७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं.
वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच.
पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल.
मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे.
अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.)
पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या!
एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रतिक्रिया
20 Jul 2013 - 3:07 am | धमाल मुलगा
सिनेमा पाहण्याचं दुर्भाग्य अजुन वाट्याला आलेलं नाहीये, पण शिरिन आणि साईनाथचं लग्न, एम.के.ला उगं यक्ष्ट्राचा रोल असल्यासारखं कचर्यात काढणं आणि श्रेयसचं शिरिनशी लग्न होणं, पुढे श्रेयस खपणं ह्या एव्हढं भांडवल संपुर्ण टीमची आयमाय काढायला पुरेसं आहे. सध्या घाईत आहे, सविस्तर श्राध्द सवडीनं घालायची इच्छा आहेच. अगदी दर्भापासून दहाव्याच्या कावळ्यापर्यंतची सगळी सोय आम्हीच करु, पण एक तेव्हढं मर्तिक मात्र निभवलंच पाहिजे अशी मनापासून तळमळ आहे.
अग्गदी...कालच हेमांगीच्या चेपूच्या भिंताडावर लिहिलं की दुनियादारीचं मातेरं करु नये इतकीच काळजी वाटते आणि आज हे दिव्य प्रताप कळाले.
सु.शिं.च्या ताजमहालाला आपल्या पदरच्या फुटक्या विटा जोडण्यामागं चिन्मयबुवा मांडलेकरांचा नक्की काय हेतू होता तो एकदा कळालं म्हणजे आम्ही सुखानं प्राण सोडू. वर आणि डायरेक्शनचे भीषण प्रकार, सोबतीला वेशभूषेची लक्तरं....हरे राऽम!!! बरं झालं आमचा सु.शि. जिवंत नाही ही दुनियादारीची धिंड काढलेली पहायला. :(
20 Jul 2013 - 10:48 am | श्रीरंग
नाही .. चित्रपट पाहिल्यावर जाणवेल तुम्हाला.. मांडलेकरांनी स्वतःच्या फुटक्या विटांचंच काहितरी बांधलंय, आणी त्यावर फक्त "ताजमहाल" अशी पाटी लावली आहे. ताज महाल चहाचा आग्र्याच्या ताज महालाशी जेवढा संबंध आहे, तेवढाच मांडलेकरांच्या दुनियादारीचा सु.शिं च्या दुनियादारीशी आहे.
20 Jul 2013 - 3:17 am | किलमाऊस्की
बाकी, ते म्हैसचं ट्रेलर बघून केव्हाच डोक्यात तिडीक गेलीय.
यासाठी +१
20 Jul 2013 - 3:18 am | चाफा
सुशी असते तर त्यांना खरंच `दुनियादारी' आठवली असती.
बाय द वे जितेंद्र जोशीचा विग नाहीये त्यान वाढवलेले केस आहेत ते :)
20 Jul 2013 - 11:01 am | श्रीरंग
बापरे!
20 Jul 2013 - 3:43 am | जॅक डनियल्स
लेख वाचून खूप मानसिक समाधान मिळाले, कारण पुण्यात असतो तर हा सिनेमा पहिल्या शो ला बाल्कनी मध्ये बसून पहिला असता. नंतर आलेला मनस्ताप मैफिल (कलिंगा हॉटेल च्या खाली)मध्ये ३-४ तास बुडवून पण पुढचा आठवडा खराब गेला असता.
नशिबाने आत्ता ती वेळ आली नाही आणि मनाला (ओंगळ)"दुनियादारी" बघायची रुखरुख पण राहिली नाही.
धन्यवाद् !
20 Jul 2013 - 5:46 am | धमाल मुलगा
एस्क्युज मी! ते 'महफील' असं आहे हां. असं आपल्या आवडत्या जागांच्या नावाची तोडमोड नै कराची हां. ;)
20 Jul 2013 - 6:57 am | जॅक डनियल्स
माफ करा, चुकलो. के.एफ ब्लू ची शप्पत ;)
20 Jul 2013 - 8:58 am | आदूबाळ
जेडी, तुझं बिहेव चुकतंय...
23 Jul 2013 - 6:06 pm | इष्टुर फाकडा
हायला ह्ये जुळतंय पघा आपलं ! तुम्हीबी तिथंच म्हयफील करता हे ऐकून गार वाटलं, भेटू कवातरी :)
24 Jul 2013 - 3:45 pm | आदूबाळ
मिपाचा "मेहफिल कट्टा" करू कधीतरी :)
20 Jul 2013 - 5:23 am | स्रुजा
दुनियादारी ची college मध्ये असताना अक्षरशः पारायणं केली होती . इतका जिव्हाळ्याचा विषय आहे माझा ती कादंबरी की पुढच्या महिन्यातल्या India trip मध्ये "must do " च्या यादी मध्ये हा चित्रपट ठेवला होता. आता नाही जाणार . ती कादंबरी "classics " मध्ये मोडते. मला फार च मनस्ताप झाला असता सिनेमा बघून . परीक्षणाबद्दल धन्यवाद.
मराठी मालिका आली होती खूप वर्षांपूर्वी याच पुस्तकावर. मूळ कथेशी बरीच प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे "casting " योग्य होतं .
शर्वरी जमेनीस , आशुतोष कुलकर्णी वगैरे सगळे त्या वेळचे नवीन पण चांगले कलाकार होते. ती सुद्धा मधेच बंद पडली मला वाटतं .
या पुस्तकावर चांगली कलाकृती बनवणं कदाचीत खूप अवघड काम असेल.
