वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींबरोबर ऐश करुन, पोटाला तडस लागेल इतकं खाऊन, ४-४ सिनेमे पाहून कंटाळा आला आहे. फेसबुकावर वांझोट्या चर्चा करुनदेखील आणि कविता, चित्रे लाईक करुन करुन देखील कंटाळा आल आहे.
बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून झाले आहे. मागे वळून पहाता फक्त स्वार्थ दिसतो कुरुप हाव दिसते. न संपणारी खरेदी दिसते आणि वखवख दिसते आयुष्यात. उपरती झाली आहे म्हणा ना : (
मुद्द्यावर येते - जर भारतातील एखाद्या संस्थेला मदत करायची असेल तर कशी आणि कोणत्या संस्थेला करावी? भूक हा मुद्दा अथवा अनाथाश्रमास मदत करायची झाल्यास कोणास व कसा संपर्क साधावा?
भारतात असताना रोज पोळी-भाजी घेऊनच बाहेर पडत असे. वाटेत येणार्या गरीबाची तेवढीच सोय. पण आता चाळीशीला आल्यावर वाटते - अधिक परीणामकारक मदत करता येऊ शकेल नव्हे हाय टाईम केली पाहीजे. डोळ्याची पापणी मिटेन आणि दुसर्या क्षणी कळेल की आपले उर्वरीत आयुष्यही कोणालाही मदत न करता वाया गेले. खरच अशी भीती दाटून येते. जोवर हातपाय शाबूत आहेत, कमवत आहोत केले पाहीजे अशी भावना घर करते.
जालावर शोधले असता मला तरी कळले नाही. शिवाय जालावर कितपत विश्वासार्ह संस्था सापडतील असे वाटले. कोणी मदत करु शकेल काय? कोणी ऑलरेडी अशा एखाद्या संस्थेस मदत करत आहे का? मदतीच्या अपेक्षेत.
माफ करा मनातले सर्व भडाभडा बोलून टाकले पण मिपाचे व्यासपीठ अशी मदत मागण्यास योग्य वाटले.
प्रतिक्रिया
27 Dec 2012 - 9:40 pm | मदनबाण
मला माहित असलेले संकेतस्थळ :--- http://www.cry.org/index.html
इथुन जास्त माहिती मिळु शकेलः--- http://www.youthkiawaaz.com/2011/01/top-ngos-of-india/
http://www.resource-alliance.org/pages/en/india-ngo-awards.html
27 Dec 2012 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी
रंग दे या नावाची एक संस्था भारतातील अनेक राज्यांतील गरजू स्त्रियांना घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी नाममात्र व्याजदरावर कर्ज मिळवून देते. अन आपण ते कर्जदार बनू शकतो. माझ्या एका जवळच्या मित्राचा अनुभव फार चांगला आहे. मी अजून स्वतः सहभागी झालेलो नाही.
आपण अमेरिकेत राहता, तर मी प्रत्यक्ष सहभागी झालेल्या एक उपक्रमाबद्दल सुचवतो. फीड माय स्टार्विंग चिल्ड्रन नावाची संस्था जगातील ५५ देशांतील बालकांसाठी पोषक आहार पुरवण्याचे काम करते. सुक्या अन्नधान्याची पाकिटे बनवण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊन श्रमदान करू शकतो. किमान दोन तासांचा अवधी एकावेळी द्यावा लागतो. आर्थिक मदत करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे.
31 Dec 2012 - 2:39 pm | ऋषिकेश
अतिशय उत्तम आणि उपयुक्त धाग्याबद्दल शुचितैंना आणि रंग देच्या दुव्याबद्दल श्रीरंग जोशी यांना दुवा देतो :)
उत्तम धागा..
27 Dec 2012 - 10:42 pm | Pearl
मला माहिती असलेल्या काही संस्था,
१) भामरागडसारख्या दुर्गम भागात महत्वाचे कार्य : डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदा आमटे
http://lokbiradariprakalp.org/activities.html
मराठी भाषेत ऐका,
http://www.youtube.com/watch?v=Z6ZN1HYL4hc&feature=relmfu
इंग्रजी भाषेत ऐका,
http://www.youtube.com/watch?v=5Gxgx-e9oUg
२) गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात महत्वाचे कार्य : डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग
http://www.searchgadchiroli.org/about%20search_back.htm
३) भारतीय समाज सेवा केंद्र: अनाथालय, चाइल्ड केअर, पुणे
http://www.bsskindia.org/programmes.html
४) वैभव फाळणीकर ट्रस्टः अनाथाश्रम, वृद्धाश्रम, पुणे
http://www.apalaghar.com/index.htm
५) श्रीवत्स अनाथालय, पुणे
http://www.sofosh.org/shreevatsa.html
६) मानव्यः HIV बाधित मुले आणि महिला यांच्यासाठी कार्य, पुणे
http://www.manavya.org/
७) सन्मती बाल निकेतनः सिंधुताई सपकाळ यांचे अनाथालय, पुणे
http://sanmatibalniketan.org/mai.php
८) निवारा वृद्धाश्रम, पुणे
९) काही करून दाखवण्याचा निश्चय असणाऱ्या तरूणाईसाठी… ज्यांना काही विधायक काम करायचे आहे त्यांच्यासाठी…
http://nirman.mkcl.org/
http://www.youtube.com/watch?v=c8z3bKwcHjw
निर्माणचे डिसेंबर २०१२ साठीचे सुरु आहे. उत्सुकांनी संधीचा लाभ घ्यावा.
http://nirman.mkcl.org/Downloads/NIRMAN_5_Starting_In_Dec_2012.pdf?v=gQ_...
