आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन.
प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख होऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते.
युगांतर मध्ये त्याने भाग घेतलेली पहिली मोठी कामगिरी म्हणजे बॅम्फिल्ड फुलर या जुलुमी अधिकाऱ्याच्या वधाचा कट. धुबडी ते रंगपूर दरम्यान रुळात बॉम्बं ठेवून त्याची गाडी उडवायची आणि त्यांतून तो वाचला वा स्फोट झाला नाही तर सरळ लाल दिवा दाखवून गाडी अडवायची आणि त्याला गाडीत घुसून मारायचे असे ठरले होते. ह्या कामगिरीत त्याच्याबरोबर हेमचंद्र कानुनगो होते. दुर्दैवाने बॅमफिल्डचा कार्यक्रम अचानक बदलला आणि तो रंगपूरला आलाच नाही व बेत रहित करावा लागला.
त्यापाठोपाठ दुसरी कामगिरी होती ती वंगभंगाची कल्पना साकारणारा कर्झनचा सल्लागार ऍण्ड्र्यु फ्रेजर च्या वधाची. त्याने मेदिनीपूर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्तावही आणला होता आणि हा क्रूरकर्मा क्रांतिकारकांच्या डोळ्यात सलत होता. त्याला नारायणागढ स्थानका नजीक रुळात बॉम्बस्फोट घडवून ठार करायचा बेत आखण्यात आला मात्र तो अशा दोन प्रयत्नातून बचावला.
मात्र यातून प्रफुल्लची धाडसी, निडर वृत्ती व कार्यनिष्ठा क्रांतिकारकांच्या नजरेत भरली. त्याची निवड आता जुलुमी किंग्जफ़ोर्ड च्या वधासाठी करण्यात आली आणि त्या कामगिरीत त्याचा नवा साथीदार होता खुदिराम बोस! क्रांतिकारकांचे सर्व कार्य अत्यंत गुप्तपणे चालत असे, अनेकदा अनेकांना एकमेकांची खरी नावे देखिल माहीत नसायची. जर कुणी पकडला गेला तर इतरांना धोका निर्माण होऊ नये यासाठी असे करावे लागत असे. हा बेत आखला जाई पर्यंत खुदिराम आणि प्रफुल्ल यांनी एकमेकाला कधीही पाहिलेले नव्हते. त्यांची एकमेकांशी ओळख झाली ती दुर्गादास सेन {हरेन सरकार असाही उल्लेख आढळला} (खुदिराम) आणि दिनेश रे (प्रफुल्लचंद्र चाकी) अशी.
ठरल्याप्रमाणे मुजफ्फरपूरमध्ये ३० एप्रिल १९०८ च्या सायंकाळी किंग्ज्फोर्डच्या बग्गीवर हल्ला झाला, दुर्दैवाने बग्गी ओळखण्यात गफलत झाली; हल्ला झालेल्या त्या बग्गीत प्रिंगल कुटुंबातील महिला होत्या. मात्र तेव्हा या दोघांनाही त्याची कल्पना नव्हती. आपल्याला पाहिले असल्याने पोलिस जोडगोळीचा शोध घेतील/ पाठलाग करतील या तर्काने खुदिराम व प्रफुल्ल दोघेही वेगवेगळे झाले. खुदिराम दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी वायनी येथे पोलिसांच्या हाती लागला. प्रफुल्ल लपत छपत समस्तीपूर येथे पोचला. पोटात अन्नाचा कण नाही, पायात वहाणा नाहीत, सतत धावणे आणि पकडले जाण्याचे भय यामुळे गलितगात्र झालेल्या प्रफ़ुल्लला एका सामान्य माणसाने आश्रय दिला. अनेकदा सामान्य माणसेही प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेता आला नाही तरी आपल्या परीने मदत करू पाहतात. असाच एक होता सरकारी नोकर असलेला त्रिगुणचरण घोष. तहान, भूक व भयंकर उन्हाळ्यामुळे जवळ जवळ बेशुद्ध होऊन गवतात पडलेला प्रफुल्ल त्याच्या दृष्टीस पडला. एव्हाना मुजफ्फरपूरच्या घटनेची वार्ता त्यालाही समजली होती. देशासाठी काही करायचे असले तर ती हीच वेळ आहे असे मानून त्याने त्या मुलाला घरी नेले, खाऊ पिऊ घातले, कपडे व पायताणे दिली व तिकिटाचे पैसे देऊन त्याला रात्रीच्या गाडीतही बसवून दिले.
कलकत्त्यास जाण्यासाठी मोकामाघाटला उतरून जावे लागणार होते. प्रवास सुरू झाला आणि सुखरूप निसटलेल्या प्रफ़ुल्लच्या नशिबाने दगा दिला. त्याच गाडीमध्ये त्याच डब्यात आपली रजा संपवून आपल्या घरून नोकरीवर रुजू होण्यासाठी निघालेला पोलिस उपनिरिक्षक (साध्या वेषात असलेला) नंदलाल बॅनर्जी नेमका शिरला व प्रफुल्ल समोर येऊन बसला. तो मुजफ्फरपूरहुन आपल्या वकील असलेल्या आजोबांच्या घरून निघाला होता. त्याला बॉम्बं हल्ल्याची हकिकत समजलेली होती. समोरचा नवे कपडे व नव्या कोऱ्या वहाणा घातलेला मुलगा पाहून त्याला संशय आला आणि त्याने प्रफ़ुल्लशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्या भोळ्या मुलाला हा माणूस पोलिस असेल अशी शंकाही आली नाही. नंदलालचा संशय बळावला. वाटेत शिमुराईघाट स्थानकात गाडी थांबताच तो पाणी पिण्याच्या निमित्ताने उतरला व त्याने स्टेशनमास्तरच्या कचेरीतून थेट मुजफ्फरपूर पोलिस व न्यायाधीश वुडबर्न यांच्याशी संपर्क साधून प्रफुल्लच्या अटकेचा बंदोबस्त केला. गाडी मोकामाघाट स्थानकात येताच, प्रफ़ुल्लाने त्याचे सामान उतरवायला त्याला मदत केली. त्याला तिथेच उभा करून, आलोच जरा असे म्हणत तो स्टेशन मास्तरकडे गेला व त्याने पोलिस कुमक घेतली. नंदलालला पोलिसांबरोबर येताना पाहून प्रप्फ़ुल्ल चमकला. नंदलालने पोलिसांना प्रफ़ुल्लला धरायचा आदेश दिला. प्रफ़ुल्लने विस्मयाने त्याला विचारले की बाबारे एक बंगाली असून तू मलाच या परक्यांना पकडून देणार? त्याने शिताफीने पोलिसाला चकवत त्याला ढकलून पाडले व खिशातून आपले ब्राउनिंग पिस्तूल काढले. ते पिस्तूल त्याने विश्वास घातकी नंदलालवर रोखले मात्र त्याने ती गोळी चुकविली. एव्हाना पोलिसांचा गराडा पडला होता. पोलिसांच्या स्वाधीन होण्याआधी प्रफ़ुल्लने स्वतःवर दोन गोळ्या झाडल्या. एक छातीवर तर दुसरी हनुवटीतून वर आरपार आणि तो तिथेच कोसळला.
पोलिसांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले व स्पिरिटमध्ये बुडवून कलकत्त्याला पाठवून दिले. ते बहुधा ओळख पटविण्यासाठी पाठविले असावे. प्रफ़ुल्लचे बलिदान २ मे चे, एव्हाना १ मे रोजी दुसरा आरोपी सापडल्याचे वृत्त पोलिसांना समजले होते व त्या सापडलेल्या आरोपी करवी मृताची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी ते अमानुष कृत्य केले. पुढे ते मस्तक पोलिसांनी ठाण्याच्या आवारात पुरले. अगदी अलीकडे या कवटी संबंधी बराच वाद निघाला होता आणि अनेक विभागांत चौकश्या झाल्या होत्या, अनेकांनी कानावर हात ठेवले होते.
