हिमरंग

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
16 Aug 2012 - 11:22 am

पूर्वरंगमध्ये सेवाधामी संस्थांच्या कामाची, लेखिकेच्या दंतसेवा शिबिरांची व तेथील लोकांची, त्यांच्या समस्यांची माहिती मिळते. हिमरंग ह्या दुसर्‍या भागांत लेखिकेने हिमालयात केलेल्या भटकंतीची ओळख होते. भटकंती म्हणजे ट्रेकिंग. गाडीतला प्रवास नव्हे. आणि थोड्याथोडक्या नव्हेत, पूर्‍या सोळा सफरींची सुरेख वर्णने येथे आहेत. कैलास-मानस, एव्हरेस्ट बेस कँप, पुष्पावती ( Valley of flowers), गंगोत्री येथील ट्रेकची वर्णने आपण सर्वांनी वाचलेली असतीलच. लेह-लडाखलाही हल्ली बरेच जण जातात. पण मुक्तिनाथ हिमल, स्वर्गारोहिणी, तुंगनाथ अशी नावेही आपण ऐकलेली नसतात. अशा ठिकाणी केलेली भटकंती एका अनोख्या दुनियेत आपणास घेऊन जाते. शिवाय लेखकाची लेखनशैली, त्याने काय पाहिले, रस कशात, यामुळेही फरक पडतोच.
सर्वसाधारण ट्रेकिंग करणारे आपला दम तपासणे, निसर्गसौंदर्य पहाणे या कारणाकरिता हिमालयात जातात तर अमरनाथ, गंगोत्री, कैलास-मानस करणारे मुख्यतः धार्मिक उद्देशानेच, यात्रा करणे या एकमेव उद्देशानेच कोणतेही कष्ट सहन करण्यास तयार असतात. ३२ वर्षांपूर्वी हिमालयात ट्रेकिंगला गेलो असतांना वाटेत एक साठीतला संन्यासी भेटला. पायात फाटक्या चपला. डोक्यावर एक फडके गुंडाळलेले, अंगात कफनी-धोतर व एका काठीला बांधलेले एक लहान बोचके. बस एव्हढेच. मी विचारले " बाबा, कुठे चाललात ? " तो उत्तरला "केदारनाथला. " मी अचंबित होऊन विचारले "असे ? जेवणाचे वगैरे काय ? " तो म्हणाला " देतात कोणी कोणी. मिळते अधूनमधून." मी विचारले "वाटेत काही झाले तर ? " तो शांतपणे म्हणाला " वाटेत पडलो काय आणि पोचलो काय, फरक काय पडतो ? त्याला सर्व कळतेच आहे." तोही ट्रेकर व मीही ट्रेकरच, पण आम्हा दोघांमध्ये एक प्रचंड दरी. पण काही असेही यात्रेकरू असतात की शिवाला भेटावयाला जातांना त्याने निर्माण केलेले सृष्टीसौंदर्यही मोठ्या आनंदाने उपभोगतात. प्रतिभाताई यातल्या एक. अतिशय श्रद्धाळुपणे दर्शनाकरता जातांनाच, (सोळापैकी पंधरा ट्रेक्स,) त्यांनी रसिकतेने न्याहाळले, हिमालयातले सौंदर्य. शांत गंगा, खळाळणारी यमुना, स्वच्छ आभाळात दिसणारे तारे, रंग उधळणारे सूर्यकिरण, कोसळणारे हिमनग, सर्व रंगछटा दाखविणारी हिमशिखरे, आरशासारखी प्रतिबिंबे दाखविणारे तलाव, रंगिबेरंगी फुले. भिजवणारा पाऊस, पाय बधीर करणारा बर्फ, अंगात उबदारपणा आणणारा सूर्य .... सर्वाचा आनंद त्यांनी उपभोगला. आणि हो, दमणुक करणार्‍या पायपीटीनंतर मिळालेल्या (आले घातलेल्या) वाफाळणार्‍या चहाचाही !

