वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना !
पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम.
मीही जराशी यादी देत आहे.
पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.
पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.
अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.
शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.
आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.
नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.
प्रतिक्रिया
8 Aug 2013 - 11:02 pm | दशानन
माचीवरचा बुधा वाचले आहे?
नसेल तर मिळेल तेथून घ्या व वाचा.
* पुस्तके वाचने म्हणजे मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, मला काय भावले हे त्यात असणे महत्त्वाचे आहे. ते आधी लिहला.
8 Aug 2013 - 11:16 pm | बहुगुणी
चांगला उद्देश आणि माहिती, धन्यवाद!
पुस्तकविश्व इथेही भेट द्या, इथलेच (आणि इतरही बरेचसे) पुस्तकवेडे या संग्रहणीय संस्थळावर पुस्तकचर्चा करतात. (पूर्वी मिपावर त्याचा दुवा असायचा, आता दिसत नाही.)
8 Aug 2013 - 11:36 pm | मोदक
तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये बहुतांश पुस्तके अनुभव / घटना / चरित्रे / आत्मचरित्रे आहेत म्हणून मी वाचलेली व आत्ता लगेच आठवणार्या त्या प्रकारच्या पुस्तकांची यादी देतोय.
अ डबल लाईफ - अॅलेक पदमसी.
अॅलेक पदमसी या अॅड गुरूचे आत्मचरित्र, MRF, लिरील पासून ते KS पर्यंत अनेक जाहिराती कशा तयार झाल्या यांची गोष्ट आणि अॅलेक पदमसी यांनी शेखर कपूरच्या गांधी चित्रपटामध्ये महमद अली जिनांची भूमीका केली त्याचा उल्लेख वाचनीय.
बुलेट फॉर बुलेट - जे एफ रिबेरो.
ज्युलिनो एफ रिबेरो या एका पोलीस अधिकार्याचे आत्मचरित्र. ऑपरेशन ब्लू स्टार ते रूमानियातील राजदूत व नंतर निवृत्ती या संपूर्ण प्रवासातील थरारक घटनांचे चित्रण. शीख अतीरेक्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ला केला आहे.
मेड इन जपान - अकिओ मोरीता.
"सोनी" ची कहाणी.
आयकोका - ली आयकोका.
फोर्ड, क्रायसलर या कंपन्या गाळातून वर काढून स्थिरस्थावर करूनही दोन्ही कंपन्यातून हकालपट्टी झालेला एक लिजंड..
लूजींग माय व्हर्जिनीटी - रिचर्ड ब्रॅन्सन.
व्हर्जिन मोबाईल च्या मालकाचे आत्मचरित्र - पुस्तक मोठे आहे - अवश्य वाचा.
जॅक - स्ट्रेट फ्रॉम द गट्
जॅक वेल्श - जीई कंट्रीवाईडच्या एका हाय प्रोफाईल सीईओचे आत्मचरित्र. जीई कंपनीवर आणि पर्यायाने संपूर्ण मार्केटवर सत्ता गाजवणार्या जॅक वेल्शचे आत्मचरित्र.
या पुस्तकामध्ये "गो होम मिस्टर वेल्श" नावाचा चॅप्टर आवर्जून वाचा. मार्केटलीडर जीई चा आपला प्रतिस्पर्धी हनीवेल ला टेकओव्हर करण्याचा प्रस्ताव युरोपीयन कमीशनर्स नी कसा उधळून लावला, जॅक वेल्श ने कशा बालीश चुका केल्या ते सगळे दिले आहे. (कल्पना करा दोन्ही अमेरीकन कंपन्या आणि त्यांच्या मर्जर / टेक ओव्हर ला युरोपीयन कमीशनर्स नकार देत आहेत.)
स्टीव्ह जॉब्स - by walter isaacson
तुमच्या जवळ खूप पेशन्स असतील तर जरूर सुरूवात करा. मोठे पुस्तक आहे.
मॉंक व्हू सोल्ड हिस फेरारी - रॉबीन शर्मा
हे पुस्तक मला झेपलेले नाही. तुम्ही वाचलेत तर जरूर परिक्षण लिहा.
कोल्ड स्टील.
आर्सेलर मित्तल मर्जर दरम्यान काय काय अचाट गोष्टी घडल्या त्यावर हे पुस्तक आहे.
बिझीनेस लीजंड्स, बिझीनेस महाराजे - गीता पिरामल.
भारतीय उद्योजकांची अप्रतीम व्यक्तीचित्रे - मराठी अनुवाद अशोक जैनांनी केला असल्याने अप्रतीम झाला आहे.
माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरीयन.
अमूलची जन्मगाथा.
टाटांच्या इतिहासाबद्द वाचायचे असल्यास - रोमान्स ऑफ टाटा स्टील, रूसी मोदी - द मॅन व्हू ऑल्सो मेड स्टील. टाटा- अ स्टोरी असे काहीतरी एक अप्रतीम पुस्तक आहे - पुस्तक पाहून सवडीने नाव कन्फर्म करेन.
९० मिनीट्स अॅट एंटबे.
ऑपरेशन थंडरबोल्ट ही अशक्य धाडसी कारवाई करणार्या इस्राईलच्या जवानांची, त्यांच्या कडव्या देशप्रेमाची आणि प्रतिकुल परिस्थितीलाही नमवणारी कहाणी.
