आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली.
नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय.
अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!
पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.
दादा हा ताईदेखील असू शकेल.. :)
आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.
लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.
थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.
३१ ऑक्टोबर..
१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.
२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..
३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.
४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.
५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्यात नेणे. (कोपर्यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)
पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.
बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.
भेटू..
प्रतिक्रिया
25 Oct 2014 - 1:30 pm | कवितानागेश
Congratulations गवि.
25 Oct 2014 - 7:54 pm | प्रास
मग पार्टीसाठी कधी बोलावतोयस?
वाट पाहतोय... :)
27 Oct 2014 - 10:17 am | जेपी
मस्त.
4 Nov 2014 - 9:24 am | कवितानागेश
पुढे काय झालं? अन्डी घातली का? आम्ही वाट बघतोय. :)
4 Nov 2014 - 11:29 am | गवि
अंडी घातली आहेत घुबडीने. सध्या ती त्या अंड्यांवर सदैव बसून राहात असल्याने क्यामेरा इंस्टालेशन करण्याचा अवसर मिळत नाहीये.
पिल्ले आली की सांगतो.
4 Nov 2014 - 2:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही त्या जागेवर एक चांगल्या प्रतीचा कॅमेरा परमनंटली बसवुन टाका हो.
कारण आता हे पाहुणे दर वर्षीच येणार तुम्ही हुसकावून लावत नाही तो पर्यंत.
रच्याकने :- तुमच्या शेजार्यांनी कधी ऑबजेक्षन घेतल नाही का या पाहुण्यांना?
पैजारबुवा,
4 Nov 2014 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
धाग्यातले सगळे व्हिडिओ "प्रायव्हेट आहेत" असे म्हणत दिसत नाहीत.