जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
26 Jul 2008 - 5:35 pm

वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते.

पुणे-नाशिक रस्त्यावर कधी गेला असाल तर जुन्नर किंवा नारायणगावच्या जवळ मोठमोठाल्या डिश अँटेना दिसतात. बय्राचदा त्या आर्वीच्या सैनिकी किंवा व्ही.एस.एन.एल.च्या संपर्क दुर्बिणी असतात पण कधीमधी आमच्या संशोधनाच्या दुर्बिणीही दिसतात. तर या दुर्बिणी दिसतात आपल्या डीश अँटेनासारख्याच (आणि त्यांचं कामही साधारण सारखंच असतं). या एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत; एकत्रितपणे त्या दुर्बिणीचं नाव आहे जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप, जी.एम.आर.टी.! साधारणतः दुर्बिणी/टेलिस्कोप म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दृश्य किरण दाखवणारी दुर्बिणी, आपण त्याला डोळा लावून पहायचं; चंद्रावरचे खड्डे, शनीची कडी, गुरूचे उपग्रह, (योग्य काळजी घेऊन पाहिलं तर) सूर्यावरचे डागही, एका गुच्छाच्या जागी ताय्रांचे समूहही दिसतात. पण या दुर्बिणी जरा वेगळ्या असतात.

आपल्याला डोळ्याला जी किरणं दिसतात, एक्स-रे साठी जे किरण वापरतात, टी.व्ही च्या अँटेना जे किरण शोषून घेतात किंवा मायक्रोवेव्हमधे जी ऊर्जा असते ते सगळी भावंडं म्हणायला हरकत नाही. त्यांची ऊर्जा कमी-जास्त केली की हे वेगवेगळे किरण मिळतात. आपल्या सूर्याच्या आणि इतर ताय्रांच्या पोटात जी ऊर्जा तयार होते ती असते गामा किरणांच्या रूपात, सर्वात शक्तीशाली! मग वाटेत हायड्रोजनच्या अणूंवर आपटून त्यांचे होतात एक्स-रे, आणि या उतरत्या भाजणीने जेव्हा हे किरण सूर्याचा पृष्ठभाग सोडतात तेव्हा बनतात दृश्य किरण. पृथ्वीवर आपटून परत जातात तेव्हा त्यांचे बनतात अवरक्त (इन्फ्रारेड) किरण! तर या प्रारणांच्या समूहातला सगळ्यात अशक्त सदस्य आहे रेडीओ लहरी. यांच्या उर्जेमधे खूप विविधता आढळते, रेडीओचे वेगळे, टी.व्ही. चे वेगळे, पेजरसाठी वेगळे, कृत्रिम उपग्रहासाठी वेगळे आणि खगोलसंशोधनासाठीही वेगळे ... आणि यातही आरक्षण असतं. खगोलसंशोधनासाठी जो भाग ठेवला आहे तो इतर कोणालाही वापरता येत नाही आणि संशोधकांना उपग्रहांचा मागोवा घेता येत नाही इत्यादी.

दृश्य दुर्बिणींपेक्षा काही बाबतीत या दुर्बिणी काही प्रकारांनी वेगळ्या असतात. दोन योग्य आरसे घेऊन आणि एक फिल्मवाला किंवा डिजीटल कॅमेरा घेऊन तुम्हाला आकाशाचे फोटो काढता येतील, पण या रेडीओ दुर्बिणी वापरायच्या तर कॅमेय्राच्या जागी किचकट इलेक्ट्रॉनिक्सची गरज पडते. शिवाय खूप मोठी दुर्बिणी वापरली तर दृश्य दुर्बिणीशी तुल्यबळ माहिती मिळते. आता इलेक्ट्रॉनिक्सला पर्याय नाही, पण ते काही फार महाग किंवा अगम्यही नाही. पण आकाराचं काय? तर यासाठी उपाय असा आहे की छोट्या-छोट्या बय्राच दुर्बिणी बांधायच्या आणि पुन्हा जास्तीचं इलेक्ट्रॉनिक्स वापरून माहिती एकत्र करायची. याच कल्पनेचा आणि तंत्राचा वापर करून जी.एम.आर.टी. मधे ४५ मीटर व्यासाच्या ३० दुर्बिणी वापरल्या आहेत. दोन दुर्बिणींमधलं जास्तीत जास्त अंतर ३० किमी आहे. त्यामुळे एक सलग ३० किमी व्यासाची दुर्बिण बांधली असता जेवढं रेझोल्यूशन मिळेल तेवढं मिळतं; अर्थात यासाठी किंमत मोजावी लागते ती वेळाची! सलग पृष्ठभाग असता तर जर १ मिनटात एखाद्या वस्तूबद्दल पुरेशी माहिती मिळाली असती पण आता त्यासाठी त्याच्या कितीतरी पट जास्त वेळ लागतो.

ज्यांनी कोणी या दुर्बिणी नीट पाहिल्या असतील तर लक्षात आलं असेल तर त्यांना एक सलग पृष्ठभाग नाही आहे. या दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचं तारांचं जाळं आहेत. या जाळ्यांमुळे एक सलग पृष्ठभाग बनवण्यापेक्षा खूप कमी खर्च आला, वजन कमी झाल्यामुळे त्यासाठी लागणारे "पाय" हलके आणि स्वस्त झाले आणि कमी पॉवरच्या मोटर्स वापरून या दुर्बिणी हलवता येतात. या रचनेचं पेटंट आहे, या संपूर्ण दुर्बिणीचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे! डॉ. स्वरूप यांच्याविषयी सामान्यतः खगोलशास्त्रज्ञ सोडून फारसं कोणाला माहित नाही. (दुर्दैवाने, त्यांच्याबद्दल लिहिणारा विसोबा खेचर अजून त्यांना भेटलेला नाही असं दिसतंय. स्वतः कामात व्य्रग्र असल्यामुळे त्यांना कधी लोकांसमोर जायला वेळच नसतो.) या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे. आणि याच्याच अनुभवातून अरेसिबो या पोर्टो रिको मधल्या रेडिओ दुर्बिणीचं इलेकक्ट्रॉनिक्स थोड्या प्रमाणात बदललं गेलं.

तर या रेडिओ दुर्बिणी वापरून काय काय पाहिलं जातं? सर्वसाधारणपणे (प्लँकच्या नियमानुसार) ज्या वस्तू दृष्य लहरी प्रक्षेपित करतात त्या वस्तू रेडिओ लहरीही प्रक्षेपित करतात; अगदी आपल्या घरातल्या साध्या बल्बपासून ते दीर्घिकांपर्यंत. काही वस्तू दृष्य प्रकाशात जास्त तेजस्वी असतात तर काही रेडिओ लहरींमधे; ते त्यांच्या तापमानावरून (आणि इतर काही गोष्टींवरून) ठरतं. रेडीओ लहरींचा जो प्रचंड मोठा स्पेक्ट्रम आहे त्यात आपण ज्या लहरी पहात आहोत त्यावरून ठरतं आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करता येईल ते! प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ज्या अवकाशस्थ वस्तूंचा अभ्यास करायचा आहे त्यांच्याबद्दलच्या उपलब्ध माहितीमधून ठरवलं जातं रेडीओ दुर्बिणी कोणत्या तरंगलांबीला (किंवा ऊर्जेसाठी) सगळ्यात चांगले निकाल देईल. जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. लहरींचे गुणधर्म ठरतात ते त्यांच्या ऊर्जेवरून. आणि त्यावरूनच त्यांची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) आणि वारंवारता (फ्रिक्वन्सी) ठरते. जी.एम.आर.टी. मधे ५० मेगाहर्टझ ते १४२० मेगाहर्टझ (हे वारंवारतेचं (फ्रिक्वन्सी) मापक (युनिट) आहे.) या स्पेक्ट्रममधल्या लहरींचा अभ्यास होतो.

