नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं.
एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे). आणि बरेचसे लोक निघून गेलेही . पण तसं केलं नाही हे चांगलंच झालं असं एकांकिका बघून नक्कीच वाटलं.
पुरोषोत्तम करंडक म्हटले कि तरुणाई आणि दंगा हा असणारच हे समीकरण माहितच होतं. एकांकिका सुरू झाली , पाहिलं एक दृश्य थोडसं गोंगाटातच गेलं. पण नंतर जेंव्हा साउंड वगैरे चांगला झाला आणि जसं ते पूरांच
दृश्य समोर आलं तसं सगळं पब्लिक एकदम हाताची घडी तोंडावर बोट ह्या स्टेज ला आलं आणि एकदम पिन ड्रोप सायलेन्स झाला. सगळे थक्क होऊन पुढंच दृश्य बघत होते. पुरामध्ये अडकल्यामुळे एक मुलगी आणि
तिचा काका शोभेल असा एक इसम, एका झाडावर जगण्यासाठी धडपडतयात. खाली जोराचा प्रवाह आहे, विजा चमकतायत , ढगांचा गडगडाट आहे. केवळ अप्रतिम असं दृश्य. आणि कोण तरी एक रसिक प्रेक्षक भानावर येऊन टाळी वाजवतो आणि पूर्ण थेटर त्याचं अनुकरण करतं. नेपथ्य खूप आवडल्याची ती खुणच म्हणावी लागेल.
तर सुरुवात तर तुम्हाला कळलीच आहे. पूर्ण एकांकिका अशींच न सांगता. तुम्हाला फक्त मला जे आवडले ते सांगतो.
गोष्ट आहे दोन व्यक्तींवर एक १५,१६ वर्षांची मुलगी आणि तिचा काका शोभेल असा इसम हे एका पुरामध्ये एका झाडावर अडकतात. तो इसम आहे मराठी आणि ती मुलगी कानडी त्यामुळे दोघांचंहि बोललेलं एकमेकांना प्रथम काही कळत नाही. पण ज्या काही सहजतेने दिग्दर्शक त्यांना हाताळतो आणि अगदी साध्या संवादाने त्यांचं संभाषण जस पुढे जातं तसं त्या दोघांना एकमेकांच्या भाषेचे काही शब्द कळायला लागतात. हे इतक्या जलद घडत तरीही आपल्याला त्याबद्दल आक्षेप राहत नाही. उलट आपण ह्या भाषा गोंधळामुळे अजूनच हुरुप येऊन पाहतो. आणि त्यात चांगली विनोदाची पेरणी करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
अजून एक आवर्जून सांगावा असा प्रसंग म्हणजे त्या मुलीला भूक लागलेली असते आणि तो इसम पाण्यामध्ये अडकलेल्या काट्या, कुपाटयात काही तरी खायला मिळतय का? हे शोधत असताना एका तरुणीचा मृतदेह वर येतो तो क्षण नक्कीच आपल्याला घाबरवून सोडतो.
काही खायला मिळतंय का? हे शोधतांना त्या इसमाला खराब झालेला, कोंब वगैरे फुटलेला 'उळळागड्डी' सापडतो. पण तरीही तो तसाच आपल्या खिश्यात ठेवतो.
ती दोघं एक रात्र त्याच झाडावर काढतात. तोपर्यंत त्या दोघांचेही खूप हाल झालेले असतात. दुसऱ्या दिवशी मुलीला ताप वगैरे आला असल्यामुळे ती तो 'उळळागड्डी' खायला मागते.
नंतर सुदैवाने त्या दोघांची सुटका एक हेलीकॉप्टर करतं आणि ती दोघं सुखरूप सुटतात तोपर्यंत त्या दोघांचं एक अनामिक नातं तयार झालेलं असतं कि तो इसम तिला आपल्या घरी येण्यास विचारतो. पण शेवटी काय होतं हे मी इथे सांगत नाही. ते तुम्ही जाऊन बघावं हेच उचित. आणि हो शेवट हि छानच केला आहे.
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही. तरी पण नक्कीच आपल्या मनात 'उळळागड्डी' बद्दल एक वेगळीच आपुलकीची भावना तयार होते आणि दिलेल नाव योग्यच वाटतं.
दोघांचा हि अभिनय अप्रतिम आहे. भाषा भेदामुळे होणारे विनोद हसवतात. आणि सर्वात जमेची बाजू म्हणजे एकांकिकेचे नेपथ्य आणि प्रकाश योजना. पाण्याचा प्रवाह , अडकलेले काटे वगैरे त्यांनी फार छान उभं केलंय. (फक्त ह्याच्यासाठी एकदा तरी पहावी) ह्या दोन्हीतही त्यांना आपण पैकी च्या पैक्की मार्क देऊन टाकतो, आणि एक सुंदर, अप्रतिम असा अनुभव घेऊन विचार करतच थेटरच्या बाहेर पडतो.
(वरील प्रयत्नाला परीक्षण समजू नये. हे लिखाण केवळ ज्या लोकांना एकांकिकेबद्दल माहित नाही आणि जे बघण्यास इच्छुक आहेत त्यांच्या साठी ओळख म्हणून लिहिलंय. आणि काही उणे असेल तर ते लिखाणाचा दोष समजावा. कारण एकांकिका फारच सुंदर आहे आणि कदाचित मला ती सांगताना झेपली नसल्याची शक्यताहि नाकारता येत नाही.)
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 7:29 pm | यसवायजी
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही
उळ्ळागड्डी म्हणजे कांदा. यालाच कन्नडमधे इरुळी पण म्हणतात. सीमाभागातला शब्द आहे.
30 Dec 2013 - 7:38 pm | विशाल चंदाले
धन्यवाद यसवायजी, मला माहित आहे.(त्यांनी त्यात कांदा दाखवला होता, हो पण बघण्यापूर्वी माहित नव्हतं.) मला असं म्हणायचं होतं कि त्या शब्दातून एकांकिकेबद्दल काहीच अभिप्रेत होत नाही.
30 Dec 2013 - 8:22 pm | साती
उळागड्डी खूप महाग झाला होता म्हणून ते नाव दिलंय का?
30 Dec 2013 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
सुंदर परिचय! :)
4 Jan 2014 - 12:41 pm | यशोधन वाळिंबे
बेल सुद्धा जरूर पहा.. टेलिफोनच्या शोधाबद्दल आणी त्याच्या भोवताली ही एकांकिका फिरते..
कल्पना, त्यातील लिमिटेशन्स आणी त्यानंतर लागलेला अजरामर शोध नक्कीच प्रगल्भपणे साकारलाय..
पुरषोत्तम द्वितीय..
7 Jan 2014 - 1:59 pm | विशाल चंदाले
यशोधन, हो ती पण पहायचीय. त्याच दिवशी योग होता . पण काही कामानिमित्त जावं लागलं आणि ती राहिली . नक्की बघेन.
5 Jan 2014 - 3:42 pm | पैसा
असे प्रयोग सर्वांपर्यंत कसे पोचतील याची काळजी सादरकर्त्यांनी घ्यायला हवी.