पुस्तकाच्या शेवटी UN च्या सभेमध्ये केलेले त्यांच्या प्रतिनिधीने केलेले भाषण वाचताना डोळ्यासमोर उभे राहते.
जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज - पंडीत शिवकुमार शर्मा.-
शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र.
हे नक्क्की वाचाच. संगीतक्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे आहेत.
गाए चला जा - शिरीष कणेकर.
लेखकाच्या नावावर जावू नका ;-), काही चरित्रे चांगली जमली आहेत. (राजेश खन्नाची प्रस्तावना असलेले पुस्तक हेच ना..?)
कार्यरत, प्रश्न आणि प्रश्न, धागे उभे आडवे ही अनिल अवचटांची रिपोर्ताज स्टाईलची पुस्तके.
कार्यरत मधील पान नंबर १९४ आणि १९५ चुकवू नका. ("आम्हा घरी धन - भाग १" मध्ये ते सापडेल तुम्हाला)
गुण गाईन आवडी, मैत्र, गणगोत, आपुलकी - पुलं
पुलंनी चितारलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
तीळ आणि तांदूळ - गदिमा
गदिमांनी लिहिलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
आहे मनोहर तरी, सोयरे सकळ - सुनिताबाई.
फोटोबायोग्राफीज आवडत असल्या तर..
चित्रमय स्वगत - पुलं.
बाळासाहेब
महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे.
पहावा विठ्ठल - उद्धव ठाकरे.
वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
कविता वाचायच्या असल्यास.
समग्र बोरकर - खंड १ व २
जिप्सी, बोलगाणी - मंगेश पाडगांवकर
आज आत्ता मिळत असतील तर लगेचच - "दुनीया तुला विसरेल" हे भाऊसाहेब पाटणकरांच्यावरती असलेले पुस्तक घ्या.
आणि वरचे काहीच मिळाले नाही तर रोज "दासबोध" - एक पुस्तक म्हणून वाचत चला.. :-)
13 Aug 2013 - 10:32 pm | सुधीर
माझं वाचन एवढं दांडगं नाही. पण यातली काही पुस्तकं वाचायच्या यादीत आहेत. माँक हू सोल्ड फेरारी मलाही आवडलं नाही. परिणामकारक तर मूळीच नाही असं आपलं मला वाटतं.
मी इडली आणि ऑर्कीड, उद्योजक मी होणारच ही विठ्ठल कामतांची पुस्तकं वाचली पण इतकी नाही आवडली; थोडी विस्कळीत वाटली. इरावती कर्वेंच युगांत वाचून धक्का बसला. थोडसं नकारात्मक वाटलं तरीपण कटू सत्य फार रोखठोक पणे मांडलं आहे असं वाटलं.
अल्केमिस्टची गोष्ट मात्र कधीही वाचावी अशी आहे, असं वाटतं. खांडेकरांचं अमृतवेल मात्र खूप आवडलं छोटेखानीच आहे पण बरचं काही सांगून जातं असं वाटतं.
9 Aug 2013 - 12:05 am | मोदक
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे.
हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक.
दशानना - प्लीज नोट! ;-)
तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर..
9 Aug 2013 - 9:56 pm | दशानन
ही सगळी पुस्तके आता माझ्याकडे स्टॉकला आहेत ;)
18 Aug 2013 - 1:12 am | पुष्कर जोशी
नरेंद्र जाधव - मी आणि माझा बाप
अकिओ मोरिता - मेड इन जापन - सोनि कंपनी ची गोष्ट
9 Aug 2013 - 11:12 am | आदूबाळ
(1) अंताजीची बखर आणि (2) बखर अंतकाळाची - नंदा खरे
The case of rotten mangoes - Mohommad Hanif
Six suspects - Vikas Swarup
(आत्ता टंकाळा आला आहे म्हणून इतकंच, बाकीचं नंतर)
18 Aug 2013 - 11:15 am | आशु जोग
टंकाळा - टंकायचा कंटाळा. वा छान
18 Aug 2013 - 12:21 pm | आदूबाळ
माझा नाही हो शब्द :) असाच मिपावर वाचलेला आहे.
24 Aug 2013 - 9:30 pm | भ ट क्या खे ड वा ला
टंकाळा .
मस्तच आवडला
9 Aug 2013 - 2:28 pm | आनन्दा
अज्ञेयवादाच्या चौकटीत राहून अध्यात्माचा वस्तुनिश्ठ धांडोळा.
- लेखक निरंजन घाटे.
कोणी परिक्शण लिहिल्यास फार बरे होईल.. छान पुस्तक आहे.
10 Aug 2013 - 12:57 am | धन्या
निरंजन घाटेंच्या इतर पुस्तकांपुढे हे पुस्तक खुपच बालिश वाटले. घाटेंची इतर पुस्तके विशेषतः मानसशास्त्रावरील लेखन खुपच उजवं आहे.
9 Aug 2013 - 3:23 pm | यशोधरा
आज सकाळीच पुस्तकांवर एक धागा काढावा असे मनात आले होते :)
लिहिते सवडीने.
9 Aug 2013 - 5:29 pm | स्पंदना
गोनिदांबद्दल नाही लिहीलं कोणी?