20 Jul 2013 - 5:45 am | धमाल मुलगा
सुशि स्वतः नाराज होते मालिकेवर. जे काही कथेचं कडबोळं केलं होतं त्यावरुन. शिवाय आमचा एक मित्र त्या मालिकेत काम करायचा, तो दरवेळी भेटला की "दुनियादारीची काय वाट लावतोय रे आम्ही..." असं म्हणून आईबहिणीवरुन कचकून शिव्या घालायचा.
पण एकुण पाहता, ती मालिका परवडली असं म्हणायची वेळ येते की काय असा प्रश्न पडलाय मला.
20 Jul 2013 - 7:46 am | garava
((चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे...)
चि.मा. ने 'तू तिथे मी' सिरीयलची माती केलीये तिथे चित्रपटाचं काय?
20 Jul 2013 - 8:18 am | त्रिवेणी
मी उद्याच्या शोची तिकीट शुक्रवारीच बुक केली होती. आता हे म्ह्णजे आ बेल मुजे मार.
20 Jul 2013 - 11:06 am | स्पा
म टा ने भारी परीक्षण लिहिलंय
=)) =))
म्हणे पुण्याच्याच लोकांना आवडणार नाही चित्रपट
बोंबला
20 Jul 2013 - 7:39 pm | श्रीरंग
"मूळ 'दुनियादारी' पडद्यावर आणताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं अपरिहार्य बनतं. कादंबरी वाचलेल्यांना कदाचित हे स्वातंत्र्य पटणार नाही. परंतु, हे स्वातंत्र्य घेताना पटकथेला हिसके बसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा एकसंध बनला आहे."
असंही लिहिलंय म टा मध्ये. हिसके बसणार नाहीत? उद्या रामायणावर चित्रपत बनवा. त्यात दाखवा, भीम रावणाला सामिल होऊन रामाशी युध्द करतो असं. आणी म्हणा परत अशी लिबर्टी घ्यावीच लागते, म्हणून.
20 Jul 2013 - 7:47 pm | बॅटमॅन
आणि महाभारतात दुर्योधनाबरोबर राम असतो व राम विरुद्ध अर्जुन असे युद्ध रंगते इ.इ.इ.
20 Jul 2013 - 12:14 pm | इरसाल
वाटते की ह्या पोदल्यांनी जरातरी वजन कमी करायला हवे होते. ते तुकाराम महाराज साईनाथ म्हणुन कितपत शोभतील ? कोणी काटकुळा मिळाला नाय काय ?
20 Jul 2013 - 1:55 pm | त्रिवेणी
मला तर नवे तुकाराम महाराज पण आवडले नव्ह्ते.
20 Jul 2013 - 1:35 pm | पिंपातला उंदीर
ह्या पिक्चर च ट्रेलर पाहून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मराठी तरुण कलाकारांच स्वताहाच्या शरिराकाडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. नसीर च्या एका मुलाखतीत तो म्हाणाला होता की शरीर हे अभिनेत्याच आयुध असते. पण स्वप्निल जोशी , जितेंद्रा जोशी साारखे पोटेन्षियल असणारे कलाकार याकडे जे दुर्लक्ष करतात ते बघून वाईट वाटत. जुन्या सिनेमात पण पोट हलवत नाचणारे लक्ष्या आणि अशोक सराफ झरकन आठवून गेले. बाकी अभिनेत्यांबद्दल पण (अतुल कुलकर्णी सारखे काही अपवाद वगळता) हीच बोंबाबोंब दिसते. पिक्चर च ट्रेलर मध्ये तरी तेच जुने अभिनेते कॉलेज कुमारांच्या भूमिकेत पाहून चित्रपट 'थकेला' असणार असे वाटत होते. हा चित्रपट बघितल्या जाणार नवताच.
20 Jul 2013 - 3:50 pm | आदूबाळ
असं नाय हां...
http://www.youtube.com/watch?v=M2h0PTS2WCg
यातला ड्यान्स बघा! विशेष म्हणजे जमिनीवर हात ठेवून गोल गोल फिरण्याची स्टेप. पोटबीट काही असलं तरी हा ड्यान्स महान आहे!
20 Jul 2013 - 5:21 pm | कवितानागेश
शी बाई!
अमोल उद्गीरकरांशी सहमत! :(
20 Jul 2013 - 2:06 pm | मी-सौरभ
तुमच परीक्षण वाचून सुद्धा हि चित्रपट बघायची रिस्क घेणारे..
बघुया..
20 Jul 2013 - 4:50 pm | इनिगोय
यापुढे 'चिन्मय मांडलेकर म्हणजे X ' हे समीकरण पक्कं केल्याबद्दल टीम दुनियादारीचे मनःपूर्वक आभार!
मूळ कादंबरीतच एवढं नाट्य असताना हे असले सगळे टुकार प्रकार करायची अवदसा का आठवली असावी यांना? उदाहरणार्थ -
श्रेयस.. दिग्याला शहाणं वागायला सांगणारा यश स्वतः मात्र लग्नमंडपात धिंगाणा घालतो?
मिनू.. दारू पिऊन पोरांच्या हाॅस्टेलवर??
साई.. शिरिनचा भावी नवरा???
या साईची नि दिग्याची खुन्नस का, हे तर दाखवायलाच विसरलेत लेखक महोदय.
त्याहून कहर - एम के.. चक्क आत्महत्या?? हा तर घोर गुन्हा आहे. प्रेमात हरल्यानंतर आयुष्यभर स्वतःचं अोळख मिटवून तरीही स्वतःला जगत राहण्याची शिक्षा देणारा एमके.. असा आत्महत्या करेल?
