लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
29 Jan 2014 - 10:54 am

यापूर्वीचे लेखनः लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १

प्रश्न क्रमांक ५

अलाहाबाद (उत्तर प्रदेश), बिकानेर (राजस्थान), चेन्नई दक्षिण (तामिळनाडू), मुंबई उत्तर (महाराष्ट्र), गुरदासपूर (पंजाब), नवी दिल्ली (दिल्ली), पाटणा साहिब (बिहार), आग्रा, फिरोझाबाद आणि रामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांना जोडणारा समान दुवा कोणता?

अ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेचे आजी/माजी अध्यक्ष कधीतरी निवडून गेले आहेत.
ब. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून भारताचे आजी/माजी गृहमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
क. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी मुख्यमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
ड. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.
इ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून क्रिडाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.

उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार २ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Jan 2014 - 7:55 pm | पैसा

सोपं आहे असं वाटतंय. व्यनि करीन.

आशु जोग's picture

31 Jan 2014 - 11:00 pm | आशु जोग

निरोप पाठवला आहे

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2014 - 11:24 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या वेळच्या प्रश्नांपेक्षा माझ्यासाठी हा प्रश्न बराच सोपा होता.

उत्तर व्य. सं. द्वारे पाठवले आहे.

अमोल केळकर's picture

1 Feb 2014 - 10:21 am | अमोल केळकर

वा छान संकल्पना :)

अमोल केळकर

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Feb 2014 - 2:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

उत्तर पाठवले आहे.

उत्तर माहिती नाही, त्यामुळे निकालाची वाट पाहते.
'राजकीय माहिती-जागरुकता' वाढवायला मला या धागामालिकेचा उपयोग होईल.

विअर्ड विक्स's picture

1 Feb 2014 - 2:44 pm | विअर्ड विक्स

धागा वर आणल्याबद्दल आभार सर्वांचे ...... बुधवारपासून हुडकत होतो धागा मिळताच नव्हता ......
व्यनि केला आहे.... हुश्श या परीक्षेसाठी ज्यादा अभ्यास करावा लागला नाही ...;)

चौकटराजा's picture

1 Feb 2014 - 4:56 pm | चौकटराजा

ज्यावेळी सात सात वेळा लागोपाठ लोकसभेवर काही जण निवडून येतात. त्यावेळी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असते.
कारण एक तर इतक्या वेळा तिकिट मिळविणे व त्यातून बदत्या राजकीय वार्‍याना न जुमानता विजेता होणे हे खरेच विसमयकारक असते. काही वेळा असा पॅटर्न ही दिसतो की खेळाडू कलावंत ही पुन्हा निवडून येतात. हे सगळे आपल्याला
समजते कारण अशा प्रवाहांचा वेध घेणे हे तर या प्रश्न मालिकेचे उद्दीष्ट आहे.

प्यारे१'s picture

1 Feb 2014 - 5:42 pm | प्यारे१

>>>उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार २ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.

चौरा काकांनी एक्झिट पोल रिझल्ट जाहीर केले.

चौकटराजा's picture

2 Feb 2014 - 7:27 am | चौकटराजा

यात उत्तर नाही. हे एक सर्वसाधारण निरिक्षण आहे. उत्तर व्यनिवरच पाठवलेय !

क्लिंटन's picture

2 Feb 2014 - 11:04 am | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.या प्रश्नमंजुषेचा थोडातरी उपयोग होत आहे हे वाचून बरे वाटले.

या प्रश्नाचे उत्तर (ड): या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.

ड. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.

अलाहाबाद (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९८४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला.

बिकानेर (राजस्थान) लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून २००४ धर्मेंद्र निवडून गेले.

चेन्नई दक्षिण (तामिळनाडू) लोकसभा मतदारसंघातून १९८४ आणि १९८९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून वैजयंतीमाला निवडून गेल्या.

मुंबई उत्तर (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून गोविंदाने केंद्रिय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला.

गुरदासपूर (पंजाब) लोकसभा मतदारसंघातून १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून विनोद खन्ना निवडून गेले.

नवी दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी निवडून गेले होते.त्यांनी त्याच निवडणुकांमध्ये गांधीनगर (गुजरात) लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळविला होता.अडवाणींनी गांधीनगर मतदारसंघ स्वतःकडे ठेऊन नवी दिल्ली मतदारसंघाचा राजीनामा दिला.तिथे नोव्हेंबर १९९१ मध्ये पोटनिवडणुक होणार होती.पण मुकेश कुमार गर्ग या अपक्ष उमेदवाराच्या निधनामुळे ती पोटनिवडणुक पुढे ढकलण्यात आली.पोटनिवडणुक पुढे जून १९९२ मध्ये झाली आणि त्यात काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजेश खन्नांनी भाजपच्या शत्रुघ्न सिन्हांचा पराभव केला.

