पुस्तके सुचवा ना !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
8 Aug 2013 - 10:37 pm

वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना !
पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम.

मीही जराशी यादी देत आहे.

पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.

राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.

शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.

मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.

पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.

पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.

अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.

शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.

आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.

मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्‍या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्‍या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.

नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्‍याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अ‍ॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अ‍ॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

14 Jul 2014 - 8:13 am | आशु जोग

अनगड मोती - बद्दल आणखी काही

त्यात एक प्रकरण गोध्रा आणि तिथला चहावाला यावर आहे. ही आठवण आहे १९१४ ची. मी वाचले २०१४ मधे.

आशु जोग's picture

11 Dec 2014 - 2:05 pm | आशु जोग

ज्यांना चित्रपट बारकाईने पहायची आवड असते अशांसाठी

एक होती प्रभातनगरी - बापू वाटवे

बापू वाटवे हे स्वतः केवळ समीक्षक नव्हते तर प्रभातमधे ते सहदिग्दर्शकही होते. एखाद्या रंजक चित्रपटाइतकेच हे पुस्तकही रंजक आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. लता मंगेशकरांचा जन्मही झाला नव्ह्ता तेव्हापासून शांताराम चित्रपट व्यवसायात होते. बातमीमागची बातमी असते तशी चित्रपटामगची कहाणी यात वाचायला मिळते.

काळा पहाड's picture

11 Dec 2014 - 3:34 pm | काळा पहाड

पुस्तकाचे नावः The Black Hole War: My Battle with Stephen Hawking to Make the World Safe for Quantum Mechanics
माहिती लिंक: http://en.wikipedia.org/wiki/The_Black_Hole_War
माझे मतः फक्त कॉस्मॉलॉजीची आवड असणार्‍यांकरिताच आणि अतिशय जटिल.

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2014 - 6:06 pm | प्रसाद१९७१

विजय तेंडुलकरांची ही व्यक्तीरेखांची पुस्तके वाचण्या सारखी आहेत.
१. हे सर्व कुठुन येते
२. ते
३ आणि मी.

राज कपूर, वसंतराव नाईक, चीमणभाई पटेल, पानवलकर, जयप्रकाश नारायण ह्यांच्या बद्दल ची निरीक्षणे मस्त आहेत आणि निरीक्षणातून आलेली तेंडुलकरांची मते सुद्धा.

जयप्रकाशांच्या लेखात लालूप्रसाद चा उल्लेख आहे तो वाचण्यासारखा आहे. ( लेख १९७७ चा आहे )

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2014 - 6:06 pm | प्रसाद१९७१

तेंडुलकरांचीच "कादंबरी एक" पण मस्तच

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2014 - 6:10 pm | प्रसाद१९७१

ह.मो. मराठेंची कुठलेही पुस्तक वाचण्यासारखेच आहे.
पण "बालकांण्ड" आणि "काळेशार पाणी" सुरेखच.

त्यांच्या व्यक्तीरेखा आणि लेखांची पुस्तके पण छान आहेत जसे की "मधले पान"

तर्री's picture

25 Dec 2014 - 11:19 pm | तर्री

बनगरवाडी : माणदेशी खेड्यामधल्या खडतर जीवनावर आधारित व्यंकटेश माडगुळकर सुंदर यांची कादंबरी.
केलिडोस्कोप : अच्युत बर्वे यांची "एका बेलगाम व बेफाम लोकप्रिय लेखकाचे" व्यक्तिचित्र.
बखर राजधानीची : दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या दिल्ली वास्तव्यामधील घडामोडी
आवर्तन :तालयोगी सुरेश तळवलकर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले चरित्रात्मक पुस्तक. आपल्या महान संगीतकारांना समजून घेताना आपल्या मर्यादा स्पष्ट होतात. तबला तथा शास्त्रीय संगीताची उच्च अभिरुची असेल तर जरूर वाचावे !