फौजदार नंदलाल बॅनर्जी यांना सरकारने जाहीर केलेला एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. मात्र याहूनं मोठे इनाम अजून मिळायचे होते. ’तुझ्या देशद्रोही नातवाचे दिवस भरले आहेत आणि लवकरच त्याला आम्ही यमसदनास धाडणार आहोत’ असे एक पत्र नंदलालच्या मुजफ्फरपूर येथे सरकारी वकील असलेल्या आजोबांना मिळाले. आणि अवघ्या सहा महिन्यात म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी नंदलाल कामानिमित्त कलकत्त्यात आला तेव्हा त्याला क्रांतिकारकांनी पाळत ठेवून १००/२ सरपंटाईन स्ट्रीट येथे त्याला गाठले व गोळ्या घालून त्याला यमसदनास धाडले व विसाव्या शतकातील देशासाठी सर्वप्रथम आत्मार्पण करणाऱ्या हुतात्मा प्रफुल्ल चाकी याला श्रद्धांजली दिली.
अनेक क्रांतिकारकाप्रमाणे हुतात्मा प्रफुल्ल चाकी सुद्धा अज्ञात राहिला व काळाच्या पडद्याआड गेला. अगदी अलीकडे कलकत्त्याचे एक पत्रकार मानस बॅनर्जी यांचे पत्रकारितेतील गुरु श्री प्रशांत दत्त यांनी बोलवून घेत त्यांना एका दुकानातून घेतलेल्या वस्तुच्या वेष्टनासाठी वापरलेल्या वर्तमानपत्राचा तुकडा दाखविला. त्यात मुजफ्फरपूर येथील एका उद्यानातील हुतात्मा खुदिराम बोस यांच्या पुतळ्याचे चित्र होते व सोबत एक झाकलेला पुतळा दिसत होता. जर मानस हे कधी तिकडे गेले तर त्या उद्यानाला भेट देऊन तो पुतळा कुणाचा आणि झाकलेला का? याची माहिती काढ असे त्यांनी सांगितले. योगायोगाने मानस बॅनर्जी कामानिमित्त पाटण्याला गेले असता ते मुजफ्फरपूर येथे गेले. तेथे त्यांना अशा उद्यानाचा ठावठिकाणा कुणी सांगू शकले नाही. अखेर एका रिक्षावाल्याने त्यांना बरोबर तेथे नेले. तिथे त्यांना हुतात्मा खुदिराम बोसचा व दुसरा झाकलेला असे दोन्ही पुतळे दिसले. मात्र झाकलेल्या पुतळ्याची कुणालाही माहिती नव्हती. अखेर खुदिराम-प्रफुल्ल स्मारक समितीच्या एका सदस्याची गाठ तिथे पडली ज्याने तो पुतळा हुतात्मा प्रफुल्ल चाकीचा असल्याचे सांगितले व ’अनावरणाच्या वादामुळे’ तो असाच झाकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले व तो निघून गेला. मात्र तिथे एक अतिशय वृद्ध व दृष्टी अधू असलेल्या एका म्हाताऱ्याने त्यांना गाठले व त्याने हुतात्मा खुदिराम-प्रफुल्ल यांनी ज्या आंब्याच्या झाडाआडून बॉम्बं फेकला ते झाड दाखविले व संपूर्ण हकिकत ऐकविली. ’इथे ना फलक ना माहितीपत्र मग लोकांना या मुलांचे दिव्य समजणार कसे? तो म्हातारा कर्तव्यदबद्धिने ती हकिकत तिथे येणाऱ्यांना वर्षानुवर्षे सांगत आहे, कुणी त्याला वेडा वा भिकारी समजतात कधी लोक दोन पैसेही देतात, मात्र तो म्हातारा आपले कर्तव्य करतो आहे. मात्र लवकरच ’कलकत्त्याहून पत्रकार येऊन गेल्याची बातमी पसरली आणि श्री नितिशकुमार यांच्या हस्ते हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
हुतात्मा खुदिराम, हुतात्मा प्रफुल्ल, बरिंद्रनाथ, अरविंद घोष, सुप्रसिद्ध ’अलिपूर खटला’ उर्फ ’माणिकतल्ला कट’ या सर्वांचा व आपला खूप जवळचा संबंध आहे. हे बॉम्बं बनले कसे? तर त्यामागचे प्रेरणास्थान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर व तेथे प्रत्यक्ष जाऊन बॉम्बं बनविणारे सेनापती बापट! याच अभियोगात ’बाळकृष्ण हरी काणे’ हे एक अस्सल मराठी नावही आहे’ पुढे ते अपिलात निर्दोष सुटले. होते केवळ त्यांच्या नावाचे चिटोरे घटनास्थळी सापडल्याने त्यांना संशयित म्हणून अटक झाली होती. ते मूळचे यवतमाळचे होते व बहुधा त्यांना अमरावतीचा दादासाहेब खापर्डे यांनी स्फोटकविद्या शिकण्यासाठी तिथे पाठविले असा उल्लेख आहे. हुतात्मा प्रफ़ुल्लने जे पिस्तूल वापरले ते ब्राउनींग बनावटीचे होते. १९०९ मध्ये स्वा. सावरकरांनी २० ब्राउनिंग पिस्तुले हिंदुस्थानात पाठविली होती व त्यातलेच एक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे याने जॅक्सन वधासाठी वापरले होते. कदाचित प्रफ़ुल्ल्कडचे हे पिस्तुलही स्वा. सावरकरांनीच पाठविलेले असावे.
वयाच्या १९ व्या वर्षी तेजस्वी बलिदान करणाऱा क्रांतिकारक हुतात्मा प्रफुल्ल चाकी याला त्याच्या १०५ व्या हौतात्म्यदिनी सादर वंदन.
प्रतिक्रिया
2 May 2013 - 1:52 pm | विसोबा खेचर
काय बोलू..?
साक्षीदेवा, केवळ तुझ्यामुळेच कळतात रे ही लोकं..!
नायतर आम्ही कधी गांधीनेहरुंच्या पुढे गेलोच नाही.. सावरकरही शालेय पुस्तकातनं बादच होते..
हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकींना आणि तुझ्या सुंदर लेखनाला मानाचा मुजरा..
या सगळ्या अज्ञात हुतात्म्यांबद्दल तुझं सर्व लेखन अक्षरश: संग्राह्य आहे..पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे..
सलाम..!
2 May 2013 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे
गोष्ट माहित नव्हती. नंदलाल ची काय चूक? तो त्याचे कर्तव्य बजावत होता.
इंदिरा गांधींच्या मारेकर्यांना आजही खलिस्तान वादी क्रांतीकारकच म्हणतात.
3 May 2013 - 6:04 pm | आजानुकर्ण
बिचाऱ्या नंदलालला त्याचा संसार चालवायचा असेल. त्यासाठी प्रामाणिकपणे नोकरी करुन पगार मिळवायचा असेल. त्याला काय माहिती नंतर स्वतंत्र होणाऱ्या भारतात अशी 'चूक' करण्य्ाऐवजी पाचशे हजाराची चिरीमिरी घेऊन कोणालाही सोडता आले असते.
2 May 2013 - 2:54 pm | नि३सोलपुरकर
सर्वसाक्षी साहेब ,
धन्यवाद ,नविनच माहिती समजली.
हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकींना मानाचा मुजरा
2 May 2013 - 3:02 pm | आतिवास
माहितीपूर्ण लेखन.
प्रफुल्लचंद्रसारख्या लोकांनी काय व्हावे म्हणून बलिदान केले आणि आपण काय करत आहोत - हा विचारही त्रासदायक वाटतो :-(
2 May 2013 - 3:11 pm | श्री गावसेना प्रमुख
स्वातंत्र्य सैनिकांची चुक होती का?ते काय पगारी होते
भिंद्रनवाले हा इंदिराजीनी पोसलेला भस्मासुर होता,तो एक ना एक दिवस त्यांच्यावर उलटणारच होता.
