्राम्हण आणि क्वचित इतर जातीचे पण लोक आहेत. काकांकडे एक यादी होती, त्यानुसार मराठा यजमानांना देवक, गोत्र इ सांगताना ते त्याचा आधार घेत. त्या यादीत कुलकर्णी, देशपांडे अशी एक-दोन ब्राम्हणी (वाटणारी) आडनावे होती असे स्मरते. काकांना ह्याचे कारण नक्की माहिती नव्हते पण अनेक वयोवृद्ध मराठा बुजुर्गांशी त्यांच्या ज्या अनेक वर्षे चर्चा होत त्यानुसार त्यांचा कयास असा होता की- ९६ कुळी हा प्रकार शिवाजी महाराजांच्या आधी अस्तित्त्वातच नव्हता. जेव्हा शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि पुण्याजवळचे १२ मावळ आणि त्यातले आठ आंदर-मावळ हे त्यांच्या अमलाखाली आले. ह्या मावळांतले जे प्रमुख वगैरे होते- म्हणजे लोकल कुलकर्णी/देशपांडे/पाटील्/देशमुख जे कोणी असतील त्या ९६ कुटुंबाना ते स्वराज्याचे पहिले शिलेदार म्हणून पुढे जास्त जास्त महत्त्व प्राप्त होत गेले आणि त्याची परिणती ९६ कुळी याला विशिष्ट वलय प्राप्त होण्यात झाले. रा चिं ढेरे आणि डॉ रामचंद्र देखणे यांच्या पुस्तकात पण याचा उल्लेख आहे असं त्यांनी अनेकवार सांगितल्याचे स्मरते. अनेक वर्षे होऊन गेल्यामुळे चू.भू.द्या.घ्या.

खटपट्या's picture

17 Apr 2014 - 4:42 am | खटपट्या

खालील लिंक वर थोडी माहिती मिळाली

http://en.wikipedia.org/wiki/Maratha_clan_system

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 6:54 pm | दिव्यश्री

देशमुख / देशपांडे हि मुळात आडनाव अशी नाहीत . ति वतने होती पूर्वी . कालांतराने त्या वतनांची आडनावे झाली असे ऐकले आहे . खखोदेजा बाकी आम्हीही देशमुखच . पिताश्री नेहमी म्हणायचे देशमुखी गेली कधीच . लहानपणी कळायचेच नाही नक्की काय , कुठे , कस गेल . :D

मी लायब्ररीत गेले होते तेव्हा माझं आडनाव ऐकून "मोकाशी" हा हुद्दा आहे की आडनाव यावरुन २ आजोबा चर्चा करायला लागले ते आठवले.

भिंगरी's picture

13 Jul 2014 - 8:31 pm | भिंगरी

हे ९६ कुळी, पंचकुळी प्रकार लग्नात फार मोडता घालतात राव!
हे म्हणजे असं असत कि,
खिशात नाही आणा,
नी मला बाजीराव म्हणा.

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2014 - 1:15 pm | पिलीयन रायडर

लेख छान आहे.. शैली आवडली..

बाकी अगदी जवळचे मित मैत्रीणी सुद्धा माझ्या ध्यानी मनी नसताना जेव्हा माझी जात कळत नकळत काढतात तेव्हा मलाही धक्का बसतोच.. असो.. जात आपल्या डोक्यात नाही ह्याचेच समाधान आहे..

साती's picture

15 Apr 2014 - 2:14 pm | साती

लेख आवडला.
सासर- माहेर दोन्हीकडचे आडनाव जात सहज समजण्यासारखे आहे.
;)

नाव ऐकून हलके समजण्याचा प्रकार शाळा कॉलेजात घडला नाही.

जात ओळखण्याची खुमखुमी असणे आणी जातीयवादी असणे हे दोन्ही प्रकार वेगळे असू शकतात.