9 Aug 2013 - 6:39 pm | प्रचेतस
गोनीदांची सर्वच पुस्तके खूप छान आहेत. तरी त्यातही सर्वश्रेष्ठ म्हणायचीच तर पडघवली, जैत रे जैत, माचीवरचा बुधा, दुर्गभ्रमणगाथा, कादंबरीमय शिवकाल, त्या तिथे रूखातळी...जौ द्याना, यादी लैच मोठी आहे.
9 Aug 2013 - 6:46 pm | यशोधरा
वाघरु?
9 Aug 2013 - 6:50 pm | प्रचेतस
हो.
एकाच पुस्तकात दोन कादंबर्या आहेत पण मला वाघरूपेक्षाही 'त्या तिथे रूखातळी' जास्त आवडली. निखळ भाषासौंदर्य.
9 Aug 2013 - 6:55 pm | यशोधरा
ह्म्म.. गोनिदांची सगळीच पुस्तके, त्यातली भाषा, विषय भुरळ पाडणारे, लोभस असेच आहे...
9 Aug 2013 - 10:18 pm | मोदक
गोनिदांची सगळीच पुस्तके, त्यातली भाषा, विषय भुरळ पाडणारे, लोभस असेच आहे
+१
याप्रमाणेच,
"स्मरणे गोनिदांची", "स्मरणगाथा" आणि "आशक मस्त फकीर" ही गोनिदांविषयी असलेली पुस्तकेही अप्रतीम आहेत.
आम्हा घरी धन प्रमाणेच आवडलेल्या पुस्तकांचा एखादा धागा काढा. :-)
10 Aug 2013 - 1:01 am | धन्या
मी वाचलेल्या पहिल्या तीन कादंबर्या गोनीदांच्या होत्या: मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो आणि तुका आकाशाएव्हढा. यातील पहिल्या दोन संग्रही आहेत.
जर गोनिदांनी "विष्णूदास नामा" अशा काहीशा नावाने कादंबरी लिहिली असती तर ती मी वाचलेली चौथी कादंबरी ठरली असती. :)
18 Aug 2013 - 10:20 pm | सस्नेह
'मृण्मयी ' राहिली !
19 Aug 2013 - 9:34 pm | आनंदी गोपाळ
महाराष्ट्र दर्शन.
फार सुंदर पुस्तक.
24 Aug 2013 - 9:35 pm | भ ट क्या खे ड वा ला
"कृष्ण वेध" या नावाचे एक पुस्तक वाचले आहे,खूप आवडले होते
लेखक बहुधा गो नि दा च आहेत
कुब्जा ,पेंद्या यांच्या कृष्ण भक्तीचे सुरेख वर्णन आहे.
5 Sep 2013 - 11:19 am | सौंदाळा
गो नि दांचे मला सर्वात आवडलेले पुस्तक शितु.
9 Aug 2013 - 6:31 pm | तिरकीट
गोनिदांचं 'कृष्णवेध' आणि 'दास डोंगरी राहतो' .........
9 Aug 2013 - 6:50 pm | प्रचेतस
अशी ही धरतीची माया - के. शिवराम कारंथ. अनु. रं. शा. लोकापूर
मरळि मण्णिगे ह्या मूळ कन्नड कादंबरीचा सुरेख अनुवाद.
वंशवृक्ष - भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
तपळी शिवशंकर पिल्लै - दोन शेर धान (केरळमधील कुट्टनाड ह्या ठिकाणच्या समुद्रसपाटीच्याही खाली असणार्या जमैनीत भातशेती करणार्या मजुरांवर आधारीत कादंबरी)
9 Aug 2013 - 6:54 pm | प्रचेतस
श्री.ना. पेंडसे - तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, कलंदर, हद्दपार, गारंबीचा बापू.
ह.मो. मराठे - काळंशार पाणी
अनंत सामंत- एमटी आयवा मारू, लांडगा, लिलियनची बखर
9 Aug 2013 - 9:51 pm | दत्ता काळे
सध्या हे पुस्तक मी वाचतो आहे. कथानायकाच्या वडीलांच्या आणि अमेरिकास्थित नातेवाईकांच्या हत्येचा आंतरराष्ट्रीय कट आणि त्या कटाची पालेमुळे शोधून काढण्यासाठी कथानायक आणि त्याच्या मैत्रिणीने केलेला प्रयत्न- अशी ही कथा आहे. कथेची पक्की मांडणी, ओघवती आणि वर्णनात्मक भाषा ह्यामुळे पुस्तक सुरवातीपासूनच मनाची पकड घेतं.
9 Aug 2013 - 9:59 pm | दशानन
आहा.. एक नितांत सुंदर कादंबरी.
अनेक जुने राजकिय घडामोडी व घटना यांचा सुंदर असा वापर या कादंबरीमध्ये केला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जो वेग आहे तो खरच अफाट आहे कादंबरीला.
12 Aug 2013 - 4:42 pm | नन्दादीप
निव्वळ अप्रतिम कादंबरी.....
12 Aug 2013 - 6:56 pm | आदूबाळ
अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी दोन-तीन नेहेमीच्या दुकानांत पाहिलं तर औट ऑफ प्रिंट आहे असं त्यांनी सांगितलं. टेपा लावत होते की काय कळायला मार्ग नाही, कारण पूर्वीही एक-दोनदा असा अनुभव आला आहे (स्वतःजवळ प्रती शिल्लक नाहीत आणि दुसर्याला धंदा मिळू नये म्हणून असं बिनधास्त ठोकून देतात).