ट्रेलरमध्ये जे पात्र सर्वात अपेक्षाभंग करत होतं ते - दिग्या.. मात्र फर्मास जमला आहे. शरीरयष्टीमधली उणीव अंकुश चौधरीने अभिनयातून उत्तम भरून काढलीय. म्हाताऱ्या दिग्याचा (होय होय.. म्हातारा दिग्या!!) सीनही त्याने क्लास केलाय.
हा सिनेमा पाहिल्याचे प्रायश्चित्त म्हणून आता पुन्हा एकशेआठ वेळा दुनियादारी वाचण्याचा संकल्प सोडत आहे!
20 Jul 2013 - 5:04 pm | यशोधरा
इनि, मला दे नं ते पुस्तक.
तसंही पुस्तकावरुन सिनेमे काढले की वाटच लावतात! शाळेचं तेच केलं. Vinci code ची पण वाट लावलेली. अजूनही असतील.
20 Jul 2013 - 5:22 pm | इनिगोय
नक्की!!
20 Jul 2013 - 7:13 pm | बॅटमॅन
असं कै नै हां!! लॉर्ड ऑफ द रिंग्ज व हरी पुत्तर हे सणसणीत अपवाद आहेत त्याला. बॉर्न सेरीज पण तशीच!
20 Jul 2013 - 8:06 pm | जॅक डनियल्स
अजुन या यादी मधले अप्रितम चित्रपट म्हणजे : फोरेस्ट गंप, द हेल्प , इन टू द वाइल्ड, द नोटबुक इ. खूप चांगले चित्रपट निर्माण करता येतात, फक्त तशी इच्छा पाहिजे.
20 Jul 2013 - 8:22 pm | बॅटमॅन
दिलेल्या यादीतले पिच्चर बुकांवरून घेतले आहेत हे माहिती नव्हतं, रोचक आहे.
पूर्ण सहमत! इच्छा अन इच्छाशक्ती दोन्ही असल्यास माष्टरपीसेस बनायला वट्ट हर्कत नस्ते. "अ ब्यूटिफुल माईंड" हे अजून एक उदाहरण त्यावरून आठवले.
22 Jul 2013 - 12:05 pm | मालोजीराव
कादंबरीवरून घेतलेला सर्वोत्तम सिनेमा गॉडफादर वाटला !
22 Jul 2013 - 2:51 pm | गणपा
'जैत रे जैत'बद्दल आपलं काय मत आहे?
:)
22 Jul 2013 - 3:22 pm | प्रचेतस
'जैत रे जैत' सिनेमा छानच आहे. तरीही कादंबरीच सर्वोत्तम.
22 Jul 2013 - 7:06 pm | यशोधरा
अगदी :)
22 Jul 2013 - 11:11 pm | कवितानागेश
सिनेमातली फक्त गाणी छान आहेत. आणि स्मिता पाटील छान आहे. बाकी बोअर झालाय सिनेमा.
ते पुस्तक वाचतानाजितके स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे रहाते तित का इफेक्ट सिनेमातून येत नाही.
३ दिवसापूर्वीच पुस्तक वाचलंय, त्यामुळे त्याचा इफेक्ट ताजा आहे. :)
28 Jul 2013 - 12:26 pm | दिपक
हो लिगोंबावरच्या महादेवाचे वर्णन पुस्तकात बर्याच वेळा येतं पण ते वाचताना प्रत्येकवेळी वेगळं वाटतं. पुस्तक सर्वोत्तम आहे वादच नाही. पण मला चित्रपटही आवडला.
20 Jul 2013 - 10:08 pm | हरिप्रिया_
हरी पुत्तर हा अपवाद नाही हा...
जे काही रोलिंग बाईंनी लिहिलय ते नाय दाखवायला जमल. म्हटल तर पहिले दोन भाग जरा बरे होते..
बाकि ९०% पिक्चर बकवासच पुस्तकावरुन घेतलेले.
खाली विजुभौनी लिहिलय ते १००% बराबर हाय
24 Jul 2013 - 3:49 pm | आदूबाळ
हरी पुत्तर तीन बघताना मला विजय टॉकीजच्या खुर्च्या मोडाव्याशा वाटत होत्या...
20 Jul 2013 - 8:19 pm | विजुभाऊ
पुस्तकापेक्षा उजवा चित्रपट "थ्री इडीयट्स" गाईड ( हिन्दी)
मुळात पुस्तकापेक्षा उजवा डावा असा शब्द प्रयोग चुकीचा आहे.
लेखक जे लिहेतो अन वाचक ते वाचताना स्वतःचे इमॅजिनेशन करून मनात रंगवत असतो.
कॅमेरा या माध्यमाला मर्यादा आहेत. उदा एखाद्या मोठ्या झुम्बराचे / महालाचे वर्णन लेखक तीन चार किंव अधीक पाने रम्गवू शकतो. कॅमेरा बिचारा तेच झुंबर्/महल तीन सेकंदात दाखवून मोकळा होतो.
लेखकाने जर लिहीले की दोन खट्याळ मुले तेथे आली. हे एक वाक्य मात्र कॅमेराला दाखवायला निदान दोन मिनीटे लागता. ( खट्याळ मुलांचा खट्याळपना एस्टॅब्लीश करावा लागतो.)
एख्काद्या स्त्रीचे सौदर्य दाखवताना लेखक कवी तीच्या डोळ्यांच्याची तुलना नक्षत्रांशी करतो. कॅमेरा बिचारा फक्त डोळे दाखवु शकतो.
वाचकाने मनात रेखाटलेल्या चित्राना कॅमेरा जसेच्यातसे रेखाटू शकत नाही. किंवा तो अनुभव दर्शकाला देवू शकत नाही.
