श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता. हा लेख लिहण्यामागे तो उद्देशही नाही. असा फरक कां पडतो हे जरा खुलासेवार लिहण्याकरिता हा लेखप्रपंच.
रामायण-महाभारत ही महाकाव्ये वाल्मिकी-व्यासांनी लिहली असली तरी आतां ती केवळ त्यांचीच उरलेली नाहीत. त्यांवर माझा, तुमचा, आसेतुहिमालय भारतातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. नाही कसा ? माझी वाचनाची आवड या ग्रंथांनीच वाढवली; मी घरांत आई-वडीलांशी, बाहेर ओळखी-अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे हे हे ग्रंथच (कळत-नकळत) ठरवतात; काही चुकले तर त्याची बोचणी यांच्यामुळेच लागते; थोडक्यात सीता, राम, कृष्ण, कर्ण, अर्जून, रावण आणि कंस हे ही... या ग्रंथातील व्यक्तिचित्रे रहात नाहीत, ती माझ्या अवतीभवती वावरणारी माणसेच असतात. आणि गंमत म्हणजे गेली शेकडो वर्षे हा पगडा भारतातील सर्व व्यक्तींवर पडला, विद्वान व अडाणी दोहोंवर. अडाण्यांचे सोडा, त्यामुळे झाले तर भलेच होते पण विद्वानांनी एक नवीनच भानगड निर्माण केली.
पूर्वी ग्रंथ हाताने लिहून घ्यावे लागत. त्यांत लिहतांना चुका होत. तेही फारसे महत्वाचे नव्हते. पण लेखक जरासा विद्वान व थोडासा प्रतिभाशाली असेल तर तो त्याला योग्य वाटेल ते घुसडवून देऊं लागला. तेही स्थल-कालबाधित. म्हणजे पाचव्या शतकातील मल्याळी लेखक द्रौपदीस्वयंवरातील लग्नात पगती उठवू लागला ते केरळातील त्या काळच्या पंगतींना अनुसरून. मग त्याचा मेळ काश्मीरमधील लेखकाच्या वर्णनाशी कसा जुळणार ? झाले असे कीं महाराष्ट्रात महाभारताची "निलकंठ" प्रत प्रचलित आहे तर बंगालमध्यें "कलकत्ता" प्रत. दोहोंत भरपूर फरक. भांडारकर संस्थेतील विद्वानांना या समस्येला तोंड देतांना काही दशके झगडावे लागले. लॉ कॉलेज रस्त्याने जातांना अजूनही मान खाली झुकते, आपोआप.
यात आणखी भर दोघांची. पहिली स्थानिक लेखकांची. मराठी "जांभुळाख्यान" हे एक उदाहारण. व्यासांच्या महाभारताशी काही संबंध नसलेले. किंबहुना त्यातील द्रौपदीच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. पण त्यावरही विश्वास ठएवणारे भेटतातच. दुसरी भर पाश्चिमात्य भाषांतरकारांची. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाबद्दल मला काही बोलावयाचे नाही.थोर माणसे.पण एक मोठा फरक पडतो तो येथील समाजातील चालीरितींमुळे व भाषेतील संकेतांमुळे. तुमच्या आमच्या बाबतीत हे नैसर्गिकपणे उपजत होतात; बाहेरच्यांना लक्षात येणे दुरापास्तच,.या विषयातील ज्ञान मिळवणे फार अवघड आहे. त्यामुळे जर तुम्ही रामायण-महाभारताचे इन्ग्रजी भाषांतर वाचत असाल तर काही त्रुटी अनिवार्य आहेत. उदा. म्हणून " आज दारावरून वरात गेली " याचे इंग्रजीत भाषांतर करून बघा. बहुदा श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील तपशीलातील फरक यामुळे असावा.
