अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 1:39 pm

"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."

खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला.

नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो.

एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती.

घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते.

मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं.

पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता.

तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड...

मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले.

आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर.

असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही.

चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो.

घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी..

बरं.

तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी.

आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे.

अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात.

त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात.

मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही.

आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्‍यातून येणार्‍या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन.

कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं.

नुसतीच अंडी. पक्षी नाहीच.

First

श्रीमती घुत्कर:

B

पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.

म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.

D

पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.

E

अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:

F

बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.

आत्तापर्यंत दिसलेलं:

- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.

- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.

पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.

काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.

बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.

सी यू सून.

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:02 pm | बॅटमॅन

इंचा-इंचाने

शब्द बाकी काळजाला भिडला. आयडीचे नावही तुमच्यासारखेच.

सासुरवाडीकर's picture

22 Oct 2013 - 6:57 pm | सासुरवाडीकर

वेगळाच विषय हाताळायला मिळतोय गवि अभिनंदन आणि शुभेच्छा.
वेळो वेळी डिटेल्स मिळत जातीलच याची खात्री आहे.
वेबकॅमची कल्पना पण भारीच.

सहमत.

शिल्पा ब's picture

22 Oct 2013 - 10:00 pm | शिल्पा ब

BRAVO !

गवि's picture

23 Oct 2013 - 7:59 am | गवि

दुसरे पिल्लू बाहेर. सातपैकी पाच अजूनही अंड्यात. उंदीर गायब. सर्वांनी मिळून पोटात घातलेला दिसतो. ब्रेकफास्ट लंच डिनर..

आता बघू पुढे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2013 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हिडियोची आयड्या भारीय तुमची. आवडीने हे सर्व निरिक्षण चालू आहे म्हटल्यावर क्या कहने.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

23 Oct 2013 - 11:28 am | चतुरंग

त्या घुबडिणीचे कान जबरी तिखट असणार. कारण वेबकॅम चालू झाल्याझाल्या तिने लगेच तिकडे बघितले.
तुमच्या वेबकॅमला ऑटोफोकस आहे का? कारण त्यातल्या सर्वो किंवा स्टेपरचा आवाज आला तर ती वर बघणार!

या क्लिपच्या वेळी वेबकॅम चालू केला आहे असं नव्हे.

वेबकॅम सतत चालूच आहे. या सीनपूर्वीही अनेक व्हिडीओ कॅप्चर झाले आहेत.

त्यामुळे या क्षणी कॅमेरा चालू झाल्याचा आवाज वेगळा आला नसणार.

मोशन डिटेक्शन मोडमधे अधेमधे ठेवतो (समोर सतत बसणे शक्य नसल्याने). त्यामुळे कॅमेर्‍याच्या एन्डला काही घडत नसावं. फक्त रेकॉर्डिंग (सॉफ्टवेअरमधे) चालू बंद होतं.

बाकी वेबकॅममधून काही याखेरीज वेगळा आवाज येत असेल तर माहीत नाही. मॅन्युअल (डिजिटल) झूम आणि काही प्रमाणात पॅनिंगची सोय आहे. ती सॉफ्टवेअर कंट्रोलमधूनच.

हा कॅमेरा आहे:

A

अर्थात तो एका पॅकेजिंग मटेरियलच्या ठोकळ्यात घालून ठेवला आहे. समोरचा LED बंद ठेवण्याचे सेटिंग केले आहे. (प्रत्यक्ष बंद झाला का हे पहायचे तर पुन्हा सर्व उचकटावे लागेल.)

तरीही नवीन वस्तू घुबडिणीने नोट केली आहे. ती घुबडिणीला कदाचित एका डोळ्यासारखी भासत असेल. पण या वस्तूपासून उपद्रव नाही हे दोनतीन दिवसात समजल्याने तिला साधारणपणे त्यापासून आता धोका वाटत नाही असं दिसतं आहे.

सुधीर's picture

23 Oct 2013 - 2:24 pm | सुधीर

ह्या वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून,आणि इतर काही वेगळ्या क्लिप्स जोडून, सोबतीला संगीत आणि समालोचन देऊन एक शॉर्ट फिल्म बनवता येऊ शकेल. जी या पक्षाच्या जीवावर उठणार्‍यांना नवीन काही तरी दाखवेल. :)

सुनील's picture

23 Oct 2013 - 3:16 pm | सुनील

छान ऐडिय्या!!

