सायोनारा s s

डॉ अशोक कुलकर्णी's picture
डॉ अशोक कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Jun 2012 - 6:24 pm

सायोनारा s s

नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते. आपल्या बॅगेतून त्यांनी एक छोटेसे पार्सल काढले आणि माझ्या हातात देत म्हणाले: "धिस इज फॉर यू !" मला तरी ही काही लक्षात आलं नाही हे बघून ते म्हणाले: "यू हॅड रीटन टू द कंपनी, नो ?" आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे झालं होतं असं की आमच्या औरंगाबादच्या ’नाट्यरंग" नं एक बालचित्रपट काढला होता. नांव होतं "सोनेरी डोक्याचा मासा". माझा मित्र कै. कुमार देशमुखच्या याच नावाच्या बालनाट्यावर आधारीत असा तो पिक्चर. सगळेच हौशी. सगळ्यांनी कॉंट्रीब्यूशन केलं. त्यावेळी सोळा एम.एम., ३५ एम.एम. आणि ७० एम.एम. मधे चित्रपट निघत. पण ते काही आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणून सुपर एट मधे तो चित्रपट काढला. त्यासाठी लागणारा कॅमेरा आमचे खामगावचे स्नेही बालासाहेब खेकाळे यांचा. तेच कॅमेरामन. रंगीत चित्रपट पूर्ण झाला. तो दाखवण्यासाठी दोन सुपर एट प्रोजेक्टर्स घेतले आणि शाळा-शाळातून तो पिक्चर दाखवाला. पण मधेच काही तरी गडबड झाली आणि दोन्ही प्रोजेक्टर्स बंद पडले. मुंबईला चौकशी केली तेंव्हा कळलं की एक सुटा भाग आहे, तो मिळाला तर काम होईल, पण तो मुंबईत उपलब्ध नाही. काय करावं कळेना. महिना गेला. शेवटी मी संस्थेचा सचिव म्हणून त्या जपानी कंपनीला रागारा्गानं पत्र लिहिलं आणि विसरून गेलो! आता त्या जपानी कंपनीनं तो सुटा भाग पाठवला होता! मला कळेना की या माणसाचा आणि त्या कंपनीचा काय संबंध? कारण ते प्राध्यापक होते. मी त्यांना तसं विचारलं. यावर त्यांनी सांगितली ती हकिकत ऐकून तर मी थक्कच झालो. त्या जपानी कंपनी कडे माझा पत्ता होता. त्यांनी जपानमधील भारतीय दूतावासाकडे चौकशी केली की औरंगाबादला कोण जपानी मंडळी अशात जाताहेत. तिथं त्यांना या कॉन्फ़रन्स ची आणि या प्राध्यापकांची माहिती कळाली. मग त्यांनी यांना गाठलं आणि तो सुट्टा भाग मला द्यायची विनंती केली आणि पुढचं सगळं मी सांगितलंच आहे. हा सगळा प्रकार एखाद्या भारतीय वस्तूबद्दल घडता तर... याचा विचार करून मला खरंच सांगतो, गहिंवरून आलं. आणखी आश्चर्य तर पुढेच आहे. तो भला प्राध्यापक म्हणाला: " आय ऍम सॉरी फॉर द इन-कन्व्हीनिअन्स. काईंडली ऍक्सेप्ट अवर सिन्सिअर अपोलोजीज." असं म्हणून त्यांनी खिशातून एक पाकिट काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाले," धिस शूड कव्हर युवर लॉसेस!". पाकिटात त्या प्रोजेक्टरच्या किमतीच्या जवळपास १०% भरेल इतकी रक्कम भारतीय चलनात होती, नुकसानभरपाई म्हणून! वर कंपनीचं पत्र. दिलगिरी व्यक्त करणारं आणि त्या प्रोजेक्टरचा एक महत्वाचा दोष दाखवल्या बद्दल वर आमचेच आभार मानणारं! माझ्या डोळ्यांसमोर भारतीय दुकानदारांचे आणि उत्पादकांचे अनुभव तरळून गेले.
दुसरा अनुभव असाच आहे. माझे एक स्नेही जायकवाडी धरणाच्या कामावर इंजिनिअर होते. तिथे जपानच्या सहकार्याने धरणावर रिव्हर्सिबल टर्बाइन्चा एक पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट ) चालू होता. मुख्य धरणातून पाणी काढून त्यावर गरजेच्या वेळी वीज निर्मिती आणि गरज कमी असते तेंव्हा ग्रीड मधून वीज घेवून हे पाणी परत धरणात असं त्या प्रकल्पाचं स्वरूप. त्याच्या अंतिम चांचणीची वेळ आली आणि काही जपानी इंजिनिअर्स आले. मला हा प्रकार पहायचा होता. त्या दिवशी ठरल्या प्रमाणे आमच्या इंजिनिअर स्नेह्याचा निरोप आला आणि जामानिमा करून मी गेस्ट हाऊस वर पोहोचलो. माझे स्नेही आणि त्यांचे सहकारी सुट-टाय या वेषात होते. ठीक ठरल्या वेळी ते जपानी इंजिनिअर बाहेर आले. अर्धी चड्डी आणि हाफ शर्टात! परिचय इत्यादी सोपस्कार आटोपल्यावर ते आमच्या स्नेह्यांना म्हणाले: "यू आर नॉट रेडी? वी आर लेट!" त्यावर आमची स्नेही निघू या म्हनाल्यावर त्यांनी अशा काही नजरेनं पाहिलं की सगळे सर्द झाले. चूक लक्षात आली. आमचे स्नेही धावत पळत घरी गेले आणि सैलसर कपडे घालून आले! उन्हा तान्हात हिंडून त्या जपान्यानं कधी मशीनच्या खाली जाऊन, तर कधी वर जावून, कधी गुढ्ग्यावर बसून तर कधी पाठीवर असं करत तपासणी पूर्ण केली तेंव्हा आमचे सर्वांचे चेहेरे पहाण्या सारखे झाले होते. सगळं आटोपून घरी आलो. रात्री दहाच्या सुमाराला निरोप आला की मला दवाखान्यात बोलावलंय. मी गेलो, तर आमचे स्नेही या जपान्याला घेवून आलेले. मी तपासणी केली. डी-हायड्रेशन झालं होतं. सलाइइन वगैरे सगळं झालं. तीन चार तासातच फरक पड्ला. मी दवाखान्यातच होतो. जातांना त्या जपानी इंजिनीअरचा चेहेरा कृतद्न्यतेनं भरून आला. सहज म्हणून त्यानं खिशात हात घातला आणि माझ्या हातात ४०० रुपये ठेवले. मी त्यांना समजावून सांगितलं की हे सरकारी हॉस्पिटल आहे. इथं मोफत उपचार होतात. पण गृहस्थ ऐकेना. उपचारासारखी एखादी गोष्ट फुकट मिळते हे त्याला पटेचना!! जपानी कोणाचे उपकार घेत नाही, घेतलेच तर ठेवत नाही वगैरे सांगायला लागला. मी ही इरेला पेटलो. "भांडणा"चा निकाल लागेना. शेवटी मी उपाय सुचवला. ते पैसे पुअर पेशंट फंड बॉक्स मधे टाकयचे. पण गडी स्वत:च्या हाताने टाकेना. मी पैसे तुम्हाला दिलेत, तुम्हीच काय वाटेल ते करा म्हणायला लागला. शेवटी मी माघार घेतली आणि माझ्या हातानं ते पैसे बॉक्स मधे टाकले. जातांना तो भला गृहस्थ कमरेत वाकून आणि हंसून मला म्हणाला: "सायोनारा !"
"लव्ह इन टोकियो" या सिनेमात लताजींच्या आवाजात "सायोनारा" हे गाणं आहे. मी ते बरेचदा ऐकलंय. पण शप्पथ सांगतो, खोटं नाही, मी त्या जपानी इंजिनीअरच्या तोंडून ऐकला त्या सायोनाराला तोड नाही!