अवांतर:
( मला असे वाटते की कर्णावरील एखाद्या कादंबरीवरून "कर्ण अर्जुनाहून धनुर्विद्येत जास्त प्रवीण होता" किंवा रामाने शूर्पणखेवर (किंवा सीतेवरही !) अन्याय केला असे ठरवावयाच्या आधी वाल्मिकी रामायण - व्यासकृत महाभारत वाचा. म्हणजे संस्कृत वाचा असे नाही. पण पं. सातवळेकर यांचे रामायण ( संस्कृत-मराठी दोन्हीही एकेठिकाणी) व सर्वश्री दातार-द्रविड-फफे यांनी भाषांतर केलेले व श्री. उपासनी यांनी तपासलेले (१९१०) महाभारत तुम्हाला जास्त बरोबर माहिती देईल. (हीच कां? मी गेली साठ वर्षे हीच वाचत आहे म्हणून !) व मगच कुणावर अन्याय झाला हे ठरवा. सीतेवर अन्याय झाला तसा रामावरही झाला. पण हे दोघेही तक्रार करतांना दिसत नाहीत. आणि शत्रुघ्नावर अन्याय झाला म्हणजे काय झाले ? त्याला अयोध्येचे राज्य मिळणार नव्हतेच. खरे म्हणजे कुठलेच. मिळणार नव्हते. रामाने मथुरेचा राजा म्हणून अभिषेक करतो असे म्हटल्यावर तो अचंबित होऊन म्हणतो " हे कसे शक्य आहे ? मोठा भाऊ असतांना धाकटा राजा कसा होईल ? तो राजा झाला पण तो अपवाद होता. त्यानंतर मात्र सर्वांना, लहानमोठ्यांना राज्ये मिळाली.)
शरद
प्रतिक्रिया
23 Feb 2013 - 1:28 pm | नाना चेंगट
हं. अन्याय केला असे ठरवावयाच्या आधी वाल्मिकी रामायण - व्यासकृत महाभारत वाचा हे सांगता सांगता आमचं आयुष्य संपून गेलं. असो.
मागे कधीतरी आम्ही एका जैन मुनीच्या सहवासात पाचव्या शतकातील एक संस्कृतमधील महाभारताची प्रत वाचली होती ज्यामधे गीता सांगून झाल्यावर एक श्रमण रणांगणावर येऊन उपदेश करतो ज्यामुळे पांच पांडव युद्ध सोडून जैन व्रत आचरण करुन हिमालयात निघून जातात. त्यामुळे भीमाने दुर्योधनाची मांडी फोडून त्याच्यावर अन्याय केला ही विचारवंती ओरड नवे कोणते रुप घेईल हा आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्हाला तसेही उत्तर न मिळणारे प्रश्न नेहमीच पडत असतात. ते ही असो.
26 Feb 2013 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
अरे भिल्ल महाभारत वैग्रे कसे विसरलास बाबा ?
23 Feb 2013 - 1:39 pm | स्पा
उत्तम , माहितीपूर्ण लेख
शरद काका !!!
बाकी रामायण आणि महाभारतावर , हक्काने (जणू काही युद्ध होताना सदर आय डी 'हर्षा भोगले' सोबत कोमेंट्री बॉक्स मध्ये बसून आंखो देखा हाल बघत होते ) तावातावाने चर्चा करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे
23 Feb 2013 - 2:00 pm | बॅटमॅन
अतिशय नेमका अन मार्मिक लेख. खंप्लीट सहमत!!!!!!!
23 Feb 2013 - 2:09 pm | यशोधरा
पं. सातवळेकर यांचे रामायण ( संस्कृत-मराठी दोन्हीही एकेठिकाणी) व सर्वश्री दातार-द्रविड-फफे यांनी भाषांतर केलेले व श्री. उपासनी यांनी तपासलेले (१९१०) महाभारत
ही पुस्तके सहजी उपलब्ध आहेत का? नक्कीच पाहीन ही पुस्तके. संदर्भासाठी धन्यवाद.
23 Feb 2013 - 3:22 pm | शरद
पं.श्रीपाद सातवळेकर यांनीस्वाध्याय मंडळ, पारडी, सुरत येथून प्रकाशित केलेले रामायणाचे ९ खंड नक्कीच संग्राह्य आहेत. पण आता ते परत कॊणी छापले आहेत कां हे मला ठाऊक नाही, चौकशी करतो. महाभारत वरदा प्रकाशन व विदर्भ-मराठवाडा प्रकाशन, पुणे या दोघांनी रामायणाबरोबरच छापली आहेत. फक्त संस्कृत रामायण बरोबर नाही. पण तरीही सवलतीची दरांत सर्व खंड मिळू शकतील. (खरेदी करावयाचे ठरले तर किमान २०% सवलत मागावयास विसरू नका. तेवढी नक्कीच मिळेल.)