१०) एक अतिशय धडाडीचं कर्तृत्व असणारी, कमालीचं नेतृत्व करणारी, प्रज्ज्वल संस्थेची संस्थापक सुनिता. human trafficking च्या विरोधात काम करणारी ही आपली भगिनी.
http://www.prajwalaindia.com/home.html
http://www.youtube.com/watch?v=jeOumyTMCI8
११) http://loksadhana.org/
27 Dec 2012 - 11:24 pm | जेनी...
थँक्स शुचि . मी सुद्धा या विचारात आहे . मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहे .
वरिल सर्व लिंक बद्दल हि धन्यवाद .
30 Dec 2012 - 8:01 pm | शुचि
माहीतीबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी यातील संस्था/संस्थेशी जरूर संपर्क साधेन.
30 Dec 2012 - 8:27 pm | शुचि
हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे प्रयोजन हेच की - मागे वळून पाहता अनेक खंत जाणवतात - जसे आयुष्यात कोणतेही "स्पेशलायझेशन" मास्टर (प्रभुत्व) न करु शकणे, कोणालाही भरीव मदत न करणे वगैरे. तरुणपणी यंव करू, त्यंव करू असे बरेच वाटत असते. पण काही ना काही कारणाने इतर भौतिक इच्छा "प्रिसिडन्स" घेतात, व्यापात-चाकोरीत आपण गुरफटले जातो आणि काही उदात्त नाही म्हणत पण किंचीत निस्वार्थी हेतू मागे पडत जातात.
सर्वांचे होते की नाही माहीत नाही (होतच असावे मी कोण वेगळी आहे?) पण मध्यवयात जाणीव होऊ लागते की आपल्या काही आकांक्षा अपुर्या राहील्यात, बरीच "लिमेटेशन्स" आले आहेत पण बरीच क्षीतीजे खुली देखील झाली आहेत. जोशी यांनी सुचविल्याप्रमाणे श्रमदान करण्याइतके बळ नाही पण किंचीत आर्थिक सुस्थिती नक्कीच आहे.
ज्या लोकांनी निस्वार्थ हेतूने लोकोपयोगी कार्यास जीवन वाहून घेतले आहे त्यांचे खूप कौतुक आधीही होते आणि आताही वाटते. या संथांना नक्की मदत करण्यात येईल.
2 Jan 2013 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी
मी जे सुचवले आहे त्यात जे काम करायचे आहे ते करायला काही विशेष बळ लागत नाही. जुन्या काळी विवाहप्रसंगी नातेवाइकांना वाटण्यासाठी घरीच फराळाची पाकिटे बनवली जायची त्याच प्रकारचे काम आहे...
30 Dec 2012 - 11:13 pm | जानु
491/6,Gharpure Ghat, Nashik-422002
Phone : + 91 - 253 - 2580309
Email : info@adharashram.org
नाशिक मधील एक नामवंत संस्था.
31 Dec 2012 - 12:02 am | आदूबाळ
व्यसनमुक्तीच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेली मुक्तांगण ही संस्था
31 Dec 2012 - 12:16 pm | मनीषा
तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम शुचीवैनी ..
वरचा फोटो पाहून एक कथा आठवली . प्रतिसाद अती अवांतर आणि अंमळ मोठा होणार हे माहीत असूनही सांगण्याचा मोह आवरता येत नाहीये.