एक घुबड पाळायची इच्छा झालीय.

प्रसाद गोडबोले's picture

23 Oct 2013 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले

गवि मस्त चालु आहे प्रयोग . हा कॅमेरा भन्नाट आहे ...पुर्णवेळ बीझी न रहाता नीरीक्षण करता येत आहे :)

( लेख फेसबुकावर शेयर करीत आहे )

आनंद's picture

23 Oct 2013 - 11:45 am | आनंद

मस्त चाललय ! फ्क्त ते "अपशकुनी" काढता आल तर बघा दुसर काही नाव देता आल तर बघा.

किणकिनाट's picture

23 Oct 2013 - 12:01 pm | किणकिनाट

एकदम हटके विषय आणि धागा.
सारखेच अपडेट्स पाहात राहायचे वेड लावणारा विषय हाताळता आहात.

आणि १००% आनंद्ला अनुमोदन.

एवढ्या कौतुकाने पाहिल्या जाणर्या धाग्याचे शिर्षक "अपशकुनी" नको बुवा.

किणकिनाट.

नादखुळा छंद आहे गवि. आम्हाला इथे बसुन बघताना इतका आनंद होतोय तर तुम्ह्ला प्रत्यक्ष पहायला मिळतय म्हटल्यावर तुमच्या आनंदाला पारावार नसावा.
बाकी आनंदराव म्हणतायत तसं नाव बदलता आलं तर पहा. :)

वासु's picture

23 Oct 2013 - 4:52 pm | वासु

छान आहे

सुदर्शन काळे's picture

23 Oct 2013 - 11:01 pm | सुदर्शन काळे

लेख वाचल्यापासुन अपडेट्स बघतो आहे.

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 2:40 am | प्यारे१

भन्नाट आहे गविशेठ.

आज एक नव्हे तर तीनतीन उंदीर शिकार करुन आणलेले दिसताहेत.

A

पुन्हा एकदा: रात्री व्हिडीओ अजूनतरी मिळत नसल्याने ही शिकार आईच करतेय की बापही जिवंत आहे याचा पुरावा नाही. नाईट व्हिजनची सोय केली पाहिजे. एरवी आपल्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर काळोखात टॉर्च मारणं मला पटत नाही.

इतक्या उंदरांचा स्टॉक का केला असावा? पुढच्या पिल्लांच्या अपेक्षेने का?

पहिल्या आणि दुसर्‍या पिल्लात ३ दिवसांचं अंतर होतं. रविवारी पहिलं, बुधवारी दुसरं, अशा क्रमाने साधारण शुक्रवार शनिवारी तिसरं यायला हवं. आज उरलेली पाच पिल्लं अजूनही अंड्यातच आहेत.

वाईट गोष्ट म्हणजे आज सकाळी एका पिल्लाची काहीच हालचाल दिसत नाहीये. खालील व्हिडीओ पहा.

पण ते जिवंत नाही असं इतक्यावरुन खात्रीने सांगता येणार नाही. ते हालचाल करेल अशी आशा. कार्यालयातून घरी गेलो की संध्याकाळी खात्री करुन सांगेन. हे आधी जन्मलेलं (दोघांतलं मोठं) पिल्लू आहे असा अंदाज.

नाही नाही गवि, पोट म्हणजे जठर हलतय थोडस. खाल्ल्यामुळे गप्प असाव. मला पोट थोडस हलताना दिसतय.

गवि's picture

24 Oct 2013 - 4:26 pm | गवि

विष घातलेले उंदीर खाल्ल्यामुळे मुख्यतः घुबडं मरतात. लहान पिल्लांना तर हा विषाचा अंश अजिबात सहन होत नाही. त्याच कारणाची भीती आहे. सगळीकडे कमीजास्त फरकाने घुबडांना हाच प्रॉब्लेम आहे कारण शहरांमधे उंदरांना अमिष ठेवून सापळ्यात पकडणे या सोबत दुसरा मार्ग म्हणजे विषारी अन्न ठिकठिकाणी ठेवणे किंवा रॅटकिल वगैरे हाही वापरला जातो. :(

झोपलं असावं अशीच इच्छा आहे. पोट हलताना मला तरी दिसलं नाही. दुसर्‍या पिल्लाचं पोट / छाती हलतेय ते स्पष्ट आहे. आता पुन्हा बघतो.

