ड्रॅगनच्या देशात ०४ - बायजींग : चांगलींग थडगी, चीनची महाभित्तीका (बदालींग) , पेकींग ऑपेरा, बायजींग शहर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Dec 2012 - 7:47 pm

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

आजचा बायजींगमधला तिसरा दिवस. सकाळी साडेआठला सज्जड न्याहारी चोपून झाली. लॉबीत आलो आणि पेपर चाळू लागलो तेवढ्यात गाईड माझ्या नांवाचा पुकारा करत आली. चीनमध्ये काही अपवाद वगळता कमीत कमी गाईड मंडळी दिलेली वेळ पाळत होती. टूरमध्येही त्यांची वागणूक नम्र आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी होती. कडक भाषा अथवा उर्मटपण नावालाही दिसला नाही. उलट बुद्धाचा देश म्हणून भारताबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये जराशी जवळीक व आदरच दिसला. (आवांतरः गौतम बुद्धाला चीनमध्ये शाक्यमुनी असे संबोधतात. चीनमध्ये १०० पेक्षा जास्त ज्ञानी लोक होऊन गेले आणि त्यांनाही 'बुद्धा'च म्हणतात... पुण्यातल्या असंख्य मारुती-गणपतींप्रमाणे त्यांना मेडिसिन बुद्धा, लाफींग बुद्धा, एवढेच काय पण एक लेडी बुद्धा ही आहे.) असो.

आजचा दिवस मिग राजघराण्याची थडगी बघण्याने सुरू झाला. ही जागा बाय़जींग पासून साधारणपणे ७५ किमी वर आहे. साधारणपणे एक दीड तास प्रवास होता. ५०० वर्षांच्या कारकीर्दीत बरीच थडगी जमा झाली आहेत परंतू बघण्यासारखे असे फार नाही. एकच "चांगलींग थडगे" जरासे बरे आहे. हे थडगे बायजींगचा पहिला मिंग सम्राट योंगले (Yongle) व त्याची संमाज्ञी शू (Xu) यांचे आहे. प्रशस्त आवार, एक छोटेसे प्रदर्शन, स्वर्गाचा दरवाजा आणि न खोदलेले अजूनही जमिनीखालीच असलेले थडगे एवढेच.

(आवांतरः इंग्लिश 'X' चा उच्चार चिनी भाषेत 'श' असा होतो. उदा: Xu = शू; Xian = शिआन; ई.)

थडग्याकडे जाणारा ड्रॅगनमार्ग

सम्राट योंगले. त्याच्यासमोर चिनी लोकांनी त्याला वाहिलेल्या पैशाची रास आहे.

सम्राटाचा सोन्याचा राजमुकुट

सम्राटाने वापरलेली सोन्याची भांडी

हा स्वर्गाचा दरवाजा. याच्या पलीकडे सम्राटाचे थडगे आहे. या दरवाज्यातून जाताना आणि परत येताना पुरुषांनी डावा व महिलांनी उजवा पाय पहिला टाकून जायचे असते आणि परतताना त्याच्या उलट करायचे असते. शिवाय जाता येताना एक चिनी भाषेतला मंत्रही म्हणायचा असतो. नाहीतर तुमचा आत्मा कुठेतरी मध्येच अडकून पडेल अशी भीती गाइडने घातली होती ! ते ऐकून आमच्या ग्रुपमधील निम्म्या लोकांनी दरवाज्याच्या बाहेरून जाणे पसंत केले !! बघा, केवळ भारतीय व चिनीच अंधविश्वासू असतात असे नाही, वेळ आली की पुढारलेले म्हणणारी पाश्चात्त्य मंडळीही कच खाते !!!

थडग्याच्या प्रवेशद्वारा समोर धूपदाने व एका बांबूला 'wish lists' बांधलेल्या होत्या. एका विशिष्टप्रकारे विणलेला लाल धाग्याचा गोफ आणि त्याच्यामध्ये गुंफलेला एक प्लास्टीकचा तुकडा-- तुमचे नांव किंवा इच्छा लिहिण्यासाठी-- असे 'wish list' चे स्वरूप असते. ती बांबूला बांधून प्रार्थना केली की इच्छा पुरी होते असा समज आहे.