आग्रा (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून राज बब्बर निवडून गेले. नंतरच्या काळात राज बब्बर यांचे समाजवादी पक्षाशी वितुष्ट आले आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले.२००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून कन्नोज आणि फिरोजाबाद (दोन्ही उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळवला.त्यापैकी त्यांनी कन्नोजची जागा स्वतःकडे ठेवली आणि फिरोजाबादचा राजीनामा दिला.तिथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज बब्बर यांनी अखिलेश यादवची पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला.

रामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघामधून समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून २००४ आणि २००९ मध्ये जयाप्रदा निवडून गेल्या.

तसेच या यादीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघाचा अंतर्भाव नाही.त्या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९८४,१९८९,१९९१,१९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुनील दत्त निवडून गेले.

या प्रश्नाचे उत्तर राहुलव्हीजी,जेपी,अनन्त अवधुत,राघव८२,श्रीगुरूजी,आशु जोग,चौकटराजा, ज्ञानोबाचे पैजार, विअर्ड विक्स,पैलवान आणि श्रीरंग जोशी या अकरा मिपाकरांनी बरोबर पाठवले.ज्या मिपाकरांनी उत्तर पाठवले त्या सगळ्यांचे उत्तर बरोबर होते.

पुढील प्रश्न बुधवार ५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करणार आहे.

क्लिंटन's picture

2 Feb 2014 - 11:29 am | क्लिंटन

पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून शत्रुघ्न सिन्हा निवडून गेले.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लालकृष्ण अडवाणींना काँग्रेसच्या राजेश खन्ना यांनी जोरदार टक्कर दिली होती.त्यावेळी मतमोजणी हाताने होत असल्यामुळे मतमोजणीच्या अनेक फेर्‍या होऊन निकाल यायला दुसर्‍या दिवशीची संध्याकाळ उजाडे.निवडणुकांची मतमोजणी १६ जून १९९१ रोजी सुरू झाली होती आणि त्या दिवशी रात्री राजेश खन्नांनी अडवाणींवर सुमारे दीड हजार मतांची आघाडी घेतली अशी बातमी आली होती.नंतरच्या मतमोजणीच्या फेर्‍यांमध्येही अडवाणींना राजेश खन्नांनी जोरदार टक्कर दिली.दिल्लीमधील लाजपतनगर आणि जवळच्या भागांमधून अडवाणींना चांगल्यापैकी आघाडी मिळाली आणि शेवटी अडवाणी ती निवडणुक दोन-अडीच हजारांनी जिंकले.१९९० च्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर सहा-आठ महिन्यातच दिल्लीमधून अडवाणींचा पराभव झाला असता तर तो पक्षाला मोठा धक्का बसला असता. नवी दिल्लीत मतदान २० मे १९९१ रोजी झाले होते.२१ तारखेला राजीव गांधींची हत्या झाली.२० तारखेला रात्री बातम्यांमध्ये राजीव, सोनिया आणि राहुल गांधींनी मतदान केल्याची बातमी आली होती हे बघितल्याचे आठवते. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर झालेल्या दोन टप्प्यांमध्ये काँग्रेस पक्षाला मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त चांगले यश मिळाले होते.नवी दिल्लीमध्ये २० तारखेलाच मतदान झाल्यामुळे अडवाणी बचावले असे म्हणायला हवे.

क्लिंटन's picture

5 Feb 2014 - 12:10 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ६

अमरोहा आणि मोरादाबाद (उत्तर प्रदेश), अमृतसर (पंजाब),महेंद्रगड आणि गुरगाव (हरियाणा), दरभंगा (बिहार) आणि बेतुल (मध्य प्रदेश) या लोकसभा मतदारसंघांना जोडणारा समान दुवा कोणता?

अ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेचे आजी/माजी अध्यक्ष कधीतरी निवडून गेले आहेत.
ब. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून भारताचे आजी/माजी गृहमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
क. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी मुख्यमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
ड. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.
इ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून क्रिडाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.

उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. या विकांताला बाहेरगावी जाणार आहे. फोनवरून मिपा बघेनच पण फोनवरून प्रश्नाचे उत्तर देणे किंवा व्य.नि ला उत्तर देता येणार नाही.तेव्हा या प्रश्नाचे उत्तर सोमवार १० फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

10 Feb 2014 - 1:29 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ६ चे बरोबर उत्तर आहे इ: या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून क्रिडाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.

अमरोहा (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९१ आणि १९९८ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून क्रिकेटपटू चेतन चौहान लोकसभेवर निवडून गेले.