2 May 2013 - 4:17 pm | सुहास झेले
हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांस वंदन....
काका, तुम्ही माहिती दिली नसती तर, हा हुतात्मा नेहमीच झाकलेल्या अवस्थेत राहिला असता. खूप खूप आभार ह्या माहितीबद्दल.
2 May 2013 - 4:36 pm | Dipankar
"इंदिरा गांधींच्या मारेकर्यांना आजही खलिस्तान वादी क्रांतीकारकच म्हणतात"
पण तुम्ही प्रफुल्ल चाकीला काय म्हणता ते महत्वाचे
2 May 2013 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद साक्षीकाका.
2 May 2013 - 4:44 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__
2 May 2013 - 5:41 pm | पैसा
अज्ञात क्रांतिकारकाची छान ओळख करून दिल्याबद्दल!
2 May 2013 - 9:41 pm | क्लिंटन
हुतात्मा प्रफुलचंद्र चाकी यांना विनम्र अभिवादन.
या जुलमी अधिकाऱ्यांशिवाय त्या गाडीमध्ये कोणी नसणार होते का?रूळ उडवून गाडीचा अपघात करून जुलमी अधिकाऱ्यांना मारायची कल्पना अजिबात पचनी पडली नाही.कारण त्यात हकनाक अनेक भारतीयांचाच बळी जायची शक्यता जास्त होती.बहुदा जुलमी अधिकारी मालगाडीने प्रवास करत नसावेत किंवा पूर्ण गाडीत ते एकच प्रवासी होते का? तसे असेल तर हा पूर्ण मुद्दाच गैरलागू आहे. नाहीतर या माहितीत काही गफलत आहे असे वाटते. क्रांतिकारकांनी विनाकारण कोणा इंग्रजांनाही कधी ठार मारले नव्हते तेव्हा ते विनाकारण आपल्याच लोकांना ठार मारतील ही शक्यता शून्य वाटते.
2 May 2013 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका अज्ञात स्वातंत्र्यवीराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
2 May 2013 - 10:42 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
3 May 2013 - 2:38 am | अभ्या..
धन्यवाद एका अज्ञात देशभक्ताची ओळख करुन दिल्याबद्दल.
3 May 2013 - 6:58 am | साऊ
फार छान ओळख . लेख आवडला.
गुंतागुंत आहे पण तरीही हा इतिहास समोर यायला हवाच.
3 May 2013 - 8:01 am | सुकामेवा
एका अज्ञात स्वातंत्र्यवीराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
3 May 2013 - 8:33 am | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षीजी,
अंगावर काटा आणणारी, क्रांतीकारकांची धाडसी वृत्ती खरोखरच वंदनिय आहे. तुमच्यामुळे ह्या सर्व क्रांतिकारकांची ओळख आम्हाला होते. धन्यवाद.
3 May 2013 - 10:31 am | पिवळा डांबिस
या धागालेखकाचे क्रांतिकारकांविषयीचे प्रेम सर्वज्ञात आहे, आणि त्याचा आदर आहे....
पण ते उत्साहात कधिकधी वहात जातात असं वाटतं, प्रस्तुत घागा हे त्याचं उदाहरण आहे...
आजवर प्रफुल्लचंद्र चाकी हे नांवही कधी क्रांतिकारक म्हणून ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे या धाग्यात त्यांनीच दिलेल्या माहितीवर अवलंबून रहाणे भाग आहे...
या लेखातील माहितीचा सारांश काय तर,
म्हणजे यांनी तथाकथित जुलमी अधिकार्याला न मारता दुसर्याच कुठल्या महिलांना मारलं, करेक्ट?
त्याबद्दल तो पकडला गेला आणि त्याला शिक्षा झाली/ घेतली. बग्गीत कोण होतं याची कल्पना नसणं हा बचाव होऊ शकत नाही.
यांत आदराचा भाग येतो कुठे? उलट मोस्ट लाइकली निरपराध असलेल्या स्त्रियांना मारण्याबद्दल धिक्कार करावा का?
:(
तत्कालीन बरेचसे 'क्रांतिकारक' हे देशप्रेमी होते, स्वतःच्या जीवावर उदार झालेले होते यांत संशय नाही.
परंतू ते माहितीपूर्ण होते हे आता विश्वास ठेवायला कठीण जातं आहे...
नाशिकच्या जॅकसन केसचं उदाहरण आपल्याला माहिती आहेच!
तेंव्हा स्वातंत्रलढा सुरू असतांना सर्वच 'क्रांतिकारकांना' डोक्यावर घेणं हे मी समजू शकतो, पण आता स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाल्यानंतर अशा कथांमध्ये थोडी ऑब्जेक्टिव्हिटी यावी ही अपेक्षा!!!
3 May 2013 - 9:06 pm | सर्वसाक्षी
पिडांसाहेब,
शिर्षकात असा परखड प्रश्न विचारल्यावर मग हे 'अवलंबून राहणे भाग आहे' असे अवसान गाळणे बरोबर नाही. आजपर्यंत आपण हे नांव ऐकले नसेलही, पण आता ऐकले म्हणताना आपण सदर व्यक्ति क्रांतिकारक होती की कुणी भुरटा होता याचा शोध आपण सहज घेउ शकता. तो अवश्य घ्या आणि मी लिहिलय त्या विपरीत काही माहिती समजली तर अवश्य सर्व वाचकांना सांगा. जर आपल्या सारख्या विचक्षकांनी हे केले नाही तर माझ्यासारखे हरदास काहीही भाकडकथा सांगतील आणि भाबडे वाचक ते खरे मानतील. हीच गत अन्य क्रांतिकारकांची. त्यांच्या विषयीसुद्धा जर काही विपरीत समजले तर ते परखडपणे लिहा आणि सत्य उघडकीस आणा
आपल्याकडे जॅक्सन वधाची काही नवीच माहिती आहे असे दिसते, ती जाणुन घ्यायला आवडेल, कृपया इथे सविस्तर लिहा म्हणजे सर्वांना समजेल.
4 May 2013 - 12:03 am | पिवळा डांबिस
माझ्या 'मूळ सत्य काय?' या प्रश्नाचा उद्देश हा तुम्ही दिलेली माहिती ही सत्य नाही किंवा सत्य यापेक्षा काही वेगळे आहे असं दर्शवण्याचा नाही. कदाचित मी चुकीचा शब्दप्रयोग केला असेल (आणि त्याबद्दल चूभूद्या घ्या)पण मला तुम्ही लिहिलेल्या मोठ्या लेखातून सारांश/ फॅक्टस काय हे वेगळं करायचं होतं. तुमचा या विषयांतला अभ्यास मी माझ्या प्रतिसादात सुरवातीलाच मान्य केलेला आहे. म्हणून तर तुमच्या लेखातलीच वाक्य क्वोट केली आणि त्यांच्या सत्यतेबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नाही. तेंव्हा तो प्रश्न सारांश काय असा वाचावा.
सदर व्यक्ती भुरटी होती असं मला चुकूनही म्हणायचं नाही, ती देशप्रेमाने भारलेली असेल याबद्दल मला मुळीच संशय व्यक्त करायचा नाहिये. माझा मुद्दा हा होता की तुमच्याच लेखानुसार सदर व्यक्तिचा हेतू कितीही देशभक्तीचा वगैरे असला तरी अंतिमतः त्या व्यक्तिच्या हातून गफलतीने का होईना पण संभवतः निरपराध असलेल्या स्त्रिया मारल्या गेल्या, हो की नाही? त्या निरपराध स्त्रिया फक्त इंग्रज होत्या म्हणून हे कृत्य गौरवाचं समजायचं का?
