लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा भाग १

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
1 Jan 2014 - 12:35 pm

नमस्कार मंडळी,

मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरणनिर्मिती करण्यात हातभार लावायच्या उद्देशाने तयार केलेल्या प्रश्नमंजुषेला सुरवात करताना खूपच आनंद होत आहे.

राजकारणात आणि विशेषत: निवडणुकांमध्ये अगदी चौथी-पाचवीमध्ये असल्यापासून अतोनात रस असल्यामुळे सगळ्या घडामोडी मी भक्तीभावाने वाचल्या/बातम्यांमध्ये पाहिल्या आहेत.आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असे कुठेतरी कधीतरी वाचलेले/बघितलेले होते ते एका चिटोऱ्यावर लिहून काढून, आंतरजालावर परत एकदा जुने संदर्भ तपासून २० प्रश्न तयार करण्याइतपत माहिती एकत्र झाली. ती सगळी माहिती अचूक आहे याची खात्री करायचा माझ्या परिने होईल तितका प्रयत्न मी केला आहे.तरीही त्यात काही चूक/त्रुटी असल्यास ती निदर्शनास जरूर आणून द्यावी ही विनंती.

खाली दिलेल्या पहिल्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीला सर्वसाधारणपणे समकक्ष इतर प्रश्नांची काठिण्यपातळी असेल.प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय असतील. दर आठवड्याला एक अशा पध्दतीने ते प्रश्न मी इथे पोस्ट करणार आहे.प्रश्नांची उत्तरे व्य.नि वरच कळवावी ही विनंती.प्रत्येक व्य.नि ला उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच पण तसे करता न आल्यास प्रश्नाचे उत्तर जाहिर करताना कोणी बरोबर उत्तरे दिली हे पण जाहिर केले जाईल. तसेच काही वेळा पर्यायात नसलेले पण बरोबर असलेले उत्तर असेलच.व्य.नि वर उत्तर पाठवताना असे पर्यायात नसलेले कुठले उत्तर माहित असल्यास ते पण पाठवावे ही विनंती.

या २० प्रश्नांसाठी एका धाग्यात प्रत्येकी ४ असे एकूण ५ वेगळे धागे काढायचा सध्याचा विचार आहे. नंतर या आकड्यात गरज पडल्यास नक्कीच बदल करेन. इथे सुरवात पहिल्या प्रश्नापासून करत आहे.

प्रश्न क्रमांक १
आतापर्यंत चार वेगळ्या राज्यांमधून (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि गुजरात) लोकसभेवर निवडून गेलेले अटलबिहारी वाजपेयी हे असे आतापर्यंतचे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. खालीलपैकी कोण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेले आहेत?

अ. कांशीराम
ब. जॉर्ज फर्नांडिस
क. शरद यादव
ड. इंदिरा गांधी
इ. (क) आणि (ड) दोन्ही

या पर्यायांमध्ये नसलेल्या पण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेलेले/ल्या किमान दोन सदस्य मला माहित आहेत.ते उत्तरात जाहिर करणारच आहे.आपल्यालाही अन्य कोणी सदस्य माहित असल्यास जरूर कळवावे.

(उत्तर व्य.नि वरच द्यावे ही विनंती. उत्तर इथेच ५ जानेवारी रोजी जाहिर केले जाईल)

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jan 2014 - 12:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

उत्तर व्य नि वर पाठवले आहे.

अटलबिहारी खरच ग्रेट होते / आहेत. दांडगा जनसंपर्क असल्याशिवाय हे शक्य नाही.

आनन्दा's picture

1 Jan 2014 - 2:06 pm | आनन्दा

माझे ज्ञान तितपतच..

आम्ही उत्तरे आणि प्रश्न वाचत जाऊ.

सुधीर's picture

2 Jan 2014 - 9:32 am | सुधीर

वेळ मिळेल तसा प्रश्न आणि उत्तरे वाचू.

+१.. पुढिल प्रश्नांबद्दलही उत्सूकता आहे

नवीन माहिती मिळाली , आज आनंदी आनंद झाला *dance4* *DANCE* :dance:

क्लिंटन's picture

2 Jan 2014 - 11:27 am | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

आतापर्यंत ६-७ उत्तरे मिळाली आहेत. त्यातील काही बरोबर आहेत तर काही चुकीची आहेत.काल उत्तरे पाठविलेल्या मिपाकरांना तसे व्य.नि वर कळवले आहे.आज उत्तरे पाठविलेल्यांना अजून कळवायचे आहे.

दर बुधवारी प्रश्न आणि त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे रविवारी त्याचे उत्तर इथे पोस्ट करायचा सध्याचा बेत आहे.निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर या वेळापत्रकात गरज पडल्यास बदल करणार आहे.

तसेच मी भारतातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर https://www.facebook.com/pages/India-Elections/1411047469135260 इथे एक फेसबुक पेज तयार केले आहे ते जरूर बघावे आणि तिथेही सहभागी व्हावे अशी विनंती.पण ते पेज केवळ निवडणुकांवर माहितीसाठी तयार केले आहे.प्रत्येकाची एखाद्या घटनेवर्/नेत्यावर्/पक्षावर स्वतंत्र मते असतातच/असतील त्यासाठी ते पेज नाही. माहिती आणि मत यातला नक्की फरक काय?

