आज २९ ऑगस्ट - आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस.
लहानपणी .. म्हणजे लपाछपी, चोर - पोलीस, आप्पारप्पी, लगोरी वगैरे खेळांतून "ग्रॅज्युएट" होऊन "स्पोर्ट्स" ह्या प्रकारांत गणले जाणारे खेळ खेळायला लागलो तेव्हा......त्या पांढरे कपडे घालून तांबड्या चेंडूनी खेळायच्या खेळानी वेड लावलं आणि आयुष्यात पहिल्यांदा हिरव्यागार मैदानांवर पाऊल पडलं. कपिल देवसारखी अॅक्शन करणं... "वन डाऊन" बॅट्समन असल्यामुळे हेल्मेटखाली संजय मांजरेकरसारखी पट्टी बांधणं वगैरे चावट उद्योग चालू होते. अझरुद्दीन, इम्रान, रिचर्ड्स वगैरे हीरोज होते... शाळेतून पळून जाऊन मित्राच्या घरी टीव्ही बघणं व्हायचं... सगळं यथास्थित चालू होतं. तश्यात आठवतंय... कधीतरी मुंबईत ओव्हल मैदानावर खेळायचा योग आला. तेव्हा कोणीतरी राजाबाई टॉवरकडे बोट दाखवून सांगितलं... "अरे ते सी के नायडू होते ना... त्यांनी एकदा सिक्स मारून ते घड्याळ फोडलं होतं !" आणि तेव्हा ह्या गोष्टीवर विश्वास देखील बसला होता बरंका ! इतक्या लांब बॉल गेलाच कसा... बोलर कोण होता... फुलटॉसवर मारला का......फार काय.... नायडू ओव्हलवर खरंच कधी खेळले होते का.. असे प्रश्न तेव्हा आमच्या बालमनाला शिवले सुद्धा नाहीत.
आणि का शिवावेत? तुमचा अजय देवगण एक हात हलवतो आणि ८० - १३८ किलो वजनाचे सांडांसारखे ८ - १० गुंड २० - ३८.५ फुटाच्या परिघात जाऊन पडतात तेव्हा सच्चा सिनेप्रेमी असे प्रश्न विचारतो? अहो मग आमचे नायडू, रॉड लेव्हर, नादिया कोमानेसी, एड मोझेस, पेले, सर्जी बुबका, मुहंमद अली हे तर खरेखुरे हीरोज. मग आम्ही त्यांच्या दंतकथा रंगवून रंगवून सांगायच्या नाहीत तर कोणाच्या?
आज अश्याच एका दंतकथेचा जन्मदिवस. एका डच पत्रकारानी ह्याच्या बाबतीत लिहिलं होतं, "One of these tanned diabolical jugglers stares at the ball intently; it gets upright and remains suspended in the air." आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४०० पेक्षा अधिक गोल्स.. त्यात ३ ऑलिम्पिक्सच्या १२ सामन्यांत तब्बल ३३ गोल्स, अचाट प्रतिभा, अफलातून कौशल्य, हॉकीची संपूर्ण समज, द्रिबलिंग असं की लोकं म्हणायची हा "ड्रिबल करत करत चंद्र सुद्धा आकाशातून घेऊन जाईल." ह्यानी लोकांना गुरुत्त्वाकर्षणाबद्दल शंका घ्यायला लावली. ह्याची स्टिक मोडून आत चुंबक नाही ना हे तपासायला लावलं. ह्याच्यावर जादू - टोणा करण्याच्या शंका घेण्यात आल्या. ही दंतकथा होती अफाट गुणवत्तेला प्रचंड कष्टांची जोड देत आपल्या दैवी कौशल्यानं, मृदु बोलण्यानं आणि साधेपणानं तत्कालीन हॉकीप्रेमांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेला हॉकीचा सम्राट - ध्यान चंद सिंग!
