|| ॐ ||
पावसाची रिपरिप अजुनही थोडी चालु होती . गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायच नाव घेत नव्हता . सारे ओढे नाले अगदी भरभरुन नर्मदामाईला मिठी मारत होते . नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकु येत होता . इतकया दुरवरही ...अगदी स्पष्ट ...त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणु रातकिड्याना जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती . सार्यानाच जणु लय सापडली होती . हवे मध्ये प्रचंड गारवा भरुन राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती . मातीचा, झाडांचा, पानांचा, गवतांचा,.... कित्येक वास त्या हवेत भरुन राहिले होते ... घोंगावणार्या वार्याची झुळुक जेव्हा हळुच दरवाज्यातुन आत येत होती तेव्हा अंगावर उमटणार्या प्रत्येक रोमाचापेक्षा , त्या बोचर्या थंडीच्या जाणीवेपेक्षा , निसर्गाने बाहेर मांडलेल्या खेळाची जाणीव मनाचा जास्त ठाव घेत होती .तसा सुर्यास्त तर बरेच दिवस दिसला नव्हताच पण किमान दोन - तीन प्रहर नक्कीच उलटुन गेले असावेत . क्षितीजावर चांदोबा हळुच ढगांमागुन डोकावायचा प्रयत्न करत होता .
ते एक शंकराचं जुनं पुराणं मंदीर होतं . अप्रसिध्दच असावं बहुधा कारण एक शिवलिंग , त्याचावरची २ बिल्वपत्र अन कोपर्यातल्या दगडी समई सदृश दिव्यात शांतपणे तेवत असलेल्या ज्योती व्यतिरिक्त दुसरी कोणतीच मानवी अस्तित्वाची खुण नव्हती .
आणि कदाचित म्हणुनच "त्याने" ही जागा निवडली होती .
तसा मागच्या गावातल्या आश्रमात त्याला फार आग्रह झाला होता - " महाराज इथेच थांबा , पावसाळा सुरु झालाय , आता चातुर्मासही लागेल , स्वामीजी इथेच रहा आता चार महिने . तुमच्या निमित्ताने आम्हाला काही सत्संग होईल ...तेवढंच पुण्य गाठीशी पडेल " पण त्याच्या साठी निर्णय फारच सोप्पा होता -" खुप खुप आभारी आहे मी तुमचा ...पण ....जर लोकांच्याच ह्या भाऊगर्दीत रहायचे असते तर येवढं सगळं सोडुन इथे माईच्या पायाशी का आलो असतो ? इथे राहण्यापेक्षा परत जाईन ना ... तिकडे घरी ... तुमच्या ह्या आश्रमापेक्षा कित्येक पट जास्त उपभोगात लोळत पडेन ना "
त्याच्या ह्या वाक्याने सगळ्यांनाच हतबुध्द केले शेवटी त्याने सर्वांना त्यांचा ओळखीचे ते गुढ स्मितहास्य दिले अन बाहेर पडला ...
आता धुनी शांत पेटली होती , निखार्यांची उब चांगलीच जाणवत होती . शेणाच्या गोवर्यांच्या धुराने ते मंदीर भरुन गेले होते ' आता धुनीत शेणाच्या गोवया घालतात का ? किंवा घातल्या तर त्याला धुनी म्हणतात का ?' ह्या बालीश प्रश्णाने त्याच्या चेहर्यावर तेच ते निष्पाप स्मितहास्य मनातल्या मनात उमटले . ' बर बाबा , धुनी नाही तर नाहे स, शेकोटी म्हणु ? चालेल ? ' आता मात्र तो हळुच खुदकन हसला .आणि त्याचे ते हसणे हळुच नर्मदेच्या खळखळाटात अन रातकिड्यांच्या सुरात विरुन गेले .
तो तसा जास्त मोठ्ठा नसावा ...३४- ३५ कदाचित ... काळे भोर केस अगदी मानेवर रुळणारे कानांवरुन रुळत रुळत न कळत दाढीत विरुन गेलेले ... कपाळावर अन इतर अंगावरही ठ्सठशीत भस्म फासलेलं ... कुण्या शेतकर्यानं दिलेली बंडी अन त्यातुन जाणवणारं कमावलेलं शरीर , दंडावर करकचुन बसलेल्या जपमाळा , काय तर म्हणे " बुवाबाजीला उपयोगी पडतं " म्हणे असं सगळ्यांना सांगायच ...मग लोकही हसायचे ' भोलाबाबा ' भोलामहारज' म्हणायचे तोमात्र नेहमीच स्मितहास्य देवुन सटकायचा.