.

परत बायजींगला पोहोचेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. चिनी रेस्तरॉ चांगलीच लक्षात राहतील. प्रशस्त आवारे, प्रशस्त डायनिंग हॉल्स आणि तत्पर सेवा. फक्त इंग्रजीच्या नावाने ठणठणाट ! त्यामुळे आमचा गाईड ही आमची अत्यावश्यक लाईफलाईन होती. गाईडपण तत्परतेने वेटर मंडळींना आमच्या सर्व मागण्या समजावून देऊन मगच स्वतःच्या पोटोबाकडे लक्ष देत होते. शिवाय मध्ये मध्ये येऊन सगळे ठीकठाक आहे की नाही हे विचारून जात होते.

चिनी हॉटेलची (रेस्तराँची) टेबले गोल, साधारणपणे ८ ते १० लोक बसू शकतील अशी असतात. टेबलाच्या मध्यभागी एक गोल फिरकी असते. वेटर सर्व पदार्थ आणून त्या फिरकीवर ठेवतात. ती फिरकी फिरवून आपल्याला हवा तो पदार्थ समोर आणायचा आणि आपल्या छोट्याशा वाटग्यात वाढून घ्यायचा आणि चॉपस्टीक्सने खायचा असा शिरस्ता आहे. इटुकल्या वाटग्यातून चॉपस्टीक्सने खाणे म्हणजे उपासमारीला आमंत्रण देणे होय हे ओळखून अस्मादिकांनी पहिल्या दिवसापासूनच सुरुवातीसच मोठी प्लेट आणि काटेचमचे मागून घ्यायला सुरुवात केली. ही जगावेगळी मागणी वेटरमंडळींच्या पटकन लक्षात येत नसे, त्यामुळे गाईडकरवी त्याच्या जेवणास जाण्यापूर्वी ही सोय करून घेणे जरूरीचे असते. मोठ्या प्लेटचा अजून एक फायदा म्हणजे असंख्य उष्ट्या चॉपस्टीक्स फिरकीवरच्या डीशेशमध्ये बुडण्याअगोदर आपल्याला हवे ते हवे तेवढे आपल्या प्लेटमध्ये घेता येते !

रेस्तराँचे प्रवेशद्वार... पवित्र सिंहांसकट.

आणि सुशोभित प्रवेशमार्ग


.

फिरकीवाले टेबल

हॉटेलमधला चिनी देव...

आणि त्याच्या भोवतीची आरास

जेवणानंतर आमचा प्रवास जगप्रसिद्ध चीनच्या महाभित्तीकेच्या (The Great Wall of China) दिशेने सुरू झाला. पूर्व चीनला निसर्गाचे देणे भरभरून आहे. जागोजागी अनेक रानटी फुले उमलली होती.


.

उत्तरेच्या टोळ्यांकडून होण्यार्‍या सतत आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी चिनी राजे-रजवाडे-सम्राट हजारो वर्षे (इसवीसनाच्या दोन शतकापूर्वीपासून) छोट्यामोठ्या भिंती बांधत असत. नंतर मिग राजघराण्याने त्या सर्वांना जोडण्याची योजना काढून एक सलग भिंत केली. तरीसुद्धा अनेक भाग विस्कळीतपणे अस्ताव्यस्त पसरलेले आहेत. सगळ्या भिंतींची (भिंत + नद्या, डोंगर, इ. इतर नैसर्गिक अडथळे) लांबी २१,००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतू सलग आणि मानवनिर्मित भिंतीची लांबी ८,८५० किमी मोजली गेली आहे. प्राचीन काळातला हा एवढा अजस्त्र उपक्रम (project) स्तिमित करतो.