जॅक्सन वधाबद्दल म्हणाल तर तो इंग्रज होता हे खरं पण तो खरोखरच जुलमी होता म्हणून मारला गेला की इंग्रज होता म्हणून याविषयी संशय उत्पन्न करणारी माहिती उपलब्ध होते आहे. म्हणून मी तो उल्लेख केला. मला वाटतं चितमपल्लीच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख आहे, तिथून सुरवात करणं कदाचित योग्य ठरेल.
4 May 2013 - 10:11 am | सर्वसाक्षी
आपण म्हणालात मी दिलेली माहिती मान्य करणे भाग आहे. त्यावर मी विनंती केली की आता नाव समजले आहे तर स्वतः पडताळुन पाहा आणि जर मिळालेली माहिती विपरीत असेल तर सर्वांना सांगा.
हुतात्मा पप्रफुल्लचंद्र चाकींचा गौरव वा महनियता ही त्यांनी केलेया दोन इंग्रजी स्त्रियांच्या हत्येमुळे हा तर आपला शोध आहे, माझ्या लेखात वा माझ्या वाचनात अलेल्या कोणत्याही साहित्यात तसा उल्लेख नाही
जॅक्सन विषयी जर तो न्यायी, सज्जन व नि:पक्षपाती असा कर्तव्यदक्ष अधिकारी होता, तो जुलुमी नव्हता असे आपल्या वाचनात आले असेल व त्याने कोणतीही जुलुमी कृत्ये वा पक्षपाती न्याय केला नाही, क्रूर वर्तन केले नाही असा आपला दावा असेल तर तपशिल अवश्य द्या. वाचायला आवडेल.
3 May 2013 - 11:11 pm | क्लिंटन
पिडांकाकांशी इन जनरल सहमत. इन जनरल का याचे कारण म्हणजे म्हणजे सावरकर प्रतिष्ठानाने क्रांतिकारकांवर एक पुस्तक छापले होते (स्वा.सावरकरच त्या पुस्तकाचे लेखक होते असे वाटते) त्यात प्रफुलचंद्र चाकींवर लेख होता. हे पुस्तक मी ७वीत असताना वाचले होते आणि क्रांतिकारक म्हटले की डोळे झाकून पाठिंबा द्यायचे ते वय होते त्यामुळे त्याने खरोखरच रेल्वेचे रूळ उखडून गाडीला अपघात करून जुलमी अधिकार्यांना ठार मारायचा प्लॅन केला होता का, तसेच दोन निरपराध स्त्रियांचा जीव त्यांनी घेतला होता का वगैरे गोष्टींकडे तेव्हा लक्ष द्यायची गरज भासली नव्हती आणि आता इतकी वर्षे झाल्यानंतर त्या लेखात नक्की काय लिहिले होते हे लक्षात नाही. तरीही प्रफुलचंद्र चाकी हे नाव पूर्णपणे अनोळखी निदान मलातरी नाही. दुसरे म्हणजे जॅक्सन केसविषयी पिडांकाका काय म्हणत आहेत याची मला कल्पना नाही.
रेल्वेगाडी उडवून एकादोघा जुलमी अधिकार्यांना मारायचे कारस्थान कोणीही क्रांतिकारक करेल यावर मला तरी विश्वास ठेवायला जड जाते.त्याकाळी अशा जुलमी अधिकार्यांना इतरांच्या केसालाही धक्का न लावता ठार मारता येते हे अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा इत्यादी अनेकांनी दाखवून दिले होतेच.तेव्हा ही माहिती कितपत खरी आहे याची मला कल्पना नाही.पण एक गोष्ट स्पष्ट करतो आणि ती म्हणजे एखाद-दोन जुलमी अधिकारी (कदाचित)मरतील यासाठी आपल्याच (कदाचित) शेकडो निरपराधांचा जीव घेण्याचा कट करणार्या मनुष्याला निदान मी तरी क्रांतिकारक म्हणू शकत नाही तर माझ्या मते तरी असा मनुष्य दहशतवादीच झाला.
+१.त्याचे काय आहे आपल्याला फुकटचे स्वातंत्र्य मिळाले ना म्हणून जास्तीचा माज चढला आहे.त्यातूनच असे सगळे चित्रविचित्र विचार येतात.एकदा कोलू पिसायला लागला असता म्हणजे कळले असते :)
4 May 2013 - 12:09 am | पिवळा डांबिस
क्लिंटन, शेवटचं वाक्य समजलं नाही. जर ते माझ्याविषयी असेल तर अधिक स्पष्ट केलंस तर बरं होईल!
4 May 2013 - 12:19 am | क्लिंटन
अहो पिडांकाका मिपावर मागे क्रांतिकारकांविषयी असे प्रश्न विचारणार्यांची संभावना "फुकटचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून माज चढलेले" वगैरे शब्दात झाली होती.त्याचा संदर्भ आहे याला. पूर्वी काळाची गरज म्हणून सगळ्याच क्रांतिकारकांना डोक्यावर घेणे कदाचित योग्य असेल पण आता अधिक ऑब्जेक्टिव्हिटी असावी हे तुमचे म्हणणे १००% मान्य आहे मला.
4 May 2013 - 12:31 am | पिवळा डांबिस
ओके!
धन्यवाद!!
:)
4 May 2013 - 10:15 am | सर्वसाक्षी
आपल्याला जर क्रांतिकारक दहशतवादी वाटत असतील तर तर तसे खुशाल म्हणा. त्या काळात साहेब मजकूर खास गाडीने ज्या केवळ अधिकारी व लवाजमा यांनाच घेऊन जायच्या हे आपल्याला माहित नसावे यावर विश्वास ठेवणे कठिण आहे.
4 May 2013 - 3:53 pm | क्लिंटन
एकूणच काय की विचारसरणी वगैरे आली याचा स्पष्ट अर्थ असा की तुमचे मुद्दे कमी पडत आहेत.
हो बरोबर.पण माझा मुळातल्या प्रश्नाला तुम्ही बगलच दिली आहे त्याचे काय? माझा मुळातला प्रश्न हा की त्या गाडीमध्ये हे जुलमी अधिकारी एकट्यानेच प्रवास करत होते का?तसे जर का असेल तर माझा मुद्दाच गैरलागू आहे.पण तुम्हीच दिलेल्या माहितीनुसार तसे दिसत नाही.तर त्या गाडीत अधिकारी आणि लवाजमा यांचा समावेश असे.आणि त्या गाडीत इतर अधिकार्यांचा समावेश असे का?सर्व इंग्रज अधिकारी जुलमी नक्कीच नव्हते.रिपनसारखे चांगले व्हाईसरॉय आणि सॅण्डहर्स्ट,रे यांच्यासारखे मुंबई प्रांताचे चांगले गव्हर्नरही होऊन गेले होतेच. तेव्हा गाडी उडवायची झाली तर त्यात सगळे जुलमी अधिकारीच जातील याची काय खात्री होती? दुसरे म्हणजे लवाजम्यातील नोकर-चाकरांचा या प्रकरणी काय दोष होता?की ते आपले 'कोलॅटरल डॅमेज'?आणि या नोकर-चाकरांमध्ये बहुसंख्य भारतीयच असायची शक्यता होती म्हणजे मेले असते तर ते भारतीय लोक मेले असते त्याचे काय?का क्रांतिकार्य या नावावर वाटेल ते खुनशी प्रकार करावेत आणि आज २०१३ मध्येही आपण त्यांचे डोळे झाकून समर्थन करावे का?
