मी त्याला देव मानत नाही…

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
11 Nov 2013 - 9:40 am

मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो...

तो_१
छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची. स्कोरवरुन थोडं बोलणं व्हायचं. क्रिकेटचं वेड असणारी म्हातारी माणसं त्याकाळी विरळच. त्यामुळे त्यांचं आदरयुक्त कौतुक वाटायचं. अशाच एका भेटीत तात्यांनी माझ्या हातात ‘षटकार’ दिला. बहुतेक पहिलाच अंक. त्याच्या मुखपृष्टावर फटाक्याची लड, सुतळी बॉम्ब वगैरे बॅटवर घेतलेला सुनील गावस्करचा मस्त फोटो. ‘षटकार’ आणि ‘क्रिकेट सम्राट’चं व्यसन पुढे बराच काळ टिकलं. षटकारमधे एक बातमी आणि फोटो पाहिल्याचं आठवतंय. त्यात बहुतेक दिलीप वेंगसरकर आपली बॅट, कुरुळ्या केसाच्या एका लहान पोराला भेट देत होता. ती ‘आमची’ पहिली भेट.

काही वर्ष गेली, आम्ही काळे गल्लीतून सहयोग नगरात राहायला आलो. गावातल्या कंकालेश्वरच्या मोकळ्या जागेऐवजी नव्या सो कॉल्ड स्टेडियममधल्या बाभळी तोडून केलेल्या पिचवर क्रिकेट खेळणं सुरु झालं. घरांमधे रेडिओची जागा टिव्हीनं घेतली. सुनिल गावस्कर निवृत्त होऊन काही काळ लोटला होता, त्यांची जागा कोण भरुन काढणार अशी चिंता क्रिकेट कळणाऱ्या प्रत्येकाला होती, म्हणजे तशी मोठ्यांची चर्चा कानावर पडायची.

ऑफ स्टंप बाहेरच्या किंवा बाहेर भर्रकन जाणाऱ्या आऊटस्विंगरला इमानेइतबारे बॅट लावली नाही आणि स्लिपमधे कॅच दिला नाही तर पाप लागतं असा समज असलेली बरीच मंडळी त्या काळात होती टीममधे. जेनुईन फास्ट बोलिंगला आपले फलंदाज एकामागोमाग आऊट होताना बघणं कठीण जायचं. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा दौरा तर फार मनस्ताप देऊन जायचा.

हळुहळू हे चित्र बदलणार होतं.

त्याच्या आगमनाची वर्दी मिळाली होती.

ही मॅच नेमकी कुठं पाहिली, की बातम्यात पाहिलं आठवत नाही पण पाकिस्तानात अनऑफिशियल वनडेत त्यानं अब्दुल कादिरला पुढं सरसावून त्याच्या डोक्यावरुन भिरकावून दिलं तेही एकदा नव्हे तर चारदा… तिथं कौतुक वाटलं, त्या सीरिजमधे नंतर इम्रान, अक्रमला धीरानं सामोरं गेला, बहुतेक पहिल्याच मॅचमधे गॅपमधून जाणाऱ्या त्याच्या दोन कडक बाउंड्रीज पाहून कौतुकात भर पडली, त्यानंतर वर्ष उलटण्याच्या आतच इंगलंडमधलं त्याचं पहिलं वहिलं शतक पाहताना त्या कौतुकाला धार चढली.

वयाने आपल्यापेक्षा दोन चार वर्षच मोठा असलेल्या इतक्या लहान पोराला एवढा मोठा चान्स मिळाला, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतोय वगैरे तुफान कौतुक आणि थोडीशी ज्येलसीही वाटत असावी त्यावेळी. शाळा कॉलेजचं, परिक्षेचं टेन्शन नाय काय नाय, फक्त खेळा, मस्त लाईफंय, साला, आपणही असं काही करायला पाहिजे असे फुका कॉन्फिडन्सचे दिवा स्वप्न रोज. त्याच्या मध्यमवर्गीय वगैरे बॅकग्राऊंडशी सहज जोड़ून घेता यायचं.