--अशोक

हे ठिकाणलेखअनुभव

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

18 Jun 2012 - 6:29 pm | स्वैर परी

दोन्ही अनुभव अगदी छान च! :)

बॅटमॅन's picture

18 Jun 2012 - 6:30 pm | बॅटमॅन

दुसरा अनुभव रोचक.

डॉ अशोक कुलकर्णी साहेब, अजुन अनुभव येऊ द्यात.

सागर's picture

18 Jun 2012 - 7:04 pm | सागर

म्या घाबरलो ना वो डॉक्टरसाहेब... म्हटले तुम्ही सायोनारा म्हंताय की काय ;)

अनुभव आवडला डॉक्टरसाहेब. सरकारी इस्पितळातही फुकट उपचार असले तरी सामान्य माणूस तिकडे सहसा फिरकत नाही, पण डॉक्टरसाहेब तुमच्यासारखे सर्वजण सेवाभावाने काम करु लागले तर सध्या जो मेडीकल लाईन मधे बाजार सुरु झालाय तो नक्की थांबेल... :)

अजून अनुभव येऊ द्यात :)
मनापासून आवडला हा अनुभव

मदनबाण's picture

18 Jun 2012 - 7:09 pm | मदनबाण

बोध घेण्यासारखे अनुभव ! :)

प्रदीप's picture

18 Jun 2012 - 7:19 pm | प्रदीप

तुमचे अनुभवसिद्ध लिखाण नेहमीच आवडत आलेले आहे. आता इथे ते नियमित वाचावयास मिळेल अशी आशा करतो.