सुंदर अभिजात साहित्य वाचायच असेल तर बाबा कदम यांना पर्यायच नाही.
त्यांच कुठलहि पुस्तक घ्या.
सुं द र

बाबा कदमांचं साहित्य अभिजात ?? हे तुम्ही उपहासाने तर म्हणत नाही आहात ना ? बाबा कदमांची पुस्तकं टाइमपास म्हणून वाचायला उत्तम असतात . ते माझेही आवडते लेखक आहेत . त्यांची एक वेगळीच शैली आहे . आरामशीर जीवनशैली - शेती / मळा - भरपूर दूधदुभतं , निसर्गाच्या सान्निध्यातलं घर , निरनिराळी मद्य , उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थ , अनैतिक किंवा चोरटे प्रेमसंबध ( कृपया माझ्या वाचनातील आवडीबद्दल गैरसमज करून घेऊ नये ) , एक कोणीतरी अन्यायी , अत्याचारी , श्रीमंत , क्वचित सत्ताधारी माणूस , त्याच्याविरुद्ध चांगल्या माणसांची एक टीम आणि मग रंगलेली कोर्ट केस असंच त्यांच्या ८० % कादंबऱ्यांचं स्वरूप आहे . तरीही प्रत्येक कादंबरी वाचताना तोचतोचपणा जाणवून कंटाळा येत नाही , ह्यातच त्यांच्या लिखाणाचं यश आहे हेही मान्य . त्यांची किमान १५ - २० तरी पुस्तकं मी वाचली आहेत , ४ - ५ खरेदीही केली आहेत पण त्यांच्या लेखनाला अभिजात वगैरे म्हणण्याचं धारिष्ट्य काही माझ्याने होणार नाही .

आशु जोग's picture

30 Mar 2015 - 9:32 pm | आशु जोग

'ओसरलेले वादळ' हे एक चांगले पुस्तक आहे. अनेक व्यक्तींवर लिहीलेले लेख यामधे आहेत. जगभरातील अनेक व्यक्ती यात भेटतात. ज्ञानात भर पडते.

त्यातही काही व्यक्तींवरचे लेख हे तर केवळ 'दर्शन' ठरतात. याचे कारण लेखकाला स्वतःला वेगळी दृष्टी लाभलेली आहे. (लेखकाचे नाव मुद्दामच देत नाही. नाव ऐकल्यावर अनेक जण शिवीगाळ सुरु करतात)

सन्जय गन्धे's picture

4 Aug 2015 - 4:07 pm | सन्जय गन्धे

चारही पुस्तके अनिल बर्वे यांची दिली याचे एकमेव कारण म्हणजे या धाग्यावर अजुन त्यांचा उल्लेख दिसला नाही म्हणून मला करावासा वाटला. बाकी पण खूप पुस्तके आहेत पण त्याचे बारकावे सांगितल्याशिवाय नुसती नावे देण्यात खरच काही मजा नाही म्हणून दिली नाहीत.
१. डोन्गर म्हातारा झाला - अनिल बर्वे - कम्युनिस्ट विचारांनी भारलेले अनिल बर्वे जेव्हा संघर्ष रंगवतात त्याची वेगळीच खुमारी जाणवते
एका हिल स्टेशनच्या जवळील आदिवासी जमातीचा आणि सत्ताधार्यांचा संघर्ष जमिनिसाठी होतो जी जमीन भांडवलदारना नवीन रिज़ॉर्ट साठी हवी असते. नन्तर तेथे आलेला एक निवृत्त लष्कर अधिकारी जेव्हा त्यात पडतो...
२. थॅंक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे - फाशीची शिक्षा झालेला एक दहशतवादी आणि जेलर यांच्यातील तुफान संवाद. अतिशय खिळवून ठेवणारे पुस्तक. यातच ग्लाडच्या मुलीचे तत्काळ सिझेरियन ऑपरेशन करायची वेळ येते आणि...
३. अकरा कोटी गॅलन पाणी - अनिल बर्वे - कोळसा खाणीतील कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष. त्यातच जुन्या बंद केलेल्या खाण कामाचे अफरतफरीचे संदर्भ आणि त्याच्याशी निगडीत चालू खाणीतील कामगारांचे आयुष्य पणाला लागते. याचवेळी नवीन इंजिनियर येतो...
४. स्टड फार्म - अनिल बर्वे - रेसच्या घोड्याच्या आयुष्याचा बॅकड्रोप घेऊन आलेली कथा. पण परत भांडवलदार आणि मजूर संघर्ष पदोपदी जाणवून देत पुढे सरकणारी. घोड्याचे आणि त्यांच्या घोडेस्वारांचे, आणि सर्वात शेवटी मालकांचे संबंध - त्यातील बारकावे यांचे छान चित्रण आहे.