स्पंदना's picture

24 Oct 2013 - 5:55 pm | स्पंदना

ओय! नको हो! ती शिकारीची उंदर असावीत.
आणि बाळाला जेवण पचवायला असच घोडे बेचके झोपाव लागत असाव. मी आत्त्ता नवर्‍याला दाखवल. त्यालापण पोट हललेल दिसल.

वा! खाण्यापिण्याची चंगळ आहे म्हणजे दिवाळी मस्त जाणार तर आपली.

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Oct 2013 - 8:22 pm | माम्लेदारचा पन्खा

सगळ्यांनाच नाही बघायला मिळत सहसा असले काही...

घुबड सारखा सुंदर पक्षी नाही जगात दुसरा....

जे करताय ते चालू राहू दे.....

आज सकाळपासून त्या काल निपचित पडलेल्या पिल्लाचे काय झाले ते बघायला बराच वेळ नेटाने निरीक्षण केलं. पण घुबडाई पिल्लांवर बसलेल्या हलायलाच तयार नव्हत्या. काही सेकंद उठल्या तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी:

१. तिसरे अंडे उघडले आहे. म्हणजे अजून एक (तिसरे) पिल्लू जन्मले आहे.
२. तेवढ्या हालचालीमधे एकच पिल्लू दिसले (व्हिडीओ पहा) ते दमदार हालचाली करत होते. बाकीची पिल्ले पंखाखाली असल्याने दिसली नाहीत. त्यामुळे त्या कालच्या पिल्लाच्या नशिबाविषयी मनात सस्पेन्स घेऊनच घरातून निघावे लागले.

फोटोंमधे.. (काहीजणांना घाण / किळसादि वाटू शकेल पण जे काही असेल ते लॉग करणे या उद्देशाने लिहीले पाहिजे.)

१. आज आणखी एक नवा उंदीर आणलेला दिसला.

A

२. घुबडांच्या पद्धतीप्रमाणे न पचलेल्या अन्नभागाला तोंडावाटे गोळीच्या स्वरुपात बाहेर टाकणे. या गोळ्यांना पॅलेट्स म्हणतात. पहाटे जरा अंधारात काढल्याने हे गुप्तहेर फोटो जास्त क्लिअर नाहीत. रात्री काहीतरी मारामारी झाली असावी कावळे / अन्य कोणाशी. कारण पिसे पडलेली दिसत होती (घुबडाची स्वतःची).

B

३. मधेच खाली झुकून पिल्लांना साफ करणे किंवा चोचीने स्पर्श करणे, खाजवणे यांपैकी एक चालू असतं.

C

नानबा's picture

25 Oct 2013 - 11:04 am | नानबा

कॅमेरा, दडवण्याच्या आयडियेची कल्पना, मिळालेले तपशील, सगळंच एक नंबर...

भटक्य आणि उनाड's picture

25 Oct 2013 - 11:42 am | भटक्य आणि उनाड

अगदी बिग बॉस स्टाइल रिअ‍ॅलिटी शो.. चालु द्या.. अभिनन्दन..

सुबोध खरे's picture

25 Oct 2013 - 1:00 pm | सुबोध खरे

ग वि साहेब,
एक तर घुबडे मेलेले उंदीर सहजा सहजी खात नाहीत कारण ते रात्री आपल्या नजरेने आणि ऐकण्याच्या शक्तीने हालचाल करनार्या उंदराला अंधारात शोधतात. त्यामानाने त्यांना मेलेला उंदीर सहज दिसत नाही. आणि शिवाय दोन सर्वात जास्त वापरली जाणारी मूषक नाशके म्हणजे झिंक फोस्फाईड आणि ब्रोमोडायोलोन. हि आहेत. यापैकी झिंक फोस्फाईड हे उंदराच्या शरीरात पूर्ण विघटन पावते आणि त्यामुळे त्याचा उंदीर खाणार्या प्राण्यांवर परिणाम होत नाही पहा http://npic.orst.edu/factsheets/znptech.pdf
ब्रोमोडायोलोन मुले उंदीर ३ ते ७ दिवसांनी अंतर्गत रक्तस्त्रावाने मरतात पण बहुधा ते बिळात जाऊन मरतात त्यामुळे असे उंदीर घुबडांच्या तावडीत सापडतील हि शक्यता कमी आहे. त्याशिवाय ब्रोमोडायोलोनमुळे येणारा मृत्यू हा काही दिवसांनी होत असल्याने घुबडाची पिल्ले एवढ्यात त्याला बळी पडतील अशी शक्यता फार कमी आहे.
ईश्वरेच्छा बलीयसी

तसंच होऊ दे आणि कोणतीही विषबाधा न होऊदे अशी इच्छा....

मेलेले उंदीर घुबड खात नाही हे माहीत आहे, पण मरण्यापूर्वी / अर्धमेले उंदीर पकडू शकतं. त्यामुळे मुख्यतः त्यांचे मृत्यू होतात असं दोनतीन संदर्भांत वाचलं होतं म्हणून तसं वाटलं. तुम्ही दिलेली माहिती वाचून बरं वाटलं.

हे उंदीर मृतावस्थेत खिडकीखाली असू देण्यात माझ्या घरच्यांना मोठा आरोग्यविषयक धोका आहे का?

हाच प्रश्न न पचलेल्या अन्नाची बाहेर टाकलेली पॅलेट्स आणि अन्य उत्सर्जिते यांविषयीसुद्धा आहे.

खिडकी बारीक फट वगळता बंदच ठेवली आहे. तिथेच विंडो एसी आहे, तोही सध्या वापरत नाहीये. तो वापरल्यास तिथली दूषित / संसर्गित हवा आत येईल ना?

घाण वास येत असेल तर हे सगळ थांबवणच योग्य असेल.

सुबोध खरे's picture

25 Oct 2013 - 7:57 pm | सुबोध खरे

गवि साहेब,
ए सी जर रिसर्क्युलेशन मोड वर वापरला तर बाहेरची हवा आत येणार नाही त्यामुळे तसे वापरावयास हरकत नाही.
परंतु ए सी च्या आवाजाने घुबडाला अत्यंत त्रास होण्याची शक्यता आहे. मुळात त्यांचे कान अतिशय तीक्ष्ण असतात त्यात विंडो एसी चा पंखा पूर्ण वेळ आवाज आणि कंपन( vibrations) करीत असेल तर काय होईल ते सांगणे कठिण आहे.
मेलेल्या उंदरांचे तुम्हाला तसे काही प्रदूषण होण्याची शक्यता कमी आहे.

सुमीत भातखंडे's picture

25 Oct 2013 - 1:39 pm | सुमीत भातखंडे

चाललय समालोचन....वाचतोय

सुखी's picture

25 Oct 2013 - 5:35 pm | सुखी

जबर्या उपक्रम...

अमेय६३७७'s picture

25 Oct 2013 - 7:21 pm | अमेय६३७७

वेगळाच अनुभव, वेबकॅमची क्लॅरिटी खतरनाक आहे. शाळेतील पाठ्यपुस्तकात चिमण्या आणि मुलं धडा होता, त्याची आठवण आली.
आमच्या खिडकीत मागील हिवाळ्यात कबुतरीणबाई आल्या होत्या. दोनच अंडी होती. बहुतेक कबुतरांपर्यंत कुटुंबनियोजन पोचले आहे, घुबडांचा नंबर यायचाय अजून.

गव्हाणीचे घुबड मुंबईतही खूपशा ठिकाणी आढळते. याचे कारण तिथे उंदरांचा सुळसुळाट आहे. डॉ. गिरीश जठार हे घुबडांवरचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वनपिंगळ्यावरील पुण्यातील इंद्रधनू येथील व्याख्यानात त्यांनी हे सांगितले होते.

धाग्याचं नाव बदलता आलं तर जरूर पहा. कारण उगाच काहीबाही विषय घेऊन चर्वितचर्वण करत बसली असतील मंडळी असा समज झाल्याने मी हा धागा सगळ्यात शेवटी उघडून पाहिला. :(

जाताजाता, जितकं शक्य असेल तितका निसर्गाच्या व्यवहारांमधील हस्तक्षेप टाळावा.

आधी वाटलेली काळजी खरी ठरली नाही. एक पिल्लू गेलं होतं असं वाटलं पण चार अंडी अक्षत दिसताहेत आणि तीन पिल्लंही तेव्हा सर्व जिवंत आहेत. माझा गैरसमज झाला..

