१८८० साली पहिल्या मोशन कॅमेर्याचा शोध लागल्यापासून जगात कित्येक सिनेमे बनले असतील. विविध विषय, माणसं, प्रेम, भय, युद्ध, विनोद प्रत्येक क्षेत्रात सगळ्या भाषांमध्ये हजारो सिनेमे आले, त्यांनी आपापल्या काळात लोकांवर अधिराज्य सुद्धा केलं असेल. पण एक काल्पनिक कॅरॅक्टर, जे फक्त कादंबरी रुपाने अस्तित्वात होतं, त्याने मात्र सिनेमात आल्यापासून गेली ५० वर्षे लोकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातलीये, तो म्हणजे जेम्स बाँड.
जेम्स बाँडचा जन्मदाता इयान फ्लेमींगला कधी स्व्प्नातसुद्धा वाटलं नसेल आपलं कारटं इतकं प्रसिद्ध होईल. आपली पहिली कथा लिहिताना त्याच्या मनात जेम्सबद्दल काही वेगळीच मतं होती. फ्लेमिंग स्वतः एक एक उत्तम पक्षी निरिक्षक होता, आणि जेम्स बाँड हे नाव सुद्धा त्याने त्या काळातील एका प्रसिद्ध अमेरिकन पक्षी निरिक्षकाचंच उचललं होतं. द न्युयॉर्कर ला १९६२ साली दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं, "१९५३ साली जेव्हा मी पहिली कथा लिहीली, तेव्हा मला बाँड अतिशय संथ, हळूवार, थोडासा मंद, अत्यंत निरस आयुष्य जगणारा ०० एजंट हवा होता. आणि म्हणूनच मी त्याचं नाव जेम्स बाँड ठेवलं, कारण हे मी माझ्या आयुष्यात ऐकलेलं सगळ्यात मंद नाव आहे."
फ्लेमिंगला बाँड लिहीण्याची प्रेरणा मिळायला बरेच लोक कारणीभूत होते. दुसर्या महायुद्धाच्या वेळेस नेव्हल इंटेलिजन्स डिव्हीजन मध्ये काम करत असताना त्याच्या आयुष्यात आलेल्या कॉर्नाड ओ ब्रायन फ्रेंच, पॅट्रीक डॅलझेल जॉब, बिल डंडरडेल, आणि मुख्यत्वे युरोपातल्या नॉर्वे आणि ग्रीसमध्ये काही ऑपरेशन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या त्याचा भाऊ पीटरचा फ्लेमिंगवर भलताच प्रभाव पडला होता. या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांना एकत्रित करून त्याने बाँड बनवला.
फ्लेमिंगची लिखाणाची आपली अशी खास वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे त्याने सगळं लिखाण आपल्या जमैकातल्या घरी बसून केलं, आणि दुसरं म्हणजे तो वर्षातले फक्त २ महिनेच- जानेवारी आणि फेब्रुवारी आपलं लिखाण करायचा. १९५३ साली त्याची पहिली बाँडकथा - कॅसिनो रॉयल प्रकाशित झाली. त्यानंतर १९६६ पर्यंत (फ्लेमिंगच्या मृत्यूच्या २ वर्षे नंतर) त्याच्या एकूण १२ कादंबर्या आणि २ लघुकथा संग्रह प्रकाशित झाले. ते असे -
१९५३ - कॅसिनो रॉयल
१९५४ - लिव्ह अँड लेट डाय
१९५५ - मूनरेकर
१९५६ - डायमंड्स आर फॉरेव्हर
१९५७ - फ्रॉम रशिया विथ लव्ह
१९५८ - डॉ. नो
१९५९ - गोल्डफिंगर
१९६० - फॉर युवर आईज ओन्ली. (लघुकथा)
१९६१ - थंडरबॉल
१९६२ - द स्पाय व्हू लव्हड मी
१९६३ - ऑन हर मॅजेस्टीस सिक्रेट सर्व्हिस
१९६४ - यु ओन्ली लिव्ह ट्वाईस
१९६५ - द मॅन विथ द गोल्डन गन
१९६६ - ऑक्टोपसी अँड द लिव्हिंग डेलाईट्स. (लघुकथा)
हे तर झालं बाँडचं कागदी आयुष्य. त्याला खराखुरा सुपरहिरो बनवला तो त्याच्या सिनेमातल्या पदार्पणानंतर. मुळात फ्लेमिंगच्या बाँड लिखाणात एवढा मालमसाला भरला होता की त्यावर सिनेमा बनला नसता तरच नवल. १९६२ साली इऑन प्रॉडक्शन्सनी पहिला बाँडपट "डॉ. नो" पडद्यावर आणला. त्यानंतर गेली ५० वर्षं या इसमाने अख्ख्या जगाला आपल्या प्रभावाखाली ठेवलं आहे. बाँड साकारणारे नायक बदलले, त्याच्या नायिका बदलल्या, पण लोकांवरची त्याची जादू काही कमी झाली नाही.