दोघी मैत्रीणी .. कॉलेज हॉस्टेल मधे रूमपार्ट्नर्स.. दोघी कलाकार . परंतु त्या दोघींमधील साम्य येथेच संपते. व्य्क्तीमत्व खूप वेगळी असूनही दोघी घट्ट मैत्रीणी. शिक्षणानंतर दोघींच्या वाटा वेगळ्या होतात. एक संसारात राहून जमेल तेव्हढी समाज सेवा करत राहते. दूसरी पतिबरोबर परदेशी जाते. आणि एक कलाकार म्हणून ख्याती मिळवते. भारतामधील कलाक्षेत्रात देखील ख्यातनाम होऊन वावरत असते. एकदा दोघीच्या एका भेटीत रेल्वे स्थानकावर त्या एक दृष्य बघतात. एका मृत मातेच्या भोवती तीची अनाथ मुले केविलवाणेपणाने बसलेली आहेत. कलाकार असलेली ते दृश्य विसरत नाही. त्याचं ती एक चित्र काढ्ते. त्या चित्राला कलाक्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळतो. तिच्या संवेदनाशीलतेचे सर्वजण कौतुक करत असतात. दिल्लीमधे एका कला प्रदर्शनात ते चित्रं ठेवलेले असते. कलाकार असलेली आपल्या मैत्रीणीला प्रदर्शनाला येण्याचे आवर्जुन निमंत्रण देते. प्रदर्शनाच्या ठिकाणी दोघी मैत्रीणी परत भेटतात. दूसर्या मैत्रीणीबरोबर तीन लहान मुले असतात. कलाकार असलेली मोठ्या अभिमानाने पुरस्कारप्राप्त चित्रं मैत्रीणीला दाखवते. दोघीजणी ते बघत असतात. आणि बघत असताना त्या कलाकार मैत्रीणीचे लक्ष त्या तीन लहान मुलांकडे जाते. आणि बघता बघता तिचा अभिमान नाहीसा होतो. डोळ्यात पाणी येते. प्रदर्शनाच्या बाहेर आल्यावर ती म्हणते, आज तु मला हरवलस. त्या मुलांच्या दु:खाला मी कलाकृतीचं रूप दिलं , त्याचं प्रदर्शन केलं , पुरस्कार मिळवला, आणि आता ते विकलं जाईल तेव्हा पैसे सुद्धा मिळतील. पण तु मात्रं त्यांच्या दु:खाच रुपांतर आनंदात केलस. तूच खरी श्रेष्ठ कलाकार आहेस.
3 Jan 2013 - 7:36 pm | अनन्न्या
+ निशब्द!!
3 Jan 2013 - 11:21 pm | शुचि
गोष्ट फार आवडली.
पण एक आहे - सर्व काही स्वतःच करता येत नाही. इतरांना मदतीस प्रवृत्त करणे ही देखील समाजसेवाच आहे जी की त्या चित्रकार मैत्रिणीने साधली.
31 Dec 2012 - 3:48 pm | गवि
उत्तम धागा आणि उपयोगी प्रतिसाद / माहिती.
मूळ धाग्यातली दानत आणि नीयत वाखाणण्याजोगी आणि दुर्मिळ आहे. फक्त स्वतःला गिल्टी / स्वार्थी समजून कुरुप हाव, वखवख असे शब्द चिकटवून घेऊ नयेत.
१. आपण चांगले (समृद्धीत, ती नसल्यास मिळवून) त्या त्या वेळी समाधान मिळवण्यासाठी भौतिक सुखांसह जगलो,
२. आता इतरांनाही समृद्धीने जगता यावे यासाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली आहे.
दोन्ही गोष्टी आपापल्या जागी रास्त आणि चांगल्याच आहेत.
एकूण सर्वांनी गरिबीकडे / दुर्दैवी लेयरकडे / भुकेकडे पाहताना स्वतःचे ताडन, अपराधीपणा सोडण्याची गरज आहे, तरच खरी आनंददायक निरोगी मदत आपण करु शकू..
2 Jan 2013 - 11:16 pm | ५० फक्त
नेहमीप्रमाणे एक शंका - परोपकार हाच सर्व दुखाचं कारण नाही का ?
3 Jan 2013 - 7:27 am | नगरीनिरंजन
आज जगात इतकी सुबत्ता आहे की सगळी माणसं समाधानाने जगू शकतात पण तरीही जगात भयंकर दैन्य आहे. का?
कोणत्या गरजा पूर्ण झाल्यावर माणसाने काम करणे थांबवले पाहिजे म्हणजे दुसर्याला संधी मिळेल? लोकांना फुकट खाऊ घालणे म्हणजे खरा दानधर्म आहे की त्यांना कमवण्याची संधी देणं हा आहे? किती पिढ्यांसाठी पैसा मिळवून ठेवणं चांगलं आहे?
सुबत्ता आल्यावरही माणसं पैसे मिळवण्यासाठी काम का करत राहतात? ते अतिरिक्त पैसे मिळवून त्यातून थोडाफार दानधर्म केल्याने जगातले दैन्य संपणार आहे काय?
ज्या अर्थशास्त्रावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो त्यात ठसवलेली परपेच्युअल टंचाईची, गरिबीची भीती झुगारून देणे आपल्याला शक्य आहे काय? फक्त दहाहजार लोकांकडे जगातल्या २५% लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती आहे. ते आपण बदलू शकतो का?
मग निवडक लोकांना काही दिवस खाऊ घालून आपण काय साध्य करणार आहोत?
क्षमस्व, पण अनेक गोष्टी विकत घेऊन झाल्यावर तुम्ही आता थोडासा दानधर्म करून 'आपण काहीतरी केलं याचं समाधान' अशी आणखी एक वस्तू विकत घेऊ पाहत आहात असेच मी म्हणेन.
