'मिसळपाव' उघडलं आणि केशवसुमाराचे विडंबन नाही असे दिवस माझे तरी फार थोडे गेले. पान उघडल्यावर 'काव्या'च्या विभागात केसुशेठचे एखादे फर्मास विडंबन वाचायचे आणि पुढच्या उद्योगाला लागायचे हा माझा शिरस्ताच झाला होता म्हणा ना.
परवा केसु ने निवृत्तीची घोषणा केली आणि विनंत्या, आर्जवे, कविता, विडंबने, प्रतिविडंबने यांचा पाऊस पडला.
केसु आणि निवृत्त? असं काय झालं? मलाही थोडे बावचळल्यासारखे झालं खरं आणि मी ही एक विडंबन करण्यास उद्युक्त झालो. काही लोकांनी त्याच्या ह्या निर्णयाबद्दल खुषीही व्यक्त केली त्याची काव्यप्रतिभा आता मोकळी होईल अशा शुभेच्छाही दिल्या.
व्यक्तिशः मला काय वाटलं ते सांगायला खरं तर मी हे लिहायला बसलो आहे. माझी अवस्था एका डोळ्यात आसू आणि दुसर्यात हसू अशी झाली.
आसू अशाकरता की सहाजिकच एका विलक्षण प्रतिभावंत विडंबकाच्या काव्यकृतींना आपण मुकणार हे नक्की झाले. केसुशेठसारख्या प्रतिभावंताला हा निर्णय घेताना काय यातना झाल्या असतील ह्याचा एक लुडबुड्या विडंबक म्हणून मला थोडाफार अंदाज येऊ शकतो!
आणि हसू अशाकरता की रसिकांची वाहवा मिळत असतानाच, सेंचुरी मागून सेंचुरी सुरु असतानाच निवृत्त व्हायला फार धैर्य लागतं ते केसुशेठने दाखवलं, प्रसिद्धीच्या मोहाला, टाळ्यांना न भुलता त्याने त्याला जो निर्णय त्याच्या मनाशी प्रामाणिक वाटला तो घेतला. मला त्याबद्दल त्याचं कौतुक वाटतं! शिवाय तो 'अनिरुद्ध अभ्यंकरच्या' वेशातून उत्तमोत्तम गझला द्यायला समर्थ आहेच त्यामुळे आपण सर्वस्वी त्याच्या प्रतिभेला मुकणार नाही हे ही नक्की आहे.
विडंबन हे एका दुधारी शस्त्रासारखे आहे असं मला वाटतं!
एका बाजूला विडंबन ही एक कला असली तिचं स्वतंत्र अस्तित्त्व मूळ कलाकृती शिवाय नाही असा आक्षेप घेतला जातो. विडंबनाचे काम हे दुय्यम दर्जाच्या प्रतिभेचे आहे असेही काही जणांना वाटत असेल. मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. उत्तम कलाकृतीतून तितकेच किंवा कधीकधी मूळ कृतीहून सरस विडंबन घडलेले आपण बघतो तेव्हा हे पटते. मुळात चांगली काव्यप्रतिभा असणे हा अत्यावश्यक घटक आहे. लय, ताल, मीटर, चपखल शब्द निवडणे आणि त्यांचा तोल सांभाळणे, ह्या सगळ्याची एक उपजत आणि नंतर अभ्यासाने कमावलेली जाण असणे अत्यंत गरजेचे आहे. कच्चा माल निवडतानाची एक पारखी नजर असली तर आत हिरा कोठे दडलेला आहे तो नेमका बाहेर काढणे जमते!
त्याचवेळी दुसर्या बाजूला विडंबन हे एखाद्या व्यसनासारखे आहे. एकदा त्याची चटक लागली की मानवी रक्ताची चटक लागलेल्या वाघासारखी अवस्था होते! दिसली कविता की घाल चरकात, ऐकले गाणे की वळ कडबोळे! ;) डिसलेक्शिया असलेल्या व्यक्तीसारखे शब्द नाचायलाच लागतात डोळ्यांसमोर आणि वेगवेगळ्या कल्पना डोक्यात पिंगा घालायला लागतात. अवस्था वेड्यासारखी होते. ते विडंबन कधी एकदा पूर्ण करतो आहे असे होऊन जाते. त्याला रसिकांच्या वाहवाने तर आणखीनच उधाण येते. झिंग चढते. पुढचे कधी? कच्चा माल कुठे? शोध संपत नाही, उसंत मिळत नाही. टीका झाली की कुठेतरी वाईटही वाटते. वाटतं आता 'एकच कविता' मग पुरे, मग नंतर करणार नाही पण तसं घडत नाही नवीन काहीतरी डोळ्यांसमोर येतेच आणि नव्या जोमाने तो 'एकच प्याला' तोंडाला लावला जातोच!
वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत सचिनने सेंचुर्या मारतच रहाव्यात असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे पण एक अनुभवी, प्रगल्भ खेळाडू म्हणून कुठे आणि कधी थांबायचे ह्याबद्दलचा व्यक्तिगत निर्णय आपण एक चाहते म्हणून सन्मानानेच घेऊ, कितीही दु:ख झाले तरी! तसेच माझे झाले आहे. मला आत कुठेतरी एक अतीव समाधान आहे की केशवसुमार ह्या दुष्टचक्राचा भेद करून यशस्वीरीत्या बाहेर आला. आणि त्याच्या ह्या निवृत्तीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो आहे, कितीही दु:ख झाले तरी!
