प्रोमीथीयस नावाचे एक भव्य अंतरा़ळ यान पृथ्वीपासून करोडो मैलांवर असलेल्या एका आकाशगंगेतल्या सुर्यमालिकेतील एका ग्रहावर एका मिशनसाठी चालले आहे. त्यात सर्व अंतराळवीर दीर्घकाळीन (दोन वर्षांहून अधिक) झोप घेऊन तो ग्रह जवळ आल्यामुळे उठुन त्या ग्रहावर उतरण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण उठून तयार झाल्यावर वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड, त्या मिशनचा स्पॉन्सर, एका व्हिडीओद्वारे त्या सर्वांशी संवाद साधून त्यांना सांगतो, "हा व्हिडीओ बघितला जात असेल तेव्हा मी जिवंत नसेन पण आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांची उकल ह्या मिशनमुळे होणार आहे आणि ती मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि खळबळजनक असणार आहे." त्यासाठी त्याने पुरातन सांकेतिक चित्रांचा अभ्यास करणार्या? एलिझाबेथचा ह्या मिशनमध्ये समावेश केला आहे. तीची एक थियरी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करणार असते. काय असते ही थियरी...
पुरातन चित्रांचा अभ्यास करतना वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या संस्कृतीतील काही निवडक चित्रांमध्ये कमालीचे साम्य, साधर्म्य आणि एक संदेश आहे, ह्याचे सुसुत्रीकरण एलिझाबेथ हिने केलेल असते.
ह्या चित्रांमध्ये दाखवलेली एक ग्रहमालिका ही सजीवांची उगमभूमी आहे आणि तिथल्या 'इंजीनियर्सनी' मानवाला तयार केले अशी ही थियरी असते. आता हे इंजिनियर्स कोण? ते म्हणजेच 'देव' का हे शोधण्यासाठीच हे मिशन असते. त्या अंतरा़ळ यानावर डेविड नावाचा एक मनुष्यांप्रमाणे दिसणारा रोबोट असतो. तो ह्या सर्वांची मदत करण्यासाठी शिपवर पीटर वेलॅन्डने तैनात केलेला असतो.
एकदाचे ते अंतरा़ळ यान त्या ग्रहावर उतरते आणि त्यातले अंतराळवीर त्या 'इंजीनियर्सचा' शोध घेण्यास यानाच्या बाहेर पडतात. तिथे असलेल्या गुहेत शिरून कॅमेर्याेद्वारे तिथली सर्व स्थिती यानावर प्रक्षेपित केली जात असते त्याचे 3D मॉडेल यानातील अंतराळवीर अभ्यासत असतात. अचानक त्या गुहेत त्यांचा काही चमकणार्याष आकृत्या पळताना दिसतात आणि इथुन एक थरार सुरु होतो ह्या सिनेमात. त्या आ़कृत्या आभासी असतात आणि त्या बघून त्यांच्यापैकी दोघेजण घाबरून परत यानात जाण्यासाठी तिथुन पळ काढतात. त्या आ़कृत्या जिथुन एका भिंतीत अदृश्य झालेल्या असतात तिथे गेल्यावर त्यांना काही सांगाडे दिसतात आणि मानवाच्या उगमाचे कोडे उलगडणार असे वाटू लागले जाऊन उत्कंठा एकदम शिगेला पोहोचते. ती भिंत एका सांकेतिक खुणेने उघडण्यास रोबोट, डेवीड, यशस्वी होतो. त्याला अफाट माहिती फीड केलेली असल्यामुळे तिचे जलदरीत्या पृथःकरण करून त्याला हे शक्य होते. त्या भिंतीपलीकडे असते एक भव्य मानवी चेहेर्या च्या आकाराची मुर्ती!
त्यानंतर अचानक एक भयानक वादळ सुरु होते आणि त्या सर्वांना यानात परत यावे लागते. येताना मात्र त्या मानवी सांगाड्याच्या डोक्याच्या भागाला त्यांच्याबरोबर घेवुन यानात येण्यात ते यशस्वी ठरतात. त्याचवेळी तो रोबोट, डेविड, तिथली एक काचेची वस्तू कोणाच्याही नकळत, गुपचुप त्याच्या बॅगमध्ये टाकतो. पण यानात पोहोचल्यावर काय होते...