तासदीडतासांच्या बसच्या प्रवासानंतर बदालींगला पोहोचलो. येथे सर्वात उत्तम अवस्थेत राहिलेला आणि सर्वात जास्त प्रसिद्धी पावलेला भिंतीचा भाग आहे. शेवटचा प्रवास पायाने तासाभरात किंवा १० मिनिटात केबल कारने जाता येते. बदालींग येथील भिंतीवरून दोन्हीं बाजूना ८-१० किमी चलता येते. भिंत बरीच उंचसखल भा॑गांतून जाते त्यामुळे बरीच दमछाक होते. पण भिंत आणि आजूबाजूचा डोंगराळ भाग प्रेक्षणीय आहे. निसर्गाचे विराट रूप आणि माणसाची स्वरक्षणासाठी अगदी एका टोकाची प्रचंड कारवाई थक्क करते. असे समजले जाते की चीनच्या इतिहासावर त्याच्या भूगोलाचा प्रचंड प्रभाव आहे. हा एक फार मोठा विषय आहे. पुढे त्याचा अनेक ठिकाणी उल्लेख येईलच.


.

भिंतीचे पहिले दर्शन

आणि मग बधावी तिकडे, नजरेसमोर व नजरेच्या पार टप्प्यापलीकडे अगडबंब सापासारखी वळणावळणाने पसरलेली भिंतच भिंत.


.


.


.


.


.


.


.

बायजींग शहर

बायजींग शहर खूपच आखीव रेखीव आहे. सर्व मुख्य रस्त्यांना प्रत्येक बाजूला ३ तर काही ठिकाणी ४ किंवा जास्त लेन्स + दोन्ही बाजूस प्रत्येकी २ लेन्सचे सर्विस रोड + प्रशस्त फुटपाथ आहेत. जवळ जवळ सर्वच रस्त्यांचे विभाजक हिरवळ व बहरलेल्या फुलझाडांनी सजवलेले आहेत. कोठेही वाळलेली हिरवळ अथवा मरतुकडेली / अर्धमेली फुलझाडे दिसली नाही. मुख्य म्हणजे हाच नजारा चीनच्या सर्व मुख्य शहरांत आणि इतर लहान शहरांतही (आपल्याकडील जिल्ह्याची ठिकाणे म्हणता येईल अशी ठिकाणे) दिसला. एकंदरीत मनापासून, लक्ष देऊन काम केलेले आहे, देशाची 'इमेज' आणि कोठेतरी आपण केलेल्या कामाबद्दल अभिमान वाटावा असे काम केले आहे असे सतत जाणवत गेले. अर्थात याला सर्वसामान्य जनतेचाही पुरेपूर हातभार आहे. ज्याबाबतीत आपण सिंगापूरची सतत (योग्यच) स्तुती करत असतो तो स्वच्छतेचा गुणधर्म सर्वसामान्य चिनी जनतेतही भरपूर प्रमाणात आहे. कोठेही कचर्‍याचे ढीग, अथवा बेजबाबदारपणे टाकलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या / चॉकलेट्सचे रॅपर्स, इ. दिसत नव्हते.

परंतू याची दुसरी बाजूही आहे. मार्गदर्शक मंडळींशी जरा चांगली ओळख झाली आणि ते जरा बोलते झाले की बरीच 'अंदरकी बात' बाहेर येऊ लागते. त्यांच्यामते हा म्हणजे राजकारणी (कम्युनिस्ट) लोकांनी बनवलेला चीनचा दाखवायचा चेहरा. चीनचा उरलेला ८०% भाग मात्र अजूनही खूपच मागासलेला आहे. याची प्रचिती (आणि चित्रे) पुढील भागांत येतीलच. पण मला मात्र सतत वाटत राहिले की चीनने आतापर्यंत किमान ६०-८० शहरे अमेरिका-युरोपच्या तोडीची-- किंबहुना त्यांपेक्षा वरचढच-- (हे माझे मत ऐकीव अथवा पुस्तकी नाही, प्रत्यक्षदर्शी स्वानुभवाचे आहे.) बनवली आहेत; हा सुवर्णक्षण भारतीय नागरिकाच्या आयुष्यात आणण्याची सत्बुद्धी आपल्या नेत्यांना (आणि हा प्रश्न नेत्यांना विचारण्याची बुद्धी जनतेला) केव्हा होईल? बायजींग आणि इतर मुख्य शहरांची सुधारणा बायजींग ऑलिंपिकसाठी युद्धपातळीवर केली गेली असे जेव्हा ऐकले तेव्हा तर माझ्या मनात CWG आठवण जागी झाली. चीनमध्येही भ्रष्टाचाराचा ड्रॅगन आहेच अशी कबुली नुकत्याच झालेल्या त्यांच्या दशकी राष्ट्रीय असेंब्लीमध्ये खुद्द मावळत्या व उगवत्या राष्ट्रपतींनी दिली. पण तरीही केवळ भ्रष्टाचार हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे असा चिनी नेत्यांचा मानस आहे असे न वाटाण्याइतपत सुधारणा जागोजागी जाणवत राहिली आणि अस्वस्थ करीत राहिली.

