एकदा वाजपेयी, मुशर्रफ, माधुरी दिक्षीत आणि मार्गारेट थॅचर रेल्वेच्या एकाच बोगीतून प्रवास करत असतात. सर्वजण प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यातले तिघेजण राजकारणी. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भपणे व राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेउन गप्पा मारत असतात. अचानक एक मोठा बोगदा येतो. रेल्वे बोगद्यात शिरल्यावर डब्यात अंधार येतो आणि अचानक डब्यातले दिवे जातात. आता पूर्ण अंधार झालेला असतो. अचानक कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते.
बोगदा संपतो आणि डब्यात उजेड येतो. सर्वांना मुशर्रफचा गाल लाल झालेला दिसतो. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने बघताना दिसतात. पण राजकीय चातुर्य व प्रगल्भता दाखवून सर्वजण गप्प राहून नक्की काय झाले असावे याचा मनातल्या मनात विचार करू लागतात.
थॅचर बाई विचार करत असतात की या पाकिस्तान्यांना माधुरी दिक्षीतचं फार वेड आहे. मुशर्रफही तिच्यावर डोळा ठेवून असणार. त्यामुळे डब्यात अंधार झाल्यावर संधी साधून त्याने तिचे चुंबन घ्यायचा प्रयत्न केला असणार. त्यामुळे तिने संतापून त्याच्या थोबाडीत ठेवून दिली असणार.
माधुरी दिक्षीत विचार करत असते की या भारतीयांना गोर्या कातडीचं फार वेड आहे. त्यातून वाजपेयी पडले ब्रह्मचारी. थॅचर बाईपण त्यांच्याच वयाची. त्यामुळे डब्यात अंधार झाल्यावर संधी साधून त्यांनी तिचे चुंबन घ्यायचा प्रयत्न केला असणार. त्यामुळे तिने संतापून त्यांच्या थोबाडीत ठेवून द्यायचा प्रयत्न केला असणार. पण तिचा हात चुकून मुशर्रफला लागला असणार.
मुशर्रफ विचार करत असतो की वाजपेयींनी डब्यात अंधार झाल्यावर संधी साधून माधुरी दिक्षीतचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला असणार. त्यामुळे तिने संतापून त्यांच्या थोबाडीत ठेवून द्यायचा प्रयत्न केला असणार. पण तिचा हाच चुकून मला लागला.
वाजपेयी विचार करत असतात की कधी एकदा पुढचा बोगदा येऊन डब्यात अंधार होतोय आणि मी तोंडाने चुंबनाचा आवाज काढून मुशर्रफच्या कानाखाली ठेवून देतोय.
कारगिल युद्धानंतर लगेचच अनेक महिने वरील विनोद आंतरजालावर फिरत होता. डॉ. विवेक बेळेंचे नवीन नाटक "अलिबाबा आणि चाळीशीतले चोर" पाहिल्यावर लगेचच हा विनोद आठवला.
या नाटकात आहेत ३ जोडपी व त्यांचा एक अविवाहित मित्र. सुमित्रा (मंजूषा गोडसे) गृहिणी आहे व तिचा नवरा (धनंजय गोरे) डॉक्टर आहे. वरूण (आनंद इंगळे) भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असून त्याची पत्नी शलाका (सीमा देशमुख) एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. पराग (विद्याधर जोशी) संगणक सल्लागार असून त्याची पत्नी अदिती (राधिका विद्यासागर) बँकेत काम करते. अभिषेक (राजन भिसे) अविवाहीत असून तो इंटेरिअर डेकोरेटर आहे.
हे सर्वजण चाळीशीतले असून एकमेकांचे मित्र आहेत. नियमितपणे दर शनिवारी डॉक्टरच्या घरी एकत्र भेटून हे पार्टी करतात. पार्टीत अपेयपान, नृत्य वगैरे करतात. अशाच एका शनिवारच्या पार्टीत सर्वजण एका धमाल गाण्यावर एकत्र नाचत असताना दिवे जातात. काही क्षणातच कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. प्रसंग तिथेच संपतो.
आपल्या घरी घडलेल्या या प्रसंगाने व्यथित झालेला डॉक्टर दुसर्या दिवशी या घटनेबद्दल चर्चा करून नक्की कोणी कोणाचे चुंबन घेतले असावे व कोणी कोणाच्या थोबाडीत मारली असावी याचा अंदाज घेत असताना अभिषेक येतो आणि एक धक्कादायक बातमी सांगतो. या घटनेसंदर्भात कोणीतरी एक निनावी नावाने ब्लॉग तयार केला असून घटनेचा तपास लावण्याच्या दृष्टीने पार्टीतील सर्वांनी आपली मते त्यावर लिहावीत असे सर्वांना ईमेल आलेले असते.
