हिंदुस्थानी अभिजात संगीताची लोकांवर 'जादू' होते, याचं एक महत्वाचं कारण आहे - या संगीतात असणारी लोकसंगीताची झलक. एक परिष्कृत ('सॉफिस्टिकेटेड') तरीही सरळ, साधी, सच्ची स्वररचना. या संगीतात असे कित्येक 'शास्त्रीय' प्रकार आहेत ज्यात थक्क करून टाकणार्या चमत्कृती आणि अगाध सौंदर्य आहे. असं म्हणतात की या संगीतातले राग 'जिवंत' आहेत, आणि रागांच्या महत्तेपायी नव्हे तर आपली सांगितीक जाणीव शाबूत आहे हे समजण्यासाठी एखाद्या जिवंत व्यक्तीइतकाच मान रागस्वरूपालाही द्यावा लागतो.
पं. कुमार गंधर्व म्हणायचे, "तुम्ही ज्या प्रकारे गाता, त्यात रागाच्या मूळ वृत्तीचा उपमर्द होऊ नये हे भान राखा. प्रत्येक रागाच्या अंतरंगात जिवंतपणा आहे, त्याच्या हृद्याचे स्पंदन ऐका. त्याचा मान राखा". संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी नीट स्वरात मिळवलेल्या तानपुर्याच्यातून सभोवती निर्मीत होणारा गूढरम्य नाद हा त्यांच्या वाटचालीतला महत्वाचा सवंगडी ठरतो. त्यामुळेच वरपांगी साध्या वाटणार्या या वाद्याकडेही लोक कुतूहलाने बघतात.
नंतर वारंवार एक गोष्ट जाणवायला लागते की राग म्हणजे फक्त एखाद्या थाटातला किंवा तालात बांधलेला निर्जीव नियमबद्ध स्वरसमूह नाही. तो कुठल्या प्रहरी कुठल्या ऋतूत सादर करावा याचं एक रहस्य आहे. कोणता राग कधी सादर करावा याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. या शतकाच्या सुरूवातीस कित्येक संगीतकारांनी आपल्या ध्वनिफिती प्रकाशित करायला नकार दिला. ते म्हणत, लोक ज्या रितीने जगतात त्याला अनुसरून ते या ध्वनिफिती कधीही आणि कुठेही बिनडोकपणे लावतील आणि त्यातून आमच्या राग-रागिणींचा अपमान होईल. तुम्ही उस्ताद अमजद अली खाँसाहेबांना भेटलात, तर असे संगीतविषयक असे अनेक किस्से आणि पैलू तुमच्या पुढे येत राहतात.
आपल्या आयुष्यातला एक किस्सा ते न कंटाळता पुनःपुन्हा सांगतात. राष्ट्रपती भवनात अमजद अलींच्या तीर्थरूपांचा (उ. हाफिज अली खाँ) सत्कार होता. समारंभानंतर राष्ट्रपती महोदयांनी त्यांना आदराने विचारलं, "मी आपल्यासाठी काय करू शकतो?" तेव्हा उस्तादजींनी उत्तर दिलं, "राष्ट्रपती हे पद म्हणजेच आपण हिंदुस्थानचे सम्राट आहात. आपल्याला अशक्य असं काहीच नाही. ऑल इंडिया रेडिओवरून राग दरबारी प्रसारित होताना कित्येकदा त्याचा 'खून' पडतो. शक्य असेल तर हे त्वरीत बंद करा!" राष्ट्रपती स्मितीत झाले. त्यांनी स्वतःला सावरत परत प्रश्न विचारला, "आपली काही वैयक्तिक मागणी असेल तर ती सांगा. मी रेडिओला आवश्यक त्या सूचना देईनच". यावर उस्तादजींनी फक्त नमाज पढण्यासाठी घरी रवाना होण्याची परवानगी मागितली!
तसं पाहिलं तर उ. अमजद अलींना संगीताचं शिक्षण मिळणं अशक्य कोटीतलंच होतं. उ. हफीज अली ६५ वर्षांचे असताना त्यांना हा मुलगा झाला! त्यामुळे त्यांना असं वाटायचं की सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्या तरी या मुलाला शिकवण्यासाठी पुरेसा अवधी मात्र आपल्याजवळ नाही. आपल्या परंपरेशी नातं जोडण्यासाठी राग, थाट किंवा ताल 'ओळखणं' किंवा बंदिशी पाठ करणं पुरेसं नाही. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर घराण्याची परंपरा टिकवणारे संगीतकार होता येत नाही.
