केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..
हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं..
केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक..
ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा...
किंवा केसरिया बालम.
देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. पधारो म्हारो देस..
राजस्थानातल्या पुरातन, प्राचिन हवेलीतलं प्रशस्त संगमरवरी अंगण, किंवा सूक्ष्म कोरीव काम केलेल्या त्या हवेलीतला एखादा झरोका, किंवा अनेक पायर्या असलेल्या विहिरीच्या एखाद्या पायरीवरून, किंवा गरम वाळूच्या एखाद्या टेकडीवरून फुलणारं हे गाणं..
हे वर्णन माझे मित्र डॉ अग्रवाल यांचं..
या लोकगीताची तशी बरीच वेगवेगळी कडवी गायली जातात.. शेवटी हे गाणं म्हणजे एक साद आहे.. कधी कुठला रचनाकार त्याच्या प्रतिभेनुसार आणि कल्पनेनुसार ही पधारण्याची साद घालेल हे सांगता यायचं नाही.. राजस्थानातलं हे पारंपारिक लोकगीत.. त्यामुळे कुणा एका रचनाकाराची यावर मालकी नाही..
परंतु मूळ गाण्यात काही सुंदर पंक्ति आहेत..त्या अलीकडे कुणी म्हणताना आढळत नाहीत..
जसे,
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस...
केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस...
और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस...
आणि या ओळी तर सुरेखच आहेत..
आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार
पधारो म्हारे देस नि...
आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..! :)
त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!
आपलं भारतीय संगीत किती म्हणजे किती समृद्ध असावं? इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे.. किती वैभवशाली आहे आपलं संगीत..! विचार करू लागलो की मन थक्क होतं. ह्या सा-याचा अभ्यास करायला सातच काय, सातशे जन्म देखील पुरणार नाहीत.. पुन्हा पुन्हा या भारतीय मातीत जन्म घ्यावा लागेल..!
जोधपूरहून परतीच्या सूर्यनगरी एक्सप्रेसने निघालो. जानेवारीचे दिवस. संध्याकाळ उलटलेली. गाडी सुसाट मुम्बैकडे निघाली होती. बोचरं वारं होतं..आणि सोबत शब्दवेल्हाळ 'केसरिया बालम..' चे स्वर कानात रुंजी घालत होते...!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
18 May 2013 - 3:54 pm | प्यारे१
छान लेख!
चीअर्स तात्या.
18 May 2013 - 4:08 pm | धनुअमिता
उत्तम लेख !!
18 May 2013 - 4:44 pm | काकाकाकू
पहिल्या ओळीचा अर्थ "या माझ्या भूमीत तीन रत्न निपजली" असा काहिसा आहे बहुदा. पण पुढच्या शब्दांचा अजिबात अर्थ माहित नाहि.
18 May 2013 - 4:51 pm | विसोबा खेचर
मलाही नक्की आठवत नाही.. अग्रवालसाहेबांना गाठलं पाहिजे..:)
इथे इतर कुणी जाणकाराने सांगितल्यास स्वागतच आहे..
18 May 2013 - 5:13 pm | काकाकाकू
अप्रतिम भजन आठवलं - म्हारो प्रणाम. (https://www.youtube.com/watch?v=z7RHhWaeQTY). काय एकेक सुरेख हरकती घेतल्या आहेत. व्वा! त्या आवाजात काय आहे शब्दात सांगणं कठीण आहे. पण जे काहि आहे ते हॄदयाचा ठाव घेणारं आहे!
18 May 2013 - 5:26 pm | विसोबा खेचर
मला शोभा गुर्टूंनी गायलेलं अधिक आवडतं.. किशोरीताईंपेक्षा अधिक सुरीलं, मनाला अधिक भावणारं आणि अधिक तयारीचं वाटतं..!
https://www.youtube.com/watch?v=WGSbcLIHXlc
18 May 2013 - 5:06 pm | jaypal
वाळवंट,उंट आणि माझा मित्र कुंडण आठवतो.
18 May 2013 - 5:12 pm | सुधीर
राजस्थानी लोकगीताची छान ओळख.
18 May 2013 - 5:29 pm | रमेश आठवले
केसरिया या शब्दाचा अर्थ केसरी रंगाचा फेटा बांधणारा असा होऊ शकतो का ? जुन्या काळात राजस्तान मध्ये पुरुषांना फेटा बांधणे जवळ जवळ सक्तीचे होते.
हे गाणे अनेकांनी गायलेले आहे. त्या पैकी लता मंगेशकर यांनी गायलेले गीत येथे देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=9SnFo2UMvQw
18 May 2013 - 5:45 pm | चाणक्य
खरय, मातीशी नाळ जुळलेलं सगळंच मनाला भावतं.