शरद
23 Feb 2013 - 3:28 pm | राही
सुमारे पन्नस-साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला 'प्रसाद' मासिकाचा एक दिवाळी अंक परंपरेने घरात आहे.तो संपूर्ण अंक य.गो.जोशी यांनी केलेल्या महाभारताच्या साररूपी मराठी अनुवादाने व्यापलेला आहे. य.गों.च्या रसाळ लेखणीतून उतरलेले महाभारत अत्यंत वाचनीय आहे. चिंतामणराव वैद्यांनीही महाभारतावर केलेले लेखन आवडले होते.इंग्लिशमध्ये राजगोपालाचारियर यांचे महाभारत तर डॉ.सर्वपळ्ळी राधकृष्णन यांचा गीतेचा अनुवाद आवडला होता.सध्या तरुणांमध्ये देवदत्त पट्टनाइक यांचे 'जय,अॅन इलस्ट्रेटेड रीटेलिन्ग ऑव्ह दि महाभारत' हे पुस्तक लोकप्रिय आहे.
23 Feb 2013 - 2:31 pm | पैसा
लेखासाठी आणि संदर्भासाठी धन्यवाद!
23 Feb 2013 - 3:39 pm | प्यारे१
>>>> पं. सातवळेकर यांचे रामायण ( संस्कृत-मराठी दोन्हीही एकेठिकाणी) व सर्वश्री दातार-द्रविड-फफे यांनी भाषांतर केलेले व श्री. उपासनी यांनी तपासलेले (१९१०) महाभारत तुम्हाला जास्त बरोबर माहिती देईल. (हीच कां? मी गेली साठ वर्षे हीच वाचत आहे म्हणून !)
आपण कोण? ;) आम्ही तुमचं का ऐकावं? आम्हाला वाटतं कर्ण लय भारी होता!
सुयोधन सज्जन होता,
सुशासनाचं साड्यांचं दुकान होतं,
धृतराष्ट्र डोळ्यांचा डॉक्टर होता,
रावणानं सीतेला टच पण नाय केला!
एवढी चांगली माणसं ही... फार फार अन्याय झाला ह्या लोकांवर! :)
23 Feb 2013 - 9:19 pm | प्रचेतस
उत्तम विवेचन सर.
वाल्मिकी रामायणाबद्दल सांगावेसे वाटते ते असे की लवणासूराचा वध आणि शत्रुघ्नाला मथुरेचा राज्याभिषेक का प्रसंग मूळात उत्तरकांडातील आहे. आणि उत्तरकांडाला बर्याच संशोधकांनी प्रक्षिप्त मानलेले आहे. साहजिकच उत्तरकांडातील तपशीलांतील फरक हे वेगवेगळ्या प्रतींमध्ये किंचीत बदललेले दिसून येतात.
महाभारतात जे वनपर्वात 'रामोपाख्यान' आलेले आहे ते राम सीतेसह परत येऊन अयोध्येचा राजा बनतो इथवरच आहे. रामोपाख्यान महाभारतकारांनी तेथेच संपवले आहे. माझ्यामते रामायणातील प्रसंगांचा हा सर्वात जुना उल्लेख आहे.
परत द्रोणपर्वातसुद्धा रामाचा उल्लेख षोडशराजकीय आख्यानांत आला आहे. वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील रामोपाख्यान यात तसे काही फरक आहेत.
त्यामुळे रामायणाचा काळ जरी महाभारताच्या आधीचा असला तरी प्रत्यक्ष रामायणाची संहिता ही महाभारताची रचना झाल्यावर लिहून झाली असावी असे मानायला निश्चितच वाव आहे.
बाकी अवांतराबद्दल- मृत्युन्जयाच्या शत्रुघ्नावरच्या लेखातसुद्धा शत्रुघ्नावर अन्याय झाला असा सूर मला कुठेही दिसला नाही. एका तुलनेने दुर्लक्षित व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध असेच त्याचे स्वरूप असे मला वाटले.
26 Feb 2013 - 5:31 am | अग्निकोल्हा
इतरही जाणकारांचे मत वाचणेस उत्सूक.
26 Feb 2013 - 11:32 am | मृत्युन्जय
अरेरे. शत्रुघ्नाचा धागा वाचनमात्र झाला. नाहितर शरदकाकांचा प्रतिसाद आणी त्यावरचे उपप्रतिसाद मिळुन दीडशतक झाले असते ;)
असो. शत्रुघ्नाचा धागा हा त्याच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी होता. त्यावर अन्याय झाला असा सूर कुठे लागलाच असेल तर तो लेखाचा दुय्यम गाभा होता. बहुधा मी शत्रुघ्न सिन्हांबद्दल बोलत नसुन रामायणातल्या शत्रुघ्ना बद्दल बोलतो आहे हे लक्षात न आल्याने काहीए लोकांनी शतकी धाग्यासाठी मदत केली असावे असे वाटते ;).धागा वाचनमात्र झाला नसता तर दत्ताजी शिंदेच्या "बचेंगे तो और भी लढेंगे" च्या धर्तीवर अजुन चर्वितचर्वण केले असते हे ही तितकेच खरे.