आपल्या विश्वात अदमासे ७५% हायड्रोजन आहे आणि २४% हेलियम. साधारण १% इतर मूलद्रव्य आहेत. या बाकीच्या सर्व मूलद्रव्यांना खगोलशास्त्रात धातू (मेटल्स) म्हणतात. यात कार्बन, ऑक्सिजन, सोनं, सुरेनियम असे सगळेच मोडतात. तर विश्वाचा अभ्यास करायचा असेल तर हायड्रोजनचा अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा हायड्रोजन बघण्यासाठी जी.एम.आर.टी. सारख्या कमी वारंवारतेमधली प्रारणं पाहू शकणाय्रा दुर्बिणींना महत्त्व आहे. अतिशय जवळचा म्हणजे आपल्या आकाशगंगेलला आणि अतिशय लांबचा म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढं लांबचं पाहू शकतो तिथला हायड्रोजन बघण्यासाठी जी.एम.आर.टी. ही एकदम सुंदर दुर्बिण आहे. याशिवाय तिथून गुरूचाही अभ्यास होतो. मगाशी मी जसं म्हटलं की वस्तूच्या तापमानावरून ठरतं की ती वस्तू आपल्याला कोणत्या फ्रिक्वन्सीला दिसेल. आपला हा जो दादा ग्रह आहे त्यातपण भरपूर हायड्रोजन भरला आहे. आणि त्याच्या तापमानामुळे तो रेडिओ लहरींमधे प्रकाशमान आहे. जी.एम.आर.टी. मधून गुरूचाही अभ्यास होतो.

तारे जेव्हा मरतात ... हो तारे मरतात. त्यांच्या गाभ्यात हायड्रोजनचं रुपांतर हेलियममधे होतं आणि या प्रक्रियेमधे ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा ही ऊर्जा बनवण्याची क्रिया थांबते तेव्हा तारा मरतो. आणि मरतो तेव्हा त्याच्या गाभ्याच्या वस्तूमानावरून ठरतं की त्याचं मरण कसं असेल ते! मध्यम आकाराच्या ताय्रांसाठी मरणपण मस्त असतं. त्यांचा फक्त गाभा शिल्लक राहतो, तो खूप वेगात स्वतःभोवती फिरतो (एका सेकंदाला ३० आवर्तनं हा साधारण मध्यम वेग आहे). आणि हा फिरणारा मृतवत तारा त्याच्या धृवीय भागामधून प्रारणं बाहेर टाकतो. ही प्रारणं आपल्याला पल्सेसच्या रुपात दिसतात. त्यांची वारंवारता ताय्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगावरून ठरते. या ताय्रांना पल्सार (pulsar) म्हणतात. या पल्सार्सचाही अभ्यास जी.एम.आर.टी. मधून होतो.

जी.एम.आर.टी. ही आंतरराष्ट्रीय दुर्बिण आहे. (या वाक्याला तसा म्हटलं तर काही अर्थ नाही आहे.) ज्याला कोणाला जी.एम.आर.टी. वापरायची असेल त्याला (/तिला) "प्रपोजल" लिहावं लागतं. त्यात आपल्याला काय बघायचं आहे, का बघायचं आहे, त्यातून काय शिकता येईल (हो हे पान आधीच लिहायचं!), किती वेळ वापरायची आहे अशा गोष्टी लिहाव्या लागतात. एक कमिटी, ज्यात जी.एम.आर.टी. आणि इतर संस्थांमधले तज्ञ आहेत, ते ठरवतात कोणत्या प्रपोजलला किती वेळ द्यायचा. आणि हे प्रपोजल कोणालाही लिहिता येतं, तुम्ही भारतीय आहात का, खगोलशास्त्रात काही पदवी आहे का असे प्रश्न त्यात विचारले जात नाहीत.

जी.एम.आर.टी.चं स्थान मी लेखाच्या सुरुवातीला उडत उडत दिलेलं होतंच. पुणा-नाशिक रस्त्यावर जुन्नर/नारायणगावच्या जवळ खोडदमधे जी.एम.आर.टी. आहे. पण सर्व शैक्षणिक कामं पुण्यात होतात. पुणे विद्यापीठाच्या आवारात एन.सी.आर.ए. (नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजीक्स) ही संस्था आहे. हे मुंबईच्या टी.आय.एफ.आर. (टाटा मूलभूत संशोधन संस्थानचं) पुण्यातलं बाळ! एन.सी.आर.ए. मधूनच उटीच्या रेडीओ दुर्बिणीचाही कारभार हाकला जातो. खगोलशास्त्रज्ञेतर लोकांना तिथे जायचं असेल तर शुक्रवारी पूर्वपरवानगी घेऊन जाता येतं. पण
रेडीओ दुर्बिण असल्यामुळे तिथे मोबाईल फोन वापरायला सक्त बंदी आहे. आणखी माहितीसाठी इथे टिचकी मारा.

अवांतरः मी या लेखात खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत. आणि काही ठिकाणी इंग्रजी वाक्यांचं मराठी भाषांतर झालं आहे. तेव्हा प्रतिशब्द /सूचनांचं स्वागतच आहे. अर्थात कोणत्याही वैज्ञानिक भाषण्/लेक्चरनंतर प्रश्नांचंही स्वागतच आहे.

तंत्रविज्ञानलेखमाहिती

प्रतिक्रिया

II राजे II's picture

26 Jul 2008 - 6:53 pm | II राजे II (not verified)

या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे.

खरोखर अभिमान वाटावा असा शोध !

एका किलिष्ट विषयाबद्दल सरळ साध्या सोप्या मराठी मध्ये छान माहीती !!!!
आवडले... अजून लिहा.... तारे व आकाश ह्याचे वेड लहानपणापासूनच .. पण फक्त रात्री साध्या डोळ्याने आकाश बघणे ईतकंच प्रेम आमचं !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मदनबाण's picture

26 Jul 2008 - 7:24 pm | मदनबाण

अरे व्वा,,जबरदस्तच आहे हे सर्व आणि सर्व भारतीय बनावटीचं ही तर अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे..

(खगोल प्रेमी)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 1:57 am | विसोबा खेचर

अरे व्वा,,जबरदस्तच आहे हे सर्व आणि सर्व भारतीय बनावटीचं ही तर अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे..

सहमत आहे!

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jul 2008 - 7:45 pm | बिपिन कार्यकर्ते

खूपच छान माहिती आहे. जी.एम.आर.टी. बद्दल थोडी थोडी माहिती होती, तुम्ही एवढी बैजवार माहिती आणि एवढ्या सोप्या शब्दात दिली त्यामुळे तुमचे कौतुक आणि धन्यवाद. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आवडेल.

०१. एन.सी.ए.आर. चे कार्यालय पुणे विद्यापीठात आहे का?
०२. जर लहान मुलांना न्यायचे असेल तर शक्य आहे का? साधारण १२ वर्ष वयातील मुलं.
०३. तिथे मुलांना समजेल अश्या भाषेत काही माहिती मिळेल असा काही उपक्रम आहे का?

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jul 2008 - 8:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

०१. एन.सी.ए.आर. चे कार्यालय पुणे विद्यापीठात आहे का?
हो! विद्यापीठाच्या खडकीच्या बाजूला जे फाटक आहे, तिथून २ मिनीटांवर एन.सी.आर.ए. आहे (आयुकाच्या समोर, रस्त्याच्या दुसय्रा बाजूला).

०२. जर लहान मुलांना न्यायचे असेल तर शक्य आहे का? साधारण १२ वर्ष वयातील मुलं.
जी.एम.आर.टी. मधे त्यांना जरूर न्या. एन.सी.आर.ए. मधे त्यांना फक्त लेक्चर देता येईल; पण प्रत्यक्ष बघण्याचा आनंद नाही. साधारण ८ वीच्या पुढच्या मुलांना (आणि बाकी सर्वांनाच) जनरल खगोलशास्त्राबद्दलही काही सांगता येईल.
तुम्हाला जर तिथे मुलांना घेऊन जायचं असेल आणि इतरही मागणी असेल तर काही स्पेशल सहल काढता येईल का याची मी चौकशी करू शकते. आणि तुम्हाला मराठीतून माहिती हवी असेल तर आपल्या सर्वांच्या सोयीने आपण काहीतरी करू शकतो.