त्यांची शेवटची सफर आहे एका समाधीसाठी. भगिनी निवेदिता यांच्या समाधीचे दर्शन घ्यावयाचेच ही उत्कट इच्छा. भूतानच्या सफरीहून कालिपाँगला पोचल्यावर त्यांनी चौकशीला सुरवात केली. कुणालाच सांगता येईना. मग कन्याकुमारीला अपर्णादीदींना फोन. त्यांनी कलकत्याच्या शारदा मठात चौकशी केली व 'दार्जिलिंग स्टेशन व विक्टोरिआ धबधबा यांच्या दरम्यान कोठेतरी" एवढे माहिती दिली. कालिपाँगहून निघालेल्या टॅक्सीतील सहप्रवाश्याने सांगितले " तुम्ही वेदांत आश्रमात जा, तुम्हाला पत्ता मिळेल." मग वेदांत आश्रमाचा पत्ता शोधून काढला. तेथील स्वामीजींना अहमदाबादहून एक बाई केवळ समाधी पहाण्याकरिता इतकी धडपडत आली याचे आश्चर्य वाटले. मग त्यांनी पुढची सर्व सोय केली. भगिनी निवेदिता यांची समाधी, त्या रहात होत्या ते घर असे सर्व पाहिले..." ११५ वर्षांपूर्वी सातासमुद्रांपलिकडून एक तरुण, सुंदर परदेशी मुलगी हिंदुस्थानात येते काय्, इथली संस्कृती आपलीशी करते काय आणि आपले सर्वस्व या देशाला देते काय, सगळंच धाडसी, सगळंच विलक्षण " माझ्या बरोबर आलेल्या ब्र.अक्षयचैतन्यांनी उदबत्ती व फुलेही आणली होती. मला म्हणाले, "तुम्ही इतक्या उत्कटतेने इथे आलात, तेव्हा मूर्तीची पूजा करा." मंत्रोच्चार करून, उदबत्ती लावून, फुले वाहून समाधीपुढे नतमस्तक झाले. भगिनी निवेदितांपाशी एकच इच्छा व्यक्त केली, " माझ्याही हातून थोडीशी का होईना पण नारायणी सेवा घडू देत," ही एकच सफर देवदर्शनाकरता नव्हती, ट्रेकिंगही नव्हते, निसर्गसौंदर्याचे आकर्षणही नाही पण " दार्जिलिंगला कधीकाळी गेलो तर या समाधीपाशी जाईन " असे प्रत्येक वाचकाला वाटेल इतक्या समर्थपणे हा लेख लिहला आहे.

ईश्वर आणि निसर्ग इतकीच आत्मियता प्रतिभाताईंना माणसांबद्दल आहे. गरज ओळखून चहा वेळेवर हजर करणारा टपरीवाला, वाटेत टॅक्सी थांबवून हे देऊळ, हे स्थळ पहाच असे सांगणारा टॅक्सीवाला, गावात आलेल्या बाईला यमुनेच्या मंदिराबरोबर शनीचे मंदिरही पहा सांगणारा मुलगा, श्रद्धा पाहून पूजेला व फोटो काढावयास परवानगी देणारे पुजारी, पहाडी गीते गाऊन दाखविणारे हेल्पर, सर्वांबाबतीत त्यांना आवर्जून सांगण्यासारखे काही तरी सापडतेच. एडमंड हिलरी यांच्याबद्दल लिहतांना त्यांनी येथील लोकांकरिता केलेल्या कामाचे, ठिकठिकाणी बांधलेल्या शाळा, होस्टेल्स, हेल्थ सेंटर्स्,पूल याचे प्रतिभाताई कौतुकाने वर्णन करतात. शेर्पा संस्कृती जतन करावयाचा प्रयत्न, बांधलेल्या बुद्ध गोंपा व कटाक्षाने टाळलेले "धर्मांतर" याचा जनतेवर झालेला परिणाम सांगतांना त्या लिहतात "हिलरी व रेक्स फाफलू गावात दवाखाना बांधत होते व त्याच्या उदघाटनासाठी हिलरी यांची पत्नी व मुलगी काठमांडून विमानाने येतांना अपघात झाला व दोघीही स्वर्गवासी झाल्या. त्यावेळी फक्त हिलरींवरच नव्हे तर सबंध कुंभू व्हॅलीमध्ये दु:खाचे सावट पसरले होते. तरीही हिलरी पुन्हा पुन्हा इथे येत राहिले, काम करत राहिले."

पहिल्या लेखाप्रमाणेच इथेही मी पुस्तकातले काही उतारेच देत आहे. लेखनमर्यादा लक्षात घेऊन काही थोडेच.

