ड्रॅगनच्या देशात ०१ - हिमालयावरून बायजींगच्या दिशेने भरारी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Dec 2012 - 2:34 am

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

खूप दिवसांपासून चीन बघण्याची इच्छा होती. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा योग जुळून आला. एकदा जायचे नक्की झाले आणि मग आंतरजलावर अभ्यास सुरू केला. चारपाच टूर एजन्सीच्या ईटिनेररीज बऱ्या वाटल्या पण एकही मला पाहिजे असलेली सर्व ठिकाणे असलेली नव्हती. पण आता टूर कस्टमायझेशन ही काही फार नावीन्यपूर्ण गोष्ट राहिली नाही त्यामुळे चिंता नव्हती. सगळ्यांना ईमेल पाठवल्या. त्यातल्या एका, China Highlights चा, प्रतिसाद चांगला होता. टूर व्यवस्थापिकेने चीनवरून फोन करून अगदी अगत्याने सर्व माहिती विचारली... केवळ भेट देण्याची ठिकाणेच नाही तर पर्यटनांसंबंधीच्या आवडी, खाण्याच्या आवडी (नुसते शाकाहारी-मांसाहारी नव्हे तर आठ्वड्याचा कोणकोणत्या वारी शाकाहारी आहात हे सुद्धा नोंदवून घेतले!), अगदी food allergies सुद्धा ! असो, आतापर्यंत तुमच्या ध्यानात आलेच असेल मी कोणती टूर कंपनी निवडली आणि का ते .

नंतरचाही अनुभव चांगला होता. मूळ ईटिनेररीमध्ये मी बरेच फेरफार केले, अर्थात त्यामुळे खिशावर दडपण आले. पण विचार असा की आपण काय परतपरत चीनला थोडेच जाणार, एकदा काय करायचे ते करून घ्या. तरीसुद्धा तिबेट राहिलेच. तेथील राजकीय परिस्थितीमुळे परदेशी प्रवाश्यांकरीता भेटीचे नियम कडक आहेत. कमीतकमी ५ जण, तेही एकाच देशाचे, एकाच ग्रुपने, एकाच वेळी आगमन-निर्गमन करणारे असल्याशिवाय तिबेटचे स्पेशल परमिट मिळत नाही. त्यामुळे थोडा नाराज झालो. पण इतर सर्व मनासारखे (अगदी गुरुवार,शनीवारला शाकाहारी जेवण, व्हेजिटेबल तेलातले, फिश ऑइल न वापरण्याची जबाबदारी गाईड घेईल, वगैरे !) ठरल्याने बरे वाटले.

शेवटी अशी ठरली ईटिनेररी:

बायजींग - शियान - लिजीयांग - शांग्रीला -गुइलीन - यांगशुओ - चेंगदु - चोंगचिंग - यांगत्से नदीवर क्रूझ -यिचांग - शांघाई.

काय गंमत असते पहा. हा काही माझा पहिला परदेश प्रवास नव्हता, पण चीन म्हटल्यावर जरा धाकधूकच वाटली ! शिवाय चाललो आहोत पण कम्युनिस्टांनी काही गैरसमजुतीने अडकवले तर काय असा एक विचारही मनाला चाटून गेला !!! पण मुळातच मर्द मराठा असल्याने असल्या विचारांना फारसा थारा न देता पुढील तयारीला लागलो. चिनी लोकानांही याची कुणकुण लागली असावी कारण सर्व काम फारच सहजपणे होऊन आठवड्याभरात व्हिसा हाती आला. नंतर मात्र प्रवासाचा दिवस कधी येईल असे झाले.