पहिला बाँड साकारण्याचा मान मिळाला शॉन कॉनरीला. त्याने १९६२ ते १९६७ मध्ये ५ बाँडपटात काम केलं (डॉ. नो, फ्रॉम रशिया विथ लव्ह, गोल्डफिंगर, थंडरबॉल आणि यु ओन्ली लिव्ह ट्वाईस.)
त्यानंतर १९६९ मध्ये आलेल्या ऑन हर मॅजेस्टीस सिक्रेट सर्व्हिस मध्ये जॉर्ज लेझनबाय ने बाँड साकारला होता. पण तो केवळ एकाच सिनेमात. १९७१ मध्ये आलेल्या डायमंड्स आर फॉरेव्हर मध्ये पुन्हा शॉन कॉनरीनेच बाँड साकारला.
कॉनरीनंतर आलेल्या रॉजर मूरला सर्वाधिक काळ बाँड बनण्याचा मान मिळाला. त्याने १९७३ ते १९८५ या काळात ७ सिनेमात बाँडची भुमिका केली. ( लिव्ह अँड लेट डाय, द मॅन विथ द गोल्डन गन, द स्पाय व्हू लव्हड मी, मूनरेकर, फॉर युवर आईज ओन्ली, ऑक्टोपसी आणि अ व्ह्यू टू अ किल)
रॉजर मूर नंतर बाँडची भुमिका मिळाली ती टिमोथी डाल्टनला. त्याने १९८७ ते १९८९ या काळात २ बाँडपट केले. (द लिव्हिंग डेलाईट्स आणि लायसन्स टू किल)
१९८९ नंतर इऑन प्रॉडक्शन्स आणि बाँडपटांचे निर्माते एम. जी. एम. स्टुडिओ यांच्यातल्या काही वादांमुळे मधली काही वर्षे बाँडपट येणं थांबलं होतं. त्यानंतर बाँड पुन्हा पडद्यावर झळकला तो १९९५ मध्ये पिअर्स ब्रॉस्नन च्या रूपात. ब्रॉस्ननने १९९५ ते २००२ मध्ये ४ सिनेमे केले. ( गोल्डनआय, टुमॉरो नेव्हर डाईज, द वर्ल्ड इज नॉट इनफ आणि डाय अनदर डे)
नंतर आलेला, आणि निदान आज पर्यंतचा शेवटचा बाँड आहे डॅनियल क्रेग. क्रेग ने २००६ पासून आजपर्यंत ३ बाँडपट केलेत. (कॅसिनो रॉयल, क्वांटम ऑफ सोलॅस आणि स्कायफॉल)
नायक बदलले, नायिका बदलल्या. (बाँडपटात तसंही नायिकांना फार ठराविक कामच असतं, त्यामुळे त्यांचे चेहरे असेही कोणाच्या लक्षात राहत नाहीत.) सिनेमाचे दिग्दर्शक बदलले, पण बाँडची स्टाईल आहे तशिच राहिली. बाँड म्हटलं की हमखास डोक्यात येतात अशा काही खास गोष्टी आहेत. त्यातली काही म्हणजे जगातील उत्तमोत्तम निसर्गरम्य ठिकाणं, बाँडची खास एजंट क्यू आणि त्या॑च्या सहकार्यांनी बनवलेली अफलातून गॅजेट्स, बटणं दाबून जगावेगळ्या करामती करणारी त्याची अॅस्टन मार्टिन कार, सुबक देखण्या (कमीत कमी कपड्यातल्या) एकदम रापचिक नायिका आणि या सर्वांना पुरून उरणारा, शांत डोक्याचा, ओठात नेहमी सिगार असणारा, दारू सुद्धा त्याच्या आवडत्या शैलीत ऑर्डर करणारा (व्होडका मार्टिनी - शेकन, नॉट स्टर्ड) धडाकेबाज बाँड. क्या बात है..