०३. तिथे मुलांना समजेल अश्या भाषेत काही माहिती मिळेल असा काही उपक्रम आहे का?
सध्यातरी नाही; पण शाळेची सहल काढली तर थोडे प्रयत्न करून काहीतरी नक्कीच मॅनेज करता येईल.
पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष जाहिर झालं आहे. त्यामुळे आता काही दिवसात (किंवा महिन्यात) एन.सी.आर.ए. प्लॅनींग सुरू होईल, लोकांपर्यंत खगोलशास्त्र आणि विषेशतः जी.एम.आर.टी. पोहोचवण्यासाठी काय करता येईल ते ... त्यामुळे आपले सर्वांचे प्रतिसाद, मतं आले तर आम्हाला त्याचा फायदा होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2008 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेडियो दुर्बीणीचे जनक डॉ. गोविंद स्वरूप आहेत आणि भारतीय अभियंत्यानीच अशा दुर्बीणीचा विकास केला आहे. ही अभिमानाची गोष्ट. माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी !!!

एका किलिष्ट विषयाबद्दल सरळ साध्या सोप्या मराठी मध्ये छान माहीती !!!!

अस्सेच म्हणतो.

आकाश निरिक्षण काही कळत नसतांना अनेकदा चंद्रावरील खड्डे, मंगळ, शनी, तार्‍यांचा पाठलाग करत अनेक रात्री घातल्या आहेत. ( विमानाच्या चमकणार्‍या लाइटांचाही पाठलाग केला आहे. )

-दिलीप बिरुटे

(टेलिस्कोप १०० मी.मी. / १००० मी.मी ने आकाश भ्रमण करणारा )

अरुण वडुलेकर's picture

26 Jul 2008 - 8:36 pm | अरुण वडुलेकर

........आणि उद् बोधक माहिती.

कांही दिवसांपूर्वीच जुन्नर जवळील ओझर आणि लेण्याद्रीला जात असतांना त्या डिश एन्टेना (दूरूनच) पाहिल्या.त्या कशाच्या आहेत हे कुतुहल कोणी स्थानिक रहिवाशी शमवू शकला नाही. तुम्ही ती महिती दिलीत.धन्यवाद. तरीही एक कुतुहल बाकी आहे.त्या डिश त्यांचा आकाशाकडील कोन बदलतांनाही दिसत होत्या. ते कशासाठी?

((या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे. आणि याच्याच अनुभवातून अरेसिबो या पोर्टो रिको मधल्या रेडिओ दुर्बिणीचं इलेकक्ट्रॉनिक्स थोड्या प्रमाणात बदललं गेलं. ))

ही माहिती वाचून त्या अभियंत्यांचा अभिमान वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jul 2008 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या डिश त्यांचा आकाशाकडील कोन बदलतांनाही दिसत होत्या. ते कशासाठी?

एकाच वस्तूकडे उदा: देवयानी दीर्घिका, जर काही तास पहायचं असेल तर अँटेना फिरवाव्या लागतात. नाहीतर सोर्स एकीकडे आणि अँटेना भलतीकडे असं व्हायचं. शिवाय अधून मधून काही स्टँडर्ड सोर्स आहेत त्यांच्याकडे पहावं लागतं. आपल्याला रस आहे त्या वस्तूकडून किती उर्जा येत आहे ते कॅलिबरेट करण्यासाठी!
किंवा एका वस्तूकडे पाहून पूर्ण झालं किंवा ते ऑब्जेक्ट क्षितीजाजवळ आलं की दुसय्राकडे बघतात.
म्हणूनच असेल ...
अगदी क्वचित, जर फार वारा आला तर मात्र अँटेना मोडू नयेत म्हणून फिरवाव्या लागतात.

अदिती

टारझन's picture

26 Jul 2008 - 11:17 pm | टारझन

संहिता ,
खगोलिय अभ्यास हा शास्त्रिय झाला की बोर होतं, ते नुसत बघणे , आणि मजा घेणे यात आनंद मिळतो , पण तु तर कमाल केलीस .. मस्त डिस्क्राईब केलंस. आपल्या भाषेत प्रत्येक ईंग्लिश शब्दाला ऊपशब्द सापडेल असं नाही, पण तु नॉन सायंस पब्लिक ला पण समजेल अशा भाषेत लिहीलय.

अवांतर : मला त्या दुर्बिणींमधे शिरून आत काय आहे याची ऊत्सूकता आहे. आम्ही तुझे नातेवाईक म्हणून आत प्रवेश मिळवू शकतो का ? दुर्बिन तुटली तर जोडून देईल मी फेव्हिक्विक ने !
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...


श्रीकृष्ण सामंत's picture

27 Jul 2008 - 5:47 am | श्रीकृष्ण सामंत

अदितीने अतिशय कल्पकतेने आणि जरूरी प्रमाणे टेकनीकल शब्द वापरून कुणालाही वाचायला इंटरेस्ट येईल अशा शब्दात हा रेडिओ एस्ट्रॉनॉमीचा क्लिष्ट विषय विशद करून लिहिला आहे.वाचून बरं वाटलं.अभिनंदन.

जाता जाता---
डॉ.गोविंद स्वरूप यानी "रेडिओ एस्ट्रॉनॉमी" चा नव्याने सेक्शन स्थापन केला त्यावेळी मी मॅगनॅटो-हायड्रो-डायनामिक्स, म्हणजेच प्लाझ्मा पिझिक्स,ह्या विषयावर tifr मधे संशोधन करीत होतो तेव्हा प्रो.मेनन यांच्या सुचनेनुसार मी व श्री.एस.एस.भावे मिळून डॉ.स्वरूपना जॉईन झालो होतो.मी टेकनीकल एसीस्टंट म्हणून आणि भावे रिसर्च एसीस्टंट म्हणून.भाव्यानी आपला सहभाग चालूच ठेवला पण मी पुन्हा प्रो.मेनन यांच्या सांगण्यावरून CDC 3600 ह्या मेन फ्रेम कंप्युटर वर काम करू लागलो.नंतर मला आणखी मोठ्या मेन फ्रेम Cyber कंप्युटरवर ट्रेनींग साठी अमेरिकेत मिनियापोलीस मिनेसोटा स्टेट मधे एक वर्षाच्या ट्रेनींग साठी tifr ने पाठवलं.
हे सर्व लिहिण्याचा प्रपंच एव्हड्यासाठी की अदितीने लेखात लिहिलेल्या डिश एनटेना आणि त्या संबधाने लागणार्‍या इलेक्ट्रॉनीक्सच्या विषयाच्या टेबलावरच्या योजनांच्या प्रक्रियेत माझा अल्प असा सहभाग होता.नारायणगावाला डॉ.स्वरुपांबरोबर आमच्या बर्‍याच ट्रिपा व्हायच्या.ते आठवलं.
दिवस निघून जातात पण आठवणी मात्र येतात.एव्हडंच.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2008 - 8:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता तुम्ही डॉ. स्वरुपांबद्दलच्या अनुभवांबद्दल लिहाच. तुम्हाला छायाचित्र हवं असल्यास मी पुरवते.

आणखी एक सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे: गेल्याच वर्षी, सप्टेंबरमधे, जॉड्रल बँक ऑब्झव्हेटरीमधे (मँचेस्टर, यू.के), डॉ. गोविंद स्वरूप यांना ग्रोट रीबर सुवर्ण पदक मिळाले. ग्रोट रीबर म्हणजे पहिला खगोलशास्त्रज्ञ ज्याने एक चौरस किमी क्षेत्रफळाची सर्वात पहिली रेडीओ दुर्बिण बनवली. माझ्या सुदैवाने हा सोहळा मला पाहता आला कारण तिथेच माझं माहेर ... (आम्ही मुली जिथे पी. एचडी. करतो त्याच जागेला माहेर म्हणतो.)

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Jul 2008 - 10:32 am | डॉ.प्रसाद दाढे

सु॑दर लेख! भारतीय अभिय॑त्या॑नी तयार केलेल्या जी.एम.आर.टी बद्दल ता॑त्रिक माहिती वाचून आन॑द झाला. आपले मिपाकर साम॑तकाकापण त्या चमूत होते हे वाचून दुप्पट आन॑द झाला. त्या महाकाय दूर्बिणी॑चे छायाचित्रही दिले असते तर बरे झाले असते.
माझे एक वास्तूशास्त्रज्ञ मित्र श्री. रवि॑द्र जोग या॑चा त्या दूर्बिणी॑च्या बा॑धकामात मोठा सहभाग आहे.
वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते.
यमूताई, क्षमा वगैरे मागायची काही जरूर नाही हो, मिपावर पुष्कळ विज्ञानप्रेमी आहेत (बुद्धिमान अभिय॑तेसुद्धा आहेत). अशी ता॑त्रिक माहिती इतक्या लालित्यपूर्ण मराठीत वाचायला मिळते आहे! तुम्ही खूप छान लिहिता, आणखी लिहा.