अर्थात एखादी सुकुमार कमल नयना सुवर्णकांतीची वेणीची नागीण गजगामिनी असे वर्णन केलेली स्त्री दाखवताना कॅमेरामन ने अलका कुबल/सवीता प्रभुणे/प्रिया अरूण दाखवली तर दर्शक तेथे आपल्या इंमॅजिनेशन ने मधुबाला/माधुरी दिक्षीत्/वर्षा उसगावकर कल्पु शकत नाही
21 Jul 2013 - 12:38 am | धन्या
मी हा चित्रपट दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले.
कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी?
कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच.
शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना?
उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?
21 Jul 2013 - 12:39 am | धन्या
मी हा चित्रपट आज दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले.
कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी?
कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच.
शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना?
उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?
21 Jul 2013 - 1:00 am | श्रीरंग
अहो, मूळ कथेशी थोडीफार फारकत समजू शकतो. एखादं नाव बदलणे, एखादे पात्र घुसवणे, कादंबरीतल्या काही प्रसंगांना छाटणे, इत्यादि. परंतु, आता हेच पहा.. पुस्तकातला श्रेयस, शिरीनचे लग्न ठरल्याचे समजल्यावर, तिच्या होणार्या नवर्यावर अन्याय नको म्हणून स्वतः दूर होतो.. चित्रपटात मात्र लग्नात जाऊन धुडगूस घालून थेत तिला पळवूनच आणतो. चित्रपटाचा उत्तरार्ध तर कादंबरीपेक्षा संपूर्णतः वेगळा आहे. फक्त पात्रांची बावं ती ठेवायची होती, तर उगाच शिरवळकरांच्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचा खोटा दावा का करावा? वाचकांचं प्रचंड प्रेम असलेल्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचं सांगून प्रेक्षक खेचायचे, आणी दाखवायचं भलतंच, ही शुध्द फसवणूकच नव्हे काय?
21 Jul 2013 - 1:22 am | धन्या
भलतंच मनाला लावून घेतलंय तुम्ही.
चित्रपट पाहून इतका मनस्ताप होत असेल तर चित्रपट पाहण्याचा मुळ उद्देश बाजूला राहतो. :)
21 Jul 2013 - 11:12 am | श्रीरंग
मनाला का लागलं हे लिहिलं आहेच. असो.. तुम्हाला चित्रपट आवडला हे उत्तम झालं! :)
28 Jul 2013 - 10:22 pm | कोमल
-१००
श्रेयस, शिरिनला त्रास होऊ नये म्हणून दूर होतो. आणि शिरिन तिच्या वडीलांसाठी ते लग्न करायला तयार होते.
चित्रपट अगदीच टाकाऊ नाहिये. नाहीतर आत्ता खेचत आहे तेवढी पण गर्दी खेचू शकला नसता..
21 Jul 2013 - 1:05 am | श्रीरंग
इन फॅक्ट हयात असलेल्या कुठल्यातरी मोठ्या मान्यवर लेखकाच्या बाबतीत चित्रपटकर्त्यांना इतक्या निर्भयतेने असं करता आलं असतं का? चेतन भगतनी श्रेय मिळालं नाही म्हणुन आमीरसारख्याच्या ही नाकी नऊ आणले होते. इथे तर सु.शिं चं नाव वापरून स्वतःला वाट्टेल ती कथा दाखवण्यात येते आहे. शिरवळकरांच्या वतीने भांडायला कोणीही उभे राहणार नाही, असा निर्लज्ज आत्मविश्वास तर यामागे नसावा?
21 Jul 2013 - 1:24 am | अजयिन्गले
DUNIYADARI..................................KHUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUP AWADALA................Ekadatari THEATERmadhye jaun pahilach pahije...................Thanks a lot ENTIRE TEAM of DUNIYADARI.........................
हे मि फेस बुक आलेलि कोमेन्त्स आहे, आनि दुसरि हि पिच्तुएर बघित्ल्य नन्तर्चि अॅड. मीताली कुलदीप सावळेकरposted toVachoo Aanande
Please can anybody tell me where ill get to Read Duniyadari online????????????
21 Jul 2013 - 11:56 am | तिमा
धन्यवाद. चला, पैसे वाचले.
21 Jul 2013 - 12:43 pm | चावटमेला
क ह र!!!!. मनापासून धन्यवाद गुरूजी, कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी उपकार फिटायचे नाहीत. ह्या सिनेमाची लायकी कळाली. अजून तरी ही ठिगळं थेटरात पैसे घालून पाहिली नाहीत हे माझे परमभाग्य. आता जास्त डोक्याला न लावून घेता पुन्हा एकदा गॉडफादर पाहतो.
21 Jul 2013 - 1:36 pm | सुहास झेले
धन्स... पैसे वाचले :) :)
21 Jul 2013 - 4:55 pm | निखिल देशपांडे
'दुनियादारी'वर चित्रपट्/मालिकेच्या संदर्भात सुशिंनी 'दुनियादारी'च्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिलेली काही वाक्ये:
तरीही एक स्वतंत्र कलाकृती म्हणुन चित्रपट मला बघायचा आहे.
21 Jul 2013 - 5:24 pm | धन्या
जरुर बघा. चित्रपट नक्की आवडेल.
आपलं होतं काय, एक तर आपण मुळ कलाकृतीने प्रचंड झपाटलेलो असतो किंवा मग आपण मनातल्या मनात त्या मुळ कलाकृतीचे आणि त्या कलाकाराचे "लॉयल" रसिक आहोत हा अहं कुरवाळत असतो. अशा वेळी त्या मुळ कलाकृतीला ठीगळं लावण्याचा प्रकार झाला किंवा मुळ कलाकाराला नावं ठेवली गेली की आपला अहं दुखावतो. आणि मग आपण चवताळून उठतो.