12 Aug 2013 - 7:39 pm | मोदक
हे वसन्त वसन्त लिमये म्हणजे ट्रेकर वसन्त लिमये का..?
13 Aug 2013 - 11:29 am | आदूबाळ
हो तेच ते. त्यांची मुळशी जवळ अॅडव्हेंचर स्पोर्ट अॅकॅडमी पण आहे
13 Aug 2013 - 10:37 pm | दशानन
माझ्याकडे आहे स्टॉकला.
12 Sep 2013 - 6:19 pm | भुमन्यु
http://www.bookganga.com/eBooks/Book/5732868582999487413.htm
5 Aug 2016 - 10:10 pm | mahayog
लॉक ग्रिफिन मला बुकगंगा वर मिळाले.
9 Aug 2013 - 10:03 pm | दशानन
वाचलेच पाहिजे असे,
"डोह" लेखक श्रीनिवास कुलकर्णी, प्रकाशक मौज.
मिपावरील प्रत्येकाने वाचावेच असे पुस्तक, मिळवून वाचा अशी शिफारस करतो मी.
त्याच सोबत नेहमीचीच... तोत्तोचान, माचीवरचा बुधा, पवनाकाठचा धोंडी ही तर प्रत्येक मराठी माणसाने वाचावीत अशी पुस्तके आहेत.
9 Aug 2013 - 10:10 pm | यशोधरा
सुरेख आहे हे पुस्तक. :)
10 Aug 2013 - 1:04 am | धन्या
काय विषय आहे या पुस्तकाचा? कादंबरी? कथा संग्रह? ललित निबंध?
थोडी पुस्तकाची ओळख करुन द्याल का?
10 Aug 2013 - 10:00 am | यशोधरा
जरुर.
9 Aug 2013 - 10:26 pm | दशानन
जर जाहिरात करतो आहे असे वाटत असेल तर हा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल, चिंचवड येथे लिंक रोडवर, डोके उद्यान येथे "पुस्तकजत्रा" पुस्तक प्रदर्शन चालू आहे माझे, वरील पुस्तके जवळपास सर्व पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील आहेत, व्यनि केल्यावर त्याची मी लिंक देईन.
10 Aug 2013 - 1:05 am | धन्या
ऑ???
वाट चुकलात की काय? ;)
9 Aug 2013 - 10:51 pm | आशु जोग
दशानन
तुम्ही तुमच्या "पुस्तकजत्रा" बद्दल सांगितले. यात वावगे काहीच नाही.
aparna akshay ,
गोनीदांच्या पवनाकाठचा धोंडीबद्दल लिहिले आहे. माचीवरला बुधा, शितूचाही उल्लेख केलेला आहे.
पुस्तकांची नावे देताना फक्त लेखकाचे नाव न देता पुस्तकाबाबत थोडकी माहिती द्यावी.
9 Aug 2013 - 11:28 pm | उपास
असे धागे कुठल्या ना कुठल्या मराठी संस्थळावर थोड्या थोड्या दिवसांनी येतच राहातात, नेमकं होतं काय ही अशी पसरलेली नावं घेऊन दुकानात जाता येत नाही ना...
मोदका (तू एक्सेल मास्टर म्हणून म्हटलं) ह्याची एखादी एक्सेल बनवून गुगल डॉक्स वर टाकता येईल का.. पुस्तकाच नाव, लेखकाच नाव, प्रकाशकाच नाव, वर्गीकरण (ऐतिहासिक, कादंबरी, आत्मचरित्र, कवितासंग्रह, अनुवाद वगैरे)
जर शंभर एक लोक जमले तर एकदमच मेगा ऑर्डर देऊन टाकु मग ;)
9 Aug 2013 - 11:38 pm | मोदक
कल्पना चांगली आहे.
पण अशा प्रकारची.. पुस्तकांच्या नावाचीच पुस्तके पाहिली आहेत. त्यात ही सर्व माहिती असते. आपण वेगळे काय करणार..?
10 Aug 2013 - 12:31 pm | अभ्या..
आपण मेगा ऑर्डर वर मेगा डिस्काउंट मागणार. शिम्पल :-D:-D
10 Aug 2013 - 2:50 am | स्वैर परी
मुंबईत घडलेल्या आणि घडणार्या बर्याचश्या गोष्टींचि माहिती लेखकाने अनुभवुन जशीच्या तशी पुस्तकात सादर केली आहे! बरेचसे धक्कादायक सत्य दोल्यासमोर येते आणि विचार करायला लावते!
10 Aug 2013 - 9:43 am | यशोधरा
सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही गिरीश कर्नाडांची आत्मकथा वाचत आहे.मूळ कन्नडमध्ये असलेल्या पुस्तकाचा उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला हा अनुवाद. नवीनच पुस्तक आहे आणि बर्याच जणांना वाचायचे असेल, तर डिटेल्स देत नाही, पण अत्यंत प्रामाणिकरीत्या लिहिलेले पुस्तक आहे, इतके म्हणते. हे पुस्तक वाचणे हा एक सुरेख अनुभव ठरतो आहे.
10 Aug 2013 - 11:20 am | किसन शिंदे
दोन महिन्यांपुर्वी या पुस्तकातला काही भाग लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये वाचला होता. त्यात गिरीश कर्नाड यांनी त्याच्या महाविद्यालयीन जीवनातल्या दिवसांवर लिहले होते.