आता मात्र धुनी अगदी संथ झाली . त्याचा आधीच सतेज असलेला चेहरा त्या प्रकाशात उजळुन निघाला . तो अगदी ताठ पण सुखासनात बसलेला . दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवुन धरलेले . धुनीच्या उबी मुळे त्याने अंगावरची ती जुनीपुराणी गोधडी बाजुला सारली , त्याचा शेजारी निखारे हलवण्याचा चिमटा , कोण्या एकाने दिलेली अन आजवर वापरायची इछा न झालेली चिलीम , काही पुस्तकं सांभाळणारी त्याची झोळी वगळता काहीच नव्हते .
पण आज त्याच्या मनात काहीतरी खळबळ चालु होती जणु त्याला काही बोलायचे होते... काही तरी लिहुन ठेवायचं होतें , काहीतरी जे उरल्या सुरल्या आयुष्यभर शिदोरी म्हणुन पुरेल ... काही तरी असं की ज्यामुळे ह्या स्विकारलेल्या आयुष्या पुढे कधीच " का ?" हा गंभीर प्रश्न उभा राहणार नाही ... त्याने झोळीतुन कागद पेन काढले , पण सुरवात काय करावी हे बराच वेळ त्याला उमजेचना ....
तेव्हा मग ती पावसाची रिपरीप, नदीचा खळखळाट ,रातकिड्यांचे संगीत, पिंपळपानांची सळसळ , हवेतला गारवा , देवळातले ते शिवलिंग , शांत तेवणारी धुनी , देऊळ भरुन राहिलेला धुर , सारेच जणु दोन क्षण स्तब्ध झाले ,
त्याच्या चेहर्यावर तेच नेहमीचे स्मितहास्य उमटले अन मग त्याने त्याच्या खोल धीर गंभीर आवाजात त्या शांततेला भेदुन जाणार्या ॐ काराचा उच्चार केला अन वही वर लिहायला सुरुवात केली ....
|| ॐ ||
प्रतिक्रिया
21 Dec 2012 - 2:19 pm | चित्रगुप्त
उत्तम, उत्कंठावर्धक सुरुवात. वातावरणनिर्मिती आवडली.
(थोडे र्हस्व-दीर्घाचे बघा, म्हणजे परिपूर्णता येइल. तसेच आधीच्या वर्णनाच्या संदर्भात 'पेन' हा शब्द खड्यासारखा लागला.'लेखणी' जास्त चपखल वाटेल).
शिवाय (त्याच्या साठी : त्याच्यासाठी), (वही वर :वहीवर), (काळे भोर : काळेभोर)... वगैरे.
याप्रकारचे लेखन शुद्धलेखनाच्या दृष्टीने परिपूर्ण असले, तर पूर्ण आनंद देईल,असे वाटते.
21 Dec 2012 - 2:33 pm | किसन शिंदे
पहिला भाग मस्तच पण पुढे येणारी कथा जर नर्मदामाईच्या प्रदक्षिणेची असेल तर निराशा होईल. कंटाळा आला आहे सारखं सारखं तेच वाचून.
21 Dec 2012 - 3:05 pm | ५० फक्त
एक शंका, तुम्हीच लिहिताय की तुमच्याकडुन सुद्धा कुणी लिहुन घेतं आहे ?
21 Dec 2012 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार
वातावरणनिर्मिती आवडेश. हा भाग मात्र खूपच छोटा वाटला.
22 Dec 2012 - 1:17 pm | गणपा
वातावरणनिर्मिती उताम केली आहे
पुढे वाचायला आवडेल.
22 Dec 2012 - 4:23 pm | शैलेन्द्र
सहमत
23 Dec 2012 - 10:08 am | पैसा
छान लिहिताय.
17 May 2024 - 11:05 am | अहिरावण
पुढचा भाग येईल काय?
17 May 2024 - 5:45 pm | चौथा कोनाडा
व्वा ... सुंदर वातावरण निर्मिती... आवडलं लेखन !
येऊ द्या पुढचा भाग !
(आ.सू. : ७ जुन म्हणजे पाऊस सुरु होण्यापुर्वी येऊ द्या)
17 May 2024 - 10:21 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद.
तब्बल १२ वर्षांपुर्वी सुचलेली ही कथा. नर्मदाकाठावरील एका विरक्त योग्यापासुन सुरु झालेला प्रवास पुढे फ्लॅशबॅकमध्ये प्रापंचिक जीवनात फिरुन परत नर्मदेकिनारी विसावतो, असा काहीसा ढाचा होता मनात. ४ भागात लिहायचा विचार होता. पण राहुन गेले.
बघु कधी वेळ होइल तेव्हा लिहुन पुर्ण करतो.
प्रोत्साहनाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद :)