लाचार शेत झाले

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
20 Jun 2013 - 1:12 am

लाचार शेत झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री
निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे

घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची
झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे

                              - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Jun 2013 - 10:37 pm | पैसा

आजची गझल. पण यावर्षी तरी प्पाऊस चांगला पडतोय. शेतकर्‍यांची अवस्था जरा सुधारू दे!