मोरादाबाद (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून क्रिकेटपटू महंमद अझरूद्दिन निवडून गेले.

अमृतसर (पंजाब) लोकसभा मतदारसंघातून २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तसेच २००७ च्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू निवडून गेले.

महेन्द्रगढ (हरियाणा) लोकसभा मतदारसंघातून राव इंदरजीत सिंग १९९८ आणि २००४ मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेले.हा मतदारसंघ मतदारसंघांच्या पुनर्रचनेत भिवानी-महेन्द्रगड असा झाला.२००९ मध्ये गुरगाव (हरियाणा) मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणूनच राव इंदरजीत सिंग लोकसभेवर निवडून गेले.त्यांनी राष्ट्रकूल खेळांमध्ये भारताचे शुटिंगमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

दरभंगा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून क्रिकेटपटू किर्ती आझाद निवडून गेले.

बेतुल (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून हॉकीपटू अस्लम शेरखान निवडून गेले.

या प्रश्नाचे उत्तर एकूण ४ मिपाकरांनी पाठवले.त्यापैकी जेपी, अनन्त अवधुत आणि ज्ञानोबाचे पैजार या मिपाकरांचे उत्तर बरोबर होते.

पुढील प्रश्न बुधवार १२ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करेन.

राघवेंद्र's picture

12 Feb 2014 - 3:03 am | राघवेंद्र

हा धागा कायम पहिल्या पानावर राहण्यासाठी काही करता येईल काय ?
प्रश्न क्रं ६ पहायचा राहुन गेला.

अनन्त अवधुत's picture

12 Feb 2014 - 5:28 am | अनन्त अवधुत

बुधवारी प्रश्नासाठी आणि रविवारी उत्तरासाठी पाहत चला

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2014 - 2:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

व्य. नि. केल्या गेला आहे

क्लिंटन's picture

12 Feb 2014 - 12:48 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ७

बारपेटा (आसाम), होशियारपूर (पंजाब), नंद्याल (आंध्र प्रदेश) आणि जांगीपूर (पश्चिम बंगाल) या चार लोकसभा मतदारसंघांना जोडणारा समान दुवा कोणता?

अ. या चार मतदारसंघांचे त्या राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व गेले होते.
ब. या चार मतदारसंघांचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक लढवली.
क. या मतदारसंघांचे लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.
ड. या मतदारसंघांचे भारताच्या विद्यमान गृहमंत्र्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.
इ. या मतदारसंघांचे लोकसभेच्या विद्यमान उपाध्यक्षांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.

प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार १६ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

16 Feb 2014 - 12:10 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ७ चे बरोबर उत्तर आहे ब: या चार मतदारसंघांचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक लढवली.

बारपेटा (आसाम) लोकसभा मतदारसंघातून १९७१ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून फक्रुद्दिन अली अहमद निवडून गेले. त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन १९७४ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली.

होशियारपूर (पंजाब) लोकसभा मतदारसंघातून १९८० मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून ग्यानी झैलसिंग निवडून गेले.त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन १९८२ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली.

नंद्याल (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून नीलम संजीव रेड्डी १९६७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर १९७७ मध्ये भारतीय लोकदलाचे (जनता पक्षाचे) उमेदवार म्हणून निवडून गेले.ते १९६७ आणि १९७७ या दोन्ही वेळा लोकसभेचे अध्यक्ष होते.दोन्ही वेळा त्यांनी लोकसभा अध्यक्षपद आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली--१९६९ मध्ये त्यांचा पराभव झाला तर १९७७ मध्ये ते राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवडून गेले. १९६९ मधील राष्ट्रपतीपदाची निवडणुक इंदिरा गांधींच्या राजकिय भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची होती.इंदिरा गांधींच्या गटाने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार्‍या उपराष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी यांना पाठिंबा दिला आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या नीलम संजीव रेड्डींचा पराभव केला.नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसमधील इंदिरा गांधींना विरोध असलेल्या गटाने (सिंडिकेटने) उभे केलेले उमेदवार होते.

जांगीपूर (पश्चिम बंगाल) लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी निवडून गेले. त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली.

या प्रश्नाचे उत्तर राहुलव्हीजी, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स आणि जेपी यांनी बरोबर पाठवले.

पुढील प्रश्न बुधवार १९ फेब्रुवारी रोजी जाहिर केला जाईल.

धन्यवाद

क्लिंटन

क्लिंटन's picture

19 Feb 2014 - 7:08 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ८

खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत भारताच्या तीन पंतप्रधानांनी पंतप्रधानपदावर असताना किंवा पंतप्रधानपदावर येण्यापूर्वी केले होते?

