ड्रॅगनच्या देशात ०३ - बायजींग : स्वर्गमंदीर, रेशीम बनवण्याचा कारखाना व ग्रीष्ममहाल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
5 Dec 2012 - 2:10 am

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

Forbidden City बघण्यात सकाळचे जवळजवळ ३ तास गेले. तरीसुद्धा जरा अजून वेळ असता तर सगळ्या इमारती, त्यांच्यावरची कलाकुसर नीट बघता आली असती असे वाटत राहिले.

हे सम्राटाच्या प्रासादाबाहेरचे धूपदान... सम्राटाच्या मोठेपणाला साजेशे !

त्याचा आकार पाहून "पूर्वी इथे फार डास होते का ?" असे विचारल्यावर मार्गदर्शिका शांतपणे म्हणाली, "त्याबद्दल काही माहिती नाही" आणि आमचा बार फुसका निघाला. अर्थात हे संभाषण इंग्रजीतून चालले होते आणि सोप्या इंग्रजीतूनच व सरळ भाषेतच बोलावे ह्याचा प्रत्यय आला व परत परत येत राहिला. याला आश्चर्यकारक अपवाद म्हणजे युन्नान(लिजीयांग, शांग्रीला) सारखा दूरदराज डोंगराळ भाग आणि यांगत्से क्रूझमधील स्थानिक ट्रायबल [आपल्याकडे यांना अनुसूचित जाती-जमाती म्हणतात आणि चीनमध्ये अल्पसंख्याक(minorities) म्हणतात]. जास्त माहिती तेथे पोचल्यावर येईलच.

खालचा फोटो आहे संरक्षक सिंहांचा. हे चीनमध्ये जागोजागी खाजगी व व्यावसायिक इमारतींसमोर दिसतात. हे नेहमी जोडीनेच असतात. नराच्या पंज्याखाली पृथ्वीचा गोल असतो... याचा अर्थ मालकपुरुष जगभरातून संपत्ती गोळा करून आणेल. मादीच्या पंज्याखाली छावा असतो... याचा अर्थ मालकाची स्त्री ती सर्व संपत्ती सांभाळून ठेवील व घरातल्या मुलाबाळांचा नीट सांभाळ करेल. सर्वसाधारण चिनी हा असले संकेत, भूतखेत इत्यादीवर शेकडो वर्षांपासून प्रचंड विश्वास ठेवून आहे. ६०-६५ वर्षांचा कम्युनिझम आणि माओचीसमाजीक क्रांती याबाबतीत फार फरक करू शकलेली नाही. अगदी सरकारी-व्यापारी इमारतींपुढेसुद्धा हे सिंह असतात!

हे आहेत Forbidden City मधले सम्राटाचे सिंह.

अरे हो. खरी गंमत राहिलीच. सिंह हा प्राणी चीनमध्ये सापडत नाही आणि आमच्या मार्गदर्शिकेच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी कघीही नव्हता. हा भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणून फक्त चिन्हाच्या स्वरूपात चीनमध्ये आला आणि राजघराण्यांमध्ये मानाचे स्थान पटकावून बसला... इतका की ड्रॅगनचे तोंड खूपदा सापाऐवजी सिंहासारखेच होते... विशेषतः राजघराण्याशीसंबंधित असेल तेव्हा.

Forbidden City मधून बाहेर पडून चिनी फूट मसाज करवून घेऊन स्वर्गमंदिर (Temple of Heaven) बघायला गेलो. हे १४२० साली मिंग राजघराण्याने बांधले. याचा मिंग व नंतर चींगराजघराणी अगदी १९व्या शतकाच्या सुरुवातीस राज्यक्रांती होऊन साम्राज्य लयाला जाईपर्यंत शांतता व उत्तम पीकपाणी व्हावे म्हणून पूजापाठासाठी नियमित उपयोग करीत असत.


.


.


.

खऱ्या प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा तर होतीच पण त्याबरोबर प्राण्यांचे पुतळे बनवून ते अर्पण करण्याची प्रथाही होती.

इमारतीच्या बाहेर व आतील नक्षीदार कलाकुसर बघण्यासारखी आहे.