1992 चा वर्ल्ड कप अनेक गोष्टींमुळे लक्षात राहिला. बीडात ज्याच्या घरी कलर टीव्ही आहे त्याच्या घरी आम्ही काही मित्र एकत्र जमायचो, थोडा अभ्यास करायचो, भल्या पहाटे म्हणजे बहुतेक अडीच तीन वाजता उठून मॅच बघायचो. मार्टिन क्रोची कॅप्टनशिप, दीपक पटेलनं बॉलिंगची सुरुवात करणं, मार्क ग्रेटबॅचचा धडाका असा काहीसा वेगळा न्यूझीलंड संघ लक्षात राहिला. आणि लक्षात राहिली भारताची तशी सवयीची नांगीटाकू कामगिरी. त्यातही थोडा दिलासा म्हणजे पहिल्याच वर्ल्ड कपमधे खेळणारा, दोन चार मॅचेसमधे मोक्याच्या वेळी येऊन पटकन ५०-६० रन मारणारा, त्याकाळी टीममधे अभावानेच दिसणाऱ्या चपळाईने रन धावणारा, नॉन स्ट्रायकरलाही पळायला भाग पाडणारा, पाकिस्तानविरुद्धची ती मॅच जिंकून देणारी इनिंग खेळणारा तो चांगलाच लक्षात राहिला.

याच काळात क्रिकेटकडून अपेक्षा वाढल्या. त्यापोटी मॅच पाहायचं व्यसन लागलं आणि एखाद्या अॅडिक्टप्रमाणेच मॅच पाहता यावी यासाठी सगळे मार्ग आले.

आई कधीतरी काम सांगायची पण मॅच सुरु असेल तर ते टाळायची कला साध्य केली होती. ती सुरुवात होती.

अमरावती अनेक कारणांनी माझं वन ऑफ द आवडतं शहर. शिक्षणासाठी वगैरे तिथं चार वर्ष राहिलो. कॉलेजमधे किती शिकलो माहिती नाही, बाहेरच्या जगानं मात्र मस्त अनुभव दिेले. काही चांगले मित्रही… मोरे, गावंडे या मित्रकंपनीसोबत रुरलच्या ग्राऊंडवर जवळपास रोज क्रिकेट खेळायचो. समोर गर्ल्स होस्टेलही होतं. आम्ही जिथं राहायचो त्या घरमालकाच्या पोराला रिक्वेस्ट करायची, त्यानं खिडकी उघडी ठेवायची मग खिडकीच्या गजातून दिसणाऱ्या टीव्हीत आपण मॅच बघायची असेही काही दिवस काढले. रुरल होस्टेलला टीव्ही असायचा, तिथं मित्रांकडे जाऊन, दंगा करत काही मॅचेस बघायला मिळाल्या. काही ‘एसप्या’ देशमुखच्या घरी.

तिथे पंचवटी चौकाजवळच्या राधानगरात एक मिनी थिएटर सुरु झालं होतं. एरवी हॉलिवूड मुव्ही बघण्याचा तो अड्डा. तिथे ९६ च्या वर्ल्ड कपच्या मॅचेस लाईव्ह दाखवणार असं कळलं. मोठ्या पडद्याचं अप्रुप होतंच. नेहमीप्रमाणेच एक अडचण होती… पैशांची. महिन्याच्या शेवटी शेवटी- आपत्काळात रुमवर साचलेली पेपर रद्दी आणि बाटल्या (रिकाम्या) हमखास मदतीला यायच्या, सगळ्याच बॅचलर्सच्या येतात कधी न कधी. मोजक्याच मॅचेस बघायचं ठरवलं. सगळी रद्दी आणि होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या बाटल्या (रिकाम्या) महिना संपायच्या आधीच भंगारात घातल्या, आणि मोठ्या पडद्यावर मॅच पाहायची सोय केली.

त्या एका मॅचमधल्या दोन गोष्टी लक्षात राहिल्या, एक, शेन वॉर्नच्या हातून बाहेर पडणारा आणि भयानक पद्धतीनं गर्रगर्र फिरत वळणारा पांढरा चेंडू, मोठ्या पडद्यावर तो आणखीन अंगावर यायचा, आणि दुसरी, भारताला विजयाकडे घेऊन जाणारी पण मार्क वॉच्या धुर्तपणाने यष्टीचित झालेली त्याची इनिंग.

त्यावेळचे त्याच्या आणि आमच्या चेहऱ्यावरचे निराशा हताशेचे भाव एकच असावेत.