असो, हे बघा काही फोटो बायजींगचे...


.


.


.


.


.


.


.

या रस्त्यावर जी LED sign दिसते आहे ती या आणि त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकची अवस्था त्यांच्या रंगावरून दर्शवित आहे. सर्व मोठ्या शहरांत ही व्यवस्था आहे.

बायजींग शहरातील काही नजरेत भरलेली ठिकाणे:


.


.

बायजींगमध्ये टॅक्सी इतका त्रास देईल असे वाटले नव्हते. पहिले तर चालकांना सहसा इंग्रजी येत नाही.. अगदी थोड्या प्रमाणांत ज्यांना इंग्रजी येते तेही इंग्रजी न समजण्याचे नाटक करतात. एकूण हेतू एकच... परदेशी गिर्‍हाईकाच्या चिनी भाषेच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन त्याला लुटणे ! सर्व चांगली हॉटेल्स चिनीमध्ये त्यांच्या पत्त्याची व 'Please take me to xxx hotel at so and so address' असे छापलेली कार्डं ठेवतात त्यांचा खूप उपयोग होतो. तसेच माझ्या टूर मॅनेजरने पाठविलेल्या माहितीपत्रकामध्येही सर्व हॉटेलांबद्दल अशी वाक्ये लिहून पाठवली होती, ती मी माझ्या मोबाइलवर आणली होतीच. ही तयारी हॉटेलवर एकटे परतताना खूप उपयोगी पडते. कार्ड टॅक्सी चालकाला दाखवायचे (बोलण्यात काहीही अर्थ नसतोच !) आणि त्याच्या होकारार्थी मान हालवण्याची वाट बघायची. बायजींगमध्ये टॅक्सी आवश्यकतेपेक्षा कमी आहेत. गर्दीच्या वेळेस टॅक्सी मिळण्यासाठी पदरी बरेच पुण्य असावे लागते. जवळचे गिर्‍हाईक नाकारणे आणि मीटरपेक्षा जास्त पैशांकरिता घासाघीस करणे ही केवळ मुंबईच्या टॅक्सीवाल्यांची अथवा पुण्याच्या रिक्शावाल्यांची मक्तेदारी नसून बायजींगमध्येही ती आम गोष्ट आहे. घासाघीस करताना भाषेचा अडथळा innovartive प्रकाराने सोडवला जातो. चालकाकडे calculator असतो, तो त्यावर त्याचा आकडा दाखवतो, मग आपण आपला आकडा टंकायचा... जमले तर जमले नाहीतर दूसर्‍या calculator च्या शोधात निघायचे. टॅक्सीवाल्यांचा हा त्रास मात्र इतर कुठल्याही ठिकाणी झाला नाही... शिआन-शांघाईमध्ये सगळे टॅक्सीवाले अगदी सज्जनपणे हात केला की थांबत होते, मीटर टाकून योग्य तेच भाडे आकारत होते आणि सुटे पैसे करत होते. असाच अनुभव त्यांनाही आला असे पुढे प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशांनीही सांगितले.

संध्याकाळी प्रसिद्ध 'पेकींग ऑपेरा' बघायचा बेत होता. पहिल्या दिवसाच्या टॅक्सी पकडण्याच्या अनुभवानंतर मी माझ्या हॉटेलच्या बेलबॉयला आपल्या गटात सामील करून घेतले होते. दरवेळी ५-१० युवान दिले की तो अगदी टॅक्सी पकडून आणून माझ्या नियोजित स्थळाच पत्ता चालकाला पूर्णपणे समजला आहे याची खात्री करून घेऊन मगच मला आत बसवत असे.