श्रावण मोडक's picture

18 Jun 2012 - 9:34 pm | श्रावण मोडक

सहमत!

मुक्त विहारि's picture

18 Jun 2012 - 7:35 pm | मुक्त विहारि

एक रोगी म्हणून (आमच्याकडून) तुम्हा डॉ.च्या काय अपेक्षा असतात ते पण

आणि

तुमच्या पेशात आलेले अनुभव पण.

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2012 - 7:29 pm | स्वाती दिनेश

दोन्ही अनुभव आवडले,
स्वाती

रेवती's picture

18 Jun 2012 - 7:57 pm | रेवती

दोन्ही अनुभव आवडले.
स्वातीताईसारखेच म्हणते.
जपान म्हटले की स्वातीताईच आठवते.
आता आपल्या लेखनामुळे जपानप्रेमी टीम तयार होऊ लागली की काय? ;)

jaypal's picture

18 Jun 2012 - 8:29 pm | jaypal

खरोखरीच बोधप्रद अनुभव आणि तो ईथे दिल्या बद्दल
धन्यवाद.

सोत्रि's picture

18 Jun 2012 - 8:41 pm | सोत्रि

मस्त विषय! माझे अनुभव एका नविन धाग्यात टाकावे इतके मोठे आहेत. टाकतो एक धागा.

- (जपान रिटर्न्ड) सोकाजी

उदय's picture

18 Jun 2012 - 8:44 pm | उदय

छान अनुभव. असेच अजून लिहित जा.
धन्यवाद.

जाई.'s picture

18 Jun 2012 - 8:56 pm | जाई.

लेखन आवडलं

सागरसारखं मलाही वाटलं की निरोप घेताय की काय?

दोन्ही किस्से आवडले. :)

प्रचेतस's picture

18 Jun 2012 - 9:34 pm | प्रचेतस

दोन्ही अनुभव रोचक.

टुकुल's picture

18 Jun 2012 - 9:50 pm | टुकुल

दोन्ही अनुभव आवडले..

--टुकुल

डॉ अशोक कुलकर्णी's picture

18 Jun 2012 - 9:58 pm | डॉ अशोक कुलकर्णी

खरं सांगू दोस्तानू...
जरा अपेक्षाभंगच झाला तुमचे अभिप्राय वाचून !!!
मिपा बद्दल जरा वेगळंच ऐकून होतो आणि त्यामुळे मध्यंतरी काही पोष्टायच्या फंदात पडलो नव्हतो. इथं उगाचंच एखाद्याला नामोहरम करणारे अभिप्राय दिले जातात इत्यादी इत्यादी. पण आता पहातो तो ...... !!!
हाच अपेक्षाभंग म्हणायचंय मला .... !!!

सागर's picture

18 Jun 2012 - 10:30 pm | सागर

सकाळी एक तर
दुपारी मी दुसराच असतो
समोर तुमच्या उभा तो
मी कुणी तिसराच असतो

डॉक्टरसाहेब एकदम कवी झालात ;)

चारोळी जाम आवडली :)

jaypal's picture

18 Jun 2012 - 10:49 pm | jaypal

ते "सायोनारा s s" म्हनुन ठोकलीया नवसा सुरवातीलाच, म्हंनताना गि-हाईक सावरुन धरलया.
म्होरल्या धाग्यासाठी लै जन दबा धरुन बस्ल्यात गल्लीत.

रेवती's picture

18 Jun 2012 - 11:35 pm | रेवती

अच्छा, तुम्हाला 'तसे' प्रतिसाद अपेक्षित होते तर!
जरा कुणकुण लागली असती तर कंपू जमवून धाग्याची शंभरी गाठून दिली असती किहो. ;)
आम्ही तसं काँट्रॅक्ट घेतो. ;)
नंतर संपादक धाग्याची शंभरी भरवतात ती गोष्ट वेगळी, पण आपण आपलं कार्य जोमानं करत रहायचं.
(प्रतिसाद हलका घ्या.)