हेमंत लाटकर's picture

4 Aug 2015 - 8:57 pm | हेमंत लाटकर

मी पाॅपिलाॅन हे अनुवादित पुस्तक वाचले. विनाकारण शिक्षा झालेला एक कैदी आणि दोघे मिळून प्लॅन करून जेल मधून पळतात व समुद्र मार्गात त्याची नाव भरकटते व एका किनार्याला लागतात व तेथील जंगली लोकांच्या तावडीत सापडतात पुढे रोमहर्षक कथेचा प्रारंभ होताे.

आशु जोग's picture

5 Aug 2015 - 2:10 am | आशु जोग

पॅपिलॉन - हेन्री शॅरीयर, अनु-रविंद्र गुर्जर

पुस्तक रंजक आहे. पण सगळ्या गोष्टी खर्‍या असतील का अशी अनेक ठिकाणी शंका येत राहते..

अनिल अवचट यान्चि सर्व पुस्तके, आय डेअर किरन बेदि यान्चे.

हर्मायनी's picture

10 Sep 2015 - 2:09 pm | हर्मायनी

मी नुकतीच गणेश मतकरींची "खिडक्या अर्ध्या उघड्या" हि कादंबरी वाचली.. एक वेगळ्या प्रकारची मांडणी आहे या पुस्तकाची.. सध्याच्या जीवनपद्धतीचे चित्रण आहे. या पुस्तकाला मराठीतून लिहिलेलं इंग्लिश पुस्तक म्हणावं का असा प्रश्न पडू शकतो.. पण overall पुस्तक आवडलेलं आहे..

आशु जोग's picture

13 Sep 2015 - 11:49 pm | आशु जोग

गणेश हा मूळात लेखक आहेत का...
की ते नाटकाच्या इतरही प्रांतात त्यांचे नाव आहे ? कला, वेशभूषा असे काही.

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 1:15 am | प्यारे१

आर्किटेक्ट आहेत. नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मिती शी संबंधित आहेत. त्यांची बहिण सुप्रिया विनोद नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करते. ते स्वत: अनेक चित्रपटांचं समीक्षण करतात जे वृत्तपत्रांमध्ये छापून येतं. त्या अर्थानं कलेशी संबंधित आहेत.

सिरुसेरि's picture

10 Sep 2015 - 2:33 pm | सिरुसेरि

रविंद्र पिंगे यांची सर्व पुस्तके . त्यांच्या पुस्तकांमधून को़कणातील निसर्ग , जीवन दर्शन , प्रवास वर्णन छान सांगितले आहे .

जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र.
अकुपार लेखक ध्रुव भट्ट

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Sep 2015 - 8:07 am | कैलासवासी सोन्याबापु

The Ghost War

(Steve Coll)

आशु जोग's picture

29 Feb 2016 - 11:46 pm | आशु जोग

एका दिवाळी अंकात या लेखिकेची कथा वाचली. यानंतर या लेखिकेचे लेखन शोधून वाचले पाहीजे असे वाटल्याने स्वतःविषयी हे पुस्तक मिळवले. पुस्तकाच्या निर्मितीसकट सर्व गोष्टी उच्च दर्जाच्या आहेत. अनेक लोकांनी इथे स्वतःविषयी लिहीले आहे. लेखन - नीलिमा बोरवणकर

प्रत्येकाने जडण घडण, मैत्री, सहजीवन याविषयी लिहीले आहे.

