अनुदिनी अनुतापे...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 Jul 2008 - 1:12 am

माय मराठीच्या जगभर उमटलेल्या पाऊलखुणा संगणकाच्या पडद्यावर पाहाताना येणाया आनंदाच्या भरात मीही एकदा मराठीच्या जागतिकीकरणात आपलाही हातभार लावावा, म्हणून `अनुदिनी' सुरु केली. आनंदाचं ते भरतं ओसरायच्या आत दोनचार लेखही पाडून अनुदिनीवर डकवले. तेव्हापासून रोज त्यावरच्या हिट्स मोजल्याशिवाय मला झोप येईनाशी झाली. दिवसातून दहापंधरा वेळा तरी आपली अनुदिनी उघडावी, आणि जगभरातल्या किती मराठीप्रेमींनी आपल्या `वैश्विक साहित्या'चा आस्वाद घेतला, ते पाहात आनंदून जावे, हा छंद मला जडला. प्रत्येक वेळी उघडलेल्या अनुदिनीच्या `हिट काऊंटर'वर एकएका आकड्याची भर पडताना पाहून माझ्या आनंदाला अक्षरश: उधाण यायचे, आणि साहित्यनिर्मितीच्या उर्मी उरात उचंबळायला लागायच्या. रात्ररात्र जागून मग मी साहित्याच्या लगडी उलगडून अनुदिनीवर पसरायचो,आणि लगेचच, हिट्स मोजायाची सुरुवात व्हायची...
... दिवसामागून दिवस जात राहिले. माझ्या अनुदिनीवरल्या हिट्स कितीने वाढल्या, ते मी न चुकता, दिवसातून जमेल तितक्यांदा पाहात होतो. प्रत्येक वेळी वाढणारा आकडा पाहून येणार्या त्या आनंदाच्या उधाणात डुंबत असताना, कॉमेंटसच्या रिकाम्या रकान्याकडे माझं लक्षच जात नव्हतं.
... आणि एका दिवशी, माझ्या मित्राला अनुदिनी उघडून दाखवली. संगणकाच्या पडद्यावरल्या माझ्या अक्षर साहित्याचे शब्द ताठ मानेनं जग पाहातायत, या जाणीवेनं मी मोहरून गेलो, आणि अनुदिनी बंद केली. पण त्यानं मला ती पुन्हा उघडायला लावली, आणि मी हिटस काऊंटरकडे पाहिलं... एका क्षणात तिथला आकडा एकाने पुढे सरकला होता... आपल्या साहित्यावर जग फिदा झालंय अशी माझी खात्रीच झाली. आता एखाद्या ऑनलाईन अंकाचं संपादक वगैरे होण्यासाठी चाचपणी वगैरे करायला काहीच हरकत नाही, असा एक विचारही मनात विजेसारखा चमकून गेला, आणि क्षणाचाही विलंब न लावता तो तोंडातून बाहेरही पडला... शून्यात पाहाताना, जगाच्या कुठल्यातरी कोपर्यातला, मायभूमीच्या ओढीने अस्वस्थ झालेला आणि मराठीला मुकलेला, मराठीसाठी भुकेला मराठी बांधव आपल्या अनुदिनीचा आस्वाद घेत आपली भूक भागवतोय, असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. माझा तो मित्र, अनुदिनीची उघडझाप करत होता, आणि ...हिटस वाढतच होत्या... आणि माझ्या डोक्यात लक्कन वीज चमकली. हिट्सचा आकडा आपल्या क्लिकबरोबरच वाढत नसेल ना, या शंकेनं मी कावराबावरा झालो, आणि पुन्हा ती शंका तोंडातून बाहेर पडली. वास्तवाला सामोरं जायचा क्षण जवळ आला होता, हे मी ओळखलं, आणि ओशाळून अनुदिनी बंद केली...
... आता कधीमधी मी ती उघडतो, तेव्हा हिट्स काऊंटर एका आकड्याची भर घालून शून्याएवढे डोळे वटारून माझ्याकडे पहात हसताहसता जिवंतपणाची साक्ष देत असतो... प्रतिक्रीयांचा रकाना मात्र एकलकोंड्यासारखा शून्यात बघत, तळाशी कुठेतरी लपलेला असतो...

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Jul 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

वा! मस्त हलकाफुलका लेख! वाचायला मौज वाटली! :)

दिनेशराव, औरभी आने दो...

आपला,
(अनुदिनीकार) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2008 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिनेशराव,
अनुदिनीच्या लेखकाचे मनोगत आवडले. :)

( मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं )

-दिलीप बिरुटे
(हिट्स आणि जगाच्या नकाशावरील भेटी मध्यरात्रीही उठू उठू पाहणारा अनुदिनी लेखक )

II राजे II's picture

4 Jul 2008 - 1:54 pm | II राजे II (not verified)

>>हिट्स आणि जगाच्या नकाशावरील भेटी मध्यरात्रीही उठू उठू पाहणारा अनुदिनी लेखक
ह्या रोगाचा बळी मी पण होतो ....
:D

>>>( मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं )

त्याला साखळीने बांधून ठेवा ... ;)

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

छोटा डॉन's picture

4 Jul 2008 - 2:30 pm | छोटा डॉन

मस्त लिहले आहे राव ...
अगदी म्हणतात ना "दिन की बात जुबान पर आ गयी" , तसेच ...
मी पण पहिले काही दिवस "ह्याच व्यसनाने" पागल झालो होतो ...

मग अशाच काड्या करता करता मला "हिट्सच्या वैश्विक सत्याचे" गुढ उकलले मी मी स्वतःवरच हसलो व त्यानंतर पुढे असे काउंत पहाणे सोडून दिले ...

>> मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं
=)) =)) =))
आरारा ... जबरा !!!
एखाद्याला किती हाणावे म्हणतो मी ?

अवांतर : ब्लोगवर पडणार्‍या "प्रतिक्रीयेच्या संख्येत" पण कहीच दम नाही. तिथेपण सो कॉल्ड "प्रतिक्रीयांचे राजकारण" चालते.
आपण "ब्लॉग का लिहतो" हा प्रश्न सर्वात महत्वाचा. जर त्याचे उत्तर "मानसीक समाधान किंवा खाज" असेल तर "हिट्स / प्रतिक्रीयांची संख्या " यासारख्या गोष्टी अर्थशुन्य ठरतात ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर's picture

4 Jul 2008 - 2:16 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेख..
असंच होत होतं सुरुवातीला माझं सुद्धा... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू's picture

4 Jul 2008 - 2:32 pm | बेसनलाडू

आवडले.
(खुसखुशीत)बेसनलाडू

विद्याधर३१'s picture

4 Jul 2008 - 8:39 pm | विद्याधर३१

आहो मी तर मिपावर लिहिलेल्या पहिल्यावहिल्या दोन ओळींच्या लेखाचीसुध्दा किती वाचने झाली याची परायणे करत होतो.

विद्याधर

यशोधरा's picture

4 Jul 2008 - 10:15 pm | यशोधरा

सहीच लिहिलेय!! :D

चतुरंग's picture

5 Jul 2008 - 4:44 am | चतुरंग

(स्वगत - बरे झाले मी अजून अनुदिनी लिहिली नाहीये! ;))

चतुरंग