अशा या बाँडला पडद्यावर येऊन नुकतीच ५० वर्षे झाली, पण तरीही तो जुना वाटत नाही, म्हातारा वाटत नाही, आउट डेटेड वाटत नाही. काळानुरूप त्याने स्वतःला बदललंय. असाच तो पुढेही बदलत राहील, आणि आत्ता जसं आमच्या पिढीने बाबा लोकांसोबत बसून त्यांच्या काळातले बाँडपट बघितलेत, तसंच येणार्या पिढ्याही बघतील, आणि बाँड आपली मोहिनी अशीच जगावर कायम ठेवेल, एव्हढं मात्र नक्की.
प्रतिक्रिया
18 Jan 2013 - 4:51 pm | चाणक्य
वरिलप्रमाणे
18 Jan 2013 - 4:57 pm | पैसा
आपल्याला ब्वॉ ००७ आवडतो. त्यातही सगळ्यात आवडता पिअर्स ब्रॉस्नॉन. बाकी कोणाला दुसरा कोणी बाँड आवडला तरी हरकत नाही!
18 Jan 2013 - 6:01 pm | वेताळ
पिअर्स ब्रॉसन आपल्याला पण आवडतो
18 Jan 2013 - 8:40 pm | धमाल मुलगा
ब्रिटिश मनुक्षाच्या तोंडी अमेरिकन हेल कोंबणारा पिअर्स नाय भावला.
राॅजर. मूर बेष्ट. आणि डॅनियल क्रेगही. विशेषतः त्याचं कसिनो रोयालमधलं मार्टिनीचं आरडर देणं लै खास. आत्ता मोबाईलावरुन टंकतोय. सवडीनं त्या सीनचा यु ट्युब दुवा देतो मग बोल :-)
19 Jan 2013 - 7:06 pm | धमाल मुलगा
20 Jan 2013 - 4:03 am | अग्निकोल्हा
मला वाटलं हा व्हिडीओ दाखवताय की काय .. यात बाँडच्या तोंडी प्रथमच मार्टिनीची ऑर्डर देताना नेहमीच्या "शेकन नॉट स्टीअर्ड" च्या ऐवजी दुसरा संवाद दिला होता... धमाल आलि होती.
20 Jan 2013 - 1:37 pm | धमाल मुलगा
खरं म्हणजे हाच डायलॉग बेष्ट आहे म्हणा. :D (आणि आमच्यासारख्या कामानं गांजलेल्यांचा फारच जिव्हाळ्याचाही! :) )
18 Jan 2013 - 5:53 pm | चौकटराजा
मला आवडला... डेनियल क्रेग ... बाकी कोणाला दुसरा कोणी बाँड आवडला तरी हरकत नाही!
