भटकंती २

इन्ना's picture
इन्ना in जनातलं, मनातलं
30 Dec 2013 - 7:24 am

भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे.

कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं. माणसं भेटायला हवीत, तिथलं खाणं पिणं, गाणं, इतर कल्चर, इमारती, त्यावरुन होणारी त्या गावाची ओळख, सार्वजनिक ठिकाणं, पार्क्स, म्युझियम्स, रेल्वे, ट्राम, त्यामधे दिसणारी तिथली जनता, त्यांचा पेहराव , लोकल ते ग्लोबल फुटट्टीवर त्यांचा नंबर शोधणं हे माझे आवडते विषय.

नशिबाने माझ्या कामाचं स्वरुप असं आहे की भटकण्याची हौस पुरेपूर भागते. ह्या सगळ्या भटकंतीमध्ये बरेच चित्रविचित्र, मजेशीर, उद्बोधक(?) अनुभव आलेत, येतात. ते सगळं लिहावं असं ठरवलं. अर्थात, माझ्या भटकण्यासारखंच लिखाणही परीटघडीचं नाही, गबाळं आहे. माझा, "अबकचा प्रवास" या थाटात लिहिण्यापेक्षा आडवे छेद देऊन, मला जगभर (माझं जग बरंका, हे फारच लहान आहे.) भेटलेली माणसं, माझी खाद्ययात्रा, विविध छोट्या मोठ्या गावातले चौक, अनुभव असं मांडते.
______________________

या भागात, तुमच आणि आमच सेम असत.

_______________________

१० -१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे हैद्राबाद प्रवास, ट्रेनमधून. सहप्रवाश्यांमध्ये एक पुणेकर आज्जी, त्यांची सून, नातू - वय वर्ष १४-१५, एक कानडी कुटुंब. इतर सोलापूरला उतरणारी गर्दी. माझी ३ वर्षांच्या लेकाला सोडून प्रवास करण्याची पहिलीच खेप. दौंडपर्यंत पोचेतो तुम्ही कोण, आम्ही कोण, कुंडल्या मांडून झाल्या होत्या. रीतसर गप्पा रंगल्या होत्या. बराच वेळ गप्प असलेल्या आज्जींनी एकदम रॅपिड फायर सुरु केलं.

"तू आर्किटेक्ट आहेस ना?"

"हो आज्जी, ४ वर्षं झाली, आता माझी प्रॅक्टीस करते"

"किती दिवस आहे काम?"

"दोन दिवस काम आहे, मग मी जुनं हैद्राबाद पहाणार आहे एक दिवस जास्त थांबून"

"कामासाठी ठीक आहे पण भटकायला पण जातेस बाहेरगावी? पोराला, नवर्‍याला टाकून?" पोराला, नवर्‍याला टाकून??? मी थक्क!!

मग आजी म्हणाल्या, "तसं कौतुक वाटतं तुम्हां आजकालच्या पोरींचं, आमच्या वेळी नवर्‍यावर मुलांची जबाबदारी टाकून बाहेरगावी जाणं अशक्य होतं."

मग पुढे रीतसर सासू काय करते, मुलाला सांभाळते का? हैद्राबादला एकटीने जायला घरची परवानगी असते का? -हैला! अशी परवानगी मागायची असते, हे पण माझ्या डोक्यात आलं नव्हतं! - नवरा काय करतो, मुलगा किती वर्षांचा, घरी अजून जबाबदारी काय? -म्हणजे गोतावळा किती मोठा, असं विचारायचं होतं बहुतेक! - सणवार करतेस का नाही? असा इंटरव्ह्यू झाला.

मला झाल्या गप्पांची मौज वाटली. आजीबाईंना भोचक चौकशा करायच्या होत्या. थोडं कौतुक, थोडी असूया होती, आमच्यावेळी आणि आजकाल अशी तुलना होती. कामासाठी ठीक आहे, पण भटकण्यासाठी एकटं जाण्यावर चक्क आक्षेप होता.

***

गेल्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण बेल्जियम आणि नेदरलॅंड पहायला गेलो होतो. फक्त मुंबई ते ब्रुसेल्स आणि परत, ह्या प्रवासाच्या तारखा नक्की होत्या. बाकीचं आवडेल तसं पहायचं असं ठरवलं होतं. यूथहोस्टेलमध्ये रहायचं, सायकली भाड्याने घेऊन गावभर फिरायचं. त्या त्या गावात खास, ते खायचं, वगैरे. तिचा आणि माझा नवरा टूर कॅटॅगरीत मोडणारे, त्यामुळे त्यांना आणि मुलांना न घेता आम्ही दोघीच प्रवासाला निघालो होतो.

अ‍ॅंटवर्प ते ब्रुसेल्स, ट्रेनचा प्रवास. समोर एक बेल्जियन आज्जी. माझी मैत्रीण फ्रेंच उत्तम बोलते, त्यामुळे हळूहळू गप्पा सुरु झाल्या .

पहिला प्रश्न. "तुम्ही दोघी मैत्रिणी.. म्हणजे..?"

"नाही, आमच्या दोघींचे आपापले नवरे आणि मुलं आहेत. फक्त इथे बरोबर नाहीत."

मग आजीबाईंची कळी खुलली. पुढच्या गप्पा सुरु. ह्या शेतकरीणबाई लेकीकडे निघाल्या होत्या. शेतकरी काका मागच्या सीटवर .

