विद्वानाची* लक्षणे

आबा's picture
आबा in जनातलं, मनातलं
29 May 2012 - 5:43 pm

भूमिका :
हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.) अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे. ही गरज भागवणे हे आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व समजतो. तद् नुषंगाने आणि काही रचनात्मक कार्य करावे या हेतूने प्रेरित होऊन आम्ही ही मार्गदर्शन पर लेखमाला लिहित आहोत. त्या लेखमालेचे हे पहिले पुष्प आपल्याला अर्पण करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.

विद्वान म्हणजे:

तर मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी, "विद्वान म्हणजे काय?" हे स्पष्ट करणे योग्य ठरेल. आम्ही स्वतः ही विद्वान आहोतच, परंतू "आम्ही असे", "आम्ही तसे" हे सांगण्यापेक्षा, "विद्वान कसे" ते आम्ही सांगतो. (काय विनयशिलता आहे, वा! वा!). समजायला सोपे जावे म्हणून आम्ही ही लक्षणे संवाद स्वरूपात देत आहोत. सर्वसामान्य वाचकाला सुद्धा समजावे म्हणून संवाद बोली भाषेत लिहिलेला आहे.

खाली दिलेला "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" यांच्यातला संवाद वाचा. ("विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" ही नावे मोठी असल्यामुळे सोयीसाठी आपण त्यांना अनुक्रमे "पांड्या" आणि "सुभान्या" म्हणू.)**
__________________________________________________________

पांड्या उवाच:हे सुभान्या, विद्वान कैसा चाले, कैसा बोले, हे कथावे मजप्रति ...

सुभान्या उवाच:
toilet का? त्या तिकडे, उजव्या बाजूला...

पांड्या उवाच: toilet नाय रे भाऊ ,
विद्वान. म्हणजे "लै भारी" माणसाची characteristics विचारतोय मी...

सुभान्या उवाच: तुझ्या XXX, असं मराठीत बोल ना...

पांड्या उवाच: ठीके, यापुढे विचारीन, पण आता कर भुंकायला सुरुवात...

सुभान्या उवाच:पांडबा, विद्वान ओळखण्यासाठी काही ठराविक अशी कसोटी नाही रे. पण तुला समाजात विद्वान म्हणून ओळखले जायचे आहे का? तर मी मार्गदर्शन करतो.

पांड्या उवाच:ठीक आहे कर, पण सहसा चाऊस वापरावी लागणार नाही, असं बोल.

सुभान्या उवाच:सर्वप्रथम पांडबा कोणालाही झेपत नाहीत अश्या कवितांच, चित्रपटांच कौतुक करायला सुरुवात कर.
सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक.
दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर.
सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर.
आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव...

पांड्या उवाच:अशी पण वाक्ये असतात? उदाहरणे दे ना!

सुभान्या उवाच:ठीक आहे, ही वाक्ये लक्षात ठेव.
1) थ्री इडीयट्सच्या दिग्दर्शकास, रंगमंचीय अभिव्यक्तीला आवश्यक असलेली कलात्मक अनुभूती घेताना, व्यक्तिगत अलिप्तता जपता आलेली नाही.
किंवा,
2) लिओनार्डो दा व्हिन्चीने काढलेल्या मोनालिसाच्या चित्रातून त्याच्या सामाजिक उत्तरादायीत्वापेक्षा त्याची व्यक्तिनिष्ठता प्रकर्षाने जाणवते.
किंवा,
3) हिमेश रेशामियांच्या गाण्यावर टीका करणाऱ्या संगीतातल्या तथाकथीत जाणकारांना; त्यांच्या आवाजातली उत्कटता समजत नाही, हिमेशजी त्यांच्या आवाजामधून भांगारवाले, कल्हईवाले यांसारख्या कष्टकरी समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतात. अर्थात हे समजण्यासाठी सामाजिक जाणीवा सुस्पष्ट असायला हव्यात.
वगैरे वगैरे...

पांड्या ये पांड्या, काय झालं तुला? असे केस का उपटतो आहेस? अरे अरे थांब दगड नको मारूस...लागेल!

पांड्या उवाच: ल्ये गयी, द्यील म्येरा, मनच्यली...
खल्यीबल्यी खल्यीबल्यी खल्यीबल्यी..
मुंबई - ढोपरगाव बुद्रुक, डेक्कन किंग एक्स्प्रेस,
अपने निर्धारित समय पर platform नंबर
"पंधरा हजार सातशे ब्याण्णव पूर्णांक दोन दशांश" पर आ रही है ...
याद आ रही है.. त्येरी याssद आ रही है...
कलमाडी निर्दोष आहेत, हे विरोधकांच कारस्थान आहे....
मी आहे एक शून्य आकाशाच्या आकांक्षांना ग्रासलेलं...
मूळव्याध आणि गुप्तरोगावर आयुर्वेदिक इलाज केला जाईल, संपर्क साधा...
संपर्क, संपर्क.. पंक सम्पर्के कमळ का भिकारी, धूली सम्पर्के रत्न का भिकारी, तशी तूही मग मजसवें कशी भिकारी???

सुभान्या उवाच :वाचवा वाचवा ...
_________________________________________________________________
तर वाचकहो, वर दिलेला उद्बोधक संवाद वाचून, विद्वान या शब्दाबद्दलच्या आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. समर्थांनी लिहिलेली जशी मूर्खांची लक्षणे आहेत तशी विद्वानांचीही बरीच लक्षणे आहेत. (आहे, दोन्हीमध्ये फरक आहे, उगीच फालतू शंका काढू नका.) परंतू ती याच लेखमालिकेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये देत आहे.
इत्यलम.
_________________________________________________________________

टीपा आणि रेफ्रन्सा

* विद्वान हा शब्द या ठिकाणी आमचे गणिताचे मास्तर आम्हाला वापरत असत त्या अर्थी वापरला आहे.