ज्या सांगितीक 'करामती' करून लहान वयात मुलं आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून नावारूपाला येतात, त्या अमजद अली लीलया करून दाखवायचे. तरीही त्यांची रवानगी 'औपचारिक' शिक्षणासाठी मॉडर्न स्कूलमधे होणे टळले नाही. तसे घडूनही या मुलाच्या मनात खोलवर सतत एक जाणीव होती, जी त्याला कधीच दृष्टीआड करता आली नाही. ज्याला आपण शिक्षण समजतो आहोत, ते एका मर्यादेपर्यंत अपरिहार्यच आहे, पण ते निव्वळ 'ठोकळेबाज' आहे. ज्याच्यापुढे आपले आयुष्य 'घडवण्याची', खर्या अर्थाने जगण्याची संधी हात जोडून उभी आहे, त्याच्या दृष्टीने असली पोपटपंची कुचकामी आहे.
हा मुलगा भर दुपारी रियाझ करण्यासाठी नित्यनेमाने चक्क घरी पळून जायचा. सुदैवाने त्यावेळी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ एम. एन. कपूर दिल्लीच्या या मॉडर्न स्कूलच्या प्राचार्यपदी होते. त्यांनी हेरलं की निव्वळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या हेतूने शाळेत येणार्या मुलांपैकी हा विद्यार्थी नाही. त्यांनी शाळेच्या कार्यालयीन वेळेत घरी जाण्याची खास सवलत अमजद अलींना दिली. शेवटी अमजद अलींनी शालेय शिक्षणातली अंतिम परीक्षाही व्यवस्थित पार पाडली. शालेय अभ्यासक्रमाला पुरेसा 'न्याय' देत फार थोडा वेळ झोप घेऊन ते रोज बारा ते चौदा तास न चुकता रियाझ करायचे.
[श्री. राघव मेनन यांच्या 'द साँग ऑफ अमजद अली खाँ या लेखावर आधारित]
प्रतिक्रिया
22 Jan 2013 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
22 Jan 2013 - 11:20 pm | तर्री
मूक वाचाकाजी , शा. संगीतावर लिहीत राहा हो ...मी.पा. वर आजकाल कोणी लिहीत नाही हया विषयावर ( तात्या - कुठे गेलात ? ).
हा जरा छोटा ख्याल झाला पुढचाबडा ख्याल होवून जावूद्या ......बन रे बलैयां सारखा !
23 Jan 2013 - 5:37 pm | चौकटराजा
आम्ही नवे आहोत ! तरी किरवाणी वर एक लेख लिहिला आहे. आपला आग्रह असेल तर शास्त्रीय संगीत आहे तरी काय ?
याचे वरवर स्वरूप समजावण्याइतके तरी वाचलेले आहे. त्या बद्द्ल लिहेन !
22 Jan 2013 - 11:35 pm | कवितानागेश
येस्स... :)
22 Jan 2013 - 11:52 pm | किसन शिंदे
वाह!!
_/\_
उ.अमजदअली खाँ, उ. जाकिर हुसैन, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. रविशंकर, उ. बिस्मील्लाह खाँ.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि अखंड आयुष्य त्याची सेवा केलेले हे अनमोल हिरे, यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे.
या सगळ्यांवर आपण लिहाल अशी अपेक्षा बाळगतो.
पुढचा भाग लवकरात लवकर टाका. :)
23 Jan 2013 - 2:01 am | शुचि
मूवा असे भाग येऊ द्या.
23 Jan 2013 - 2:28 am | आदूबाळ
(२/२) लवकर लिहा. लई नाही मागणं.
23 Jan 2013 - 2:29 pm | पैसा
मस्त लिहिलंस! क्रमशः का नाही?