अशा वेळी ती मुळ कलाकृतीसुद्धा कल्पनाविलासच आहे हे आपण विसरुन जातो.
21 Jul 2013 - 6:04 pm | श्रीरंग
लॉयल असल्याचा अहं?? वाट्टेल ते..
नुसते कादंबरीचे नाव वापरून लोकांची उत्सुकता चाळवायचे, आणी स्वतःला वाटेल तशी कथा वळवायची, या खोटारडेपणाला नावं ठेवण्यात कसला आला आहे अहं??
आणी एवढीच खाज होती मांडलेकर-जाधव मंडळींना तर दुनियादारी नाव तरी का वापरावं? वेगळ्या नावानी काढायचा चित्रपट..
21 Jul 2013 - 8:51 pm | धन्या
मालक, मांडलेकरांनी शिरीनचं साईनाथबरोबर लग्न लावण्याचा घाट घालून आणि त्या लग्नात नाटयमयरीत्या श्रेयसला उभा करुन, मारधाड करुन नंतर श्रेयस आणि शिरीनचं लग्न लावून दिलंय. "दुनियादारी"च्या वाचकांच्या दृष्टीने त्यांचा अक्षम्य अपराध आहे हे मलाही मान्य आहे. कारण मी ही "दुनियादारी"च्या भक्तांपैकी एक आहे.
ही फसवणूक झाल्याची भावना तुमच्या मनावर स्वार झालीय त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तो तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. परंतू तुम्ही जो स्ट्राँग निगेटीव्ह रीव्ह्यु दिलाय तो प्रमाण मानल्यामुळे इथले बरेच जण एक चांगला मराठी सिनेमा पडद्यावर पाहण्याच्या अनुभवापासून वंचित राहणार आहेत.
शेवटी एक लक्षात घ्यायला हवं की हा चित्रपट दुनियादारी या कादंबरीवर "आधारीत" आहे, दुनियादारीचं "लाईन बाय लाईन" रुपांतर नाही. :)
22 Jul 2013 - 9:03 am | चौकटराजा
मी मुळातली कादंबरी वाचलेली नाही. पिच्चर मी अस्सल "चि. मा." असल्याने टी व्ही वर पाहीन कदाचित. पण मी १९७० च्या दशकात स प जवळून पाहिले आहे. मला स प एक सपक कॉलेज वाटत असे. त्यात हे ग्यांग वगैरे प्रकरण असावे असे वाटत नाही. उदय विहार मधे काही " पडीक" पोरं त्या काळात दिसत पण यातील ग्रूपस जर ग्यांग या सदरात मोडणारे असतील तर मूळ कादंबरीच फार काल्पनिक असावी असे वाटते.
28 Jul 2013 - 7:45 pm | ऐक शुन्य शुन्य
+1
21 Jul 2013 - 6:32 pm | तुमचा अभिषेक
फेसबूकवर माझ्या बरेच मित्रांना चित्रपट आवडला असेच अपडेटस आहेत.. आणि ते अपडेट्स प्रामाणिकच असतात, आवडला तर आवडला नाही तर दे दणादण शिव्या.. जवळपास सर्वच जणांनी ते "टिकटिक" गाणे देखील उचलून धरलेय.. हे सर्व मित्र २२ ते ३० च्या वयोगटातले आणि त्यातील कित्येक असे असावेत की दुनियादारी पुस्तक वाचणे तर दूर असे काही पुस्तकावरून हा सिनेमा आहे हे देखील माहित नसावे.. :)
21 Jul 2013 - 7:42 pm | प्राध्यापक
मुळात कादंबरीच इतकी सशक्त आहे की वाचत असतानाच डोळ्यासमोर ती पात्र अगदी चित्रपटासारखी अवतरतात्,त्यामुळे चित्रपट बघण्यापेक्षा पुन्हा एकदा कपाटातली दुनियादारी काढुन वाचावी हेच उत्तम.
21 Jul 2013 - 11:24 pm | निनाद मुक्काम प...
जाधव ने आधीच म्हटले होते हा सिनेमा कादंबरी वर आधारीत नसून प्रेरित आहे ,
मुळात आजच्या कॉलेज मधील १६ ते २० वर्षांची बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या मुलांना दुनियादारी नावाचे मराठी साहित्यात एक वादळ ७० च्या दशकात येउन गेले ह्याची ह्या सिनेमाच्या निमित्ताने माहिती होईल , कदाचित हि कादंबरी वाचण्याचा ते प्रयत्नही करतील ,
आज ३० उलटलेले अनेक महाभाग आहेत त्यांना सुशी व दुनियादारी माहिती नाहीत , आजही अनेक विचारजंत सुशी ह्यांच्या कादंबर्या वाचतात पण त्यांना दिवाणखान्यात मानाचे स्थान देत नाही , तेथे ठरावीक पुस्तके हटकून आढळतात. ज्यांचे नाणे खणखणीत आहे ते पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यावर आधारित पांचट शिनेमा जर गर्दी खेचू शकतो म्हणजे मूळ कलाकृती काय ताकदीची होती ह्यांची सगळ्यांना कल्पना येते.
सुशी ह्यांच्या कादंबऱ्यांतील एखादा उतारा शाळेच्या पाठ्यपुस्तकात आला पाहिजे असे मनापासून वाटते.
राहिला प्रश्न म्हातारे अवजड देहयष्टी असलेले नट
त्यांना इलाज नाही , आमचा
खारघर चा इम्रान हाश्मी
संतोष जुवेकर , ह्या शिनेमात हवा होता.