दुसरे म्हणजे नंदलाल बॅनर्जी या पोलिसावर तुम्ही नाही म्हटले तरी टिका केली आहे पण यात त्याची चूक काय? मुझफ्फरपूर बॉम्ब केस म्हणजे मिसेस प्रिंगल आणि मिस प्रिंगल या दोन निरपराध स्त्रियांचा जीव घ्यायचीच होती ना?क्रांतिकारकांचा अंदाज चुकला आणि बॉम्ब भलतीकडेच जाऊन पडला हे निरपराधांना मारायचे समर्थन कसे होऊ शकेल? आणि कायद्याप्रमाणे त्या केसमध्ये दोषींना शिक्षा झाली असेल तर त्यात चूक काय?आणि कायद्याच्या या प्रक्रियेत नंदलाल बॅनर्जी हा एक पोलिस अधिकारी या नात्याने आपले योगदान देत असेल तर त्यात त्याची चूक काय?उठल्यासुटल्या कोणीही निरपराधांना मारावे आणि म्हणावे अरे "य" मेला काय मला तर "क्ष" या जुलमी अधिकार्याला मारायचे होते आणि क्रांतिकारक या बॅनरखाली या प्रकाराचे सर्वांनी डोळे झाकून समर्थन करावे का?
मागे हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे या लेखात क्रांतिकारकांचा विषय आला की सदर लेखकाकडून तारतम्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे असे एका माजी आय.डी धारकाने म्हटले होते ते काही अगदीच चुकीचे नव्हते तर.
4 May 2013 - 9:11 pm | सर्वसाक्षी
जुलमी अधिकारी ज्या गाडीतुन जाणार ती उडवायचा बेत आखताना अन्य सामान्य प्रवासी गाडी न उडवता ती विशिष्ठ गाडीच उडवायची या दृष्टिने टेहेळणी/ ईशारा वगैरे काहीतरी नियोजन केले असणारच. त्या गाडीत अर्थातच त्या अधिकार्याचे सहकारी व रक्षक असणार. जे आपल्या मातृभूमीला दास्यात ठेवण्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी आहेत ते निष्पाप कसे? एकीकडे चुकुन दोन महिलांची ह्त्या घदली तरीही क्रांतिकारक खूनी आणि इकडे राज्यकर्त्यांना सामिल होउन आपल्याच बांधवांना पकडायला वा मारायला सजलेले सज्जन हे कसे?
क्रांतिकारकांना पकडुन वा मारुन कर्तव्य बजावणार्या पोलिसांचे क्रांतिकारकांनी जर कौतुक करायचे म्हणता, मग याच तुमच्या न्यायाने भारतिय सैन्याने सीमा ओलांडुन भारतात घूसलेल्या पाकी सैनिकांचे कौतुक करायला हवे आणि जर त्यांनी त्या पाकी सैनिकांना गोळ्या घातल्या तर त्यबद्दल त्यांना मनुष्यवधाच्या आरोपाखाली फाशी दिले पाहिजे! कारण ते पाकी सैनिक तर खाल्ल्या मिठाला जागुन कर्तव्य करत असतात!
घटनेची नीट माहिती मिळवा. बाँब भलतीकडे पडला नव्हता. तो बग्गीवरच टाकला आणि पडलाही. मात्र ती वेळ आणि ती जागा यामुळे ती बग्गी किंगजफोर्डची समजली गेली मात्र प्रत्यक्षात ती दुसरीच होती आणि त्यात दोन महिलांचा मृत्यु झाला. घटनेनंतर झालेल्या गदारोळात ते दोघेही क्रांतिकारक निसटुन गेले त्यामुळे त्यांना आपल्या हातुन महिला मारल्या गेल्या गेल्या होत्या हे पकडले जाईपर्यंत समजलेही नव्हते.
आपण इतक्या पोटतिडकीने निष्पाप भारतियांना मारणार्या इंग्रजांचा निषेध केल्याचे स्मरत नाही. केवळ संशयावरुन अटक करुन असंख्य निरपराधांचा अमानुष छळ करणार्या इंग्रजांचा धिक्कार करताना कधी दिसला नाहीत. असो.
4 May 2013 - 9:47 pm | क्लिंटन
असणार या शब्दावरून प्रश्न पडला आहे की हा तुमचा तर्क आहे की खरोखरच घडलेली घटना?आणि तुमच्याच प्रतिसादात "घटनेची नीट माहिती मिळवा" असे म्हटले आहे तेव्हा तुम्हाला या सगळ्याच घटनांची (बग्गी बॉम्ब घटना, गाडी उडवायचा कट इत्यादी) पूर्ण माहिती आहे असे गृहित धरतो.
कमाल आहे. तरीही बॉम्ब भलतीकडे पडला नाही असे म्हणायचे?
पण पोलिसांना या क्रांतिकारकांच्या हातून नक्की कोण मारले गेले होते हे समजले होते ना?आणि प्रफुलचंद्र चाकींचा नक्की उद्देश कोणाला मारायचा होता हे पोलिसांना जरी कळले असले तरी दोन निरपराध स्त्रियांच्या खुनासंदर्भात पोलिसांना चाकी आणि खुदिराम बोस हवे असतील तर त्यात काय चुकीचे आहे? इतर कोणाही माणसाच्या खुनासंदर्भात पोलिसांचा तपास चालू असेल त्याच प्रकारे या संदर्भातही चालू असेल तर त्यात नक्की काय चुकले? दुसरे म्हणजे तुम्ही म्हणता त्या जुलमी अधिकार्याला जर खरोखर चाकी-बोसांनी मारले असते आणि जर भारतीय पोलिसांनी त्यांना पकडायला जंग जंग पछाडले असते तर तुम्ही म्हणता तो मुद्दा मान्य करता येता येईल.पण इथे एकूण जुलूम-जबरदस्तीशी संबंध नसलेल्या दोन निरपराध स्त्रिया मारल्या गेल्या होत्या.तेव्हा तुमचा हा मुद्दा गैरलागू आहे.नाहीतर कोणत्याही खुनासंदर्भातील आरोपी मला खरं तर अमक्यातमक्या जुलमी इंग्रज अधिकार्याला/इंग्रजांच्या खबर्याला/ देशद्रोह्याला मारायचे होते पण प्रत्यक्षात माझ्या हातून कोण मारले गेले आहे हे मला माहितच नाही असा बचाव करू शकेल.ते कसे समर्थनीय ठरेल?
अधिकार्यांच्या लवाजम्यातले सगळे लोक राज्यकर्त्यांना सामील होऊन आपल्याच लोकांना मारायला टपलेले होते का?माझ्या माहितीप्रमाणे इंग्रज अधिकार्यांचा ऐषोराम प्रचंड असे आणि त्यात कित्येक साधेसाधे लोक (पाय चेपणारे, वारा घालणारे इत्यादी) पण असत.सत्यम कॉम्प्युटर्समध्ये रामलिंगराजूने शेअर होल्डर्सचे काही हजार कोटी रूपये बेमालूम आपल्या खिशात टाकले.तुम्ही म्हणता त्या न्यायाने सत्यममध्ये नोकरीला असलेले सामान्य लोकही मग त्या गुन्ह्यात सामील झाले का?ज्या भारतीयांनी इंग्रज अधिकार्यांबरोबर भारतीयांवर अत्याचार करण्यात भाग घेतला होता ते मेले तरी त्याविषयी फारसे वाईट वाटायला नको.पण लवाजम्यातील सगळ्या लोकांविषयी सरसकट असे कसे म्हणता येईल?
बरं मग मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे?इंग्रज राज्यामुळे भारताचे काही फायदे जरूर झाले आणि ज्या परकियांनी भारतावर राज्य केले त्यात इंग्रज सगळ्यात सोबर होते (याचा अर्थ इंग्रज चांगले होते असे अजिबात नाही) असेच माझे मत आहे आणि त्याबद्दल मी वेळोवेळी मिसळपाववर लिहिलेही आहे.त्याबद्दल मला "काळा इंग्रज" म्हणणारे लोकही आहेत आणि अशांना मी फाट्यावर मारतो हे पण सांगतो.पण सरसकट इंग्रज राज्यामुळे भारताचा उत्कर्षच झाला आणि काहीच तोटा झाला नाही अशा स्वरूपाचे लिखाण मिसळपाववर मी तरी वाचलेले नाही त्यामुळे तुम्ही म्हणता तसा निषेध करायची वेळ कधीच आली नाही. पण असे कोणी लिहायला लागला तर त्याचा पण मी नक्कीच निषेध करेन याविषयी इतरांना शंका वाटत असली तरी मला अजिबात शंका वाटत नाही.