3 Jan 2013 - 8:05 am | शुचि
काही लोक भौतिकदृष्ट्या कुपोषित असतात तर काही स्पिरिच्युअली. दाता कोण आणि भिकारी कोण हे एक परमेश्वरच जाणतो.
3 Jan 2013 - 8:37 am | ५० फक्त
एग झॅक्टली, हेच म्हणायचे होते, अगदी स्पष्टच सांगायचं म्हणलं तरी दिखावा आहे,आपल्या सुबत्तेचा आणि करत असलेल्या तथाकथित दानाचा.
क्षमस्व, पण अनेक गोष्टी विकत घेऊन झाल्यावर तुम्ही आता थोडासा दानधर्म करून 'आपण काहीतरी केलं याचं समाधान' अशी आणखी एक वस्तू विकत घेऊ पाहत आहात असेच मी म्हणेन. + १०००, फक्त तेवढं क्षमस्व खटक्लं... जर या काहीतरी केल्याच्या / करावयाच्या / करावयाच्या इच्छेची आणि त्यातुन मिळणा-या समाधानाची जाहीर जाहिरात आहे तर स्पष्ट बोलणा-यांनी का क्षमस्व असावे, स्त्रीआयडीदाक्षिण्य म्हणुन काय ?
3 Jan 2013 - 10:59 am | स्पा
अनुमोदन
3 Jan 2013 - 11:26 am | गवि
ननि आणि ५०राव.
तुम्हा दोघांच्याही म्हणण्यात "एक सत्य" म्हणून चुकीचं काहीच नाही. पण एका स्केप्टिक की काय म्हणतात तशा सुरात हे म्हटल्यासारखं का वाटतंय. मी पुन्हा एकदा म्हणू इच्छितो की "गिल्ट", "अपराधीपणा" हा सर्वात दुरित भाग आहे. एरवी आपण नवकोट नारायणापेक्षा जास्त श्रीमंत झालो काय किंवा कोंकणातल्या घरी परसात घरच्यापुरते नाचणी अन भात उगवून खाल्ले काय.. या प्रोसेसमधे आनंद, समाधान मिळालं का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. करुन करुन भागलो असा अॅप्रोच नकोच.
अमुक संचय झाला की इतरांना संधी देणे वगैरे हे खूप विस्कळीत स्वरुपाचं आहे.
आजही एखाद्या व्यक्तीला आपण आपलं लाईफ समृद्धीत जगलो, ऐष केली याबद्दल बोच का लागावी? जर रुढ मार्गाने ऐश्वर्य मिळवलं असेल तर "उपरती" स्वरुपात किंवा प्रायश्चित्त स्वरुपात काही मदत करण्याचा भाव मनात का यावा?
इतरांना मदत ही देखील आपण निखळ आनंदासाठी करतो. त्यात काही गैर नाही. आपण जे काही करतो ते स्वतःच्या समाधानासाठीच. इतर कोणाच्या नव्हे. रुढ अलिखित नियम असा आहे की दान गुप्त असावं. पण या नियमात असं काय मोठेपण आहे? काहीजणांना हे देण्याचं समाधानही चारचौघांशी शेअर करावंसं वाटलं तर त्यात कोतेपण नाही. तशा विचारांनी तर मग मिपावर प्रवासवर्णनाचे फोटो म्हणजे आपल्या पर्यटनप्रेमाची जाहिरात, रेसिपी टाकणं म्हणजे सुगरणपणची जगजाहीर जाहिरात.. परदेशातला अनुभव शेअर केला की एनारायपणाची जाहिरात.. कलादालनात फोटोसोबत कॅमेरा डेटा टाकला की कॅमेर्याची जाहिरात.. असं म्हणता म्हणता काही एक्स्प्रेस करताच येणार नाही..
त्यामुळे आत्तापर्यंत केलं ते आत्ममग्न होतं आणि यापुढे इतरांसाठी काहीतरी दानधर्म करायचा आहे ही थॉट प्रोसेस चुकीची आहेच. पण त्यासोबत आत्तापर्यंत जगलेल्याबद्दल निगेटिव्ह भावना नसावी. तेही सुख आणि हेही सुख अशा भावनेने कोणाला मदत केली तर त्या मदतीचा आनंद पूर्ण उपभोगता येतो.. तेव्हा धागाकर्तीची यापूर्वेच्या जीवनाविषयीची विचारधारा योग्य प्रकारची नसली तरी यापुढील इच्छित कृती उत्तमच आहे.
3 Jan 2013 - 6:30 pm | दादा कोंडके
ही बोच प्रगत राष्ट्रात रहाणार्यांना शुची म्हणतात त्याप्रमाणे जगाच्या कुठल्याश्या कोपर्यातलं दारीद्र्य-दैन्य बघून एकदम अॅटॅक आल्यासारखी लागू शकते याच्याशी सहमत. तिथं रोज पावला-पावला वर दैन्य दिसत नाही. पण (जवळचं उदाहरण म्हणून) भारतासारख्या देशात रहाणारी श्रीमंत लोकं मुर्दाड असतात किंबहुना ती तशी असल्याशिवाय ते श्रीमंत होउच शकत नाहीत असं वाटत नाही का? मी तर ते मान्य करतो बुवा.