सूड's picture

22 Jun 2012 - 6:36 pm | सूड

मस्त लिहीलंयत. फक्त आता लोक कितीही म्हणले 'आणखी लिहा आणखी लिहा' तरी तुम्हाला सवड असल्याशिवाय काही डकवू नका. लोकांनाही वाट बघू देत. अर्थात सल्ला देण्याइतका मी मोठा नाही, पण निरीक्षण नोंदवलं. ;) पुधाशु !!

डॉ अशोक कुलकर्णी's picture

22 Jun 2012 - 8:39 pm | डॉ अशोक कुलकर्णी

धन्यवाद !! लिहा म्ह्टलं की लिहीलं हे जमायला आपण काय वृत्त पत्रीय कॉलम थोडाच लिहितोय ! पण तुमचं सौजन्य संवत्सर संपल्यावर लिहिलं तर मग आमचं काय होईल या विचारानं थरकाप वगैरे बरंच काही होतं !!

डॉ अशोक कुलकर्णी's picture

22 Jun 2012 - 11:45 pm | डॉ अशोक कुलकर्णी

*

शिल्पा ब's picture

18 Jun 2012 - 11:54 pm | शिल्पा ब

एक्दम भावुक करणारे अनुभव.
मी खुप लहान असल्यापासुन "असं काहीतरी" वाचतेय पण भारतात असे अनुभव कध्धीच आले नाहीत. हे टीका म्हणुन नाही तर खरंच आले नाहीत. जाउदे.

तुमचे अनुभव इतर संस्थळांवर वाचलेले आहेत. इथेही लिहिते व्हा. आम्हाला वाचायला आवडेल.

अवांतरः तुम्हाला जर खोचक /टोचक प्रतिक्रिया हव्या असतील तर खवत तसं सांगावं आम्ही त्याचीही सोय करु. तुमचे जपानी करतात का असं? आं? ;)

मृत्युन्जय's picture

19 Jun 2012 - 10:09 am | मृत्युन्जय

दोन्हीही अनुभव भावले. तुम्ही जसे "जापानमध्ये असे नसते हो" म्हणता आहात तसेच कदाचित एक जपानी भारतातल्या डॉक्टरांचे कौतुक करताना " भारतात असे नसते हो" म्हणत असेल :)

तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय एका जपान्याच्या मनातली भारताबद्दलची प्रतिक्रिया उंचावण्यास कारणीभूत ठरला असेल असे वाटते आणि त्यामुळे आनंद झाला. शेवटी भारतीय संस्कृती आणि सभ्यता म्हणजे काय हो? अस्तंगत होत जाणारी ही आपुलकी आणि हा प्रामाणिकपणा तर आपली संस्कृती आहे ना?

बादवे मिपाकरांच्या प्रतिसादांनी खुप निराश झाला असाल तर पुढच्या खेपेला:

१. उर्मट पुणेरी दुकानदार (एक द्विरुक्ती?)
२. देशप्रेमी अनिवासी (एक विरोधाभास?)
३. प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता (एक मृगजळ)

यापैक्की कुठल्याही एका विषयावर तिरकसपणे लिहा. उरलेले काम आम्ही करु.

वरील तिन्ही विषय वर्ज्य असतील तर कुठलेही विचारजंती लेखन करा धाग्याची शंभरी नक्की ;)

दिपक's picture

19 Jun 2012 - 10:48 am | दिपक

मस्त अनुभवकथन. अशोकजी अजुन अनुभव नक्की लिहा

--
"सायोना~~रा ---सायोना~~रा---!" छे! जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो! - पु.ल.

पैसा's picture

19 Jun 2012 - 11:36 pm | पैसा

आयुष्य समृद्ध करणारे अनुभव, आणि लिहिलेत पण छान! आणखी येऊ द्या!

कलंत्री's picture

22 Jun 2012 - 2:40 pm | कलंत्री

लेख आवडला.

कालच तोत्ताचान पुस्तक वाचण्यात आले. काही कल्पना भन्नाटच वाटल्या उदा. शाळेत येताना मळक्या कपड्यात या म्हणजे मुलांना मनोसोक्त खेळता येईल, पोहण्याचा वर्ग त्यात भिन्नलिंगी मुलामुलींना एकमेकांच्या शरीराबद्दल आदर निर्माण होईल, जेवताना बत्तीस वेळा घास चावुन खा अशी कविता, एखाद्या शेतकर्‍याकडून शेतीचे तंत्र समजुन घेणे इत्यादी. जपानी माणसाला सलाम.

त्याच बरोबर हाही विचार आला की जपान्यांचे या जगाला नेमके काय देणे आहे? त्यांनी जगाच्या विचारात, संस्कृतीमध्ये काही विधायक बदल घडवुन आणला आहे काय? समजुन घ्यायला नक्कीच आवडेल.