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 6:01 pm | विसोबा खेचर

अशी ता॑त्रिक माहिती इतक्या लालित्यपूर्ण मराठीत वाचायला मिळते आहे! तुम्ही खूप छान लिहिता, आणखी लिहा.

प्रसादरावांशीदेखील सहमत आहे. अदिती, येऊ दे अजूनही!

तात्या.

सहज's picture

28 Jul 2008 - 2:24 pm | सहज

असेच म्हणतो

उत्तम लेख लिहल्याबद्दल लेखीकेला धन्यवाद व अजुन असेच लेख लिहीत जावे अशी विनंती.

अवांतर- पुणेकर मिपाकरांनी आवर्जुन ह्या संस्थेला भेट देण्याचा कार्यक्रम आखावा.

स्वाती दिनेश's picture

27 Jul 2008 - 11:19 am | स्वाती दिनेश

सु॑दर लेख! भारतीय अभिय॑त्या॑नी तयार केलेल्या जी.एम.आर.टी बद्दल ता॑त्रिक माहिती वाचून आन॑द झाला. आपले मिपाकर साम॑तकाकापण त्या चमूत होते हे वाचून दुप्पट आन॑द झाला.
असेच म्हणते.
स्वाती

अवलिया's picture

27 Jul 2008 - 11:34 am | अवलिया

चांगली माहिती

अजुन येवु द्या

नाना

भडकमकर मास्तर's picture

27 Jul 2008 - 5:54 pm | भडकमकर मास्तर

शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात...
धन्यवाद...
दुर्दैवाने, त्यांच्याबद्दल लिहिणारा विसोबा खेचर अजून त्यांना भेटलेला नाही असं दिसतंय.
पण आपले मिपाकर सामंतकाका डॉ. स्वरूप यांच्याविषयी व्यक्तिचित्रात्मक लेख लिहितील की...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

27 Jul 2008 - 8:04 pm | धनंजय

तांत्रिक विषय रंजक करून सांगितलात.

धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

28 Jul 2008 - 2:11 am | पिवळा डांबिस

एका सहसा अपरिचित विषयावर लिहिलेला माहितीपूर्ण लेख!!

मी या लेखात खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत. आणि काही ठिकाणी इंग्रजी वाक्यांचं मराठी भाषांतर झालं आहे. तेव्हा प्रतिशब्द /सूचनांचं स्वागतच आहे.
एकच सूचना, जरी इंग्रजी शब्द वा भाषांतर अपरिहार्य असलं तरी असं लिखाण चालूच ठेवा. आशय वाचकांपर्यंत पोचण्याला इथे जास्त महत्व आहे....
अशा प्रकारच्या वैद्यानिक विषयांवरचे लेख मराठीत अधिकाधिक यायला हवेत!!!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!

बेसनलाडू's picture

30 Jul 2008 - 5:19 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

ध्रुव's picture

28 Jul 2008 - 6:04 pm | ध्रुव

लेख सुरेख झाला आहे. अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, सोप्या भाषेत सुरेख माहिती.
--
ध्रुव

विजुभाऊ's picture

28 Jul 2008 - 6:20 pm | विजुभाऊ

शनी मंगळ व तत्सम युत्या ( म्हणजे कोणता तरी ग्रह कोणत्या ग्रहाच्या/तार्‍याच्या मागे दडणे) ग्रहणे ( छायांकित होणे) हे अवकाशात नेहमीच होत असते.
अशा युत्यांचा मानवी मनावर किंवा त्यांच्या मुळे पृथ्वीवर होणारे परिणाम या विषयावर कोणी ही खगोल दुर्बीण वापरुन काही संशोधन केले आहे का?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉ. स्वरुप यांनी उटीला आधी टेलिस्कोप बांधला (पक्कं माहित नाही, पण बहुतेक त्यांनीच!). तो टेलिस्कोप एका ११ अंश उताराच्या टेकडीवर आहे. उटीचे अक्षांश पण ११ अंशच आहेत. आणि ही टेकडी उत्तरेला उंच आहे, आणि बरोब्बर उत्तर-दक्षिण आहे. हा टेलिस्कोपही तारांचा बनवलेला आहे, पण थोडा वेगळा आहे. हा cylindrical parabola आहे. (नेमकी माझ्याकडची फोटोची प्रत २६ जुलैच्या पावसानी खाल्ली.) म्हणजे असा विचार करा की आपले मोठे पाईप्स असतात ना, ज्यातून पाणी वगैरे वाहून नेतात, तसा पाईप जर का उभा चिरला तर कसा आकार तयार होईल, साधारण त्याच आकाराचा parabola तारा एकमेकांशेजारी ठेऊन बनवला तर जसं दिसेल तसा हा टेलिस्कोप आहे..... या ११ अंशाची आणि उत्तर-दक्षिणेची भानगड अशी आहे की, हा टेलिस्कोप फक्त एकाच दिशेत हलू शकतो. पण त्यामुळे एकदा आकाशात एक वस्तू उगवली की ती मावळेपर्यंत तो तिचा पाठलाग करू शकतो. पण जर ती वस्तू फार उत्तर किंवा दक्षिणेला असेल तर या दुर्बिणीला ती दिसणार नाही, किंवा फार चांगली माहिती गोळा करता येणार नाही.
तर हा टेलिस्कोप मुख्यत: चंद्राच्या निरीक्षणाकरता बनवला आहे. चंद्राच्या मागे कधीमधी तारे किंवा ग्रह लपतात, याला पिधान युती (occultation) असं म्हणतात. तर असं पिधान असलं की त्याच्या निरीक्षणासाठी हा उटीचा टेलिस्कोप बनवला. अर्थात पिधान युती ही विजुभौंनी म्हटल्याप्रमाणे फक्त चंद्राचीच होते असं नाही तर ग्रहांची आपसात किंवा एक ग्रह एक तारा अशीही होऊ शकते.

अशा युत्यांचा मानवी मनावर किंवा त्यांच्या मुळे पृथ्वीवर होणारे परिणाम या विषयावर कोणी ही खगोल दुर्बीण वापरुन काही संशोधन केले आहे का?
विजुभौ, काय गरीबाची टिंगल करता काय? मानवी मनाचा अभ्यास करायला आमच्या दुर्बिणी काय करायच्यात? आमची घरची दुर्बिण (जी.एम.आर.टी.) वापरायची असेल काही टेस्ट्स साठी सुद्धा तरी हजार उचापती करायला लागतात. आम्ही माणवी मणाच्या संशोधनासाठी दुर्बिणी देऊ होय?
आता प्रश्न पृथ्वीवर होणय्रा परिणामांचा! पृथ्वीवर एवढ्या अंतरावरून फक्त गुरुत्वाकर्षण या एकमेव बलाचा परीणाम होऊ शकतो. आणि त्यात चंद्रच दादा आहे, त्याच्यामुळेच भरती-ओहोटी येतात. सूर्यामुळे (अमावस्या आणि पौर्णिमेला) फक्त त्यांची तीव्रता वाढते (आणि अष्टमीला कमी होते). एवढा मोठ्ठा सूर्य आपला त्याचं काही नाही चालत तर हे शनी-मंगळ काय घेऊन बसलात हो तुम्ही राव!

अदिती

मागे एकदा२००० साली पुण्यात एका संस्थेत मी काम करत असताना एका संध्याकाळी अचानक डॉ.गोविंदस्वरुप तिथे आले. मी पाहताक्षणीच त्यांना ओळखले आणि मला डोळ्यांवर विश्वास बसेना. मी चटकन पुढे होऊन त्यांना बसायला खुर्ची दिली. ते बसले आणि मला हाताला धरुन तिथे शेजारीच बसवले. आम्ही व्ही.एल्.एस्.आय. (व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स) मधे काय स्वरुपाचे काम करतो हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा होती. फील्ड प्रोग्रामेबल गेट अरेज आणि काँप्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिवायसेस संदर्भात आमचे काम सुरु होते त्याबद्दल त्यांना मी सांगितले. त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने मी सांगितलेले ऐकून घेतले आणि अत्यंत सोपे सोपे प्रश्न विचारुन (प्रगत तंत्रज्ञानाविषयी असे सोपे प्रश्न विचारणे फार अवघड असते!) माझ्याकडून बरीच माहिती घेतली. त्यांना हे सर्व नवीन तंत्रज्ञान खगोलशात्रातल्या त्यांच्या कामात कसे वापरता येईल त्याबद्दल उत्सुकता होती.