5 May 2013 - 12:48 am | सर्वसाक्षी
दोन बग्ग्य्या शेजारी उभ्या असता एकीवर पडलेला बाँब जर दुसरीवर पडला तर तो 'भलतीकडे पडला' असे म्हणता येईल. इथे बग्गी चुकिची समजली होती. बाँब फेकताना तो किंग्जफोर्ड वर फेकत आहोत असे समजुनच फेकला होता, मात्र किंग्ज्फोर्ड त्या बग्गीत नव्हता.
उगाच शब्दच्छल केल्याने खोट्याचे खरे होत नाही.
एका स्थानकातुन दुसर्या स्थानकापर्यंत जाताना खास गाडीत जी बहुधा एखाद दोन डब्यांची असे, त्यात अधिकार्याब्रोबर रक्षकवर्ग असणे अपेक्षित आहे. आणि युद्धात शत्रूच्या गोळीला/ बाँब हल्ल्यात वाहन चालक, सेवक, व अन्य जीव ज्यांना मारणे हा उद्देश नसतो तेही कामी येतात.
मी मिपावरच्या लेखनाच्या निषेधाचा उल्लेख केलेला नाही. काय लिहिले आहे ते नीट वाचा.
काही मुद्दे आपण उत्तर नसल्याने सोयिस्कर रित्या सोडले आहेत, हे लक्षात आले आहे.
लोक तुम्हाला काय म्हणतात त्याच्याशा मला काही एक देणे घेणे नाही आणि मी तसे विचारलेही नव्हते.
तुम्ही काही मिपकरांना फाट्यावर मारता तेही इथे सांगणे अप्रस्तुत आहे. ते विषयाला सुसंगत नाही.
असो. विचार थकले की विकार भडकतात. मग अशी भाषा सुरू होते.
5 May 2013 - 7:26 am | क्लिंटन
तेच म्हणतो मी.
एकूण प्रतिसादांमध्ये तुम्हीच लिहिलेली वाक्ये जशीच्या तशी इथे चिकटवतो:
१. जुलमी अधिकारी ज्या गाडीतुन जाणार ती उडवायचा बेत आखताना अन्य सामान्य प्रवासी गाडी न उडवता ती विशिष्ठ गाडीच उडवायची या दृष्टिने टेहेळणी/ ईशारा वगैरे काहीतरी नियोजन केले असणारच
२. त्या गाडीत अर्थातच त्या अधिकार्याचे सहकारी व रक्षक असणार.
३. एका स्थानकातुन दुसर्या स्थानकापर्यंत जाताना खास गाडीत जी बहुधा एखाद दोन डब्यांची असे
४. त्यात अधिकार्याब्रोबर रक्षकवर्ग असणे अपेक्षित आहे.
असणार/बहुधा/अपेक्षित आहे या शब्दांचा इतरांनी नक्की काय अर्थ घ्यायचा?हे सगळे तुमचे तर्क की खरोखरच तशी परिस्थिती होती?आणि मुळातल्या माझ्या पहिल्याच मुद्द्यावर (त्या गाडीत जुलमी अधिकारी सोडून इतर कोणी असणार होते का) यावर हो किंवा नाही किंवा नक्की परिस्थिती काय होती हे न लिहिता असणार/बहुधा/अपेक्षित आहे अशा प्रकारच्या शब्दरचनेमुळे एक तर नक्की काय झाले हे तुम्हालाही माहित नाही पण उगीच काहीतरी सारवासारव करायला नंतरच्या गोष्टी लिहिल्या आहेत असे वाटले तर त्यात काय चुकले?त्याच मुद्द्याचा पहिल्यांदाच सोक्षमोक्ष लागला असता तर पुढचे सगळे रामायण लिहायची गरजही लागली नसती.
पण इथे शत्रूचे नाही तर आपलेच लोक (सेवक वगैरे) कामी येणार होते त्याचे काय?आणि ज्या जुलमी अधिकाऱ्याचा उल्लेख तुम्ही केला आहे तो पूर्व बंगालचा गव्हर्नर होता.त्याला ढाक्यात किंवा इतर कुठेही असे आपल्याच लोकांचे कोलॅटरल डॅमेज होणार नाही अशा पध्दतीने मारायचा क्रांतिकारकांनी नक्की काय प्रयत्न केले होते?त्या पध्दतीने इतर अनेक जुलमी अधिकाऱ्यांना यमसदनी धाडलेही होते मग यालाच मारायला रेल्वे उडवायची काय गरज होती हे मात्र समजले नाही.
अगदी माझेच शब्द तुम्ही वापरलेत बघा.टंकण्याचे श्रम वाचविल्याबद्दल धन्यवाद.
सुसंगत कसे नाही?तुमचाच मुद्दा होता की मी इंग्रजांचा तितक्या प्रमाणावर निषेध कधी केला नाही त्यावर पुढचे सगळे लिहिले आहे.
+१. अगदी असेच.
3 May 2013 - 1:00 pm | मृत्युन्जय
प्रिंगल महिलांच्या मृत्युबद्दल हळहळ वाटते आणि प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस बद्दल आदर.
क्रांतिकारी आणि दहशतवादी यामधला मुख्य फरक हा उद्देशाचा आहे. दहशतवादी दहशत पसरवण्यासाठी निरपराध लोकांचे जीव घेउ शकतात / घेउ इच्छितात तर क्रांतिकारकांची तशी इच्छा कधीही नसायची. चुकुन काही लोकांचे प्राण गेले असतील तर ती त्यांची चूक नक्की म्हणता येउ शकते पण त्यांना दहशतवाद्यांच्या रांगेत बसवणे हा आपला करंटेपणा म्हणायचा.
3 May 2013 - 6:06 pm | आजानुकर्ण
मग क्रांतीकारक नक्की कशासाठी जीव घेत असतात? माझा समज होता की इंग्रजांच्या मनात दहशत पसरवण्यासाठी.
4 May 2013 - 10:23 am | सर्वसाक्षी
आपण जर भारतिय म्हणुन विचार केलात तर इंग्रज राज्ययंत्रणॅला हादरवैणारा क्रांतिकारक देशभक्त ठरतो. आपण जर इंग्रज राज्यकर्त्यांच्या नजरेतुन पाहिलेत तर ते दहशतवादी ठरतात.
लाखो देशभक्तांच्या प्रयत्नांनी देश स्वतंत्र झाला, इंग्रजांना राज्य व देश सोडावा लागला. मात्र काही भारतियांच्या मनात ईंग्रज रज्यकर्ते आजही अढळ आहेत, त्यांना या भारतियांच्या हृदयातुन हद्दपार करण्यात बिचारे देशभक्त अपयशी ठार्लेले दिसतात.
4 May 2013 - 6:02 pm | आजानुकर्ण
हेच खरे. माझ्या मनात इंग्रज राज्यकर्ते अढळ आहेत हे तुम्हाला माझ्या प्रतिसादातील कोणत्या वाक्यावरुन दिसले हे कळत नाही. माझा मुद्दा अत्यंत साधा आहे. ज्या क्रांतीकारकांनी विचारपूर्वक आखणी करुन योजनाबद्ध प्रतिसादांनी इंग्रजांना इशारे दिले ते आणि ज्या क्रांतीकारकांनी नंदलालसारख्या हुकुमाचा ताबेदार असणाऱ्या भारतीय व्यक्तीला किंवा निरपराध इंग्रज स्त्रियांना मारले ते या सर्वांना क्रांतीकारक किंवा देशभक्त या एकाच लेबलखाली आणणे चुकीचे आहे.