यानात पोहोचल्यावर त्या मानवी सांगाड्याच्या डोकेसदृश्य भागाचे विष्लेशण केले जाते तेव्हा त्यांना कळते की तो सांगाडा म्हणजे एक हेल्मेट आहे. ते तोडल्यावर त्याच्या आत एक मानवी मुंडके असते. त्यात असणार्यात मेंदुत विचार प्रक्रिया करण्याची शक्ती असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. लगेच एक इंजेक्शन देऊन त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो यशस्वी होतोही पण त्या चेहृयातुन रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात आणि सर्वजण त्या चेहेर्याीला एका काचेच्या बॉक्समध्ये बंद करतात. त्या बॉक्समध्ये त्या चेहेर्या चा स्फोट होतो. त्या रक्तातले DNA घेऊन त्याची पडताळणी मानवी रक्ताच्या एका सॅंपलबरोबर केली जाते आणि तो DNA मानवी DNA शी तंतोतंत जुळणारा असतो. आपल्याला तयार करणारे 'इंजीनियर्स' एकदाचे मिळाले ह्याचा आनंद सर्वांना होतो. आता परत त्या गुहेत जाउन त्या 'इंजीनियर्स'पैकी कोणि तिथे सांगाड्यांऐवजी जिवंत असल्यास त्याचा शोध घ्यायचा असे ठरते. त्याचवेळी यानात रोबोट, डेविड, गुढपणे कोणाशीतरी बोलत असतो आणि सिनेमातले गुढ एकदम अचानक वाढते कारण आकृत्यांना घाबरून यानात परत येण्यास निघालेले यानात परत आलेलेच नसतात, ते त्या गुहेतच विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असतात. डेविड त्याने आणलेल्या काचेच्या वस्तूमधील रक्तसदृश्य द्रवपदार्थ एलिझाबेथच्या पार्टनरला देतो जो तिचा बॉयफ्रेंडही असतो. थरार वाढतो आणि उत्कंठा लागून रहाते पुढे काय होणार ह्याची...
दुसर्याश दिवशी सगळे परत सगळे परत त्या गुहेत जातात आणि इथुन पुढे सगळ्या चित्रपटाचा बट्ट्याबोळ व्ह्यायला सुरुवात होते. अचानक एवढा चांगला विषय आणि आशय ह्यांच्यावर बेतलेला सिनेमा अचानक 'एलियनपट' बनतो. पुन्ह्या त्याच चित्रविचित्र किळसवाण्या एलियनचे अवतार दिसणे, त्यांनी विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असणार्यास अंतराळवीरांच्या तोंडात त्यांचा सोंडसदृश्य शरीराचा भाग सोडून त्यांना मारणे, एलिझाबेथ प्रेग्नंट राहून (रोबोट, डेविड जेव्हा तिच्या पार्टनरला रक्तसदृश्य द्रवपदार्थ देतो त्यारात्री त्यांना प्रेमाचा साक्षात्कार झालेला असतो) एकाच रात्रीतला गर्भ ३ महिन्यांच्या गर्भाप्रमाणे मोठा असणे, तो गर्भ म्हणजे एक एलियन असणे, तिने स्वतःचे स्वतः ऑटेमॅटिक ऑपरेशन मशिन वापरून गर्भपात करताना, तेही भूल न घेता लेसर किरणांनी पोट फाडून घेऊन, त्यातुन तो एलियन बाहेर पडणे असल्या मार्गानी सिमेना जायला लागून रसातळाला जातो.
पुढे कळते की वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड हा मेलेला नसून तो त्या यानातच असतो. त्याला अमर व्ह्यायचे असते म्हणजे मृत्युला हरवायचे असते त्यासाठी त्याने हा सगळा खटाटोप केलेला असतो, हाय रे कर्मा! हेही नसे थोडके म्हणून पुढे, ती गुहा ही गुहा नसून अजून एक अंतराळ यान असते जे मानवसदृश्य 'इंजीनियर्स'चे असते. ते 'इंजीनियर्स' सर्वजण नष्ट झालेले असतात आणी त्यांच्यातला फक्त एकजण जिवंत असतो आणि ते म्हणे त्या वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड आणि रोबोट डेविडला माहिती असते. तो शेवटचा मानवसदृश्य 'इंजीनियर्स' त्याचे अंतराळयान घेऊन पृथ्वीवर जाउन पृथ्वी उजाड करणार आहे कारण त्याला त्यांची जमात पुन्हा पृथ्वीवर वसवायची आहे. मग प्रोमीथीयस अंतरा़ळ यानाचा कॅप्टन पृथ्वीला वाचवण्यासाठी त्या 'इंजिनीयरच्या' अंतराळयानाला धडक देतो आणि पृथ्वीला एका भयानक संकटातून, आपत्तीपासून (?) वाचवतो. पण त्यावेळी एलिझाबेथ त्या ग्रहावर असते, ती वाचते. मग रोबोट, डेविड तिला सांगतो ही त्या ग्रहावर अजूनही अंतराळ याने आहेत. तो ती याने चालवू शकतो. मग एलिझाबेथ त्यातील एक यान वापरून पृथ्वीवर न परतता 'पुनश्च हरीओम' म्हणत खरोखरीच्या 'इंजीनियर्स'चा शोध घेण्यास अंतराळात निघून जाते. त्याचवेळी तिकडे त्या ग्रहावर तिच्या गर्भातून निघालेल्या एलियन मधून अजुन एक विचित्र एलियन सदृश्य आकृती पडद्यावर येउन, पडदा व्यापून खच्चून ओरडते, उगाचच....