राफ्टिंगच्या वेळेस नदीच्या दोन्ही बाजूला निसर्गाचा नजारा देखील किती बघू आणि किती नाही असा होता. सिंधूच्या दोन्ही बाजूचे अंजिरी पखरण केलेले डोंगर,रंगाचा विविधोस्तव साजरा करणार हे डोंगर, अंगाखांद्यावर हिरवं लावण्य मिरवण्याच्याऐवजी सोनेरी वालुकामय लहरींची ओढणी सावरत होते. निसर्गाचे हे पर्वतीय रूप सिंधूच्या जलतत्वाला वंदन करत होतं ! चार तास चाललेला हा रंगीत चित्रपट केंव्हा पूर्ण झाला ते कळलंसुद्धा नाही..... वाळवंटी काव्य-लेहलडाख

बोगद्यातून सुपरफास्ट ट्रेन कशी धाडधाड करत बाहेर येते तशी ही भागिरथी या बर्फाच्या बोगद्यातून प्रचंड वेगाने गडगडात करत बाहेर येते. चित्त्तथरारक असे हे दृश्य ! या गडगडाटामुळे सगळा आसमंत व्यापून जातो.त्या आवाजाचे प्रतिध्वनी काळजाला कापत जातात. अंगावर अक्षरशः काटा उभा राहत्तो. बोगद्याच्या ८ फूट x ८ फूट मुखामधून (opening) भागिरथी जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर मोठेमोठे हिमखंडही बाहेर फेकले जातात. या हिमखंडांमुळे भागिरथीच्या दोन्ही बाजूने आणि बोगद्याच्या वरूनही बर्फाच्या अवाढव्य भिंती तयार झाल्या आहेत. कधी कधी हवेतल्य उष्णतेमुळे ह्या बर्फाच्या भिंती धडाम करत कोसळतात. अशावेळी जर कोणी त्या ठिकाणी असतील तर आपत्तीच ! .. गर्जना करत, मोठ्ठाले हिमखंड बाहेर फेकत भागिरथी गोमुखातून बाहेर येते, जरा पुढे जाते आणि मग थोडी शांत होते. तिचा वेग थोडा मंदावतो आणि पात्र ही विस्तारित होते. .... तपोवन.

हनुमानचट्टीपासून १० कि.मीटरचा ट्रेक करून गेल्यावर समुद्रसपाटीपासून १२,००० फूट उंचीवर यमुनोत्री आहे. गोमुखला गंगा जी पृथ्वीवर अवतीर्ण होते ती रौद्र स्वरूपात, यमुना मात्र खडकांमधून एखाद्या कारंज्याप्रमाणे थुई थुई नाचत्,लचकत, मुरडत पृथ्वीवर अवतरते. आपलं मन पुलकित करते. यमुनेची ही अनोखी नजाकत बघून वाटतं, श्रीकृष्ण तिच्यावर का प्रेम करत होते ! याच यमुनाजलात खेळून कृष्ण कन्हैयाने बर्‍याच रासलीला पेश केल्या होत्या. ...यमुनोत्री.

मखमली आकाशांत चंद्राची रुपेरी कड डोकावू लागली आणि चांदण वसतीला आलं. माझे मन अमृताने न्हालेल्या क्षणांना आठवत, शब्दांची फुलं गोळा करत काव्यात गुंफायला अधीर झालं.

पारदर्शी आभाळाने उधळले निळे रंग !
कालिंद पर्वताच्या माथी कोरले सूर्यबिंब !
खट्याळ यमुना आहे त्याच्या अंतरी !
उगीच नाही वेडावला तो श्रीहरी !

तर असा हा हिमरंग. नुसते "प्रवासवर्णन" न करता हिमालयाचे विविध रंग दाखविणारे, स्थानिकांशी संवाद करणारे, निसर्गाशी नाते जोडणारे, थोडक्यात "संग्राह्य " पुस्तक.

पूर्वरंग-हिमरंग ले.: डॉ. प्रतिभा आठवले

प्रकाशक : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

इरसाल's picture

16 Aug 2012 - 11:29 am | इरसाल

आवडले. पुस्तक संग्रही असावे असे वाटतेय.

प्रचेतस's picture

16 Aug 2012 - 12:13 pm | प्रचेतस

उत्तम परिचय.

मूकवाचक's picture

16 Aug 2012 - 12:43 pm | मूकवाचक

+१