- वर्षानुवर्षे चौका-चौकातल्या सिग्नलवरच्या भिकार्यांकडे दुर्लक्ष करतो
- सिग्नलवर थांबताना एखादा भिकारी/छक्का येणार असं दिसल्यास बाईक शक्यतो दूर उभी करतो (लोकं गाडीच्या काचा वर करतात)
- फुटपाथवर रहाणार्या भिकार्यांकडे बघून न-बघितल्यासारखं करून पुढे जातो
- रेल्वेत/बसमधल्या भिकार्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो. अगदीच कुणी अंगचटीला आलं की २-४ रुपये देतो.
- ओंगळवाण्या भिकार्यांकडे शक्यतो बघून त्रास करून घेण्यापेक्षा बघतच नाही, (एका गर्दीच्या रस्त्यावर आखूड हात आणि पायांची थोटं दाखवत पडलेला घाणेरडा भिकारी लहान मुलांना दिसू नये म्हणून आई-वडीलांनी मुलाचे हातानी डोळे झाकलेले बघितलेत)
- पुर्वी लिहिलेलाच अनुभव लिहितो. २००४ साली एक वेडसर भिकारी बाई सेनापती बापट रस्त्याच्या (ज्यावरून रोज लाखो लोकं जायची) कडेला उकिरड्यावर बसलेली दिसायची. दोन-तीन महिन्यानंतर बघितलं तर ती चक्क गरोदर होती. मग १-२ दिवस ती काहीच हलचाल न करता पडलेली दिसली आणि दुसर्या दिवशी ती तशीच दिसली तेंव्हा तीसर्या दिवशी तिला (बहुतेक) म्युनिसीपाल्टीनं उचलून नेलं.
मी दोन्-तीनदा कुठल्याश्या संस्थेत फोन करून कळवलं होतं पण काहीच झाल नाही. आणि जास्त काही केलं नसल्याची टोचणी नाही.
ही काहीच उदाहरणं झाली. अश्या असंख्य गोष्टीकडे आपण रोज दुर्लक्ष करत असतो.
बरं याशिवाय मी असंही मान्य करतो की जे काही उत्पन्न मिळवतोय ते गैरमार्गानी मिळवतच नाही असं नाही. त्यातही स्पेसिफिक उदाहरण द्यायचं झाल्यास, बँकेतल्या बचत खात्याचे पै न पै जमा झालेले व्याज "इन्कम फ्रॉम ऑदर सोअर्सेस" मध्ये लिहित नाही.
याची एक दिवस उपरती होउन मी पण मग पाच-पन्नास रुपये टाकून मानसिक शांती विकत घेइन. :)
ते जाहीरही करेन. पण मग कारण सांगताना, 'ही आत्मप्रौढी नसून हे बघून इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी' म्हणून सांगेन. :)
3 Jan 2013 - 11:05 am | इस्पिक राजा
जन्मभर फक्त मी, माझा, माझे या विश्वात गुरफटण्यापेक्षा त्यातुन बाहेर पडुन यथाशक्ती समाजाला मदत करण्याची इच्छा असेल तर त्यात अयोग्य काहीच नाही. एक माणूस समाजातले दैन्य, गरीबी, दु:ख यांचे निर्मुलन आणि निर्दालन नाही करु शकत. पण समाजाचे असे अनेक घटक एकत्र आले तर इतरांना माणूस म्हणुन जगण्यासाठी ज्या किमान गरजा असतात त्या मिळवुन देउ शकतात.
आपण संपुर्ण समाजाच्या जखमांवर कदाचित फुंकर घालु नाही शकणार पण एका माणसाच्या आयुष्यात थोडाफार फरक करु शकलो तर त्यात वाईट काहीच नाही. स्वतःसाठी किती साठवुन ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण स्वतःसाठी थोडा साठवल्यानंतर जर एखाद्याला समाजाला मदत करायची इच्छा झाली तर ती भावना स्वागतार्ह आहे.
तुमची एकुण अपेक्षा स्वार्थाचा विचार न करता परमार्थ साधला तरच फक्त उदात्त. माझ्यामते स्वार्थाबरोबर परमार्थ देखील साधण्याचा विचार मनात आला तर तेदेखील उदात्तच आहे. कमरेचे सोडुन दुसर्याची लाज झाकण्याचा प्रयत्न करणे हे कदाचित साधूत्वाचे लक्षण असु शकेल. आपल्यातील प्रत्येक जण साधू नाही होउ शकत. त्यामुळे आपला वॉर्डरोब भरल्यावर समोरच्याला शाला पांघरण्याचा विचार मनात आला तर ते ही नसे थोडके. आपला वॉर्डरोब किती मोठा हवा हे ज्याचे त्याने ठरवावे.