१. १९७७ मध्ये इंदिरा गांधींचा राय बरेली लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. हे वाक्य म्हणजे माहिती आहे. हे बरोबर आहे की नाही याची पडताळणी करता येऊ शकेल.तसेच हे कोणाला मान्य/अमान्य असायचा प्रश्नच नाही. जे काही आहे ते समोर आहे.

२. इंदिरा गांधी या एक उत्तम/चांगल्या/वाईट/हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेत्या होत्या. हे वाक्य म्हणजे त्या मनुष्याचे मत झाले. त्याबरोबर सगळे सहमत असतील असे नाही.

तेव्हा निवडणुकांवरील केवळ माहितीसाठी ते पेज आहे. तसेच त्या पेजवर चर्चा इंग्रजीतूनच होणार आहे कारण तिथे माझे अमराठी मित्रही सहभागी झाले आहेत.

मिसळपाववरील प्रश्न तिथेही पोस्ट करतच आहे.त्या व्यतिरिक्त लहान बातम्या (ज्याला nuggets किंवा मिपाच्या परिभाषेत चारोळ्या म्हणता येईल) तिथे पोस्ट करणार आहे. अर्थातच असे चारोळी धागे मिपावर काढणे मला स्वतःलाच योग्य वाटत नाही.

तेव्हा निवडणुकांमध्ये रस असल्यास त्या पानाला जरूर भेट द्यावी ही विनंती.

धन्यवाद

क्लिंटन

अभ्यास करायला लावणारा धागा! जरा शोधते आणि व्यनि करते.

अनन्त अवधुत's picture

6 Jan 2014 - 11:21 pm | अनन्त अवधुत

+१

क्लिंटन's picture

5 Jan 2014 - 9:56 am | क्लिंटन

बरोबर उत्तर आहे (इ)--शरद यादव आणि इंदिरा गांधी दोन्ही.

शरद यादव यांनी १९७४ मध्ये जबलपूर (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक जिंकून लोकसभेत प्रवेश केला.ते १९७७ मध्ये त्याच मतदारसंघातून विजयी झाले.त्यांनी १९८९ मध्ये बदाऊन (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून तर १९९१,१९९६,१९९९ आणि २००९ मध्ये मधेपुरा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

इंदिरा गांधी यांनी राय बरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९६७,१९७१ आणि १९८० मध्ये विजय मिळवला. त्या १९७८ मध्ये चिकमागळूर (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्या.तसेच त्यांनी १९८० मध्ये मेडक (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता. १९८० मध्ये इंदिरा गांधींनी रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देऊन मेडक (आंध्र प्रदेश) स्वतःकडे ठेवला. (अवांतरः अनेकदा पी.व्ही.नरसिंह राव हे दक्षिणेतून निवडून गेलेले पहिले पंतप्रधान असा उल्लेख असतो तो माझ्या मते चुकीचा आहे. इंदिरा गांधी या दक्षिणेतून निवडून गेलेल्या पहिल्या पंतप्रधान होत्या. तर नरसिंह रावांना भारताचे पहिले दाक्षिणात्य पंतप्रधान म्हणणे योग्य ठरेल).

इतर पर्यायः
१. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम १९९१ मध्ये इटावा (उत्तर प्रदेश) आणि १९९६ मध्ये होशियारपूर (पंजाब) मधून लोकसभेवर निवडून गेले.त्यांचा १९८९ आणि १९९१ मध्ये पूर्व दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. ते विजयी झाले असते तर त्यांचे नावही तीन वेगळ्या राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेलेल्यांमध्ये आले असते.

याव्यतिरिक्त कांशीराम यांचा १९८८ मध्ये अलाहाबाद (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत पराभव झाला होता.१९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती.पण पुढे बोफोर्स प्रकरणात नाव गोवले गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.ही पोटनिवडणुक राजीव गांधींसाठी प्रतिष्ठेची होती.काँग्रेसचे उमेदवार होते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री तर सर्व विरोधी पक्षांचे उमेदवार होते राजीव गांधींना आव्हान देणारे विश्वनाथ प्रताप सिंग. अर्थातच वि.प्र.सिंगांनी विजय मिळविला.त्याच निवडणुकीत कांशीराम यांनीही सुमारे ७० हजार मते घेऊन आपले आणि आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले.

२. जॉर्ज फर्नांडिस यांनी १९६७ मध्ये दक्षिण मुंबई (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला.पुढे १९७७,१९८९,१९९१ आणि २००४ मध्ये त्यांनी मुझफ्फरपूर (बिहार) लोकसभा मतदारसंघातून तर १९९६,१९९८ आणि १९९९ मध्ये नालंदा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला.त्यांचा १९८४ मध्ये उत्तर बंगलोर (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.ते विजयी झाले असते तर त्यांचेही नाव तीन वेगळ्या राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेलेल्यांमध्ये आले असते.