आता सर्वांची उत्सुकता चाळवते व काहीशी भीति सुद्धा वाटू लागते. प्रत्येक जण आपापल्यापरीने घडलेल्या घटनेचा अर्थ लावू पाहतो व त्या घटनेत मी किंवा माझी बायको तर नक्कीच नाही कारण आम्ही "तसे" नाही. असलेच तर इतर जण असतील असा बचाव सुरू होतो.
ब्लॉगवर त्यांची नावे घेऊन निनावी प्रतिसाद येऊ लागतात आणि एकमेकांची बिंगे फुटायला लागतात. सर्वजण चाळीशीतले. त्यामुळे आपले काहीतरी "अफेअर" असावे अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असते. आपल्याला आपल्या बायकोचा कंटाळा आला आहे व काही काळ चेंज म्हणून एखादे अफेअर व्हावे या भावनेतून पुरूषांचे प्रयत्न सुरू असतात. या वयात आपल्याला एखादा वेगळा पुरूष मित्र म्हणून मिळावा अशी बायकांची देखील इच्छा असते. मग त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला सुरूवात होते. सर्वजण मनातून कितीही उत्सुक असले तरी मध्यमवर्गीय संस्कार व भित्रेपणा यामुळे किरकोळ फ्लर्टिंगच्या पलीकडे कोणाचीच मजल जात नाही. पण इतरांची मजल खूप पुढे गेली आहे असे प्रत्येकालाच वाटत राहते.
अभिषेक व अदिती एकमेकांशी सारखे फोनवर बोलतात, बाहेर भेटून कॉफी पितात या बातम्या कोणतरी ब्लॉगवर टाकते. ते वाचून परागचा संताप होतो. परागशी मैत्री वाढवायला शलाका उत्सुक आहे. शलाकाचा नवरा वरूण व सुमित्रा एकमेकांना सारखे फोन करतात. त्यांना एकमेकांशी बोलायला आवडतं हे बाहेर येतं. पार्टीत आपला डॉक्टर नवरा शलाकाच्या पुढेपुढे करतो, तिचा ग्लास संपला की लगेच तो भरून देतो हे सुमित्राच्या लक्षात येतं व वरूणबरोबर ती याचीही चर्चा करते. आपली बायको शलाका घरात सारखे नवीन इंटेरिअर करून घेण्याच्या निमित्ताने अभिषेकला घरी बोलाविते. म्हणजे त्याची व तिची भानगड आहे अशी वरूणला शंका येते तर जरी अभिषेक आपल्याबरोबर फ्लर्टिंग करत असला तरी सुमित्रा त्याच्यात इंटरेस्टेड आहे असा अदितीचा समज होतो.
यातून वेगवेगळ्या शक्यता चर्चिल्या जातात. परागने पूर्वी सुमित्राशी लग्न करायला नकार दिल्याने तिनेच परागला फशी पाडून अंधारात त्याला आपले चुंबन घ्यायला लावले व नंतर त्याच्या थोबाडीत मारून त्याच्यावर व अदितीवर एकत्रित सूड उगविला अशी एक थेअरी मांडली जाते. अभिषेक अविवाहीत असल्याने त्यानेच अदितीचे चुंबन घेतले व आपले बिंग फुटु नये म्हणून तिनेच त्याच्या थोबाडीत मारली असाही काहीजण अंदाज बांधतात. डॉक्टरने शलाकाचे चुंबन घेतले व तिनेच त्याच्या थोबाडीत मारली हा पण एक अंदाज येतो.
दरम्यानच्या काळात संशयावरून पराग व अभिषेकचे जोरदार भांडण होते. शलाका परागला तो ब्लॉग हॅक करून त्यावरील कॉमेंट्स काढून टाकायची विनंती करते आणि हे करताना ती परागला आव्हान पण देते. पण मध्यमवर्गीय भित्रेपणामुळे परागची पुढे पाऊल टाकायची हिंमतच होत नाही
सुरवातीला मी किंवा माझी बायको यात नाही असे छातीठोकपणे सांगणारे नंतर मी नक्कीच यात नाही पण माझी बायको किंवा माझा नवरा यात असू शकतो असे उघडउघड सांगू लागतात.
शेवटी आपली बायको शलाका व डॉक्टरचे अफेअर आहे या निष्कर्षावर वरूण व सुमित्रा येऊन पोचतात व सर्वांनी एकत्र येऊन सोक्षमोक्ष लावायचा प्लॅन करतात. तेवढ्यात बातमी येते की उद्या रात्री १० वाजता नक्की कोणी कोणाचे चुंबन घेतले व कोणी कोणाच्या थोबाडीत मारली याचा गौप्यस्फोट ब्लॉगवर होणार असल्याची बातमी येते. जर आपला नवरा किंवा आपली बायको यात असेल तर आपले संसार उध्वस्त होणार या कल्पनेने सर्वजण हादरतात. आता आपल्या पार्ट्या बंद होऊन सर्वांची मैत्री तुटणार हे लक्षात येऊन अभिषेकही अस्वस्थ होतो.