3 Jan 2013 - 11:13 am | प्रेक्शक
शब्दशः असेच म्हनेन.कधिचि मनात असलेली खन्त बोललात.
3 Jan 2013 - 10:44 am | प्रभाकर पेठकर
डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे ह्यांच्या संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. जरूर मदत करावी.
3 Jan 2013 - 2:44 pm | शुचि
५० फक्त यांना त्यांचे बायस असण्याचा पूर्ण हक्क आहे जितका की मला अशा अॅटॅकनंतर (हल्ला) स्पष्टीकरण न देता,स्वतःच्या कवचात जाण्याचा. पण संस्थळांवर एकदा हल्ले सुरु झाले की थांबत नाहीत हा अनुभव असल्याने स्पष्टीकरण देते -
सुबत्ता कोणालाच "पुरेशी" वाटत नाही. कारण ती एक मानसिक गरज आहे. अनक्वान्टिफायेबल. मलादेखील वाटत नाही की "हुश्श आता आर्थिक दृष्ट्या आपण पुरेसे सेक्युअर झालो" असे मला कधी वाटेल म्हणून.
तेव्हा "सुबत्तेचा दिखावा" हा मुद्दा अलाहिदा.
___________
तथाकथित दान अजून तरी केलेले नाही. तेव्हा दिखावा तर नाहीच पण "पोकळ बाता" या रुपात अजून तरी तो निश्चाय आहे.
_______________________
बर्याच माझ्याही गरजा आहेत ज्या की डीप-रूटेड (सखोल) आणि मानसिक आहेत. पण ज्या मी इथे शेअर करु शकत नाही. तेव्हा स्वतःला मदत किंवा आऊटलेट म्हणून मी हा धागा काढला आहे.
______________----
स्त्री आयडी हा मुद्दा कळला नाही. ननिंनी जर त्यांच्या मुशीप्रमाणे/स्वभावाप्रमाणे सौम्य भाषेत लिहीले तर ५० फक्त यांना खटकण्याचे काय कारण आहे?
इन एनी केस मला कळलेले - (१) सुबत्ता आणि दान हे दिखावा करण्याजोगी काहीतरी मुद्दे आहेत (२) स्त्री आय डी शी जर सौम्य विरोधी भाषेत बोलाल तर तुमच्यावर सौम्यतेचा आरोप करण्यात येईल.
3 Jan 2013 - 7:04 pm | प्रकाश घाटपांडे
करुन करुन भागले / थकले आन देवपूजेला लागले. अशी एक म्हण आपल्याकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता ही त्यावरुनच आली आहे. त्यात काही गैर नाही उलट चांगलच आहे. समाजाच देण आपण काही लागतो ही भावना सुदृढ समाजासाठी आवश्यकच आहे. ग.प्र प्रधानांनी त्यांचा वाडा हा साधना ट्रस्टला दान केला तेव्हा वाचकांच्या पत्रात आलेले एक पत्र आठवते. त्यात लिहिले होते- नाणे हवेत उडवावे. ते फरशीवर पडेल. त्याला खणकन आवाज येईल. लोकांचे लक्ष तिकडे जाईल. मग ते उचलावे व दान करावे.
गवि म्हणतात तस काहीजणांना हे देण्याचं समाधानही चारचौघांशी शेअर करावंसं वाटलं तर त्यात कोतेपण नाही. दान हे या हाताच त्या हाताला कळू नये अशी प्रतिष्ठा त्याला दिली असल्याने असे शेअर करणे म्हणजे स्वतःला मोठेपण देण्यासारखे वाटते म्हणुन काही क्लृप्त्या वापरवाव्या लागतात.
शुचिने टाकलेला फोटो पाहिला कि असे वाटते कि आपण दोन वेळचे व्यवस्थित व्यवस्थित जेउ शकतो पण काही माणसे अशीही आहेत की ज्यांचा जीव खाण्यापिण्यावाचून तडफडतो आहे. ही जाणीव संवेदनशील मनाला अपराधिपणाची जाणीव देते.
3 Jan 2013 - 8:59 pm | उपास
लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचले.
स्वतः आधी कुटुंबाचा (आई-वडिल/ नवरा-बायको/ मुले/ भावंडे) तसा स्वतः आणि कुटुंबाच्या आधी समाजाचा विचार करणारे फार थोडे असतात (संन्यस्थ/ व्रतस्थ/ झोकून दिलेले सामाजिक कार्यकर्ते वगैरे).
स्वत:चा आणि कुटुंबाचा विचार झाल्यावर समाजाचा विचार मनात येणं हे सामान्यपण आहेच, आपण बहुतांश लोक असेच आहोत, मात्र ह्याच उदात्तीकरण करण्यात अर्थ वाटत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की काहीच करायचं नाही. बर्याच एनजीओ संस्था आहेत, मी स्वतः काही वर्षे सामाजिक संस्थांना मदत करणारा ग्रुप चालवतोय पण आमटे, बंग, अवचट ह्यांच्या कार्याला आर्थिक हातभार लावणं हे त्यातल्या त्यात जास्त विश्वसनीय आहे असं अनुभवातून सांगू शकतो.