ध्यानचंद बाबत जाणून घ्यायचं तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. पण ह्या लेखाचा हेतु तो नव्हे. "लेजंड" म्हणवलं जाणं हे अथक मेहनतीचं, खडतर तपश्चर्येचं, असीमित त्यागाचं, अजोड कर्तृत्त्वाचं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे काळाच्या कसोटीवर उतरण्याचं काम आहे. "लेजंड" ही पदवी आजकालच्या पद्मभूषण इतकी स्वस्त नाही ! ध्यान चंदनी फक्त एक हॉकीपटू म्हणून प्रसिद्धी मिळवली असं नाही. भारतासारख्या "गुलामांच्या देशात" असा दैवदत्त प्रतिभेचा, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्विवाद हुकुमत गाजवणारा खेळाडू निपजू शकतो आणि सर्व जग पादाक्रांत करून सुद्धा आपल्या विनम्रतेनं आणि साधेपणानं जगभरातल्या क्रीडाशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनू शकतो हे ध्यान चंदनी दाखवून दिलं. एका सैनिकाप्रमाणेच मेजर ध्यानचंदनं देशाची इभ्रत आपल्या समर्थ खांद्यांवर पेलली. म्हणूनच धानचंदचा जन्मदिवस "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणून साजरा होतो.
खेळाडू अक्षरशः जगात आपल्या देशाची प्रतिमा बदलू शकतात. तसा प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्त्व करताना सैनिकाचीच तर भूमिका बजावत असतो. लुटुपुटुची का होईना, लढाईच लढत असतो. प्रत्येकाची पद्धत, ताकद, बलस्थानं, रणनीती वेगळी. बघा ना....आमचा सच्या मैदानात उतरतो तो महाधनुर्धर अर्जुनासारखा. दिव्य रथ.....बॅटरूपी गांडीव आंणि कट्स, पुल, हुक, ड्राईव्ह्स, पॅडल स्वीप, फ्लिक्स, ग्लान्स सारख्या दिव्य अस्त्र शस्त्रांचा अक्षय्य भाता घेऊन. फेडरर पण तसाच... हातात रॅकेट आहे की जादूची कांडी असा प्रश्न पडावा. त्याचेच जादूगार भाऊबंद म्हणजे मेस्सी, मॅजिक जॉन्सन, फेल्प्स सारखी लोकं. आमचा स्टीव्ह वॉ बेरेटधारी मेजर सारखा. करड्या शिस्तीचा आणि बारिक डोळे करून आपल्या कंपनीला हल्ल्याची धूर्त योजना समजावून सांगणारा. पाँटिंग, मॅक्ग्रा किंवा जोकोविच म्हणाल तर सील्सचे स्नायपर्स ... एक गोली एक दुश्मन. रिचर्डस, डेली थॉम्पसन किंवा बोरिस बेकर म्हणजे ग्लॅडियेटर्ससारखे... बेदरकार...निडर स्वत:च्या बाहुबळावर भक्कम विश्वास असलेले. राहुल द्रविड, साईना नेहवाल, रायन गिग्ज किंवा नदाल म्हाणाल तर कपार्यांमधून हल्ला करत राहाणारी... कधीही हार न मानणारी चिवट जमात. लारा.... वॉर्न...रोबेर्टो कार्लोस...मायकेल जॉर्डन... उसेन बोल्टसारखे अवलिये म्हणजे जेम्स बाँडचे आजे पणजेच. कुठल्या क्षणी काय करतील आणि विल स्मिथ किंवा अक्षयकुमारसारखे दोन हातात दोन बंदुका घेऊन, शत्रुचा संहार करून श्टायलीत मान मोडल्याची अॅक्शन करतील काही नेम नाही. सेहवाग, वकार, शोएब अख्तर, रूनी, सेरेना विल्यम्स म्हणजे "किसीने रोकनेकी कोशिश की तो भून के रख दूंगा" टाईप्स.