शुक्रवारीच आणखी एक पिल्लू जन्मलं होतं. मला असं वाटलं की दोन नंबरचं पिल्लू जगण्याच्या झगड्यात बळी गेलं. पहिलं तिसरं आणि चौथं सध्या अस्तित्वात आहेत. पण तीनच जन्मली आहेत आणि तिन्ही जिवंत आहेत हे आता कळलं. नंबर १ आता मोठं झालं आहे. त्याचे डोळे उघडले आहेत. त्याने खाणंपिणं व्यवस्थित सुरु केलं आहे आणि त्याउपर आता अविर्भाव करुन शत्रूला (शत्रू = मी, कावळे इत्यादि) घाबरवणंही सुरु केलं आहे.

सोमवार सकाळचा व्हिडीओ:

आता एक विशेष गोष्ट. या व्हिडीओबाबत आणि त्यावेळच्या घटनेबाबत. मी आज पहिल्यांदाच फोटोच्या / व्हिडीओच्या मोहात पडून एक चूक केली. मी पहिल्यांदाच थेट कॅमेर्‍याने फोटो काढायला म्हणून खिडकी उघडली आणि हात बाहेर काढले. मला माहीत होतं की अशाने घुबडाई उडून जाते. पण तरीही मी ते केलं कारण तशीही शिकारीसाठी ती काहीकाळ पिल्लांना सोडून दूर जातेच असं मला वाटत होतं.

तशी ती खरंच उडून समोरच्या झाडावर जाऊन बसली. आणि त्यानंतर एक भयंकरच नाटक घडलं ज्यामुळे मला बर्‍यापैकी धक्का बसला.

जणूकाही घुबडाई तिथून बाहेर निघण्याची दिवसरात्र वाट पाहात असल्याप्रमाणे आजवर घराजवळ कधीही न दिसणारा कोतवाल (ब्लॅक ड्रोंगो) पक्षी तातडीने तिथे येऊन घुबडाच्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी घुसू लागला. मी त्याला हुसकावलं कारण चूक माझी होती.

तेवढ्यात सात आठ कावळ्यांचा एक झुंड आला. तोही टपून बसल्यासारखाच दिसत होता. त्यांनी टीमवर्क करुन पिल्लांना खायचंच असं टार्गेट ठेवल्याप्रमाणे काम विभागून घेतलं. दोन कावळे घुबडामागे लागून त्याला भेवडवून आणखी दूर घेऊन गेले. (आउट ऑफ साईट) बाकीचे तीनचार कावळे घरट्यामधे घुसायला लागले. मी बर्‍यापैकी सटपटलो कारण माझ्या एका कृतीने आता ती तिन्ही पिल्लं मरणार होती. मला एकदम टेन्शन आलं आणि मी त्या कावळ्यांना हुसकावत तिथेच उभा राहिलो.

आता आपत्ती अशी होती की मी तिथे हुसकत उभा असेपर्यंत घुबडही परत येणार नाही आणि मी हुसकणं थांबवून आत गेलो तर कावळे एक मिनिटही पिल्लांना जिवंत सोडणार नाहीत.

यातून मार्ग काढण्यासाठी मी खिडकीच्या लेव्हलखाली लपून कावळ्यांना आवाजाने हाकलत राहिलो. एकदोन मिनिटांनी ते घुबड कावळ्यांचा ससेमिरा चुकवून घरट्यात आलं. ते खूफिया कॅमेर्‍यात पाहून माय सोल फेल इन युटेन्सिल.

मग सर्व पूर्ववत झालं. आता स्वतःच्या उतावीळपणापायी असले प्रयोग करायचं नाही असा स्टोन टू ईअर.

:)

आणखी एक व्हिडीओ. वरुन व्ह्यू असल्याने नीट दिसत नाही पण भक्ष्याचे लचके तोडणं (बहुधा पिल्लांना भरवण्यासाठी) चालू आहे. पिल्लांचे चर्प चर्प ऐकण्यासारखे आहे. व्हॉल्यूम वाढवा.

यसवायजी's picture

28 Oct 2013 - 6:40 pm | यसवायजी

आल इज वेल हे वाचल्यावर माय सोल अल्सो फेल इन युटेन्सिल.
सगळंच मस्त.. आवडल्या गेलेलं आहे..

एस's picture

29 Oct 2013 - 12:20 am | एस

हुश्श्श्श्श...

बहुगुणी's picture

29 Oct 2013 - 1:51 am | बहुगुणी

तुमच्यातल्या भूतदयेला सलाम! तुम्ही त्या घुबडाईला ऊठवून लावण्यात 'उतावीळपणा' केला म्हणत असलात तरी आमच्यापैकी बहुतेकांनी उत्सुकतेपोटी exactly तेच केलं असतं, what mattered is that your soft side showed through आणि thanks to you, मायलेकरं सुरक्षित आहेत!

