संवादिका : १ - मंगल कार्यालय

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
20 Oct 2013 - 3:12 pm

"अहो, तो विजुताईंचा मुलगा ना?"
"कोण हो?"
"अहो तो काय, त्या छोटीला कडेवर घेऊन उभा आहे, तो."
"तो होय, हो हो, तो विजुताईंचा मुलगाच नि ती छोटी त्यांची नात."
"हं, म्हणजे केलं वाटतं याने लग्न."
"छे हो, ती छोटी विजुताईंची नातच पण म्हणजे त्यांच्या मुलीची, ज्योतीची मुलगी."
"म्हणजे अजून नाहीच केलंय का याने लग्न?"
"हो ना!"
"इतका चांगला मुलगा आहे, स्वभाव, शिक्षण, नोकरी. मग करत का नाहीये लग्न?"
"कुणास ठाऊक?"
"तसं कधी, कुठे प्रकरण वगैरे काही?"
"ऐकलं नाही कधी तसं. पण आजकालच्या मुलांचं काय, कसं, ते काही कळतंच नाही. येवढा चांगला मुलगा आहे पण चांगली मुलगीच कोणी सांगून आली नाही तर काय करेल?"
"अहो मंदाताई, तुमची मोठी मुलगीपण लग्नाची आहे ना? तिच्यासाठी का तुम्ही...?"
"कसं शक्य आहे ते, सुलूताई? आम्हाला तो आमच्या मुलींचा, मीनू-तनुंचा भाऊच वाटतो. तनु तीन वर्षाची असताना मला भाऊ पाहिजे म्हणून हट्टाने त्याला राखीही बांधली होती."
"मंदाताई, मीनू बरोबर त्याचा जोडा छान दिसेल हो, तुम्ही का प्रयत्न करत नाही?"
"तुमचं आपलं काहीतरीच. सुलूताई, अहो, तो पण आमच्या मुलींना बहिणच मानतो. अरे, शैलाताई बोलावतायत वाटतं. जरा, त्यांच्याकडे जाऊन बघते हं."
"काय मंदाताई, तुमच्या ओळखी भरपूर, याचा पुरेपूर प्रत्यय आला बघा. अगदी इथेही तुमच्या ओळखीच्या मैत्रिणी भेटल्याच की तुम्हाला. माझ्या ओळखीच्या नाही दिसत. आहेत कोण?"
"तसं काही नाही हो शैलाताई, अगदी जुजबी ओळखच आहे. आपल्याकडील नाहीत. मुलाकडून काही नातं आहे. आमच्या गावचीच तशी ओळख. पण भारी ढालगज भवानी आहे ती! काय काय विषय सुचतात तिला, मग बसते टोचत..."
"मग? आत्ता काय टोचत, आपलं, विचारत होती म्हणे?"
"काही नाही हो, विचारत होती विजुताईंच्या मुलाबद्दल."
"काय ते?"
"त्याचं लग्न झालंय का? का करत नाही? हल्ली चांगल्या मुली मिळत नाहीत का? वगैरे वगैरे..."
"अरे, म्हणजे समाजसेविकाच की ती! कुणी मुलगी आहे का त्यांच्या डोळ्यासमोर?"
"अहो, विचारत होती, तुमच्या मीनूसाठीच तो का बघत नाही? दोघांतलं वयही योग्य आहे. मुलगा ओळखीतला आहे, चांगला स्वभाव आहे, शिक्षण आहे, नोकरी आहे, वगैरे वगैरे..."
"भारीच भोचक की हो! मग तुम्ही काय म्हणालात?"
"शैलाताई, अहो, सांगून पाहिलं, आमच्या मुलींना तो भावासारखा आहे, त्यांनी राखी बांधलीय, पण ऐकतच नव्हत्या. बरं झालं बाई, तुम्ही दिसलात आणि त्यांना तिथेच सोडून तुमच्याकडे आले पळून. अहो कसं आहे, आपल्या मुलींचीच काही गॅरेंटी आहे का? मुलगा चांगला आहे पण यांचं काही सांगता येतंय का?
"हो ना! आमच्या आशूचंच बघा ना, तिला आता लग्न नाही करायचं. आधी करीयर, नोकरी हवीय. यांची कामं, कामाच्या वेळा, सगळं सगळं वेगळंच!"
"मग आपण कुणाशी बोलायचं आणि यांनी नकारघंटा लावायची. अशानं आपण तोंडघशी पडू त्याचं काय?"
"हे बाकी खरंय मंदाताई, पण मग हे त्यांना का सांगत नाही?"
"त्यांच्याशी आपण आपल्या मुलींबद्दलच कसं बोलणार असं? आणि त्यांना कळणारही कसं? तशी जुजबीच ओळख म्हणजे..."
"हो ना, ते ही खरंच! पण काय हो मंदाताई, येवढं जर त्यांना विजुताईंच्या मुलाबद्दल वाटतंय, तर त्या त्यांच्याच मुलींसाठी का बघत नाहीत त्याचं स्थळ?"
"हुं! सटवीला गरजच नाही, तिला दोन्ही मुलगेच!"

(स्थानपरत्वे आणि प्रसंगपरत्वे विवक्षित लोकांमध्ये संवाद घडतात. त्यातील काहींचा संग्रह सादर करण्याचा प्रयत्न.)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Oct 2013 - 3:34 pm | मुक्त विहारि

आवडले...

पैसा's picture

20 Oct 2013 - 3:42 pm | पैसा

लग्नात लग्नं जुळवणारे लोक नेहमीच बघायला मिळतात, अन भोचक विचारणा आणि सल्ले देणारे अशा लग्ना-बिग्नाच्या जागी हमखास भेटतात!