येथून पुढे पोटपूजा करून रेशीम बनवण्याचा कारखाना (Silk Factory) बघायला निघालो. Silk factory ही तुम्हाला आवर्जून (जबरदस्तीने) दर शहरात बघावीच लागते. यात रेशीम हे चीनचे पूर्वपरंपरांगत अभिमानपूर्ण निर्यातचिन्ह आहे हे जेव्हढे खरे आहे तेव्हडाच मार्गदर्शकाचे कमिशन हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. शिवाय सर्व रेशीम ऊद्योग कम्युनिस्ट सरकारच्या ताब्यात आहे, तेव्हा त्यांना वगळून पुढे जाणे मार्गदर्शकाला तसे अशक्यच आहे म्हणा ! रेशीम कसे बनवले जाते याची माहिती मात्र छान मिळाली. फक्त ती ५-६ वेळा न मिळता फक्त एकदाच मिळाली असती तर बरे झाले असते !

रेशमाच्या कोशामध्ये प्रत्येक कीटक एकच सलग धागा बनवतो. दोन कीटक असलेल्या मोठ्या कोशामध्ये दोन धागे एकमेकात गुंफलेले असतात त्यामुळे त्यांचा उपयोग ते रेशीम ओढून-ताणून फक्त रजई बनविण्यासाठीच होतो. या कामासाठीही खास कसबी कामगार लागतात. एकच कीटक असलेल्या छोट्या कोशांचा उपयोग धागा बनवून तलम वस्त्रे बनवण्यास होतो. मूळ धागा इतका तलम (thin) असतो की खालील यंत्र वापरून ८ कोशांतील ८ धाग्यांना गुंफून एक धागा बनवतात व नंतरच अश्यातऱ्हेने बनलेला जाड (!!!) धागा वस्त्रे बनविण्यासाठी वापरात येतो.

आणि ही आहेत काही रेशमाची उत्पादने:


.


.

पुढचा प्रवास ग्रीष्ममहालाच्या (Summer Palace) दिशेने सुरू झाला. हा महाल शहरापासून साधारण ३० मिनिटे दूर एका तलावात आहे. एकूण आवार साधारण २.९ चौ. किमी आहे. त्यातील ३/४ भाग मानवनिर्मित "कुनमींग" नावाच्या तलावाने व्यापलेला आहे आणि १/४ भागावर राजमहाल व मंदिर आहे. तलाव खणताना निघालेल्या मातीचाच उपयोगLongevity Hill बनवण्यास केला गेला आणि त्यावर ते मंदिर बांधले. हा महाल एका सम्राटाने त्याच्या आईसाठी बांधला होता. ती जहाल स्वभावामुळे Dragon Lady म्हणून प्रसिद्ध होती. मंदिराकडे जाण्यासाठी पूल आहे पण साधारपणे ३०-४५ मिनिटे चालावे लागते. त्यामुळे आमच्या ग्रुपने बोटीने जाणे पसंत केले. खास सजवलेल्या टूरिस्ट बोटीने १० मिनीटांत जाता येते. शिवाय बोटींगची मजा घेता येते ती वेगळीच!


.

ग्रीष्ममहाल (Summer Palace)


.

देवळाच्या आवारांत एक ७५० मीटर लांबीचा Covered Walking Track बनवलेला आहे... ड्रॅगनलेडी त्यावरून पालखीत बसून रोज संध्याकाळी फेर्या मारीत असे !!! हा मार्ग मात्र त्याच्यावरच्या रंगरंगोटीमुळे बघण्यासारखा आहे. शिवाय त्याच्यावरून तुम्ही "स्वतःच्या पायाने" फेर्‍या मारू शकता !

हाच तो मार्ग...


.

हा एक सद्य चिनी कलाकुसरीचा नमुना

आणि हा चिनी विनोदबुद्धीचा नमुना (कॉमरेड ओबामा) !

या तलावात बहुदा जगातील एकमेव संगमरवरी बोट आहे. अर्थातच ही बोट तलावात कधीच तरंगू शकली नाही. ड्रॅगनलेडी मात्र रोज संध्याकाळी त्या बोटीमध्ये बसून चहा पीतपीत तळ्याची मजा बघत बसत असे.