या पर्यायांमध्ये नसलेल्यांपैकी दोन नावे म्हणजे पी.व्ही.नरसिंह राव आणि सध्याच्या लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार हे प्रत्येकी तीन राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. पी.व्ही.नरसिंह राव १९७७ आणि १९८० मध्ये हणमकोंडा (आंध्र प्रदेश), १९९१ च्या पोटनिवडणुकीत आणि १९९६ मध्ये नंद्याल (आंध्र प्रदेश), १९८४ आणि १९८९ मध्ये रामटेक (महाराष्ट्र) तर १९९६ मध्ये बेरहामपूर (ओरिसा) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर मीरा कुमार १९८५ मध्ये बिजनोर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्या. पुढे १९९६ आणि १९९८ मध्ये करोल बाग (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून तर २००४ आणि २००९ मध्ये सासाराम (बिहार) लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

१९८५ च्या बिजनोर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये मीरा कुमार यांनी प्रतिस्पर्धी रामविलास पासवान आणि बसपा नेत्या मायावती या दोघांचाही पराभव केला.या पोटनिवडणुकीत रामविलास पासवान यांचा थोडक्यात (सुमारे ५ हजार) मतांनी पराभव झाला तर मायावतींनी ६१ हजारांपेक्षा जास्त मते घेतली. अर्थातच पासवान आणि मायावती हे दोघेही एकाच समाजातील नेते होते. आपल्याला त्या समाजातील काँग्रेसविरोधी मते मिळतील आणि आपला विजय होईल असे पासवानांना वाटत होते.पण त्या काँग्रेसविरोधी मतांमध्ये मायावतींनी फूट पाडली म्हणून आपला पराभव झाला हे पासवानांच्या लक्षात आले.मायावती आणि पासवान यांच्यात विस्तव जात नाही तो अगदी १९८५ पासून. पुढे १९८७ मध्ये हरिद्वार (त्यावेळी उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पासवान आणि मायावती या दोघांनीही पोटनिवडणुक लढवली आणि परत त्यात दोघांचाही पराभव झाला.पण त्यात मायावतींनी सव्वा लाख मते घेतली तर पासवान ३४ हजार मतांनीशी चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर पासवानांनी उत्तर प्रदेशातून निवडणुक लढवली नाही.या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये बसपाच्या मायावतींचा पराभव झाला.पण पुढे १९८९ मध्ये मायावती बिजनोर (उत्तर प्रदेश) मधूनच लोकसभेवर निवडून गेल्या. बसपा संस्थापक कांशीराम यांचा मूलमंत्र--पहला चुनाव हारने के लिए, दुसरा चुनाव हराने के लिए और तिसरा चुनाव जितने के लिए हा मायावतींनी थोड्या वेगळ्या क्रमाने अंमलात आणला.१९८५ मध्ये बिजनोरमधून त्यांनी रामविलास पासवानांना हरविले, १९८७ मध्ये त्या हरिद्वारमधून हरल्या तर १९८९ मध्ये त्या बिजनोरमधूनच जिंकल्या!!

यापैकी मीरा कुमार हे नाव मला आधी माहित नव्हते.प्रश्नमंजुषेसाठी प्रश्न तयार करायला घेतल्यानंतर मायावतींचे "बेहेनजी" हे चरित्र वाचले त्यात बिजनोर पोटनिवडणुकीविषयी माहिती होती.त्यामुळे ही माहिती कळल्यावर पर्यायात नसलेल्या "एका" नेत्याऐवजी "दोन" नेते असा प्रश्नात बदल केला.

गॅरी ट्रुमन's picture

22 May 2016 - 9:01 pm | गॅरी ट्रुमन

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीदरम्यान ही प्रश्नमंजुषा चालवली होती. एकूण २० प्रश्न ५ वेगळ्या धाग्यांमध्ये विचारले होते. यातील पहिल्या प्रश्न होता-- तीन वेगळ्या राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांची नावे कोणती? पर्यायात नसलेले पी.व्ही.नरसिंह राव आणि मीरा कुमार ही दोन नावे वरील उत्तरात लिहिली आहेतच. त्याचबरोबर कालच मला आणखी एक नाव सापडले. त्या संबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी असावी म्हणून हा जुना धागा वर आणत आहे.

तर तीन राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये आणखी एक नाव आहे: चीन युध्दादरम्यान बदनाम झालेले संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्ण मेनन यांचे. १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान ते मुंबई उत्तर (महाराष्ट्र) या मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. १९६७ मध्ये त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यावेळी त्यांनी मुंबई उत्तर पूर्व (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी मिदनापूर (पश्चिम बंगाल) लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. पुढे १९७१ मध्ये त्यांनी त्रिवेंद्रम (केरळ) लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले.

म्हणजेच व्ही.के.कृष्ण मेनन हे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळ या तीन राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेले होते.

या उत्तरासाठी १९५७ मध्ये मुंबई उत्तर हा मतदारसंघ मुंबई राज्यात येत होता ही तांत्रिकता लक्षात घेतलेली नाही. नंतरच्या काळात मुंबई असे कोणतेच राज्य अस्तित्वात राहिले नाही ही तांत्रिकता लक्षात घेतलेली नाही.

