मे महिना. डोक्यावर आग ओकणारा सुर्य. रणरणते उन आणि दमट हवा. मुंबई मधला उन्हाळा म्हणजे, प्रचंड घाम आणि चिकचीकाट. तशात लोकलच्या सेकंड क्लास मधुन प्रवास करायची मजबुरी. म्हणजे फस्ट क्लास काही फार सुसह्य असतो असे नाही, फक्त तिकडे सेंट मिश्रीत घामाचा दर्प येतो आणि लोक रुमाला ऐवजी टायने घाम पुसत असतात.
बसायला जागा मिळाली नाहीच. तसाच लटकत उभा राहिलो. दोन बाकांच्या मधल्या ओळीत. एका बारला जीवाच्या आकांताने घट्ट पकडून. आजूबाजूचे प्रवासी अगदी खेटून उभे होते. त्यांच्या चिकट अंगाचा स्पर्श नको नको झाला होता. त्यातच प्रत्येक दिशेने घामाचा वेगवेगळा वास येत होता. त्यांच्या पासुन शक्यतेवढे अंग चोरत, मधेच येणारा जवळपासच्या गटारांचा किंवा खाडीचा वास झेलत मी मुकाट उभा होतो. रुमाल हातात असून सुध्दा घाम पुसता येत नव्हता इतकी अफाट गर्दी. लोकल स्लो झाली की खिडकीतुन येणारा वारा पण बंद व्हायचा आणि मग तगमग अजुन वाढायची. डो़क्यावरच्या पंख्यातुन घरघर आवाज येत होता त्यामुळे तो सुरु आहे हे समजत होते. पण वार्याची साधी झुळुकही त्या पंख्यातुन येत नव्हती. मोबाइलवर कोणतीतरी गाणी सुरु होती. पण एकाही गाण्याकडे माझे लक्ष नव्हते. पण गाणी बंद करण्याची सुध्दा इच्छा मला होत नव्हती. ईयर फोन कानांना तसेच लटकवुन बधिरासारखा त्या गर्दीत सुन्नपणे उभा होतो मी. कोणी तरी ओरडले "दादर दादर" आणि मी आपोआप दरवाज्याकडे सरकु लागलो. एखाद्या यंत्रा सारखा निर्जीव पणे.
हातातली बॅग संभाळत कसाबसा धापा टाकत प्लॅटफॉर्मवर उतरलो.
अंग घामाने चिंब झालेल होतं, केसांमधुन आलेला घाम भुवयाना, पापण्यांना न जूमानता डोळ्यात जात होता त्या मुळे डोळेही जळजळत होते. कपडे अंगाला घट्ट चिकटले होते त्यामुळे चालतानाही अडखळायला होत होते. पायातले मोजे तर काढुन फेकुन द्यावेसे वाटत होते. चिंब झालेला रुमाल पिळुन त्याच ओलसर रुमालाने घाम टिपण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न चालला होता.
बॅगेतुन पाण्याची बाटली काढुन त्यातले कोमट पाणी प्यायलो. पण त्याने काही समाधान होत नव्हते. उलट तहान अजुनच वाढली. गर्दी कमी होण्याची वाट बघत जिन्याच्या कडेला एका पंख्या खाली दोन मिनीट उभा राहिलो येणार्या जाणार्यांच्या बडबडीकडे, धक्यांकडे दुर्लक्ष करत.
दुसरी एक लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती.
आणि दरवाजातच ती उभी असलेली दिसली. काजळ घातलेले ते टपोरे काळेभोर डोळे, मुळचा लख्ख गोरा पण उन्हाने गुलाबी झालेला तिचा चेहरा बघितल्यावर जणु नजरबंदी झाली. माझी नजर तिच्यावर खिळुन राहिली. खुळ्या सारखा मी तिच्या कडे पहात राहिलो. तीच्या कपाळावर जमलेले घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकत होते. खांद्यावरची भलीमोठी लालभडक पर्स सांभाळत मागच्या गर्दीला थोपवत गाडीतुन उतरण्याचा अचुक क्षण साधण्यासाठी ती सज्ज उभी होती.