10 Aug 2013 - 10:30 am | सौंदाळा
रॉबिन कुकचे मेडिकल थ्रिलर्स.
कन्टेजन, कोमा, क्रायसिस, टोक्सिन, सीज्रर, क्रिटिकल आणि एक नॉन मेडिकल पण भन्नाट पुस्तक..स्फिंक्स.
जयवंत दळवी यांचे चक्र, (मधु मंगेश कर्णिक यांचे 'माहीमची खाडी' पण 'चक्र' बरोबर वाचा.. झोपड्पट्टी मधील लोकांच्या जीवनाचे भेदक वास्तवदर्शी चित्रण) सारे प्रवासी घडिचे, धर्मानंद
अॅलिस्टर मॅकलीनचची सर्व अनुवादित.. समुद्रप्रवास, जहाजे वगैरेशी संबधित थ्रिलर्स..
दिलीप प्रभावळकर यांचे हसगत (वेगळ्या ढंगाच्या निखळ विनोदी कथा), हसगत
द. मा. मिरासदार यांची कोणतीही.. नाना चेंगट, बाबु पैलवान, गणामास्तर, रामा खरात, शिवा जमदाडे, आनशी वगैरे मंडळीना भेटुन मज्जा येते.
सिडने शेल्ड्न, आर्थर हेली यांची सर्व अनुवादित..
पॅपिलॉन, बँको (तुरुंगातुन पलायन..सत्यकथा), नॉट विदऊट माय डॉटर (अमेरिकन महिलेचे ४ वर्षाच्या मुलीला घेउन इराण्मधुन नव्रर्याच्या तावडीतुन यशस्वी पलायन), सत्तर दिवस (अँडीज पर्वतात विमान कोसळल्यावर त्यातुन वाचलेल्या आणि ७० दिवसांनी माणसात येणार्या प्रवाशांची सत्यकथा)
10 Aug 2013 - 11:16 am | कापूसकोन्ड्या
साधारण विस एक वर्षापूर्वी वाचलेली पुस्तके. चांगली आठवतात पण लेखकाच्या नावासाठी कुणीतरी कमेंट करेलच.
आणि काही अलिकडची पुस्तके.
अच्युत गोडबोलेंची सर्व पण विशेष उल्लेखनिय म्हणजे -
10 Aug 2013 - 11:21 am | किसन शिंदे
रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
10 Aug 2013 - 12:09 pm | आदूबाळ
ऑक्टोपस - श्री ना पेंडसे
10 Aug 2013 - 1:05 pm | धन्या
गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं आहे. बाकीच्या पुस्तकांमध्ये अजिबात दम नाही. मनात तर खुपच बालिश आहे. आयटीच्या भाषेत सांगायचं तर नुसतं कॉपी पेस्ट आहे हे पुस्तक.
गोडबोलेंचं "मुसाफीर" हे आत्मचरीत्र आवर्जून वाचावं असं आहे. त्यांचा पानापानांवर डोकावणारा "मी" खटकणारा असला तरी त्यांचा सोलापूरचा एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा ते माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एक प्रभावी व्यक्तिमत्व हा प्रवास थक्क करणारा आहे. ते ज्या ठीकाणावर पोहचले त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही.
10 Aug 2013 - 2:31 pm | आदूबाळ
"अर्थात" मध्ये जरा सरधोपटीकरण झाल्यासारखं वाटलं.
"मुसाफिर" बद्दल अशाच चांगल्या गोष्टी ऐकून आहे. त्यामुळे वाचण्याच्या यादीत दर्ज केलं आहे.
11 Aug 2013 - 9:34 pm | जॅक डनियल्स
मुसाफिर चांगले आहे, वरती लिहिल्याप्रमाणे "मी" खूप डोक्यात जातो आणि लेखकाच्या प्रमाणिकपणा चा संशय येतो.
11 Aug 2013 - 10:33 pm | आशु जोग
मनात तर खुपच बालिश आहे
लोकसत्ता-लोकरंगमधे 'मनात' प्रसिद्ध होत होते तेव्हाच हे मनात आले होते.
हे एक जमेल तसे संकलन आहे. त्यामानाने सुबोध जावडेकर यांचे मानसशास्त्रावरचे लेखन नवीन माहिती देणारे वाटते.
दुसरी गोष्ट बाबाची. अनिल अवचट यांचाही अनेक संस्थांमधे काम करताना लोकांच्या 'मनाचा' चांगला अभ्यास जाणवतो.
बा द वे
'बोर्डरूम' सारखी गोडबोलेंची छान आहेत.
8 May 2014 - 7:14 pm | असंका
आपल्याला आठवते "दिवसेंदिवस"? मी मसापच्या ग्रंथालयात वाचून हसून हसून अख्खे ग्रंथालय ढवळून टाकले होते. मग कित्येक वर्षांनी एका प्रदर्शनात दिसल्याबरोबर उचलली. तोवर मी आतल्या गोष्टी विसरलो होतो. पुन्हा वाचल्यावरसुद्धा मला तशी आवडली, पण एक एक गोष्ट आवडायचे एक एक वय असते हे जाणवलं.
4 Aug 2015 - 12:45 am | आशु जोग
मुसाफिरचा उल्लेख नाही केलात
10 Aug 2013 - 12:30 pm | चौकटराजा
हल्ली वाचन कमी. मोदक यानी दिलेली यादी मस्त आहे.अनिल अवचट ,अच्यूत गोडबोले,मीना प्रभू, मोहन आपटे यांची सर्वच पुस्तके संग्रही असावीत असे वाटते.