हा होता आमचा टुरच्या या भागातील बहुराष्ट्रीय ग्रुप: अमेरिकन, कॅनेडियन, इंडोनेशिअन, कोरियन, जर्मन, इटालियन आणि भारतीय (मी).

संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर शॉवर घेऊन त्वरित निघालो. ७:३० चा Red Theater वर The Legend of King Fu हा शो बघायला.

बायजींगमध्ये अजिबात न चुकवाव्या अशा गोष्टींच्या यादीमध्ये या शोचा बराच वरचा नंबर लागेल. कुंगफूच्या वेगवेगळ्या करामती एका कथानकाच्या आधाराने मोठ्या नाट्यमय प्रकारे प्रदर्शित करतात. भलामोठा रंगमंच आणि जागतिक कीर्तीचे कुंगफूचे उस्ताद... ९० मिनिटे कधी संपली ते कळले नाही. या शोमघ्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण संपुर्ण शोची सीडी विकत मिळते. मात्र शो संपल्यावर कलाकारांबरोबर फोटो काढून घेता येतो...

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

तिरकीट's picture

5 Dec 2012 - 2:43 am | तिरकीट

सर्वच फोटो अप्रतिम आले आहेत.

बहुगुणी's picture

5 Dec 2012 - 2:51 am | बहुगुणी

प्रकाशचित्रेही आवडली (फक्त साईझ थोडा कमी केलात [६००X४०० वगैरे] तर उजवीकडचा साईडबार overlap होऊन जो किंचित रसभंग होतो तो होणार नाही.) त्या ग्रीष्ममंदिराच्या आसपासची स्वच्छता डोळ्यांत भरणारी आहे. आता चीनचं प्रवासवर्णन ओघात पूर्ण होऊ द्या, पण नंतर कधीतरी सविस्तर रेशीम-आख्यान लिहिता आलं तर बघा.

वृत्तांत आवडला. कलाकुसरीचे फोटोही आवडले. काही फोटो मोठे आल्याने अगदी त्या ठिकाणी नेऊन उभे करावे असे झाले. रेशमी कापडाला हात लावून बघावासा वाटला पण ते नेहमीचे भगवे ड्रॅगन कापड मात्र कंटाळा आणणारे आहे. ड्रॅगन लेडीचे बरेच प्रस्थ होते हे वर्णनावरून समजते.
बाकी मालक पुरुष जगभरातून संपत्ती गोळा करून आणेल यावरून धागा सुरु केला तर शतक गाठेल यात शंका नाही. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2012 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

चीनमध्ये लाल रंग हजारों वर्षांपासून संपत्ती, सुबत्ता, सत्ता व शांतीचे प्रतीक व शुभ मानला गेला आहे... केवळ राजघराण्यांतच नव्हे तर जनसामान्यांतही. कम्युनिस्टांनी तो रंग आपलासा केला ही फारच अलिकडची गोष्ट आहे. त्यामुळे चीन आणि लाल रंग यांची फारकत होऊच शकत नाही.

जगभरात कोठेही गेला आणि कुठ्ल्याही विचारसरणीचा असला तरी चीनी माणूस हा लाल रंग सोडत नाही... चीनी कॅपीटालीस्टाने रेस्तरॉ काढले तरी त्यांत लाल रंगाचेच प्राबल्या असते !

बंगालमध्येदेखील लाल रंग असाच दिसून येतो - कालीमातेच्या संदर्भात. त्यावरून एक मस्त कॉन्स्पिरसी थिअरीदेखील बनवता येऊ शकते ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Dec 2012 - 1:12 pm | llपुण्याचे पेशवेll

>> बाकी मालक पुरुष जगभरातून संपत्ती गोळा करून आणेल यावरून धागा सुरु केला तर शतक गाठेल यात शंका नाही.
मान्य, पण तो धागा चीन सरकारच्या लक्षात येऊ देऊ नका म्हणजे मिळवलेनीत्. नाहीतर गजहब व्हायचा, चीनमधे. :)
प्रवासवर्णन फार छान

इरसाल's picture

5 Dec 2012 - 9:30 am | इरसाल

प्रवासवर्णन आवडले. पुढील भागाची वाट पहात आहे.