** प्रश्न : पहिल्यांदा अभद्र नावे वापरून नंतर त्यांनाच पांड्या आणि सुभान्या म्हणण्या ऐवजी, थेट तीच नावे का वापरली नाहीत?
उत्तर क्र. १: आमची मर्जी!
उत्तर क्र. २: त्यांची खरी नावे "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" अशीच आहेत, परंतू विरुपाक्षनेत्राचे संपूर्ण नाव "विरुपाक्षनेत्र पांडूरंग लांडगे" आणि शाल्वरूद्राचे पूर्ण नाव "शाल्वरूद्र सुभानराव कामठे" असे असल्याने शाळेत मुले त्यांना अनुक्रमे पांड्या आणि सुभान्या असे म्हणायची.
उत्तर क्र. ३: भारी भारी नावे वापरणे हेही एक विद्वानांचे लक्षणच आहे.

कलासमाजकृष्णमुर्तीसद्भावना

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

29 May 2012 - 5:57 pm | सुहास..

मजा !!

अजुन येवु द्यात डिट्टेल वारी

विद्वान बनण्याचा अट्टाहास असलेला ( हे च्यायला अट्टाहास काय असते, सुहास ? )

पैसा's picture

29 May 2012 - 6:17 pm | पैसा

आणखी कृष्णमूर्ती लेख येऊ द्यात!

नाना चेंगट's picture

29 May 2012 - 6:25 pm | नाना चेंगट

वेलकम ब्याक :)

विद्वान सर्वत्र पूज्य*ते !

(पूज्य = ० )

बॅटमॅन's picture

29 May 2012 - 7:18 pm | बॅटमॅन

काय श्लेष मार्लाय...एकच नम्बर!!

आबा लयं झ्याक लिवलं हाय बगा तुमी...
सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक.
दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर.
सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर.
आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव...

हे वाचुनशान झाल्यावर लगेच मला एका धाग्याची आठवण आली, पण तो कोणता ते काय बी आठवेना फकस्त एक ओळ आठवली... मग गुगलवर ती ओळ टाकली आणि गुगलवल... लगेच तो धागा सापडला !
ती ओळ होती,माधुरीला अभिनय येत नाही. आणि धागा आहे प्रिय माधुरीस
चला... मी पुढच्या धाग्याची वाट पाहतो. ;)

इरसाल's picture

29 May 2012 - 7:17 pm | इरसाल

आपण दिलेल्या लक्षणांवरुन मराठी भाषेच्या सहिष्णुतेच्या गोडवे गाणार्‍या तसेच तथाकथित अभिमान बाळगणार्‍या आणी आपली अभिव्यक्ती व्यक्त करणार्‍या उच्च्भ्रु मान्यवरांच्या पेक्टोरल गर्डलवर (की पेल्व्हिक) लत्ताप्रहार करण्याचा मोह अनावर होत आहे.
त्याबद्दल आपले धन्यवाद.

अर्धवटराव's picture

29 May 2012 - 10:10 pm | अर्धवटराव

साथ पसरत चाललीय... रोग (इतरांचा) जीवघेणा आहे... अक्सर इलाज अव्हेलेबल आहे पण कोण नडलय च्यामारी... कितीही नाहि म्हटलं तरी पुढील भाग वाचायची खुमखुमी ( कि कंड) आहेच तर लपवुन का ठेवा... आणि नाहि म्हटलं तरी विद्वत्ता प्रसवायची थांबेल थोडीच...

अर्धवटराव

आबा's picture

29 May 2012 - 10:56 pm | आबा

:)

दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो,
जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो,
तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो...

एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ?

sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख...

असो, धन्यवाद वगैरे तर आहेच.

अर्धवटराव's picture

29 May 2012 - 11:12 pm | अर्धवटराव

>>दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो,
-- या रोगांमुळेच दुनिया चलती है... तेंव्हा ते जास्तीत जास्त बळावेत हेच वैद्यराजापाशी मागणे !!

>>जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो, तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो...
-- तर तर. एखाद्या कोल्ह्याने कुई केले आणि त्याला प्रतिसाद म्हणुन अकडु-पकडु ओरडला नाहि असं होतय का??

>>एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ?
-- अजीबात थंबु नये. थांबतो म्हणतो तरी कंड थांबु देईल का? मग त्याला कंड तरी का म्हणावा :D

>>sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख...
-- अजीबात दु:खी वगैरे होऊ नये. उदार अंतःकरणाने आपणाच त्यांना माफ करत सुटावे. शेवटी हे समाजसेवेचं व्रत, नाहि का.

>>असो, धन्यवाद वगैरे तर आहेच.
-- अहो एव्हढ्याने काय होतेय. अजुन पहिलाच समास पूर्ण केलात... संपूर्ण अध्याय बाकि आहे ना. नंतर करुच कि धन्यवाद-पानसुपारी वगैरे.

अर्धवटराव

आबा's picture

29 May 2012 - 11:20 pm | आबा

तर मग झालंच की, हेच म्हणणं आहे !

अर्धवटराव's picture

29 May 2012 - 11:23 pm | अर्धवटराव

:)

अर्धवटराव

छान वाटलं वाचुन, बरेच दिवसात मिपावर असं काही आलं नव्हतं. धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार

असे लोक्स आंतरजालावर 'विचारजंत' ह्या उपाधीने आधिच प्रसिद्ध आहेत.