असे राहून राहून राहून वाटते
हा शिनेमा जाधव ह्यांनी केला असला तरी त्यापुढे रवी हे नाव नसल्याने अभ्यासपूर्ण कलाकृती सादर करण्याची अपेक्षा बाळगले हे अती होते.
डेविड चा चष्मे बद्दूर हा पराजाप्यांच्या मूळ सिनेमा एवढा
सरस का नाही झाला असा टाहो कोणी फोडला नाही कारण जरी डेविड परांजपे ह्यांचा अनेक क्लासिक सिनेमात त्यांचा सहाय्यक होता.
बेडकी ची म्हैस व पालीची मगर होणे शक्य नाही हे माहिती असून सुद्धा ह्या सिनेमाला जातांना त्यांच्या मर्यादा व दिग्दर्शकाची कुवत लक्षात घेऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा अपेक्षा करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे.
त्यापेक्षा डे डी ला जाऊन त्यावर काही खरडले असते
तर आमच्या सारख्या पैलतीरी लोकांना कोमल सारख्या तस्सम लोकांवर विसंबून राहावे लागले नसते.
ताजा कलम
ज्यांनी child plays , पहिला आहे त्यांनी
झपाटलेला भाग १ व २ वर टीका केली नाही
महेश चे शिनेमे जसे असतात तसे ते होते. म्हणूनच ते पहिले गेले म्हणजे सहन केले गेले.
ह्याच तत्त्वानुसार ज्यांनी चेकमेट, रिंगा रिंगा पाहून सुद्धा मल्टीप्लेक्सेस मध्ये सिनेमा छोट्या पडद्यावर येण्याची वाट न पाहता मोठ्या पडद्यावर पाहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो पाहून उगाच आता त्याच्यावर चिखलफेक करू नये.
एक सिनेमा म्हणूनच तो पाहावा .
22 Jul 2013 - 12:06 am | किसन शिंदे
खारघर नाही रे निनाद..खारेगाव!:)
22 Jul 2013 - 12:10 am | रेवती
ही कादंबरी आमच्याकडे आहे पण १५ पाने वाचल्यानंतरही त्यात विंट्रेष्ट वाटेना! मग नाही वाचली. आता शिनेमा हा नेहमीचा शिनेमा म्हणूनच बघीन. या पुस्तकावर आधारीत म्हणून नाही बघणार.
22 Jul 2013 - 12:11 am | किसन शिंदे
रच्याकने इतक्या संमिश्र प्रतिक्रिया पाहून दुनियादारी पाहण्याची रिस्क घेतोय. कितीतरी आवडत्या पुस्तकांचे सिनेमे बनवल्यानंतर त्यांची झालेली वाट पाहिली, आणखी एकाने काय फरक पडतो.
अवांतरः आपण तर बुवा कोणी मायचा दिग्दर्शक सुशिंच्या चारही मानसपुत्रांना एकत्र एका कथेत गुंफून सिनेमा बनवतोय याचीच वाट पाहतोय्.(होय कि नाय रे धम्या?;))
22 Jul 2013 - 2:16 am | धन्या
नक्की का? की सलोनीला पडद्यावर पाहायची सुप्त ईच्छा या निमित्ताने व्यक्त्त करताय ? ;)
22 Jul 2013 - 12:25 pm | कपिलमुनी
परा ने लिहायला पण सुरुवात केली होती
http://www.misalpav.com/node/19128
22 Jul 2013 - 12:42 am | विजुभाऊ
मादार पटवर्धन , फिरोझ इराणी एकत्र बघायचे?
22 Jul 2013 - 10:00 am | रोहन अजय संसारे
सावध केलेत मानून मनापासून आभार
खरे पुस्तक जनी वाचले त्यांना हे बदल खपणार नाहीत, त्या मुले न जाणेच चित्रपट बगायला चागले. उगाच जाऊन चुकल्या सारखे वाटायला नको
काही वर्ष पूर्वी मणजे जेवा झी मराठी चा अल्फा मराठी हे नाव होते तेवा "दुनियादारी" हि मालिका लागायची. पण ती मधेच बंद करण्यात आलि. त्या मालीकातले काही पत्रे अजून लक्षात आहे DSP - दिग्या - संजय नार्वेकर, शिरीन पटेल - शर्वरी जेमिनीस ,
त्यातला दिग्या अजून मनात घर करून आहे.
आणि जर सुहास शिरावाकारचा पुस्तक फिल्म न बनवनेच चागले.
i.e : येता जाता , बरसात चाद्ण्याची
11 Aug 2013 - 9:44 pm | भडकमकर मास्तर
मोकलायाची आट्वान जाली...
22 Jul 2013 - 11:23 am | सौंदाळा
पत्नीहट्टामुळे चित्रपटाची तिकीटे काढायला काल गेलो होतो पण एका चित्रपटग्रुहात हाऊसफुल आणि दुसर्यामध्ये पहिली रांग होती म्हणुन गेलो नाही.
आज तुमचे परिक्षण वाचुन देव करतो ते भल्यासाठीच करतो यावर विश्वास बसला. :) आजच जाताना वाचनालयातुन दुनियादारी घेऊन अजुन एक पारायण करतो.
बाकी पत्नीहट्ट पुरवण्यासाठी 'काट्कोन त्रिकोण' ची तिकिटे काढली आहेत. कसे आहे हे नाटक एनी आयडीया?
22 Jul 2013 - 11:40 am | बॅटमॅन
काटकोन त्रिकोण नाटक चांगले आहे. ट्विस्टचा जरा अतिरेक केलाय शेवटीशेवटी, पण ऑन द होल चांगले एंजॉयेबल आहे. डायलॉग्स उत्तम आहेत.