शुचि ताई, स्पष्टवक्तेपणा बद्दल माफी असावी, पण तो फोटॉ पहाता क्षणी अंगावर आला. त्या असहाय्य मुलाचा फोटॉ काढून भुकेचा बाजार मांडल्याच वाटून गेलं, असं काहीसं मला मी 'स्लम डॉग मिलिनेयर' बघताना वाटलं होतं.. तो फोटॉ काढून टाकता आला तर भुकेलेल्यांची जाहिरात तरी आपल्याकडून होणार नाही (वर एका प्रतिसादात सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे) असं मनापासून वाटतं, असो!
3 Jan 2013 - 11:17 pm | शुचि
बाजार वगैरे काही नाही कारण मला या फोटोतून काही मिळणार नाहीये.
बाकी तो फोटो फार भयानक आहे ही वास्तविकता आहे. अगदी काळजात चटका बसविणारा आहे. सहमत आहे.
4 Jan 2013 - 12:10 am | उपास
वास्तविकता ह्यही पेक्षा भयानक आहे, महाराष्ट्रातल्या कुपोषणाबद्दल आपण सगळेच जाणतो. माध्यम कसे वापरायचे हा ज्याचा त्याच प्रश्न आहे. बाजर हा शब्द मी 'प्रदर्शन' ह्या अर्थाने मांडला होता, गैरसमज नसावा.
ह्या चर्चेवरुन 'खरेखुरे आयडॉल' आणि 'खरी खरी टीम इंडिया' ही दोन पुस्तके वाचायला सुचवावीशी वाटतात, त्यांच्याविषयी मी इथे लिहिले आहे मागे - http://upasanip.blogspot.com/2008/03/blog-post.html
3 Jan 2013 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
गरजवंताला मदत केली आणि त्या मदतीने गरजवंताला कायम गरजवंत राहणेच जास्त फायद्याची गोष्ट आहे असे वाटले नाही, तर मदत करणार्याच्या हातून चांगले काम झाले असे म्हणायला काही हरकत नाही.
मग ती मदत कोणी, कधी, कशी, किती व कोणत्या कारणाने केली हे सर्व प्रश्न गौण आहेत. मदत करणारा (किवा न करणाराही) या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या नितीमत्ते (value system) प्रमाणे आणि सद्य परिस्थिती (prevailing situation) प्रमाणे ठरवत असतो... आणि इतर त्यांच्या नितीमत्तेप्रमाणे आणि सद्य परिस्थितीप्रमाणे.
ती उत्तरे एकमेकांना पटोत न पटोत, काही फरक पडत नाही... कारण खरंच मदत करायची इछा असली तर करणारा ती करेलच... आणि इतरही त्यावर जी टिप्पणी करायची आहे ती करणारच.
"मदत करून काय मिळवले / मिळणार?" हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण काहीच न मिळण्याची इछेने कोणिही, कधिही काहिही करीत नाही. अगदी निष्काम कर्मयोगाच्या मागेसुद्धा मुक्ती मिळवण्याची इछा असतेच नाही का?
तर जेव्हा जमेल, जशी जमेल, ज्या कारणाकरीता करायची असेल त्या कारणाकरीता गरजवंताला मदत करा, फक्त गरजवंत तुमच्या मदतीने पांगळा बनणार नाही इतकी काळजी घ्या म्हणजे झाले.
3 Jan 2013 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
गरजवंताला मदत केली आणि त्या मदतीने गरजवंताला कायम गरजवंत राहणेच जास्त फायद्याची गोष्ट आहे असे वाटले नाही, तर मदत करणार्याच्या हातून चांगले काम झाले असे म्हणायला काही हरकत नाही.
मग ती मदत कोणी, कधी, कशी, किती व कोणत्या कारणाने केली हे सर्व प्रश्न गौण आहेत. मदत करणारा (किवा न करणाराही) या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या नितीमत्ते (value system) प्रमाणे आणि सद्य परिस्थिती (prevailing situation) प्रमाणे ठरवत असतो... आणि इतर त्यांच्या नितीमत्तेप्रमाणे आणि सद्य परिस्थितीप्रमाणे.
ती उत्तरे एकमेकांना पटोत न पटोत, काही फरक पडत नाही... कारण खरंच मदत करायची इछा असली तर करणारा ती करेलच... आणि इतरही त्यावर जी टिप्पणी करायची आहे ती करणारच.
"मदत करून काय मिळवले / मिळणार?" हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण काहीच न मिळण्याची इछेने कोणिही, कधिही काहिही करीत नाही. अगदी निष्काम कर्मयोगाच्या मागेसुद्धा मुक्ती मिळवण्याची इछा असतेच नाही का?
तर जेव्हा जमेल, जशी जमेल, ज्या कारणाकरीता करायची असेल त्या कारणाकरीता गरजवंताला मदत करा, फक्त गरजवंत तुमच्या मदतीने पांगळा बनणार नाही इतकी काळजी घ्या म्हणजे झाले.