उद्या रात्री १० वाजता बॉम्बगोळा पडणार या भावनेने सर्व जोडपी एकमेकांशी निरवानिरवीची भाषा करू लागतात. आपल्या दोघांपैकी कोणाचे नाव यात आले तर त्याचा आपल्या संसारावर काय परीणाम होईल याची चर्चा सुरू होते व त्यानंतर वेगळे व्हायचे किंवा काय करायचे याचीही चर्चा सुरू होते.
शेवटी दुसर्या दिवशी रात्री १० वाजता ब्लॉगवर नक्की कोणाची नावे येतात, ज्यांची नावे येतात त्यांच्या कौटुंबिक जीवनात काय वादळ येते, त्या प्रसंगाला ते कसे सामोरे जातात हे पाहण्यासाठी नाटकाचा शेवट पाहायलाच हवा. नाटकाचा शेवट सांगून मी रसभंग करू इच्छित नाही.
डॉ. विवेक बेळेंचे हे नवीन नाटक अत्यंत उत्कंठावर्धक आहे. "माकडाच्या हातात शॅम्पेन"नंतर त्यांनी पुन्हा एकदा एक जबरदस्त संहिता दिली आहे. चाकोरीबाहेरील विषय व प्रतीकांचा वापर करून खेळकर अंगाने नाटक फुलविणे ही त्यांची वैशिष्ट्ये. "माकडाच्या हातात शॅम्पेन"मध्ये त्यांनी पुस्तक, पेन्सिल, चाकू, माकड अशी प्रतीके वापरून मानवी स्वभावाचा मागोवा घेतला होता. या नाटकात प्रतिकांचा वापर करायला त्यांना वाव मिळालेला नाही, पण प्रतिकांचा वापर करून एक अॅनिमेटेड गाणे त्यांनी नाटकात टाकले आहे.
चाळीशीतल्या जोडप्यांची मनातून अफेअरविषयी असलेली व दबलेली उत्सुकता, त्यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा व मध्यमवर्गीय भित्रेपणामुळे किरकोळ फ्लर्टिंगपुढे जाउ न शकलेले त्यांचे प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या व खेळकरपणे या नाटकात मांडले आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
सेन्सॉर बोर्डाने या नाटकाला "A" (फक्त प्रौढांसाठी) हे प्रमाणपत्र दिले आहे. या नाटकात खूपच बोल्ड संवाद आहेत, पण व्हल्गर किंवा अश्लील किंवा कमरेखालील संवाद अजिबात नाहीत. यातील पात्रे चाळीशीच्या पुढची व अनेक वर्षे एकमेकांशी मैत्री असल्याने स्त्रीपुरूष संबंधाविषयी एकमेकांशी खूपच बोल्डपणे बोलतात. पण नाटकाशी हे संवाद सुसंगत वाटतात.
सर्वच कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. संगीत, नेपथ्य व प्रकाशयोजना देखील उत्तम आहे. एकंदरीत नाटकाची भट्टी व्यवस्थित जमून आली आहे. एकदा तरी हे नाटक पहाच.
प्रतिक्रिया
23 Sep 2013 - 4:41 pm | आदूबाळ
dhanyavaad, guruji... nakkI baghnaar
23 Sep 2013 - 4:49 pm | पैसा
नाटक बघण्यात येईल. चाळिशॆत काहॆसे स्थैर्य आलेले असते त्यामुळे असे काही करावेसे वाटत असेल. लग्नातली सुप्रसिद्ध 7 years itch साधारण याच वयात येण्याची शक्यता.
23 Sep 2013 - 4:59 pm | सुधीर
बेळेंच अजून एक नाटक "काटकोन त्रिकोण" पण खूप छान आहे. रविंद्र पाथरेंनी सुद्दा या नाटकाचं कौतुक केलं होतं. नाटक पाहयचा योग कधी येतोय ते बघतो आता.
23 Sep 2013 - 5:15 pm | चाणक्य
बेळेंच 'माकडा हाती शँपेन' खूपच आवडलं होतं. हे पण नक्की बघणार.
24 Sep 2013 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
बघणार!
24 Sep 2013 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
बघणार!
30 Sep 2013 - 8:41 pm | श्रीगुरुजी
या नाटकाचा पुढील प्रयोग पुण्यात बालगंधर्वला ६ ऑक्टोबरला आहे. या नाटकाचे फारसे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे आगामी प्रयोग चुकवू नका.
30 Sep 2013 - 9:40 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद! :)