या प्रश्नाला ११ मिपाकरांनी उत्तरे पाठवली.प्रश्नाचे उत्तर शरद यादव आणि इंदिरा गांधी दोन्ही असे आहे.ज्या मिपाकरांनी शरद यादव (क) किंवा इंदिरा गांधी (ड) अशी उत्तरे दिली त्यांना उत्तर चुकले असेच कळविले आहे.त्यांचे उत्तर अंशत: बरोबर आहे असे कळविले असते तर ती एक obvious hint झाली असती आणि बरोबर उत्तर सांगितले गेले असते म्हणून तसे केले नाही.

पुढील मिपाकरांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले: हतोळकरांचा प्रसाद, सुनील,चौकटराजा,विअर्ड विक्स,अनन्त अवधुत

पुढील मिपाकरांनी या प्रश्नाचे उत्तर अंशत: बरोबर (इंदिरा गांधी/शरद यादव) दिले: ज्ञानोबाचे पैजार,नाद खुळा, विनोद१८,श्रीगुरूजी

तर टिवटिव आणि तथास्तु यांनी यापेक्षा वेगळी उत्तरे पाठवली.

पर्यायात नसलेल्या दोन नेत्यांपैकी पी.व्ही.नरसिंह राव हे सुनील,चौकटराजा,अनन्त अवधुत आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर सांगितले. मीरा कुमार हे नाव ओळखणे तसे कठिणच होते.ते कोणालाच सांगता आले नाही.

सर्वांच्या सहभागाबद्दल आभारी आहे.आपल्या सहभागामुळेच ही प्रश्नमंजुषा यशस्वी होणार आहे.

आता दुसरा प्रश्न बुधवार ८ जानेवारी रोजी प्रसिध्द करेन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2014 - 10:30 am | ज्ञानोबाचे पैजार

माझ्या कडे असलेल्या थोड्याशा माहितीवर उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता. आता अजुन माहिती जमवायला लागणार. पण हा खेळ मला आवडला आणि निवडणुक २०१४ च्या रंगात रंगुन जायला मी उत्सुक आहे.

अजुन काही आकडेवारी.

लोकसभेच्या एकुण जागा ५४३. त्या पैकी सर्वात जास्त ८०(१४.७३%) जागा उत्तर प्रदेश मधे आहेत . त्या खालोखाल ४८ जागांसह (८.८४%) महाराष्ट्राचा नंबर लागतो.

आंदमान, चंदीगड, दादरा आणि नगर, दमण आणि दिव, लक्षव्दीप, मिझोराम, नागालँड, पाँडेचरी, सिक्कीम येथे प्रत्येकी १ जागा आहे (०.१८%).

२००९ साली एकुण ७१,६९,८५,१०४ नोंदणीकृत मतदार होते त्या पैकी फक्त ५८.२% म्हणजे ४१,७०,८७,२०९ जणांनी मतदान केले, किंवा २९,९८,९७,८९९ जणांनी म्हणजे ४१.८% जणांनी मतदान केले नाही.

एकुण मतदाना पैकी ११,९१,११,०१९ मते (म्हणजे एकुण मतदानाच्या २८.६%) मते काँग्रेसला मिळाली व तो पक्ष २०६ जागा जिंकुन पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

त्या खालोखाल भाजपा ७,८३,३५,३८१ मते एकुण मतदानाच्या १८.८% मते मिळवुन व ११६ जागा जिंकुन दुसर्‍या क्रमांकावर राहिला.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २००९ साली काँग्रेसची २.१% मते वाढली. २००४ साली त्यांनी ४१७ जागा लढवत १०,३४,०८,९४९ मते मिळवली होती तर २००९ मधे ४४० जागा लढवत ११,९१,११,०१९ मते मिळवली. २००४ च्या तुलनेत एकुण १,५७,०२,०७० मते जास्त.

१९८४ साली ४१५ जागा मिळवताना काँग्रेसला १२,०१,०७,०४४ (एकुण मतदानाच्या ४८.०१%) मते मिळाली होती.

२००४ च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलने मधे २००९ ला भाजपची ७९,३६,१८० कमी झाली.

२००४ मधे त्यांनी ३६४ जागा लढवत २२.२% म्हणजेच ८.६३,७१,५६१ मते मिळवली होती. तर २००९ साली त्यांनी ४३३ जागा लढवल्या होत्या.

लोकसभेवर सर्वाधिक म्हणजे ११ वेळा निवडुन जाण्याचा मान श्री इंद्रजीत गुप्ता यांच्या कडे आहे १९६० पासुन ते त्यांचे २००१ साली त्यांचे निधन होई पर्यंत १९७७ ते १९८० या वर्षांचा अपवाद वगळता ते लोकसभेचे सभासद होते.

श्री अटलबिहारी वाजपेयींना आहे, ते एकुण ९ वेळा लोकसभेवर निवडुन आले आहेत. १९९६ मधे गांधीनगर आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणहुन ते निवडुन आले होते. तर १९९१ मधे विदीशा आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणांवरुन

अटलजी एकुण सहा वेगवेगळ्या मतदार संघातुन निवडुन आले आहेत. बलरामपुर १९५७,१९६७, ग्वाल्हेर १९७१, नवी दिल्ली १९७७, १९८० विदिशा १९९१, गांधीनगर १९९६, लखनऊ १९९१, १९९६, १९८८.