तीला पण उकाड्याने आणि घामाने घेरलेले होती. घामाने तीचा ड्रेस अंगाला घट्ट चिकटला होता तो मोकळा करायचा तीचा प्रयत्न मोठा लोभस दिसत होता. हिरवा कंच ड्रेस आणि त्यावर जरीच्या काठांची ओढणी तीला भलतीच शोभुन दिसत होती. पण त्या उन्हाला, उकाड्याला ती वैतागलेली नव्हती तर तो उकाडा ती जणु एन्जॉय करत होती. चेहर्यावर एक हलकेसे स्मीत ठेवत, सुस्कारे सोडत त्या गर्दीत डौलात उभी होती. तो डबा माझ्या जवळपासच थांबला आणि ती झटकन खाली उतरली. ओढणीनेच तीने आपला चेहरा पुसला. कपाळावरची टिकली सारखी केली. मानेवर ओढणीचे टोक फिरवत, त्याच ओढणीने वारा घेत, ती जीन्याकडे यायला लागली. आपले लांबसडक केस तीने मानेला एक नाजुकसा झटका देत सारखे केले. डोक्यात चाफ्याची फुले माळली होती. त्यातले एक काढुन त्याचा वास घेत घेत ती जीना चढु लागली. स्वतःच्या पुर्णपणे धुंदीत होती ती. आजूबाजूच्या जगाची तिला मुळी पर्वाच नव्हती. उकाड्याचा, उन्हाळ्याचा त्रागा तिच्या चेहर्यावर नावाला देखील नव्हता. ड्रेसला मॅचिंग असलेल्या सँडलचा लयबध्द आवाज करत लगबगीने जीना चढणारी ती बघून मला वाटले परी परी असे म्हणतात ती हिच असावी. तिच्या नुसत्या दर्शनाने आजुबाजुचे वातावरणच बदलले होते.
पण परमोच्च बिंदु अजुन यायचा होता.
म्हणजे बघा देव द्यायला लागला की एखाद्याला कसे भरभरुन द्यायला लागतो. त्या उकाड्याने वैतागलेला, उन्हाळ्याने त्रासलेला आणि घामाने हैराण झालेला मी तीच्या दर्शनाने आनंदीत झालो होतो तेवढ्यातच माझ्या मोबाईल वर गाणे वाजु लागले
हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस केसांत उगा का ?
वार्याचे हळु पीस फिरवुनी उसळ्यास हिरव्या लहरी का ?
पिवळी-काळी फूलपाखरे फेकुनी मजवर भिवविसी का ?
लाल फुलांनी भरता ओंजळ, माझी मजवर उधळसी का ?
सहसा शिंपुनी गुलाबपाणी ढगा आड दडलास वृथा का ?
प्रतिबिंबानी निळ्या-जांभळ्या तनमन अवघे व्यापिसी का ?
अशी हरवली राणी मीरा, अशी हरवली राधा गौळण
असेच मी मज हरवून जावे हेच तुझ्या मनी जागत का ?
संपुर्ण गाणे संपे पर्यंत मी तिथेच उभा होतो. भारावल्या सारखा. त्या वेळात एक जादु झाली होती, माझ्या अंगावर एक मोरपीस फिरल्या सारखे झाले. अंगावर एक शहारा आला आणि मग माझा उकाडा कुठल्या कुठे पळाला. थंडाव्याची, उल्हासाची एक शीत लहर माझ्या अंगात उसळली.चहुबाजुनी येणारा चाफ्याचा सुगंध मला धुंद करायला लागला.गाणे संपल्यावर त्या धुंदीतच मी जीना चढु लागलो.
प्रतिक्रिया
5 May 2013 - 4:52 pm | जेनी...
:)
आवडला लेख ...
रीफ्रेशमेंट :)
5 May 2013 - 4:58 pm | प्यारे१
आवडलं.
5 May 2013 - 4:58 pm | अग्निकोल्हा
.
5 May 2013 - 5:04 pm | तुमचा अभिषेक
आवडकी झु़ळूक.. एकेकाळी मीसुद्धा अश्या झुळकीच्या प्रतिक्षेत कांदिवली स्टेशनबाहेर उभा असायचो.. शेवटाला तुम्ही मला त्याच आठवणींत घेऊन गेलात.. :)
5 May 2013 - 5:26 pm | चाणक्य
खरच गार झुळुक आल्यासारखं वाटलं लेख वाचून.