आम्हाला बर्‍याचदा पेशंटची जात ओळखावी लागते कारण 'चौकशी' साठी कुठला पॉलिटीशीयन येईल हे त्यावरून ठरते.
;)

लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती. मी जवळजवळ डहाणूच्या समुद्रकिनारी पोहोचलो होतो. फक्त समुद्रात दुबकी मारणे बाकी होते.
हॅ.हॅ.हॅ... डुबकी मारायची संधी तुम्ही मिसवली बघा ! ;) आहाहा काय ते "गोड" वर्णन ! ;)
पाखरं इतकी ग्वाड नसती तर आम्हाला पहायला काय राहिलं असतं या जगात ? ;)

काऽऽऽय ... शीऽऽऽ
पुन्हा काऽऽऽय चा कोरस.
अय्या ...
पाखरु जीव म्हंटला की वरचं सगळ कंपल्सरी हाय बघा ! त्यांच्या या एंकंदर वागण्यावरुन पाखरु कुठल्या मोड्[पक्षी-मूड} मधे आहे याचा अंदाज {हो,फक्त अंदाजच...त्यांच्या मनात काय चाललयं हे ब्रम्ह देवाच्या बा ला सुदीक समजायाचे न्हाय !} लावता येउ शकते.उदा. हे कायऽऽऽ ? ते कायऽऽऽ ? असं का ते ? तसं का ते ? असे प्रश्न पाखरांच्या बोलण्यात किंवा लिखाणात आले आणि तुमच्या ऐकण्यात किंवा वाचनात आले तर पाखरु सध्या नॉर्मल मोड मधे आहे असे समजावे... तसही पाखरु जीव कधी काय विचार करुन बसेल ते सांगता येत नाही ! नैसर्गिक पणे भावना प्रधानता हा त्याचा स्वभाव विशेष गुण आहे.{शुद्ध मराठीत हायली इमोशनल} त्यामुळे एखाद्या गोष्टीवर ते अख्खा दिवस विचार करण्यात घालवु शकतात ! उदा. तो मला असं का बोलला ? ह्या एका विचारावर पाखरु जीव बराच काळ विचार करु शकतं !बाकी हल्ली मुली लाजताना दिसणे ही सगळ्यात दुर्मीळ गोष्ट आहे ! आणि अय्या कानावर पडणे ही सुद्धा कठीण गोष्ट झाली आहे...काल महिमा अजुन काय ?

जाता जाता :- माझा एक मित्र गोडसे आडवनाव धारी आहे,तो ब्राम्हण नाही.पै तै शी सहमत.

प्यारे१'s picture

15 Apr 2014 - 3:47 pm | प्यारे१

गोड.... से!

से.... गोड!

- बर्‍याचदा 'मराठीत' सांगून देखील आवळे झालेला 'वेशीवरचा' प्रशांत आवले! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2014 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत आणि मार्मिक लिहिलंय गोडसे तुम्ही.....!

रायफल मोठी असल्याने चालताना जमीनीला टेकायची.शेवटी शरिराच्या बरोबर मधोमध दोन्ही हातांनी मुसळासारखी धरली व गरोदर महिलेसारखे चालत चालत सरांच्या दिशेने निघालो.

इथे खपलो. मेलो. =))

आणि

लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती. मी जवळजवळ डहाणूच्या समुद्रकिनारी पोहोचलो होतो. फक्त समुद्रात दुबकी मारणे बाकी होते.

केवळ सुरेख..जब्रा.....! :)

बाकी, विषयावर थोर मंडळी बोलतीलच. वाचत राहीन.

-दिलीप बिरुटे

साधामाणूस's picture

15 Apr 2014 - 11:42 pm | साधामाणूस

सुरेख..जब्रा.....!

आता हे जब्रा काय?

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2014 - 12:07 am | प्रसाद गोडबोले

जनरल ब्राह्मण ?

बॅटमॅन's picture

15 Apr 2014 - 4:19 pm | बॅटमॅन

मार्मिक अन गोडसे असे लेखन आहे. लैच आवडले. फुकाचा सल्ला देणार्‍या काही मूर्खागमनी कमेंटी सोडल्या तर बाकीच्या कमेंटीही मस्तच.

माधुरी विनायक's picture

15 Apr 2014 - 4:31 pm | माधुरी विनायक

छान लिहिले आहे.. आवडले..