शेवटी तो दिवस उजाडला आणि दम्माम, सौदि अरेबिया - दुबई - बायजींग असा प्रवास Emiratesने सुरू झाला. दम्माम ते दुबई प्रवास ठीक झाला, झाला परंतु खरा दणका दिला दुबई विमानतळाने. साधारणपणे दुबई विमानतळ आंतरराष्टीय दर्जाची सेवा देतो असा माझा सर्वसाधारण अनुभव आहे. पण तेथे check-in करायला गेल्यावर हवाईसुंदरीने गोड हसून सांगितले की तुमची window seatबदलून तुम्हाला aisle seat देण्यात आली आहे. दरवेळेस, दर रूटच्या किमान पहिल्या प्रवासाला मला खिडकीजवळची सीट हवी असते म्हणून मी जवळजवळ तीन आठवडे अगोदर ती बुक केली होती. आणि ही बया मला हसत सांगतेय की माझी सीट बदलली? ते सुद्धा साडेसहा तासांच्या long haul प्रवासाला! माझ्यातला मर्द मराठा परत जागा झाला. जरा (नाही बरीच)हुज्जत घातली. मी ऐकतच नाही हे बघितल्यावर तिने "सुपरवायझरला बोलवते मग बघा" अशी धमकी दिली. मी म्हणलो, "बोलवच". मग सुपरवायझरने मला असंख्य कारणे सांगितली आणि मीही त्याला एमिरेटसच्या फ्लाईट मगॅझीनमधली त्याच्याच CEO ची quality, customer care, etc. वरची वचने ऐकवली. काही वेळाने त्याच्या ध्यानात आले की हा काही ऐकणार्‍यातला नाही. शिवाय विमानाला दोन अडीच तास होते, दम्मामहूनच माझे लगेज थ्रू-चेकइन झाले होते आणि माझ्या online seat reservation चे एमेरिटसने केलेले confirmation माझ्या मोबाइलवर होते, त्यामुळे आपला गड पक्का होता. शेवटी त्याने कुठेतरी एक फोन करून माझी मूळ सीट मला देऊ केली. हे प्रकरण दुबईला झाल्याने इतका बाणेदारपणा जमला. दम्मामला हे जमणे कठीण होते. असो, याचा मला प्रवासात किती फायदा झाला ह्याची थोडीबहुत कल्पना विमानातून काढलेल्या फोटोंवरून येईलच. A-380 मधून १० किमी वरून उडताना डोळ्यांना जे हिमालय, तिबेट आणि चीनचे दर्शन झाले ते वर्णनातीत होते. A-380 मधून उडण्याची ही माझी पाहिलीच वेळ आणि तीही बहुदा विमानबदलामुळे, ही आणखी एक अनपेक्षित आनंदाची बाजू.

विमानाचा मार्ग


.

बलुचिस्तान


.

काश्मीर

आणि येथून पुढे बलवन्त हिमगिरीचे अचाट रुपडे असे काही सुरू झाले की डोळा मावेनासे झाले आणि केवळ नशिबात होते म्हणून कधी नाही ते दुबईला घातलेल्या हुज्जतीचे चीज झाल्याचे वाटले.
.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०१


.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०२


.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०३


.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०४


.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०५


.

बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०६

इथून पुढे तिबेटचे रखरखीत पठार सुरू झाले. जगातले सर्वात उंच पठार. जणू जगाची पाठच.

तिबेट ०१


.

तिबेट ०२

मेनलँड चीन सुरू... बहुतेक झिन्जियान्गचा वाळवन्टी भाग असावा.

चिनी वाळवंट

विमान वेळेवर पोहोचले. विमानतळावर चोख व्यवस्था होती. सर्व कामे शिस्तीत झाली. इमिग्रेशन ऑफिसर हसून वेलकमपण म्हणाला. चला मनावरची चीनची उरलीसुरली भीती पळून गेली. मार्गदर्शक नावाची पाटी घेऊन उभा होता. चिनी ढबीचे पण सहज समजेल असे इंग्लिश बोलत होता. टुरचा पूर्णं मूड जमला. इंग्लिश बोलणारा मार्गदर्शक ही चीनमध्ये luxury नसून अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे नंतर सततच्या अनुभवाने समजत गेले. अगदी बायजींग व शान्घाईसारख्या शहरांतही स्टार्ड हॉटेलच्या स्टाफमध्ये एखादाच / एखादीच कामचलाऊ इंग्लिश बोलू शकतो/ते. अन्यथा sign language वर भागवावे लागते. कधी कधी ते ही कसे तोकडे पडते आणि कशी मजा होते(आता मजा वाटते, त्या वेळी तसे वाटले नाही !) ते पुढे कधितरी येईलच.