आशु जोग's picture

16 Apr 2016 - 4:03 pm | आशु जोग

शशिकांत पित्रे कुणी वाचलेत का

चीन इ विषयावर बरे लिहितात असं ऐकलंय

न सांगण्याजोगी गोष्ट' हे शशिकांत पित्रेंच भारत चिन युद्धा वरच पुस्तक आहे.
विस्तीर्ण आढावा घेतलाय.
तसच सद्यस्थिती आणी भविष्यातील वाटचाल यावर ही भाष्य केलय.
चांगल आहे पुस्तक.

नमकिन's picture

7 May 2016 - 9:40 pm | नमकिन

वाचाल तर वाचाल- बाजीराव वर पुस्तक आहे छान

संजीव केळकर यांनी हे पुस्तक लिहीले आहे. बूकगंगाच्या मते "संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले"

_

वास्तविक पुस्तकामधे असंख्य संदर्भ आणि जोडाजोडी केलेले उतारे येतात. त्यामुळे सगळाच विस्कळीतपणा आहे. लेखकाला नेमके काय म्हणायचे हे कळत नाही. संपूर्ण पुस्तकभर निरनिराळ्या पुस्तकातले संदर्भ लेखक फेकत राहतो. पुस्तकाच्या नावापलिकडे उत्सुकता निर्माण करणारे यात काही नाही, हेच सिद्ध होते.

पानिपत व मृत्युंजय बरेच वेळा प्रयत्न करून पण शेवट पर्यंत वाचवत नाहीत.

आशु जोग's picture

4 Aug 2016 - 8:38 pm | आशु जोग

पानिपत वाचण्याचे एक टेक्निक आहे. पहिली ५० पाने पुन्हा पुन्हा वाचा

माझं वाचन अजून अल्प आहे , त्यामुळे पानिपत , स्वामी , छावा यांसारखी पुस्तकं या लीस्टमध्ये नाहीत कारण ना.सं .इनामदार यांची ४-५ पुस्तकं सोडली तर खालील सर्व पुस्तकं मी वाचलेली आणि मला आवडलेली अशी आहेत .

.
विनोदी , हलकीफुलकी आवडत असतील तर हि घ्या - द . मा . मिरासदार यांच्या कथासंग्रहांपैकी कोणतंही पुलंचं हसवणूक , व्यक्ती आणि वल्ली , गणगोत . शंकर पाटील यांची . फक्कड गोष्टी , ताजमहालमध्ये सरपंच , इल्लम , जुगलबंदी , खुळ्याची चावडी , खुश खरेदी , वावरी शेंग , धिंड . शरद वर्दे यांची राशा , फिरंगढंग आणि झुळूक अमेरिकन तोऱ्याची ही पुस्तकंही अतिशय सुरेख आहेत .
.
पौराणिक आवडत असतील तर सगळ्यात आधी मृत्युंजय , मग युगंधर ( शिवाजी सावंत ) . गो . नी . दांडेकरांचं कृष्णवेध अप्रतिम आहे . राधेय - रणजीत देसाई .
.
ऐतिहासिक - श्रीमान योगी - रणजीत देसाई . बाबासाहेब पुरंदरेंची राजा शिवछत्रपती आणि शेलार खिंड . शिवाय ना.सं .इनामदार यांची मंत्रावेगळा , शिकस्त , राजेश्री , शहेनशहा , झुंज हि पुस्तकही सुंदर असावीत , मी त्यांचं फक्त राऊ वाचलं आहे त्यावरून सांगते .
.
सामाजिक वाचायची तर विश्वास पाटील यांचं झाडाझडती , कविता महाजनांचं भिन्न .
.
विज्ञानकथा आवडत असतील तर जयंत नारळीकरांची अंतराळातील भस्मासुर , यक्षांची देणगी , वामन परत न आला , प्रेषित , अभयारण्य , टाईम मशीनची किमया , अरुण साधू यांची स्फोट , मंत्रजागर , डॉ . बाळ फोंडके यांचं सायबर कॅफे , सुबोध जावडेकर यांची आकाशभाकिते , कुरुक्षेत्र , पुढल्या हाका , गुगली , संगणकाची सावली हि पुस्तकं खरंच खूप छान आहेत .
.
भयकथा - नारायण धारप ( त्यांची सगळीच पुस्तकं मला अतिशय आवडतात ) गुढकथा - रत्नाकर मतकरी .