इथे सिनेमा संपतो आणि पैसे वाया गेल्याची जाणिव होते. हॉलीवुडला पडलेली परग्रहवासीयांची भुरळ काही केल्या उतरायची नाव घेत नाहीयेय. खरंतर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या आकारातले परग्रहवासीयांचे काल्पनिक चित्रीकरण सुरुवातीच्या काही सिनेमांमध्ये आकर्षक वाटले होते पण आता त्यात तोच तोचपणा येऊन (ऑक्टोपससदृश्य प्राण्यांचे किळसवाणे दृश्यीकरण) परग्रहवासीयांवर आधारित सिनेमांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे जेव्हा प्रोमीथीयस (Prometheus) सिमेनाच्या प्लॉटबद्दल वाचले होते तेव्हा, आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांचा उहापोह ह्या सिनेमात केला आहे हे कळले होते. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मनुष्य फार पुरातन काळापासूनच करतो आहे. ह्या असल्या भारी भक्कम कंसेप्ट वर सिनेमा आणि तोही रिडले स्कॉट ह्या 'एलियनपटांचा' बादशहा असलेल्या दिग्दर्शकाकडून येणार म्हटल्यावर उत्सुकता खुपच होती. रिडले स्कॉट एलियन्सच्या पुढे जाउन आता 'देव' ह्या संकल्पनेशी त्यांचा (एलियन्सचा) काही संदर्भ जोडेल अशी आशा होती पण पदरी पूर्णपणे निराशा येते.
दिग्दर्शन आणि चित्रपटाचा कॅन्व्हास अप्रतिम आहे. ग्राफिक्स वापरून सिनेमाला दिलेला अंतराळ यानातला 'ग्लॉसी' लूक एकदम मस्त आहे. स्काय फाय सिनेमासाठी जे काही आवश्यक आहे तो सर्व मसाला ठासून भरलेला आहे पण सिनेमाचा आत्मा, पटकथा, त्या पटकथेचा अर्ध्यातून चुथडा झालेला आहे. खरेतर ह्या विषयाला साजेसा वेळ (२ तासांपेक्षाही जास्त) घेतला आहे रिडले स्कॉटने पण तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे. शेवटी एका एलियनला ओरडायला लावून ह्या चित्रपटाच्या सिक्वेलची जाहिरातही करून टाकली आहे.
चार्लीझ थेऱोन ह्या सुंदर आणि कमनिय हिरॉइनला चित्रपटात काहीही 'काम' नाहीयेय, तिला तिचा रोल फार महत्वाचा आहे असे सांगून चित्रपटात घेतले होते असे वाचले कुठेतरी आणि हसूच आले. बाकीच्या कलाकारांनी कामे त्यांच्या भुमिकेनुसार चांगली केली आहेत. Michael Fassbender ने साकारलेला रोबोट, डेविड, एकदम मस्त आणि पुर्णतः यंत्रमानव वाटतो. पण एकंदरीत हा सिनेमा एक परिपूर्ण अनुभव देण्यात पूर्णतः अयशस्वी ठरला आहे.
हॉलीवुडमधले चित्रपटही बॉलीवुड चित्रपटांना टक्कर देऊ शकतात, भरकटण्याच्या बाबतीत, ह्याचे उदाहरण असलेला प्रोमीथीयस सिनेमागृहात जाऊन बघण्याची घाई करण्याएवढा काही खास नाही. सावकाश डाउनलोड करून बघितल्यास एकदा बघायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 10:19 pm | संपत
चांगले परीक्षण. हल्लीचे रिडली स्कॉटचे चित्रपट बऱ्यापैकी गंडलेले वाटतात. तरीही स्पेशल इफेक्ट्स साठी बघीन म्हणतो.. पण हा 'एलिअन'चा प्रीक्वेल आहे ना?
