सुजीत फाटकची एक मस्त कविता मागे वाचली होती. त्याच्याशी संपर्क साधता आला नाही. पण पोरगं नक्की कलंदर असणार. किती जणांनी वाचली असेल कल्पना नाही पण तुम्हालाही ती आवडेल म्हणून इथे देतोयः
देहाला चाळुन घेता
मातीची पखरण व्हावी
हा इकडे देह सरावा
ती तिकडे मूठ भरावी
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
माझ्या वंशाच्या गावी
रंगाला फुटतो गंध
दृष्यांना सुचती कविता
गंधाचा होतो स्पर्श
माझ्या असल्या वंशाचे
कित्येक उमलले कोंभ
परि माझ्यारूपी पक्का
वंशाचा पहिला अंत
(सुजीत फाटक)
कविता गंभीर असली तरी दु:खद खासच नाही. अत्यंत मोजक्या पण नेमक्या शब्दात भावना व्यक्त करण्याच सुजीतचं कौशल्य दाद देण्यासारखं आहे. ज्या सहजतेनं त्यानं लय सांभाळली आहे त्याचंही कौतुक आहे.
मला समजलेला अर्थ असा:
जीवन सार्थ झालं तर नुसता देह सरत नाही तो कित्येकांच जीवन आनंदाच करून जातो. पहिल्या कडव्यात अत्यंत सहजतेनं त्यानं कविताचा आशय उलगडला आहे.
अशा जीवनाला त्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेमुळे (किंवा दैववशात) अत्यंत प्रतिकूलतेतनं मार्ग काढावा लागतो. कवि ग्रेसनं म्हटलय तसं :
मी महाकवि दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोलं
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूलं
सुजीत तो आशय एक पाऊल पुढे नेतो. त्याला वाटतं की जीवलग सखीचा सहवास देखील अशा जगण्याला उ:शाप ठरू शकत नाही.
त्याचा लिहीण्याचा अंदाज जीवघेणा आहे. शेवटच्या दोन ओळीतली नज़ाकत पाहा:
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
तिसरं कडवं अफलातून आहे. ते कविच्या अत्यंतिक तरल मनोजगताच वर्णन आहे. संदीप खरेच्या या ओळी :
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
ज्या तरलतेनं विमनस्कतेच वर्णन करतात त्यासारख्या या ओळी आहेत. पण त्या जास्त चित्रदर्शी आहेत आणि पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात. रंगांना गंध असणं, दृष्यांच्या कविता होणं आणि गंधांचे स्पर्श होणं हे निव्वळ लाजवाब आहे!
बेभान आणि कलंदर जगणं प्रत्येकाची आंतरिक आस आहे. ती आपल्या मुक्त स्वरूपाची साद आहे. पण प्रत्येकाला ते जमेल असं नाही. सुजीत या अवस्थेच वर्णन काय अफलातून करतो ते शेवटच्या कडव्यात येतं. त्यानं कहर केलायः
माझ्या असल्या वंशाचे
कित्येक उमलले कोंभ
अशा बेबंद जगण्याची आस कविचं जगणं बघून अनेकांना लागलीये. पण :
परि माझ्यारूपी पक्का
वंशाचा पहिला अंत
अस्तित्व एक आयुष्य एकदाच घडवतं. ते इतकं मौलिक असतं की त्याचा वारसा पुढे चालत नाही. स्वच्छंद ही व्यक्तिगत उपलब्धी आहे, तो वंशपरंपरेनं लाभत नाही. नवा कलंदर पुन्हा नव्या वंशात जन्मावा लागतो. त्या वंशाला मग नवे अभिशाप असतात. त्या अभिशापातून तो जगणं कृतार्थ करतो आणि निरोपाच्या वेळी म्हणतो :
हा इकडे देह सरावा
ती तिकडे मूठ भरावी
प्रतिक्रिया
25 Jan 2013 - 2:16 am | शुचि
वा! फारच सुंदर उलगडून दाखविली आहे ही कविता. मला तरी अर्थ कळत नव्हता. पण तुम्ही लावलेला अर्थ आता लागतो आहे.
हा असा वेगळाच सेन्सरी अनुभव घ्यावा असे मात्र खूप वाटते, बरेचदा वाटते.
25 Jan 2013 - 3:15 am | आजानुकर्ण
तुमचे गेल्या काही दिवसांतले प्रतिसाद वाचल्यानंतर चुकून या कवितेचे नाव 'देहाला चोळून घेता' असे वाचले
25 Jan 2013 - 4:46 am | नंदन
Ay there's the 'rub' (पहा: हॅम्लेटचे ते प्रसिद्ध स्वगत) :)
25 Jan 2013 - 7:21 am | अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
असो... पण छान लिवलय हो,कविता तर स्वालिड हाय!