लेख आवडला. माझ्या मुंबईतील शाळेत ७-८ वी पासून एकमेकांना आडनावाने हाक मारण्याची पद्धत पडली ती बरीच वर्षे टिकली. आता मात्र पुन्हा सर्व नावाने हाक मारत आहेत हे जाणवले. जातीची चौकशी जरी झाली तरी जातीयवाद कधी जाणवला नाही. स्वयंपाक घरापर्यंत मुक्त प्रवेश असायचा. अर्थात मांसाहारावरून चिडवणे वगैरे असायचे पण ते तेवढेच.

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2014 - 5:10 pm | प्रसाद गोडबोले

मार्मिक लिहिलय हो !!

शेवटी काहीही केल्या जात नाही तीच जात !!

धन्या's picture

16 Apr 2014 - 5:03 pm | धन्या

जातींबद्दलचे पूर्वग्रह एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडून हस्तांतरीत होतच राहणार.

वर बॅटमॅण यांनी उल्लेख केलेल्या "ताजमहाल कॉम्प्ल्क्सचा" अनुभव तर जागोजागी येतो. :)

रेवती's picture

15 Apr 2014 - 5:53 pm | रेवती

लेखन आवडले.

सिफ़र's picture

15 Apr 2014 - 7:17 pm | सिफ़र

लेख उत्तम !!!

अमित खोजे's picture

15 Apr 2014 - 9:24 pm | अमित खोजे

लेख मनापासून लिहिला कि छान होतो याचे अजून एक उदाहरण सापडले. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनाला पटत नाहीत. मिपा मुळे या गोष्टी इथे समाजाला न भिता सांगता येतात, चर्चा करता येतात, इतरांची मतंहि कळतात. आपले काही चुकत असेल तर न लाजता स्वीकारताहि येते.

शाळेत जोगळेकर सरांनी चौरस आहारात दूध, अंडी,मासे ई. चा समावेश असावा असे शिकवले होते.ते मी आचरणात आणून त्यांना गुरूदक्षिणा देतो हे मी म्याडमला पटवून दिले.(शाळेत आमच्या वर्गात फळ्यावर 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे सुभाषीत लिहीले होते, ते मी प्रत्यक्ष आचरणात आणले होते. बस्स.)

या विषयी माझ्याही मनात बरेच वेळेला संभ्रम होतो. शाळेत जे शिकवतात ते सर्वांसाठी नसते. आपली जात कुळ वय वगैरे लक्षात घेऊन समाजाचे अगणित नियम लावून मग ते आचरणात आणावयाचे असतात हि शिकवण लहान मुलांना द्यायला हवी.

बाकी काही काही अनुभव तर सुन्न करणारे आहेत.

माझ्या एका कोब्रा मित्राच्या काकूने माझ्या बायकोच्या वर्णाकडे पाहून पूर्ण वेळ तिच्याशी काहीच न बोलणे वगैरे..

अशा प्रकारची मानहानी मीसुद्धा अनुभवली आहे.

"त्याच बरोबर अस्सल कोकणातल्या आजोबांनी "आडनाव कसं?याचं उत्तर मिळेपर्यंत
आंब्याचा भावही न सांगणे"

आडनाव सांगितल्याशिवाय घर भाड्याने मिळत नाही हे ऐकले/अनुभवले होते पण आंबे पण?

"त्यावरून कोणत्या कपात चहा द्यायचा ते ठरते"

एकदा काय सांगावं म्हणुन मी भिंल्ल सांगितली मग काय मज्जा तर समोरच्या आजोबांच्या चेहर्याचे रंगच बदलले

*ROFL* वाचून गडबडा लोळलो… चांगली कल्पना आहे. एकदा आजमावून बघायला हवी.

थोडे अवांतर :
देब्रा कोब्रा बाब्रा वरून मला माझ्या शाळेतली गम्मत आठवली. 'काम क्रोध लोभ मद मोह मत्सर' हे षड्रिपू आहेत आणि माणसाचे शत्रू आहेत अशी बुद्ध समाजाची शिकवण आहे - इतिहासाच्या तासाला माने बाई शिकवत होत्या. अस्मादिकांना उरलेले पाच रिपु कळाले पण पहिला काही कळला नाही. बरं गप्प बसावे तर ते पण नाही. शेजारच्या मित्राला विचारले परंतु त्यालाही माहिती नव्हते. सरळ हात वर करून उभा राहिलो. बाईंनी विचारले 'काय प्रश्न आहे?' "बाई, 'काम' म्हणजे काय?" माने बाईंचा चेहरा बघण्यालायक. सहावीतल्या मुलाला काय सांगणार काम म्हणजे काय? बाईंनी इतर मुलांकडे बघितले पण सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. शेवटी 'मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल' म्हणून मला खाली बसवले.