डॉ. गोविंदस्वरुप आलेले आहेत हे समजताच लॅबमधले आठ-दहा जण जमले. सांगायचा मुद्दा असा, की त्यावेळी गप्पांच्या ओघात उटी येथील रेडियो टेलिस्कोप कसा बांधला ह्याची सुरस हकिगत त्यांनी सांगितली होती. टेलिस्कोप बांधायचा हे ठरल्यावर त्यांना उटी येथे जावे लागले त्यांनी जागेची पहाणी केली. रेडियो टे. हे तंत्रज्ञान आपल्याला त्यावेळी फारच नवीन होते. प्रत्यक्ष टेलिस्कोप बांधणे म्हणजे प्रचंड मोठे मेकॅनिकल इंजिनियरिंगचेच काम होते. डॉ. साहेब कामानिमित्त मुंबईला गेले असताना तिथल्या फुटपाथवरुन जुन्याबाजारातले 'अप्लाईड मेकॅनिक्स्'चे एक टेक्स्ट्बुक चार की आठआणे किमतीला विकत घेतले. रेल्वेत बसून उटीला जाताना सलग दोन दिवस आणि रात्र त्यांनी ते पुस्तक वाचून संपवले. 'ट्रसेस', कँटिलिव्हर्स, चे डीझाईन आणि कमित कमी खर्चात वजनाला हलक्या गोष्टी वापरुन आणि टिकाऊ असे ते कसे बनवता येईल ह्यासाठी नवीन विषयाचा पूर्ण अभ्यास डॉ. नी केला! आणि त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर त्यांनी हा टेलिस्कोप बांधताना केला. त्यातले त्यांचे ज्ञान इतके उच्च दर्जाचे होते की ते खगोलशास्त्रज्ञ आहेत की मेकॅनिकल इंजीनिअर असा प्रश्न पडावा!

रॉयल सोसायटी, लंडन ह्या जगन्मान्य संस्थेचे सन्माननीय सभासद असलेल्या ह्या महान खगोलशात्रज्ञाबरोबरची अचानक झालेली ही भेट हा माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा आहे.
चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2008 - 6:38 pm | प्रकाश घाटपांडे

हे खगोल विश्व खरच अद्भुत आहे. इन्ट्रोडक्शन टु द युनिवर्स असा माझा प्रोजेक्ट होता त्याची आठवण आली.
(नाममात्र बीएस्सी फिजिक्स)
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 11:17 pm | विसोबा खेचर

हे खगोल विश्व खरच अद्भुत आहे.

सहमत आहे!

तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार,
विठ्ठला, तू वेडा कुंभार!

तात्या.

झकासराव's picture

28 Jul 2008 - 8:40 pm | झकासराव

अप्रतिम अशी माहिती देणारा लेख :)
मी हा प्रकल्प प्रत्यक्ष पाहुन आलो आहे. ते पेटंटच ज्यावेळी मी ऐकल तेव्हा फार अभिमान वाटला.
त्यावेळी जवळच्याच एका नारायणगड नावाच्या छोट्याशा डोंगरावरुन काढलेले हे फोटो.


बहुतेक फोटो दिसत नाहीत.
ह्या लिन्क वर पहा.
http://picasaweb.google.com/zakasrao/NarayangadKhodad/photo#518763400808...
http://picasaweb.google.com/zakasrao/NarayangadKhodad/photo#518763399090...

अवांतर : बर्‍याच वेळा पिकासावरील दिलेल्या दुव्यातील फोटो का बर दिसत नाहीत???

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 8:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकासराव,बरी आठवण करून दिलीत! मी पण तिथे नारायणगडावर गेले आहे.

जी.एम.आर.टी. च्या मुख्य इमारतीच्या आतले दृश्य:
http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074306425796595842

नारायणगडाच्या पायथ्याजवळून
http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074310969871995090

आणि ही एक अँटेना नारायणगडाच्या अर्ध्या उंचीवरून
http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074306434386530450

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल:
मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो.
माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल. पण आपल्या मिपाच्या जनतेला जर इतर शनिवार-रविवार चालणार असतील तर आपण तसा प्लॅन करू शकतो.

अदिती

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2008 - 1:43 pm | भडकमकर मास्तर

तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो.

मी आहे इच्छुक... शिवाय तिथे तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांकडून माहिती मिळवण्यासही उत्सुक आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

29 Jul 2008 - 1:59 pm | मनिष

मलाही आवडेल ही दुर्बिण बघायला. गोविंदस्वरूप फारच ग्रेट दिसताहेत!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2008 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा नवीन पोस्ट-डॉकबरोबर आता काय काय नवीन करता येईल जी.एम.आर.टी. वापरून याचा विचार-विनीमय करणारा माणूस किती कार्यरतही असेल याचा विचारही मी करू शकत नाही!
अदिती.

पद्मश्री चित्रे's picture

29 Jul 2008 - 11:46 am | पद्मश्री चित्रे

लेखाचे नाव वाचुन पुढे जायचा मोह झाला, पण लेख वाचला आणि खुप (खर तर सर्वच) नविन महिती मिळाली.
लेख अजिबात बोजड, किचकट नाही

मनस्वी's picture

29 Jul 2008 - 2:24 pm | मनस्वी

यमी, छान माहितीपूर्ण लेख.
अजूनही वाचायला आवडेल.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रमोद देव's picture

29 Jul 2008 - 4:04 pm | प्रमोद देव

यमे लेख मस्तच उतरलाय. असेच माहीतीपूर्ण लेखन करत राहा.
गोविंदस्वरूप
ह्यांच्याबद्दलची थोडी माहीती इथे मिळेल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

स्नेहश्री's picture

29 Jul 2008 - 9:23 pm | स्नेहश्री

लेख खुपच छान आहे मला पण समजला.
जिथे अडल तिथे गुगल आणि पुस्तक होतच.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

टिउ's picture

30 Jul 2008 - 12:50 am | टिउ

रेडीओ दुर्बिण असल्यामुळे तिथे मोबाईल फोन वापरायला सक्त बंदी आहे.

तिथे म्हणजे नक्की कुठे? मला हा प्रश्न फार कधीचा कुणालातरी विचारायचा होता. मोबाईल फ्रिक्वेन्सी तिथे ब्लॉक केली आहे असं ऐकलं होतं. मी पुण्याहुन दर १५ दिवसांनी नाशिकला घरी जायचो. पण नारायणगाव किंवा नारायणगावच्या जवळपास कधीही माझा मोबाईल बंद झालेला मला आठवत नाही (आधी बि.पी.एल आणि मग आयडिया).

घाटावरचे भट's picture

30 Jul 2008 - 6:06 am | घाटावरचे भट

मी जी एम आर टी पाहिली आहे. माझ्य अल्पश्या माहितीनुसार तिथे मुख्यतः सेंटिमीटर लेव्हलची ऑब्सर्व्हेशन्स केली जातात (wavelengths of the magnitude of few centimeters. Typically 21 cms, which is associated with hydrogen. This hydrogen based research is an important part of research at GMRT. Last time I heard they were mapping the sky at 21 cms, which was of course a long time back) माझी माहिती चुकीची असल्यास कृपया सुधारावी.