अ. रायबरेली
ब. अलाहाबाद
क. लखनौ
ड. फूलपूर
इ. अमेठी

प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार २३ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

23 Feb 2014 - 9:42 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ८ चे उत्तर आहे (ब): अलाहाबाद

१९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू अलाहाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले (त्यावेळी अलाहाबाद पूर्व आणि अलाहाबाद पश्चिम असे दोन लोकसभा मतदारसंघ होते). १९५७ आणि १९६२ मध्ये अलाहाबाद असा एकच मतदारसंघ झाला त्यातून लालबहादूर शास्त्री लोकसभेवर निवडून गेले. (पंडित नेहरू १९५७ आणि १९६२ मध्ये फूलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले). अलाहाबादमधून निवडून गेलेले तिसरे पंतप्रधान म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग.

१९८४ मध्ये राजीव गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळात वि.प्र.सिंग १९८५-८७ मध्ये अर्थमंत्री आणि नंतर काही महिने संरक्षणमंत्री होते.राजीव गांधींशी त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांची मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. १९८४ मध्ये अलाहाबादमधून अमिताभ बच्चन निवडून गेले होते.१९८७ मध्ये बोफोर्स प्रकरणात नाव गोवले गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजकारणातून अंग काढून घेतले.जून १९८८ मध्ये त्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली.त्यासाठी वि.प्र.सिंग हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होते तर कॉंग्रेसचे उमेदवार होते माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू सुनील शास्त्री.त्या पोटनिवडणुकीत वि.प्र.सिंगांनी सुनील शास्त्रींचा पराभव केला.(अवांतर: त्या पोटनिवडणुकीत तिसरे उमेदवार होते बसपा अध्यक्ष कांशीराम.सुनील शास्त्रींना ९२ हजार मते मिळाली तर कांशीराम यांना सुमारे ७० हजार.अशा महत्वाच्या निवडणुकीत इतकी मते मिळविणे नक्कीच सोपे नव्हते.तरीही कांशीरामांनी इतकी मते घेतली.मायावतींनी १९८५ आणि १९८७ च्या बिजनोर आणि हरिद्वार पोटनिवडणुकांमध्ये चांगली मते घेतली होतीच.त्यानंतर कांशीरामांनी इतक्या महत्वाच्या पोटनिवडणुकीत चांगली मते मिळवून त्यानंतर--"कोण बसपा" असा प्रश्न कोणीच विचारू शकणार नाही याची व्यवस्था केली :) ) तसेच १९८० मध्येही वि.प्र.सिंग अलाहाबादमधून लोकसभेवर निवडून गेले होते पण त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला.

रायबरेलीमधून केवळ इंदिरा गांधी (१९६७,१९७१ आणि १९८०--नंतर राजीनामा देऊन मेडक मतदारसंघ स्वत:कडे ठेवला), लखनौमधून केवळ अटलबिहारी वाजपेयी (१९९१,१९९६,१९९८,१९९९ आणि २००४), फूलपूरमधून केवळ पंडित जवाहरलाल नेहरू (१९५७ आणि १९६२) तर अमेठीमधून केवळ राजीव गांधी (१९८२ ची पोटनिवडणुक, १९८४,१९८९ आणि १९९१--मृत्यूपश्चात) हे एकेक पंतप्रधान निवडून गेले होते.

अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून "हाय प्रोफाईल" उमेदवार निवडून गेले आहेत. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री,वि.प्र.सिंग यांच्याबरोबरच हेमवतीनंदन बहुगुणा, अमिताभ बच्चन (राजकीय दृष्ट्या हायप्रोफाईल नसले तरी प्रचंड लोकप्रिय), ज्येष्ठ समाजवादी नेते जनेश्वर मिश्रा (यांनी १९७७ मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या वि.प्र.सिंगांचा पराभव केला) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी असे नेते या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

या प्रश्नाचे उत्तर नितीन थत्ते, श्रीरंग जोशी, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स आणि मी-सौरभ या पाच मिपाकरांनी बरोबर पाठविले.

पुढचा प्रश्न (नवीन धाग्यामध्ये) बुधवार २६ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे. सध्या प्रत्येक बुधवारी प्रश्न आणि रविवारी त्याचे उत्तर असे वेळापत्रक पाळत आहे.फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल.गरज पडल्यास या वेळापत्रकात या तारखा कळल्यानंतर बदल करेन.

धन्यवाद
क्लिंटन

क्लिंटन's picture

23 Feb 2014 - 9:45 am | क्लिंटन

एक सुधारणा-- सुनील शास्त्री हे लालबहादूर शास्त्रींचे नातू नाही तर चिरंजीव आहेत.