स्मिता चौगुले's picture

16 Apr 2014 - 10:08 am | स्मिता चौगुले

कॉलेजनंतर नुकतीच पुण्यातील एका मोठ्या मोटर कंपणीमध्ये शिकावू इंजिनीअर म्हणून नियुक्त झाले. असेच एकदा माझ्या वरिष्ठानीं मला असेंबली लाइन दा़खवण्यासाठी नेले होते,तिथे त्या वरिष्ठांच्या ओळखीचा एक मनुष्य, जो मुका होता, तो भेटला. वरिष्ठ आणि हा मनुष्य दोन्ही जुनी खोडं, त्यांच्या गप्पा(हातवारे, तत्सम आवाज,त्यास ऐकु येत होते), आणि माझी ओळखपरेड इ. झाल्यावर त्याने स्वतःच्या हातावर ब्राम्ह्ण आणि मराठा असे लिहुण मला माझी जात विचारली,आधीतर मला समजेना की हा प्रश्न कशासाठी? पण मग नंतर मी मराठा सांगितल्यावर त्याने असे काही तोंड केले की त्याचा अर्थ मला आज पर्यंत समजलेला नाहिये.

अभि जीत's picture

16 Apr 2014 - 10:13 am | अभि जीत

मला पण असेच अनुभव आलेत. छान लिहीलय.

कॉलेजची साडेचार वर्ष अधिक ट्रेनिंगचे १ वर्ष या़ काळात कधीच नावाने किंवा आडनावाने हाक मारली नाही कायम "नेतृत्व अथवा बागाईतदार" , सुरुवातीस कस तरी वाटायच त्यानंतर मात्र पाच वर्ष प्राचार्य व व्यवस्थापन यांना पाटीलकी आणी गावकी काय असते याचा पुरेपुर अनुभव देण्याची कामगिरी मी व माझ्या मराठा बटालियने पार पाडली,पण मजा आली साली.ते दिवसच वेगळे.

मैत्र's picture

16 Apr 2014 - 12:58 pm | मैत्र

पाटील भौ / काका,

खवचटपणे बागाईतदार म्हणणार्‍यांना व्यवस्थित फाट्यावर मारले पाहिजे.
पण मुद्दाम पाटिलकी आणि गावकी हेच मुख्य उद्योग करणारी मराठा बटालियनही डोक्यात जाते हो..
म्हणजे त्यांना ९६ कुळातलीच नावे आवडतात. मग काय बामण मार्क काढणारच की .. पण इथले आम्हीच राजे.
असं बोलणारे वागणारे पण खूप पाहिले.. आणि त्यातही मराठा राजकीय लॉबीतून आलेली अनेक आणि ठराविक कॉलेजेस / शिक्षण संस्था आहेत तिथे हा प्रकार खूप जास्त आहे.
वेळेला ब्राह्मण नको म्हणुन अमराठी लोकांना सपोर्ट केला जातो केवळ मागे ओढाण्यासाठि आणि यात शिक्षकही येतात. महाराजांच्या नावाने असे वागणार्‍या संस्था आहेत.

डबा खाताना जोशी कुलकर्णि ओबीसी / एस सी एस्टी कोट्यातून आलेले मित्र बरोबर घेऊन निवांत खाताना ९६ कुळीचा अभिमान दाखवणार्‍यांना दोन्ही नको असायचे.. किमान इंजिनिअरिंग मध्ये तरी इतके जुनाट आणि आडनाव आणि खानदानाचा माज करणारे अपेक्षित नव्हते..