त्यांनी ऑल इंडिया भारतिय जनसंघ, जनसंघ, भारतिय जनसंघ, भारतिय लोकदल, जनता पार्टी व भारतिय जनता पार्टी या पक्षांतर्फे निवडणुका लढवल्या आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2014 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

श्री अटलबिहारी वाजपेयींना आहे, ते एकुण ९ वेळा लोकसभेवर निवडुन आले आहेत. १९९६ मधे गांधीनगर आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणहुन ते निवडुन आले होते. तर १९९१ मधे विदीशा आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणांवरुन

हे वाक्य

श्री अटलबिहारी वाजपेयीं एकुण ९ वेळा लोकसभेवर निवडुन आले आहेत. १९९६ मधे गांधीनगर आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणहुन ते निवडुन आले होते. तर १९९१ मधे विदीशा आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणांवरुन

असे वाचावे.

टिवटिव आणि तथास्तु यांनी यापेक्षा वेगळी उत्तरे पाठवली.
या दोघात एक समानता आहे ओळखा बर ! *mosking* *wink*

श्रीरंग_जोशी's picture

7 Jan 2014 - 12:28 am | श्रीरंग_जोशी

टिवटिव आणि तथास्तु - दोघेही लातूरकर आहेत. बरोबर का?

टिवटिव आणि तथास्तु - दोघेही लातूरकर आहेत. बरोबर का?+१

arunjoshi123's picture

7 Jan 2014 - 4:04 pm | arunjoshi123

हामीबी हाव.

दोघांनी ही चुकीची उत्तरं दिली हे का?:)

ही प्रश्न मंजुषा सुरु केल्याबद्दल आभारी आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2014 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रश्नांची उत्तरे देण्याइतका आणि चर्चेची खडाजंगी करायला विदा जमेला असण्याएवढ्या बारकाईने राजकारणाचा अभ्यास नसला तरी तुमचे लेख जरूर वाचतो आणि आवडतात हे मात्र नक्की. पुभाप्र.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2014 - 2:22 pm | श्रीगुरुजी

>>> विदा

"विदा" म्हणजे काय?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Jan 2014 - 3:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Data.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2014 - 8:39 pm | श्रीगुरुजी

"विदा" आणि "Data" यांचा कसा संबंध आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2014 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला इतकेच म्हणायचे होते की राजकारणाच्या इतिहासातिल संदर्भ, आकडेवारी, सनावळी, निवडणूकांचे आकड्यांसकट निर्णय इत्यादी वादविवाद करण्यास आवश्यक असा डेटा माझ्याकडे नाही. त्यामुळे त्याविषयी मी जास्त चर्चा करणे योग्य नाही (वाचतो-ऐकतो आहेच)... थोडक्यात त्याबाबतीतल्या माझ्या अज्ञानाचे मला पूरे ज्ञान आहे :)

लईच इस्काटून सांगायला लागलं राव ;)

आदूबाळ's picture

13 Jan 2014 - 10:52 pm | आदूबाळ

नाही नाही, गुर्जींना भौदा विचारायचंय की डेटा सारख्या मराठी शब्दाला विदा हा किचकट शब्द कुठून आला असावा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2014 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला खर्र्च की. पण हा शब्द आम्ही अलिकडेच मिपावरूनच अलगद उचलला आहे. नायतर आतापत्तूर डेटा डेटा च्या गजरातच आमची जिंदगानी गेलीया. ;)

arunjoshi123's picture

7 Jan 2014 - 4:05 pm | arunjoshi123

सुरेख.

क्लिंटन's picture

8 Jan 2014 - 11:49 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक २

एकाच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर जास्तीत जास्त वेळा निवडून जायचा विक्रम कोणाच्या नावे आहे?

अ. इंद्रजीत गुप्ता
ब. सोमनाथ चॅटर्जी
क. पी.एम.सईद
ड. खगपती प्रधानी
इ. माणिकराव गावीत

उत्तरे व्य.नि वरच पाठवावी ही विनंती. उत्तर रविवार १२ जानेवारी रोजी जाहिर केले जाईल.

धन्यवाद

क्लिंटन

क्लिंटन's picture

12 Jan 2014 - 9:08 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक २ चे बरोबर उत्तर आहे (क): पी.एम.सईद. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून १९६७,१९७१, १९७७,१९८०,१९८४,१९८९,१९९१,१९९६,१९९८ आणि १९९९ असे दहा वेळा निवडून गेले.

इंद्रजीत गुप्तांनी लोकसभेवर ११ वेळा निवडून जायचा विक्रम केला.पण ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून चार वेगळ्या मतदारसंघांमधून लोकसभेवर निवडून गेले होते.१९६० ची पोटनिवडणुक आणि १९६२ मध्ये ते कलकत्ता उत्तर पूर्व (पश्चिम बंगाल),१९६७ आणि १९७१ मध्ये अलीपूर (पश्चिम बंगाल), १९८० आणि १९८४ मध्ये बासीरहाट (पश्चिम बंगाल) तर १९८९,१९९१,१९९६,१९९८ आणि १९९९ मध्ये मिदनापूर (पश्चिम बंगाल) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

सोमनाथ चॅटर्जी लोकसभेवर १० वेळा निवडून गेले.पण ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून तीन वेगळ्या मतदारसंघांमधून लोकसभेवर निवडून गेले होते.१९७१ मध्ये ते बरद्वान (पश्चिम बंगाल),१९७७ आणि १९८० मध्ये जादवपूर (पश्चिम बंगाल) तर १९८५ ची पोटनिवडणुक, १९८९,१९९१,१९९६,१९९८,१९९९ आणि २००४ मध्ये बोलपूर (पश्चिम बंगाल) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. १९८४ मध्ये त्यांचा जादवपूरमध्ये ममता बॅनर्जींनी पराभव केला.