माझ्या स्मरणात ठाण मांडलेली काही.
विज्ञानातील क्रांत्या.- ले डॉ, वसंत चिपळोणकर
आर डॉक्युमेंट- आयर्विंग वॅलेस
१९८४ जॉर्ज ओरवेल
फ्रीडम अॅट मिडनाईट- लॅरी कोलिन्स
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि स वा़ळिंबे.
10 Aug 2013 - 12:35 pm | अभ्या..
राजासाब नाझी भस्मासुर इनामदार यांचा. वालिम्ब्यांचा फ़क्त हिटलर. तोच भारी वाटतो वाचताना. स्पेशली शीर्षके प्रकरणाची.
10 Aug 2013 - 12:37 pm | प्रचेतस
'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि. ग. कानिटकरांचे आहे बे.
10 Aug 2013 - 1:14 pm | अभ्या..
सॉरी शक्तीमान.
ते मी वाचलेच नाही. वालिम्ब्यांचे आहे एक म्हणल्यावर दुसरे वाचलेच नाही. बादवे त्यांची सगली पुस्तके अभिजीत वालिम्बे दिजितलाइज करनार होते त्याची काही कल्पना आहे का?
10 Aug 2013 - 2:55 pm | प्रचेतस
नाय ब्वा.
11 Dec 2014 - 2:59 pm | बोका-ए-आझम
एके काळी हे पुस्तक मला खूप आवडलं होतं पण जेव्हा मी विल्यम शिररचं 'Rise and Fall of the Third Reich ' वाचलं तेव्हा कानिटकरांनी त्याचं भाषांतर केलं पण ते भाषांतर किंवा अनुवाद आहे असं जाहीर केलेलं नाही हे लक्षात आलं. शिररच्या पुस्तकाचा त्यांनी संदर्भग्रंथ म्हणून उल्लेख केलेला आहे. प्रत्यक्षात ते भाषांतर आहे. त्यामुळे हे पुस्तक मनातून उतरले.
11 Aug 2013 - 9:40 pm | जॅक डनियल्स
आयर्विंग वॅलेस चे 'द सेवेन्थ सिक्रेट' नावाचे हिटलरच्या शेवटच्या काळातले खूप मस्त पुस्तक आहे. हिटलरने आत्महत्या केलीच नाही, हा त्याचा सार आहे.
11 Aug 2013 - 10:02 pm | पैसा
खूप वर्षांनी या पुस्तकाबद्दल उल्लेख वाचला इथे! पुस्तक मस्त आहे!
10 Aug 2013 - 1:28 pm | दत्ता काळे
ओसामा बिन लादेनला जी योजनाबध्द मोहिम आखून संपविले, त्या 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर' ह्या मोहीमेचं हे घटनापुस्तक. हे पुस्तक 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर' ह्याच्या टिम लीडरनं - मार्क ओवेन आणि केव्हीन मॉव्हरर ( सहलेखक) ह्यांनी लिहिलं आहे. साधारण तीनशे पानी हे पुस्तक आहे.
10 Aug 2013 - 1:35 pm | त्रिवेणी
मनात - लेखक - अच्युत गोडबोले
10 Aug 2013 - 1:44 pm | धन्या
मिसळपाववर हात-पाय आपटत देव, धर्म, पुनर्जन्म, विज्ञान, मानसशास्त्र वगैरे गोष्टींवर कीबोर्ड बडवणार्यांसाठी:
देववादी आणि दैववादी:
१. कर्माचा सिद्धांत
२. मृत्यूचे माहात्म्य
दोन्ही पुस्तके हीराभाई ठक्कर यांनी लिहिली आहेत. मुळ पुस्तकं गुजराती असली तरी इंग्रजीसहीत बर्याच भारतीय भाषांमध्ये रुपांतरीत. पुस्तकांचा विषय काय असेल हे नावावरुनच कळते.
३. जिवात्म जगाचे कायदे (द लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड) - खोर्शेद भावनगरी: मुंबईतील एका पारशी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यूमुखी पडतात. आई वडील अतोनात दु:खात असताना एका मांत्रिक बाईच्या मदतीने मृत भावांपैकी एकाचा आत्मा आपल्या आईशी स्वयंलेखन (ऑटोमेटीक रायटींग) पद्धतीने आपला म्रूत्यूनंतरचा प्रवास कथन करतो असा काहीसा साचा आहे या पुस्तकाचा.
४. मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स - डॉ. ब्रायन वेसः मराठीत उपलब्ध. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेल्या ब्रायन कडे एक मुलगी तपासणीसाठी येते. आपल्या नेहमीच्या उपचारांबद्दल पुर्ण खात्री असलेल्या ब्रायनचे इलाज या पेशंटवर चालत नाही. शेवटी तो तिला संमोहन अवस्थेत नेतो. या अवस्थेत त्या मुलीला "मास्टर्स" तिच्या ८६ जन्मांबद्दलची माहिती देतात. प्रचंड गाजलेलं पुस्तक.