बाबा पाटील's picture

16 Apr 2014 - 1:26 pm | बाबा पाटील

आयुर्वेद शिकण्यासाठी मराठा पाटील म्हणुन कोनी वैद्य दारात उभा करत नव्हता,जावु द्या अश्या गोष्टींना फाट्यावर मारणेच चांगले,किंवा त्यामुळेच आयुर्वेद शिकण्याची जास्तच किडा उत्पन्न झाला व यशस्वी आयुर्वेद डॉक्टर म्हणुन नावारुपास आलो.अश्याच गोष्टी मानसाला अधिकाधिक खंबिर बनवत्तात.
अवांतरः-बाकी पाटीलकी आपल्या रक्तातच भिनलेली आहे,जोपर्यंत तिला कुनी डिवचत नाही तोपर्यंत एकदम सदाशिवपेठी व्यवसायिक आणी एकदा कोनी शेपटावर पाय दिला की मग आहेच समोरच्याचा साग्रसंगित सत्कार....!

काळा पहाड's picture

18 Apr 2014 - 11:36 pm | काळा पहाड

कुनी डिवचत नाही तोपर्यंत एकदम सदाशिवपेठी व्यवसायिक आणी एकदा कोनी शेपटावर पाय दिला की मग आहेच समोरच्याचा साग्रसंगित सत्कार

बाबा पाटील उपचारानंतर एखाद्याला बुकलताहेत हे दृष्य डोळ्यासमोर येवून ड्वाले पानावले!

पुणे तिथे काय उणे's picture

16 Apr 2014 - 4:56 pm | पुणे तिथे काय उणे

जात नाहि ती जात .. हेच खर. बाकि मला तसा काहि वेगळा अनुभव आलेला नाहि.

जेपी's picture

16 Apr 2014 - 5:16 pm | जेपी

पर्दापणातच सेंच्युरी मारल्याबद्दल मार्मिक भौचे हार्दिक अभिनंदन . अवांतर प्रतिसाद देणार्यांचे जाहिर आभार .

शुभेच्छुक - जेपी आणी समस्त 'मी पयला' क्लब .

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2014 - 5:47 pm | मार्मिक गोडसे

मिपा,जेपी,आणी समस्त 'मी पयला' क्लब चे आभार... कायम असाच लोभ ठेवा... माझा 'लाला अमरनाथ' होनार नाहि अशी अपेक्षा करतो.

शशिकान्त पवार's picture

16 Apr 2014 - 6:49 pm | शशिकान्त पवार

माझ आडनाव पवार आहे सर्व जन विचारतात की शरद पवार कोन लागत मि म्हन्तो कि ते माझे पुतणे लागतात

भिंगरी's picture

5 Oct 2014 - 11:52 pm | भिंगरी

मग लगेच धरणावर चर्चा होत असेल?

भाते's picture

16 Apr 2014 - 8:34 pm | भाते

मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना नेहमी आडणावावरूनच प्रत्येकाला ओळखले जात होते. पण कधीही त्याची/तिची जातपात-धर्म विचारले गेले नाही.
त्यावेळी खान नावाच्या बाई आम्हाला विज्ञान-गणित शिकवत होत्या. मार्च (१९९३) महिन्यानंतर त्या ते वर्ष संपेपर्यंत (आजारी म्हणुन ?) सुट्टीवर होत्या. पुढल्या शैक्षणिक वर्षात त्या पुन्हा परत आल्या. पुढे त्या शाळेच्या मुख्याध्यापिकादेखिल झाल्या.
जातपात-धर्म हे प्रकार शाळा संपल्यावरच सुरु झाले.

इरसाल's picture

17 Apr 2014 - 9:43 am | इरसाल

स्वाक्षरी : मिपाकरांच्या प्रतिक्रियांमधुन सकारात्मक शिकण्यासारखे बरेच काही आहे.

प्रतिक्रियांमधुन मिपाकरांना सकारात्मक शिकण्यासारखे बरेच काही आहे.;)

पण मला मिपाकरांच्या प्रतिक्रियांमधुन बरेच काही सकारात्मक शिकायला मिळते.

बाळकराम's picture

17 Apr 2014 - 2:49 am | बाळकराम

तुमच्या लेखनातल्या निर्विषतेने, सहजपणाने, सरळपणाने जिंकलं यार! इतका स्फोटक विषय केवळ याच गुणांमुळे सुसह्य झाला! जियो!! असेच लिहित राहा!