खगपती प्रधानी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून नबरंगपूर (ओरिसा) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर १९६७,१९७१, १९७७,१९८०,१९८४,१९८९,१९९१,१९९६ आणि १९९८ असे ९ वेळा निवडून गेले.त्यांचा १९९९ मध्ये पराभव झाला नसता तर त्यांचाही पी.एम.सईद यांच्याप्रमाणे विक्रम झाला असता.

माणिकराव गावीत हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून नंदुरबार (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर १९८०,१९८४,१९८९, १९९१,१९९६,१९९८,१९९९,२००४ आणि २००९ असे ९ वेळा निवडून गेले.त्यांचा २०१४ मध्ये विजय झाल्यास त्यांचाही पी.एम.सईद यांच्याप्रमाणे विक्रम होईल.

या प्रश्नाला एकूण ५ मिपाकरांनी उत्तरे पाठवली.यापैकी ३ मिपाकरांनी--अनन्त अवधुत,ज्ञानोबाचे पैजार आणि सुनील यांनी बरोबर उत्तरे दिली.

तिसरा प्रश्न बुधवार १५ जानेवारी रोजी मिपावर पोस्ट करेन.

अस्वस्थामा's picture

14 Jan 2014 - 1:34 am | अस्वस्थामा

जरी जास्त महिती नसली तरी ही प्रश्नोत्तरे रोचक आहेत. शक्य असेल तर प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा धागा काढाल काय? नाही म्हणजे प्रश्न क्र. २ आधी निसटून गेला होता वाचनातून आणि आज पाहिला..

क्लिंटन's picture

14 Jan 2014 - 10:27 pm | क्लिंटन

शक्य असेल तर प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा धागा काढाल काय?

धन्यवाद अस्वस्थामा. एका धाग्यात ४ प्रश्न लिहिण्यामागे एक उद्देश आहे.प्रश्न पोस्ट केल्यानंतर थोडीफार अवांतर चर्चा होणे अपेक्षित आहेच.पण नक्की किती होईल हे आधीच सांगता येणार नाही.तेव्हा प्रत्येक प्रश्नाला वेगळा धागा केला तर कदाचित काही प्रश्नांवर मूळ प्रश्न आणि त्याचे उत्तर सोडून काहीच नसेल.त्यातूनच उगीचच मिपाची बॅन्डविड्थ खर्ची पडेल (एकाच धाग्यात चार प्रश्न लिहून बॅन्डविड्थ वाचेल की नाही हे मला माहित नाही.माझे तांत्रिक गोष्टींविषयीचे ज्ञान अगदी यथातथाच आहे तेव्हा हा माझा आपला तर्क :) ). तरीही जर कोणत्या प्रश्नाच्या धाग्यावर अधिक चर्चा होऊन चर्चा दुसऱ्या पानावर गेली तर ती ट्रॅक करणे कठिण होईल त्यामुळे त्या परिस्थितीत एका धाग्यात चार पेक्षा कमी प्रश्न लिहेन.

पहिल्या प्रश्नाच्या उत्तराची श्रेयनामावली लिहिताना एक चूक झाली.कोणाची उत्तरे बरोबर आहेत हे लिहिणे ठिक आहे पण कोणाचे उत्तर चुकले हे जगजाहिर करायची काहीच गरज नव्हती.ही चूक परत नक्कीच होणार नाही :)

तिसरा प्रश्न उद्या पोस्ट करेन.

आनन्दा's picture

23 Jan 2014 - 3:25 pm | आनन्दा

मान्य आहे, पण किमान शीर्षकाततरी सूचक बदल करा.. माझा हा धागा आजपर्यंत सुटला होता.

क्लिंटन's picture

23 Jan 2014 - 4:16 pm | क्लिंटन

मान्य आहे, पण किमान शीर्षकाततरी सूचक बदल करा.. माझा हा धागा आजपर्यंत सुटला होता.

एकदा धागा काढल्यानंतर शीर्षकात बदल कसा करणार?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

संपादकांना विनंती करून शिर्षकातले "भाग १" हे शब्द काढून टाकायला सांगा.

क्लिंटन's picture

23 Jan 2014 - 10:27 pm | क्लिंटन

संपादकांना विनंती करून शिर्षकातले "भाग १" हे शब्द काढून टाकायला सांगा.

पण पुढच्या बुधवारी दुसरा भाग पण येईल म्हणून हा पहिला भागच असू दे असे वाटते.चालेल ना? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो, चालेल नाही... धावेल !

शिर्षक हे धागाकर्त्याचा हक्क आहे :) मी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं (अबंधनकारक) उत्तर दिलं, इतकंच !