10 Jun 2012 - 10:36 pm | इनिगोय
आत्मा बित्मा काय ते समजून घ्यायला मिपावरचे लेख वाचण्याला पर्याय नाय!! मृत्यूआधी काय, नंतर काय, अध्ये मध्ये काय, सगळंच आहे की इकडे..
10 Jun 2012 - 10:46 pm | सोत्रि
पटकथा लेखक स्कॉटच्या मते तरी ही एक स्वतंत्र कथा आहे. पण इथे त्याचा उहापोह झाला आहे.
- (एलियन्स नसावेत असे मानणारा) सोकाजी
11 Jun 2012 - 2:14 pm | शरभ
सोकाजीराव...तुम्हाला अस का वाटतं की एलिअन नसतील ?
आपण आहोत म्हणजे एलिअनसुद्धा असलेच पाहिजेत. नाहीतर आपणदेखील नसतो.
10 Jun 2012 - 11:59 pm | भडकमकर मास्तर
वाचतावाचताच बट्ट्याबोळ कुठून व्हायल सुरुवात होते ते कळाले आणि पटले...
11 Jun 2012 - 12:40 am | आळश्यांचा राजा
एका चांगल्या कल्पनेला आकार देता देता गंडलेले कथानक वाटते खरे.
थोडी भर - "So God created man in his own image" (Genesis 1:27) या बायबलमधील वचनाचा आधार घेऊन अशी कल्पना केली गेलेली आहे, की अज्ञात अतीतामध्ये एक "इंजिनियर" (माणूस/ पृथ्वीवरील जीवसृष्टी निर्माण करणारे ते "इंजिनियर") पृथ्वीवर येतो, एक औषध पितो, त्याचे शरीर विघटीत होते, पाण्यात मिसळते, आणि त्याच्याच डीएनए पासून पृथ्वीवर जीवसंसार सुरू होतो. (हे सिनेमात अगदी सुरुवातीला दाखवले आहे.) त्यामुळेच, त्या परग्रहावर मानवसदृश चेहेरे इत्यादि दिसतात. (खरे तर मानवच यांच्यासदृश असतो.) याच इंजिनियरला भेटून आपल्याला अमर होता येते काय ते पहायला वेलँड जगलेला असतो.
एलिझाबेथ डेव्हिडला शेवटी विचारते, की ह्या मंडळींनी आपल्याला निर्मीले, तर यांना कुणी निर्मीले? आणि यांनी आपल्याला निर्माण जर केले, तर हे आपल्याला पुन्हा नष्ट का करु पाहताहेत? याचा शोध घेण्यासाठी ती आणि डेव्हिड पुन्हा पुढील प्रवासाला निघतात.
असो. सिनेमा काही ठीक वाटला नाही हे खरे. निर्मीकाचा शोध घेणारा कॉण्टॅक्ट एकदम दुरुस्त आहे. कार्ल सेगनची रचनाच जबरदस्त आहे. इंडियाना जोन्स अॅण्ड द किंग्ड्म ऑफ द क्रिस्टल स्कल या सिनेमात शेवटच्या पाच मिनिटांत पण प्रमिथियस पेक्षा छान पद्धतीने हाच "इंजिनियर्स" चा प्रकार दाखवला आहे, त्यामुळे रिड्ले स्कॉट साहेबांचे जरा आश्चर्यच वाटले.
11 Jun 2012 - 8:37 am | प्रभाकर पेठकर
सुंदर परिक्षण. चित्रपट अर्थात बघणार नाहीच.
11 Jun 2012 - 8:48 am | श्रीरंग_जोशी
परीक्षणाचा पूर्वार्ध वाचून चित्रपटाकडून भव्यदिव्य अपेक्षा निर्माण झाल्या. परंतु उत्तरार्धाने लगेच जमिनीवर आणले.
यासाठी आपले विशेष आभार.
11 Jun 2012 - 9:31 am | प्रचेतस
सुंदर परिक्षण.
चित्रपट नक्कीच बघणार.(जरी शेवटी बट्ट्याबोळ झाला असला तरी. :) )
11 Jun 2012 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार
अपेक्षाभंग झाला वाचतानाच.
पण स्कॉट साहेबांचे कार्य म्हणजे घरचे कार्य असल्याने उपस्थिती लावली जाईलच.
परिक्षण आणि कुठे सावध रहावे हे आधीच सुचवल्याबद्दल धन्यवाद अण्णा.
11 Jun 2012 - 9:24 pm | सुहास झेले
मस्त परीक्षण ...
सोत्रि, ८०० एमबी वाचवलेत... कोणी डालो करून दिल्यावर बघण्यात येईल ;)