पेकींग ऑपेरा म्हणजे काहीसे आपले संगीत नाटक. चिनी पद्धतीला साजेसे रेशमी रंगीबेरंगी आकर्षक पोशाख बघण्यासारखे असतात. पूर्वापार गाजलेले तीनचार अंक/प्रवेश दाखवितात. संपूर्ण नाटक दाखवत नाहीत हे काहीसे आपल्या पथ्यावरच पडते कारण पूर्ण संभाषण आणि गाणे एवढ्या चिरक्या आवाजात आणखी वरच्या पट्टीत असते की काही विचारू नका. त्यामुळे वाचकांनी हा प्रकार आपापल्या जबाबदारीवर पहावा. बायजींगचा पेकींग ऑपेरा हा सर्वोत्तम समजला जातो. राजेरजवाड्यांच्या काळांत भरभराटीत असलेली ही कला आता फक्त काही नवश्रीमंत शौकीन मंडळींच्या व पर्यटन व्यवसायासाठीच्या त्याच्या महत्त्वामुळे सरकारी आश्रयावर जगून आहे. पूर्वी फक्त राजे-सरदार-सरंजामांसाठी असलेली हा प्रकार आपल्यालाही बघायला मिळतो म्हणून शोला आलेली चिनी आम जनता खूश दिसली.

चेहर्‍याची रंगरंगोटी करताना पेकींग ऑपेराचा मुख्य नट.

आणि ही आहे मुख्य नायिका

Farewell my concubine या नाटकातले एक दृश्य

'तलवार नृत्य' या नाटकातले एक दृश्य

ऑपेरातले अजून एक दृश्य

प्रियकर सरदार लढाईवर जाऊन लई दीस झाले म्हणून विरहाने तळमळणारी त्याची concubine, तिच्या दासी आणि eunuchs.

तीच concubine... दु:खाने "पिऊन फॅस" झालेली... आणि तिला सांभाळणारा तिचा दासगण

जाताना टॅक्सीची व्यवस्था बेलबॉयकरवी करता येते येताना मात्रा आपण आपल्या जबाबदारीवर टॅक्सीवाल्याशी लढा द्यावा लागतो. शो संपून रस्त्यावर येईपर्यंत १० वाजले होते. पाऊसही बर्‍यापेकी पडत होता. म्हणजे टॅक्सीवाल्यांची पर्वणीच. पहिलेतर थांबायलाच तयार नव्हते. थांबलेले पत्त्याचे कार्ड बघून मान आडवी हलवून नकार व्यक्त करत होते. एक स्कूटर रिक्शावाला मागे लागला होता. पण रिक्शाचे रुपडे पाहून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. रिक्शाला मीटरही नव्हते. १५-२० मिनिटाने ध्यानात आले की जर हापण निघून गेला तर परिस्थिती कठीण होईल. तेव्हा त्याला खुणेनेच विचारले, 'किती घेणार?' त्याने पंजा पसरून ५ असे दाखवले . जरा आश्चर्य वाटले कारण येताना मी ६० युवानं मोजले होते. त्याच्याही नजरेस माझ्या नजरेवरचा अविश्वास आला असावा. कारण त्याने calculator बाहेर काढला आणि ५० टंकून दाखविले. म्हटले चला आता दुसरा काही उपाय दिसत नाही शिवाय हा पैसेही ठीकच आकारतोय. आमची सवारी निघाली.

चिनमघ्ये सायकलींकरिता वेगळ्या लेन सर्व शहरभर असतात. स्कूटर रिक्शावाले बेधडक या लेनमधून गाडी दौडवतात. साधारणपणे सायकल व रिक्शा यांच्याकरिता रहदारीचे नियम नसल्यासारखे दिसते. त्यांनी इकडेतिकडे पाहून लाल दिव्यामधून गेले तरी कोणाला फारसे बिघडले असे वाटत नाही. हे सर्व रस्त्याच्या बाजूला उभे राहून बघणे वेगळे आणि स्वतः अशा एका धीट वाहनात बसून प्रवास करणे वेगळे ! रिक्शावाल्याने ज्या आवेशाने रिक्शा उडावयाला सुरुवात केली की मला त्याला आवरावे असे वाटू लागले. आणि मी तसा प्रयत्न केलाही... त्याची खाणाखुणेची प्रतिक्रिया होती: 'No problem, enjoy the trip !' म्हटले ठीक आहे काढूया थोडे 'Beijing by night' चे फोटो.