मोबाईल बद्दल सांगायचं, तर आजकालचे बहुतेक सर्व मोफो दोन फ्रीक्वेन्सी वर चालतात (०.९ गिगाहर्ट्झ आणि १.८ गिगाहर्ट्झ). यमीताईंच्या माहितीनुसार जी एम आर टी चे काम मुख्यतः ०.१४५ गिगाहर्ट्झ च्य खाली चालत असल्याने १.८ गिगाहर्ट्झ ची फ्रीक्वेन्सी वापरली असता दुर्बिणीच्या कामात अडथळा येत नाही (जो पूर्वी फक्त ०.९ गिगाहर्ट्झचे फोन असताना येत असे, म्हणून तिकडे मोबाईल कंपन्यांना टॉवर्स उभारायला बंदी केली होती). माझ्या महितीप्रमाणे, त्या भागातील सर्व सेलसाइट्स (मोबाईल टॉवर्स ) १.८ गिगाहर्ट्झ वर चालतात. त्यामुळे फोन चालू राहातात.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भटोबा,

आपली माहिती योग्य आहे. पण GMRT मधे फक्त २१ से.मी/१.४ गी.हर्ट्झ याच फ्रीक्वेन्सीवर निरीक्षणं होत नाहित. तिथे ५० से.मी/६१० मेगाहर्ट्झ, २०० से.मी/१५० मेगाहर्ट्झ, इत्यादी फ्रीक्वेन्सीवरही निरीक्षणं होतात.

मोबाईल्सचा लफ्रा असा होतो की त्या फ्रीक्वेन्सी वेगळ्या असल्या तरी त्यांचे हार्मॉनिक्स त्रास देतात. तिथले समदे कँपूटर्सबी येका (खरंतर दोन) खोल्यांतच ठेवतात आणि त्या खोल्यांना बाहेरून पूर्णपणे जाळी लावली आहे. त्यामुळे सी.पी.यू.च्या फ्रीक्वेन्सीजचाही काही फरक पडत नाही. तिथले बरेचसे संगणक २.० गीगाहर्ट्झच्या वरचे आहेत तरीही... आकाशातून येणारे सिग्नल्स बाकीच्या या टि.व्ही, मोबाईल, इत्यादींपेक्षा एवढे अशक्त असतात की बाकीच्या गोष्टी बंद असल्या तरच आम्हाला उच्च प्रतीचा डेटा मिळतो.

जॉड्रेल बँकमधे आम्हाला लॅपटॉप/संगणक घेताना सी.पी.यू.स्पीड १.८-२.२ गीगाहर्ट्झ या बँडमधलाच घ्यायला लागायचा (अजूनही लागतो), नाहीतर ६१० मेगाहर्ट्झला खूप त्रास व्हायचा. आणि अर्थात ही फक्त एकच फ्रीक्वेन्सी नसते, तिथे साधारण ३२ मेगाहर्ट्झची बँडविड्थ असते त्याचाही विचार करावा लागतो.

स्वगतः तिथे मोबाइल्स चालत असतील तर मला केंद्र संचालकांशी बोलायलाच पाहिजे! मला ७ ऑगस्टला ५-६ तास दिले आहेत .... माझा डेटा बेकार व्हायचा!

घाटावरचे भट's picture

31 Jul 2008 - 4:00 am | घाटावरचे भट

यमूताई, आपल्या इथे मीटर वेव्ह रेन्ज मधे प्रदूषण किती आहे हो? मी असं कुठेतरी वाचलं की, साधारणतः प्रगत देशांमधे या रेन्ज मधे खूप प्रदूषण आहे, त्यामुळे तिकडे मीटरवेव्ह दुर्बिणी बांधणे शक्य नाही.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

झकासराव's picture

31 Jul 2008 - 7:07 am | झकासराव

मोबाइलला तिथे व्यवस्थित रेन्ज येते की.
हा पण मोबाइल स्वताहुन बन्द करण्याचा उपाय आहे तो काटेकोरपणे अमलात आणला पाहिजे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

घाटावरचे भट's picture

30 Jul 2008 - 6:11 am | घाटावरचे भट

एक चूक झालिये...०.१४५ गिगाहर्ट्झ ऐवजी १.४५ गिगाहर्ट्झ असायला हवे...

स्वगत : सगळ्या गोष्टी पहिल्या प्रयत्नात जमल्या असत्या, तर आपणही जी एम आर टी मधे काम करत असतो राव :<

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

घाटावरचे भट's picture

30 Jul 2008 - 6:11 am | घाटावरचे भट

एक चूक झालिये...०.१४५ गिगाहर्ट्झ ऐवजी १.४५ गिगाहर्ट्झ असायला हवे...

स्वगत : सगळ्या गोष्टी पहिल्या प्रयत्नात जमल्या असत्या, तर आपणही जी एम आर टी मधे काम करत असतो राव :<

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 9:22 am | विजुभाऊ

भटा एकच प्रतिसाद दोनदा पोस्ट करुन तू दुसरीही चूक केली आहेस
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

यशोधरा's picture

30 Jul 2008 - 9:39 am | यशोधरा

खूप सुरेख, महितीपूर्ण लेख.

एकलव्य's picture

31 Jul 2008 - 6:50 am | एकलव्य

आताच लेख वाचला (इतक्या प्रतिक्रिया पाहून क्लिक केले :)) यमीताई सुंदर माहिती उतरली आहे. आभार आणि अभिनंदन!!

अनेकांच्या प्रतिक्रियाही आवडल्या... (श्रीकृष्ण, चतुरंग यांसारखे दादा लोक (आणि इतरही अनेक छुपे रुस्तुम) येथे वावरताना पाहून सुखद आनंदही झाला.)

अवांतर - दुर्बिणींबरोबरोबरच युद्धतंत्रज्ञानाच्या आणि अवकाशाच्या क्षेत्रातही भारतीयांनी स्वतःच्या हिंमतीवर मोठी मजल मारली आहे याचीही जाताजाता नोंद केल्याशिवाय राहवत नाही. यमीताई - त्यावरही लिहा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2014 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिलीपूर्ण लेख. ही लिंक दिल्याबद्दल बहुगुणींना अनेक धन्यवाद !

अशी भारताची नविन शक्तीस्थानं बघण्याची ओढ आहे.

परदेश् वासी तरिहि घाटी's picture

29 Jan 2014 - 11:05 pm | परदेश् वासी तरि...

नमस्कार अदिती,
तुम्ही मला अगदी भूतकाळात घेऊन गेलात. मी पण एक हौशी खगोल निरीक्षक आहे. लहान पणी नाशिक मधल्या हौशी खगोल मंडळा तर्फे मी GMRT आणि IUCAA ला भेट दिली होति. तेव्हाच मनात निश्चय केला होता कि मला खगोल शास्त्रात career करायचं , पण पुढे इतर अनेक भारतीय मुलांप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याबद्दल माझे मत परिवर्तन करण्यात आले आणि जीव घेण्या जीवशास्त्राचा प्रचंड तिटकारा असल्याने गर्दीतला एक इंजिनिअर बनलो. असो . अश्याच लिहित राहा . आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभारी .

मी जसे वाचले होते त्यानुसार जीएमआरटी प्रकल्प हा पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागापेक्षाही जास्त पटींनी तरंगलांबी ग्रहण करतो. याबाबत थोडे सांगावे. तसेच जीएमआरटीच्या उपयुक्ततेसंबंधी प्रा. गोविंदस्वरूप आणि अजून एक नामवंत भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांच्यात मतभेद होते असेही वाचले आहे. या दोन्ही गोष्टींवर जर तपशीलवार माहिती मिळाली तर बरे होईल अशी अदितीला विनंती. (दुसर्‍या मुद्द्याच्या बाबतीत वाद महत्त्वाचा नसून त्यातील शास्त्रीय मुद्दे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2014 - 12:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वादाबद्दल मलाही फार माहिती नाही. कदाचित पुण्याजवळ बनवायची का भोपाळजवळ यावरून वाद झालेला असू शकेल. पुण्यात शिक्षणाची सोय चांगली आहे, या खगोलबाह्य कारणासाठी पुण्याची निवड झाली. भोपाळची जागा खगोल आणि सिग्नल प्रोसेसिंगच्या दृष्टीने जास्त चांगली ठरली असती.

अशा काही गोष्टी गोविंदकडून ऐकता यायच्या, पण तेव्हा लिहून नाही ठेवल्या! :-(

पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागापेक्षाही जास्त पटींनी तरंगलांबी ग्रहण करतो.

शब्दांत किंचित गडबड आहे, पण ते सगळं शिकल्याशिवाय लक्षात ठेवण्याची अपेक्षाही नाही. प्रश्न मला समजला.

पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन सलग नसलेल्या, एकापेक्षा जास्त अँटेना वापरून, ३० किमी व्यास असणारी एकसंध दुर्बीण आहे असं वापरता येतं. (हे वाक्यही फार बरं दिसत नाहीये, पण) आकृत्या वगैरे शोधून, सविस्तर उत्तर लिहीते. त्याला थोडा वेळ लागेल.

भाते's picture

30 Jan 2014 - 12:31 pm | भाते

इतका सुरेख धागा पुन्हा वरती काढल्यापद्धल.

किचकट विषयांचे आंजावरील लेख बहुतेक वेळा इंग्रजीत असल्याने समजायला कठीण असतात. पण तेच सहज सोप्या मराठीत वाचल्यावर त्यातुन बरीच माहिती मिळते.

धन्यवाद आदिती. छान लिहिले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते श्रेय बहुगुणीं यांचे. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयुका वेधशाळा - गिरवली या मोदक यांच्या लेखाच्या प्रतिसादात या धाग्याचा संदर्भ दिला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2014 - 3:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'स्वॅप्स'च्या प्रश्नाबद्दल -

मला चांगले फोटो चटकन सापडले नाहीत, त्यामुळे शब्दातच मांडायचा प्रयत्न करते.

त्याचा प्रश्न असा आहे की या दुर्बिणी ३० किमी अंतरावर पसरलेल्या आहेत. म्हणजे दोन स्वतंत्र अँटेनांमधलं अंतर जास्तीतजास्त ३० किमी आहे. या परिसरात एकूण ३० दुर्बिणी आहेत. त्यात पृथ्वीच्या परिवलनाचा (स्वतःभोवती फिरणं) फायदा घेऊन जास्तीतजास्त फायदा कसा होतो?

याचं उत्तर असं -

समजा आपल्या डोक्यावर एक वस्तू तरंगती ठेवली. आपल्याला या वस्तूच्या बुडाकडचाच भाग दिसेल; पण तिच्या बाजूला काय आहे हे दिसणार नाही. मग आपण आपली खुर्ची थोडी सरकवून एका बाजूला घेतली, तर कडेचा थोडा आणि बुडाचा थोडा भाग दिसेल. पृथ्वीच्या परिवलनामुळे अगदी हेच होतं. खुर्ची सरकवण्याऐवजी पृथ्वी हलते, त्यामुळे दुर्बीणींची आकाशातल्या ठराविक वस्तूकडे बघण्याची दिशा बदलते.

समजा आपण पृथ्वीपासून लांब अंतरावर आहोत. आणि लांबून या दुर्बीणीकडे पाहिलं, तर दुर्बीणी एका ठराविक ठिकाणी दिसतील. मग पुन्हा थोड्या वेळाने पाहिलं तर त्यांचं configuration तेच दिसेल. पण जागा हललेली असेल. एकूण ३० किमी व्यासाच्या परीघात ३० दुर्बिणी तशाच राहिल्या, पण त्यांची या वर्तुळातली जागा बदलली. त्यातून एकसंध, ३० किमी व्यासाची दुर्बीण वापरल्याचा परिणाम साधता येतो.

खालचं चित्र पहा, यात एक सेकंद दुर्बीण वापरली तर एका अँटेनाचा एक असे तीस ठिपके दिसतील. पृथ्वीच्या परिवलनामुळे अँटेनांची जागा बदलते, आणि सलग काही तासांनंतर पाहिलं तर सगळे ठिपके मिळून चित्र भरायला लागतं.

rnityananda

ही चार चित्रं निरनिराळी दिसतात, ती बघण्याच्या दिशेमुळे. बऱ्यापैकी उत्तरेला असणारी वस्तू बघितली जात असेल तर वरची दोन चित्रं योग्य आहेत. दुर्बीण खूपच क्षितीजाजवळच्या वस्तूकडे पाहत असेल तर तिसरं/चौथं चित्र बनेल. (दुर्दैवाने या प्रतिमेमधे कोणती वस्तू आणि तिचं आकाशातलं स्थान नीट वाचता येत नाहीये.)

ते चित्र जेवढं काळं तेवढं प्रतिमा बनवण्यासाठी जास्त विदा गोळा झालेला असतो.

एस's picture

4 Feb 2014 - 10:11 pm | एस

फारच छान माहिती. या दुर्बिणीच्या विशिष्ट आकारामुळे जास्तीत जास्त परिक्षेत्रावरील प्रारणे ग्रहण करणे आणि संवेदनशील अ‍ॅन्टेनांमुळे उच्च दर्जाची कोनीय पृथक्करणक्षमता असणे ह्या दोन बाबी खगोलनिरीक्षकांसाठी फारच उपयुक्त ठरतात. दुर्बिणीचा आकार आणि पृथ्वीचे परिवलन यामुळे एकाच २५ किमी व्यासाच्या दुर्बिणीइतकीच क्षमता जीएमआरटीला प्राप्त झाली आहे. खासकरून तू धुंडाळून आणलेल्या ह्या आकृत्या ही बाब छानपैकी स्पष्ट करतात. त्याबद्दल विशेष आभार.

वादाबद्दल मला वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे जीएमआरटीचे स्थान कुठे असावे यावरून नाही, तर जीएमआरटीचा वापर पृथ्वीव्यतिरिक्तच्या अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेचा मागोवा घेण्यासाठी करावा की नाही अशा स्वरूपाचा वाद होता. त्यामागील भूमिका महत्त्वाच्या, भूमिकांचे पुरस्कर्ते कुणी का असेनात. असो.

(अवांतर - याच वादाची फोडणी स्वतःच्या मसाल्यात घालून मनू जोसेफ यांनी लिहिलेली "सिरिअस मेन" ही उपहासात्मक विनोदी कादंबरी कदाचित कुणाला वाचायला आवडेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Feb 2014 - 12:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जीएमआरटीचा वापर पृथ्वीव्यतिरिक्तच्या अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेचा मागोवा घेण्यासाठी करावा की नाही अशा स्वरूपाचा वाद होता.

मग मला हे "गॉसिप" अजिबातच माहित नाही. (याबद्दल आमच्या गप्पा, मित्रांची टांग खेचणं इतपतच मर्यादित असायच्या.)

जीएमआरटीमधून पीएच.डी. करणारा माझा एक मित्र 'सेटी' (Search for Extra-Terrestrial Intelligence) वर काम करत होता. अर्थातच त्याला त्यापैकी उल्लेखनीय काही सापडलं नाही, पण 'सेटीवर काम करणारा एकमेव भारतीय वैज्ञानिक' अशा शीर्षकाचा, त्याच्या कामाबद्दल असणारा लेख 'टाईम्स अॉफ इंडिया'त छापून आला होता. (बाकीचं त्याचं काम पल्सार्सबद्दल आहे, आणि व्यक्तिशः मला ते जास्त रोचक वाटतं.) या कादंबरीबद्दल त्यालाही सांगितलं पाहिजे.

खोडदच्या दुर्बिणीवरील अजून एक लेख :

http://www.maayboli.com/node/2337

मी अद्यापही डॉ.स्वरुपांबरोबर एका सामाजीक प्रकल्पासाठी कार्यरत आहे. त्याबद्दल लवकरच लिहीतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2014 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर लिहा. वाचायला नक्की आवडेल.

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Feb 2014 - 9:43 pm | भ ट क्या खे ड वा ला

एका अवघड विषयाची सोप्या शब्दात ओळख
अजून येउदे ,
कोणी ४ तारे नक्षत्र सांगणारा कधी तरी एखाद्या गडावर भेटतो ,तेव्हा तो काय सांगेल आणि त्यातील काय लक्षात राहील तेव्हढीच या विषयाशी ओळख आहे
डॉक्टर स्वरूप यांच्या बद्द्ल हि लिहा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2014 - 9:42 am | कैलासवासी सोन्याबापु

जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह लेंग्थ" श्रेणीतली जगातली सर्वात मोठी अन आधुनिक दुर्बिण असल्याचे वाचले होते, हे खरे आहे का ?

