स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम.
एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते. दर वर्षी 'देश' बदलून मिळतो. तशी सगळ्याच खेळांत मजा येते. पण 'भारत' हा देश कधी हातांत येईल याची सगळे आतुरतेने वाट पहातात. कारण तिथल्या 'लोड' केलेल्या खेळांत जे वैविध्य आहे ते इतर कुठेच नाही यावर सर्व बाळांचे एकमत आहे. काम चालू असताना हळु आवाजांत एकमेकांशी बोलण्याची मुभा आहे. तिथे चाललेले हे कांही 'संवाद'!
बाळ १ : काय रे इतका कसला आनंद झालाय् ?, फारच आरोळ्या ठोकतो आहेस मगापासून .
बाळ २ : अरे या भारतावर खेळायला फारच मजा येतीये रे! मला तर एक कधी न संपणारा खेळ मिळाला आहे.
बाळ १ : कुठला रे ?
बाळ २ : हे बघ, आपल्या पूर्वजांच्या वेळी एवढी प्रगती झाली नव्हती. इथे बसून असं कांही करता यायचं नाही. तिथे जाऊन काम करावं लागायचं. वेळ बराच जायचा. त्यांत तेंव्हा तिथे 'देवाची माणसं फार होती, त्यामुळे सगळ्यांची मनं काबीज नाही करता यायची. हिंसाचार, दंगली चालू केल्या तरी फार काळ टिकवता यायच्या नाहीत. ती दुष्ट देवाची माणसं आपला खेळ बंद पाडायची. आता कित्ती सोपं झालंय, इथे बसून या कठपुतळ्या हलवता येतात आणि त्यांची मनं काबीज करणं किती सोप्पं झालाय्!
बाळ १ : पण ते सगळीकडेच करता येताय्, बघ नं, मला अमेरिकेत पण खूप मजा येतीये.
बाळ २ : अरे, मला तर एक न संपणारी ' गोष्टच मिळालीये! तिथे आता माणसांची इतकी गर्दी झालीये की त्या रिकामटेकड्यांच्या धार्मिक, प्रादेशिक भावनांना हात घालणं आगदीच सोपं झालाय्.
बाळ १ : ते कसं ?
बाळ २ : हे बघ, मी तो जुना दोन धर्मांचा खेळ खेळून बोअर झालो होतो, त्यापेक्षा हा नवीन जातींवरचा खेळ फारच छान आहे. एका वेळेला एका जातीला पेटवायचं, नुसतं त्यांच्या नेत्यावर 'टिचकी' मारली की ती सगळी 'कौम' स्वयंचलित' होते. मग ते आपोआप रेल्वेचे रुळ उखडतात, तोडफोड करतात, नंग्या तलवारी घेऊन फिरतात. साहेबांना मानायला पाहिजे हं, काय जबरदस्त रचलाय हा खेळ त्यांनी, आपलं कसब दाखवायला भरपूर वाव आहे. शिवाय वैविध्य किती! एका जातीला महिनाभर खेळवलं की दुसरी! महिने बारा पण जाती अगणित.
बाळ १ : पण काय रे, ते सरकारी लोक काय नुसते बघत रहातात? त्यांत पण 'देवाची माणसं असतीलच की.
बाळ २ : छे रे, तोच तर हल्ली आपल्या साहेबांना फायदा आहे. तिथे पण सगळी आपलीच 'प्यादी' आहेत, ती आपल्या साहेबांशी एकनिष्ठ आहेत. आणि त्यातून त्यांनी कांही उपाय केले की आपण इकडे नवीन 'कौम' वर टिचकी मारायची.
बाळ १ : पण तरी देवाची खूप माणसं खाली आहेत ना ?
बाळ २ : हो, पण ती आता फारसं काही करु शकत नाहीत. ती कधी ही सत्तेवर येणार नाहीत याची तजवीज आपल्या साहेबांनी आधीच करुन ठेवलीये.
बाळ १ : अरे वा, मग आपला विजय आणि देवांचा दणदणीत पराभव आता नक्कीच की!
बाळ ३ : ए, गपा रे, मला या 'पाकिस्तानात' पण तेवढीच मजा येतीये.
बाळ ४ : हं, बघू या , यावर्षीचा 'महाविध्वंसक' चा कप कोणाला मिळतोय ते !
बाळ ५ : शू s s s s, शांतता , सैतानसाहेब येताहेत !!!
प्रतिक्रिया
22 Jun 2008 - 11:18 am | सखाराम_गटणे™
कथानक चांगले आहे.
लवकरात लवकर दुसरा भाग टाकावा ही विनंती.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))