अचानक तो एका छोट्या गल्लीत घुसला... माझ्या आश्चर्यपूर्ण सातवार्‍यांवर त्याची खाणाखुणेची तीच जुनी प्रतिक्रिया होती: 'No problem, enjoy the trip !' नंतर तो अजून एका छोट्या आणि अंधार्‍या गल्लीत शिरला. मग मात्र मी खाणाखुणेची भाषा सोडून सरळ इंग्रजीतून मोठ्याने हा रस्ता चुकीचा आहे, मी येताना वेगळ्याच रस्त्याने आलो होतो असे म्हणू लागलो. इतके सगळे झाल्यावर भाऊसाहेब मोडक्यातोडक्या इंग्रजीतून म्हणाले: short cut, short cut... hotel near, hotel near. जरा बरे वाटले, आणि अर्थात आता त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा वेगळा काही पर्यायही नव्हता. आजूबाजूला बघितले तर जुनीपुराणी वस्ती होती. लाल रंगाचे दरवाजे सोडले तर भारतातलीच एखादी जुनी वस्ती दिसत होती. पण हे सर्व भर बायजींगच्या मध्यावर असेल यावर विश्वास बसत नाही. नंतर केलेल्या संशोधनातून कळले की असे बरेच चिनी मावळे आपापले गढ चिनी 'लॅण्ड माफीया' विरुद्ध लढवत आहेत. इतका वेळ विसरलेला माझ्यातला प्रवासी जागा झाला, कॅमेरा बाहेर आला.


.


.


.

मी फोटो काढतो असे बघितल्यावर तो 'थांबू काय?'; 'अजून शेजारच्या रस्त्यावर खूप जुनी घरे आहेत' असं मोडके इंग्लिश + खुणांनी सांगू लागला. पण आजूबाजूची परिस्थिती व रात्रीची वेळ पाहून मोडके इंग्लिश + खुणांनीच 'नको बाबा. हॉटेलकडेच चल' म्हणून सांगितले. हॉटेल खरच जवळच होते आणि सगळे मिळून दहाएक मिनिटात पोहोचलोही. थोडक्यात थियेटरवर जाताना टॅक्सीवाल्याने चांगल्या रस्त्यावरून पण २५-३० मिनिटे घुमवत चक्क ६० युवानपर्यंत बील फुगवले होते !

हॉटेलवर पोचल्यावर रिक्शातून खाली उतरून त्याला ठरलेले ५० युवान देऊ लागले तर तो म्हणू लागला: five hundred... five hundred. मी उडलोच आणि जोराने म्हणालो: Are you mad? हे किती जोराने म्हणालो याची कल्पना जेव्हा आजूबाजूचे दोनचार लोक काय झाले म्हणून चमकून बघायला लागले तेव्हाच कळले. रिक्शावाल्यालाही ते कळले असावे. तोही माझ्या हातातले ५० युवान घेऊन हसत हसत 'no problem... no problem असं म्हणू लागला.

आमच्यात युद्धसंधी झाल्याने त्याच्या हाती कॅमेरा देऊन माझा एक रिक्शात बसलेला फोटो काढ म्हणालो...

नंतरच्या प्रवासात एका अमेरिकन जोडप्याला व अबू धाबीत काम करणार्‍या एका भारतीयालाही बायजींग रिक्शावाल्यांचा असाच अनुभव आला असे कळले. घासाघीस करून त्यांनी शेवटी १५० - २०० युवानवर तडजोड केल्याचे सांगितले. त्यामानाने माझा अनुभव विनोदी प्रकारात मोडला असेच म्हणावे लागेल. तेव्हा बायजींग टॅक्सीवाल्यांपासून व विशेषतः रिक्शावाल्यांपासून सावधान!