पुढचा टप्पा होता परभणी. गाव बदललं पण क्रिकेट प्रेमाबाबतची परिस्थिती फार बदलली नाही. मॅचचा जुगाड कुठे होतो याचीच चिंता अभ्यासापेक्षा जास्त. लोकलचं कोण आहे, ज्युनिअर आहे की सिनीयर आहे, कोणाकडून जॅक लावता येईल असे विचार, मग कनेक्शन लावायचं. अशीच ढाणे-पाटील, संजू’राहुल रॉय’गुगवाड सारखी समवेडी सिनीयर मंडळी भेटली. एकदा त्यांच्यासोबत याचकाचे सगळे भाव तोंडावर ठेवत त्यांच्या मित्राच्या घरी मध्यरात्री आगंतुकपणे धडकलो. तिथं आधीच छोटी जत्रा. थोडावेळ मॅच पाहिली पण पावसानं राडा केला, सगळी मेहनत वाया. आफ्रिकेविरुद्धच्या त्या सीरिजने बऱ्यापैकी निराशा केली पण आम्ही आमचा नित्यनेम नाही सोडला.

नागनाथ होस्टेलला काही काळ पॅरासाईट म्हणून घालवला. मॅच असली की रात्री बाहेर निघायचं, स्टेशनला उभ्या असलेल्या वॅगनच्या खालून अंधारात अंदाज्यानं रुळ क्रॉस करुन गावात जायचं.

कुणीतरी सांगितलं विसावा लॉजमधे मॅच चालु असते मग एक मॅच तिथे धडकलो, तो जो कोणी तिथं ड्युटीवर होता त्याला दादा बाबापुता करत लोणी लावलं, पाचपाच रुपये दिले. मग त्याने आत घेतलं, तिथं जिन्याच्या पायऱ्यावर बसून आवाज न करता थोडा वेळ मॅच बघितली.

आता त्या रोडचं नाव आठवत नाहीये पण परभणीतला फेमस रोड, शेंगदाणे खात संध्याकाळी फिरण्यासाठी चांगला. तिथे मॅचच्या संध्याकाळी मार्केटमधे ज्या दुकानात टीव्ही सुरु असेल तिथं जाऊन दुसरी इनिंग बघायचो. एक आशाळभूत नजर टीव्हीकडे एक नजर गल्ल्यावरच्या दुकानदारावर ठेवत, बाहेर गटारीच्या एका काठावर एक पाय, दुसऱ्या काठावर दुसरा… असा तोल सांभाळायचा; ध्यान लावलेला बगळा आठवायचा; आपल्यामुळे दुकानदाराला थोडा सुद्धा त्रास होऊ नये अशी काळजी घ्यायची. कधी एखादा दुकानदार टीव्हीचा अँगल बदलून बाहेरच्याला म्हणजे आस्मादिकांना दिसणार नाही याची काळजी घ्यायचा, कधी एखादा दुकानदार चॅनलच बदलायचा. एखादा थेट खेकसायचा. एकानं टीव्ही बंद केला तेव्हा मी गटारीवरचा तोल सांभाळून त्याला बोललो, काय काका आमच्या घरीसुद्धा मोठा कलर टीव्ही आहे वगैरे. त्याला काही दया आली नाही. मी पुढच्या दुकानाचा रस्ता पकडला.

अशावेळी मोठया शोरुम्सचाही बऱ्याचदा आधार वाटायचा. तर कधी काही हॉटेलमधेही मॅच सुरु असायची. मनात नसताना जावं लागायचं, खिशाचा अंदाज घेत चहाची ऑर्डर द्यायची आणि जमेल तितका वेळ तिथं काढायचा असेही काही दिवस गेले.

नैरोबीतल्या सहारा कपच्या काही मॅचेस रात्री मेसमधे पाहिल्या. हे सारं किंवा यापेक्षा जास्त झेडझेड करणारे आपण एकटेच नाहीयत हे माहिती होतं.

तो चांगला खेळला, त्यातही भारत जिंकला तर तो दिवस आणि त्याच्या नंतरचे २-३ दिवस एकदम सॉलिड जायचे. मित्र कंपनीत तीच चर्चा. जणू आपणच खेळलो, आपणच मॅच काढली असा आव चेहऱ्यावर घेऊन हिंडायचो. तो आऊट झाला की मॅच बघण्यासाठी आपण उगीच इतकी झेडझेड केली असं वाटायचं.