जगणं सार्थकी लावतात असले अनुभव. अश्या छोट्या छोट्या प्रसंगातून जीवन समृद्ध होत जातं असं मला वाटतं
20 May 2013 - 9:18 am | मूकवाचक
+१
18 May 2013 - 5:57 pm | चौकटराजा
जोधपूर जवळ वीसेक किमीवर मंडोर नावाची बाग आहे. खरे तर ते एक स्मशान आहे. तिथे अनेकविध आकारात इमारतींच्या स्वरूपात समाध्या आहेत.बाग बर्यापैकी सुंदर आहे. पण तेथील एक विशेष म्हणजे राजस्थानी कलाकारांचे
लोकधून वादन. एका तंतूवाद्यावर ते इतक्या अप्रतिम जागा घेत ही " केसरिया ची मांड रागातील धुन वाजवितात की क्या कहने ? आपण तल्लीन होउन ऐकत रहातो. व आपण गाफील आहोत असे पाहून बानरे आपल्या वस्तू प़ळवितात.
या लेखाने तू चंदा मै चांदनी, ( रेश्मा और शेरा) या अप्रतिम गीताचीही याद आली.
18 May 2013 - 6:02 pm | विसोबा खेचर
क्या बात है... :)
18 May 2013 - 6:08 pm | विसोबा खेचर
आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार
आमरी - इमली.
नैना मिठी कामरी - सुरेख नयन असलेली कामिनी/प्रणयिनी
रन - रण, युद्धभूमी
18 May 2013 - 6:10 pm | पिशी अबोली
अतिशय सुंदर... केवळ हे वर्णन अनुभवण्यासाठी बालमने लढायला जावं असं वाटायला लागलं.. ;)
18 May 2013 - 6:32 pm | मनिम्याऊ
अप्रतिम लेख...
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस..
या ओळी गायलेले
मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस..
18 May 2013 - 8:10 pm | मनिम्याऊ
http://www.youtube.com/watch?v=-Au5XknNgVg&list=HL1368888021&feature=mh_...
18 May 2013 - 7:26 pm | तिमा
तात्या, लेख आणि प्रतिक्रिया वाचून फार आनंद झाला. शोभा गुर्टुंचे दोन वेगवेगळ्या मैफिलीतले 'केसरिया' माझ्या संग्रहात आहे. त्याची आठवण झाली. 'म्हारो प्रणाम' बाबत तुमच्याशी सहमत.
20 May 2013 - 7:59 am | स्पंदना
सुरेख!
मस्त गाण आहे हे.
20 May 2013 - 9:39 am | सौंदाळा
तात्या लेख नेहमीप्रमाणेच मस्त.
'केसरिया' हा शब्द विश्वास पाटलांच्या 'पानिपत' मध्ये वाचला आहे.
राजपुतांमध्ये सती जाण्यासारखी काहीतरी प्रथा होती त्याला हा शब्द होता असे वाटते.
'पानिपत' मध्ये जनकोजी शिंदे धारातीर्थी पडल्यावर त्याच्या पत्नीने केसरिया केल्याचा उल्लेख आहे.
कोणी जाणकार अधिक प्रकाश टाकु शकेल का?
पण तुमचे रसग्रहण वाचून मात्र प्रसन्न वाटले.
20 May 2013 - 9:54 am | प्रभाकर पेठकर
रजपुतांमध्ये परकिय आक्रमणात पराभव अटळ आहे असे वाटले की रजपुत वीर केसरी वस्त्र परिधान करून लढाईत आत्मसमर्पण करीत. त्याला केसरिया म्हणतात. केसरिया मध्ये जीव तोडून शत्रू सैन्यावर तुटून पडणे अभिप्रेत असते. स्वतःचा जीव रणांगणावर समर्पित करायचा असतो.
अशा सैनिकांच्या स्त्रीया चिता पेटवून त्यात आत्मसमर्पण करायच्या (शत्रू सैन्याच्या हाती पडून विटंबना होऊ नये म्हणून). त्याला जोहार म्हणत.
20 May 2013 - 9:58 am | सौंदाळा
धन्यवाद पेठकरकाका.
20 May 2013 - 10:29 am | रमेश आठवले
माझ्या समजुतीप्रमाणे राजपूत हे त्यांच्या किल्ल्याला शत्रूने वेढा घातला की शर्थ करून लढवीत आणि जर अन्न धान्य अथवा पाणी पुरे नाहीसे झाले तर शेवटच्या लढाई साठी किल्ल्यावरून खाली उतरत. त्यावेळी ते केसरी रंगाची पगडी अथवा फेटा बांधत आणि त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी जोहार करत. केसरी रंगाचा फेटा याला हे सांकेतिक महत्व आहे.
विसोबा खेचर यांच्या मूळ लेखात नायीका ही लढाई वर गेलेल्या म्हणजे (केसरी फेटा बांधलेल्या) शूर प्रियकराला बोलवत असल्याचा उल्लेख आहे. नंतर या गाण्यात पुढे जाउन नायिका प्रियकराला केशर लावून पाय धुण्याचे आश्वासन ही देते.
यावरून केसरीया बालमा याचा अर्थ केसरी फेटा ( किंवा पगडी ) परिधान केलेला प्रियकर असावा असे मी समजतो.
20 May 2013 - 11:40 am | विसोबा खेचर
सर्वांचे मनापासून आभार.. रमेश आठवले, चौकट राजा, मनिम्याऊ, सौंदाळा, पेठकरसाहेब यांच्या प्रतिक्रिया माहितीपूर्ण..
अजूनही ह्या विषयात खूप काही अभ्यासपूर्ण कुणी काही लिहिल्यास स्वागतच आहे..
पुन्हा एकदा आभार..
तात्या.