.
संतांच्या आयुष्यावर आधारित साहित्य वाचायचं असेल तर रवींद्र भट यांची इंद्रायणीकाठी , घास घेई पांडुरंगा , हेचि दान देगा देवा …. आणि गो . नी . दांडेकरांचं पाच संत चरित्रे हि पुस्तकं वाचावीत . ( पाच संत चरित्रे अधिक उत्तम …. टीका करण्याएवढी माझी अजिबातच योग्यता नाही पण वाचक म्हणून वाटलं ते सांगते , रवींद्र भटांना ज्यासाठी ३००-३५० पानांची कादंबरी लिहावी लागली ते दांडेकरांनी प्रत्येकी ४०-५० पानांत कितीतरी जास्त हृदयाला भिडेल असं मांडलं आहे )
.
व्यंकटेश माडगूळकर यांचे सगळे कथासंग्रह अतिशय उत्कृष्ट लिखाणाची उदाहरणं आहेत.
.
आणि ग्रामीण पण माडगुळकर , शंकर पाटील , मिरासदार यांच्या ग्रामीण लेखनापेक्षा भिन्न अशी काही उत्तम पुस्तकं म्हणजे - गारंबीचा बापू , गारंबीची राधा , एक होती आजी - श्री.ना.पेंडसे . शितू , जैत रे जैत , पडघवली , पवनाकाठचा धोंडी - गो . नी . दांडेकर .

जयन्त बा शिम्पि's picture

5 Aug 2016 - 4:11 am | जयन्त बा शिम्पि

तुंबाडचे खोत , रक्तरेखा , मर्मभेद , या मराठीतील व The Second Lady इंग्रजीतील मला आवडलेल्या कादंबर्‍या आहेत.
दी सेकंड लेडी मध्ये, अमेरिकेन प्रेसिडेंटच्या पत्नीसारखी, दुसरी,तशीच दिसणारी,पण रशियात असलेली एक स्त्री ,रशियन गुप्तहेर शोधुन काढतात, अमेरिकन फर्स्ट लेडी ला पळवुन, रशियात आणली जाते आणि तिच्या जागी , ही डमी स्त्री पाठवुन , अमेरिकन अध्यक्षाच्या मनातील , गुप्त विचार काढण्याचा , रशियन सरकारचा प्रयत्न असतो. पण एक जागरुक पत्रकार हा कट कसा उधळुन लावतो, याची वेधक कथा सुंदर रितीने गुंफली आहे .

आशु जोग's picture

5 Aug 2016 - 9:33 am | आशु जोग

वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना !
पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम.

वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके म्हणजे सुशिंची. एकदा वाचायला सुरवात केली की 2-3 कसे जातात काळात नाही.

वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके म्हणजे सुशिंची. एकदा वाचायला सुरवात केली की 2-3 कसे जातात कळत नाही.