आणी ते तुम्ही आहात होय, मला वाटले की तुमच्या फोटोंमधे तो पांढरा शर्ट आणी जीन्स जॅकेट वाला माणुस सारखा मधे मधे का येतोय ?

बॅटमॅन's picture

5 Dec 2012 - 12:05 pm | बॅटमॅन

मस्त फटू, लयच भारी!!!

मूकवाचक's picture

5 Dec 2012 - 5:44 pm | मूकवाचक

+१

लई भारी, पुन्हा एकदा धन्यवाद.

त्या बोटीच्या ड्रॅगनचा कांन पिळ्तानाचा फोटो लई भारी.

तुम्ही आर्मर्ड फोर्सेस मधुन रिटायर्ड झालेले आहात काय ? आणि अजुन एक या सगळ्या प्रवासाची व्यावहारिक बाजु कधी समजावुन सांगाल काय,अर्थात विनंती आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2012 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

व्यावहारीक म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते नीट कळले तर काही सांगता येइल.

आर्मर्ड फोर्सेस मेडिकल सर्विस मध्ये काम केले आहे पण भारताच्या नाही. पण हा प्रश्ण कशावरून विचारलात?

५० फक्त's picture

5 Dec 2012 - 6:56 pm | ५० फक्त

व्यावहारिक म्हणजे, एकंदर प्रवास कोणत्या वाहनातुन झाला, पर्याय काय आहेत, बजेटची रेंज काय, अराउंड द चीन इन ८ डॉलर असलं काही करणं शक्य आहे का वगैरे.

बाकी ते आर्मर्ड फोर्सेस तुमच्या मिश्या आणि नजरेवरुन वाटलं, म्हणुन विचारलं. रागावला नसाल अशी अपेक्षा, (नाहीतर माझा ही कान पिळाल ड्रॅगनचा पिळलात तसा.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2012 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो राग कसला त्याच्यात? अचानक असा प्रश्न आला म्हणून कुतूहलाने विचारले. काही मनात आले तरे जरूर विचारा. I have nothing to hide ! (; o.

चीन ऑस्ट्रेलीया-स्विझर्लड इतका महाग नसला तरी व्हिएतनाम-श्रीलंके एवढा स्वस्तही नाही-- साधारण कोठेतरी मध्यावर आहे. शिवाय चीनचा पर्यटन व्यवसाय खूप पुढारलेला आहे त्यामुळे ऑप्शन्स व त्यानुसार किंमतीतही खूप फरक पडू शकतो. सुदैवाने आंतरजालावर पुरेशी माहिती मिळते. टूर ऑपरेटर्सही मदत करतात. एकदा तुमच्या टूरबद्दलच्या प्रेफरेंसची बोलणी झाली की किंमतीबाबतीत विचारायला किंचीतही सन्कोच करू नका. जास्त खर्च होतो असे वाटले तर स्पष्टपणे (अर्थातच सौजन्याने) आपले म्हणणे सांगा. योग्य पर्याय योग्य किंमतीत मिळवण्यास मदत करण्याठीच टूर मॅमेजर्सची नेमणूक असते. अर्थात दुर्दैवाने भारतात या आंतर्रारष्ट्रीय स्तरावरच्या मानदंडास बरेच अपवाद सापडतात. पण माझा आंतरराष्टीय कंपन्यांचा अनुभव बरचसा चांगला-ते-आश्चर्यपूर्ण सुखदायी आहे. मी शक्यतो स्थानिक (भेट देण्याच्या देशातील) टूर ऑपरेटर्स निवडतो. अर्थात, वरील सर्व जमेस धरूनही आंतरजालाला वापरून स्वतः केलेल्या संशोधनासारखा इतर पर्याय नाही कारण जागतीक पर्यटन व्ययसाय इतक्या वेगाने बदलतोय की आजची माहिती ऊद्या जुनी होतेय. शिवाय माहित नसलेले / विचारात न घेतलेले अनेक पर्यायही आंतरजालावर सापडतात. मी टूरचे ठिकाण ठरवलेकी एक आंतरजाल संशोधन मोहिमच ऊघडतो आणि मग टूर मॅनेजर्सचा ऊपयोग ईटीनेररीवर शेवटचा हात (final touches) फिरविण्यासाठी करतो.