आता मला पडलेला एक प्रश्नः आपल्या या धाग्यातल्या चित्राचे प्रयोजन काय? धागा तुमचे संवेदनशील मन व्यक्त करतो आहे, तर चित्र त्याच्यावरचा पाश्चात्य पत्रकारितेचा प्रभाव.
3 Jan 2013 - 11:19 pm | शुचि
चित्राचे १ प्रयोजन हे की अधिकाधिक लोक मदतीस प्रवृत्त करणे. दुसरे भयानक वास्तव मांडणे.
4 Jan 2013 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे चित्र या घाग्याशी सुसंगत नाही हे आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादांवरून आपल्या ध्यानात आले असेलच.
आजची भूक शमवण्याबरोबरच उद्या स्वतःच्या जेवणाची स्वतः सोय करण्याची पात्रता यावी यासाठी मदत करणार्या व्यक्ती आणि संस्थाच खरे सामाजिक कार्य करतात. त्याविरुद्ध, ही दूरदृष्टी न ठेवता केवळ भडक चित्रे दाखवून मदत गोळा करणार्या किंवा पत्रकारितेचे तुरे कमावणार्यांची मांदियाळी पाश्च्यात्य जगतात काही दशके यशस्वीपणे जम बसवून आहे. हे चित्र त्यांचे "सिग्नेचर मार्केटींग ग्राफीक" म्हणून शोभते. ते लेख व प्रतिसादांमध्ये तुम्ही व्यक्त केलेल्या उद्देशाच्या अगदी विरुद्ध भावना निर्माण करते आहे.
तुमचे शब्द व ते चित्र यातील अधिक काय जवळचे वाटते हे ठरवलेत तर काय करायला पाहिजे आणि आपणे हे का करतो आहे हे जास्त स्पष्टपणे दिसेल.
3 Jan 2013 - 10:58 pm | पैसा
चर्चा वाचते आहे. मी 'शुचि' ला जितकं ओळखते त्यावरून हा धागा दिखाव्यासाठी काढलेला नाही हे नक्कीच. आपल्या मनात गोंधळ असला की आपण जवळच्या माणसांना विचारतो तसेच शुचिने विचारले आहे. शक्य असेल तर तिला अशी एखादी संस्था शोधायला मदत करा. ननि, दादा, ५० फक्त यांनी लिहिलंय तेही आपापल्या जागी बरोबर आहे. पण मी किती पैसेवाली आहे हे दाखवण्यासाठी हा धागा नक्कीच काढलेला नाही. मी अशी मदत करायला जाईन का माहित नाही, पण शुचि, विचार चांगलाच आहे. ज्यांना मदत करशील ती नीट पारखून कर. आणि मदत योग्य हातात पडेल याची काळजी घे.
3 Jan 2013 - 11:14 pm | शुचि
धन्यवाद पैसा. खरच मनापासून धन्यवाद.
5 Jan 2013 - 1:40 am | प्रभाकर पेठकर
पैसा ह्यांच्याशी १०० टक्के सहमत.
4 Jan 2013 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
उजव्या हाताने केलेले दान हे डाव्या हाताला देखील कळू द्यायचे नसते म्हणतात.
असो..
बाकी मिपाप्रतिष्ठान सुद्धा सुरु झाले होते. त्याला देणगी दिलीत तर उत्तमच.
5 Jan 2013 - 12:11 am | इन्दुसुता
शुचि,
तुमच्या इतर लेखनाप्रमाणेच हे देखील अत्यंत प्रामाणिक आणि उत्कट आहे हे ध्यानात आलेच.
त्यावरील प्रतिसादही अपेक्षेप्रमाणेच... ५०राव यांचा तर विचारयलाच नको. परा यांचाही. ननिंशी पूर्ण असहमत, गविंशी अंशतः सहमत. प्रकाश घाटपांडेंचा प्रतिसाद प्रामाणिक वाटला ( त्यात स्वत:चा अजेन्डा किंवा स्कोअर सेटलींग दिसले नाही).
माझ्यातर्फे, सर्व प्रथम ; आयुष्यातल्या ह्या टप्प्यावर आल्याबद्दल अभिनंदन. दुसरे म्हणजे, सबूरीचा सल्ला देते. You are embarking upon a quest of a lifetime. काही जणांनी येथे दिलेले प्रतिसाद वाचून कवचात जाण्याचा विचार सुद्धा करू नका.
तुमच्या लेखाचा विषय माझ्या अभ्यासाचा विषय आहे असे म्ह्टले तरी चालेल. काही जणांनी येथे काहीशी उपयुक्त माहिती दिली आहेच, a very good place to start.
आणखी माहिती साठी हवे तर, व्यनीतून संपर्क साधा.
5 Jan 2013 - 1:18 am | शुचि
इन्दुसुता आपले आभार. खरं आहे सबुरीचा सल्ला मोलाचा आहेच.