अशा लेखांमधून संदेश जातो तो असा की, तुमच्या एखाद्या ध्येयासाठी काहीही करा, कोणालाही मारा, तो निरपराध असला तर जुजबी माफी मागा, आज (इंग्रज) तुम्हाला दहशतवादी म्हणतील म्हणू द्या, मात्र उद्या ते ध्येय साध्य झाल्यावर एखादा सर्वसाक्षी या सर्व कृत्याचे देशभक्तीपर समर्थन करील.
हा प्रकार पटत नाही इतकेच म्हणायचे आहे.
मला तर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या नंदलालचा क्रांतीकारकांनीच सत्कार करायला हवा होता असे मनापासून वाटले. असो. अनेक क्रांतीकारकांना घर, संसार, मुलेबाळे या नित्याच्या जबाबदाऱ्या व त्यामागून येणाऱ्या विवंचना वगैरेही नव्हत्या त्यामुळे त्यांना नंदलालसारख्यांची स्थिती कळणे कठीण आहे.
5 May 2013 - 9:24 am | मदनबाण
__/\__
5 May 2013 - 12:02 pm | प्रभाकर पेठकर
शिवाजी महाराजांचे वैर मुघल, आदिलशहा, निजाम वगैरे मुसलमानांशी होते. त्यांच्या जुलमी राजवटींविरोधात आणि स्वराज्याच्या संरक्षणार्थ महाराजांनी आणि मराठ्यांनी लढाया केल्या. तेंव्हा ह्या सर्व मुघल, आदिलशहा, निजाम वगैरेंच्या सैन्यात अनेक मराठा सरदार आणि सैनिक होते. ह्या जुलमी राजांशी लढताना हे आपलेच मराठा सरदार, सैनिकही मारले जायचे. ते ही तसे त्यांच्या त्यांच्या राजांशी एकनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष असायचे त्यामुळे त्यांना मारायचे नाही म्हंटले तर स्वराज्य स्थापन झालेच नसते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात नंदलाल बॅनर्जीचा वध समर्थनियच ठरतो. बाकी रेल्वे गाडीतील निरपराध्यांबद्दल बोलायचे झाले तर सुक्या बरोबर ओलेही जळते हा निसर्गनियम आहे.
बांगलादेश मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम वगैरे लढायांमध्येही अनेक निरपराध मारले गेले.
सहेतुक निरपराधांना मारणे आणि स्वातंत्र्य युद्ध आरंभले असताना शत्रू सानिध्यातील कांही निरपराध, त्यांना मारण्याचा हेतू नसताना, मारले जाणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. दूसर्या घटनेतील निरपराधांचा मृत्यू समर्थनिय नसला तरी अनिवार्य असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. पोलीसी कारवाईतही 'क्रॉस फायर' मध्ये मरणारे कांही असतातच. पण अशा घटना घडूनही 'दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार्या' पोलीस अधिकार्यांचे आपण कौतुकच करतो. त्यांचा आदर करतो. तद्वत, क्रांतिकारकही आदरास पात्र आहेत, असे माझे मत आहे.
5 May 2013 - 12:21 pm | बॅटमॅन
सहमत आहे.
5 May 2013 - 12:30 pm | क्लिंटन
हो बरोबर आहे ना. इंग्रजांच्या बरोबरीने भारतीयांवर अत्याचार करण्यात ज्या भारतीयांचा हात होता असे लोक मेले तर त्याविषयी कोणालाच वाईट वाटू नये.
जर या जुलमी अधिकार्यांना (आणि त्यांच्या भारतीय साथिदारांना) इतरांच्या केसालाही धक्का न लावता ठार मारले असते (जसे मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे आणि इतर अनेकांनी केले) तर त्याविषयी कोणालाच तक्रार करायचे कारण नाही.जर एखाद्या अधिकार्याला मारताना झटापटीत इतर कोणा निरपराधाला गोळी लागली असती तर तो प्रसंग वेगळा पण मुळातच तो अधिकारी जाणार ती रेल्वेगाडीच उडवायचा कट करणे (ज्यात इतर अनेक निरपराध लोक असणार होते) कसे काय समर्थनीय आहे? अशा प्रसंगी हकनाक मरणारे लोक आणि क्रॉसफायरमध्ये मरणारे लोक या दोन्हींची तुलना कशी करता येईल?
शीख संघटनांचा इंदिरा गांधींवर दात होता हे सर्वांना माहित आहेच.केवळ इंदिरा गांधींना मारणार्याला जर कोणी क्रांतिकारक म्हणत असेल तर ते समजू शकतो (जरी मी त्यांना दहशतवादीच म्हणत असलो तरी).इंदिरा गांधींना मारताना जर इतर कोणी क्रॉसफायरमध्ये मारले गेले असते तरी त्या "क्रांतिकारकांच्या" मते "ओल्याबरोबर सुके जळते" असे समर्थन झाले तरी ते समजू शकतो.पण इंदिरा गांधी जाणार त्या विमानात जाणीवपूर्वक बिघाड करून विमान पाडायचा जर का कोणी कट करत असेल (मला वाटते १९८३ मध्ये हा प्रकार झाला होता. त्याचा पंजाब प्रश्नाशी संबंध होता की नाही हे माहित नाही) आणि त्यात इंदिरा गांधींच्या राजकारणाशी संबंध नसलेल्या इतर अनेकांचा बळी जाणार असेल तर ते कसे काय समर्थनीय ठरेल?
5 May 2013 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर
तेच म्हणतोय मी. प्रत्येक कृती समर्थनीय नसते पण अनिवार्यता नजरेआड करता येत नाही. जिथे जिथे शक्य होते, जसे मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे आणि इतर अनेकांनी केले, तिथे तिथे क्रांतिकारकांनी निरपराध्यांचे बळी टाळले आहेत.
समोरुन गोळी घालून ठार मारणे, दूरून बॉम्ब फेकून मारणे,विश्वासघात करून मारणे (जसा अफजलखानाचा वध) वगैरे अनेक मार्गांनी ध्येयाप्रत जाता येते. कुठल्या परिस्थितीत कुठला मार्ग अवलंबायचा हे विचार करूनच ठरत असणार. (माझा आपला अंदाज). इंग्रजांनी स्वतः बाबू गेनू सारख्यावर ट्रक चढवून त्याला चिरडून मारलं, जनरल डायर सारख्यांनी लहान मुले, स्त्रीया, वृद्ध सर्वांवर सरसकट गोळ्या चालवल्या. पुण्याच्या प्लेगच्या साथीत डब्ल्यू. सी. रँड नांवाच्या इंग्रज अधिकार्याने पुण्यात, प्लेग निर्मुलनाच्या नांवाखाली घरातील स्त्रीपुरुषांना घराबाहेर काढले, देवघरात बुट घालून घुसून तीही विस्कटली. त्या काळच्या कर्मठ क्रांतीकारकांनीही त्याचा सूड उगवला. तसेच इतरही अनन्वित अत्याचार केले त्याने क्रांतिकारकांची माथी भडकली असतील तर तो दोष कोणाचा?
माझ्या अल्पमतीला हिच दोनचार, पण प्रातिनिधीक, उदाहरणे माहीत आहे. माझा ह्यावर विशेष अभ्यास नाही. परंतू, चारही बाजूंनी अनन्वित अत्याचारांच्या बातम्या कानी येत असताना ह्या इंग्रजांना धडा शिकविणे, सूड घेणे, इंग्रजांना सळो की पळो करून देश सोडण्यास भाग पाडणे हाच क्रांतिकारकांचा उद्देश होता. निरपराध्यांना मारणे हे ध्येय नव्हते पण अपराध्यांना मारताना कांही निरपराध्यांचा बळी गेल्यास नाईलाज होता.