वरील कारणांमुळे मी साधारणपणे काय न चुकता बघावे आणि काय चुकले तरी चुकचुक वाटण्याची गरज नाही हे नोंदवण्यावर भर देत आहे. परन्तु काही विशेष माहिती हवी असल्यास निसंकोचपणे विचारा. योग्य उत्तरदेण्याचा प्रयत्न करण्यात आनंदच होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 1:55 pm | अत्रुप्त आत्मा

ला.....................................जव्वा................ब..........!!!

मीनल's picture

5 Dec 2012 - 5:37 pm | मीनल

त्यावरच्या मंदिरात अनेक हात असलेली मूर्ति किती सुंदर आहे नाही का? आपल्या श्री विष्णुसारखी वाटते.

ते भडक सिल्क आहे छान. पण फारच जर्ड आहे. मुंबईत वापरणे शक्य नाही. इथे अमेरिकेत तर ते रंग अति भडक दिसतील. मी त्यकापडाच्य्चे बटवे, चष्म्याच्य डब्या लहान डब्या, वॉल पिसेस घेतले आहेत.

तिथले पेंटिग्ज अप्रतिम. तेव्हा ते खूप आवडायचे. आता अमेरिएक्त आल्यापासून काहीसे भडक वाटायला लागले आहेत. तरी इथल्या घरातल्या भिंतींवर यूनिक दिसतात.

Forbidden City चे नाव तसे का आहे ते कळले असेलच. कुणालाही या Cityच्या आत प्रवेश नाही म्हणजे तिथे सर्व काही उपल्ब्ध असावे. तिथे काम करणा-या कार्मचा-यांची सामाजिक पातळी बाहेरेल समाजात उच्च मानली जायची. सिंह, सिहिण आणि बछडा जिथे तिथे दिसले असतिल. मकीक लहानशी जोडी आणली आहे.

खूप आठवणी येत आहेत. किती लिहावे बरे?

मी त्यकापडाच्य्चे बटवे, चष्म्याच्य डब्या लहान डब्या, वॉल पिसेस घेतले आहेत.

हेच म्हणायचे आहे. म्हणजे मी नाही घेतले पण सगळ्यांकडे चीनमध्ये जाऊन आल्यानंतर त्या रंगाचे लहान मुलींचे कपडे, बटवे, पिशव्या पाहिले आहेत. "चीनची वारी झाली काय?" असे विचारले की लगेच या कापडाचा बटवा भेट म्हणून देतात.

बाय द वे, The Legend of King Fu या शेवटच्या फोटोतली ललना त्या शोमधे काय काम करते?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2012 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती त्या शो मधली जागतीक किर्तीची कसरतपटू आहे.

तिनही भाग एका दमात वाचून काढले.प्रवास वर्णन उत्तम्,फोटोही अप्रतिम.
पुढच्या भागाची वाट पाहातोय.

गणामास्तर's picture

5 Dec 2012 - 7:12 pm | गणामास्तर

लै म्हणजे लैचं भारी फोटो अन वर्णन सुद्धा..लवकर टाका पुढचे भाग.
एकदा आफ्रिका बघायचे स्वप्न पुर्ण झाले की चीन कडे मोर्चा वळवावा म्हणतो. :)

टुकुल's picture

6 Dec 2012 - 10:13 am | टुकुल

तिन्ही लेख वाचले आणी नीट पाहीले. खुपच सुंदर सफर घडवलीत चीनची, त्याबद्दल धन्यवाद :-)

बादवे, तुम्ही आधी म्हणल्याप्रमाणे चीन हा तुमच्या भेटीचा २१ वा देश, मग ईतर २० देशांबद्दल पण येवु द्या थोडी थोडी माहीती तुमच्या सोयीनुसार.

--टुकुल.

हर्शयोग's picture

6 Dec 2012 - 6:49 pm | हर्शयोग

अप्रतिम

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2012 - 10:33 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वांचे प्रतिसादांबद्दल धन्यवाद !