अशी एक अभिमानास्पद गोष्ट आहे भारतीयांसाठी ती म्हणजे " द हानले ऑब्झर्व्हेटरी, लडाख , जमु कश्मीर, भारत"
ही एक ऑप्टीकल दुर्बीण आहे जी पुर्ण पणे रीमोट ऑपरेटेड आहे, तिथे फक्त १५ दिवसातुन एकदा लोकल लडाखी स्टाफ मेंटेनेन्स च्या कामाला जातो, धुळविरहीत वातावरण अन कोल्ड डेझर्ट च्या वातावरणामुळे हानले स्थापन करण्यात आली, तिचे नियंत्रण चक्क कर्नाटकातल्या "हासन" इथल्या मास्टर कंट्रोल फॅसीलिटी (एम सी एफ) मधुन होते

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2014 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा ! खरंच अभिमानास्पद आणि आश्चर्यकारक माहिती !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2014 - 4:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह लेंग्थ" श्रेणीतली जगातली सर्वात मोठी अन आधुनिक दुर्बिण असल्याचे वाचले होते, हे खरे आहे का ?

आता हे फारसं खरं नाही. GMRT चा विकास सुरू झाला या गोष्टीला आता दोन दशकं लोटली आहेत. मधल्या काळात दुर्बिणीवर काही काम केलंच नाही असं नाही; पण जुन्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी अद्ययावत ठेवण्यापेक्षा कधीकधी पूर्ण नवीन गोष्टच बनवणं सोपं पडतं. या दशकाच्या सुरूवातीला, नेदरलंड्समधे LOFAR नावाची नवीन दुर्बिण सुरू झाली; ती GMRT पेक्षा अधिक अद्ययावत आणि मोठी आहे. त्यांचा सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विदागाराचा. एका observation run मधे जमा होणारा विदा साठवून, तो जगात जिथे कुठे संशोधक बसला असेल तिथे पाठवणं तापदायक होतं आहे. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या विदेतून वापरण्यास योग्य अशा प्रतिमा मिळवण्यात automation सुरू केलं आहे. GMRT मधे अशी एक प्रतिमा बनवायला, वेळेस दोन-दोन आठवडे (आणि बरीच mental sanity) जाते.

१९७० च्या दशकात बनवलेली VLA नामक अमेरिकन दुर्बीण आता कात टाकते आहे आणि ती सुद्धा अद्ययावत होत आहे. GMRT अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे; हे प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा ती बरीच जास्त कालसुसंगत होईल.

पण आहे तीच GMRT वापरून तीन वर्ष, पूर्ण आकाशाचा सर्व्हे करण्याची निरीक्षणं पूर्ण होत आहेत. यासाठी आवश्यक असणारी ढोरमेहेनेत पूर्ण होईल तेव्हा GMRT ची पत बरीच जास्त वाढेल, अशी आशा मला वाटते.

---

हानलेची जी दुर्बिण आहे ती अवरक्त प्रकाशात काम करते; अधिकतर त्यात. पण ही दुर्बिण एकमेवाद्वितीय वगैरे नाही. हिचा आकार बराच लहान आहे, त्यातून फार काही पथप्रदर्शी, नवीन विज्ञान-संशोधन होत नाही; पण भारतीय खगोल-संशोधकांच्या पिढीला शिक्षणासाठी याचा बराच उपयोग आहे. गोविंद स्वरूपांनी त्यांच्या वयाच्या तिशीत दुर्बिणी बांधायला सुरूवात केली तेव्हा साठीत आल्यावर GMRT बनवण्याची ताकद अभियंत्यांमधे आणि वापरण्याची ताकद खगोलसंशोधकांमधे आली.

बहुतांश दुर्बिणी लांबूनच चालवल्या जातात; प्रत्यक्ष दुर्बिणीपाशी बसून काम करण्याचं प्रमाण आता, जगभरच बरंच कमी होत आहे. त्यात भारत आणि भारतीय दुर्बिणीही आल्याच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2014 - 4:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. "ढोरमेहेनेत" हा शब्द ढोरमेहेनत असा वाचावा.

२. रेडीओ दुर्बिणीच्या आकारामुळे जेवढी देखभाल करावी लागते, तेवढे कष्ट दृष्य आणि अवरक्त दुर्बिणींसाठी होत नसावा, असा अंदाज. पण मी कधीही दृष्य/अवरक्त दुर्बिणी असतात अशा संस्थेत काम केलं नाही, त्यामुळे हा फक्त अंदाजच.

गोविंद स्वरूप सारखे वैज्ञानिक आपलं मत देतात परंतु एकदा सरकारी निर्णय झाला की त्यानंतर मात्र त्याविषयी बोलणार नाहीत .
खोडद का भोपाळ अथवा इतर काही तांत्रिक मुद्दयांची चर्चा आता पुन्हा उकरून काढणार नाहीत असं मला वाटतं . त्यामुळे तो वाद काय होता हे गौण झाले आहे असे मानू .

एस's picture

26 Jun 2014 - 6:04 pm | एस

ही बातमी वाचली आणि हा धागा आठवला.

http://timesofindia.indiatimes.com/india/ECILs-giant-telescope-to-be-tra...

Similar telescopes set up in Namibia, Europe and US have been realized by collaborative efforts of multiple institutions, whereas, the present MACE Telescope has been designed and realized from conceptual stage to trial assembly stage by ECIL, Hyderabad with technology support from BARC

जगातली दुसर्‍या क्रमांकाची गॅमा किरण दुर्बिण लडाखला बसवताहेत. भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

आयुर्हित's picture

31 Mar 2015 - 1:06 pm | आयुर्हित

ताऱ्याचा अंत झाल्यावर त्यातून 'पल्सार' हा स्वत:भोवती वेगाने फिरणारा घटक निर्माण होतो.. हा खगोलशास्त्रीय सिद्धांत शास्त्रज्ञांना ठाऊक आहे. पण पल्सारची निर्मिती होताना ती प्रत्यक्ष टिपण्याची अतिशय दुर्मीळ कामगिरी भारतीय दुर्बीण, संस्था आणि शास्त्रज्ञांच्या पथकाने करून दाखवली आहे.. पृथ्वीपासून तब्बल ४५०० प्रकाश वर्षे दूरवर असेलेल्या पल्सारची निर्मिती सुरू आहे. ती या पथकाने पुणे जिल्ह्य़ातील खोडद येथील 'जाएंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप' (जीएमआरटी) या दुर्बिणीतून टिपली आहे.

जगात यापूर्वी केवळ दोन वेळा अशी घटना टिपण्यात यश आले होते. आताच्या घटनेचे वैशिष्टय़ असे की, ती भारतीय महादुर्बीण, भारतीय संस्था आणि भारतीय शास्त्रज्ञांनी टिपली आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेचे डॉ. जयंत रॉय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. त्यात याच संस्थेचे प्रो. जयराम चेंगालूर, ब्रिटनमधील डॉ. बेन स्ट्रापर्स, अमेरिकेतील डॉ. पॉल रे, डॉ. भासवती भट्टाचार्य यांचाही समावेश आहे.

'पल्सार' म्हणजे स्वत:भोवती अतिशय वेगाने फिरणारा खगोलीय घटक. ताऱ्याचा अंत झाल्यानंतर त्यांची निर्मिती होते. ते ताऱ्याचीच ऊर्जा वापरून गती प्राप्त करतात. खोडद येथील महादुर्बिणीतून निरीक्षण करत असताना या शास्त्रज्ञांना ४५०० प्रकाशवर्ष दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापासून पल्सारची निर्मिती होत असलेली दिसली. ही निर्मितीची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू झाली असून, ती पुढे काही वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे.

palsar450 ताऱ्यातून ऊर्जा मिळवून स्वत:ची गती वाढवणाऱ्या 'पल्सार'चे चित्र. प्रचंड वेगाने फिरणाऱ्या (मध्ये चमकणाऱ्या) पल्सारपासून रेडिओ बीम व प्रचंड ऊर्जा असलेले वारे निर्माण होत आहेत. ते शेजारच्या ताऱ्याला (उजवीकडील) नष्ट करत आहेत.(सौजन्य- 'नासा'चे गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर)

फोटो पाहण्यासाठी पहा लोकसत्ता: भारतीय दुर्बीण अन् शास्त्रज्ञांनी विश्वातील अद्भुत घटना टिपली