पण ती ११ वर्ष फार छान गेली. त्याची अनेक कारणं होती. हिरो कपची लास्ट ओव्हर, मार्क मस्कारेन्स हे नाव आणि त्याकाळातला सगळ्यात मोठा तब्बल १०० कोटींचा करार, आपल्याशीच करार केलाय असं समजून कॅलकुलेशन्स करणं. आफ्रिकेत एका सीरिजमधे क्रोनिएनं त्याचा केलेला बकरा, मॅकग्राविरुद्धची उच्च दर्जाची लढत, वॉर्नची धुलाई, शारजाह मधील दोन्ही मॅचमधील तुफानी खेळी, पाकिस्तान विरुद्धची जवळपास प्रत्येक वर्ल्ड कपमधील कामगिरी, नंतर स्टीव्ह बकनरला सर्वात मोठा व्हिलन मानून त्यांच्या अंपायरिंगला दिलेल्या शिव्या, अझर, जाडेजा, मोंगियाच्या काळातली त्याची अगतिकता, क्रिकेट वगैरे वाचवण्याची धडपड, पाकविरुद्धची चेन्नई कसोटी, त्याही अवस्थेत टिच्चून खेळणं मॅच काढायच्या जवळपास नेणं आणि आऊट होणं, आपलं चरफडणं, तो आऊट झाला की मॅच संपल्यात जमा असणं आणि तो स्ट्रेट ड्राईव्ह, अशा अनेक गोष्टी आठवतात.

खेळायचा तो, पण एक वेगळा आत्मविश्वास, सकारात्मकता मिळायची आपल्याला.

सगळ्या गोष्टींचं तुफान कौतुक त्यातलं जास्त मनातल्या मनात.

नंतर नोकरीसाठी हैदराबाद गाठलं. तिथंही निखिलच्या (आता TV9 मुंबई) खाजेपायी दर रविवारी क्रिकेट खेळणं सुरु होतं. क्रिकेट बघायचोही पण ती मजा येत नव्हती, शेवटी तो ही एक माणूस आहे हे लक्षात ठेवायचो त्यामुळे फार अपेक्षाही ठेवायचो नाही.

त्यातल्या त्यात २००३ च्या वर्ल्डकपमधे ती जुनी झलक दिसली शोएब अख्तरला पहिल्याच ओव्हरमधे टाचा उंचावून पॉईंटच्या डोक्यावरुन मारलेला कडक सिक्स जितका आवडला तितकाच इंग्लंडविरुद्ध कॅडीकला मारलेला पुलचा सॉलिड सिक्स मनाला इतका आनंद देऊन गेला त्याला तोड नाही. असे आनंदाचे क्षण अधनंमधनं मिळत राहिले.

नोकरी मुंबईत घेऊन आली. मीडिया कपची प्रॅक्टीस करायची ठरलं. सुधीर रावने शिवाजी पार्कला सकाळी बोलावलं, तिथे एक नेट बुक केली होती. शनिवारी पवारसोबत रवि पवारसोबत पार्कात पोचलो पण बराच वेळ आत जाऊ शकलो नाही. याच मैदानातून सुरुवात केली अशा दिग्गजांची नावं डोळ्यासमोरुन फिरली. कुठं बीडाचं ग्राऊंड, आपलं बॅकग्राऊंड, कुठं शिवाजी पार्क, वेगळंच दडपण जाणवलं. त्यावरुन कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांच्या दडपणाची पुसट कल्पना पुन्हा आली. त्या मैदानात सरावासाठी का असेना कधी मी हातात बॅट किंवा बॉल घेईल असं वाटलं नव्हतं. माझ्यासाठी तो मोठा क्षण होता, जगून घेतला.

एक माणूस… ज्याचा आणि आपला कधीही तसा थेट संबंध आला नाही, पण आपल्या एवढ्या मोठ्या प्रवासात तो आपल्या सोबत असतो, त्याला आपण आपलं मानतो, त्याच्याकडनं अति अपेक्षा ठेवतो, अपेक्षाभंगाचं दु:ख पचवतो, आपलेपणापोटी कधी पाठराखण करतो तर कधी शिव्या घालतो. त्याची निराशा आपली मानतो, त्याचं यश आपलं मानतो, त्याचे माईलस्टोनही आपले मानतो…

असं कधी होतं का आयुष्यात? पण हे झालंय, कोट्यवधी भारतीयांसाठी तब्बल २४ वर्ष आणि माझ्यासाठी किमान पहिली ११ वर्ष तरी.