"मग अश्या मुलाबाळांना सोडून दोघीच का फिरताय... ?"
घरी कोण कोण असतं? नवर्‍याने स्पॉन्सर केलं का तुम्ही कमावता? मुलं काय करतात... ?"

मैत्रिणीला म्हटलं, त्यांचं आणि आपलं अगदी सेम असतं नै?
:)

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

30 Dec 2013 - 8:05 am | इन्दुसुता

:)
ह्यात आणखी तुम्ही जुन्या हैदराबाद मध्ये, बेल्जीयम/ नेदरलॅन्ड मध्ये काय बघितलंत त्याबद्दल वाचायला आणि वेग्वेगळया वाहनांनी प्रवास करताना आलेले अनुभव वाचायला अधिक आवडेल.

नेटाने लिहिणे ,लिहीत रहाणे , इथेच अडतय सगळ. :(
आता ठरवलय लिहायच म्हणून , प्रयत्न करते.

सविता००१'s picture

30 Dec 2013 - 3:35 pm | सविता००१

परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर. हे तर फारच पटलं. आता भराभर पुढचे भागही टाका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2013 - 3:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणसांबद्दल छान लिहीलयं पण जागांबाद्दलही लिहा की ! त्यांना असं एकदम फाट्यावर मारू नका... सचित्र लिहिलंतंतर अजून मजा येईल.

चित्र कशी टाकायची ते जमल की जागांबद्दल लिहीते . जागांना फाट्यावर मारून कस चालेल हो, माझ्या भटकंतीचा जीव आहे तो. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2013 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर चित्रे टाकण्याची कृती:

१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो किंवा तत्सम संस्थाळावर चढवा. शक्यतो गुगल-फोटोच वापरा. कारण तेथिल चित्रे सर्वांना दिसतात असा अनुभव आहे. इतर ठिकाणची चित्रे काही जणांना दिसत नाहीत.

२. त्या संस्थळावर चित्र उघदून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" वर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकायला तयार झाले आहे.

आता मिपावर या आणि :

२. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सुर्योदयाचे चित्र असलेल्या (डावीकडून ९ व्या) बटणावर टिचकी मारा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल)

३. आता दिसू लागलेल्या टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:

अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)

आ) Width X Height: कोरे ठेवा.

इ) Alternate Text: इथे फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.

४. OK बटन दाबून चित्र कसे दिसते ते बघण्यासाठी लेखन करण्याच्या चौकोनाच्या खालचे "पूर्वपरिक्षण" बटण दाबा.

५अ. चित्र लेखनाच्या चौकटीत नीट दिसत असले तर "प्रकाशित करा" बटण दाबा. मोठी Width अथवा Height टाकू नका. चित्र पिक्सलेट होऊन धूसर होते.

किंवा

५ब. चित्र चौकटीबाहेर जात असल्यास Width मध्ये ८००, ६०० अथवा ३०० असे पर्याय वापरून पहा आणि ज्याने चित्र सर्वात चांगले दिसते त्याला वापरून "प्रकाशित करा".

महत्वाची सूचना: Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

६. वरील १ ते ५ पायर्‍या प्रत्येक चित्राला वापरा..... हाकानाका :)

शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या क्रमांक पासून पुढे असा फरक आहे:

४. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.

५. प्रत्येक चित्र फक्त "पूर्वपरिक्षण" करुन पहा:

अ) चित्र लेखनाच्या चौकटीत नीट दिसत असले तर कोड तसाच ठेवा.

आ) चित्र चौकटीबाहेर जात असल्यास Width मध्ये ८००, ६८०, ६०० अथवा ३०० असे पर्याय वापरून पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

६. पुढच्या प्रत्येक चित्राचा कोड पायरी क्रमांक १ ते ५ परत वापरून लेखात अंतर्भूत करा.

७. सर्व चित्रे आणि लिखाणाचे शेवटचे मनाजोगते "पूर्वपरिक्षण" झाल्यावरच सर्व लेख चित्रांसह "प्रकाशित करा".

*** वरच्या चुकीच्या सूचनांबद्दल क्षमस्व :(

जेपी's picture

30 Dec 2013 - 3:53 pm | जेपी

वाचतोय .

अजया's picture

30 Dec 2013 - 4:05 pm | अजया

पुढल्या लेखाची वाट पहायला लावू नका!!

मुक्त विहारि's picture

30 Dec 2013 - 4:28 pm | मुक्त विहारि

झक्कास.....खुसखूशीत लेख...

प्रवासवर्णन पण असेच रंगतदार असेल अशी अपेक्षा आहे.

सत्याचे प्रयोग's picture

30 Dec 2013 - 4:46 pm | सत्याचे प्रयोग

पुढे काय ????

आदूबाळ's picture

30 Dec 2013 - 4:56 pm | आदूबाळ

फारच छान! माणसं इथूनतिथून सारखीच!

आडवे छेद देत देत, पण लवकर लवकर लिहीत रहा...

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 5:24 pm | बॅटमॅन

हे आवडलंच! शैली उत्तम आहे तुमची. और आंदो!

कंजूस's picture

30 Dec 2013 - 8:34 pm | कंजूस

बिनपरीटघडीचे चालेल .
पळेल .
डागपण चांगले असतात .

सर्वांनी एकाच विकिपिडिआ छापाचे लिहिण्याचा आग्रह का करतात ?
असंच चालू द्या .

इन्ना's picture

30 Dec 2013 - 9:49 pm | इन्ना

फिकर नॉट :)
मला ठरवूनही तस लिहिता येनार नैये. माझे काचेचे तुकडे अन माझा कॅलिडोस्कोप !