बाकी ते "माय सोल फेल इन युटेन्सिल...स्टोन टू ईअर..." खासच!

स्पंदना's picture

29 Oct 2013 - 8:15 am | स्पंदना

बघा? मी म्हंटल होतं कनी? त्याच पोट हलत होत. जेवण पचवायला ते तस गप्प पडल होतं.
मस्त आहे व्हिडीओ.

ज्यांना व्हिडीओ दिसत नाही त्यांच्यासाठी एक प्रतिमा..

A

पैसा's picture

28 Oct 2013 - 11:10 am | पैसा

ही एकटीच पिलांना सांभाळत असेल तर खरंच ग्रेट आहे!

सूड's picture

28 Oct 2013 - 5:28 pm | सूड

मस्तच !!

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 5:39 pm | चित्रगुप्त

वाहवा. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि अगदी वेगळा धागा.
पुढे काय काय कसकसे होते, हे बघण्याची उत्सुकता आहेच.
जीएंनी 'पिंगळावेळ' असे ज्याला म्हटले आहे, त्यावेळी म्हणजे साधारणतः पहाटे चारच्या सुमारास घरासमोरच्या तारेवर एक पिंगळा (हे नेमके कोणत्या जातीचे घुबड असते, हे ठाऊक नाही, पण लहानसे असते) येऊन बसतो, आणि काहीतरी 'बोलून' उडून जातो, असे बरेचदा बघितले आहे. ही घुबडीण पहाटे अवाज काढते का?

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2013 - 1:43 am | प्रभाकर पेठकर

इतर पक्षांपेक्षा दिसायला वेगळे असल्या कारणानेच घुबड खुप आवडते. वेब कॅम द्वारे घुबड कुटुंबाची दिनःश्चर्या टिपून आणि सोबतीच्या समालोचनाने ह्या पक्षीविषयक ज्ञानात भर पडते आहे.

गवि's picture

29 Oct 2013 - 1:27 pm | गवि

सर्वांना थँक्स.. :)

पिल्लं कशी आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या साईझची दिसताहेत ना?

घुबडाच्या पिल्लांना काहीतरी शब्द काढला पाहिजे.. कॅट - किटन, डॉग - पपी, गाय - वासरु, घोडा - शिंगरु तसं.

बादवे, मला एक इमिनंट घटना काळजीत पाडते आहे. आवाजाबाबत अत्यंत सेन्सिटिव्ह असलेले हे पक्षी चारच दिवसात येणार्‍या दिवाळीच्या बाँब्स आणि कडकड वाजणार्‍या माळांना कसे सहन करणार? विशेषतः पिल्लं. एखादा अग्निबाण घरट्यात शिरु नये अशी इच्छा. अर्थात तशी शक्यता कमी आहे.

नाय हो अस काय होणार नाय !काय पण आणु नका मनात ! मस्त चाललंय सगळं ! हि पिल्लं मोठी होणारेत सगळी !!

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2013 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर

कॅट - किटन, डॉग - पपी, गाय - वासरु, घोडा - शिंगरु तसं.

घुबीज..

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2013 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर

किंवा

औल ची 'औलेट्स'.

आउलेट हा शब्द आहे आधीच. पिंगळा (घुबडाची लहान आकाराची जात).. त्याला आउलेट म्हणतात.

घुबी चांगला आहे.. :)

परिंदा's picture

29 Oct 2013 - 2:08 pm | परिंदा

घुब्बाळ कसे वाटतेय?

बहुगुणी's picture

29 Oct 2013 - 4:13 pm | बहुगुणी

तुम्ही पालक आहात त्या पिलांचे :-) वेळेवर नांवे ठेवलीत तर पुढे पिलू नं.१, पिलू नं. २ ....करायला लागणार नाही!

(बाकी video blog (vlog) ची वाटचाल मस्त चालली आहे, जमलं तर एकसंध short film करता आली तर बघाच. इथेच तज्ञांची मदत मागून crowdsourcing करू शकाल. अशा प्रकारची collaborative film तयार झाली नसेल तर अभिनव प्रयत्न ठरेल.)

सौंदाळा's picture

29 Oct 2013 - 5:53 pm | सौंदाळा

थरारक, उत्कंठावर्धक, नेत्रसुखद, वाचनीय, नाविन्यपुर्ण
ओळ न ओळ वाचतोय.
तुमचे अपडेट आले की आधीचे व्हीडीओ बघुन परत परत तुलना करतोय.
आणि पुढच्या अपडेट्सची वाट बघतोय.