22 Jul 2013 - 11:42 am | धन्या
यातच आलं नाही का? इन फॅक्ट काल हा चित्रपट पुण्यातल्या बर्याच थेटरात हाउसफुल होता. माझा भाऊ दोन तास वणवण करुन दिवसभराचे सारे शो हाऊसफुल आहेत हे ऐकून आला.
"पीअर प्रेशर" हा प्रकार इतका इफेक्टिव ठरु शकतो याचं आश्चर्य वाटत आहे. :)
22 Jul 2013 - 12:00 pm | सौंदाळा
धन्यवाद बॅटमॅन.
धन्या,
पीअर प्रेशर, जाहीरातबाजीमुळे तर फरक पडतोच शिवाय काल असे लोक (तरुण, तरुणी) पण पाहिले की जे फक्त आणि फक्त चित्रपट बघण्यासाठी आले होते.
भाग मिल्खा भाग हाऊसफुल आहे मग दुनियादारी द्या, दुनियादारी हाऊसफुल आहे मग रमय्या वस्तावया (का काय ?) तो द्या. त्यांना काहीही करुन कोणता का होईना पण चित्रपट बघायचा होता.
22 Jul 2013 - 12:10 pm | बॅटमॅन
नाहीतर अन-कूल , वेडे किंवा गावंढळ ठरतील ना! वीकेंडला पिच्चर नै पाहिला तर काय खाक वीकेंड साजरा केला???इ.इ.इ.
22 Jul 2013 - 12:18 pm | प्रभाकर पेठकर
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, 'आज आपण पिक्चर बघायला जाऊ. मी एकदम शेवटच्या रांगेतील एकदम कोपर्यातील दोन तिकिटे काढतो.'
प्रेयसी: 'आणि अशी तिकिटं नाही मिळाली तर?'
प्रियकरः 'पिक्चर पाहूsss..!.'
22 Jul 2013 - 12:15 pm | अविनाश पांढरकर
साफ निराशा झाली चित्रपट पाहुन!!!
22 Jul 2013 - 1:11 pm | नि३
चित्रपट बघुन ठरवीनार की तो चांगला आहे की वाईट .....
आणी श्रीरंग साहेब, चित्रपट निरीक्षण करताय ..तेव्हा किमान अपेक्षा आहे की spoiler alert ठेवावा ..
ईथे बर्याच लोकांनी कांदबरी वाचली आहे पण चित्रपटात जे बदल केले गेले आहे असे ऊघड करायला नको होते..
23 Jul 2013 - 10:10 am | श्रीरंग
अर्र्र.. तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. spoiler alert च मुद्दा लक्षातच आला नव्हता. क्षमस्व. यापुढे काळजी घेण्यात येईल.
22 Jul 2013 - 3:14 pm | त्रिवेणी
कादंबरी वाचली नाही. पिक्चर मला व नवर्याला सुध्दा आवड्ला.
22 Jul 2013 - 4:32 pm | सूड
चित्रपट पहायला गेलो. काल सलग चार थेटरात हाऊसफुल ऐकून परत आलोय. रिक्षेला दिलेल्या पैशात पिक्चर बघून झाला असता या विचारानेच दडपण आलं. दुनियादारी बघायला सकाळी साडेअकराला म्हणून आम्ही जे बाहेर पडलो ते इथे तरी मिळेल तिथे तरी मिळेल म्हणून पळापळ करुन शेवटी संध्याकाळी साडेसातच्या शोसाठी सुद्धा दुपारी दोन वाजता हाऊसफुल ऐकलं तेव्हा नाईलाजाने घर गाठलं.
22 Jul 2013 - 6:14 pm | श्रीरंग
चित्रपटकर्त्यांचा खोटारडेपणा मला व्यक्तिशः कितीही आवडला नसला, तरी एका मराठी चित्रपटाबद्दल हे वाचून खरोखर खूपच बरं वाटलं. :)
22 Jul 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
+११११११११११११.
अगदी असेच म्हणतो. तेलुगु अन तमिळ पिच्चरसारखे मराठी पिच्चर कधी हौस्फुल्ल होतील देव जाणे.
22 Jul 2013 - 6:33 pm | ऋषिकेश
आधी इंटरनेटवरून तिकीटे काढावीत असे सुचवतो. ;)
22 Jul 2013 - 5:56 pm | मोग्याम्बो
चित्रपट पाहणारा वर्ग हा कादंबरी वाचणार्या वर्गा पेक्षा खूप मोठा आहे. आणि चित्रपट जर आर्थिक दृष्ट्या यशस्वी करायचा असेल तर तो class पेक्षा पिटातल्या public ला पटेल असा बनवावा लागतो... उत्तम उदाहरण म्हणजे "3 idiots ". अमीर खानचे पात्र चित्रपटात खूपच यशस्वी दाखवले आहे पण मूळ कादंबरी मध्ये तसे नाही दाखवले. मला वाटते कि दुनियादारी बाबतही तसेच काहीसे बदल केले गेले आहेत. आणि माझ्या तर सर्व मित्र मैत्रीणीना हा चित्रपट खूप आवडला ( वयोगट १६ ते २६ ) आणि त्यापैकी एकानेही कादंबरी वाचलेली नाही....