5 May 2013 - 5:29 pm | अभ्या..
छानेय एकदम.
माऊली धन्यवाद हो.
5 May 2013 - 5:34 pm | चित्रगुप्त
व्वा. झकास.
याला साजेसे चित्र्/फोटो हुडकला पाहिजे आता.
5 May 2013 - 6:16 pm | पक पक पक
संपुर्ण गाणे संपे पर्यंत मी तिथेच उभा होतो.
त्या मुळेच गोष्ट लवकर संपली..... ;)
5 May 2013 - 6:19 pm | विसोबा खेचर
ज्ञापै, मस्तच लिहिलंत हो. आज बरेच वर्षांनी तुमच्या या लेखामुळे ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली चित्रा जोशी नावाची झुळूक आठवली.. :-)
5 May 2013 - 6:28 pm | किसन शिंदे
पैजार बुवा मस्तच लिह्लंय पण डोक्यात चाफ्याची फुले माळली होती हे काही पटले नाही. आदीवासी किंवा खेड्यापाड्यातल्या स्त्रिया सोडल्या तर अजूनपर्यंत एकाही शहरी स्त्रिच्या डोक्यात चाफ्याची फुले कधीच पाहिली नाहीत.
5 May 2013 - 7:06 pm | पक पक पक
आदीवासी किंवा खेड्यापाड्यातल्या स्त्रिया सोडल्या तर अजूनपर्यंत एकाही शहरी स्त्रिच्या डोक्यात चाफ्याची फुले कधीच पाहिली नाहीत.
हे देखिल पट्ले नाही...
5 May 2013 - 8:39 pm | सूड
चाफा म्हणजे सोनचाफा!! :) तसं नसेल तर पैजारबुवा सांगतीलच.
6 May 2013 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार
चाफा आणि सोनचाफा वेगळा हे म्या पामराला माहितच नव्हत. आम्ही सोनचाफ्यालाच चाफा समजुन चाललो होतो.काय मस्त वास असतो त्यांचा. दादर स्टेशनच्या बाहेर गजरेवाल्या कडे बर्याचदा पाहिली आहेत. डोंबिवली स्टेशनच्या फुटओव्हर ब्रीजवर पण बर्याचदा त्याचे वाटे ठेवलेले पाहिले आहेत.
5 May 2013 - 6:58 pm | मुक्त विहारि
आवडले..
5 May 2013 - 8:53 pm | सूड
डोळ्यासमोर चित्र उभं केलंत. हापिसात हिरवी नऊवारी, केसांचा खोपा त्यावर मोगर्याचा गजरा माळून आलेली एक झुळूक आठवली. (त्यादिवशी महिला दिनाचा कायसा समारंभ होता म्हणे त्यांचा, त्यानिमित्त सगळा नटापटा होता). पण त्यादिवशी मी तिच्याकडे एकटक बघत असल्याचं ज्यांच्या ज्यांच्या म्हणून लक्षात आलं होतं ते सगळे कलिग्ज लिफ्टमध्ये जरी ती आमच्यासोबत दिसली तरी बळंच खाकरल्यासारखं करुन माझ्याकडे बघत. ;)
5 May 2013 - 10:07 pm | सस्नेह
हिरवा कंच ड्रेस आणि त्यावर जरीच्या काठांची ओढणी
वा, खूप दिवसांनी हा 'कंच' भेटला..अलिकडे सगळे हिरवे 'गार' असतात....
5 May 2013 - 11:25 pm | आदूबाळ
+१
कोरडं"ठा़क" पण भेटत नाही हल्ली...
5 May 2013 - 11:23 pm | आदूबाळ
पैजारबुवा, क्रमश: आहे का? :)
6 May 2013 - 4:07 am | स्पंदना
अंहं!
काय शब्दात पकडलात ही कचकचीत भावना. मस्त!
8 May 2013 - 6:54 pm | साऊ
फार छान लिहील आहे.
सोनचाफा मलाही आवडतो.
8 May 2013 - 7:00 pm | पैसा
वार्याची झुळूक आणि चाफ्याचा घमघमाट एकदमच अनुभवला!