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

विलासराव's picture

6 Dec 2012 - 10:59 pm | विलासराव

मस्त माहीती.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

माहिती व फोटू... दोन्ही अवडले :-)

५० फक्त's picture

6 Dec 2012 - 11:29 pm | ५० फक्त

एक विनंती, शक्य असल्यास तिथल्या चारचाकींबद्द्ल लिहाल का ? म्हणजे कोणत्या होत्या एवढंच, यावेळच्या फोटोत एक होंडा आणि एक फोक्स्वॅगन ओळखु आली, बाकी फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे मस्तच.

अजुन एक विनंती, ते ऑपेराचे फोटो पाहताना डिस्क्लेमर का आहे, आपल्या जबाबदारीवर पाहा असा.

खेडूत's picture

7 Dec 2012 - 12:03 am | खेडूत

होंडा नाही. फोटोमध्ये पहिली सित्त्रोएन आणि दुसरी प्युजो आहेत. पण चीन मध्ये सर्व गाड्या बघायला मिळतात...जपानी सोडून.
जपानशी त्यांचे फार प्रेमाचे संबंध आहेत म्हणून. बाकी एक्काजी प्रकाश टाकतीलच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2012 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

चिनमघ्ये जपानी गाड्याही ढीगभराने दिसतात... नुकताच एका बेटावरून जुनाच चिनी-जपानी संघर्ष परत पेटला आहे आणि त्यासंबंधाने झालेल्या निदर्शनांमुळे चिनमधील जपानी कार्सचे (टोयोटो, होंडा, ई.) प्लँट्स बंद आहेत. यामुळे या जपानी कंपन्यांच्या फयद्यामध्ये लक्षणीय घट होऊन त्यांचे शेअर गडगडले. यावरून चिनमध्ये जपानी गाड्यांचा किती खप होत असेल याचा अंदाज यावा. किंबहुना सद्ध्याच्या जागतीक वित्तपरिस्थितीत बर्‍याच प्रमाणात चीन व काही प्रमाणात भारत व इतर BRICS राष्ट्रांवरच जपानी कार कंपन्यांची भिस्त आहे.

>> ते ऑपेराचे फोटो पाहताना डिस्क्लेमर का आहे, आपल्या जबाबदारीवर पाहा असा.
हो ना.. केवढ्या आशेने फोटो बघितले!

खेडूत's picture

7 Dec 2012 - 12:13 am | खेडूत

अरे हो..
तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच होंडा दिसतेय..मी नंतरच्या फोटोबद्दल म्हणतोय..
आपलाच प्रतिसाद सुधरवता येत नाही दिसतंय..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2012 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे

चिनमध्ये सर्व प्रकारच्या चारचाकी आहेत. अगदी मर्सिडीझ- बीएमडब्ल्यू पासून इतर सर्व. नुकतेच चिनने दशलक्षाधीशांच्या संखेप्रमाणे बनविलेल्या यादीत अमेरिकेला मागे टाकून पहिला नंबर पटकावला आहे. पैसेवाले असले म्हणजे गाड्या आल्याच. परंतू चारचाकी घेणे आणि तिचा सांभाळ करणे हे खूपच खर्चिक आहे आणि फक्त खूप श्रीमंत असलेल्यानाच परवडते.

ऑपेराचे डिस्क्लेमर जरा गम्मत म्हणून आहे. तरीसुद्धा ऑपेरात सर्व पात्रे अत्यंत चिरक्या आवाजात व विचीत्र हेल काढून बोलतात आणि तेही चिनी भाषेत त्यामुळे थोड्याच वेळात बोअर होऊन पैसे व्यर्थ गेले असे वाटण्याची दाट शक्यता आहे.

रेवती's picture

7 Dec 2012 - 12:04 am | रेवती

छान माहिती आहे. सर्व छायाचित्रे चांगली आहेत. चीनच्या भिंतीची तर झकासच! जेवणात, न्याहरीला शाकाहारी पदार्थ काय मिळू शकतात हेही सांगावेत अशी विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2012 - 1:08 am | डॉ सुहास म्हात्रे

स्टार्ड (कमीतकमी ***) होटेलमध्ये continental मेन्यूमध्ये जे पदार्थ मिळतात... त्यांच्यात खात्रीने शाकाहारी पदार्थ शोधणे जमते. चिनी पदार्थांत शाकाहारी म्हणजे नक्की काय हे सांगायला कठीण आणि ऊत्तम दुभषांशिवाय आच्यार्‍याला कळणे दुरापास्त आहे.