18 Jan 2013 - 7:55 pm | अग्निकोल्हा
दुर्दैवाने हे तितकं खर न्हवे. डेनियल क्रेग मस्तच अभिनेता आहे. थंड निळे डोळे तर अप्रतीमच. पण Whatever lost by Daniel Craig after Casino Royal, surprisingly found by Tom Cruise's American Bond "Ethan Hunt" with the latest Mission Impossible :(
पण होय बंड्या परत उसळी घेणार हे नक्कि, तसा सेहवागच आहे तो.
18 Jan 2013 - 8:18 pm | नानबा
मला तर ब्वॉ सगळेच बाँड आवडले.. पण त्यातल्या त्यारत ब्रॉस्नन आणि रॉजर मूर जास्त... प्रत्येक कलाकाराने आपापली वैशिष्ट्ये जपली.. कॉनरीचं लेडी किलर स्माईल, मूरचा बिन्धास्तपणा, ब्रॉस्ननचा रॉ अॅटिट्यूड, क्रेगचे थंड निळे डोळे, सगळेच जाम भारी... आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्कायफॉल मधल्या बाँड तर जामच भारी.. जगावेगळी गॅजेट्स नाहीत, सुस्साट जाणार्या नव्या गाड्या नाहीत, जुनी शस्त्रं, त्याच्या वडिलांची असणारी ६० च्या दशकातली अॅस्टन मार्टिन, आणि नेहमीचा बाँडपणा... एक नंबर..
18 Jan 2013 - 8:22 pm | विकास
सहमत. फक्त त्यातील रंगवलेली कॅरेक्टर म्हणून डॅनियल क्रेगचा बाँड जास्त आवडला.
18 Jan 2013 - 8:56 pm | अत्रुप्त आत्मा
हमरा वोट भी रॉजर मूर को जाता है जी! :-)
18 Jan 2013 - 10:23 pm | आदूबाळ
मला कॉनेरी, मूर आणि क्रेग समप्रमाणात आवडले. पण इतर सर्व बाँडपटांपेक्षा "स्कायफॉल" वेगळा (आणि म्हणून श्रेष्ठ) वाटला.
गेले काही सिनेमे स्त्री असलेली "एम" स्कायफॉलमध्ये पायउतार होते आणि नवीन पुरुष एम येतो. बाँडला गॅजेट्स बनवून देणारा इसम गेल्या काही सिनेमात म्हातारा होता. स्कायफॉलमधे तो बदलून पोरगेलासा दिसणारा एक टेक विझार्ड आला आहे. स्कॉटलंडमध्ये व्यतीत केलेल्या आपल्या भूतकाळाशी नाळ तोडून स्कायफॉलमधला बाँड आता सर्वार्थाने एम आय ५ चा झाला आहे.
बाँडपट कूस पालटत आहेत. स्कायफॉल त्याची नांदी आहे...
18 Jan 2013 - 11:54 pm | योगप्रभू
बाँड म्हणजे कसा चुस्त, सडपातळ आणि ऑलवेज अलर्ट.
शरीराने ओघळलेला आणि मंद हालचालींचा रॉजर मूर बाँड म्हणून तितकासा पटला नाही. केवळ कथानक आणि हिरॉइनींसाठी त्याचे पिक्चर बघितले. टिमोथी डाल्टन आणि लेझेन्बी पण एवढे काही खास वाटले नाहीत.
शॉन कॉनरी, पिएर ब्रॉस्नन आणि डॅनियल क्रेग या तिघांनी मात्र बॉडला न्याय दिलाय.
19 Jan 2013 - 8:22 am | ५० फक्त
हे सगळे बाँडपट आहेत का कुणाकडं, फेब्रुवारीच्या चवथ्या शनिवार रविवारी दोन दिवस बॉड्२डे साजरा करु.
19 Jan 2013 - 9:00 am | प्रचेतस
माझ्याकडे आहेत.
19 Jan 2013 - 7:32 pm | नानबा
५० राव, माझ्याकडं बी सगळे हायेत कानफूटर वर...