आणि हे लढवय्ये मैदानावर लढतात देखील असे की हृदयाचा ठोका चुकावा. दोन संघ वा खेळाडू अश्या ताकदीनी आणि त्वेषानी एकमेकांना भिडतात की बघणार्याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटावा. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात! Contests not for the faint hearted ! १९६१ ची ती विंडीज ऑस्ट्रेलियाची टाय टेस्ट असो, १९८० सालची बोर्ग मॅकेन्रोची विम्बल्डन फायनल, भारत पाक टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना, चॅम्पियन्स लीगचा २००५ ची लिव्हरपूल एसी मिलानचा "पलमें तोला पलमें मासा" झालेला अंतिम सामना, "थ्रिल्ला इन मनिला", "रम्बल इन द ब्रोंक्स",... २००८ च्य जुलैमध्ये फेडरर आणि नदालनी चर्च रोड लंडन SW19 5AE वर "रोमहर्षक टेनिस म्हणजे काय" ह्याचा दिलेला डेमो....अॅटलांटा ऑलिम्पिक्समध्ये २०० आणि ४०० मीटर्सच्या शर्यती जिंकताना मायेकल जॉन्सननी लावलेला धडाका....एक ना दोन... असे कित्येक सामने... अश्या कित्येक लढती कित्येक शर्यती ज्यांनी "रोमहर्षक", "उत्कंठावर्धक", "humdinger", "nail-biting" वगैरे विशेषणांना नवं परिमाण दिलं.
आज परिस्थिती अशी आहे की सकाळी वर्तमानपत्र हातात घ्यावंसं वाटत नाही. माणसाला मनुष्य"प्राणी" का म्हणतात ह्याचं पदोपदी प्रत्यंतर देणार्या घटनांनी भरलेला ती कागदाची चळत. पशु, नराधम वगैरे विशेषणांना लाजेनी खाली पहायला लावतील अशी लोकं आता आपल्या आजूबाजूला दिसायला लागली आहेत. अश्या वेळी ह्या अंधारात आशेचा किरण शोधायला आपण शेवटच्या पानावरच जातो. तिथेही सगळं आलबेल आहे असं नाही, पण वादळात फडफडणार्या ज्योतीसारखी का होईना, एक पणती तिथे अजून तेवत आहे. आणि जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही. खेळच ह्या पोरांना परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद देईल. संकटांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत देईल, अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाचा जल्लोष करण्याची ऊर्मी देईल.
आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सलाम ध्यान चंद पासून भारतातल्या दुर्गम खेड्यातल्या आखाड्यात दम घुमवणार्या प्रत्येक खेळाडूला, त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या रहाणार्या त्यांच्या गुरुजनांना आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या मुला / मुलींना खेळाडू बनवण्यासाठी झटणार्या त्यांच्या पालकांना. आणि शुभेच्छा तुम्हाला.... जिद्दीनी संकटांचा सामना करण्यासाठी, नव्या जोमानी भोवतालच्या अराजकाचा सामना करण्यासाठी आणि शुभेच्छा हार न मानता झुंजण्यासाठी.
..... फक्त त्या बारक्या फुटबॉलपटूच्या पाठीवर हात ठेऊन एकदा त्याला म्हणा, "Come on बारक्या.....fight!"
प्रतिक्रिया
30 Aug 2013 - 12:05 am | राही
सकारात्मक दृष्टिकोनही आवडला.
सी.के.नायडूंच्या सिक्सर विषयी असे ऐकलेले आहे की बाँबे जिम्खान्यावर खेळताना त्यांनी ती सिक्सर मारली होती. त्या काळी बहुधा क्लब मॅचेस ओवलवर होत नसत. त्यामुळे जे घड्याळ फुटले (हे ऐकले आहे)ते राजाबाई टॉवरचे नसावे. ओवल च्या कडेने युनिवर्सिटी आणि कोर्ट असल्याने तो परिसर शांत राखला गेला होता. मधल्या रस्त्यावरही वाहतूक नसे. ती सुरू झाली श्री.पसरिचा वहातुक आयुक्त असताना म. गांधी मार्ग एकदिक मार्ग केला गेला तेव्हा.
30 Aug 2013 - 12:37 pm | जे.पी.मॉर्गन
राही,
माहितीबद्दल धन्यवाद. खरंतर त्या गोष्टीची कधी शहानिशा करावीशी वाटलीच नाही. मला अगदी लहानपणी असं कोणी सांगितल्याचं आढवतंय. सी के नायडूंनी बॉम्बे जिमखान्याच्या गच्चीवर बॉल मारल्याचंदेखील मी ऐकलंय. ते अंतर १०० एक मीटर असेल पिच पासून. म्हणजे विश्वास ठेवायला जागा आहे. पण ते घड्याळ फोडायला केवळ मिसाइल लाँचरमधून बॉल सोडावा लागेल हे आम्हाला तेव्हा लक्षातही आलं नाही. आम्हाला तर कित्येक वेळा "अरे त्या अमुक तमुकनी जी सिक्स मारली.... नेहरू स्टेडियमवरून बॉल थेट सारसबागेत" वगैरेही सांगितलं गेलं होतं :).