या ११ वर्षाच्या प्रवासात, मॅच सुरु असताना ज्या आईनं दळण आणायची किंवा कुठल्याच कामाची सक्ती केली नाही, ज्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानातला टीव्ही सुरु ठेवला, मित्रांच्या ज्या मित्रांनी मॅचसाठी त्यांच्या घरात येऊ दिलं, ज्या हॉटेलवाल्यांनी एका चहावर १-१ तास बसून मॅच पाहू दिली, घरमालकाच्या मुलानं ज्यानं टिव्ही दिसेल इतपत खिडकी किलकिली ठेवली, ज्या मित्रांनी कुठल्याही थराला जात मॅच बघायला साथ दिली आणि आम्हाला मॅच बघता यावी म्हणून ज्या रद्दी आणि बाटल्यांनी भंगारात जाणं पसंत केलं अशा अनेक ज्ञात अज्ञातांचे आभार.

या शेवटच्या दोन कसोटीत काहीही झालं तरी त्याची चिंता मला नाहीये,

ती सुरुवातीची ११ वर्ष मला कायमची पुरतील,

तृप्त मनाच्या भरपूर शुभेच्छा सदैव त्याच्यासोबत असतील.

थँक्यू मित्रा…

होय मित्राच, कारण मी त्याला देव मानत नाही…

मला तो सदैव सोबत असणाऱ्या अदृश्य मित्रासारखा जास्त वाटला..

करोडो क्रिकेटप्रेमींच्या जीवनात आनंदाचे असंख्य क्षण पेरल्याबद्दल त्याचे आभार…

थँक्यू व्हेरी मच मित्रा…
तो_१

क्रीडाविचारसद्भावनाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 Nov 2013 - 9:49 am | मुक्त विहारि

झक्कास

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:41 am | रामबाण

आभार

प्रचेतस's picture

11 Nov 2013 - 9:54 am | प्रचेतस

सुरेख

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:42 am | रामबाण

आभार

Dhananjay Borgaonkar's picture

11 Nov 2013 - 10:35 am | Dhananjay Borgaonkar

लैच मनापासुन लिहिलय राव!!!

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:44 am | रामबाण

पर्यायच नव्हता राव :-) कधी कधीची येते अशी संधी... सो लिहिलं :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2013 - 10:44 am | डॉ सुहास म्हात्रे

लै ब्येष्ट ! निखळ सुरेख !! खरंच हृदयाच्या कोपर्‍यातून पुढे आलेले लिखाण !!!

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:46 am | रामबाण

आभार

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Nov 2013 - 10:52 am | लॉरी टांगटूंगकर

सुरेख लिहिलय !!!

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:46 am | रामबाण

आभार

झंम्प्या's picture

11 Nov 2013 - 11:11 am | झंम्प्या

"एक माणूस… ज्याचा आणि आपला कधीही तसा थेट संबंध आला नाही, पण आपल्या एवढ्या मोठ्या प्रवासात तो आपल्या सोबत असतो, त्याला आपण आपलं मानतो, त्याच्याकडनं अति अपेक्षा ठेवतो, अपेक्षाभंगाचं दु:ख पचवतो, आपलेपणापोटी कधी पाठराखण करतो तर कधी शिव्या घालतो. त्याची निराशा आपली मानतो, त्याचं यश आपलं मानतो, त्याचे माईलस्टोनही आपले मानतो""

लय भारी... आयुष्यात अशा खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण मनापासून करतो, ज्या आपल्याला आत्मिक आनंद देऊन जातात. त्यासाठी भोगलेल्या कष्टांच दुक्ख होण्यापेक्षा, समाधान वाटत. नशीबवान आहात की अशा कुठल्याशा गोष्टीचं व्यसन तुम्हाला आहे.

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:48 am | रामबाण

आयुष्यात अशा खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण मनापासून करतो, ज्या आपल्याला आत्मिक आनंद देऊन जातात. त्यासाठी भोगलेल्या कष्टांच दुक्ख होण्यापेक्षा, समाधान वाटतं

अगदी.. तसंच समाधान मिळालं त्या ११ वर्षात

होय मित्राच, कारण मी त्याला देव मानत नाही…

हे पटलं आणि आवडलं!!!