५. लाईफ बिफोर लाईफ - जिम टकरः पुनर्जन्म या विषयावरचं मोस्ट ऑथेंटिक लेखन असूनही "पुनर्जन्म आहे" असा दावा न करणारे हे पुस्तक आहे. डॉ. इयान स्टीव्हन्सन या अमेरिकेतील युनिव्हरसीटी ऑफ व्हर्जिनिसाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुखाचे चाळीस वर्षाच्या संशोधनाचे फलित म्हणजे हे पुस्तक. डॉ. स्टीव्हन्सननी चाळीस वर्षात जगभरातील तत्कालीन पुनर्जन्मांच्या केसेसचा अभ्यास केला. त्यांच्या नोंदी केल्या. या नोंदी त्याच्या कनिष्ठ सहकार्याने, जिम टकरने पुस्तक रुपात मांडल्या आहेत. या विषयावरील हे "द वन" पुस्तक आहे.
अजून खुप पुस्तकं आहेत. पण ब्रेक के बाद.
11 Aug 2013 - 9:44 pm | जॅक डनियल्स
फारच मस्त यादी आहे, या विषयावरची पुस्तके शोधायचा प्रयत्न करत होतो पण जास्त कचराच मिळत होता.
18 Aug 2013 - 1:31 am | पुष्कर जोशी
भारी...
हाच विषय वर्तक यांनी पन हाताळला आहे
5 Sep 2013 - 12:37 pm | बॅटमॅन
वर्तक म्हंजे तेच का ते सूक्ष्मदेहाने मंगळावर जाणारे आणि वास्तव रामायणात यथेच्छ फेकाफेकी करणारे?
10 Aug 2013 - 8:53 pm | आशु जोग
सर्वांना एक नम्र विनंती.
पुस्तक आणि लेखकाचे नाव यापेक्षा आपण वाचले असल्यास पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात काही लिहिले तर बरे होइल. धाग्याच्या सुरुवातीला मी तशाच प्रकारे लिहिले आहे. धन्या आणि दत्ता काळे यांचा सविस्तर प्रतिसादही अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा पुस्तकाचे नुसते नाव दिल्याने ते वाचण्याची उत्सुकता निर्माण होतेच असे नाही.
(आपुन विनम्र है) जोग
10 Aug 2013 - 11:32 pm | सुधांशुनूलकर
चिंतन – ले. कविवर्य मंगेश पाडगावकर. हे कवितांचं पुस्तक नसून गद्य आहे. कविवर्यांनी काही पुस्तकांची मराठीत भाषांतरं केली. संत सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या रचना, तसंच शेक्सपियरची तीन नाटकं, आणि बायबल. ही भाषांतरं करताना त्यांनी प्रत्येक रचनाकारांचाही संशोधनात्मक सखोल अभ्यास केला. या प्रत्येक ग्रंथाला लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. अत्यंत रसाळ भाषा. सोपं, तत्त्वचिंतनात्मक. त्या त्या काळाचं, समाजाचं चित्र. एका वेगळ्या पाडगावकरांची आपल्याला ओळख होते.
एक धागा सुताचा – कमला काकोडकर याचं (डॉ. अनिल काकोडकरांच्या मातोश्रींचं) आत्मचरित्र. राजकीय वलय लाभलेल्या पतीने संसाराच्या ऐन उमेदीच्या काळात उभ्या केलेल्या वादळाला सामोरं जाताना, जुन्या वळणाच्या त्या माउलीने धैर्याने सगळा संसार सावरलाच, त्याचबरोबर मुलाच्या (अनिलच्या) शिक्षणात खंड न पडू देता त्याच्यावर उच्च मूल्यसंस्कार करून त्याचं भविष्य घडवलं, हे वाचताना आपण आदराने नतमस्तक होतो. एक अत्यंत सात्त्विक, सोज्वळ व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर जिवंत उभं राहतं. जणू सुती धाग्याने विणलेलं भरजरी वस्त्रच.
नादवेध – ले. अच्युत गोडबोले. शास्त्रीय संगीतातल्या रागांवर साध्यासोप्या भाषेत लिहिलंय. त्या त्या रागांवर आधारित असलेली, मराठी आणि हिंदी भाषांतल्या प्रसिद्ध सिने/भाव/भक्ति/नाट्यगीतांची यादीही दिली आहे. शास्त्रीय संगीताबद्दल (रागांबद्दल) विनाकारण निर्माण झालेल्या भीती दूर व्हायला मदत होईल. (‘धन्या’च्या प्रतिसादात ‘मुसाफिर’चा उल्लेख आल्यामुळे त्याबद्दल लिहीत नाही.)
चकवाचांदणं – वनऋषी मारुती चितमपल्लींचं आत्मचरित्र. जाडजूड (साडेसहाशे पानांचा) ग्रंथ. सुरुवातीची काही प्रकरणं वैयक्तिक आयुष्याबद्दल, नंतर मात्र पूर्ण ‘जंगली’. वनकारकिर्दीत आलेले थरारक अद्भुत अनुभव, चिकित्सक वृत्तीने केलेलं संशोधन, त्यांना भेटलेली माणसं आणि त्याचं मार्गदर्शन याबद्दल अतिशय मोकळ्या भाषेत. ‘मी’पण कुठेही जाणवत नाही. चुका, दोष याबद्दल खोटाखोटा प्रांजळ पश्चात्तापही जाणवत नाही. अतिशय निर्मळ निवेदन.
बदलता भारत – ले. भानू काळे. जागतिकीकरणामुळे बदललेल्या परिस्थितीला आणि नव्या आव्हानांना विविध राज्यं (र्ज्यांची सरकार आणि जनता) कशा प्रकारे सामोरी गेली, त्याचा आढावा. विविध राज्यांचा स्वत: दौरा करून त्यावर आधारित.