शेवटी दंतकथा म्हणजे वेगळं काय? बाजीप्रभूंची तलवार एक मणाची (४० किलो!!) होती वगैरेही सांगणारे असतातच की. पण ती लोकं मुळात इतकी महान होती म्हणूनच तर त्यांच्या दंतकथा बनतात ना? सुनील जोशी किंवा नरेंद्र हिरवाणीची नाही दंतकथा सांगत ते कोणी? ;-). आणि शेवटी why let facts come in the way of a good story? :-)
30 Aug 2013 - 12:41 pm | बॅटमॅन
हे बाकी एकदम खरं!!! तुकोबा सदेह वैकुंठात जाणे किंवा ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवणे इ. गोष्टी लैच जबर्या. त्यांचे महात्म्य तेवढ्यापुरते राहू देण्यात काही हार्म इल्ले असे मला वाटते.
31 Aug 2013 - 7:00 am | शेखर काळे
ही नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मारलेली होती. मैदानच्याच बाहेर एक चर्च आहे व त्यावर (अजूनही) ते घड्याळही आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर हे अंतर जवळ जवळ १५० मीटर असावे.
31 Aug 2013 - 10:41 am | तुषार काळभोर
अन् नागपुरच्या त्याच मैदानावर वेंगसरकरने तसा सिक्स हाणला आणि त्याला पण "कर्नल" हे टोपणनाव मिळाले.
30 Aug 2013 - 12:21 am | अर्धवटराव
या सर्व लढवय्या मैदानपटुंचं कौतुक करताना एका रसीक, अगदी मोजक्या शब्दात खेळाचा थरार आणि जिगर नेमकं पकडणार्या आणि ते आमच्यापर्यंत सही सही पोचवणार्या क्रीडाप्रेमी समीक्षकाचं नाव न दिल्यामुळे जे.पी. चा निषेध :)
ओळखा बघु कोण हा मिपाकर :) ??
30 Aug 2013 - 12:30 am | अगोचर
माझ्या क्रीडाप्रेमी मित्रान्ना दुवा पाठवला आहे
30 Aug 2013 - 12:31 am | उपास
छान लिहिलयस (तुझ्या जुन्या लिखाणाची आठवण झाली - शारलेट एअरपोर्टवरचया अन इंडँटेड कॅज्युएलिटी वालं).
खेळ खेळायचेच कशाला, पाहून/ चर्चून वेळ फुकट कशाला घालवायचा? काय मिळतं त्यातून असे प्रश्न मला विचारले गेले (विशेषतः नवतरूणांकडून) की माझं असं लंबचौड भाषण तयार असतं ;)
स्पोर्टसमन्शिप आणि त्याची नशा अशी काही और आहे की बस्स्स! बॉल टू बॉल मॅच, मग री-प्लेज, मग सगळ्या पेपरांमधील वार्तांकन वाचण्याचे दिवस आठवले. दुर्दैवाने क्रिकेट इतका ठसा इतर खेळांनी उठवेपर्यंत लहानपण संपलच होतं जवळ जवळ. पण ब्रीज, कॅरम, चेस सारखा बैठा असो की कुठलाही मैदानी, खेळ खेळण्याची आणि पहाण्याची मजा लहानपणापासूनच ठसली मनावर.
आणि हो, विश्वनाथ आनंदचा उल्लेख आवडला असता लेखात :) तद्वत पेस सुद्धा!
30 Aug 2013 - 11:08 am | ब़जरबट्टू
तद्वत पेस सुद्धा!