सपे-पुणे-३०'s picture

5 Aug 2016 - 10:06 am | सपे-पुणे-३०

जॉन ग्रिशॅम ची सर्व पुस्तके. 'द लास्ट ज्युरर', 'द असोसीएट' ई.
बहुतांशी पुस्तके अमेरिकेतील लवादांवर आहेत. केसेसची पार्श्वभूमी वेगळी असल्याने वाचायला मजा येते. तसेच अमेरिकन कायदे पध्दतीचं छान चित्रण आहे.
ही पुस्तके मराठीत मेहता पब्लिकेशन तर इंग्रजीत क्रॉसवर्ड मध्ये मिळतात.

मनीशा's picture

5 Aug 2016 - 8:51 pm | मनीशा

जॉन ग्रिशॅम माझा सर्वात आवडता लेखक आहे

अलीकडेच गिरीश कुबेर यांचे "एका तेलियाने" हे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया व इतर तेल उत्पादक देशांमधील राजकारण व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणाला कशी दिशा मिळाली याचे सुंदर वर्णन(इतिहास) या पुस्तकात आहे.

आशु जोग's picture

9 Aug 2016 - 1:22 am | आशु जोग

हा असा प्रतिसाद पाहीजे. नुसती पुस्तकांची यादी फेकण्याऐवजी हे पुस्तक का वाचावं हे कळलं तर बरं असतं

अन्यथा

पुस्तकांची यादी तर बुकगंगावर पण मिळते ना

palambar's picture

6 Aug 2016 - 8:23 pm | palambar

not without my daughter (ईराण मधुन मुलिसह सुटका करण्यासठि एका आईने केलेलि धड्पड) मराठि अनुवाद, for here or to go अपर्ना वेलणकर , अनुवाद पण बरेच चांगले आहेत .

tusharmk's picture

8 Aug 2016 - 5:41 pm | tusharmk

एक पुस्तक आहे.. "many lives many masters"
यात ७०-८० च्या दरम्यान घडलेली गोष्ट अथवा आत्मचरित्र..डॉ. कडे त्यांच्याच हॉस्पिटल मधली नर्स म्हणुन काम करणारी एक मुलगी काही अगम्य त्रास (विचित्र स्वप्ने, काही गोष्टींची खु भिती) या कारणाने योगायोगाने येते..

तिच्य ट्रिट्मेंट दर्म्यान आलेले अनुभव लिहिले आहेत..

तिच्यावर बरेच उपाय करुन काही फरक पडत नाही म्हणुन डॉ. हिप्नॉटिझम चा पर्याय घेतात.. आणी मग हळु हळु कळत जाते की तिने ह्या आधी जवळ जवळ ८०-९० जन्म घेतले आहेत .. आणी बरिच भिती आधिच्या जन्मातल्या प्रसंगांशी सबंधित आहे..

त्यात ते डॉ. तिला हिप्नॉटिझम दरम्यान अगदी म्रुत्युच्या जवळचे आणी नंतर चे डिटेल्स पडताळतात..

असे बरेच म्रुत्यु शी निगडीत अनुभव ती सांगते .. त्यात सारांश असा की ती मरतान सांगते "मला खुप हलक वाटतय मी खुप उंच उंच जात आहे .. एक खुप मोठी शक्ती प्रकाश दिसत आहे .. जो खुप छान वाटत आहे .. इथे खुप जन आहेत आम्ही सगळे नव्या जन्माची प्रतिक्शा करत आहोत ई. "
तो प्रकाश एक शक्ती आहे ज्याला ती मास्टर म्हणते आणी ती शक्ती त्यांच्याशी बोलतेही..

अजुन ही खुप छान आणी बर्याच प्रश्नांन उत्तर मिळेल अस पुस्तक आहे.. जरुर वाचा..