22 Jul 2013 - 6:33 pm | ऋषिकेश
दुनियादारीवर चित्रपट येतोय हे समजताच तो बघायचा नाही हे ठरवले होते. माझ्या डोक्यात घट्ट बसलेली दुनियादारी मी स्वतः पडद्यावर आणायची म्हटली तरी जमणार नाही
22 Jul 2013 - 6:41 pm | चिगो
श्रीरंगजींच्या ह्या परीक्षणानंतर "दुनियादारी" पुन्हा वाचली, आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक ह्यांची मजबूरी कळली.. सुशिंनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, ही एक अत्यंत फसवी कादंबरी आहे. वरकरणी धुमाकूळ, मस्ती असलेल्या ह्या कादंबरीत कुणाच्याच नशीबी सुखांत नाही. मग ते श्रेयस-मिनु-शिरीन असो, मीरा सरदेसाई-श्रेयस गोखले- एम. के. - तळवलकर असो, दिग्या - सुरेखा असो की अगदी एका प्रसंगापुरते आलेले अपर्णा भालेराव - मनीष जाधव असोत. श्रेयस शिरीनऐवजी मिनुकडे का जातो, शिरीनला श्रेयस आवडत असतांनाही ती धीरुभाईशी लग्न का करते, कादंबरीत शेवटी शेवटी मिनु आणि शिरीन दोघीही त्याच्याकडे यायला तयार असतांना श्रेयस त्यांना का नाही म्हणतो इत्यादी गोष्टी कादंबरी वाचल्यावरच कळतात.
चित्रपटाला दुनियादारीतली भावनिक गुंतागुंत आणि बारकावे दाखवायला जमणं जवळपास अशक्य आहे.. पात्रांच्या परस्पर संबंधातली अंडरकरन्ट्स दाखवणंही फार कठीण. ते दाखवायला अभिनेत्याला, दिग्दर्शकाला जमायला पाहीजे, आणि प्रेक्षकांनाही ते "कन्व्हिंसींग" वाटलं पाहीजे.. कशाला एवढा त्रास घ्या मग? शिरवळकर थोडीच "समिक्षक-मान्य" होते.. करा मग राडा. (कहर म्हणजे "ह्या चित्रपटाच्या म्युजीक रिलीजला "सुहास" उपस्थित होते." हे वाचण्याचं दुर्दैव नशीबी आलंय. अरे, बातमी देतांना जरा अभ्यास / विचार कराल की नाही !?
तर, आम्हाला चिन्मयबुवांची मजबूरी कळलीय. ती आम्ही समजूनही घेतोय. फक्त मायबाप रसिकांना एकच विनंती आहे, की चित्रपट पाहील्यावर ही कादंबरी वाचा. चित्रपटाचं यश त्यांचं त्यांना लखलाभ होवो, पण "दुनियादारी" म्हणजे "कॉलेजात जाणार्या पोरापोरांची टगेगिरी" असं चित्रपट पाहून वाटलं, तर तुम्ही चुकताय..
बाकी प्रकाशनापासून गेल्या एकतीस वर्षांत कॉलेजात जाणार्यांच्या आवडीनिवडीत आणि एकंदरीत सामाजिक परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक पडला, लेखकाला "त्याच्या लिखाणात काही साहित्यमुल्य आहे का?" म्हणून नाकारलं गेलं असलं तरी तितक्याच आवडीने दर तरुण पिढीला आवडणार्या "दुनियादारी"ला सर्टीफिकेट्सची गरज नाहीय, हेही तितकंच खरंय.. :-)
24 Jul 2013 - 3:58 pm | आदूबाळ
ज्जे बात!
"उलटा प्रवास" म्हणजे चित्रपटावरून कादंबरीला जोखलं जाण्याची शक्यता लक्षातच आली नव्हती...
22 Jul 2013 - 7:36 pm | मोहनराव
तरिसुद्धा चित्रपट पाहण्यात येईल....
22 Jul 2013 - 11:04 pm | विश्वेश
नशीब ह्यात "तांबडे बाबा" नाही घुसडले ;)
23 Jul 2013 - 3:09 am | अग्निकोल्हा
सुशि पासुन नेहमीच लांब राहिलो कारण ओरिजिनॅलिटी यथातथाच वाटायची... कारण आधिच इतरांचे अनुवादित साहित्य जास्तच वाचलं गेलं होतं. दुनियादारीच्या नादि मात्र न लागण्याचे एकमेव कारण म्हणजे भर तारुण्यात व्यसनाधिन बनलेला एक आप्त सदानकदा या कदंबरिच गुणगान करायचा म्हणुन तर विषेश तिटकारा.
आजच हा चित्रपट बघुन आलो. रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा, खोलि सोडा आगापिछाच नसलेलि पात्रे वगैरे कमकुवत बाजु उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद यांच्या जोरावर शेवटपर्यंत बसणे सुसह्य करतो इतकच.
23 Jul 2013 - 11:47 am | बॅटमॅन
बाकी सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही ती अशाच काहीशा कारणांमुळे. कॉलेजात जास्तीत जास्त पोरे करू तरी काय शकणार-गँगबाजी. लिहा गँगबाजी. असे काहीसे वाटले. असो.
23 Jul 2013 - 6:17 pm | रेवती
सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही
अगदी अगदी. खूप बोलबाला असल्यानं एवढ्यातच ते पुस्तक आणलं गेलं पण मी कॉलेजात असतानाही ते भावलं नसतच. कुठेच कनेक्ट होत नव्हते. नुकतच झिम्माही वाचलं. नाटकाच्या संदर्भात असलेलं तरी कुठे सगळं आपण रिलेट करू शकतो? पण काहीतरी असं होतं की ज्यामध्ये थोडंफार गुंतता येईल. आता सिनेमाबद्दल जितकं जास्त बोललं जातय तितकं ते पुस्तक वाचावसं वाटण्याऐवजी नकोसं झालय. मला जसं वाचवलं नाही तसं आणखी कोणालातरी वाटलं म्हणून बरं वाटलं. ;)