त्याने सध्या एव्हडा धिगांना केला ना, उतरलाय मनातून... :(
30 Aug 2013 - 9:20 am | पिंपातला उंदीर
दिवसाची स्फूर्तिदायक सुरूवात करून दिल्याबद्दल . फेडरर वर तुमच्या लेखणीतून आलेल काहीतरी वाचण्याची हावरट इच्छा आहे
30 Aug 2013 - 9:57 am | बेकार तरुण
लेख आवडला.
30 Aug 2013 - 10:25 am | प्रभो
मस्त
30 Aug 2013 - 10:32 am | अनुप ढेरे
खूप आवडलं लिहिलेलं.
30 Aug 2013 - 10:55 am | चतुरंग
सुरेख लेख. फारच आवडला. (वरती उपास यांनी म्हणल्याप्रमाणे आमच्या 'विशीचा' उल्लेख असता तर सोने पे सुहागा असं झालं असतं पण तरीही लेख आवडलाच.)
खेळाने जो चिवटपणा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती तयार होते त्याला खरंच पर्याय नाही.
आमचे मल्लखांबाचे गोपाळे सर आठवले त्यांनी रागं भरुन पहाटे व्यायामाच्या सवयीची लावलेली शिस्त आठवली आणि भरुन आलं!
5 Sep 2013 - 7:16 pm | जे.पी.मॉर्गन
रंगाकाका,
तुमच्याकडून गोपाळे सरांचा उल्लेख ह्या आधीही एकदा आलाय. त्यांच्याबद्दल तुमच्या लेखणीतून वाचायला खूप आवडेल.
जे.पी.
30 Aug 2013 - 11:05 am | अद्द्या
प्रत्येक खेळातल्या या जवळपास देव पदाला पोचलेल्या ' माणसांची ' उदाहरणे देऊन . जबरदस्त लेख लिहिलात .
सुंदरच :)
30 Aug 2013 - 11:05 am | ब़जरबट्टू
वा, मस्त लिहलय..
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!
30 Aug 2013 - 11:42 am | चिगो
क्या बात..
जबरदस्त.. अत्यंत समर्पक, रोमांचक लेेख, माॅर्गनसाहेब.. अत्यंत आवडला..
30 Aug 2013 - 12:16 pm | इस्पिक राजा
खुपच सुंदर. जेपीदा नेहमीच मस्त लिहितात.
30 Aug 2013 - 12:49 pm | मुक्त विहारि
झक्कास..
31 Aug 2013 - 9:11 am | उपास
वर उल्लेखलिल्या किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यांचि क्षणचित्रे यु ट्युब वर असतिल ना? त्यांच्या सगळ्या लिंक्स एकत्र करुन ठेवता येतील का? म्हणजे वेगवेगळे खेळ आणि त्यातले हे क्षण पुन्हा पुन्हा उपभोगता येतील, ते ही सहजच. जे. पी. what say?
2 Sep 2013 - 1:17 pm | जे.पी.मॉर्गन
सर्वांना त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
@उपास.... अशी एक यादी करायला हवी. आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या सामन्यांचे दुवे द्यावेत ! आयडिया भारी आहे.
जे.पी.
4 Sep 2013 - 2:30 pm | पैसा
मिपा गंडल्यामुळे हा लेख वाचायचा राहून गेला होता. लै भारी लिहिलंय! सलाम!!
5 Sep 2013 - 3:21 am | राजेश घासकडवी
मस्त लेख.
माझी टीम जिंकत असेल तरच मी टाळ्या वाजवणार या प्रवृत्तीच्या पलिकडे जाऊन सुंदर खेळ झाला तर मी दाद देणार हे म्हणणं आवडलं.
5 Sep 2013 - 3:43 am | जॅक डनियल्स
सहज सुंदर आणि मस्त लेख आहे.
सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. क्रिकेट सोडून इतर खेळांचा उल्लेख आल्यामुळे खूप बरे वाटले.
भाग मिल्खा भाग ! हे गाणं खूप प्रेरणा देऊन जाते. आत्ता असाच ध्यानचंद वर पण सिनेमा यायला पाहिजे, मन खुश होऊन जाईल.
5 Sep 2013 - 5:11 pm | एच्टूओ
खूपच छान...!!
5 Sep 2013 - 6:31 pm | मी-सौरभ
नेहमीप्रमाणेच भारी लेख