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:50 am | रामबाण

जरा धाडसाचं होतं, पण तसंच वाटलं.. देव नव्हे मित्र :-)

बाबा पाटील's picture

11 Nov 2013 - 11:18 am | बाबा पाटील

जिंकलस मित्रा....!

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:51 am | रामबाण

आभारी आहे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Nov 2013 - 11:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त लेखन !!! बर्याच दिवसांनी या विषयावरचा चांगला लेख वाचायला मिळाला. अन्यथा तेच तेच देव मानणारे व्यक्तीपूजक लेख वाचून उबग आला होता.

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:54 am | रामबाण

मला तोच धोका वाटत होता... पण टळला बहुदा :-)
आभारी आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Nov 2013 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त लिहिलय राव,
सच्या बद्दल बर्‍याच जणांच्या याच भावना असतील.
त्याची रिटायरमेंटची बातमी हुरहुर लावणारीच आहे.

रामबाण's picture

11 Nov 2013 - 11:57 am | रामबाण

होय...हुरुहुर आहेच.. २ दशकांचं नातं अनेकांचं... कमी जणांना असं भाग्य लाभतं..

चावटमेला's picture

11 Nov 2013 - 12:13 pm | चावटमेला

सुंदर लेख.
बादवे, माझ्या आठवणीनुसार सहारा कप च्या मॅचेस नैरोबी मध्ये नाही तर टोरांटो मध्ये झाल्या होत्या. असो, त्यमुळे लेखाचं महत्व कुठेही कमी होत नाही.

रामबाण's picture

12 Nov 2013 - 9:00 am | रामबाण

सहारा कप एवढं पक्कं आठवत होतं, केनिया की कॅनडा वगैरे गोंधळ होताच.. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारीय.. मूळ ब्लॉगमधे बदल करतो...

फारएन्ड's picture

11 Nov 2013 - 12:24 pm | फारएन्ड

सुंदर लिहीले आहे! एकदम स्पॉण्टेनियस. खूप आवडले.

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 12:34 pm | स्पंदना

मित्र म्हणन आवडलं. त्यामुळे तो माणूस ठरतो, उगा अव्वाच्या सव्वा अपेक्षांच ओझ डोक्यावर न लादता त्याचा निखळ खेल पाहता येतो.
आमच्या पेक्षा तर दोन वर्षान लहाणच हे पोरग. "कस झक्कास खेळतय सच्या" अस म्हणनच जास्त!
त्यातल्या त्यात तुमच

या ११ वर्षाच्या प्रवासात, मॅच सुरु असताना ज्या आईनं दळण आणायची किंवा कुठल्याच कामाची सक्ती केली नाही, ज्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानातला टीव्ही सुरु ठेवला, मित्रांच्या ज्या मित्रांनी मॅचसाठी त्यांच्या घरात येऊ दिलं, ज्या हॉटेलवाल्यांनी एका चहावर १-१ तास बसून मॅच पाहू दिली, घरमालकाच्या मुलानं ज्यानं टिव्ही दिसेल इतपत खिडकी किलकिली ठेवली, ज्या मित्रांनी कुठल्याही थराला जात मॅच बघायला साथ दिली आणि आम्हाला मॅच बघता यावी म्हणून ज्या रद्दी आणि बाटल्यांनी भंगारात जाणं पसंत केलं अशा अनेक ज्ञात अज्ञातांचे आभार.

हे फार भारी वाटलं.
आणी हो जे काय आभार मानायचे ते शेवटी एकदम माना. नाहीतर प्रतिसाद उगा दुप्पट दिसतात.
(च्यामारी हा पर्‍या कुठे उलथला? हे खरतर त्याच काम)

बॅटमॅन's picture

11 Nov 2013 - 12:38 pm | बॅटमॅन

आवडले हो लेखन. मस्त लिहिले आहे.

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2013 - 12:44 pm | जे.पी.मॉर्गन

तुम्ही त्याला देव मानत नसलात (आम्ही पण नाही मानत) तरी ह्या लेखातली कृतज्ञता मनाला भिडली.

मस्त लिहिलंय!

जे.पी.

तुमचा अभिषेक's picture

11 Nov 2013 - 1:32 pm | तुमचा अभिषेक

असाच एक नशीबवान मी सुद्धा, जो क्रिकेट कळायच्या आणि बघायच्या वयात सचिनच्या सोबतीनेच आला, ज्याला सचिन आपलाच एक मोठा दादा वाटला..