"कर्ण अर्जुनाहून धनुर्विद्येत जास्त प्रवीण होता"
जास्त प्रविण होता हे चुकीचे असले तरी कमी प्रविण होता असे म्हणणे म्हणजेदेखील लारा सचिन पेक्षा कमी प्रविण फलंदाज आहे असे म्हणण्यासारखे आहे असे नमूद करु इच्छितो. लवकरच त्यावरही एक धागा येइल. :)
26 Feb 2013 - 12:35 pm | अग्निकोल्हा
शक्य आहे. लेखकास असे वाटणे शक्य आहे.
+१
26 Feb 2013 - 2:12 pm | ५० फक्त
रामायणात फार उल्लेख नाहि तो नाही, इथला धागा देखिल वाचनमात्र व्हावा यासारखं नशीब ते काय ?
26 Feb 2013 - 2:22 pm | अग्निकोल्हा
म्हणुनच मी सांगतो जास्त चित्रपट बघु नयेत.
26 Feb 2013 - 2:22 pm | मृत्युन्जय
आयला आपल्या नावाचे मिपावरचे धागे वाचनमात्र होण्याची प्रसिद्धी लाभण्याचे सौभाग्य वाट्याला आले हे कळाले तर शत्रुघ्नाचेही ड्वाले पाणावतील हो.
26 Feb 2013 - 6:12 pm | नाना चेंगट
कारण काय धागा वाचन मात्र होण्याचे? बिनकामाचे भुक्कड हिंदूंची बदनामी करणारे, गरळ ओकणारे धागे चालतात मग हा धागा काय पाप करत होता? तरी बरे धागा उडवला नाही ते !
असो संपादकांची मर्जी आणि सल्लागारांची अॅलर्जी ... इलाज नाही.
26 Feb 2013 - 6:28 pm | प्यारे१
राहुल द्रविड नि व्ही व्ही एस लक्ष्मण दीड दिवस दोघेच बॅटींग करत होते म्हणून ऑस्ट्रेलियाने मॅच नाही खेळायचं सोडलं....!
उलट मॅच संस्मरणीय का काय म्हणतात तशी झाली....
27 Feb 2013 - 9:47 am | शिल्पा ब
वाल्मिकींनी स्वत: लिहिलेल्या रामायणाची प्रत कुठे मिळेल? अन भाषांतरकारांना कुठे मिळाली? तेच खरं कशावरुन?
इतके हजार वर्ष वाल्मिकींची प्रत कोणी जपुन ठेवली ?
27 Feb 2013 - 11:30 am | स्पा
ब तैं शी शमत
27 Feb 2013 - 3:43 pm | शरद
वाल्मिकीने लिहलेल्या रामायणाची प्रत कोठे मिळेल ? उत्तर "कोठेही नाही".दोन हजार वर्षांपूर्वी लिहलेल्या ग्रंथाची प्रत कशी मिळणार हो ? विनोद सोडा. रामायण साधारणत: इ.स.पूर्व पहिल्या-दुसया शतकात लिहले गेले असावे. मात्र सर्वात जुनी प्रत मिळाली ती इ.स.दहाव्या शतकातील आहे.मधल्या हजार -बाराशे वर्षातील प्रत मिळत नाही. आज तुम्हाला पं. सातवळेकर यांचे पुस्तक पुण्या-मुंबईत नक्कीच मिळेल. शिवाय गीता प्रेस वगैयांची प्रकाशनेही मिळवयास पाहिजेत. धार्मीक पुस्तके विकणाया दुकानांत चौकशी करा. शिल्पाताई, आपण जर भांडारकर संस्थेत काम करत नसाल तर असले गहन प्रश्ण त्यांच्यावर सोडून काव्याचा आस्वाद घ्या.
जर आपण शाळेत संस्कृत शिकला असाल तर रामायणातील संस्कृत कळणे सहज शक्य आहे. महाभारतासारखे क्लिष्ट नाही. त्यातील काही भाग, उदा. रामाने केलेला सीता-विरहातील विलाप, सीतेने दरबारात केलेले दिव्य, तर एक रम्य काव्यच आहे. मदतीला खाली मराठी भाषांतर असेल तर उत्तमच.
शरद