सपे-पुणे-३०'s picture

9 Aug 2016 - 12:56 pm | सपे-पुणे-३०

डेज ऑफ गोल्डन सेपिया
यास्मिन प्रेमजी (विप्रो च्या अझीम प्रेमजींची पत्नी) यांनी लिहिलेलं पुस्तक.
लालजी लाखा नावाच्या गुजरात मधील कच्छ च्या छोट्या गावातील मुलाने मुंबईत येऊन केवळ हुशारी, कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा या आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर 'कॉटन किंग ' हे स्थान कसं निर्माण केलं त्याची कथा.
स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे साधारण पणे १८५७ सालातल्या मुंबईचे वर्णन आहे.

एक खूप जुनं पुस्तक वाचनात आलंय. स आ जोगळेकर यांचं सह्याद्री. निव्वळ अप्रतिम!

इथे प्रचेतस यांनी संदर्भात लिहिलेलं.

आशु जोग's picture

13 Sep 2016 - 1:16 am | आशु जोग

पुरंदर्‍यांनी राजा शिवछत्रपती लिहीताना 'सह्याद्रीचा' आधार घेतला आहे. असं जाणवतं.

भ ट क्या खे ड वा ला's picture

12 Sep 2016 - 12:09 pm | भ ट क्या खे ड वा ला

एका डोंगर वेड्याने सलग साठ दिवस एकट्याने केलेली भन्नाट डोंगर यात्रा.
लेखक श्रीपाद हिर्लेकर

रायबा तानाजी मालुसरे's picture

12 Sep 2016 - 4:47 pm | रायबा तानाजी मालुसरे

मनोज भाटवडेकरांच एका पुनर्जन्माची कथा!
भाटवडेकर मुंबईकर मानसशास्त्रज्ञ. र्‍हुमॅटॉइड अर्थ्राय्टीस नावाच्या भयंकर आजाराशी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही गोष्ट,
अतिशय प्रामाणिकपणे मांडली आहे. अत्यंत वाचनीय.
डॉ. अंजली जोशींनी लिहिलेलं मी अल्बर्ट एलिस देखील असंच जबरदस्त पुस्तक. एका मानसशास्त्रज्ञाची वैचारीक बैठक समजून घ्यायला मजा येते. बरोबरीला विवेकनिष्ठ विचारसरणीची तोंडओळखही होते.

आशु जोग's picture

13 Sep 2016 - 1:13 am | आशु जोग

तुम्ही छान प्रतिसाद दिलाय. अशाच प्रतिसादांची खरं म्हणजे अपेक्षा होती. अनेकांनी नुसती यादी दिलीये.

अंतरा आनंद's picture

12 Sep 2016 - 5:59 pm | अंतरा आनंद

अहा, मला ही बर्^याच वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांची यादी करता आली. इथे नंदा खरेंच्या पुस्तकांचा उल्लेख कसा नाही? असल्यास माझ्या नजरेतून सुटला. "अंताजीची बखर" भन्नाट पुस्तक आहे. सुरुवातीला पार जुन्या लहेज्यातल्या भाषेची सवय नसल्याने वेळ लागतो पण मग जे काही गुंगून जातो की बस्स. पेशवाईच्या उत्तरार्धातील भारतीय समाजाचे चित्र एका संधीसाधू, स्वतःला तोशीस न लागू देता महत्व मिळवण्याचे जमलेल्या एका भटाच्या भूमिकेतून रंगवल्रे आहे. प्रचंड आवडले होते.
त्यांचंच "वारूळ" वाचायला घेतलय.
"उद्या" हे नंदा खरेंचेच वेगळे पुस्तक. भारतातील तंत्रज्~जनातील अफाट प्रगती, त्याचा केवळ ठराविक वर्गाच्या तुंबड्या भरण्यासाठी होत असलेला कल्पक उपयोग. त्या प्रगतीबरोबर समाजातल्या न बदललेल्या परंपरा, समजूतींची घातली जात असलेली सांगड आणि त्यातून दिसणारे भावनाशून्य त्याहीपेक्षा मेक्~एनिकल भावभावनांचे जग याचे एक ओझरतं भयावह काल्पनिक दर्शन या पुस्तकातून होतं.