बायजींग मध्ये दूषित वातावरणामुळे सर्व वर्षभर केव्हाही धुके असू शकते. बायजींग ऑलिंपिकच्या वेळेस याचा फार गाजावाजा झाला होता हे आठवत असेलच. विमानतळावरून हॉटेलवर जाताना याचा प्रत्यय आला. शिवाय आंतरजाल माझ्या बायजींगमधील ४ दिवसांत सतत ढग व पाऊस दाखवत होते. परंतू वरूणराजाशी आमचा थोडाबहुत वशिला आहे. आजपर्यन्त त्यांनी आमची सहल कधीच खराब होऊ दिली नाही. तेव्हा त्यांची आठवण काढून बाकी सर्व नशिबावर सोपवले.

जगप्रसिद्ध बायजींग धुके

हॉटेलवर आल्यावर प्रथम शॉवर घेतला आणि ChaoYang Acrobatic Show बघायला बाहेर पडलो. तिकिटे आंतरजालावरून बुक केली होती. The China Guide (www.thechinaguide.com)नावाची एक एजन्सी हे काम करते, शिवाय तिकिटे छापील किंमतीच्या १५-२०% स्वस्त देते. थिएटरवर एजन्सीचा/ची गाईड तुम्हाला भेटतो/ते, तेथेच पैसे द्यायचे आणि तिकीट घ्यायचे... आंतरजालावर फक्त बुकिंग करायचे. फारच सोयीचा व्यवहार. मी तीन रात्रींच्या वेगवेगळ्या तीन शोंची तिकिटे अशीच बुक केली होती. चीनमध्ये जिथे जाल तिथे छान शोज आहेत. पर्यटन व्यवसाय उत्तम रीतीने डेव्हलप केला आहे हे वारंवार जाणवते.

बायजींग मध्ये आवर्जून बघावा असा शो म्हणजे ChoYang Acrobatic Show (ChaoYang Theater, 36, Dongsanhuan North Road.Phone; 010 65068116. Time: 7:15 - 9:15 pm. Tickets: 180 to 880 RMB (Chinese Yuan). 1 yuan = approx 9 INR.)

शो इतका छान होता आणि त्याची CD पण विकत मिळते म्हटल्यावर फोटोकडे दुर्लक्ष झाले नाही तरच नवल. त्यामुळे हे फक्त नमुन्यादाखलचे फोटो. मात्र पुढील भागांतील outdoor फोटो ही कसर पुरेपूर भरून काढतील अशी अपेक्षा आहे. या शोमधील सर्वच कलाकार नावाजलेले असून अनेक जागतिक स्तरावरची बक्षिसे त्यांनी पटकावलेली आहेत.


.


.


.


.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

नंदन's picture

1 Dec 2012 - 2:51 am | नंदन

हिमालयाचे फोटो मस्त आलेत. प्रवासवर्णनाच्या पुढील भागांची वाट पाहतो.

विशेषतः हिमालयाची प्रकाशचित्रे उत्तमच!

पुढील लेखांची प्रतीक्षा आहे.

सुनील's picture

1 Dec 2012 - 3:09 am | सुनील

सुरुवात छानच. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Dec 2012 - 9:49 am | श्री गावसेना प्रमुख

फोटो खुपच मस्त आयलेत

ज्ञानराम's picture

1 Dec 2012 - 9:54 am | ज्ञानराम

मस्तच

चांगला विषय. पुढील लेखनाची वाट पहात आहे. छायाचित्रांमध्ये चीनी वाळवंट व शेवटचे दोन फोटू फार आवडले.

