कवितेच्या झाडावर...

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
9 Jul 2008 - 10:11 am

कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी
पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी

गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला
यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला

भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे
काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे

सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने
विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने

षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम
कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम

अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता
कवितेची लागते किनारी नाव भावगीता

--अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:13 am | बेसनलाडू

शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली.
(प्रसन्न)बेसनलाडू

चेतन's picture

9 Jul 2008 - 10:19 am | चेतन

सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा)
त्यात
अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता
कवितेची लागते किनारी नाव भावगीता

खासच्...

काव्यप्रेमी चेतन

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Jul 2008 - 10:36 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चतुरंग's picture

9 Jul 2008 - 4:49 pm | चतुरंग

वृत्तबद्ध, गेय आणि आनंददायी रचना आवडली! :)

चतुरंग

शितल's picture

9 Jul 2008 - 4:57 pm | शितल

खुप छान काव्य रचना झाली आहे.
सगळीच कविता आवडली. :)

धनंजय's picture

9 Jul 2008 - 8:02 pm | धनंजय

पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 12:02 am | विसोबा खेचर

गोडबोले मास्तर,

सगळीच कविता सुंदर, परंतु

कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी
पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी

या ओळी सर्वाधिक आवडल्या...

तात्या.

अवांतर -

मिपाकरहो,

सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन.

इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी...

तात्या.