मस्त लेख.. स्वताशीही रिलेट झाले...

अवांतर - यंदा सचिनवरच्या लेखांचेही शतक झाल्यास नवल नाही.

अग्निकोल्हा's picture

11 Nov 2013 - 2:45 pm | अग्निकोल्हा

उतरल्या आहेत.

प्यारे१'s picture

11 Nov 2013 - 3:13 pm | प्यारे१

चोक्कस!
सुंदर लेख.

सचिननं सगळ्या मध्यमवर्गीयांना लढायला शिकवलंय. मोठी स्वप्नं बघायला शिकवलं.
एका सामान्य घरातनं आलेला पोरगा जास्त न शिकता नि मुख्य म्हणजे सरळमार्गाने* खेळूनसुद्धा मोठा होऊ शकतो हे देखील लोकांना कदाचित तेव्हापासूनच माहित झालं, अंगवळणी सुद्धा पडलं.

त्याला देव म्हणावंसं कधीच वाटलं नाही मात्र त्याच्यातली एकाग्रता, जिद्द, ओतून देण्याची नि मुख्य म्हणजे प्रचंड प्रसिद्धीत सुद्धा जमिनीवर पाय असण्याची वृत्ती नि असेच अनेक गुण 'दैवी' या टॅगसाठी अत्यंत योग्य आहेत.

*-सचिनला चांगलं खेळूनच पैसे मिळायला सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये पैसा कसा, किती, कुणी आणला हा वेगळा विषय आहे

विटेकर's picture

11 Nov 2013 - 4:02 pm | विटेकर

लेख आवडला. दरम्यान .. " सचिन रमेश तेंडुलकर " या अक्षरांनी काढलेले एक गण्पतीचे चित्र " वरं-कायं" वर आलेले येथे देत आहे ..Sachin ganesh

कृतज्ञता अतिशय नेमकी व्यक्त झाली आहे; लेख आवडला.

शैलेन्द्र's picture

11 Nov 2013 - 5:31 pm | शैलेन्द्र

आमच्या पिढीच्या भावनांना न्याय देणार लिखाण, सचिनच्या दोन चार वर्ष मागे पुढे असलेल्या आमच्या वयातील मुलांनी त्याच्याकडे कधीच देव म्हणुन पाहिल नाही, तरी तो मनाच्या अगदी जवळ राहिला, कुठेतरी बहूदा आम्ही त्याच्या यशामध्ये स्वतःलाच पहात होतो ..

अमेय६३७७'s picture

11 Nov 2013 - 7:07 pm | अमेय६३७७

मनापासून लिहिलेय, भावना भिडल्या. सुंदर लेखन.

अद्द्या's picture

11 Nov 2013 - 7:23 pm | अद्द्या

सरळ साधा . अगदी मनापर्यंत पोचणारा लेख .
सुंदर लिखाण :)

सोत्रि's picture

12 Nov 2013 - 12:07 pm | सोत्रि

एकदम प्रामाणिक लेख!

- (सचिनला देव मानणारा पण त्याचा बाऊ न करणारा) सोकाजी

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 12:20 pm | चतुरंग

एकदम मनमोकळे लिहिले आहे, मनात येत जातील तसे लिहिलेले विचार परंतु अतिशय जिव्हाळ्याचे!

(सचिनपंखा)रंगा

चिगो's picture

12 Nov 2013 - 7:45 pm | चिगो

उत्स्फुर्तपणे मनातून उतरलेलं आणि मनापर्यंत पोहचलेलं लिखाण.. आवडले.

मेघवेडा's picture

13 Nov 2013 - 1:54 am | मेघवेडा

छान लिहिलंय. आवडलं! :)

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2013 - 3:05 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम!!

कमी अधिक प्रमाणात माझ्या पिढीतल्या सर्वांच्याच भावना परिणामकारकपण मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

बहुगुणी's picture

13 Nov 2013 - 5:13 am | बहुगुणी

खेळायचा तो, पण एक वेगळा आत्मविश्वास, सकारात्मकता मिळायची आपल्याला.
हे वर्णन म्हणजे अगदी परफेक्ट सार आहे 'सचिन तेंडुलकर' नावाच्या शांत झंझावाताचं आणि त्याने भारतीय मनांवर केलेल्या जादूचं!