25 Jan 2013 - 10:29 am | धन्या
कविता आणि तुम्ही केलेलं कवितेचं रसग्रहण दोन्ही आवडले.
25 Jan 2013 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आणि तुम्ही केलेलं कवितेचं रसग्रहण दोन्ही आवडले.
-दिलीप बिरुटे
25 Jan 2013 - 1:49 pm | मूकवाचक
+१
25 Jan 2013 - 11:47 am | तिमा
कविता व रसग्रहण आवडले. याहीपेक्षा वेगळा अर्थ (तसा असल्यास) कुणी सांगू शकेल काय ?
25 Jan 2013 - 12:05 pm | क्रान्ति
उत्कट कवितेचं तसंच उत्कट रसग्रहण.
25 Jan 2013 - 12:31 pm | मुक्त विहारि
उत्तम..
25 Jan 2013 - 12:32 pm | कवितानागेश
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
या ओळी मातीला उद्द्येशून असाव्यात असा माझा समज आहे.
25 Jan 2013 - 12:44 pm | संजय क्षीरसागर
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
हे मातीला म्हटलं तर, `मृत्यूसुद्धा माझी या शापित जीवनातनं सुटका करू शकणार नाही' असा अर्थ होईल. आणि तसा कवितेचा मुळ आशय नाही.
25 Jan 2013 - 7:19 pm | शुचि
हा अँगलही रुचतो आहे.
25 Jan 2013 - 12:45 pm | मनीषा
माझ्या वंशाच्या गावी
रंगाला फुटतो गंध
दृष्यांना सुचती कविता
गंधाचा होतो स्पर्श
अप्रातिम कविता ..
25 Jan 2013 - 12:46 pm | टवाळ कार्टा
'देहाला चोळून घेता' असे वाचले...आणि मग अपेक्शाभंग झाला :( (मला वाटले "मचाक" असेल ;))
25 Jan 2013 - 6:50 pm | पिलीयन रायडर
मीही 'देहाला चोळून घेता' असे वाचले... मग लेखकाचे नाव वाचले..मग गडबडीने परत धाग्याचे नाव वाचले.. मग नीट कळाले.. मग म्हणलं.."तरीच..."
25 Jan 2013 - 1:44 pm | अभ्या..
सुंदर कविता आणि तेवढेच छान रसग्रहण.
आवड्ले.
25 Jan 2013 - 8:16 pm | अनन्न्या
+१
25 Jan 2013 - 9:35 pm | तर्री
कविता व रसग्रहण आवडले.
25 Jan 2013 - 9:45 pm | पैसा
कविता काहीशी गूढ आहे आणि कवीने आपआपला अर्थ लावायला वाव ठेवला आहे. संक्षी आणि माऊ दोघांचेही अर्थ बरोबर असू शकतात. कदाचित कवि आपल्या काव्यप्रतिभेला उद्देशून बोलत असेल. किंवा माझ्या मनात उमटलेला अर्थ आणिच वेगळा असू शकेल.
28 Jan 2013 - 1:46 am | संजय क्षीरसागर
प्रतिभेशी इमान हे कोणत्याही अस्सल कलाकाराचं प्रार्थमिक लक्षण आहे. खरं तर तो त्याच्या जगण्याचा उ:शाप आहे. अभिव्यक्तीतूनच तो आपल्या भावना व्यक्त करतो. त्यामुळे तसा अर्थ लागत नाही.
कविता गूढ आहे त्यामुळे अर्थभिन्नता असू शकते हे मान्य पण कवितेचा मुळ आशय लक्षात ठेवून अर्थ लावला तर सहसा चूक होत नाही.
28 Jan 2013 - 9:14 am | पैसा
मी दोन्ही अर्थ बरोबर असण्याबद्दल बोलतेय. तुम्ही परत चुकीबद्दल बोलताय. :)
28 Jan 2013 - 10:46 am | संजय क्षीरसागर
प्रश्न चुकीचा नाहीये.
या ओळी इतक्या सरळ आहेत की त्यात इतर अर्थ संभवत नाहीत:
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
तरीही सुजीतशी संपर्क साधला तर त्याला विचारीन.
28 Jan 2013 - 2:00 pm | सुधीर
कविता थोडी कठीण आहे पण रसग्रहण आवडले. "हा इकडे देह सरावा ती तिकडे मूठ भरावी" या ओळी छान आहेत.