जीएंची इतर पुस्तके तर आहेतच पण 'माणसं-अरभाट आणि चिल्लर' हे त्याचं वेगळ्या शैलीतलं एक छान पुस्तक.
दुर्गा भागवतांच्या ऋतूचक्र, पैस आणि बहुधा भारतीय लोककथांचे काही भाग माझ्याकडे आहेत. तेही मधे मधे वाचायला मजा येते.
मारूती चितमपल्लींचं चकवा-चांदण पुरं केलं नाही पण त्याची त्या निसर्गावरची पुस्तकं म्हणजे रातवा, निळावंतीचे दिवस (स्वतंत्र पुस्तक आहे की लेख नक्की आठवतनाहीय्_),नागझिरा ही अप्रतिम पुस्तकं तुम्हाला निसर्गाच्या जवळ, झाडे,प्राणीपक्ष्यांच्या दुनियेत अलगद घेऊन जातात.
रा. चिं. मोरविंचीकरांचे 'शुष्क नद्यांचे आक्रोश' हे ही सगळ्यांनी वाचावंच असं म्हणेन. आपल्या खर्^या खुर्^या समृध्द वारश्याची, परंपरेची आपण कपाळकरंट्यांनी कशी वाट लावली आहे ते वाचून खिन्न व्हायला होतं. या लिखाणासाठी या साध्या शिक्षकाने घेतलेले श्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत पण त्याच्या उपयोग काय?

मला पुस्तकांच्री नावं नक्की आठवत नाही आहेत , बहुधा गंगाजळी असावं. जोशी म्हणून कलकत्त्याच्या एका लायब्ररीत ग्रंथपाल असणार्^यांनी केलेल्या स्फुट लेखनाचे तीन भाग आहेत. ते लेखही फार सुरेख आहेत.
मुखवटे हे आ वि जातेगावकरांचं पुस्तकही मला खुप आवडतं. आता मिळेल का माहिती नाही, पण़ वाचा मिळवून. देवी, सरत चाललेल्या परंपरांचं एक वेगळं विश्व आहे. अर्थात ते मला आवडतं कारण आजीच्या परंपरा जपण्याच्या कडक शिस्तीत माझी वाढ झाली, कोकणातले देवदेवतांच्या, अवचारांच्या गोष्टी ऐकत लहानपण गेलेय. त्यामुळे ह्या मराठवाड्यातील वातावरणातल्या गोष्टी असल्या तरी माझ्या विचाराने प्रागतिक पण संस्कारांने प्रतिगामी असलेल्या मनाला त्या भावतात.

२०१६ मधे अनुभवच्या दिवाळीत अंकात सुहास कुलकर्णी यांचा अरुण टिकेकर यांच्यावर प्रदीर्घ लेख आला त्यामधे सुहास कुलकर्णी यांनी येऊ घातलेल्या या पुस्तकाचा उल्लेख केला होता.

कॉलेजातून नुकतीच बाहेर पडलेली काही मुले अगदी अनौपचारीकपणे एकत्र यायला लागतात, गप्पांचे अड्डे जमवतात. पुढे स्व-तंत्रपणे अनेक नियतकालिकांसाठी लेखन करणारी युनिक फीचर्स ही संस्था सुरु होते. मग उत्तम दर्जाचे चांगल्या खपाचे मासिक, प्रकाशन संस्थाही सुरु होते. दूरदर्शन मालिकांची निर्मितीही त्यांच्याकडून होते. या लोकांची कामे सगळ्यांना माहीत असतात पण या लोकांची नावे फारशी कुणाला माहीत नसतात. या पुस्तकाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी माहीत होतात.

लक्ष्मणझुला’ या लक्ष्मण लोंढेंच्या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते.

हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना.

माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते.
स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते.

‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे.

पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो.
‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही?

.. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.