संवाद मस्तच! अगदी १००% वास्तवातला. बोलताना तरीही मुलगा आणि मुलगी यांच्या वागण्यात फरक केलेला बघून मजा वाटली. हे असंच ८०-९०% वेळेला ऐकायला मिळतं!

प्रचेतस's picture

20 Oct 2013 - 3:58 pm | प्रचेतस

खुमासदार लेखन.

हमखास कानी पडणारे संवाद. अचूक निरीक्षण :-)

तिमा's picture

20 Oct 2013 - 5:19 pm | तिमा

भारी बाई लक्ष तुमचे लग्नातल्या बायकांकडे! सूक्ष्म निरीक्षण!

अभ्या..'s picture

20 Oct 2013 - 6:06 pm | अभ्या..

भारी बाई लक्ष तुमचे लग्नातल्या बायकांकडे

नुसते भारी लक्ष नायतर तिखट कान सुध्दा. कारण अशा वेळी बायका जो खाजगी स्वर लावतात तो त्याच ग्रुपमध्ये नको असलेल्या बाईला पण ऐकायला जात नाही. ;)
वा वा. सुरेख लेखन. :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2013 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा

+१

प्रचेतस's picture

20 Oct 2013 - 10:32 pm | प्रचेतस

बाकी तुम्हा दोघांनाही कसे माहिती रे बायकांचे खाजगी स्वर. =))

जेपी's picture

20 Oct 2013 - 5:40 pm | जेपी

आवडल

प्रसाद गोडबोले's picture

20 Oct 2013 - 5:57 pm | प्रसाद गोडबोले

छान आहे

दिपक.कुवेत's picture

20 Oct 2013 - 6:20 pm | दिपक.कुवेत

कार्यालयाचं नाव पण एकदम कॉमन......

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 6:56 pm | चित्रगुप्त

हल्ली उत्तम नोकरी, भक्कम पगार असलेल्या मुलींचे पालकच मुलीचे लग्न व्हावे यासाठी अनुत्सुक असतात, असेही बघण्यात येते.... लग्न झाले, तरी लग्नानंतरही तिच्या मनात भरवून सासर सोडून माहेरी बोलावून घेतल्याचेही प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे.

मुक्त विहारि's picture

20 Oct 2013 - 7:02 pm | मुक्त विहारि

जावू द्या हो.

प्रसाद गोडबोले's picture

20 Oct 2013 - 7:11 pm | प्रसाद गोडबोले

लग्नानंतरही तिच्या मनात भरवून सासर सोडून माहेरी बोलावून घेतल्याचेही प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे.

>>> कोण आहे तो नशीबवान .... ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Oct 2013 - 8:03 pm | लॉरी टांगटूंगकर

=)

रेवती's picture

20 Oct 2013 - 7:08 pm | रेवती

हा हा. अगदी बरोबर.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 7:40 pm | चित्रगुप्त

खरेच आहे.
या मंडळींना वीस वर्षांपासून ओळखतो, त्यावरून त्या मुलाची सुटका झाली, असेच म्हणायला हवे, हे खरेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Oct 2013 - 11:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Hmmmm !!!

अग्निकोल्हा's picture

21 Oct 2013 - 2:25 am | अग्निकोल्हा

...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Oct 2013 - 2:37 am | निनाद मुक्काम प...

मी तर अनेक लग्न समारंभात केवळ अश्या गप्पा ऐकण्यासाठी हजेरी लावतो.
येवू दे अजून अश्या संवादांची मालिका
अशातूनच व्यक्ती मधील वल्लींचे दर्शन घडते.

स्पंदना's picture

21 Oct 2013 - 4:12 am | स्पंदना

मला तर डोळ्यासमोर प्रास भौ एकटेच खुर्चीत बसून हे सगळ शांतपणे ऐकताना दिसताहेत.
भारीच!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Oct 2013 - 6:09 am | निनाद मुक्काम प...

भारतात इतक्यात येणे झाले नाही , त्यामुळे अनेक धार्मिक समारंभाला हजेरी लावता येत नाही , मुंज , बारसे , पहिला वाढदिवस ते लग्न व साखरपुडा. ह्यामुळे अनेक गमती जमतीला मी मुकतो ,
मुंज व लग्नात म्हटलेली मंगलाष्टक.

सध्या ह्याच नावाने एक मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे , जो आपली मराठी ह्या वेब साईट वर आल्याशिवाय पाहणे होणार नाही.
पण नुकतीच माझ्या चेहरा पुस्तकावरच्या एका मित्राच्या कृपेमुळे ही तू नळीवरील क्लिप पाहण्यात आली ,
एका मुंजीत कोणतीतरी हौशी मावशी ,आत्या , काकू ही कुसुमाग्रज , ग्रेस , मर्ढेकर ह्यांचा वारसा सांगणार्‍या एका अनामिक कवी रचित मंगलाष्टक सुरात गात आहे. ज्यात खुबीने बटूच्या बहुतेक सर्व नातेवाईकांच्या नावाचा उल्लेख केला आहे ,
ही आधुनिक काळातील मंगलाष्टक माझ्या मुंजीत का बरे गायल्या गेली नाही , असे मात्र मला राहून राहून वाटते.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 8:47 am | मुक्त विहारि

लोळत आहे...

पिवळा डांबिस's picture

21 Oct 2013 - 9:34 am | पिवळा डांबिस

हा हा हा हा!!!!
-सटवा!!!
:)

मे महिन्यात जी काही लग्नं अटेंड केली त्यातले प्रसंग उभे राह्यले डोळ्यापुढे !! =))

गणपा's picture

21 Oct 2013 - 1:08 pm | गणपा

संवाद आवडला. :)