चतुरंग
प्रतिक्रिया
24 Jul 2008 - 12:02 am | llपुण्याचे पेशवेll
चतुरंगराव सुंदर विचार मांडले आहेत आपण. +१च नव्हे तर +१०००.
केसुशेठच्या पुढच्या गझलांच्या प्रतिक्षेत.
पुण्याचे पेशवे
24 Jul 2008 - 12:39 am | धनंजय
विडंबन लिहिणार्याची काव्यप्रतिभा म्हणजे उत्तम लोणचे करायच्या पाककौशल्यासारखी आहे.
सामग्री जोडून एकत्र करण्याचे रसकौशल्य तर आहेच. आस्वादसुख तर अप्रतिम. चटक लागते.
हे लक्षात येते : नुसत्या वरणभाताने, किंवा नुसत्या बिर्याणीने, किंवा नुसत्या फलाहाराने पोषण होऊन जेवण करता येते. लोणच्याची चटक लागली म्हणून जेवणात बरणीभर लोणचेच खाता येत नाही.
त्याच प्रकारे बाकी सर्व प्रकारचे साहित्यप्रकार एकनिष्ठपणे हाताळणारे साहित्यिक आपल्याला आढळतात - कवी, लघुकथाकार, कादंबरीकार. टिकाऊ साहित्यिकांमध्ये १००% विडंबनकार क्वचितच आढळतील. बाकीची सकस साहित्यनिर्मिती करता-करता चविष्ट विडंबनेही रचणारे त्या मानाने अधिक आढळतील.
24 Jul 2008 - 12:53 am | प्राजु
तुम्ही दिलेले लोणच्याचे उदाहरण उत्तम आहे.
विडंबने लिहिण्यात केसुंचा हात कोणीही धरू शकणार नाही याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या गझलाही अतिशय सुंदर असतात. गझल कशी लिहावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल मी बोलणे म्हणजे .... जाऊदे. मी त्यांना गुरूस्थानी मानते.. कारण त्यांच्या उत्तेजनामुळे मी गझल नावाचा प्रकार लिहिण्याचा प्रयत्न करते आहे (ते अजून तरी जमलेलं नाही हा भाग वेगळा) .
मी केसुंना अशी विनंती वजा आग्रह करेन की, पूर्ण निवृत्ती न घेता लोणच्याच्या चवीप्रमाणे अधून मधून एखादा जिभ जागी करणारा झटका येऊद्यावा.
चतुरंग आपणजे विचार मांडले आहेत ते ही आवडले.
केसु.. आपण विचार करावा ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jul 2008 - 6:18 am | टिउ
मी आज सकाळपासुन तिसर्यांदा 'केशकर्तनालय बंद होते तेव्हा' असं वाचलं!
केशवसुमारांचा विषय असला की नीट काही वाचताच येत नाही!
बाकी प्राजु यांच्या प्रतिसादाशी सहमत...
24 Jul 2008 - 7:36 am | सहज
विडंबन अजिबातच करुच नये असे नक्की सांगीतले तरी कोणी केशवसुमार यांना?
कमी वेळा लिहा पण अजिबातच लिहायचे नाही हे काही पटत नाही.
परत एकदा केसुंना विनंती आहे की मायकेल जॉर्डन आदी निवृत्त झालेले दिग्गज परत येउन पुन्हा जगज्जेते झाले आहेत.
केसुंच्या पुनरागनमाच्या अपेक्षेत. :<
24 Jul 2008 - 5:58 pm | विसोबा खेचर
शिवाय तो 'अनिरुद्ध अभ्यंकरच्या' वेशातून उत्तमोत्तम गझला द्यायला समर्थ आहेच त्यामुळे आपण सर्वस्वी त्याच्या प्रतिभेला मुकणार नाही हे ही नक्की आहे.
सहमत...
मला आत कुठेतरी एक अतीव समाधान आहे की केशवसुमार ह्या दुष्टचक्राचा भेद करून यशस्वीरीत्या बाहेर आला. आणि त्याच्या ह्या निवृत्तीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो आहे, कितीही दु:ख झाले तरी!
मीही स्वागतच करतो, परंतु मला विशेष दु:ख झालेले नाही. कधी कुठे एखाददा जबरा कच्चा माल मिळाला की विडंबनही करायला हरकत नाही. परंतु या परप्रकाशी काव्यप्रकाराच्या रंगा म्हणतो तश्या दुष्टचक्रात अडकून केसूने सतत विडंबनंच करत रहावीत आणि त्यामुळे त्याच्यातल्या एका उत्तम कवीची अभिव्यक्ति सतत दडपून जावी असं मला तरी वाटत नाही! मी त्याच्या उत्तमोत्म कविता वाचायला उत्सुक आहे, नव्हे मला ते अतिशय आवडेल! असो.
केसूच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागतच करतो...!
आपला,
(केसूच्या कवितांचा चाहता) तात्या.
24 Jul 2008 - 11:28 pm | बेसनलाडू
तात्यंसारखेच म्हणतो.
(सहमत)बेसनलाडू
नुकतीच केसुशेठने त्यांची नवीकोरी गझल ऐकवली आणि कसे अगदी तृप्त वाटले. त्यांच्याकडून असेच खणखणीत काव्य प्रसवले जावो,ही सदिच्छा.
(चाहता)बेसनलाडू