साधारणपणे चीनी कोबी (हीची पाने आणि गड्डे लांबट असतात, आपल्या कोबीसारखे गोलाकार नसतात), वांगी आणि चीनी पालक याव्यतिरिक्त आपल्या पचनी पडणार्‍या भाज्या फारशा दिसल्या नाहीत. फळे मात्र खूप प्रकारची आणि छान चवदार मिळतात.

रेवती's picture

7 Dec 2012 - 8:18 pm | रेवती

माहितीबद्दल धन्यवाद.

बॅटमॅन's picture

7 Dec 2012 - 12:23 am | बॅटमॅन

फोटो नेहमीप्रमाणे अव्वल. शिवाय ठीकठिकाणचे भाष्य अगदी जमून आलेल्या चकलीसारखे खुसखुशीत, तुम्ही अजून बरेच देश फिरावेत ही विनंती :)

अर्धवटराव's picture

7 Dec 2012 - 12:50 am | अर्धवटराव

जबरी चाललीय लेखमाला इस्पीकराव. (तुमच्या झोकदार॑ मिशा आणि गॉगल बघुन मी भारावुन गेलोय)
चीनने एव्हढी अगडबंब भींत बांधली, मग त्याचा संरक्षण दृष्टीने खरच काहि उपयोग झाला का? त्या भींतीची "साईझ" बघता एखादं संपूर्ण महाभारत तिच्याभोवती घडलं असावं, आणि चीनी लोकमानसात कथांच्या, मिथकांच्या, लोककलांच्या रुपाने ते जीवंत असावं असं वाटतय.

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2012 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

अगदी खरे ! या भिंतीएवढाच अगडबंब तिचा ईतिहास आहे. संरक्षणासाठी तिचा ऊपयोग झालाही. पण ऊत्तरेकडून एवढी प्रचन्ड आक्रमणे होत गेली की फक्त भिंतीवर भिस्त टाकून जमण्यासारखे नव्हते. चेन्गीझ खानने तर जवळजवळ सर्वच चीन आपल्या ताब्यात घेऊन बराच काळ खान राजघराणे (Khan Dynasty) चीनवर सत्ता गाजवत होते. हा एक फार मोठा विषय आहे.

३००० वर्षांच्या काळात असंख्य राजे व सम्राट होऊन गेलेआणि एकमेकांशी लढले, त्यामध्ये आणि सिल्क रूटवरुन होणार्‍या व्यापाराचे संरक्षण करण्यात या भिंतींचा व अनेक शहरांच्या संरक्षक भिंतींचा फार मोठा ऊपयोग होता.

दादा कोंडके's picture

7 Dec 2012 - 1:45 am | दादा कोंडके

अतिशय सुंदर प्रवासवर्णन हो एक्कासाहेब. पुढच्या भागाची वाट बघतोय. इतरही देशात केलेली प्रवासवर्णनं येउ द्या!

प्रचेतस's picture

7 Dec 2012 - 9:04 am | प्रचेतस

लै भारी भाग झालाय हा.

टुकुल's picture

7 Dec 2012 - 2:44 pm | टुकुल

वाचत आणी पाहत आहे.

--टुकुल

स्मिता.'s picture

7 Dec 2012 - 3:25 pm | स्मिता.

लेखमाला छान चालू आहे... वाचत आहे.

(काल तर मी स्वप्नात चीनच्या प्रवासाला जावून आले ;))

प्यारे१'s picture

7 Dec 2012 - 10:55 pm | प्यारे१

खूपच छान लिहीताय!

मूकवाचक's picture

10 Dec 2012 - 10:38 am | मूकवाचक

+१

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2012 - 12:21 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या बरोबर बायजिंगमधे फिरतोय असं वाटलं. धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2012 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वांना प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

मृत्युन्जय's picture

10 Dec 2012 - 10:48 am | मृत्युन्जय

चांगली लेखमाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.