चांगला उपक्रम ..
वाचते आहे.

क्लिंटन's picture

15 Jan 2014 - 10:01 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ३

लोकसभेवर निवडून जाणारे सर्वात वयोवृध्द सदस्य कोण?

अ. एन.जी.रंगा
ब. राम सुंदर दास
क. रामचंद्र वीराप्पा
ड. लालकृष्ण अडवाणी
इ. मोरारजी देसाई

उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. बरोबर उत्तर रविवार १९ जानेवारी रोजी जाहिर करेन.

सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन's picture

19 Jan 2014 - 11:41 am | क्लिंटन

हा प्रश्न तसा बऱ्यापैकी आव्हानात्मक होता.त्यातून विकिपिडियावर रामचंद्र वीराप्पांचे जन्मसाल चुकीचे दिले असल्यामुळे गुंतागुंत थोडी वाढली हे नक्की.प्रश्न क्रमांक ३ चे बरोबर उत्तर आहे (क): रामचंद्र वीराप्पा.

रामचंद्र वीराप्पा २००४ मध्ये लोकसभेवर भाजपचे उमेदवार म्हणून बीदर (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यावेळी त्यांचे वय नक्की किती होते याविषयी थोडा संभ्रम आहे.विकिपिडिया त्यांचे जन्मसन १९२३ म्हणजे २००४ मध्ये वय ८१ वर्षे होते असे म्हणते.पण निवडून गेल्यानंतर दोन महिन्यातच म्हणजे १८ जुलै २००४ रोजी त्यांचे निधन झाले.रेडिफवरील या , द हिंदू मधील या आणि टाईम्स ऑफ इंडियामधील या दुव्यांवर त्यांचे वय ९६ वर्षे होते असे म्हटले आहे.मागे एकदा लोकसभेच्या संकेतस्थळावर त्यांचे जन्मसन १९०८ असे वाचल्याचे आठवते.पण सध्या ते वेबपेज चालत नाही :( तर मायनेता या संकेतस्थळावर त्यांचे २००४ मध्ये उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्नापत्रात त्यांचे वय ९४ वर्षे होते असे म्हटले आहे. तेव्हा त्यांचे वय कमितकमी ९४ वर्षे होते असे म्हणायला हरकत नसावी.

एन.जी.रंगांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०० चा.ते १९८९ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून गुंटुर (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

रामसुंदर दास यांचा जन्म ९ जानेवारी १९२१ चा. ते २००९ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी जनता दल (संयुक्त) पक्षाचे उमेदवार म्हणून हाजीपूर (बिहार) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

लालकृष्ण अडवाणींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ चा. ते २००९ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी भाजपचे उमेदवार म्हणून गांधीनगर (गुजरात) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

मोरारजी देसाईंचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ चा. ते १९७७ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षीच भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणून सुरत (गुजरात) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

तेव्हा या प्रश्नाचे उत्तर (क): रामचंद्र वीराप्पा.

या प्रश्नाचे उत्तर एकूण ८ मिपाकरांनी पाठविले.त्यापैकी कोणालाच रामचंद्र वीराप्पांच्या जन्मसनातील गोंधळामुळे हे उत्तर बरोबर सांगता आले नाही.उत्तर पाठविले त्या मिपाकरांना वैयक्तिक उत्तरे अजून दिलेली नाहित.ती आज देईन.

सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jan 2014 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रश्र्ण खरोखरच चकवणारा होता आणि त्यात विकी वरच्या डेटा मुळे अजुनच भर पडली. उत्तर देताना मी सुध्दा विकीच रेफर केले होते.

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ह्या आणि ह्या दुव्यां मुळे तुमच्या म्हणण्याला अजुन बळकटी येते.

अनन्त अवधुत's picture

19 Jan 2014 - 1:43 pm | अनन्त अवधुत

+११११११

अनन्त अवधुत's picture

18 Jan 2014 - 2:53 am | अनन्त अवधुत

धागा वर काढायला

अर्धवटराव's picture

18 Jan 2014 - 3:13 am | अर्धवटराव

इतक्या वेळा एकाच मतदार संघात निवडुन आलेल्यांची कारकीर्द थोडीफार माहित आहे, थोडीफार आंजावरुन कळली. नथींग स्ब्स्टॅन्शिअल. नेत्याचा प्रभाव-वलय, जात-धर्म फॅक्टर, पॉलितिकल स्टॅण्ड... कितीही विचारात घेतलं तरी इतक्या वेळा एकाच ठिकाणाहुन निवडुन यायचे कारण स्पष्ट होत नाहि. जैन साहेबांनी जळगावचं काय गटार करुन ठेवलय... तरिही त्यांची होल्ड कमि होत नाहि. व्हाय ??? गेल्या ५ दशकात राजकारण स्थितीप्रियतेने आक्रसलं होतं काय? इतक्या सार्‍या घडामोडी झाल्या देशात आणि राज्यात. पण यांच्या बुडाखालुन खुर्ची सरकली नाहि. का??

क्लिंटन's picture

22 Jan 2014 - 2:01 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ४
राजमोहन गांधी, मेनका गांधी, राज नारायण आणि राम जेठमलानी या चौघांची पार्श्वभूमी पूर्णपणे भिन्न असली तरी त्यांना जोडणारा एक दुवा आहे.पुढीलपैकी कोणाला तोच दुवा जोडतो?

अ. चंदुपाटला जंगा रेड्डी
ब. मुझफ्फर अली
क. करण सिंग
ड. विजय कुमार मल्होत्रा
इ. विजयाराजे शिंदे

उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार २६ जानेवारी रोजी जाहिर केले जाईल.

(गेले २-३ दिवस मिपावर येता येऊनही लिहिणे झाले नव्हते.काही प्रतिसादांना उत्तरे द्यायची आहेत तर काही नवे प्रतिसादही लिहायचे आहेत. ते पुढील दोन दिवसात व्हायला हवे.)

धन्यवाद
क्लिंटन

विअर्ड विक्स's picture

23 Jan 2014 - 6:19 pm | विअर्ड विक्स

या सर्वांनी पंत प्रधान विरुद्ध निवडणूक लढवलेली आहे.……

परंतु दुवा काही सापडत नाही …

उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.

क्लिंटन's picture

26 Jan 2014 - 9:41 am | क्लिंटन

बरोबर उत्तर आहे (क):करण सिंग

राजमोहन गांधी, मेनका गांधी,राज नारायण आणि राम जेठमलानी यांनी तत्कालीन विद्यमान पंतप्रधानांविरूध्द लोकसभा निवडणुक लढवली. १९८९ मध्ये राजमोहन गांधींनी जनता दलाचे उमेदवार म्हणून अमेठी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली.१९८४ मध्ये मेनका गांधींनी अपक्ष उमेदवार म्हणून अमेठी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. राज नारायण यांनी संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून १९७१ मध्ये तर भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान इंदिरा गांधींविरूध्द निवडणुक लढवली.राम जेठमलानींनी २००४ मध्ये लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींविरूध्द निवडणुक लढवली.

पर्यायांपैकी केवळ करण सिंग यांनी विद्यमान पंतप्रधानांविरूध्द निवडणुक लढवली.त्यांनी १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली.

इतर पर्यायातील नेत्यांनी भविष्यात पंतप्रधान झालेल्यांविरूध्द (विद्यमान पंतप्रधानांविरूध्द नव्हे) निवडणुक लढवली. चंदुपाटला जंगा रेड्डी यांनी भाजपचे उमेदवार म्हणून १९८४ मध्ये हणमकोंडा (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पी.व्ही.नरसिंह राव यांच्याविरूध्द निवडणुक लढवली.अर्थातच राव त्यावेळी पंतप्रधान नव्हते.तर ते १९९१ मध्ये पंतप्रधान झाले. १९८४ च्या निवडणुकीत हणमकोंडामधून नरसिंह रावांचा पराभव झाला होता आणि चंदुपाटला जंगा रेड्डी जिंकले.पण नरसिंह रावांनी रामटेक (महाराष्ट्र) या लोकसभा मतदारसंघातूनही निवडणुक लढवली होती त्यात त्यांचा विजय झाला. १९८४ मध्ये भाजपला केवळ दोन लोकसभा जागा जिंकता आल्या.त्यातली हणमकोंडा (आंध्र प्रदेश) ही एक जागा तर मेहसाणा (गुजरात) ही दुसरी जागा. १९८४ मध्ये खुद्द अटलबिहारी वाजपेयींचाही पराभव झाला होता.

मुझफ्फर अलींनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ मध्ये लखनौ (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून अटलबिहारी वाजपेयींविरूध्द निवडणुक लढवली.वाजपेयी त्या निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नव्हते तर निवडणुका झाल्यानंतर त्यांचे सरकार सत्तेवर आले.

विजय कुमार मल्होत्रांनी भाजपचे उमेदवार म्हणून १९९९ मध्ये दक्षिण दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून मनमोहन सिंगांविरूध्द निवडणुक लढवली.अर्थातच मनमोहनसिंग त्यावेळी पंतप्रधान नव्हते. ते पुढे २००४ मध्ये पंतप्रधान झाले.

विजयाराजे शिंदेंनी जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून १९८० मध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींविरूध्द निवडणुक लढवली.पण त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान नव्हत्या.त्या निवडणुकांनंतर पंतप्रधान झाल्या. १९८० मध्ये इंदिरा गांधी मेडक (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रायबरेलीतून आपला झालेला पराभव इंदिरा गांधी विसरल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी रायबरेलीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन मेडक मतदारसंघ स्वतःकडे ठेवला.

या प्रश्नाला एकूण ५ मिपाकरांनी उत्तरे पाठवली.त्यापैकी श्री. अनन्त अवधुत यांचे उत्तर बरोबर होते. तर अन्य चार मिपाकरांना उत्तर बरोबर देता आले नाही. अर्थातच हा प्रश्न बराच चकविणारा होता आणि पर्यायही बरेच जवळजवळ होते.

अनन्त अवधुत's picture

23 Jan 2014 - 4:46 am | अनन्त अवधुत

1. आधी त्या चौघांचा संबंध शोधा,
2. मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधा.

जेपी's picture

23 Jan 2014 - 2:36 pm | जेपी

यावेळेस आपला पास .