राही's picture

17 Apr 2014 - 1:40 pm | राही

अगदी अगदी. नाही तर या तापलेल्या उन्हात लाक्षागृह भडकायला वेळ लागला नसता.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2014 - 12:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

अगदी मनातले लिहिलेत !!!

किसन शिंदे's picture

17 Apr 2014 - 9:37 am | किसन शिंदे

लेख आवडला.!

अनन्या वर्तक's picture

18 Apr 2014 - 8:34 pm | अनन्या वर्तक

मी दहा बारा वर्षानंतर प्रथमच भारतात गेले होते तेव्हा माझ्या ताई च्या सासूबाई आणि मी आम्ही एकमेकींशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी त्या मला त्यांच्या कुटुंबातील नवीन लग्न झालेल्या व्यक्तींविषयी माहिती देत होत्या. त्यांच्या भावाच्या मुलीने कुणाशीतरी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले, त्यांची जात वेगळी कशी होती पण आत्ता त्यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या बहिणीच्या मुलाने दुसर्या जातीच्या मुलीशी लग्न केले आहे आत्ता सगळे आनंदात राहत आहेत. त्यांच्या मुलीच्या मुलाने दुसर्या जातीच्या मुलीशी लग्न ठरवले आहे त्या मुलीची जात वेगळी आहे तरीसुद्धा आत्ता आम्ही त्यांना समजून घेवून मान्यता देतो आहोत......अशी बरीच उदाहरणे देत होत्या.

मी ऐकत होते आणि मला एक प्रश्न पडला होता. ज्या माणसांन बद्दल ह्या मला माहिती देत आहेत त्या प्रत्येकच एक वेगळ आयुष्य आहे आणि एक माणूस म्हणून मी त्याचा आदर करणे इतकच मला माहीत आहे. ह्यातील एकाही माणसाला मी ओळखत नाही किवा मी त्यांना कधी भेटणार सुद्धा नाही. मग त्यांच्या आयुष्य बद्दलची ही माहिती मला का सांगत आहेत? मग त्यांनी शेवटी न राहून आणि बहुतेक माझा गोंधळ ओळखून त्यांनी मला विचारले तुझ लग्न अमेरिकेत झालं आणि तुझे पती सुद्धा अमेरिकेतील मग त्यांचे आडनाव काय? म्हणजे ते ब्राम्हण आहेत का? ते हिंदू देवांची पूजा करतात का? मग मला समजलं गेले अर्धा तास त्या जे काही सांगत होत्या त्याचा उद्देश हा होता. हे सगळ अश्या पद्धती प्रमाणे विचारण्या पेक्षा त्यांनी मला सुरवातीलाच स्पष्ट विचारले असते तर कदाचित मी त्यांच्या प्रश्नांची Genuinely उत्तरे दिली असती पण त्यांनंतर मी त्यांना फार कॉमेडी उत्तरे दिली.

हा माझा आत्ता पर्यंतच्या आयुष्यातील Racism चा एकमेव अनुभव.

काळा पहाड's picture

18 Apr 2014 - 11:33 pm | काळा पहाड

हा माझा आत्ता पर्यंतच्या आयुष्यातील Racism चा एकमेव अनुभव.

पृथ्वीतलावर तुमचं स्वागत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2014 - 9:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखन आवडलं.

काही आडनावं मजेशीर वाटतात. काळे, हिरवे, निळे, गोरे ही रंगांमुळे, घासकडवी, गोडसे ही आडनावं चवींमुळे मजेशीर वाटली पाहिजेत. त्यातल्या गोडश्यांना नथुराममुळे बरंच काही सहन करावं लागत असेल.

माझा एक एक्स ऑफिसमेट आहे, तो आडनाव लावत नाही. मी सुरूवातीला फक्त नाव ऐकलं, जयंती प्रसाद. आणि विचार केला, मी बाई आहे म्हणून मला मुलगीच ऑफिसमेट असायची गरज नाही. आणि थोड्या वेळाने एक मध्यम उंची, बांध्याचा टकलू आला. "हाय, तू माझी नवीन ऑफीसमेट ना?". हा जयंती प्रसाद आहे आणि तो दक्षिण भारतीय नसून उत्तराखंडचा आहे हे लगेच बोलण्यातून समजलं. नावांवरून स्टीरीओटाईप बनवणं थोडं कमी झालं.