सुधांशुनूलकर
11 Aug 2013 - 10:46 am | आशु जोग
नेगल भाग १ व २ कुणी वाचलेत का ? याच प्रकारचे सोनाली सिंहीणीवरचेही डॉ. पूर्णपात्रे यांचे पुस्तक आहे. त्याला चांगली लोकप्रियता लाभली.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' नावाचा चित्रपट आला होता. त्यावेळी बापू वाटवे यांनी लिहिले दादासाहेब फाळकेंवर लिहिलेले पुस्तक मुद्दाम मिळवून वाचले होते. चित्रपटापेक्षा पुस्तक रंजक आणि रोमांचक आहे. विशेषतः वाटाण्याचे रोप वाढत जाते त्याची चित्रफीत फाळके तयार करतात. ते पुस्तकातले वर्णन चित्रपटापेक्षा शतपटीने भावते.
5 Sep 2013 - 12:58 pm | कपिलमुनी
एकदम दुनियादारी वरून चाललेले कंदन आठवले .. हे पुस्तक कमी लोकांनी वाचले असल्याने तसे काही झाले नाही..
11 Aug 2013 - 1:36 pm | चौकटराजा
एका लग्न ठरलेल्या मुलीला आपल्याला कुष्टरोग झाल्याचे कळते . लग्न मोडते. नंतर रोगाची वाढ . मग तिच्या मनाची उलघाल , बरे होण्याची धडपड व शेवटी जीवनाचा जोडीदार मिळणे. अशी ही सत्य हकिकत. ...पानगळीचे झाड. माझ्या आठवणी प्रमाणे कोणी तरी जैन आडनावाची लेखिका आहे.
11 Aug 2013 - 7:34 pm | प्राध्यापक
माणूस-मनोहर तल्हार
आयुष्य पेलताना-मधुकर तोरडमल
परजित-अपराजित-वि.स.वाळींबे
पृथ्वीवर माणूस उपराच-सुरेशचंद्र नाडकर्णी
तराळ अंतराळ-शंकरराव खरात
बनगरवाडी-माडगुळकर
माझा प्रवास-गोडसे भटजी
वैदीक संस्क्रुतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्षमंणशात्री जोशी(अप्रतीम ग्रंथ)
फकिरा-अण्णाभाउ साठे
झाडाझडती-विश्वास पाटील
इजिप्तायन-मिना प्रभू
माझी लंडनवारी-आनंद पाटील
याशिवाय पु.लंचे सर्व साहीत्य,नारायण धारपांच्या सर्व कथा,आणी अर्थातच सु.शि.
12 Aug 2013 - 1:01 pm | आशु जोग
मसापचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळवणारे हे एकमेव जोडपे.
प्रतिभा रानडे आणि फिरोझ रानडे यांचे अफगाणिस्तान, पाकिस्तानविषयक जे लिखाण आहे त्याला मराठीत तोड नाही.
प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या काबूलमधील १९७२ च्या वास्तव्यावर अफगाण डायरी हे पुस्तक लिहिले. काबूल म्हणजे जुने पुणे हे वाक्य फार भावले. अफगाणिस्तानातील स्त्रिया एके काळी शिकत असत. नोकरी करत असत. इंजिनीयर म्हणून काम करणार्या स्त्रियाही तेथे होत्या. असे सगळे वर्णन त्यात येते.
--
वाचकांना धर्माच्या नावाखाली अश्मयुगात ढकलला गेलेला अफगाण माहीत आहे.
16 Nov 2014 - 2:08 am | आशु जोग
पाकिस्तानात जो इतिहास सांगितला जातो त्यावर 'मर्डर ऑफ हिस्टरी' नावाचे पुस्तक पाकिस्तानात लिहीले गेले आहे.
लेखक आहेत के के अझीझ.
याचा मराठी वा हिंदीमधे अनुवाद असेल तर हवा आहे.
12 Aug 2013 - 1:14 pm | बाबा पाटील
विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ......अप्रतिम पुस्तके आहेत....
12 Aug 2013 - 1:35 pm | आशु जोग
का बरं अप्रतिम ?
12 Aug 2013 - 2:13 pm | बॅटमॅन
युगंधर एकवेळ सोडा पण युगांत लै जबरी आहे. वाचा म्हंजे कळेल.
14 Aug 2013 - 8:00 pm | आनन्दिता
+१
12 Aug 2013 - 3:44 pm | प्रचेतस
युगंधर शिवाजी सावंतांचं आहे आणि लैच कंटाळवाणं आहे.
12 Aug 2013 - 4:19 pm | बॅटमॅन
+१.
काही प्रसंग चांगले रंगवलेत पण अदरवाईज कुछ खास जम्या नही.
15 Aug 2013 - 12:03 am | अर्धवटराव
मला तरी युगंधर जरा "जास्तच" वाटलं... युगांत मात्र बेष्ट.
अर्धवटराव
12 Aug 2013 - 2:34 pm | आशु जोग
युगांत
महाभारतावरचं ना वाचलय. लोक्सनी नुसती यादी न चिकटवता. त्याबाबत अधिक काही लिहावं म्हणजे ज्यांनी वाचले नसेल त्यांच्या मनात उत्सुकत निर्माण होइल.