गांधीजींच्या अहिंसक चळवळीतही अनेक निरपराध्यांनी (क्रांतिकारकांच्या नातेवाईकांनी) इंग्रजांच्या अत्याचारामुळे प्राण गमावले. गांधीजींच्या अहिसा चळवळीत भाग घेणारे, मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करू इच्छिणारे अपराधी होते? तेही निरपराध होते. त्यांनीही लाठ्या, काठ्या, बंदूकीच्या गोळ्या खाल्ल्या, प्राणत्याग केला. गांधीजींच्या अहिंसेच्या धोरणातही स्वकियांची हिंसा , कितीतरी मोठ्या प्रमाणात, घडलीच आहे. पण गांधीजींना 'महात्मा' मानतातच नं?
5 May 2013 - 1:40 pm | क्लिंटन
निरपराध्यांना मारणे हे क्रांतिकारकांचे ध्येय नव्हते हे सर्वमान्य आहे आणि त्याविषयी कसलाही प्रश्न नाही.म्हणूनच रेल्वे उडवायचा कट त्यांनी कसा केला हे आश्चर्य वाटून मुळातला प्रतिसाद लिहिला आणि पुढची चर्चा झाली.आणि क्रॉसफायरमध्ये कोणी मारले गेल्यास त्याची अनिवार्यता मलाही समजते हे वर लिहिले आहेच.पण रेल्वे उडवायचा कट करणे आणि क्रॉसफायर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पण वर लिहिले आहेत. असो.
5 May 2013 - 1:21 pm | क्लिंटन
पूर्व बंगालच्या गव्हर्नरला मारणे गरजेचे होते हे मान्य केले. आम्हाला त्या गव्हर्नरलाच मारायचे होते पण त्या रेल्वेगाडीच्या दोनेक डब्यातील चाळीस लोक (दोन डब्यात मिळून चाळीस लोक असावे असे मानायला हरकत नसावी) सुक्याबरोबर ओलेही जळते या निसर्गनियमाने मारले गेले हे आपले समर्थन असेल तर हे लॉजिक दुधारी तलवारीसारखे आहे आणि ते आपल्यावरही उलटू शकते.
मुझफ्फरपूरच्या घटनेत मिसेस प्रिंगल आणि मिस प्रिंगल मारल्या गेल्या आणि त्यांचा इंग्रज अधिकारी जुलूम करत होते त्याच्याशी काही संबंध नव्हता याविषयी फारसा वाद नाही.मिस्टर प्रिंगलचे पुढे काय झाले याची कल्पना नाही पण आपल्या बायको आणि मुलीला हकनाक मारणाऱ्यांविषयी त्याच्या मनात राग असला तर त्यात त्याची चूक काय?समजा त्याने प्रफुलचंद्र चाकीवर सूड उगविण्याचा विडा उचलला आणि चाकी प्रवास करत असलेल्या बसलाच उडवून द्यायचा त्याने कट केला तर असे करणे समर्थनीय आहे का? याच लॉजिकने प्रिंगलही त्या परिस्थितीत म्हणू शकतो की मला मारायचे होते एकालाच पण काय करणार सुक्याबरोबर ओलेही जळते या नियमाने बसमधील इतर चाळिस लोकही गेले!!
आता गव्हर्नर प्रवास करत असलेली रेल्वेगाडी क्रांतिकारकांनी उडविणे/चाकी प्रवास करत असलेली बस प्रिंगलने उडविणे यात नक्की फरक काय?
5 May 2013 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या राजवटी विरोधात कारवाया करणार्या एखाद्याला शोधताना इंग्रजांनी ४० काय १०० निरपराध्यांनाही छळून, हाल हाल करून मारले आहे. इंग्रजांच्या, निरपराध्यांवर अत्याचार करण्याच्या, अनेक कथा इतिहासात सापडतील.
क्रांतिकारक आपल्या मातृभूमीच्या सुटकेसाठी लढत होते.इंग्रज दुसर्या देशावर (स्वार्थासाठी) आपली पोलादी पकड आवळत होते.
स्वार्थासाठी एखाद्यावर हल्ला करणे आणि आत्मसंरक्षणार्थ एखाद्याला मारणे ह्यात फरक असतो तोच इथे आहे.
5 May 2013 - 1:53 pm | क्लिंटन
तुम्ही हे म्हणणार हे मला माहितच होते म्हणून माझे उत्तरही आधीच तयार करून ठेवलेच होते.ते आता चोप्य-पस्ते केले की झाले.
प्रिंगल हे इंग्रज नाव असल्यामुळे हा प्रश्न उभा राहतो.समजा प्रिंगलऐवजी प्राणनाथ या भारतीय कुटुंबातील स्त्रिया मारल्या गेल्या असत्या आणि मिस्टर प्रिंगलऐवजी श्री.प्राणनाथ यांनी अशी बस उडवायचा कट केला तरी एकाला मारायचे म्हणून पूर्ण बस उडविणे समर्थनीय नाही हा माझा मुद्दा कायमच राहिल.
गव्हर्नर हा वाईट होता आणि त्याला यमसदनी धाडणे अगदी १००% गरजेचे होते हे मान्य.पण रेल्वे गाडी उडवून आपल्याच लोकांना मारणे आणि त्याचे सुक्याबरोबर ओले जळते असे म्हणत समर्थन करणे मला मान्य नाही आणि असे मारले गेलेले लोक आणि क्रॉसफायरमध्ये मारल्या गेलेल्यांची केस वेगळी आहे हे परत एकदा लिहितो आणि माझ्याकडून या चर्चेला पूर्णविराम देतो.मला मांडायचे असलेले सगळे मुद्दे मी आतापर्यंत मांडले आहेत.
5 May 2013 - 2:54 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या प्रतिसादातील
हे वाक्य आपल्या नजरेतून निसटलेले दिसते आहे. नाहितर उगीच गाडी 'समर्थनिय' ह्या शब्दावर अडली नसती. असो.
रेल्वे उडविण्याच्या कटात कोणा एक्-दोन अधिकार्यांना मारण्याचा उद्देश असतो/होता. फायरिंगचा हूकूम देतानाही कोणा एकदोन दहशतवाद्यांना मारण्याचा उद्देश असतो. ह्यात कांही निरपराधही मारले जाणार हे रेल्वे उडविण्याचा कट करणार्यांना आणि फायरींगचा हूकूम देणार्यांनाही माहित असते. परंतु, ज्या अपराध्याला मारायचे आहे तो हातून निसटला तर अजून कित्येक निरपराध्यांचे जीव जातील ह्या अभ्यासपूर्ण जाणीवेतूनच अशा टोकाच्या घटना घडतात.
शिवाय इंग्रजांनी जे, माझ्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे, निरपराध बळी घेतले त्याकडेही दूर्लक्ष करता येत नाही. असो.
माझ्याकडूनही चर्चेला पूर्णविराम.
5 May 2013 - 4:19 pm | प्यारे१
>>>चर्चेला पूर्णविराम.
हुश्श्श्श!
२२-२५ वर्षांच्या मुलांकडून देशासाठी काही करण्याची इच्छा होणं हेच कौतुकास्पद वाटतं. (नसेल त्यावेळी एवढा डीप थॉट )
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कुठलाही मार्ग तिरस्करणीय असू शकत नाही.
दुर्दैवानं आजच्या काळात नेत्यांकडं, लोकांकडं बघून मुळातच स्वातंत्र्यासाठी दिलेली बलिदानं, न्यौछावर केलेली आयुष्यं, केलेले त्याग इ.इ. सगळं फोल वाटू लागलंय. ते जास्त खेदजनक आहे.
6 May 2013 - 1:22 pm | प्रकाश घाटपांडे
योग्य वेळी पुर्ण विराम व सहमती.