पैसा's picture

1 Dec 2012 - 9:31 pm | पैसा

फोटो सुद्धा आवडले. पुढचा भाग लौकर येऊ द्यात!

संजय क्षीरसागर's picture

2 Dec 2012 - 12:13 am | संजय क्षीरसागर

सर्व फोटो एका-खाली-एक नाही का येत? प्रत्येक फोटो वेगवेगळा उघडावा लागतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2012 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर नविन आहे. अगोदर लेखनामघ्ये फोटो कसे चिकटवायचे त्याची कल्पना नव्हती. आता ती तृटी भरून काढली आहे. झालेल्या त्रासाबद्दल माफ करा.

संजय क्षीरसागर's picture

3 Dec 2012 - 10:48 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2012 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिक्रीया देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

खुप खुप मस्त आहेत फोटो, अतिशय धन्यवाद.

अभय's picture

3 Dec 2012 - 8:55 am | अभय

पुढचा भाग लौकर टाका

मूकवाचक's picture

3 Dec 2012 - 9:29 am | मूकवाचक

+१

झकासराव's picture

3 Dec 2012 - 5:28 pm | झकासराव

ऑस्सम :)

बॅटमॅन's picture

3 Dec 2012 - 6:05 pm | बॅटमॅन

वर्णन तर उत्तमच, पण फटू विशेषतः लय लय भारी बगा. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Dec 2012 - 9:25 am | llपुण्याचे पेशवेll

छान. आवडले.

सुकामेवा's picture

4 Dec 2012 - 10:36 am | सुकामेवा

पहिला प्रयत्न छान झाला आहे पुभाप्र ..............

सुहास..'s picture

4 Dec 2012 - 10:40 am | सुहास..

क्लास !!

आमचे परममित्र बैलोबा चायनीजकरांची आठवण झाली ;)

प्यारे१'s picture

4 Dec 2012 - 11:12 pm | प्यारे१

खूपच मस्त फोटो आलेत!

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 3:45 pm | मालोजीराव

रौद्र हिमालयाचे दर्शन सुरेख !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2012 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वांचे प्रतिसादांबद्दल धन्यवाद !

ऋषिकेश's picture

10 Dec 2012 - 4:24 pm | ऋषिकेश

वा!.. जरा वेळ राखून ठेवला होता या मालिकेसाठी पहिला भाग आवडलाच.
आता पुढची एकत्रित प्रतिक्रीया शेवटच्या भागावरच देतो (नाहितर आधीचे धागे वर काधतोय म्हणून कोणीतरी ओरडायचे :) ;) )

अशोक सळ्वी's picture

31 Dec 2012 - 3:21 pm | अशोक सळ्वी

इन्टिनरीच्य गुगल नकाशात अरुनाचलच्या सिमा सन्धिग्ध का? मिपा वर टकतना त्या सरळ करायला हव्या होत्या!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2013 - 2:47 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व नकाशांत योग्य ते बदल केले आहेत.

असो, आतापर्यंत तुमच्या ध्यानात आलेच असेल मी कोणती टूर कंपनी निवडली आणि का ते.- कोणती टूर कंपनी ? . नाही ध्यानात आलं :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2018 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे वाक्य ज्या (लेखाच्या पहिल्या) परिच्छेदाच्या अखेरीला आहे, त्या परिच्छेदातच टूर कंपनीचे नाव आणि ती निवडण्याची सर्व कारणपरंपरा दिलेली आहे :) ;)

शेखरमोघे's picture

10 Feb 2018 - 7:43 pm | शेखरमोघे

छान वर्णन, फोटो आणि माहिती - सुन्दर लेख!