23 Jan 2013 - 2:46 pm | बॅटमॅन
लिहिलेय मस्त. संगीतातला तद्दन अज्ञानी म्हणून एक प्रश्न विचारतो:
बडे उस्ताद असं म्हणताहेत म्हणजे काहीतरी तथ्य असले पाहिजे, पण पुलंच्याच एका संगीतविषयक लेखात याला विरोधी मत वाचलेय. त्यामुळे प्रश्न असा आहे की समजा सकाळचा राग संध्याकाळी लावला तर व्हायोलेशन होते म्हंजे नक्की काय होते?
23 Jan 2013 - 10:57 pm | मूकवाचक
राग आणि प्रहर याबद्दल -
ट्रॅफीक सिग्नल तोडणे हे उदाहरण घेतले तर एखाद्या तरूण व तडफदार नवयुवकासाठी तो विरंगुळा असतो (गांभीर्याची पातळी: टाईमपास), सर्वसामान्य नागरिकांसाठी ती शक्यतो टाळावी अशी बाब असते (गांभीर्याची पातळी: ब्रीच ऑफ अ प्रोटोकॉल) आणि 'निर्धार'च्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने पाहता तो अक्षम्य अपराध ठरतो (गांभीर्याची पातळी: व्हायोलेशन ऑफ लॉ, क्राईम). तोच प्रकार या बाबतीत असावा असे वाटते.
संगीतशास्त्रात दिल्याप्रमाणे ठरावीक वेळ, ॠतू असताना एखादा राग ऐकला तर तो जास्त परिणामकारक वाटतो असे ढोबळमानाने म्हणता येईल. ते सहज अनुभवताही येईल. उदा. शास्त्राप्रमाणे पहाटे ललत आणि तिन्हीसांजेला मारवा ऐका आणि नंतर याच्या उलटेही करून पहा.
24 Jan 2013 - 12:16 pm | बॅटमॅन
ललत आणि मारवा ऐकले तर दोघांमधील फरकही कळणार नाही मला, बाकीचे तर सोडाच. =)) पण हरकत नाही, कधी करून पाहीन.
25 Jan 2013 - 1:05 am | शुचि
बॅट्मॅन, भूपाळी ऐका. सकाळी फार गोड वाटते पण संध्याकाळी नाही. मला फक्त भूपाळी सकाळी गातात हे माहीत आहे तेव्हा तूर्तास इतकच :D
25 Jan 2013 - 1:15 am | बॅटमॅन
वेल, अमर भूपाळी तर मी कधीही ऐकली तरी तितकीच भारी वाट्टे! नाद नाय करायचा होनाजीबाळाचा.
25 Jan 2013 - 1:19 am | शुचि
खरं तर मलाही तितकीच भारी वाटली होती रात्री व संध्याकाळी तसेच दुपारी :(
आपल्याला संगीताचा कान नाय म्हणून गप बसले.
25 Jan 2013 - 1:26 am | बॅटमॅन
सोडा हो, भारी वाटले बास झाले. "रागीट" गोष्टी कळायला बरेच संगीत नीट ऐकले पाहिजे, तोवर जे काही आणि जेव्हाही भारी वाटते ते ऐकावे बास्स . अज्ञजनांचा राजमार्ग आहे हा. :)
25 Jan 2013 - 7:25 pm | मी-सौरभ
आपण सगळ्या दारवांकडे अल्कोहोल म्हणुन बघणारे...
आवड्ते ती आवड्ते मग कारणे काही का असेना तसच गाण्याचं
हा.का.ना.का.
23 Jan 2013 - 3:14 pm | इनिगोय
हे विलक्षणच!!
समोरच्याला - मग ती व्यक्ती असो, वा राग - मान देणे हे आपल्याच सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, हे अगदी यथातथ्य.
पुढचा भाग लवकरच येऊ द्या.
23 Jan 2013 - 4:16 pm | यशोधरा
उस्ताद आमीर खाँबद्दल लिहाल का? आणि गिरीजादेवींबद्दल.
23 Jan 2013 - 6:37 pm | राघव
वाचतोय!
23 Jan 2013 - 7:45 pm | Dhananjay Borgaonkar
झक्कास्..मजा येतीये वाचताना. पुढचा भाग पटकन टाका.
बर्याच दिवसांनी आवडीच्या विषयावर धागा वाचायला मिळाला :)
24 Jan 2013 - 9:30 am | अक्षया
विषय आणि कलाकार दोन्हीही आवडते.
लेखन अप्रतिम. :)