उपास's picture

29 Oct 2013 - 5:54 pm | उपास

बहुगुणी म्हणतायत तेच म्हणतो, तंतोतंत.. अजून एखादा कॅमेरा डकवता आला तर बघा..
आणि गविकाक, दिवसातून किमान एक अपडेट तरी टाकाच, काळजी/ उत्सुकता वाटतेय.. एस्.पी.सी.ए. ला कळवणार आहत का? पुढे जाऊन ही पिल्लं घरट्याबाहेर कधी आणि कशी झेप घेतील तेव्हा तुम्ही त्यांना कसं सावरणार, काही विचार केलाय का? कावळा हा महानालायक प्राणी आहे, टपून असतो! उडायला शिकणार्‍या कित्येक पोपटांना समूहाने कावळे टोचताना पाहिलय..

चांगला करमणूकीचा उपक्रम आहे .पक्षी थोडावेळ दूर जात असेल तर ओळखण्यासाठी अंड्यांवर स्केच पेनने रंगीत रेघा (रेझिस्टनसवर असतात तशा)मारा आणि वहीत प्रत्येकाची नोंद करा .जमल्यास अंडयाचे वजन घ्या .अगोदर आलेल्या पिलांच्या पायात रंगीत दोरे बांधा .पुढे कधी मोठे घुबड पाहिल्यास ओळखता येईल गविंचे घुबड .

छान लिहिलय. वेगळाच विषय.

अद्द्या's picture

30 Oct 2013 - 12:59 pm | अद्द्या

गवी काका .

त्या पिल्लांची काळजी घुबड घेइलच .
पण तुम्ही जे करताय त्याला

अगदी मनापासून सेल्यूट

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

सौ. घुबड आणि पिटुकले घुबीज कसे आहेत? नवा व्हिडिओ नाही आला.

आज व्हिडीओ तर घेतले. पण घुबडाईने पिल्लाना पूर्णवेळ पोटाखाली लपवून ठेवलेलं ... जाम उघड करेना.

त्यामुळे काही इव्हेन्ट कॅप्चर झाला नाहीच. मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले.

समोर बसून मॅन्युअली कॅप्चर करणं कार्यालयामुळे शक्य नाही. त्यामुळे पहाटे उठून वेळ काढतो. पण तेवढ्यात काही घडले नाही की काहीच कळत नाही अपडेट.

आज घुबडीण जागची हललीच नाही त्यामुळे आज अपेक्षित असलेलं आणखी एक पिल्लू बाहेर आलं की नाही हेही कळलं नाही.

:-(

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले.

बघाSSSS! झाला नं अपशकून??

लॅपटॉपच्या एक्झॉस्ट जवळ एक टेबल फॅन चालू ठेवा. माझा लॅपटॉप तापला की मी सरळ त्याला उचलुन एसीच्या ब्लोकडे ठेवतो २-३ मिनीटं. तुमचा एसी सध्यां बंद असल्याने जर टेबल फॅन असेल तर तो वापरुन पहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Oct 2013 - 9:23 pm | बिपिन कार्यकर्ते

पाहिजे तर हपिसला दांडी मारा! पण हे काम झालंच पाहिजे! ;)

उपास's picture

30 Oct 2013 - 8:55 pm | उपास

व्हिडिओ कॅप्चरिंग आणि प्रोसेसिंगसाठी चिक्कार सिपीयू लागतो राव, नेहमीचा लॅपटॉप घेऊन केलत तर सीपीयु तापतोच, आतल्या संरक्षक रचनेमुळे प्रमाणाबाहेर तापत असेल चीप तर मशिन बंद होते आपोआप. गणपा भौ ने सांगितल्यानुसार थंड ठेवता येईल का बघा लॅपटॉप नाहीतर एक से भले दो ;) म्हणजे एक काम करेल तेव्हा दुसर्‍याला विश्रांती. अहो, जगभरातल्या माणसांचे डोळे लागलेत तुमच्या इव्हेंटवर, नाहीतर एखादा हायर करा लॅपटॉप.. (सिरीयसली) पण मशिन नाही हे सांगू नका ब्वॉ :)

जॅक डनियल्स's picture

31 Oct 2013 - 4:10 am | जॅक डनियल्स